Tuesday, February 23, 2016

सोड, घे, टाक आणि दे

हा लेख मी मराठी दैनिकाच्या दि.३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
 मी मराठीचे धन्यवाद. 
http://epaper.mimarathilive.com/epapermain.aspx?pgno=16&eddate=2016-4-03&edcode=820009
----------------------------------------------------------------------------------------------

सोड, घे, टाक आणि दे या चार क्रियापदांचा उपयोग आपण आपल्या दररोजच्या जीवनात  वारंवार करत असतो. आपण काही तरी सोडून दुसरे काहीतरी घेत असतो, कुणाला तरी काही तरी देऊन टाकतो किंवा काही तरी टाकून देत असतो. पण यातली क्रिया प्रत्यक्षात घडत नसतांना किंवा तसा कोणाचा उद्देश किंवा अपेक्षा नसतांना देखील त्या क्रियापदाचा नेहमी उपयोग होत असतो तो कशासाठी असेल ?

मराठी, हिंदी, कन्नड अशा बहुतेक सगळ्या भारतीय भाषांची वाक्यरचना कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमाने होते.  त्यातला कर्ता किंवा कर्म यांच्याविषयी अधिक माहिती विशेषणांमधून दिली जाते आणि क्रियेबद्दल माहिती देण्यासाठी क्रियाविशेषणांचा उपयोग केला जातो. पण कदाचित तेवढ्याने भागत नसावे म्हणून काही वेळा एकाच वाक्यात दोन दोन क्रियापदांचा उपयोग कसा केला जातो हे वर दिलेल्या दुस-या वाक्याच्या  उदाहरणावरून (देऊन टाकतो, टाकून देतो) दिसतेच आहे. खंडाळ्याच्या घाटातून आगगाडीला वर चढवण्यासाठी दुसरे इंजिन लावतात त्याप्रमाणे या दुस-या क्रियापदाने पहिल्याला कदाचित जास्त जोर येत असावा. मी याबद्दलच या लेखात थोडेसे लिहिणार आहे.

माझे बालपण उत्तर कर्नाटकात गेले. त्या राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्येसुद्धा कानडी भाषेच्या निरनिराळ्या बोली बोलल्या जातात. आमच्या भागात एकादी गोष्ट  "दे" किंवा  "घे" असे सांगतांना "क्वोट्ट बिडू" किंवा "तगोंड बिडू" असे म्हंटले जात असे. आमच्या बोलण्यातल्या मराठी भाषेवर याचा प्रभाव पडल्यामुळे आम्ही देखील "देऊन सोड", घेऊन सोड" असे बोलत असू. इतकेच नव्हे तर त्याला "बघ" हे तिसरे क्रियापद जोडून "देऊन सोड बघं, घेऊन सोड बघं." असेही सांगितले जात असे. ही बोली ऐकण्यासाठी जुन्या मराठी नाटक सिनेमांमधली बेळगावकडली पात्रे आठवावीत.

मी कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यामुंबईकडे आलो तेंव्हा मी सुद्धा असेच बोलत असे . "देऊन सोड बघं, घेऊन सोड बघं." असे काही मी कोणाला सांगितले तर ते ऐकून माझे मित्र मला हसत असत. "मी तर हे दिलं (किंवा घेतलं,) आता मी काय सोडू आणि काय बघू?" असे ते मला खोचकपणे विचारायचे. त्यामुळे मी माझ्या बोलण्यातल्या दुस-या "सोड"ला सोडचिठ्ठी दिली आणि "बघ" ला वा-यावर सोडून दिले. आता "बघ" ला वा-यावर सोडल्यानंतर मी कोणाला आणखी काय दिले असेल ? खरे तर काहीच नाही, पण "सोडून दिले" असे म्हणण्याची पुण्यामुंबईच्या भाषेतली नवी संवय मला लागली. इकडच्या बोलीमध्ये जसे "सोडून दे" म्हणतात तसेच "देऊन टाक", "घेऊन टाक" असे ही सांगतात. आता एकादी गोष्ट दिल्यानंतर काय टाकायचे आणि ती टाकायचीच असेल तर घ्यायची तरी कशाला ? इथे "टाक" या क्रियापदाला तो अर्थच नसतो. ते फक्त अधिक जोर देणारे दुसरे इंजिन असते.

माझी पत्नी मध्यप्रदेशातली पण मराठी भाषिक आहे. तिच्या माहेरच्या लोकांच्या कानावर सारखी हिंदी भाषा पडत असल्यामुळे त्या भाषेचे संस्कार त्यांच्या मराठी बोलीवर होणारच. हिंदी भाषिक लोक  देण्याघेण्यासाठी "दे दो, ले लो" असे म्हणतात तर करण्यासाठी "कर लो आणि कर दो" हे दोन्ही पाठभेद प्रचलित आहेत. त्यांच्या अर्थांमध्ये सूक्ष्म भेद ही आहेत. त्यामुळे माझी पत्नी आणि तिच्या नातेवाइकांच्या बोलण्यात "घेऊन घे, देऊन दे, करून घे. करून दे" असे वाक्यप्रयोग येत असतात आणि त्यांना ते शुद्धच वाटतात.

आम्ही ज्या घरात जवळजवळ अर्धे आयुष्य घालवले तिथे आमचे एक शेजारी इंदूरचे भटनागर होते, ते तर शुद्ध हिंदीभाषिक होतेच आणि दुसरे नागपूरचे देशपांडे होते. त्यांच्या बोलण्यावरही हिंदी भाषेचा प्रभाव होता, शिवाय "करून राहिलो, देऊन राहिलो" वगैरे विदर्भीय थाट होता.  त्याची सरमिसळ आमच्या बोलण्यात होत गेली. खरे तर ती कुठेच गेली नाही, आमच्या बोलण्यात एकरूप होऊन ती तिथेच राहिली.

आता मला एकादा बेळगाव धारवाडकडचा माणूस भेटला तर मी ही त्याला "अरे, हे काम करून सोड बघं." असे सांगतो. पुणेकराला "देऊन टाक" सांगितले तर तो ते ऐकेल की नाही कोण जाणे, त्यापेक्षा त्याला "घेऊन टाक" म्हंटलेले बरे. इंदूरकडच्याला "देऊन देतोस का?" म्हंटले तर तो ही लगेच "घेऊन घे ना." असे म्हणेल आणि नागपूरकर तर "देऊन राहिलोय् ना बे." असे बोलेल. यातल्या शेवटच्या क्रियापदाचा शब्दशः अर्थ घेणे अभिप्रेत नसतेच मुळी !