Friday, June 10, 2022

व्यक्तीस्वातंत्र्य की बेशिस्त वर्तन ?

 

दोन वर्षांपूर्वी अचानक आलेल्या कोरोनाच्या साथीने जगभर हाहाःकार पसरवला होता. चीनमधून निघालेली ही साथ इटली, इराण, इंग्लंड, फ्रान्स करत भारतात आणि रशियाअमेरिकेतही जाऊन अत्यंत वेगाने फैलावत होती. तिला कसा प्रतिबंध घालावा हे कुणालाच धड समजतही नव्हते किंवा नक्की सांगता येत नव्हते. 'जागतिक आरोग्य संस्था' या नावाने काही तथाकथित तज्ञ मंडळी भलभलती भीषण चित्रे रंगवून जगाला भीती दाखवत होती आणि उलटसुलट सल्ले देत होती. युरोपातील बहुतेक देशांनी लॉकडाउन डिक्लेअर करून कडक संचारबंदी लागू केली होती. भारताच्या माननीय पंतप्रधानांनीही एका संध्याकाळी दूरदर्शनवर भाषण देऊन वीस दिवसासाठी सगळ्या देशाला घरी बसवून ठेवले. तरीही ती साथ वेगाने पसरतच राहिल्यामुळे त्याच्या मुदतीत वाढ होत गेली. या सगळ्या गोष्टी सर्वांच्या स्मरणात पक्क्या रुतून बसल्या असतील.

त्या काळात बहुतेक सगळे उद्योगव्यवसाय बंद पडल्यामुळे बहुसंख्य लोकांचे आर्थिक नुकसान झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या मनात कडवटपणाही निर्माण झाला होता, तरीसुद्धा भारतातल्या बहुसंख्य लोकांनी कदाचित स्वतःच्याच काळजीपोटी सगळी बंधने स्वीकारली होती आणि रस्त्यात सगळीकडे शुकशुकाट दिसत होता. मात्र काही दिवसांनी अमेरिकेच्या काही भागातल्या लोकांनी सगळे निर्बंध झुगारून देऊन रस्त्यावर येऊन निदर्शने सुरू केली. त्यावर मी फेसबुकवर एक स्फुट लिहून असे भाष्य केले होते.

"अमेरिकेतील लोक रस्त्यावर येतात आणि संचार - नियमनाचा निषेध करतात. मास्क घालत नाहीत. वावर संहिता पाळत नाहीत. काही युरोपियन लोक पण तसेच करतात, रस्त्यावर येतात असे आपण टी व्हीवरील बातम्यांवर पाहतो.  ते असे का वागत असतील?

यावर एक मत असे आहे, "त्यांना स्वातंत्र्याची किमत कळते, स्वातंत्र्य म्हणजे काय ते जाणतात . ते प्रश्न विचारतात. आम्हाला पिढ्यानपिढ्या फक्त आज्ञापालनच शिकविले आहे. आज्ञा चुकीची असो, बरोबर असो, आपण प्रश्न करतच नाही."  यावर उदाहरण म्हणून त्याने रामायणातले दाखले देऊन तशीच शिकवण आपल्याला दिली गेली आहे असे प्रतिपादन केले आहे. आणि "अशा वातावरणात शास्त्रीय दृष्टिकोन कुठून रुजणार ? आणि लोकशाही कशी रुजणार?" असे विचारले आहे.

यावर मला असे वाटते की "आज्ञापालन असे हाडीमासी रुजले आहे" हे काही लोकांच्या बाबतीत खरे असेलही. पण मला भेटलेले बहुतेक लोक तर सरकारने कुठलाही नवा नियम केला की तो पाळला नाही तर काय होणार आहे? त्यातून कोणत्या पळवाटा काढता येतील? असाच विचार आधी करतांना दिसतात. कर भरण्याचे किंवा वाहतुकीचे नियम जितक्या सूज्ञपणे पाश्चिमात्य देशात पाळले जातात त्याच्या एक शतांश भागसुद्धा पुण्यातही पाळले जात नाहीत. इतर गावांमध्ये तर विचारायलाच नको. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग शिकवला होता म्हणून लोकांच्या या गैरशिस्त वागण्याचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडणारेही मी पाहिले आहेत. युरोप अमेरिकेत सध्या चालत असलेली निदर्शने त्यांच्या या बाबतीतल्या तीव्र भावना दाखवतात, तिथेही भोळ्या लोकांची माथी भडकवणारे राजकीय पुढारी आहेत. पण त्याला 'आचारस्वातंत्र्य', 'शास्त्रीय दृष्टिकोन' वगैरे नावाने गौरवण्याचे कारण नाही. त्यांचे आताचे वागणे चूकच आहे आणि शिस्त हाच त्यांचा खरा स्थायी भाव आहे असे मला तरी वाटते.  यावर तुमचे काय मत आहे?"

यावर व्यक्तीस्वातंत्र्याचा भोक्ता असलेल्या एका मित्राने असे उत्तर दिले, "शिस्त हा त्यांचा स्थायी भाव आहे . पण सरकारच्या चुकीच्या निर्णयाला ते जाब विचारतात . अमेरिकेत ८०-९० % ठिकाणी शांततापूर्ण निदर्शने चालू आहेत . पोलिसाने एका कृष्णवर्णीयाचा सरळ सरळ खून केला .  म्हणून काही वेळ ही निदर्शने हिंसक झाली . आता ती युरोपमध्ये पण पसरत आहेत ."

मला ते उदाहरण पटले नाही म्हणून मी लिहिले, "एका पोलिस अधिकाऱ्याने केलेले चुकीचे आणि निर्घृण कृत्य हे सरकारचा चुकीचा निर्णय कसे ठरते? माझ्या माहितीप्रमाणे त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. खून झालेला माणूस कोणी मोठा लोकप्रिय संत महात्मा नव्हता, त्यामुळे त्याच्यावर झालेल्या अन्यायाने सगळ्यांनी एवढे चिडून जायचे काय कारण आहे? त्यांनी इतर निष्पाप लोकांवर अत्याचार करणे किंवा दुकानांची लुटालूट करणे तर मुळीच समर्थनीय ठरत नाही."

माझ्या दुसऱ्या मित्राने असे मत दिले होते, "जेव्हां जेव्हां कोणत्याही सरकारी संस्थेच्या कृत्याला वर्णभेद, जातिभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद असे रंग असतात तेव्हां झालेले कृत्य हे एका व्यक्ति विरुद्ध झालेले रहात नाही. अशा परिस्थितीत अन्यायाच्या विरुद्ध संपूर्ण सचेत समाजातून त्यांच्या भावनांचा प्रतिध्वनी उठतोच.

पाश्चिमात्य देशांत शिस्त, ही तेथील कडक कायदा पालन व तडकाफडकी बेशिस्त वागणाऱ्या बद्दल करण्यात येणारी अति तीव्र आर्थिक किंवा इतर शिक्षा, हे आहे. हे बऱ्याच काळा पासून सातत्याने करण्यात येत असल्याने प्रथम दर्शनी शिस्त हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे असे वाटते, पण ते बरोबर नाही. इतर देशीय व्यक्ति देखील तेथे गेल्यावर एकदम शिस्तबद्ध होतात.

"आपण प्रश्र्न करीतच नाही", हे विधान चुकीचे आहे. संपूर्ण भारतीय दर्शन हे प्रश्न व त्याचे उत्तर / समाधान, ह्या धर्तीवर उभे आहे. संपूर्ण भग्वदगीता अशाच संकल्पनेवर रचलेली आहे.

मात्र, राजा म्हणजे देव ही भावना खोलवर रुजली असल्याने, राजाज्ञा पाळणे हा आपल्या येथील समाजाचा स्वभाव आहे / होता. आता नवीन पिढ्या त्याला फूस लावत आहे."

दोन वर्षांनंतर मी तीच पोस्ट पुन्हा एकदा फेसबुकवर टाकली. यावेळी दोन निराळ्या मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. 

१. ज्ञान व अज्ञान हे सर्वत्र असते.म्हणून संत वचन आहे की ज्ञानीयाचा सल्ला ऐकणे हितकारक आहे. पण अज्ञानाने चुकीचे निर्णय स्वातंत्र्याच्या नावे अवलंबणे हे हानी कारकच आहे. अमेरिकेत अशा अज्ञानी लोकांना कोव्हिडचा चांगलाच अनुभव आला आहे. मास्क न वापरणे लस न घेणें याला स्वातंत्र्य म्हणणे उचित नाहीच .

२.Being irresponsible is not a right reserved for any particular nation!  I am going to say their intent to keep their personal freedom is admirable but their discriminating skills as to recognizing its limitations for the general good and exercising the self control is lacking. in simple words it's very smart people behaving very irresponsibly. 

या सगळ्यावरून असे दिसते की हे कोरोनाचे सरकरी निर्बंध न पाळण्याचे अशा प्रकारचे व्यक्तीस्वातंत्र्य एकादा अपवाद सोडता बहुतेक सूज्ञ लोकांना समर्थनीय वाटत नाही. या वर्षी तर बेजबाबदार लोकांनी केलेल्या बेछूट गोळीबाराच्या अनेक घटना अमेरिकेत घडल्या आहेत. तिथे असे कायदे आहेत असे म्हणतात की कुणाला साधी डोकेदुखीची गोळी घेण्यासाठी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन लागते पण बंदुका आणि त्यांच्या गोळ्या सहजपणे बाजारात मिळतात म्हणे. आपल्याला हवे ते शस्त्र बाळगण्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल तिथले काही लोक आग्रही आहेत. हा व्यवसाय करणाऱ्या लोकांचीच एक प्रभावी लॉबी आहे. इतक्या दुर्दैवी घटना घडून गेल्यानंतर आता तिथे याबद्दल नुसते विचारमंथन सुरू झाले आहे.

अरण्यात रहाणाऱ्या एकट्यादुकट्या आदिमानवाला कुणीही विचारणारा नव्हता त्यामुळे त्याला मनाला वाटेल तसे वागण्याचे पूर्ण व्यक्तीस्वातंत्र्य होते. पण समाजात राहणाऱ्या आजच्या माणसाला अनेक नियम, कायदेकानून यांच्या बंधनातच रहावे लागते. यात त्याचे व्यक्तीस्वातंत्र्य किती प्रमाणात धोक्यात येते याबद्दल थेट राज्यघटनेतील कलमांचे उल्लेख करून वादविवाद घातले जात आहेत हे आपण रोजच्या बातम्यांमध्ये पहात आहोत. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह करून जो मार्ग दाखवला त्याचे उदाहरण देऊन कोणीही उठतो आणि "मी अमूक कायदा मोडणार" असे जाहीरपणे सांगतो. बेशिस्त वृत्तीचे असे उदात्तीकरण धोकादायक आहे. 

---------------------------------------------------------