उत्तर इंग्लंडमधील दोन छोट्या नद्यांच्या बेचक्यातली ही नैसर्गिक रीत्या सुरक्षित जागा बरोबर हेरून रोमन राज्यकर्त्यांनी या ठिकाणी आपले मुख्य ठाणे वसवले होते. अधिक सुरक्षेसाठी त्यांनी गांवाभोवती भक्कम तटबंदी बांधली आणि खंदक खणले. नंतरच्या काळातील यॉर्विक आणि नॉर्मन राज्यकर्त्यांनी ती सुरक्षाव्यवस्था आणखीनच मजबूत केली. इतिहासकालात बांधलेल्या या तटबंदीचा बराच भाग आजही चांगल्या अवस्थेत टिकून राहिलेला दिसतो.
व्हायकिंग्जच्या यॉर्विक या नांवावरूनच यॉर्क हे त्या शहराचे नांव पडले. नॉर्मन राजवटीमध्ये ते उत्तर इंग्लंडचे प्रमुख शहर झाले. त्या भागातल्या राज्यकारभाराची तसेच व्यापारउद्योगाची सूत्रे तिथून हलवली जात असत. यॉर्कचे हे वैभव कित्येक शतके टिकले. तो भाग इंग्लंडच्या राज्यात सामील झाल्यानंतरही यॉर्कचे महत्व टिकूनच होते. त्या काळात तिथे ज्या उत्तमोत्तम सुंदर इमारती बांधल्या गेल्या त्यातल्या कांही इमारती आजही सुस्थितीत पहायला मिळतात.
दोन्ही नद्यांच्या पलीकडल्या भागातसुद्धा आधुनिक काळात सगळ्या बाजूने वस्ती वाढत गेली. यॉर्कचे रेल्वे स्टेशन आणि नॅशनल रेल्वे म्यूझियम या नव्या भागातच प्रस्थापित झाले आहे. या नव्या भागात आधुनिक पध्दतीच्या रस्त्यांचे जाळे बांधले आहे. त्यावरील मोटारगाड्यांची रहदारी पाहून ते इंग्लंडमधील इतर कोणत्याही गांवासारखेच दिसते. पण तटबंदीच्या आंत बंदिस्त असलेला शहराचा बराचसा मूळ भाग अजून पूर्वीच्याच अवस्थेत राखून ठेवला आहे. तिथे अरुंद असे दगडी रस्ते आहेत. त्यावरून फक्त पायीच चालता येते. आजूबाजूला त-हेत-हेची दुकाने आहेत. अरुंद गल्लीबोळांच्या चौकाचौकात तिथून फुटणारा प्रत्येक मार्ग कोठे जातो याची दिशा दाखवणारे पुरातन वाटावेत असे सुबक फलक लावलेले आहेत. ते पाहून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाता येते. हा भाग स्टेशनपासून किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही तिथे पायीच जाणे पसंत केले. तशा तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जाणा-या सिटी बस दिसल्या, पण त्यांचे मार्ग आणि नेमके कुठे जायचे ते समजून घेणे कठीण होते. त्यापेक्षा इकडचे तिकडचे निरीक्षण करीत पायीपायीच फिरणे जास्त आनंददायी होते. ऊन पडल्यानंतर वातावरणातला गारवा कमी होऊन तेसुध्दा उत्साहवर्धक झाले होते.
औस नदीवरील पूल पार करून यॉर्क मिन्स्टरला गेलो. तिथले भव्य वास्तुशिल्प पाहून जुन्या गांवात शिरलो आणि गल्लीबोळातून फिरत फिरत जुन्या काळातल्या गांवाच्या दुस-या बाजूला असलेल्या क्लिफोर्ड टॉवरला पोचलो. या ठिकाणी वस्तीच्या मधोमध एक उंचच उंच बुरुज बांधला आहे. विल्यम द काँकरर या इंग्लंडच्या बलाढ्य राजाने आपल्या उत्तर दिग्विजयाचे प्रतीक म्हणून हा बुरुज बांधला. या बुरुजाचा उपयोग दूरवरच्या भागाचे निरीक्षण करून शत्रूसैन्याच्या हालचाली न्याहाळण्यासाठी होत होता. तसेच अत्यंत महत्वाच्या व्यक्तींना या बुरुजावर सुरक्षितपणे ठेवलेही जात असावे. त्यात कांही राजबंदीही असत. तत्कालिन राहण्याच्या खोल्या अजून पहायला मिळतात. या बुरुजावरून यॉर्क शहर आणि आसमंताचे विहंगम दृष्य दिसते.
क्लिफोर्ड बुरुजाच्या पायथ्यापाशी कॅसल म्यूजियम आहे. अनेक जुन्या काळातल्या वस्तू तिथे ठेवल्या आहेत. त्यातील जुन्या काळातील वस्त्रे प्रावरणे विशेष लक्षवेधी आहेत. त्यातल्या एका दालनात राणी व्हिक्टोरियाच्या काळातील एक लहानशी गल्ली उभी केली आहे. तत्कालीन घरे, दुकाने, त्यावरील पाट्या, त्यातली कपाटे आणि त्यात मांडून ठेवलेला माल हे सगळे आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. रस्त्यावरून जाणारी घोड्यांची बग्गी आणि हातगाडी वगैरे तपशील देखील उभा केला आहे. अशा प्रकारची दृष्ये मी याआधी लीड्स आणि लंडनला पाहिलेली असल्यामुळे ती अप्रतिम असली तरी मला विशेष नाविन्यपूर्ण वाटली नाहीत.
कॅसल म्यूझियम बंद होण्याची वेळ होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. पुन्हा हवेत बोचरा गारठा आला होता. आणखी फिरण्याची हौसही शिल्लक नव्हती आणि अंगात त्राणही उरले नव्हते. रेल्वे स्टेशनवरील उबदार वातावरणात येऊन थोडे खाऊन पिऊन घेतले. परतीच्या गाडीचे आगाऊ तिकीट काढून ठेवलेले असल्यामुळे त्याआधी लीड्सच्या दिशेने रिकाम्या गाड्या जातांना दिसल्या पण त्यासाठी वेगळे तिकीट काढून त्या गाडीतून जाणे परवडण्यासारखे नव्हते. तिथल्या दुकांनाच्या तावदानांतून विंडो शॉपिंग करीत व येणा-या जाणा-या प्रवाशांचे निरीक्षण करीत आपल्या ठरलेल्या गाडीची वाट पहात राहिलो. एक प्रेक्षणीय स्थान पाहिल्याचे समाधान मनात होतेच. त्यामुळे आता सोसावा लागणारा गारठा सुसह्य वाटत होता.
No comments:
Post a Comment