Monday, June 23, 2014

माझा दर महिन्याचा खर्च किती?

"महिन्याला साधारण किती खर्च येतो?" असा एक अवांतर प्रश्न माझ्या आधीच्या एका लेखावर विचारला गेला होता. त्यावर निरनिराळी आकडेवारी देणा-या उत्तरांचा पाऊस पडला. "या गोष्टीसाठी तुमच्याकडे इतके पैसे पडतात? अबबबबब .. " किंवा "बैबैबैबै आता इतके तरी खर्च करायला नकोत का?", "होहोहो" किंवा "नैनैनै" वगैरे सारखे प्रतिसाद होतेच, शिवाय ठाण्यात किंवा पुण्यात, त्यातसुद्धा नौपाड्यात की कासारवडवलीला, नारायण पेठेत की पिंपळे सौदागरला असे भेदसुद्धा होते. दिल्लीचं तर सगळच अचाट असे इकडच्या लोकांना वाटले. मूळ लेखाच्या झुडपापेक्षा हे बांडगूळ बरेच मोठे होणार याचा अंदाज आल्याने ते कलम उपटून "सध्या मासिक खर्च किती आहे?" या नावाने दुसरीकडे लावले गेले आणि पाहता पाहता ताडमाड वाढले.

एवढेच नव्हे तर दर महिन्याला अमूक इतका खर्च होतो असे गृहीत धरले आणि इतके मोठे डबोले घेऊन आज कोणी धनिक बाहेरून भारतात किंवा महाराष्ट्रात आला तर तो माणूस यापुढे पैसे कमावण्यायाठी काहीही काम न करता अनंत कालपर्यंत (खरे तर त्याच्या अंतकालापर्यंत) आरामात राहू शकतो का? या विषयावर दुसरा धागा निघाला आणि तोही चांगला फुलला. यात भविष्याचा वेध घ्यायचा असल्यामुळे कल्पकतेला जास्तच वाव होता. काही लोकांनी एक्सेललशीटवरील आकड्यांची मोठमोठी भेंडोळी सादर केली. या चर्चेत एका विद्वानाने अशा प्रकारचे प्रतिपादन केले की (पैसे आहेत तोवर) रोज केक आणून खा आणि तो (कदाचित त्याचा रिकामा खोका) कपाटातही ठेवा म्हणजे पुढे खाता येईल. (यू कान्ट ईट अ केक अँड हॅव इट टू). अशी एक इंग्रजी म्हण).अशी एक इंग्रजी म्हण) ही चलाखी एका चाणाक्ष वाचकाच्या लक्षात आल्यावर पुन्हा हिशोब केला तेंव्हा अनंतकाल पुरणारे पैसे काही वर्षात संपून जातांना दिसले. माझ्याकडे जेंव्हा नव्याने पीसी आला होता, त्यावेळी मी अशा प्रकारची असंख्य कोष्टके तयार केली होती. त्या काळात माझा जो काही मासिक पगार होता त्यात दरवर्षी ५, १०, १५, २० टक्के वाढ धरली, त्यातून दरमहा ५, १०, १५, २०, २५ टक्के बचत केली, त्या बचतीमधून केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर दरवर्षी १०, १५, २०, २५  टक्के परतावा मिळाला, ते पैसे पुन्हा गुंतवले तर मी कधीपर्यंत लक्षाधीश, कोट्याधीश, अब्जाधीश वगैरे होईन ते पाहिले होते आणि मनातल्या मनात मांडे खाल्ले होते. पुढल्या काळात मीच काय, माझ्या ऑफिसातले सगळे प्यून आणि ड्रायव्हरदेखील लक्षाधीश झाले. मात्र फार थोडे लोक कोटीपर्यंत पोचले. पुढच्या पिढीतल्या ज्या मुलांनी मुंबईपुण्यात बांधल्या जात असलेल्या जंगी इमारतींमध्ये मोठाले फ्लॅट्स बुक करून ठेवले आहेत किंवा ताब्यात घेतले आहेत ते बहुधा आताच कोट्याधीश झाले असणार. पण तसे वागणे मात्र त्यांच्यासाठी जरा कठीण वाटते. कारण पुढच्या महिन्यातला ईएमआय कसा भरायचा याची काही लोकांना विवंचना असते आणि अमेरिकेत झाले तसे इकडे झाले आणि प्रॉपर्टीजच्या किंमती धडाधड कोसळायला लागल्या तर काय होणार? याची टांगती तलवार डोक्यावर लोंबकळत असते.

ऐसी अक्षरेवरले हे दोन्ही लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचतांना मला खूप गंमत वाटत होती. "महिन्याला साधारण किती खर्च येतो?" या प्रश्नाचे ठाम उत्तर इतक्या सगळ्या लोकांना माहीत होते, मग माझे मलाच ते का सापडत नव्हते? तसा मी गणितात फार कच्चा नाही. पूर्वीच्या काळातल्या एसएससी बोर्डाच्या परिक्षेत मला अंकगणितात १०० पैकी १०० गुण मिळाले होते. "यात काय आहे? ते तर आजकाल कोणालाही मिळतात!" असे कोणी ना कोणी म्हणणार म्हणून 'पूर्वीच्या' काळाचा उल्लेख! त्यामुळे निदान बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे मला अजूनही येत असतील असे समजायला हरकत नसावी. पण मुळात माझ्याकडे खर्चाचे विश्वसनीय असे आकडेच नसतील तर कशाची बेरीज आणि कशाचा गुणाकार करणार?

पन्नास वर्षांपूर्वी मी कॉलेज शिकायला शहरात गेलो तेंव्हा मला पै न पैचा (खरे तर नव्या पैशांचा) हिशोब लिहून द्यावा लागायचा. त्यामुळे मेसबिल सारख्या मुख्य आकड्यापासून केशकर्तनालयात द्यायच्या रकमेपर्यंत आणि कागद, पोन्सिल, वह्या, पुस्तकांपासून ते सुई दोरा आणि टांचण्यांपर्यंत सगळे खर्च मी एका कच्च्या वहीत लिहून ठेवत असे आणि महिना संपताच ते 'फेअर' करून आणि त्यात (अत्यावश्यक) फेरफार करून घरी पाठवून देत असे. पण या सगळ्याचा मला इतका उबग आला की मी स्वतः पैसे मिळवायला लागल्यानंतर कधीही त्यांचा हिशोब ठेवला नाही तो नाहीच! 

तसे पाहता माझ्या हातात रोख पैसेही क्वचितच मिळाले. लहानपणी आमच्या शेजारीपाजारी किंवा कोणा नातलगाच्या घरी कसलीशी पूजा असली किंवा त्यातल्या एकाद्या काकूच्या एकाद्या व्रताचे उद्यापन असले तर ते लोक  ओळखीतल्या दोन चार मुलांना जेवायला बोलावत असत. त्या जेवणातल्या पक्वान्नांवर आडवा हात मारून घेतांना मजा यायची, पण पानातल्या डाव्याउजव्या बाजूचे सगळे पदार्थ आवडत नसले तरी ते निमुटपणे गिळावे लागायचे. ते सगळे संपवल्यावर पाटावरून उठायच्या आधी दक्षिणा म्हणून एक भोकाचा पैसा हातावर ठेवला जात असे आणि घेतलेल्या कष्टाची थोडी भरपाई होत असे. यजमान जरा उदार असला तर त्याच्या दुप्पट किंमतीचा ढब्बू पैसा मिळायचा. ताट, पाट, रांगोळीवाल्या तसल्या पंगतीच आता दुर्मिळ झाल्या आहेत. दहा बारा वर्षांपूर्वी कुणाकडे तरी जेवण झाल्यानंतर हातात एक बंदा रुपया पडला होता ती मला मिळालेली शेवटची दक्षिणा. मित्रांच्या कोंडाळ्यात किंवा पिकनिकला गेलो असतांना कधी एक पैसा पॉइंट अशा 'डॅम चीप' स्टेकवर रमी खेळतांना नशीबाने दोन चार जोकर आले आणि प्यूअर सिक्वेन्सही लागला तर पंचवीस तीस रुपयांची रोख कमाई व्हायची, एकाद्या मेळाव्यात हाउसी तंबोला खेळतांना 'अर्ली फाय' किंवा 'लास्ट रो'चे बक्षिस विभागून मिळायचे. असे काही क्षुल्लक अपवाद सोडले तर माझ्या कमाईचे रोख पैसे हातात पडल्याचे फारसे आठवत नाही.  

मी नोकरीला लागल्यापासून मला चेकने पगार मिळाला आणि नंतर तर तो थेट बँकेतल्या खात्यावर जमा व्हायला लागला. व्याज, डिव्हिडंड, कन्सल्टन्सी फी, ऑनरेरियम वगैरे मार्गांनी झालेली इतर आयसुद्धा चेकने मिळत गेली किंवा परस्पर बँकेत जमा होत आली. इतकेच काय पण जी काही 'उत्तेजनार्थ' वगैरे बक्षिसे मिळाली ती सुद्धा भेटवस्तूंच्या रूपात किंवा चेकनेच! दर वर्षी आयकराचे विवरण (इन्कमटॅक्स रिटर्न) भरणे सक्तीचे झाल्यापासून मिळालेल्या उत्पन्नाचा वार्षिक हिशोब ठेवणे गरजेचे होते, नाइलाजाने बँकेची पासबुके पाहून तेवढे काम करावेच लागत होते. पण खर्चाचा हिशोब ठेवण्याची सक्ती नव्हती. त्यामुळे तो ठेवण्याची गरजही नव्हती. त्या काळात ई बँकिंग नव्हते तरी अनेक ठिकाणी चेकने पैसे दिले जात असत. त्यातले काही एक रकमी, तर काही हप्त्याहप्यांनी दिले जात. शिवाय खिशातल्या पाकिटातले किंवा कपाटाच्या खणातले किती पैसे कधी होममिनिस्टरच्या पर्समध्ये जातील आणि त्यांचे तिथून कोणत्या दिशेने बहिर्गमन होईल ते समजणे शक्य नव्हते. त्याबद्दल विचारण्याएवढे धारिष्ट्य मला मिळू दे अशी देवाला प्रार्थना करून काही उपयोग नव्हता. कारण माझ्यासमोरच अनेक देवळांच्या पेटीत किंवा पुढ्यात तिने पैसे ठेवलेले असल्यामुळे ते सगळे देव तिच्याच बाजूने झालेले असणार हे उघड होते. एकंदरीत काय? नेहमीच्या सर्वसामान्य खर्चाचा हिशोब ठेवण्याचा विचार मी कधीच मनात आणला नाही.

पंचवीस तीस वर्षांपूर्वी एकदा माझ्या इन्कमटॅक्स रिटर्नची कसून तपासणी झाली होती. त्या वेळी मला इन्कमटॅक्स ऑफिसरकडे जाऊन त्याला पासबुके वगैरे दाखवावी लागली. त्या गृहस्थाने सुद्धा "तुमचा महिन्याचा खर्च किती?" हा प्रश्न विचारला आणि मी उत्तरादाखल खांदे उडवून दाखवले. त्या काळात माझा मूळ पगार (बेसिक पे) दोन अडीच हजार रुपये असेल आणि महागाई भत्ता, शहर भत्ता वगैरे मिळून त्यावर आणखी सात आठशे रुपडे मिळत असतील. त्यातून सगळ्या प्रकारच्या छाटण्या होऊन दरमहा सुमारे दीड हजार रुपये बँकेत जात होते. त्यातले कधी बाराशेहे, कधी तेराशेहे तर कधी चौदाशेहे रुपये मी काढून घेत होतो आणि उरलेले शिल्लक पडत होते. त्या माणसाने हे आकडे पाहिले आणि माझ्यावर एक जळजळीत दृष्टीक्षेप टाकला. बाहेरच्या कोणा नवख्या माणसाला (किंवा कदाचित बाईंना) भेटायला जायचे म्हणून मी त्या दिवशी जरा बरे दिसणारे कपडे घालण्याची चूक केली होती. त्या काळातल्या सुखवस्तूपणाची निशाणी माझ्या पोटाच्या आकारावरून दिसत होती, चेहे-यावरही थोडा तुकतुकितपणा होता. हे सगळे त्याने एका नजरेत टिपून घेतले आणि तो उद्गारला, "तुमच्यासारखा माणूस आणि या मुंबईमध्ये हजार बाराशे रुपयात महिना काढू शकतो हे शक्यच नाही. तुमचे आणखी कसकसले उत्पन्न आहे ते ब-या बोलाने सांगा." 

मी माझे पगारपत्रक (पे स्लिप) काढून त्याच्यासमोर धरले आणि म्हंटले, "यातली उजवी बाजू वाचून पहा. मी ऑफिसने दिलेल्या घरात राहतो, त्याचे फक्त दोन अडीचशे रुपये भाडे कापले जाते. घरून ऑफिसला आणि परत घरी यायला ऑफिसचीच बस आहे, त्याबद्दल फक्त पन्नास रुपये घेतात, औषधोपचारासाठी आमची वैद्यकीय सेवा आहे, तिची वर्गणी महिन्याला तीस रुपये, मुलीचे शिक्षण फुकट, मुलाच्या शिक्षणासाठी आमच्या वसाहतीतल्या सेंट्रल स्कूलला वर्षातून एकदा चार पाचशे रुपये फी द्यावी लागते. मी जर बाहेर कुठे नोकरी करत असलो तर याच घराचे (त्या काळातसुद्धा) पाचसहा हजार रुपये भाडे पडले असते, ट्रेनचा पास, बस, टॅक्सी रिक्शा वगैरेंवर हजार बाराशे रुपये तरी खर्च आला असता, डॉक्टरची फी आणि औषधांची किंमत मिळून दीड दोन हजार रुपये खर्च झाले असते, शाळा आणि शाळेची बस यावर दोन मुलांसाठी मिळून दर महिना तीन चार हजार रुपये खर्च झाला असता. हे सगळे आकडे जोडले तर माझा पगार निदान बारा तेरा हजार रुपये तरी होईल. माझ्यासारख्यासाठी तेवढे पुरेसे असतील नाही का? शिवाय माझे हे सगळे खर्च आणि वीज, पाणी, सफाई, टेलिफोन वगैरे सगळ्यांची बिले माझ्या पगारातूनच कापली जातात. इन्कमटॅक्स, प्रॉव्हिडंट फंड आणि कसकसल्या वर्गण्याही कापून घेतल्या जातात. दर महिन्याला जे काही बारातेराशे रुपये मी बँकेतून काढतो ते फक्त खाणेपिणे, कपडेलत्ते, साबण, शँपू असल्या खर्चासाठी लागतात. मी दारूही पीत नाही किंवा महागड्या हॉटेलात जाऊन कोंबडीही खात नाही. कधी चेंज म्हणून आम्ही हॉटेलात गेलोच तरी इडली, डोसा किंवा बटाटा वडा नाहीतर मिसळ खाऊन येतो. एरवी घरची दालरोटी खाऊन राहण्यासाठी एवढे पैसे बख्खळ आहेत नाही का?" बिचारा निरुत्तर झाला. चुकीच्या बक-याला पकडून त्याच्यावर उगाच वेळ वाया घालवल्याचा कदाचित त्याला पश्चात्तापही झाला असेल. या ठिकाणी हे सांगण्याचा उद्देश एवढाच की त्या वेळी सुद्धा माझा महिन्याचा खर्च किती होता असे म्हणायचे? रोख खर्च होणारे हजार बाराशे, की पगारातून कापलेले पैसे धरून दीड दोन हजार की मार्केट व्हॅल्यूप्रमाणे बारा तेरा हजार?

त्याच सुमाराला मला कोणीतरी सांगितले, "बघा, त्या सुशीचा दीर आताच रिलायन्समध्ये लागला आहे. तुमच्याच वयाचा असेल, पण त्याला चांगला पंधरा हजार पगार आहे, आणि तुम्ही (दोन अडीच हजारात)?" मी शांतपणे म्हंटले, "असेल, पण मी छान वसाहतीतल्या उत्तम प्रकारच्या घरात राहतो, माझी मुले चांगल्या शाळेला चालत जातात, त्यांची काही काळजी नाही. आम्हाला गरज पडताच चांगल्यापैकी वैद्यकीय उपचार मिळतात, शिवाय माझे काम मला मनापासून आवडते, माझे सहकारी माझ्याशी फार चांगले वागतात. त्या सुशीच्या दिराकडे यातले काय काय आहे? आणि त्याला किती श्रम करावे लागतात तेही त्याला विचारा." माणसाचे उत्पन्न नेमके कशात मोजायचे असते आणि त्यातल्या प्रत्येकाचे पैशात मूल्य करता येते का?

आजकालसुद्धा जसे मला सर्व श्रोतांपासून मिळणारे पैसे परस्पर बँकेत येतात तसेच माझी बरीचशी देणी चेक पेमेंट, डेबिट वा क्रेडिट कार्डे, इंटरनेट बँकिंग वगैरेंमधून परस्पर बँकेतून भागवली जातात. दर महिन्याला घरातल्या उपयोगाच्या सामानाची यादी बनवायची आणि आणलेले सामान महिनाअखेरपर्यंत संपवायचे किंवा पुरवायचे असे आम्ही अलीकडे करत नाही. पूर्वी ग्राहकसंघाचे सभासद असतांना ते लोकच एक मोठी यादी पाठवत असत आणि त्यात आकडे घालून त्या यादीसोबत आम्ही एक कोरा चेक देत असू. जो सभासद त्या महिन्याचा हिशोब करत असे तोच त्यावर रकमेचा आकडा घालून तो चेक पुढे पाठवत असे. त्यानंतर कित्येक दिवसांनी सामान घरी यायचे. त्यामुळे 'इतके पैसे मोजून इतके सामान आणले' असा फील त्या काळातही कधीच आला नाही. आजकाल घरातल्या एकेका डब्यातले सामान संपायला येते तेंव्हा ते आणले जाते किंवा एकाद्या दुकानात गेलो असतांना तिथे ठेवलेले कोणतेही सामान जरा चांगले किंवा स्वस्त दिसते आहे असे वाटले की त्याची खरेदी होते. त्या विकत घेण्याचा महिन्यांशी सहसा थेट संबंध नसतो. यातल्या कोणत्याच खरेदीत एका वेळी खूप घसघशीत रक्कम खिशातून जात नसल्यामुळे ती किती गेली ते जाणवतही नाही.

आजकाल लक्षात येण्यासारखा मोठा खर्च असतो तो वैद्यकीय कारणासाठीचा. काही स्पेशॅलिस्ट डॉक्टर लोक एका वेळा हजार, दोन हजार, तीन हजार अशी जबरदस्त फी घेतातच, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करून घेण्यात आणखी दोन तीन हजार रुपये जातात, काही तपासण्यांसाठी तर चार पाच हजारांवर खर्च येतो आणि हॉस्पिटलायझेशन करावे लागले तर मग विचारायलाच नको. शिवाय डॉक्टरकडे आणि लॅबमध्ये टॅक्सीने जाण्यायेण्यात हजार रुपये खर्च होतात आणि त्यात दिवसभर जाणार असला तर खाणेही बाहेरच होते त्यासाठी पैसे मोजले जातात. त्यामुळे जेंव्हा हे करण्याची गरज पडते त्या महिन्यात एकदम मोठा फटका बसतो, राहत्या घराचे भाडे द्यावे लागत नसले तरी सोसायटी चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स वगैरे द्यावे लागतात. ते तीन महिन्यातून किंवा वर्षातून एकदाच दिले जातात. शिवाय बिल्डिंगचे वॉटरप्रूफिंग, रंगकाम वगैरे करायचे असल्यास त्यासाठी बरीच मोठी रक्कम पाच सहा वर्षातून एका वर्षी पण अनेक हप्त्यांमध्ये द्यायची असते. आपल्या घराचे अंतर्गत रिपेअर किंवा रंगकाम करायचे झाल्यास त्याचाही जवळ जवळ तितकाच खर्च येतो. या सगळ्यांची बेरीज करून दरमहिन्याला त्यावर किती खर्च आला ते ठरवण्यासाठी बरेच प्रयास पडतील. ते कुणी करायचे आणि कशासाठी?  त्यानंतरचा टेलिव्हिजन, टेलिफोन्स, टेलिफोन, इंटरनेट वगैरे टेलिकम्यूनिकेशन्सवर होणारा मोठा खर्च हा बराचसा नियमित असतो पण बँकेकडून परस्पर जात असतो. त्यामुळे तो जाणवत नसतो पण त्याचा अंदाज करता येईल. थोडक्यात सांगायचे तर ज्या खर्चांचा अंदाज करता येतो ते झाल्याचे तीव्रतेने जाणवत नाही आणि जे खर्च खुपतात ते अनियमित असतात.


एक ओव्हरऑल विचार केला तर खिशात पैसे नाहीत म्हणून उपाशी रहायची वेळ कधीच आली नाही आणि खूप पैसे खुळखुळतात म्हणून कधी पानावर तुपाची धारही धरली नाही. चार्वाकमहर्षींचा उपदेश ऐकून त्यासाठी ऋण तर कधीच काढले नाही आणि पिळदार मिशाच कधी न ठेवल्यामुळे त्यांना तूप लावायचा प्रश्नच उद्भवला नाही. मग दर महिन्यात किती पैसे आले, किती गेले आणि किती राहिले याचा हिशोब ठेवला काय आणि न ठेवला काय, काय फरक पडतोय्?