Thursday, July 29, 2010

कौटुंबिक संमेलन - २

संमेलनाची जागा ठरवल्यानंतर लगेच सर्वानुमते त्याची तारीखसुध्दा ठरवणे आवश्यकच होते, कारण ही पंचवीस तीस मंडळी आपापल्या घरी गेल्यानंतर परस्पर विचार विनिमय करणे कठीण झाले असते. फार दूरवरचा विचार करण्यात बरीच अनिश्चितता येते आणि तयारी करण्यासाठी किमान थोडा तरी अवधी हवा. या दृष्टीने दीड दोन महिन्यात हे संमेलन भरवून घ्यायचे असे मत पडले आणि सर्वांना मान्य झाले. चातुर्मासात अनेक सणवार येतात, कोणाकोणाची व्रते वैकल्ये असतात, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी वगैरेंचे ठरलेले कार्यक्रम चुकवता येत नाहीत वगैरेंचा विचार करता त्याआधीच हे संमेलन भरवायचे ठरले. लगेच कॅलेंडर पाहून २४-२५ जुलैच्या तारखा ठरल्या आणि त्या दिवशी दुसरा तिसरा कोणताही कार्यक्रम कोणीही ठरवायचा नाही असा सर्वांना दम दिला. परगावी राहणा-यांनी आताच रेल्वेचे रिझर्वेशन करून ठेवावे असे त्यांना सांगून टाकले.

हा कार्यक्रम करायचाच असे पक्के ठरवून सगळे आपापल्या घरी परतले. पुढच्या महिन्याभरात नक्की येणा-यांची यादी तयार झाली आणि बरेचसे पैसेही गोळा झाले. कार्यक्रमाची जागा ठरवण्याचे काम पुण्यात रहात असलेल्या संजयने इतर पुणेकर मंडळींशी सल्लामसलत करून केले. सिंहगडाच्या पायथ्याशी, खडकवासला धरणाच्या जलाशयाच्या किनारी आणि पानशेत धरणाच्या रस्त्यावर शांतीवन नावाचे एक रिसॉर्ट आहे. ध्यानधारणा, योगविद्या वगैरेंच्या कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग वगैरे तिथे चालत असावेत. शंभर लोकांची उतरण्याची आणि खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था या जागी ठेवले जाते असे रिपोर्ट मिळाले. ही जागा आमच्या बजेटमध्ये बसतही होती. जागेचे बुकिंग करून सर्वांना कळवून टाकले.

शांतीवनाची जागा इतर दृष्टीने जरी खूप चांगली असली तरी तिथे पोचण्यासाठी आवश्यक असलेली वाहतुकीची व्यवस्था मात्र फारशी सोयिस्कर नाही. किंबहुना ती जवळ जवळ अस्तित्वातच नाही असेही म्हणता येईल. बाहेरगावच्या लोकांनी आधी पुण्यातल्या नातेवाइकांकडे यायचे आणि पुण्याहून तिकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करायची असा विचार सुरुवातीला केला होता. त्यासाठी एक मोठी बस भाड्याने घ्यायची की लहान मिनिबसने दोन तीन खेपा करायच्या असे पर्याय होते. जसजशी संमेलनाची तारीख जवळ येऊ लागली तसतसे लोकांचे कार्यक्रम निश्चित होऊ लागले. वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे परिसरातल्या कांही लोकांनी आपल्या गाडीनेच पुण्याला जाऊन परत यायचा विचार केला आणि आपापल्या गाडीत आणखी कोणाकोणाला आपल्यासोबत पुण्याला नेले. नाशिक आणि बार्शीची मंडळीही आपल्या गाड्या घेऊन आली. डोंबिवलीतल्या नातेवाइकांनी ट्रॅक्स किंवा तवेरासारखे वाहन भाड्याने घेऊन एकत्र जायचे ठरवले. म्हणजे ही सगळी मंडळी थेट शांतिवनातच पोचणार असे निश्चित झाले. उरलेल्या कांही जणांनी एक दिवस आधी पुण्याला जाऊन आपल्या आप्तांच्या घरी मुक्काम केला. आता पुण्याहून जाणारी किती मंडळी आहेत आणि त्यातल्या किती जणांच्या मोटारी आहेत यांची मोजणी आणि चर्चा झाली आणि थोडी दाटी वाटी करून बहुतेकजणांना सामावून घेता आले. ते लोक पुण्याच्या वेगवेगळ्या भागात रहात असले तरी कुणी कुणी कुणाकुणाला कुठून कुठून पिक अप करायचे हे ठरवून त्याची पध्दतशीरपणे अमलबजावणी केली. कांही लोकांचे पुण्यात असलेले नातेवाईक आमच्या कुटुंबाच्या परीघात बसत नव्हते, पण त्यांनीही मदत करून काही जणांना शांतीवनापर्यंत पोचवून दिले. अखेरीस अपवादात्मक दोन तीन लोकच उरले होते, जिथपर्यंत सार्वजनिक बससेवा उपलब्ध होती तिथपर्यंत ते आले आणि कोणीतरी तिथपर्यंत जाऊन त्यांना आपल्या गाडीतून घेऊन आले. मोबाईलवरून सतत एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे कोण कोण कुठपर्यंत आणि कसे येऊन पोचले आहेत याची वित्तंबातमी कळत होती आणि एकमेकांना मार्गदर्शन करणे शक्य होते. एकमेकांबद्दल मनात असलेल्या आत्मीयतेचा प्रत्यय या पूर्वतयारीतच दिसून येत होता. ज्याला ज्याला जे जे शक्य होते ते ते तो आपणहून करत होता. कुणालाही कुणाची मदत मागायची गरज पडली नाही की कुणी त्यात आढेवेढे घेतले नाहीत. डझनभर कारगाड्या, काही मोटरसायकली आणि एक व्हॅन यातून लहानमोठी सगळी मिळून नव्वद माणसे संध्याकाळपर्यंत शांतीवनाला जाऊन पोचली.

जुलैमधला दिवस ठरवतांना पाऊस पडण्याची थोडी शक्यता धरली होती आणि त्या दृष्टीने सर्वांनी छत्र्या, रेनकोट वगैरे आणले होते, पण तो आला नसता तरी चालले असते. आदल्या दिवशी पुण्यात पाऊस पडत नव्हता, त्या दिवशीसुध्दा आधी नुसतेच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सगळे खूष होते. पण घरातून निघण्याच्या सुमाराला रिमझिम पाऊस सुरू झाला. जसजसे खडकवासला जवळ यायला लागले तसतसा पावसाचा जोर वाढत गेला आणि शांतीवनात पोचेपर्यंत तो धो धो कोसळायला लागला. या अगांतुक पाहुण्याचे स्वागत करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.

शांतीवनामध्ये वस्तीसाठी अनेक वेगवेगळी कुटीरे आहेत आणि एकत्र येऊन बसण्यासाठी प्रशस्त हॉल आहेत. आमच्या कार्यक्रमासाठी जो हॉल ठरवला होता, त्यात पावसाचे पाणी येऊन साठू लागले. त्यामुळे त्याऐवजी दुस-या जास्त बंदिस्त जागेत आमची व्यवस्था करावी लागली. खरे तर दुस-या एका हॉलमध्ये गाद्या अंथरून झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यावरच वाटले तर बसावे, वाटले तर पाय पसरावे असे करण्याची सोय होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी स्टेजच्या समोर येऊन बसायचे आणि नंतर ज्याला जेंव्हा झोप येईल तेंव्हा त्याने मागच्या बाजूला पसरलेल्या पथारीवर पहुडावे असे ठरवले. याला दुसरा पर्याय तरी कुठे होता?

निरनिराळ्या दिशेने येणारी मंडळी बरोबर ठरलेल्या वेळी येऊन पोचणार नाहीत हे माहीत होतेच. पुण्याच्या स्थानिक मंडळींनी आधी पुढे जाऊन सर्व व्यवस्था पाहिली. वृध्द, महिला आणि बालकांना आत पाठवून दिले आणि युवकवर्ग येणा-या मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी उभा राहिला. एक एक ग्रुप येताच आधी आलेल्या मंडळींना भेटत होता. वडिलाधा-यांच्या पाया पडणे, कडकडून मिठी मारणे, मुलांना उचलून घेणे, पाठ थोपटणे वगैरे अनेक मार्गांनी भावना व्यक्त होत होत्या. एकाची विचारपूस होईपर्यंत मागोमाग दुसरे येत होते आणि त्यात सामील होत होते. तासभर तरी हा कार्यक्रम चालला होता. चहा पुरवणा-याला काय इन्स्ट्रक्शन्स होत्या कोण जाणे, बाहेर कोसळणारा पाऊस पाहून खरे तर त्याने चहाबरोबर कांद्याची भजी आणावीत असे वाटत होते, पण तो काही येता येत नव्हता. याबद्दल कोणाला आणि कोणी सांगायला हवे हे जो तो एकमेकांना विचारत होता. अखेर आमची आर्जवे त्याच्यापर्यंत पोचली आणि चहाने भरलेले पिंप घेऊन तो आला तेंव्हा टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत झाले.

. . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, July 27, 2010

पंपपुराण - द्वितीय खंड - ५


डबल अॅक्टिंग पिस्टन पंपातून प्रत्येक स्ट्रोकमध्ये पाणी उपसले जात असले तरी त्याची गती सतत कमी जास्त होत राहते. या प्रकारच्या पंपातून बाहेर पडणा-या द्रवाचा दाब त्याच्या प्रवाहाला होणा-या विरोधावर अवलंबून असतो. प्रवाह कमी झाला की दाब कमी होतो आणि वाढला की तोही वाढतो. वाफेच्या इंजिनातसुध्दा असे घडत असते. पिस्टनचा मागेपुढे सरकण्याचा वेग आणि त्यापासून चक्राला मिळणारी गती क्षणाक्षणाला बदलत असते. त्यामुळे यंत्राला अपाय होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी फ्लायव्हील नावाचे एक मोठे चाक जोडतात. या चाकाला गती देऊन ते फिरू लागल्यानंतर ते आपला वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्या चाकाला पुढे जोडलेले यंत्र सतत एका गतीने फिरत राहते. पिस्टन पंपातून निघणारा द्रव आधी एका अॅक्युम्युलेटर नावाच्या लहानशा बंद पात्रात सोडतात. या पात्रामध्ये बसवलेल्या ब्लॅडरचा लवचिक पडदा वरखाली होऊ शकतो. द्रवाचा दाब वाढला की तो वर सरकून अधिक जागा करून देतो, त्यामुळे द्रवाचा दाब कमी होतो आणि जेंव्हा पंपातून बाहेर पडणा-या द्रवाचा दाब कमी होतो तेंव्हा हा स्थितिस्थापक पडदा खाली येऊन त्या द्रवाला ढकलतो आणि त्यामुळे द्रवाचा दाब वाढतो. त्यामुळे पाइपातून पुढे जाणा-या पाण्याची गती आणि दाब बराचसा स्थिर राहतो.

हा परिणाम साध्य करण्यासाठी आणखी कांही उपाय आहेत. विजेच्या मोटरला जोडलेल्या मल्टिसिलिंडर पंपाच्या एकाच समाईक दांड्याला अनेक छोटे छोटे सिलिंडर आणि पिस्टन जोडतात आणि चाक फिरवले की ते सारे पिस्टन मागे पुढे होऊन द्रवाचा प्रवाह निर्माण करतात. म्हणजे चाकाच्या एका फेरीमध्ये सात आठ पिस्टन क्रमाक्रमाने द्रवाला बाहेर ढकलत असल्यामुळे त्यात एक प्रकारचे सातत्य निर्माण होते. एका मिनिटात अशा हजार दोन हजार फे-या होत असल्यामुळे त्या प्रवाहात किंवा दाबात होत असलेले चढउतार समजतसुध्दा नाहीत.

एका शाफ्टला अनेक पिस्टन जोडण्याच्या दोन वेगवेगळ्या त-हा आहेत. पहिल्या प्रकारात स्वॅश प्लेट नावाच्या एका तबकडीला अनेक लहान लहान पिस्टन जोडलेले असतात आणि एकाच मोठ्या ब्नॉकमध्ये अनेक समांतर भोके पाडून त्यांच्यासाठी सिलिंडर बनवलेले असतात. शाफ्ट गोल गोल फिरू लागताच त्याला जोडलेला सिलिंडर ब्लॉकसुध्दा फिरतो. त्यातले पिस्टन मात्र फिरता फिरताच सिलिंडरमध्ये मागे पुढे होत राहतात. त्यांची रचना अशा खुबीने केलेली असते की सिलिंडर ब्लॉकच्या पलीकडच्या बाजूच्या टोकाला केसिंगमध्ये ठेवलेल्या दोन पोर्ट्सपैकी एका पोर्टमधून द्रव आत येत राहतो आणि दुस-या पोर्टमधून तो बाहेर ढकलला जातो. या प्रकारच्या पंपांना अॅक्शियल पिस्टन पंप म्हणतात. त्यांमध्ये पुन्हा बेंट अॅक्सिस आणि स्ट्रेट अॅक्सिस असे दोन उपप्रकार आहेत.

मल्टिसिलिंडर पंपांच्या दुस-या प्रकाराला रेडियल पिस्टन पंप म्हणतात. छत्रीच्या काड्या ज्याप्रमाणे वर्तुळाच्या केंद्रापासून परीघाच्या दिशेने पसरलेल्या असतात, त्याप्रमाणे या पंपांमधले पिस्टन आणि सिलिंडर यांची रचना असते. सारे पिस्टन केंद्रभागी शाफ्टला जोडलेले असतात आणि शाफ्ट फिरू लागताच ते आपापल्या सिलिंडरमध्ये मागेपुढे करून पंपाचे काम करायला लागतात. त्यांनी बाहेर ढकललेला द्रव एकत्र गोळा करून पंपाच्या बाहेर जाणा-या मार्गामध्ये ढकलण्यात येतो.


. . . . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)

Monday, July 26, 2010

कौटुंबिक संमेलन - १

अनीशच्या मुंजीला खूप लोक आले होते. त्याच्या आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक, बिल्डिंगमधले शेजारी, अनीशच्या शाळेतले त्याचे दोस्त, त्याच्या आईवडिलांची आणि आजोबाआजींची घनिष्ठ मित्रमंडळी आणि त्यांच्या ऑफिसांमधले सहकारी वगैरे वेगवेगळ्या कारणांनी त्या कुटुंबाशी जोडले गेलेले लोक आपापल्या ओळखीतल्या लोकांच्या लहान लहान कोंडाळ्यात जमून गप्पा मारत होती. त्यातले काही लोक एक ग्रुप सोडून त्यांच्या परिचयातल्या दुस-या तिस-या घोळक्यांमध्ये सामील होत होते, पण आधीपासून असलेल्या ओळखीच्या पलीकडे कोणीच फारसा जात नव्हता. तो समुदाय एकजिनसी असा वाटत नव्हता. प्रसादच्या डोक्यात त्यावेळीच एक कल्पना चमकून गेली की आधीपासून तो ठरवून आला होता कोण जाणे, त्याने आमच्याकडच्या सगळ्या आप्तांना बोलावून एकत्र जमवले. तो पंचवीस तीस लोकांचा जमाव झाला असेल. त्यांच्यापुढे त्याने एक प्रस्ताव मांडला, "इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे, आपले जे नातेवाईक आज उपस्थित नाहीत त्यांनाही बोलवायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. प्रत्येकजण आपापल्या येण्याजाण्याचा खर्च करतोच, त्या दिवशी राहण्याजेवण्याचा खर्च सर्वांनी समान वाटून घ्यायचा, यात कोणी यजमान नसेल की कोणी पाहुणा नसेल. आदरातिथ्य, मानपान, देणे घेणे असले कांही नाही. किती लोकांची तयारी आहे?"

आधी तर सर्वांना ही कल्पना जराशी धक्कादायक वाटली. पूर्वीच्या काळी वाहतुकीची फारशी सोय नसल्यामुळे प्रवास करणे जिकीरीचे वाटत असे. माझ्या मागच्या पिढीतले लोक फक्त महत्वाच्या कारणापुरता अगदी किमान अत्यावश्यक तेवढाच प्रवास करत असत. माझ्या पिढीतल्या लोकांनी कधी तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी, तर कधी निसर्गसौंदर्य, प्रेक्षणीय स्थान किंवा ऐतिहासिक स्थळे पहाण्यासाठी पर्यटन करायला सुरुवात केली होती. कधी ऑफीसकडून मिळणा-या लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन किंवा असिस्टन्स वगैरेमधून तर कधी स्वतःच्या खर्चाने यासाठी भ्रमण करणे सुरू झाले होते. पुढच्या पिढीमधली मुले एक दोन दिवस मजेत घालवण्यासाठी एकाद्या रिसॉर्टमध्ये सर्रास जायला लागली होती. पण अशा रीतीने सगळ्या आबालवृध्द नातेवाइकांनी एका ठिकाणी जमायचे ही कल्पना भन्नाट वाटत होती. एक दोन सेकंद सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहून अंदाज घेत राहिले. सर्वांना ती कल्पना आवडली आणि ती प्रत्यक्षात आणायचे एकमुखाने ठरले. ठरले खरे, पण कशी हा प्रश्न होता. लग्नकार्य वगैरे ज्याच्याकडे असेल ते कुटुंब सारी व्यवस्था करते, पण अशा संमेलनाची व्यवस्था कोण करणार? अशी शंका अनेकांच्या मनांना चाटून गेली.

या प्रश्नावर सविस्तरपणे विचार विनिमय झाला. व्यवस्था करण्यासाठी ती किती माणसांची आणि कुठे करायची याचा अंदाज करायचा होता. त्यासाठी या कार्यक्रमात कोणाकोणाला सहभागी करून घ्यायचे हे आधी ठरवायला पाहिजे. एरवी पिकनिकसाठी जातांना एकाद्या भागात राहणारे लोक एका जागी जमून बसने प्रयाण करतात. बसमध्ये जागा शिल्लक असली तर जवळचे आप्त, मित्र वगैरेंना घेऊन जातात, तसे केले तर सर्वांना बांधणारे समान सूत्र त्यात राहणार नाही आणि हे टाळायचे होते. त्यामुळे फक्त जे एकमेकांचे नातेवाईक आहेत अशांनाच बोलवायचे असे ठरले. माझे आजोबा आणि त्यांची मुले म्हणजे आमचे बाबा, काका आणि आत्या यातले कोणीच आता हयात नाहीत. पण या लोकांच्या पुढल्या पिढीतले आम्ही सर्वजण सख्खे, चुलत, आत्तेमामे भावंडे आहोत. ते आणि त्यांची मुले, नातवंडे एवढाच परिवाराचा आवाका निश्चित करण्यात आला. एका बहिणीचा दीर आणि तिच्या भावाची मेहुणी असे नातेवाईक त्यांना कितीही जवळ वाटत असले तरी इतरांना ते परकेच वाटणार. त्यामुळे समान सूत्र रहाणार नाही. असा गोंधळ होऊ नये याचा विचार करून नातेवाइकांसाठी ही मर्यादा ठरवण्यात आली. त्या दिवशी मुंजीच्या ठिकाणी ज्या लोकांना या चर्चेसाठी एकत्र आणलेले होते ते सारे या व्याख्येत बसणारे असेच होते. ते आणि त्यांच्या परिवारातले इतर मेंबर किती आहेत त्यांची संख्या मोजली. तसेच जे आले नव्हते त्यांची नांवे लिहून संपूर्ण यादी तयार केली आणि तिथल्या तिथे त्यांना मोबाईलवरून फोन करून त्यांचे मत विचारले गेले. एकंदरीत सगळ्यांनाच उत्साह दिसत असल्यामुळे ही कल्पना पुढे रेटायचे एकमताने ठरले.

माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात संततीनियमन, कुटुंबनियोजन वगैरे शब्दसुध्दा निर्माण झाले नव्हते. त्यामुळे सरसकट सगळ्या कुटुंबांमध्ये आठ दहा मुले असतच. त्यातले अपमृत्यू, वैराग्य, आजारपण वगैरेमध्ये गाळले गेलेले वगळून घरटी सरासरी पाच धरले तरी दोन पिढ्यांमध्ये त्यांची संख्या पंचवीसपर्यंत जायचीच. माझ्या पिढीमधल्या भावंडांची संख्या त्यांच्या जोडीदारांसह पन्नासापर्यंत पोचते. त्यांनी हम दो हमारे दो या मंत्राचा अवलंब केला तरी माझ्या मुलांच्या पिढीत घरातल्या चाळीस पन्नास व्यक्ती आणि तितकेच त्यांचे जोडीदार धरून ऐंशी नव्वद होतात. त्यांच्या पुढच्या पिढीमधल्या म्हणजे आताच्या लहान बालकांची गणना धरून एकंदर संख्या दीडशेच्या वर गेली. यातली अर्ध्याहून अधिक मंडळी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर या भागात राहतात आणि उरलेली मंडळी कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखुरली आहेत. काही जण परदेशात गेलेले आहेत. त्यातले कोणी मुद्दाम या संमेलनासाठी येतील अशी शक्यता फार कमी होती. महाराष्ट्रातले ऐंशी टक्के आणि इतर राज्यांमधले पन्नास टक्के लोक येतील असे धरले तरी ऐंशीच्या वर उपस्थिती अपेक्षित होती. सर्वांना येण्याच्या दृष्टीने पुणे हे मध्यवर्ती शहर सोयिस्कर पडत असल्यामुळे त्याची निवड झाली. शहरातल्या एकाद्या कार्यालयात किंवा हॉलमध्ये जमलो तर लोक तेवढ्यातल्या तेवढ्यात बाजारात जाऊन खरेदी करायचा किंवा दुसरे एकादे काम करून यायचा विचार करतात असा अनुभव येतो. ते करायची संधी मिळू नये म्हणून शहरापासून दूर एकाद्या निवांत जागी असलेल्या रिसॉर्टवर जमायचे असे सर्वानुमते ठरले आणि पुण्यातल्या उत्साही तरुण मंडळींनी त्याची चौकशी करायची असे ठरले. दोन तीन आठवड्याच्या काळात सर्वांनी आपापल्या कुटुंबातल्या माणसांची संख्या सांगायची आणि लगोलग दर डोई पाचपाचशे रुपये जमा करायचे असेही ठरवण्यात आले.
. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, July 18, 2010

मराठी गाणी भाग २

कै.राम गणेश गडकरी यांनी लिहिलेली एकच प्याला आणि भावबंधन ही नाटके १९१९ साली रंगभूमीवर आली. त्यापूर्वीच्या नाटकांची पात्रे दाढी, मिशा, जटा वगैरे वाढवून किंवा मुकुट घालून शेला पांघरून रंगमंचावर येत असत आणि गर्जना करून संस्कृत प्रचुर भाषेत पल्लेदार संवाद बोलत असत. राजमहाल, पर्णकुटी, बाग किंवा अरण्य यांची चित्रे असलेले पडदे पार्श्वभूमीवर दिसत. हे सगळे बदलून थेट तत्कालिन समाजातल्या घराघरात घडणारे नाट्य गडक-यांनी त्यांच्या या नाटकांमध्ये सादर केले. त्यांचे कथानक प्रेक्षकांना कुठल्या तरी पौराणिक किंवा काल्पनिक काळातल्या अद्भुत वाटणा-या जगात नेत नाही. त्या नाटकांमधील घटना आपल्याच शहरात घडल्या असाव्यात असे प्रेक्षकांना वाटावे आणि त्यातली भाषा रोजच्या बोलीभाषेसारखी असावी अशा पध्दतीने ही नाटके लिहिली आहेत. रोज बोलतांना कोणी गाणी गाऊन त्यात आपल्या मनातला आशय व्यक्त करत नाहीत, पण संगीत नाटकांनी प्रेक्षकांना एवढी मोहिनी घातलेली होती की गद्य नाटके त्यांना पसंत पडतील याची खात्री नव्हती. तसेच बालगंधर्वासारखा नटश्रेष्ठ त्यात काम करणार असेल तर त्याच्या अलौकिक गायनकौशल्याला पुरेसा वाव द्यायलाच हवा. नाटकाच्या व्यवसायातला हा एक अत्यंत महत्वाचा भाग होता. या कारणांमुळे गडक-यांच्या या नाटकात त्यांनी पदे घातलीच. एकच प्याला या नाटकातली कशि या त्यजू पदाला, प्रभु अजि गमला, लागे हृदयी हुरहुर, सत्य वदे वचनाला वगैरेसारखी नाट्यगीते अजरामर झाली आहेत. भावबंधन मधले कठिण कठिण कठिण किती हे गाणे त्या काळी तर गाजले असेलच, पुढे आशा भोसले यांच्या रेकॉर्डमुळे ते अतीशय लोकप्रिय झाले.

पारतंत्र्याच्या काळात १९२७ साली आलेल्या रणदुंदुभी या नाटकातल्या दिव्य स्वातंत्र्यरवि आणि परवशता पाश दैवे या नाट्यगीतांमध्ये उघड उघड स्वातंत्र्याचे गुणगान आणि आवाहन केले आहे तर जगी हा खास वेड्यांचा पसारा मांडला सारा या गाण्यात तत्कालीन समाजावर कोरडे ओढले आहेत. इंग्रज सरकारने हे नाटक कसे खपवून घेतले की त्यावर बंदी आणली होती ते मला माहीत नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी पाहिलेल्या काळात ही गाणी चांगली गाजली होती. १९३१ साली आलेल्या संन्यस्त खड्ग या अशाच वेगळ्या प्रकारच्या नाटकातली मर्मबंधातली ठेव ही, शतजन्मशोधतांना आणि सुकतातची जगी या ही गाणी आधी दीनानाथ मंगेशकरांनी आणि नंतर वसंतराव आणि आशाताईंनी गाऊन अजरामर केली. त्याच वर्षी आलेल्या संत कान्होपात्रा नाटकात घेतलेले अगा वैकुंठीच्या राया, अवघाची संसार सुखाचा करीन, जोहार मायबोप जोहार आणि पतित तू पावना हे अभंग बहुधा पहिल्यांदाच पारंपरिक चाली सोडून शास्त्रीय संगीताच्या आधारावर रचलेल्या नव्या चालींनर गायिले गेले आणि आजसुध्दा ऐकायला मिळतात. १९३३ सालच्या ब्रह्मकुमारी नाटकातले विलोपले मधुमीलनात या हे गाणेही आशा भोसले यांच्या आवाजात सर्वांनी ऐकले असेल.

वीसाव्या शतकाच्या तिस-या दशकात मराठी बोलपट येऊ लागले आणि त्याबरोबर त्यात गाणीही आली. १९३७ साली आलेल्या कुंकू चित्रपटातील भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे।।, मन सुद्द तुझं गोष्ट हाये प्रिथिवीमोलाची। तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची ।।, १९३८ सालच्या ब्रह्मचारीमधले यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता, १९३९ च्या माणूस मधले आता कशाला उद्याची बात, बघ उडुनि चालली रात ।। आणि १९४१ मधील शेजारी सिनेमातले लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ङी कांही उल्लेखनीय आणि अविस्मरणीय गाण्यांची उदाहरणे आहेत. त्या काळात लोकप्रिय असलेले नाट्यसंगीत तसेच हिंदी, बंगाली वगैरे परभाषांमधील संगीत यांचा प्रभाव या गाण्यांवर पडला असणार. वेळेच्या बंधनामुळे आलाप ताना न घेता ही गाणी गायली गेली आहेत. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार.

जसा नाट्यसंगीताचा चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर परिणाम झाला तसाच सिनेसंगीताचा परिणाम त्या काळात आलेल्या नाटकांच्या गाण्यांवरही झालाच असणार. १९४२ साली आलेल्या कुलवधू नाटकातली बोला अमृत बोला, मनरमणा मधुसुदना, क्षण आला भाग्याचा ही गाणी तसेच १९४४ च्या देवमाणूस मधली चांद माझा हा हासरा।. दिलरुबा मधुर हा जिवाचा । ही गाणी पूर्वीच्या काळातल्या नाट्यसंगीतापेक्षा कितीतरी निराळी आणि साधी सोपी वाटतात. चित्रपटसृष्टीच्या उदयानंतर संगीत रंगभूमी जवळजवळ इतिहासजमाच झाली.

. . . . . . . . (क्रमशः)

Friday, July 16, 2010

पंपपुराण - द्वितीय खंड - ४पिचकारीच्या तत्वावर चालणारे पंप पूर्वीच्या काळापासून अस्तित्वात आहेत आणि या पंपासारखीच रचना करून त्यावर जगातले पहिले स्वयंचलित यंत्र निर्माण करण्यात आले हे आपण मागील भागात पाहिले. हाताने दांडा वर खाली करून पाणी उपसण्याचे हँडपंप त्यापूर्वीच्या काळापासून वापरले जात होते आणि ते आजपर्यंत लहान गांवांमध्ये पहायला मिळतात. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा भरंवशाचा नसतो अशा जागी हे पंप हमखास उपयोगी पडतात. या प्रकारच्या पंपांमध्ये जेंव्हा आपण पिस्टनने पाण्याला ढकलतो तेंव्हाच ते पंपामधून बाहेर पडते. जेंव्हा पिस्टनला मागे ओढतो तेंव्हा पाण्याचा पुरवठा थांबतो. अशा प्रकारे पाण्याचा पुरवठा आलटून पालटून मिळत राहतो. दांड्याला मागेपुढे किंवा वरखाली करण्यासाठी जी शक्ती लागते तीसुध्दा त्या प्रमाणात कमी जास्त होत राहते. त्यानुसार हाताने दांड्यावर कमी जास्त दाब देऊन आपण ते सहजपणे करू शकतो. या क्रियेत हाताला थोडी विश्रांती मिळत राहते आणि श्वास घ्यायला फुरसत मिळते वगैरे फायदे असल्याने त्यात गैरसोय वाटत नाही. शिवाय थांबून थांबून पाणी आले तरी आपली बादली किंवा कळशी भरतेच.

पण पंपाचा हा दांडा विजेवर चालणा-या मोटारीला जोडला तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. याचे कारण विजेवर चालणारी मोटर ठराविक गतीने सतत फिरत असते. पण त्याला जोडलेल्या दांड्याची गती क्षणाक्षणाला बदलत राहते. एका टोकाला असलेला पिस्टन हळू सरकत असतो. सरकता सरकताच त्याची गती वाढत जाते आणि तो मध्यावर येतो तेंव्हा ती सर्वात जास्त असते. त्यानंतर ती कमी कमी होत दुस-या टोकांशी पोचेपर्यंच शून्यावर येते आणि त्यानंतर दिशा बदलून विरुध्द दिशेने वाढत जाते. अर्थातच त्यानुसार बाहेर ढकलल्या जाणा-या पाण्याचा प्रवाह वाढत आणि घटत जातो आणि त्यासाठी लागणा-या ऊर्जेचे प्रमाण सारखे बदलत जाते. त्याबरोबर पंपाला लागणा-या विजेचा प्रवाहसुध्दा कमी अधिक होत राहतो. या सगळ्या कारणांमुळे पंप झटके देत चालतो आणि त्याला जोडलेल्या मोटरचा उपयोग तिच्या संपूर्ण कार्यक्षमतेइतका करता येत नाही.

हे तोटे टाळण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात आणि अनेक प्रकारचे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप तयार केले जातात. पिस्टन किंवा प्लंजरच्या रचनेत बदल करू अनेक प्रकारांनी त्यांचा उपयोग केला जातोच, शिवाय सरळ रेषेत मागेपुढे सरकण्याऐवजी त्यांना गोल फिरवून त्यातून तशाच प्रकारचा परिणाम साधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्याच्या काळात चार प्रमुख प्रकारांचे पंप पहायला मिळतात.
१. पिस्टन पंप
२. व्हेन पंप
३. गियर पंप
४. स्क्रू पंप

वाफेवर चालणा-या इंजिनामध्येसुध्दा पिस्टनपंपासारखेच प्रॉब्लेम येतात. एका स्ट्रोकमध्ये सिलिंडरमध्ये जाणारी वाफ पिस्टनला बाहेर ढकलते आणि त्याला जोडलेल्या चाकाला ऊर्जा मिळून ते फिरू लागते. त्या चाकाकडून थोडी ऊर्जा परत घेऊनच पिस्टन मागे येऊ शकतो. यामुळे चाकाची गती कमी जास्त होत राहते. यावर उपाय म्हणून दुहेरी काम करणारे इंजिन बनवले गेले. त्यात सिलिंडरच्या दोन्ही टोकांना म्हणजेच पिस्टनच्या दोन्ही बाजूंना व्हॉल्व्ह बसवले गेले आणि दोन्ही बाजूंनी वाफेला सिलिंडरच्या आत शिरण्याची व बाहेर पडण्याची व्यवस्था केली गेली. वरील चित्रात दाखवलेले डबल अॅक्टिंग पिस्टन पंप याच तत्वाच्या आधारावर चालतात. त्यामुळे या पंपामधून प्रत्येक स्ट्रोकमध्ये पाणी बाहेर येत राहते.

. . . . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)

Wednesday, July 14, 2010

मराठी गाणी भाग १

अभंग, आरत्या, ओव्या, लावण्या, पोवाडे वगैरे विविध पध्दतींची अगणित मराठी गाणी गेली काही शतके गायली जात आहेत. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत मराठी नाटके रंगभूमीवर आळी आणि त्यांनी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. सन १८८० साली रचलेल्या शाकुंतल नाटकातली पंचतुंड नररुंडमालधर ही नांदी आजही गायिली जाते. सौभद्र, मानापमान, स्वयंवर, शारदा वगैरे नाटकांमधली अप्रतिम गीते जेंव्हा पहिल्यांदा रंगमंचावर सादर केली जात होती त्या काळातल्या मूळ गायकांच्या तोंडून माझ्या आजोबांच्या पिढीमधल्या लोकांनी ती ऐकली असतील. त्यानंतर माझ्या वडिलांच्या, माझ्या आणि पुढच्या पिढीनेही आपापल्या काळातील सर्वात लोकप्रिय गायक गायिकांकडून ती ऐकली आहेत. आता प्रथमेश, मुग्धा आणि कार्तिकीसारखे लिट्ल् चँप्ससुध्दा ही गाणी गात आहेत आणि माझ्या नातवंडांच्या पिढीमधली मुले ती तल्लीन होऊन ऐकतांना दिसतात. कै.वसंतराव देशपांडे आणि पं.भीमसेन जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांपासून ते लिट्ल् चँपपर्यंत अनेक गायक गायिकांनी ही गाणी गायिलेली मी प्रत्यक्ष तसेच दूरचित्रवाणीवर पाहिली आणि ऐकली आहेत. एकाद्या चांगल्या कलाकाराचे नांव झाले की त्यानंतर तो सहसा दुस-यांनी गायिलेली गाणी गात नाही असा साधारण रिवाज असला तरी जुन्या नाटकामधील पदे त्याला अपवाद आहेत.

यातली सौभद्र, स्वयंवर, शाकुंतल वगैरे नाटके पौराणिक कथांवर रचलेली आहेत, तर शाकुंतल आणि मृच्छकटिकासारखी जुन्या संस्कृत नाटकांवरून घेतली आहेत. मानापमान, संशयकल्लोळ यासारखी नाटकेसुध्दा एका जुन्या काल्पनिक काळातल्या समाजातील पात्रांवर रचली आहेत. यातल्या कुठल्याच नाटकात शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळातल्या समाजाचे प्रत्यक्ष चित्रण नाही. त्या नाटकांमध्ये घडतांना दाखवलेल्या घटना त्या जमान्यातसुध्दा वास्तविक वाटत नसतील. तरी जुन्या दाखल्यावरून तत्कालीन समाजावर केलेले अप्रत्यक्ष भाष्य, विनोदातून काढलेले चिमटे, संभाषणातून ओढलेले आसूड वगैरे त्या काळात अपील होत असतील. पण आता तर समाजरचनेत आमूलाग्र बदल झाला आहे आणि बदललेल्या परिस्थितीत त्या गोष्टींना पूर्वी इतके महत्व राहिलेले नाही. त्यामुळे या नाटकांचे प्रयोग क्वचितच होतात, ते झाले तरी संक्षिप्त स्वरूपात असतात आणि मोजके अभ्यासू किंवा दर्दी प्रेक्षकच ते पाहतात. रात्रभर रंगणारे संपूर्ण नाटक पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात काही आला नाही. या नाटकांमधील वेगवेगळ्या प्रसंगांचे तुकडेच मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहिले आहेत. इतर अनेक लोकांनी कदाचित ते सुध्दा पाहिले नसतील. त्या नाटकात कोणकोणती मुख्य पात्रे आहेत, त्यातल्या कोणत्या पात्राने कोणत्या प्रसंगी कोणाला उद्देशून कोणते गाणे का म्हंटले आहे वगैरे पार्श्वभूमी त्यांना ठाऊकच नसते. असे असतांनासुध्दा अशी आपल्याला रिलेव्हंट न वाटणारी ही गाणी शंभर वर्षांइतका काळ टिकून राहिली आहेत. अर्थातच हा त्यातल्या दिव्य संगीताचाच प्रभाव असणार.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस आणि वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला आलेली शाकुंतल (१८८०), सोभद्र (१८८२), मृच्छकटिक(१८८९), शारदा (१८९९), मूकनायक(१९०१), मानापमान(१९११), विद्याहरण(१९१३), स्वयंवर(१९१६) आणि संशकल्लोळ(१९१६) ही सर्व नाटके मी वर दिलेल्या प्रकारातली आहेत. यातल्या घटना रोजच्या पहाण्यातल्या वाटत नाहीत. यातली संस्कृतप्रचुर मराठी भाषा ओळखीची वाटत नाही. पण यातली गाणी मात्र ऐकावीशी वाटतात. त्यातील कांही गाणी सरळ सरळ शास्त्रीय संगीतातील बंदिशींवर आधारलेली आहेत आणि छोटा ख्याल गायनासारख्याच पध्दतीने सादर केली जातात. इतर गाणीसुध्दा ठराविक तालावर आणि रागदारीतील सुरांनुसारच गायिली जातात. शास्त्रीय गायनात अनेक वेळा त्या बंदिशीमधील शब्द समजतच नाहीत किंवा त्यांचा अर्थ लागत नाही. नाट्यसंगीतातले शब्द लक्ष देऊन ऐकल्यास समजतात आणि त्यांचा साधारण अर्थ लागतो, पण संदर्भ न लागल्यामुळे तो पूर्णपणे ध्यानात येत नाही. पण तरीसुध्दा ती श्रवणीयच वाटतात.

या गीतामध्ये अनेक प्रकारचे भाव आहेत. पंचतुंडनररुंडमालधर, नमन नटवरा विस्मयकारा, राधाधरमधुमिलिंद जयजय, भाली चंद्र असे धरिला ही गाणी ईशस्तवनाची आहेत. हृदयी धरा हा बोध खरा, हा नाद सोड सोड वगैरे बोधप्रद आहेत, नभ मेघांनी आक्रमिले, रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा, रजनीनाथ हा नभी उगवला, चंद्रिका ही जणू, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला या गाण्यात निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे, प्रेमभावे जीव जगी या नटला, प्रेमसेवाशरण, बाळपणीचा काल सुखाचा या गाण्यात जीवनातली तत्वे मांडली आहेत. या गाण्यांचे विषय कालातीत आहेत. त्यासाठी नाटकाची गोष्ट माहीत नसली तरी चालते. इतर बहुतेक गाणी प्रेमाचे अनेक रंग दाखवणारी आहेत. उत्कट प्रेम, विरह, व्याकुळता, स्तुती, समजूत काढणे, लटका कोप, थट्टा वगैरे त्याची अनेक रूपे त्या गाण्यांच्या शब्दात आहेतच. त्यांना लावलेल्या चालींमध्ये ते भाव उतरले आहेत. यामुळे ते भाव कोणाच्या मनात आणि कोणाविषयी प्रगट झाले आहेत याला फार महत्व नाही. माझ्या माहितीनुसार किंवा मी ऐकलेली आणि माझ्या लक्षात राहिलेली या काळातील कांही गाणी खाली दिली आहेत. त्यावर एक नजर टाकल्यास मला काय सांगायचे आहे ते लक्षात येईल.

१८८० शाकुंतल
पंचतुंडनररुंडमालधर
... लाविली थंड उटी वाळ्याची

१८८२ सौभद्र
अरसिक किती हा शेला
... कोण तुजसम सांग गुरुराया
... नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा
... नभ मेघांनी आक्रमिले
... पांडुनृपती जनक जया
... प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा
... बलसागर तुम्ही वीरशिरोमणी
... बहुत छळियले नाथा
... बहुत दिन नच भेटलो सुंदरीला
... राधाधरमधुमिलिंद जयजय
... लग्नाला जातो मी द्वारकापुरा
... वद जाउ कुणाला शरण

१८८९ मृच्छकटिक
तेचि पुरुष दैवाचे
... माडिवरी चल गं सखी
... रजनीनाथ हा नभी उगवला
... सखे शशिवदने


१८९९ शारदा
घेउन ये पंखा वाळ्याचा
... जठरानल शमवाया नीचा का न भक्षिसी गोमय ताजे
... अजुनि खुळा हा नाद पुरेसा
... कधि करिशी लग्न माझे
... बघुनि त्या भयंकर भूता
... बाळपणीचा काल सुखाचा
... बिंबाधरा मधुरा
... मज गमे ऐसा जनक जो
... मूर्तीमंत भीती उभी मजसमोर राहिली
... म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान
... सुंदर खाशी सुबक ठेंगणी
... श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता

१९०१ मूकनायक
उगीच कां कांता

१९११ मानापमान
करा तो प्रेमा ना धरी लोभ मनी
... चंद्रिका ही जणू
... दे हाता शरणागता
... धनराशी जाता मूढापाशी
... धिःकार मन साहिना
...नमन नटवरा विस्मयकारा
...नयने लाजवीत
... नाही मी बोलत आता
... प्रेमभावे जीव जगी या नटला
... प्रेमसेवाशरण
... भाली चंद्र असे धरिला
... मला मदन भासे हा मोही जना
.. .माता दिसली समरी विहरत
... मी अधना न शिवे भीती मला
... या नवनवलनयनोत्सवा
.. आले युवतीमना दारुण रण रुचिर प्रेम ते
... रवि मी चंद्र कसा
... शूरा मी वंदिले
... अरसिक हा शेला, सवतचि भासे मला

१९१३ विद्याहरण
मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला
... मधुमधुरा तव गिरा मोहना
... लोळत कच मुखमधुवरी
... सुरसुखखनि तू विमला


१९१६ स्वयंवर
अनृतचि गोपाला
... एकला नयनाला विषय तो जाहला
... करिन यदुमनी यदना
... नरवर कृष्णासमान
... नाथ हा माझा मोही मना
... नृपकन्या तव जाया
... मम आत्मा गमला
... मम मनी कृष्ण सखा रमला
... रूपबली तो नरशार्दूल साचा
... सुजन कसा मन चोरी
... स्वकुलतारकसुता

१९१६ संशयकल्लोळ
कर हा करी धरिला शुभांगी
... कुटिल हेतु तुझा फसला
... धन्य आनंददिन
... मजवरी तयांचे प्रेम खरे
... मानिली आपुली तुजसी
... मृगनयना रसिकमोहिनी
... सुकांत चंद्रानना पातली
... संशय का मनी आला
... हा नाद सोड सोड
... ही बहु चपल वारांगना
... हृदयी धरा हा बोध खरा

Thursday, July 08, 2010

पंपपुराण - द्वितीय खंड -३पिचकारीसारखा दिसणारा किंवा पिचकारीमध्ये जरासा बदल करून तयार केलेला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आपण पहिल्या भागात पाहिला. तीनशे वर्षांपूर्वी ज्या वेळी वाफेवर चालणारे इंजिन अस्तित्वात आले नव्हते त्या काळात अशा प्रकारचे पंप बनवले जात असावेत. न्यूकॉम याने तयार केलेले जगातले पहिले वाफेचे इंजिन सिलिंडर आणि पिस्टनचा वापर करून बनवले गेले होते आणि त्याचा उपयोगसुध्दा अशा प्रकारच्या पंपाला जोडून पाणी उपसण्यासाठीच त्याने केला होता. पुढे जेम्स वॅट याने या इंजिनात खूप सुधारणा करून त्याला स्वयंचलित केले. त्यामुळे जेम्स वॅटलाच वाफेच्या इंजिनाचा जनक मानले जाते. त्याने तयार केलेल्या पहिल्या इंजिनाचा उपयोग देखील पाणी उपसण्यासाठीच केला होता. या दोन्ही इंजिनांची चित्रे वर दिली आहेत.

या इंजिनांची रचना आणि पंपाची रचना साधारणपणे सारखीच आहे. बॉयलरमध्ये निर्माण झालेली खूप जास्त दाब असलेली ऊष्ण वाफ सिलिंडरला जोडलेल्या एका झडपेमधून आत शिरते आणि पिस्टनला जोराने वर ढकलते. त्यामुळे त्याचा दांडा वर सरकतो. तो खाली येतांना वाफेला खाली ढकलतो. त्यामुळे थंड आणि कमी दाबाची वाफ दुस-या व्हॉल्व्हमधून बाहेर पडून कंडेन्सरकडे जाते. अशा रीतीने आलटून पालटून इंजिनाचा दांडा वर खाली होत राहतो. एका तरफेमार्फत हा दांडा पंपाच्या दांड्याला जोडला असल्यामुळे तोही खाली वर होत राहतो आणि त्यामुळे विहिरीतले पाणी उपसले जाते.

वाफेच्या इंजिनाचे प्रात्यक्षिक दाखवतांना नुसताच त्याचा दांडा आत बाहेर झालेला दाखवला तर ते कदाचित त्या काळातल्या लोकांना फारसे आवडले नसते. "याचा उपयोग काय?" असा खंवचट प्रश्न त्यांनी विचारला असता. त्यापेक्षा विहिरीतले पाणी कसे आपोआप बाहेर येते हा चमत्कार पहायला लोकांनी गर्दी केली असती, त्याचे कौतुक केले असते. असे असले तरी विहिरीशेजारी एवढे अवजड धूड बसवायला फारसे कोणी उत्सुक असणार नाही आणि पारंपारिक रहाटगाडग्याची जागा कांही हे इंजिन घेणार नाही हे हुषार वॅटच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने लगेचच त्याच्या इंजिनाचा दांडा एका क्रँकला जोडून त्याने एक चांक फिरवण्याची सोय करून दाखवली. आपोआप फिरणारे चक्र पाहताच त्याचे असंख्य उपयोग सुरू झाले. धान्य दळण्यासाठी पिठाची चक्की, सूत कातण्याचे चरखे, कापड विणण्याचे माग वगैरे मूलभूत गरजांपासून रुळावर धांवणा-या आगगाड्या आणि समुद्रात जाणारी जहाजे यांपर्यंत अनेक कामासाठी वाफेच्या इंजिनांचा वापर सुरू होऊन यंत्रयुग अवतरले.

पाणी उपसण्यासाठी आणि इतर द्रवपदार्थांना वाहते करण्यासाठी अशा प्रकारच्या पंपांचा उपयोग होत राहिलाच. मात्र गरजेनुसार आणि सोयीसाठी त्यांच्या रचनेत आमूलाग्र फरक होत गेले. मुख्य म्हणजे या पंपाचा लांब दांडा हा हाताने वर खाली करण्यासाठी सोयीचा असला आणि इंजिनाच्या दांड्याला थेट जोडता येत असला तरी त्याला फिरत्या चांकाबरोबर जोडणे गैरसोयीचे असते. त्यासाठी खूप मोठे चाक बनवावे लागते. त्यामुळे लहानशा आकाराच्या विजेच्या मोटरला जोडण्यासाठी या पंपाचा आकार लहान होत गेला आणि पिस्टनची लांबी लहान होत होत पिस्टनचा प्लंजर झाला. अशा प्रकारचे निरनिराळे पंप पुढे येणा-या भागांमध्ये पाहू.

. . . . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)

Monday, July 05, 2010

पंपपुराण - द्वितीय खंड -२

सेंट्रिफ्यूगल आणि पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप वेगवेगळ्या तत्वावर चालतात आणि त्यांची कार्यपध्दती वेगळी असते. यातील फरक समजून घेण्यासाठी एक सोपे उदाहरण घेऊ. आपण जेंव्हा रवीने ताक घुसळतो त्या वेळी हातातल्या रवीला आलटून पालटून घड्याळाच्या कांट्यांच्या (क्लॉकवाइज) आणि त्याच्या विरुध्द दिशेने (अँटिक्लॉकवाइज) फिरवतो. त्या वेळी बरणीमधले ताकसुध्दा रवीच्या भोंवती गोल गोल फिरत असते. मिक्सरमधले चक्र एकाच दिशेने गोल फिरते आणि त्यानुसार मिक्सरच्या बाउलमधले ताकही तसेच फिरतांना आपल्याला दिसते. सेंट्रिफ्यूगल पंपातला इंपेलरसुध्दा व्हॉल्यूट केसिंगमध्ये असाच स्वतःभोवती फिरतो आणि केसिंगमधले पाणी त्याच्या सभोवताली रिंगण घालत असते. मात्र या केसिंगचा आकार शंखासारखा असल्याकारणाने त्यातल्या पाण्याला केसिंगच्या बाहेर पडण्याची वाट मिळते आणि ते औटलेट पोर्टमधून पंपाबाहेर जाते. जेवढे पाणी केसिंगच्या बाहेर पडेल तेवढेच पंपाच्या इनलेट पोर्टमधून इंपेलरमध्ये येते आणि तेवढेच केसिंगमध्ये फेकले जाते. अशा प्रकारे पाण्याचा सलग प्रवाह चालत राहतो. मात्र पंपाच्या बाहेर डिस्चार्ज पोर्टपाशी लावलेला व्हॉल्व्ह उघडा असला तरच हे घडू शकते. पण तो जर बंद केला तर मग पाण्याला पंपाच्या बाहेर पडायला रस्ता मिळणार नाही आणि ते केसिंगमध्येच गोल गोल चकरा मारत राहील. मिक्सरमधले ताक जसे घुसळले जात असते तसे हे पाणी केसिंगच्य़ा आंत घुसळत राहते. यासाठी लागणारी ऊर्जा पंपाला जोडलेल्या विजेच्या मोटारीमधूनच मिळते. पण पंप नेहमीप्रमाणे चालू असतांना विहिरीतून पाणी उपसून वर आणण्यासाठी जितकी शक्ती लागते त्यामानाने पाण्याला फक्त घुसळण्यासाठी कमीच शक्ती लागते. त्यामुळे पंपाला किंवा मोटारीला अपाय होत नाही.

पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा मागील भागात दाखवल्याप्रमाणे पिचकारीसारखा असतो. त्याच्या दांडा बाहेर ओढला की नळकांडी पाण्याने भरते आणि दांड्याला पुढे ढकलले की ते पाणी दुस-या मार्गाने नळकांडीच्या बाहेर पडते. त्या मार्गाच्या बाहेर लावलेला व्हॉल्व्ह बंद करून हा दुसरा मार्गच बंद केला तर सिलिंडरमधील पाणी कुठेच जाऊ शकणार नाही. त्यामुळे पंपाचा दट्ट्या जागचा हलूच शकणार नाही. तो ढकलण्यासाठी अधिकाधिक जोर लावला तर त्यामुळे सिलिंडरमधले पाणी दाबले जाऊन त्याचा दाब वाढत जाईल, पण पाणी बाहेर कांही पडू शकणार नाही. अगदी राक्षसी शक्तीचा प्रयोग केला तर कदाचित सिलिंडर फुटेल, दांडा मोडेल, व्हॉल्व्ह किंवा पाइपाला फोडून ते पाणी बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल. यातला जो कोणता कच्चा दुवा असेल तो हा जास्तीचा दाब सहन करू शकणार नाही. पंपाला विजेची मोटर लावली असेल तर तिचा फ्यूज उडेल किंवा मोटरचे वाइंडिंग जळेल असे कांही तरी होण्याची शक्यता असते. यामुळे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा कधीही अशा प्रकारे आउटलेट व्हॉल्व्ह बंद करून चालवता येत नाही. चुकून असे घडले तर जास्त नुकसान होऊ नये यासाठी सेप्टी व्हॉल्व्ह, रिलीफ व्हॉल्व्ह वगैरे साधने या पंपाला जोडलेली असतात. कांही ठिकाणी या व्हॉल्व्हला समांतर अशी एक बारीकशी नळी जोडून पाण्याला बाहेर पडण्याची वाट करून दिली जाते.

सेंट्रिफ्यूगल पंपाचा आउटलेट व्हॉल्व्ह अर्धवट उघडला तर तो पाण्याच्या प्रवाहाला त्यातून वाहू देईल, पण त्याला विरोध करेल. यामुळे केसिंगमध्ये रिंगण घालत असलेल्या पाण्यामधले कांही पाणी पंपामधून बाहेर पडेल आणि उरलेले आंतल्या आंत फिरत राहील. अशा प्रकारे आपल्याला आपल्या गरजेनुसार प्रवाहाचे नियंत्रण करता येते. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपमध्ये पिस्टनच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये ठराविक म्हणजे सिलिंडरच्या घनफळाएवढेच पाणी बाहेर पडते. यामुळे बाहेरचा व्हॉल्व्ह अर्धवट उघडून त्यात कांही फरक पडणार नाही. तो व्हॉल्व्ह फक्त प्रवाहाला विरोध करण्याचे काम करेल आणि त्यामुळे निष्कारण जादा शक्ती मात्र खर्च करावी लागेल. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपापासून ठराविक एवढाच प्रवाह मिळत असला तरी पुढे गेल्यानंतर तो दोन किंवा अधिक मार्गांमध्ये वाटून घेऊन त्यातल्या एकेका मार्गातल्या प्रवाहाचे नियंत्रण करता येते. हे आपण नंतर येणा-या भागांमध्ये सविस्तर पहाणार आहोत.

सेंट्रिफ्यूगल पंपातील इंपेलरचा आकार आणि फिरण्याचा वेग यानुसार त्यातल्या पाण्याला गती मिळत असते, त्यातून पाण्याचा जास्तीत जास्त दाब ठरतो आणि पंपाबाहेर पडल्यानंतर ते पाइपातून किती उंचपर्यंत चढू शकेल हे त्यावरून ठरते. त्यापेक्षा जास्त उंचावर चढवण्याचा प्रयत्न केला तर ते चढू शकणार नाही आणि बाहेरचा व्हॉल्व्ह बंद केला असतांना ज्याप्रमाणे होते तसे ते आंतल्या आंत घुसळत राहील. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपाला अशी मर्यादा नसते. पंप पुरेसा मजबूत असेल आणि जास्त जोर लावणे शक्य असेल तर त्यातील पाण्याचा दाब वाढवत नेणे शक्य असते. या कारणाने कमी आणि ठराविक प्रवाह आणि जास्त दाब हवा असेल अशा वेळी पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपाची निवड केली जाते.

सेंट्रिफ्यूगल पंपातून निघणारा पाण्याचा प्रवाह कमी केला की त्याचा दाब वाढतो आणि प्रवाह वाढवला की दाब कमी होतो हे आपण पहिल्या खंडात पाहिले आहे. डिस्चार्ज व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद केला तर जास्तीत जास्त दाब निर्माण होतो आणि तो पुरता उघडला की दाब कमीतकमी एवढा होतो. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपात प्रवाह व दाब या दोन्ही बाबी स्वतंत्र असतात. पिस्टनच्या दर स्ट्रोकमधून ठराविक प्रवाह मिळतो. त्यामुळे तो दाबानुसार कमीजास्त होत नाही. त्या प्रवाहाला जेवढा विरोध होतो तेवढा दाब त्या पंपात निर्माण होतो. त्यामुळे डिस्चार्ज व्हॉल्व्ह कमीअधिक उघडला तर त्यामुळे प्रवाहाला होणारा विरोध कमीजास्त होतो आणि त्याप्रमाणे पाण्याचा दाबही कमी जास्त होतो.

. . . . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)

ही एक गाथा

मिसळपाव या संकेतस्थळावर श्री. नंदन यांची अप्रतिम गाथा (तिचे अभंग, तिची गाथा) वाचल्यावर त्यावर विडंबन लिहिण्याचा स्वतःच एक प्रयत्न करायचे ठरवले. ही महिला दहा बारा वर्षांनी मोठी आहे. तिची लेकरे आता कॉलेजात जातात, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आणि तिचे स्टेटसही उंचावले आहे. वि़डंबन म्हणजे विनोद म्हणजेच विसंगती अधिक अतीशयोक्ती हे होणारच. त्यातून माझा पहिलाच प्रयत्न. तेंव्हा ह.घ्या.

सकाळी उठून । आळस देऊन । दाबावे बटन । टीव्ही सेट्चे ।।
नवरा उठेल । दूध तापवेल । चहाही करेल । दोघांसाठी ।।
पोरांना झोपू दे । सुस्तीत लोळू दे । बायांना येऊ दे । कामासाठी ।।
बाया त्या येतील । भांडी घासतील । डबे करतील । सर्वांसाठी ।।
मुले उठतील । तयार होतील । कॉलेजा जातील । आपापल्या ।।
ब्रेडला बटर । लावा वरवर । जामचा वापर । कमी ठेवा ।।
सकाळी न्याहारी । एवढीच पुरी । ठेवाया कॅलरी । आटोक्यात ।।
करोनिया स्नान । नखे रंगवून । भुवया रेखून । न्याहाळाव्या ।।
नवरा निघेल । गाडीत बसेल । हॉर्न वाजवेल । एक दोन ।।
असाल तयार । निघावे बाहेर । हात नाहीतर । दाखवावा ।।
घाईत असेल । तो नाही थांबेल । निघून जाईल । जाऊ द्यावा ।।
काढा गाडी दुजी । एकादे दिवशी । नाहीतर टॅक्सी । बोलवावी ।।

ऑफीसा जाऊन । केबिन गाठून । उचलावा फोन । पहिल्यांदा ।।
कामाचा डोंगर । टेबलाच्या वर । असो निरंतर । त्याचे काय ।।
मालिका अनंत । त्यात गुंतागुंत । नव-याला खंत । त्यांची कोठे ।।
नायिका बिचारी । सारे घर वैरी । तिला ना कैवारी । कोणी भेटे ।।
चिंता तिची कैसी । जाळिते मनासी । परी नव-यासी । नाही कांही ।।
मैत्रिणींशी चार । बोला फोनवर । करावा निचर । भावनांचा ।।
फोन झाल्यावर । मन था-यावर । कामाचा विचार । करा आता ।।

सुटीचा दिवस । नको मुळी त्रास । भोगावा आळस । मनसोक्त ।।
नळाचे गळीत । ट्यूब ना पेटत । तक्रारी समस्त । साठवाव्या ।।
पतीला सांगावे । कामाला लावावे । आपण सुस्तावे । मस्तपैकी ।।
बाईला सांगावे । सामोसे तळावे । आणि मागवावे । खमण पात्रा ।।
मनसोक्त खावे । पार्लर गांठावे । आणि करवावे । फेशियल ।।
होता संध्याकाळ । गाठूनिया मॉल । करावी धमाल । सर्वांनीही ।।

उन्हाळ्याची सुटी । गोळा येई पोटी । घरी ही कारटी । अख्खा दिन ।।
शोधा आसपास । उदंड ते क्लास । द्यावे त्या सर्वांस । पाठवून ।।
शास्त्रीय गायन । पाश्चात्य नर्तन । चित्रकला छान । कांही असो ।।
असेल आवड । अथवा नावड । एक नाही धड । चिंता नको ।।
त्याला ना महत्व । हेच असो तत्व । जाई वेळ सर्व । शांततेत ।।
छानसे पाहून । एकादे ठिकाण । चार पाच दिन । जावे तेथे ।।
साईट सीइंग । करावे बोटिंग । आणिक शूटिंग । कॅमे-याने ।।
आल्बम करावा । सर्वां दाखवावा । जपून ठेवावा । कपाटात ।।
सुट्याही संपता । नाही मुळी चिंता । पूर्वीचाच आता । दिनक्रम ।।

गाथा ही सांगावी । आणिक ऐकावी । तृप्ती मिळवावी । संसारी या ।।

Friday, July 02, 2010

पंपपुराण - द्वितीय खंड -१


पंपुराणाच्या पहिल्या भागात आपण मुख्यत्वे सेंट्रिफ्यूगल पंपांचे विविध प्रकार पाहिले. गोल गोल फिरवल्यामुळे गोफणीतून जसे दगड वेगाने दूर भिरकावले जातात त्याचप्रमाणे या पंपांमधील गरगर फिरत राहणारे इंपेलर नांवाचे चक्र त्यातील द्रवाला (बहुतेक पंपांमध्ये पाणी हाच त्यातला द्रव असतो) वेगाने दूर लोटत असते. विशिष्ट आकाराचे व्हॉल्यूट चेंबर आणि डिफ्यूजर व्हेन्स या पाण्याला योग्य दिशा देऊन त्याला पंपाच्या मुखातून बाहेर पडायला मदत करतात. त्यातून पाण्याचा अखंड प्रवाह वहात राहतो. इंपेलर, व्हॉल्यूट आणि डिफ्यूजर यांच्या आकारात आणि रचनेत फरक करून सेंट्रिफ्यूगल पंपाची क्षमता आणि दाब या दोन्ही गोष्टी बदलल्या जातात आणि जशी गरज असेल त्यानुसार योग्य असा पंप निवडला जातो. तसेच निवडलेला पंप वापरतांना त्यातून मिळणारा प्रवाह आणि त्या पाण्याचा दाब यावर नियंत्रण कसे ठेवतात, तो कसा आणि किती कमी केला जातो किंवा वाढवला जातो वगैरे गोष्टी पहिल्या खंडात स्थूलमानाने दिल्या होत्या. घरात, शेतीसाठी, नगरांच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि कारखान्यांमधील कामासाठी लागणारे अधिकांश आणि महत्वाचे पंप सेंट्रिफ्यूगल या प्रकारचेच असतात. पण याशिवाय 'पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट' या नांवाची पंपांची आणखीन एक जात आहे. विशिष्ट कामांसाठी त्या प्रकारच्या पंपांचाच उपयोग करावा लागतो.

'पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट' या शब्दाचा अनुवाद 'सकारात्मक विस्थापन' असा करता येईल. पण ज्या लोकांना थोडे फार तांत्रिक ज्ञान आहे त्यांना मूळ इंग्रजी शब्दच माहीत असतो, नवीन मराठी प्रतिशब्द कदाचित त्यांच्या लक्षात येणार नाही. ज्यांना तांत्रिक विषय आवडत नाहीत असे लोक कदाचित हा भाग वाचणार नाहीत. त्यामुळे रूढ नसलेला मराठी प्रतिशब्द वापरून त्यातून कांही साध्य होईल असे मला वाटत नाही. या प्रकारच्या पंपांमध्ये त्यातला द्रवपदार्थ रेटून पुढे ढकलला जात असतो, त्यामुळे त्याला 'रेटू' किंवा 'ढकलू' पंप म्हंटले ते योग्य होईल, पण कदाचित ते हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे.

एक साधी पिचकारी घेतली तर त्यातील नळकांडी (सिलिंडर)मध्ये मागे पुढे होऊ शकणारा दट्ट्या(पिस्टन) बसवलेला असतो. या दट्ट्याला पूर्णपणे मागे ओढून ते नळकांडे पाण्याने भरले जाते आणि तो दट्ट्या जोराने पुढे ढकलला की ते पाणी समोर असलेल्या छिद्रामधून वेगाने बाहेर ठकलले जाते. पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे दट्ट्या वर ओढला की त्या नळकांडीमध्ये निर्वात पोकळी तयार होते आणि हवेच्या दाबामुळे टाकीतले पाणी त्यात ढकलले जाते आणि त्या पाण्याने नळकांडे भरते. दुस-या चित्रात दाखवल्याप्रमाणे पिचकारी बाजूला घेऊन दट्ट्या खाली ढकलला की खाली असलेल्या छिद्रामधून त्या पाण्याचा फवारा बाहेर पडतो. ही पिचकारी एकाच जागी स्थिर ठेवून दट्ट्या वर खाली केला तर त्याच छिद्रामधून पाणी नळकांडीमध्ये वर खाली होत जाईल. याला पंप म्हणत नाहीत.

पण तिस-या चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यात थोडा बदल केला. त्याला दोन वेगवेगळ्या नळ्या जोडून त्याला झडपा लावल्या तर या पिचकारीचेच रूपांतर एका पंपात होईल. दट्ट्या वर ओढतांच पहिल्या नॉझलमधून पाणी सिलिंडरमध्ये शिरून त्यात भरले जाईल. पिस्टनला खाली ढकलले असतांना या नॉझलला असलेला व्हॉल्व्ह बंद होऊन पाण्याला टाकीत परत जाऊ देणार नाही. त्या वेळी दुस-या नॉझलला जोडलेला व्हॉल्व्ह उघडा राहील आणि ते पाणी त्याला जोडलेल्या दुस-या पाइपातून उंचावर ठेवलेल्या दुस-या ड्रमात जाईल. अशा रीतीने हा पंप चालवत राहिल्यास खाली असलेल्या टाकीतील पाणी उचलले जाऊन वरचा ड्रम भरत जाईल. हा झाला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपाचा अगदी प्राथमिक नमूना.

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, July 01, 2010

ती

पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो. अशाच एका लहानशा प्रवासात मला 'तो' भेटला होता, 'त्या'च्यावर मी लिहिलेला लेख थोडासा जमला असे माझे मलाच वाटले आणि दोन चार लोकांनी तो (लेख) वाचून तसे मला सांगितलेही. पुन्हा एकदा अशाच आणखी कोणा अनामिक व्यक्तीबद्दल लिहावे असा विचार मनात येत होता, तेवढ्यात योगायोगाने बसच्या प्रवासातच मला 'ती' भेटली. म्हंटले, चला आता 'ति'च्याबद्दल लिहून मोकळे व्हावे.

वाशीहून मुंबईच्या दिशेने जाणा-या बसच्या थांब्यावर बस येण्याच्या दिशेकडे पहात मी उभा होतो. सकाळच्या वेळी वाहनांच्या गर्दीनेच तो रस्ता दुथडीने भरून वहात होता. त्या जागी घोळका करून उभे राहण्यासाठी मुळी जागाच नव्हती. बसची वाट पहाणा-या लोकांना रस्त्याच्या कडेलाच ओळीत उभे रहावे लागत होते म्हणून त्याला रांग म्हणायचे. पण रांगेत शिस्तीने उभे रहाणे, बस आल्यानंतर क्रमवार बसमध्ये चढणे वगैरे गोष्टी आता सुरूवातीच्या स्थानकावरच दिसल्या तर दिसतात. इतर ठिकाणी त्या इतिहासजमा झाल्या आहेत. पण त्यामुळे बस येण्याच्या आधी कोणी कुठे उभे रहावे यावरून आता भांडणे होत नाहीत.

आपल्या सहप्रवासोत्सुक मंडळींबरोबर मीही बसची वाट पहात उभा होतो. त्यांच्यात वैविध्य होतेच, पण त्या सर्वांपेक्षा खूप वेगळी अशी 'ती' समोरून येतांना दिसली. यौवनाने मुसमुसलेला सुडौल बांधा, विलक्षण लक्षवेधक चेहरा ...... (बाकीच्या वर्णनासाठी एकादी शृंगारिक कादंबरी वाचावी किंवा फर्मास लावणी ऐकली तरी चालेल.) 'लटपट लटपट', 'ठुमक ठुमक' वगैरे सगळी विशेषणे चोळामोळा करून फेकून द्यावीत अशा जीवघेण्या चालीमध्ये हाय हीलच्या शूजने टिकटॉक टिकटॉक करत ती आली आणि चक्क आमच्या रांगेच्या सुरुवातीलाच उभी राहिली. रांगेमधल्या सा-या नजरा आता कोणच्या दिशेने वळल्या हे सांगायची गरज नाही. तिच्या बुटांची हील्स किती उंच होती आणि केशसंभारामध्ये खोचलेल्या क्लिपांची लांबी रुंदी किती होती वगैरे तपशीलाकडे बघ्यांमधल्या स्त्रीवर्गाचे लक्ष असले तर असेल. तिच्या अंगाला घट्ट चिकटून तिची कमनीय आकृती इनामदारीने दाखवणारी जीन पँट चढवून त्यावर भडक रंगाचा टीशर्ट (किंवा टॉप?) तिने घातला होता. 'ही दौलत तुझ्याचसाठी रे, माझ्या राया' अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य त्यावर गिचमीड अक्षरांत छापलेले होते. कोणाला निरखून पहायचे असेल तर ते वाक्य वाचण्याचे निमित्य तो करू शकला असता आणि ज्याला वाचनाचीच आवड असली तर अशाला त्या 'शब्दांच्या पलीकडले' दिसल्यावाचून राहिले नसते.

कोणत्याही प्राण्याच्या कोणत्याही वयातल्या नराच्या मनात अशा प्रसंगी कोणत्या प्रकारच्या लहरींचे तरंग उठायला हवेत ते या विश्वाचा निर्माता, निर्माती, निर्माते जे कोणी असतील त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवले आहे आणि त्याचा अंतर्भाव त्यांच्या जीन्समधल्या प्रोग्रॅमिंगमध्ये करून ठेवलेला आहे. इतर प्राणी अशा वेळी कान उभे करून, नाक फेंदारून, फुस्कारून किंवा शेपूट हालवून त्या तरंगांना मोकळी वाट करून देतात. मनुष्यप्राणी मात्र सुसंस्कृत वगैरे झाल्यानंतर ही गोष्ट जाहीरपणे मान्य करायला धजत नाही. शिवाय तो लबाड असल्यामुळे ही गोष्ट आपल्या चेहे-यावरही आणू देत नाही. तरीसुध्दा आपण त्या भावनेला एका नजरेत ओळखतो असा दावा केलेला दिसतो. 'ती' आली, 'ति'नेही एक नजर रांगेतल्या लोकांवर टाकली आणि आपला सेलफोन कानाला लावून कोणाशी तरी खिदळत मोत्यांचा सडा घालत राहिली.

त्या दिवशी बसला यायला थोडा उशीर लागला असला तरी कदाचित कोणी फारशी कुरकुर केलीही नसती, पण कांही सेकंदातच ती (बस) येऊन धडकली. बसच्या ड्रायव्हरनेस्ध्दा 'ति'ला पाहिले असणार. थांबा येण्याच्या आधीच बसचे मागचे दार बरोबर 'ति'च्या समोर येईल अशा अंदाजाने ती बस उभी राहिली. बसमध्ये गच्च भरलेली उभ्या प्रवाशांची गर्दी नसली तरी बसायलाही जागा नव्हती. 'ती' बसमध्ये चढल्यानंतर चपळाईने पुढे गेली. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या एका जागेवर बसलेल्या मुलाला तिने उठायला लावले आणि ती जागा तिने पकडली. बस आल्यानंतर रांग मोडून सारे लोक धांवले आणि धक्काबुक्की करत आत घुसले. अशा धक्काबुक्कीपासून स्वतःचा जीव आणि खिशातले पाकीट सांभाळण्याच्या दृष्टीने मी त्यात सहभागी झालो नाही. सरळ पुढच्या दरवाजाने प्रवेश करून ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवलेली जागा गाठली. बहुतेक वेळी त्या जागेवर 'चुकून' बसलेला एक तरी बकरा सापडतो आणि मला ती जागा मिळते. पण त्या दिवशी त्या जागांवर बसलेले सगळेच माझ्यासारखेच ज्येष्ठ दिसत होते. त्यामुळे मला उभ्याने प्रवास करणे भागच होते.

एका मिनिटाच्या आत ती बस वाशीच्या टोलनाक्यापर्यंत आली. तोंवर माझे तिकीट काढून झाले होते. आता खाडीवरील पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतरच कोणी जागेवरून उठला तर मला बसायला मिळणार होते. पण त्यानंतर लगेच मला उतरायचे होते. एक हात खिशावर ठेवून आणि दुस-या हाताने खांबाला धरून हिंदकळत आणि आपला तोल सांवरत मी उभा राहिलो. अधून मधून आपली क्षमता पाहणेही आवश्यकच असते असे म्हणत मी स्वतःची समजूत घातली. खरोखर मला त्याचा फारसा त्रास वाटतही नव्हता. ही बस सोडली असती तर पुढच्या बससाठी स्टॉपवर पंधरा वीस मिनिटे उभे रहावे लागले असतेच. तेवढा वेळ बसच्या आत उभे राहिलो असे समजायला हरकत नव्हती.

राखीव सीट काबीज करून तिच्यावर आरूढ झालेली 'ती' जवळच बसली होती. अचानक 'ती' उठून उभी राहिली. 'ति'च्या ओळखीचे कोणी तरी मागून येत असेल असे समजून मी मागे वळून पाहिले. तिकडे कोणतीच हालचाल दिसली नाही. मला गोंधळलेला पाहून 'ति'ने मला खुणेनेच त्या जागेवर बसायची सूचना केली. मीही खुणेनेच 'स्त्रियांसाठी राखीव'चा फलक तिला दाखवला. आता मात्र ती बोलली, "मी माझी जागा तुम्हाला देते आहे."
"ते ठीक आहे. पण ..." असे म्हणत मी माझ्या मागेच उभ्या असलेल्या दुस-या मुलीकडे हळूच बोट दाखवले.
"तिची काळजी करू नका, तिला मी सांगेन." त्या मुलीला ऐकू येईल अशा पध्दतीने 'ती' अधिकारवाणीत बोलली. त्यावर कसलेही भाष्य करायची हिंमत त्या दुस-या मुलीला झाली नाही.
आता तिने दिलेल्या सीटचा स्वीकार करणे मला भागच होते. मात्र वर लिहिलेली तिच्याबद्दलची सर्व विशेषणे मी आता पार विसरून गेलो. त्यांऐवजी माया, ममता, करुणा वगैरे मूर्तिमंत होऊन माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आहेत असा भास मला होत राहिला.