Wednesday, November 30, 2011

आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हंटले असते

आत्याबाईला मिशा असत्या तर ... तिला 'काका' म्हंटले असते. ही म्हण माझ्या लहानपणी खूप प्रचलित होती. कदाचित मी जरा जास्तच चौकस (किंवा आगाऊ) असल्यामुळे नाही नाही ते प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडत असेन आणि त्यामुळे वैतागून ते लोक मला ही म्हण वरचे वर ऐकवत असतील. 'आत्या' म्हणजे पित्याची बहीण म्हणजे ती बाईच असणार आणि 'काका' हा पित्याचा भाऊ असल्याने बुवाच असणार हे या शब्दांच्या व्याख्यांवरून स्पष्ट होते. हिंदी भाषेत आत्याला 'बुवा' म्हणतात हे मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा माझी हंसून हंसून पुरेवाट झाली होती. पण 'बुवा' असा ऐकू येणारा हा शब्द 'बुआ' असा आहे आणि तो स्त्रीलिंगी आहे ही माहिती राष्ट्रभाषेचा अभ्यास करतांना मिळाली. ज्या प्रमाणे मला बुवा(आ) हा शब्द ऐकून गंमत वाटली होती तशीच मजा हिंदी भाषिक लोकांना 'जगन्नाथबुवा' किंवा 'यशवंतबुवा' ही मराठी नावे ऐकतांना वाटत असेल. 'काका' हा शब्द मात्र सगळ्या भाषांमध्ये पुल्लिंगीच असावा. त्या बाबतीत काही गोंधळ नाही. पण पंजाबीमध्ये लहान मुलाला 'काका' किंवा 'काके' असे संबोधतात तेंव्हा त्यांना मिसरूड फुटलेले नसते. त्यामुळे पंजाबी 'काका'ला बहुधा मिशा नसतात. राजेश खन्ना मात्र जन्मभर 'काका'च राहिला. एका चित्रपटात त्याने "ये मर्दोंकी खेती है।" असे म्हणून ओठांवर थोडेसे रान माजवले होते आणि त्याच्या 'मर्दानगी'ची खात्री नायिकेला पटली हे पाहून झाल्यावर त्याला साफ करून टाकले होते.
पुरुषांना मिशा असतात तशा स्त्रियांना त्या नसतात हे सर्वसामान्य निरीक्षण असते. त्यामुळे आत्याबाईला मिशा नसतात हे उघड आहे. पूर्वीच्या काळी बहुतेक काका लोक मिशा ठेवत असत. पण गेल्या दोन तीन पिढ्यांपासून बहुसंख्य पुरुषांनी मिशांना चाट दिली असल्यामुळे आत्या आणि काका यांच्यातला एक महत्वाचा दृष्य फरक नाहीसा झाला (दोघेही पँट चढवू लागले असल्यामुळे आणखी एक फरक कमी झाला) आणि ही म्हण किंचित मागे पडली असावी. खूप दिवसांपासून माझ्या कानावर ती पडली नाही. पण लेखनामध्ये आणि भाषणांमध्ये ती अजूनही सर्रास वापरली जातेच. 'जर असे झाले असते तर' असे तर्ककुतर्क असलेले प्रश्न कोणी विचारले आणि त्याला उत्तर देणे अडचणीचे असले तर ही म्हण त्या प्रश्नकर्त्याच्या तोंडावर फेकली जाते. उदाहरणार्थ तुमचा अमका उमेदवार निवडणूकीत पडला असता, तमक्याला भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन बनवले असते, व्यापाराचे जागतिकीकरण झाले नसते, न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडण्याऐवजी त्याचे झाडच पडले असते वगैरे वगैरे. ज्या गोष्टीची मुळीच शक्यता नसते अशी एकादी गोष्ट झाली तर (तू काय करशील?) किंवा जी गोष्ट घडलेली नाही ती घडली असती तर काय झाले असते? असे विचारणे हा या म्हणीचा अर्थ आहे. तसेच एकादी गोष्ट करण्यासाठी अशक्य अशा अटी घालणे असाही होऊ शकतो. "आत्याबाईला मिशा असत्या तर ..." असे विचारणे मूर्खपणाचे आहे असे म्हणू शकतो किंवा तसे न म्हणता "तर तिला 'काका' म्हंटले असते." असे चतुराईचे उत्तर देता येते. न होणा-या गोष्टींबद्दल चिकित्सा करत बसू नये असा बोध त्यावरून मिळतो.

"तुला दोन शिंगे फुटली तर .." असे एकाद्याला म्हंटले तर तो माणूस प्रश्न विचारणा-याला मूर्खात काढेल किंवा "आधी मी ती तुझ्या पोटात खुपसेन" असे उत्तर देईल. 'आत्याबाईला मिशा असत्या तर' ही म्हण या ठिकाणी लागू पडते कारण तसे घडण्याची शक्यता नसते. या उलट "तुला खूप भूक लागली तर ..." असा प्रश्न विचारला तर त्यात काहीच अशक्य नाही. प्रत्येक माणसाला भूक तर लागतेच. पण तिचे शमन अन्न खाऊन करतात हे उत्तरसुध्दा सर्वांना माहीत असते. त्यामुळे हा प्रश्न "काकाला मिशा असल्या तर... " असा (निर्बुध्दपणाचा) होऊ शकेल आणि वैतागून "तुलाच खाईन." असे उत्तर त्यावर मिळण्याची शक्यता आहे. पण जर तो माणूस अंटार्क्टिका किंवा सहारा वाळवंटात मोहिमेवर निघाला असेल तर मात्र आपण भूक भागवण्याची कशी जय्यत तयारी केली आहे हे फुशारकीने सांगेल.

चित्रपट आणि मालिकांमध्ये न्यायालयाची जी दृष्ये दाखवतात त्यांमध्ये साक्षीदाराला एका बाजूच्या वकीलाने 'जर तर' असलेला काही प्रश्न विचारला की लगेच विरुध्द बाजूचा वकील "ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा प्रश्न हायपॉथिटीकल आहे" असे म्हणत उभा राहतो. त्या वेळी प्रेक्षकांमध्ये पिकलेल्या हंशावरून कदाचित हा प्रश्न 'आत्याबाईला मिशा असत्या तर' अशा प्रकारचा असावा असे आपल्यालाही वाटते. मग त्या प्रश्नाचा न्यायालयासमोर असलेल्या खटल्याशी कसा संबंध आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न पहिला वकील करतो. ते ऐकून घेतल्यानंतर "ऑब्जेक्शन सस्टेन्ड किंवा ओव्हररूल्ड" असा निर्णय न्यायमूर्ती देतात. याबद्दल थोडी फार संदिग्धता असते हेच यावरून दिसते.

काही दिवसांपूर्वी परगावी गेलो असतांना परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्टेशनावर आलो असतांना अचानक माझी प्रकृती खूप बिघडली होती. त्या वेळी आलेल्या अनुभवावर मी एक लेख लिहून तो एका संकेतस्थळावर प्रसिध्द केला होता. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी एका प्रतिसादात "जे घडलेच नाही त्यावर जर तर चर्चा करून उगाच त्रास कशाला करून घ्यायचा ?" असे विचारले होते. त्यामुळे त्या लेखात केलेले माझे विवेचन 'आत्याबाईला मिशा असत्या तर' अशा प्रकारचे होते का असे मला क्षणभर वाटले. पण ते तसे नव्हते. कोठल्याही माणसाची प्रकृती अचानक बिघडण्याची शक्यता तरुणपणी अगदी कमी म्हणजे शून्याच्या जवळपास इतकीच असते. त्यामुळे नको ते विचार मनात आणून स्वतःला ताप करून घेण्यात अर्थ नसतो हे खरे आहे. पण माझी तब्येत बिघडण्यासाठी माझ्या शरीरात जे काही (मला माहीत नसतांना) चालले होते त्याचा परिपाक मी रेल्वे स्टेशनवर असतांना ती व्याधी एकदम विकोपाला जाण्यात झाला. जी गोष्ट प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर अर्ध्या तासात झाली ती नंतरच्या सोळा तासात होण्याची शक्यता बत्तीसपट जास्त होती. त्यामुळे प्रवासात असतांना ती झाली असती तर काय झाले असते हा प्रश्न गैरलागू ठरत नाही.

हृदयविकार, एड्स किंवा कँसर या व्याधी कोणालाही जडण्याची शक्यता संख्याशास्त्रानुसार नगण्यच असते, पण कोणत्याही दिवसाचे वर्तमानपत्र वाचतांना त्यासंबंधी निदान एक तरी बातमी, लेख किंवा जाहिरात त्यात दिसतेच. जेंव्हा एकादा प्रसिध्द माणूस त्यांना बळी पडलेला असतो तेंव्हा त्याच्य़ासमवेत त्याला जडलेल्या विकारालासुध्दा प्रसिध्दी मिळते. रोगाचे निदान आणि त्यावरील उपाययोजना यात झालेल्या प्रगतीमुळे बहुतेक इतर व्याधी पहिल्यासारख्या दुर्धर राहिलेल्या नाहीत. त्यांची गणना आता बातमी या सदरात होत नाही. त्यामुळे प्रसिध्द व्यक्तींना दुर्धर व्याधी जडण्याची शक्यता अजूनही तशी कमीच असली तरी त्याची बातमी होण्याची शक्यता मात्र प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्या बातमीमुळे सर्वसामान्य लोकांनासुध्दा त्याची माहिती मिळते तसेच त्याची भीती वाटते. ते विकार होऊ नयेत यासाठी घेण्याची सावधगिरी किंवा त्यांचे नियंत्रण व निवारण करण्याठी करण्याचे उपाय, ते जडल्यानंतर काय करावे यावर सल्ले अशा अनेक प्रकारचे लेख रोज वर्तमानपत्रात येत असतात किंवा त्याची चर्चा टीव्हीवर होत असते. त्यावरील प्रतिबंधक व निवारक औषधे आणि त्यांचे निदान व त्यावर उपचार करण्याची व्यवस्था असलेल्या संस्था त्यांची जाहिरात मोठ्या प्रमाणावर करत असतात. कांही लोकांना याचा उपयोग होत असतो. त्यामुळे आपल्याला असे काही होईल का हा विचार आत्याबाईंना मिशा असण्याच्या जवळपास असला तरी तो करणे योग्य ठरते. फक्त त्याविषयी भलभलत्या शंकाकुशंका मनात आणून त्यावर चिंता करून फार मनस्ताप करून घेतला, नको तेवढ्या अनावश्यक चाचण्या करून घेतल्या आणि अखेरीस ते 'गुंड्याभाऊचे दुखणे' ठरले तर मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते.
'आत्याबाईला मिशा असत्या तर ...' हा वाक्यप्रयोग त्याची किती टक्के शक्यता आहे एवढ्यावरच अवलंबून नसते, शक्यतेपेक्षाही त्याचे संभाव्य परिणाम किती विदारक असू शकतात यांचा परिणाम जास्त प्रभावी ठरतो.

Friday, November 18, 2011

ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव ...

विश्वामधील सर्व चराचरांचा कर्ता करवता परमेश्वरच असतो. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पानदेखील हलत नाही. तसेच मनुष्याला आपल्या पापपुण्याचे फळ या किंवा पुढल्या जन्मात मिळतेच. त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे आधीच ठरलेले असते आणि त्याच्या कपाळावरील विधीलिखितात लिहून ठेवलेले असते. ते घडल्याशिवाय रहात नाही. वगैरे गोष्टींवर अढळ विश्वास ठेवणा-या लोकांची संख्या प्रचंड आहे.

सर्व सजीव आणि निर्जीवांचे गुणधर्म आणि त्यात होणारे बदल या गोष्टी निसर्गाच्या निश्चित आणि शाश्वत अशा नियमांनुसार होत असतात. प्रत्येक घटनेच्या मागे एक कार्यकारणभाव असतो आणि त्या क्षणी असलेली परिस्थिती आणि ते नियम य़ांच्या अनुसार सर्व घटना घडत असतात असे मला वाटते. विज्ञानामधले शोध, श्रेष्ठ साहित्यकृती व कलाकृती, तंत्रज्ञानातून निर्माण झालेली उत्पादने वगैरे सगळे पुढे घडणार आहे असे आधीच ठरले असेल असे म्हणणे मला पटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आय़ुष्यात घडत असलेल्या घटना हा एका मोठ्या गुंतागुंतीच्या योजनेचा लहानसा भाग असतो असे मला वाटत नाही.

असे असले तरी कधी कधी आलेले अनुभव चक्रावून सोडतात. असेच माझ्या बाबतीत नुकतेच घडले. आमच्या नात्यातील एका मुलाच्या लग्नासाठी आम्ही जबलपूरला गेलो होतो. लग्नामधले धार्मिक विधी, सामाजिक रूढीरिवाज, नाचणे, भेडाघाटची सहल वगैरेंमध्ये धमाल आली. लग्न संपल्यानंतर त्या रात्रीच सर्व पाहुण्यांची पांगापांग सुरू झाली. जबलपूरमधीलच एका आप्तांना भेटायला आम्ही गेलो आणि तिथेच राहिलो. तोपर्यंत सारे काही अपेक्षेप्रमाणे सुरळीत चालले होते. पण दुसरे दिवशी पहाटेच पोटात गुरगुरू लागले आणि उठल्याबरोबर एक उलटी आणि जुलाब झाला. आमचे यजमान स्वतःच निष्णात आणि अनुभवी डॉक्टर असल्याने त्यांनी लगेच त्यावर औषध दिले. ते घेऊन आम्ही आपल्या मुक्कामी परत गेलो. त्यानंतर दिवसभर पुन्हा काही झाले नाही. तरीही दुस-या एका स्थानिक डॉक्टराचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला परत यायला निघालो.

प्लॅटफॉर्मवर बसून गाडीची वाट पहात असतांना एकाएकी मला डोळ्यापुढे निळाशार समुद्र पसरलेला दिसला, आजूबाजूला चाललेला गोंगाट ऐकू येईना, क्षणभर सगळे शांत शांत वाटले आणि ते वाटणेही थांबले. प्रत्यक्षात मी माझी मान खाली टाकली होती, माझ्या पोटातून बाहेर पडलेल्या द्रावाने माझे कपडे आणि पुढ्यातले सामान भिजले होते आणि मी नखशिखांत घामाने थबथबलो होतो, पण मला त्याची शुध्दच नव्हती. जवळच बसलेल्या पत्नीने मला गदागदा हलवल्यावर मी डोळे किलकिले करून वर पाहिले. तोपर्यंत आमची गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती, पण त्यात चढण्याचे त्राणसुध्दा माझ्यात नव्हते, तसेच ते करण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला पोचवायला आलेल्या नातेवाईकांनी धावपळ करून एक व्हीलचेअर आणली आणि तिच्यावर बसवून तडक एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले. अतिदक्षता विभागात दाखल करून इंजेक्शन्स, सलाईन वगैरे देत राहिले. तिथून दुसरे दिवशी वॉर्डमध्ये आणि तिसरे दिवशी घरी पाठवले.

जबलपूरच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण दाखल झाला तर त्याच्या सोबतीला सतत कोणीतरी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. रुग्णासाठी अन्न, पाणी, औषधे वगैरे गोष्टी त्याने वेळोवेळी आणून द्यायच्या असतात. माझी पत्नी सोबत असली तरी त्या नवख्या गावात ती काय करू शकणार होती? डॉक्टर्स सांगतील ती औषधे केमिस्टकडून आणून देणे एवढेच तिला शक्य होते. बाहेरगावाहून लग्नाला आलेले सर्व पाहुणे परतीच्या वाटेवर होते. आता फक्त नवरदेवाचे आईवडील तिथे राहिले होते. लग्नकार्यातली धावपळ आणि जागरणे यांनी त्यांनाही प्रचंड थकवा आला होता आणि उरलेल्या कामांचे डोंगर समोर दिसत होते. तरीही त्यातल्या एकाने माझ्या पत्नीसोबत तिथे राहून दुस-याने घर व हॉस्पिटल यामध्ये ये जा करायची असा प्रयत्न ते करत होते. या दोन्हीमधले अंतरही खूप असल्यामुळे ते कठीणच होते. त्यांनी आणलेले उसने बळ कुठपर्यंत पुरेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पुढे उभा होता.

पण माझ्या आजाराबरोबर जसा हा प्रश्न अचानक उद्भवला, तसाच तो सुटलासुध्दा. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची वार्ता मोबाईल फोनवरून सगळीकडे पसरली होतीच. बाहेरगावातल्या एका नातेवाईकाने त्याच्या चांगल्या परिचयाच्या जबलपूरमधील एका हिंदी भाषिक व्यक्तीचा फोन नंबर माझ्या पत्नीला कळवला. त्यांना फोन लावताच दहा मिनिटात ते सद्गृहस्थ हॉस्पिटलात येऊन हजर झाले आणि त्यांनी आमच्या कल्पनेच्या पलीकडे मदत केली. डॉक्टरांना विचारून माझ्यासाठी ते सांगतील तसे मऊ आणि सात्विक अन्नपदार्थ त्यांच्या घरी तयार करून आणून दिले, तसेच माझ्या पत्नीला जेवणासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि परत हॉस्पिटलात आणून सोडले. असे दोन्ही वेळा केले. गावातच राहणारी त्यांची बहीण आणि तिचे पती यांनी दुसरे दिवशी अशाच प्रकारे आमची काळजी घेतली. त्या संध्याकाळी आम्ही आमच्या आप्तांच्या घरी परतलोच. पुण्याहून माझा मुलगा विमानाने जबलपूरला येऊन पोचला आणि त्याने आम्हाला विमानानेच मुंबईला परत आणले.

आजारपण हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक भाग असतो आणि ते काही सांगून येत नाही. त्यामुळे तसे पाहता यात काहीच विशेष असे नव्हते, पण या वेळचा सारा घटनाक्रम मात्र माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाहून काही बाबतीत वेगळा होता. आम्ही जबलपूरला गेल्यावेळी तिथे कसलीही साथ आलेली नव्हती आणि लग्नसमारंभ एका चांगल्या दर्जाच्या हॉटेलात होता. शुध्दीकरण केलेले पाणी पिणे आणि भरपूर शिजवलेले किंवा भाजलेले ताजे अन्न खाणे याची सावधगिरी मी कटाक्षाने घेतली होती. तरीसुध्दा कोणत्या रोगजंतूंना माझ्या पोटात प्रवेश मिळाला हे पहिले गूढ. त्यांच्या पराक्रमाचा सुगावा लागताच मी त्यावर औषधोपचार सुरू केला होता आणि दिवसभर त्रास न झाल्यामुळे तो लागू पडला आहे असे मला वाटले होते. तरीसुध्दा माझी प्रकृती क्षणार्धात एकदम का विकोपाला गेली हे दुसरे गूढ आणि या गोष्टींचे परफेक्ट टायमिंग हे सर्वात मोठे तिसरे गूढ.

मला सकाळी दिसलेली आजाराची लक्षणे औषध घेऊनसुध्दा दिसत राहिली असती, तर मी लगेच त्यावर वेगळे उपाय केले असते आणि माझी परिस्थिती कदाचित इतकी विकोपाला गेली नसती, परगावाहून आलेला एकादा धडधाकट नातेवाईक माझ्यासाठी मागे थांबला असता. थोडक्यात सांगायचे तर आम्हा सर्वांना झालेल्या त्रासाची तीव्रता कमी झाली असती. पण तसे झाले नाही. नंतर ज्या वेळी परिस्थिती अगदी असह्य होत चाललेली दिसायला लागली होती तेंव्हा नात्यागोत्यात नसलेल्या एका सद्गृहस्थांनी पुढे येऊन तिचा भार उचलला आणि तिला सुसह्य केले. गाडी सुटून पुढे निघून गेल्यानंतर जर मला हेच दुखणे झाले असते, तर त्यावर तातडीचे उपाय होण्याची शक्यताच नव्हती आणि कदाचित त्यातून भयानक प्रसंग ओढवला असता.

परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!

Tuesday, November 08, 2011

सात अब्ज

गेल्या महिन्याच्या अखेरीस जगाची लोकसंख्या सात अब्जावर पोचली अशी बातमी आली. ही संख्या अचूकपणे काढता येणे शक्यच नाही. कारण बरेच वर्षात कित्येक देशात खानेसुमारीच झालेली नाही आणि जेथे ती नियमितपणे होते तेथेसुध्दा ती कितपत बरोबर असते याबद्दल शंका कुशंका असतातच. जन्म आणि मृत्यू यांची नोंदणीसुध्दा सगळीकडे काटेकोरपणे केली जातेच असे नाही. ग्रामीण भागात याबद्दल अजूनही पूर्ण लोकजागृती झालेली नाही किंवा त्यांची सोयच नसते. या सगळ्या गोष्टीबद्दल काही अनुमाने काढून हिशोब मांडले जातात. जनगणनेतून उपलब्ध झालेले आकडे आणि जन्म मृत्यू यांच्या संख्या यावरून प्रत्येक देशाची लोकसंख्या किती दराने वाढत आहे याचा अंदाज बांधून त्यावर चालणारी मीटरे अनेक उत्साही मंडळींनी तयार केली आहेत. प्रत्येकाकडे उपलब्ध असलेली माहिती आणि त्यांची गृहीतकृत्ये यात थोडी फार तफावत असल्यामुळे त्यांच्यात मतैक्य नाही. पण एकाद्या टक्क्याच्या फरकाने ती जुळतात. सात अब्जाचे एक टक्कासुध्दा सत्तर कोटी म्हणजे लहान देशाच्या लोकसंख्येहून जास्त होतात ही गोष्ट वेगळी. या फरकामुळे लोकसंख्येच्या काही मीटर्समध्ये अजून सात अब्जाचा पल्ला गाठला गेलेला नाही. बीबीसी या विश्वसनीय अशा वृत्तसंस्थेचा समावेश त्यात होतो.


असे असले तरी अत्यंत मनोरंजक आणि उद्बोधक अशी माहिती क्षणार्धात मिळवून देण्याची सोय त्यांनी केली आहे. त्यावरून खालील माहिती मिळाली.

जगामध्ये दर तासाला १५३४७ अर्भके जन्माला येतात आणि ६४१८ व्यक्ती दिवंगत होतात त्यामुळे जगाची लोकसंख्या दर तासागणिक ८९२९ ने वाढत आहे.

त्यापैकी भारतात दर तासाला ३११३ अर्भके जन्माला येतात आणि १११४ व्यक्ती दिवंगत होतात, शिवाय ६८ व्यक्ती परदेशगमन करतात त्यामुळे भारताची लोकसंख्या दर तासागणिक १९३१ ने वाढत आहे.

चीनमध्ये हे प्रमाण दर तासाला १९०८ अर्भकांचा जन्म, १०९५ व्यक्तींचा मृत्यू आणि ४३ बहिर्गमन असल्यामुळे चीनची लोकसंख्या दर तासागणिक ७७० ने वाढत आहे.

जगाची लोकसंख्या सात कोटी आणि त्यातील वाढ होण्याचा दर दर वर्षी १.१६ टक्के इतका आहे. चीनची आजची लोकसंख्या सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज ३४ कोटी इतकी असली तरी त्यातील वाढीचा दर फक्त अर्धा टक्का इतकाच आहे. दुस-या क्रमांकावरील भारताची आजची संख्या १ अब्ज २३ कोटी इतकी असली तरी त्यातील वाढीचा दर १.४ टक्के इतका असल्यामुळे काही वर्षानंतर नक्कीच या बाबतीत आपण अग्रगण्य होणार हे ठरलेले आहे. तिस-या क्रमांकावरील यूएसए आणि चौथ्या इंडोनेशियाची लोकसंख्या अजून अनुक्रमे ३१ व २४ कोटी एवढीच असल्यामुळे ते देश आपल्या बरेच मागे आहेत आणि त्यांचा वाढीचा दरसुध्दा अनुक्रमे ०.९ व १.१ टक्के एवढाच म्हणजे आपल्याहून कमी असल्यामुळे ते देश आपल्यापुढे जाण्याची शक्यता नाही. लोकसंख्येच्या बाबतीत बांगलादेशाला मागे सारून पाकिस्तानने आघाडी मारलेली आहे हे मला ठाऊक नव्हते. तसेच बांगलादेशातील वाढीचा दर भारतापेक्षा कमी आहे आणि त्या देशातून परदेशी जाणा-या लोकांची संख्या मात्र जवळ जवळ भारतीयांएवढीच आहे ही नवी माहिती मिळाली. कदाचित यातले बरेच लोक तिकडून इकडे येत असण्याची दाट शक्यता आहे. बेकायदेशीररीत्या येणा-यांचा समावेश यात होत नसावा. असे सगळे असले तरी बांगलादेशीयांच्या लोकसंख्येची घनता (दाटीवाटी) अपरंपार आहे.

कतार या देशाची लोकसंख्या सर्वाधिक झपाट्याने वाढत असली तरी तिचा परिणाम जगाची लोकसंख्या वाढण्यावर होत नाही. फक्त अठरा लक्ष एवढीच लोकसंख्या असलेल्या या देशात दर तासाला दोन मुले जन्माला येतात आणि एक माणूस हे जग सोडून जातो. पण दर तासाला वीस माणसे बाहेरून येत असल्याकारणाने त्या देशाच्या लोकसंख्यावाठीचा दर वर्षाला पंधरा टक्के एवढा फुगला आहे. रशिया या मोठ्या देशामधील मृत्यूंचे प्रमाण जन्मांपेक्षा जास्त असून शिवाय काही लोक बहिर्गमन करत आहेत. त्यामुळे त्या देशाची लोकसंख्या घटत चालली आहे. सोव्हिएट युनियनमधून बाहेर पडलेल्या मोलदोव्हा नावाच्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक वेगाने कमी होत चालली आहे. फक्त ३५ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात तासाला पाच बालके जन्माला येतात, सहा जण हे जग सोडून जातात आणि चार जण देश सोडून परागंदा होतात. लोकसंख्या कमी होत असतांनासुध्दा उरलेल्या लोकांना तिथून बाहेर जावे असे का वाटते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

कोठल्याही सर्वसाधारण कुटुंबात चिमुकल्या नव्या पाहुण्याचे स्वागत खूप आनंदाने केले जाते. काही मुलांची गणना ७ अब्जाव्वा जीव म्हणून केली गेली आहे. त्यांचे जरा जास्तच कौतुक होत असेल. एकंदरीतच कोणत्याही क्षेत्रातल्या नव्या उच्चांकाचा जल्लोश साजरा केला जातो. पण या सात अब्जांच्या टप्प्यावर मात्र उत्साह आणि उल्हास यापेक्षा चिंताजनक प्रतिक्रियाच मोठ्या प्रमाणात व्यक्त केल्या जात आहेत. त्याची कारणे उघड आहेत. सात अब्ज तोंडांबरोबर चौदा अब्ज हातसुध्दा उपलब्ध झाले आहेत आणि ते काम करून त्या तोंडांना खाऊ घालू शकतील असे म्हणता येत असले तरी पृथ्वीतलावरील उपलब्ध जमीन, हवा, पाणी वगैरेंचा आजच जवळ जवळ पुरेपूर उपयोग केला जात असल्यामुळे त्यांच्यावील ताण वाढत चालला आहे. शिवाय आजच्या राहणीमानानुसार अन्नाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि बहुसंख्य लोकांकडे त्या अल्प प्रमाणात असल्यामुळे किंवा मुळीच नसल्यामुळे त्यांची मागणी लोकसंख्येमधील वाढीच्या काही पटीने वाढत जाणार आहे. त्या सर्वांची पूर्तता कशी करता येईल हा यक्षप्रश्न जगापुढे उभा आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेले प्रदूषण, जंगलांचा नाश वगैरेंमुळे पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.

व्यक्तीगत पातळीवर तुलना करायची झाली तर माझ्या जन्माच्या वेळी जगाची लोकसंख्या अडीच अब्जाहून थोडी कमी होती, ती माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी चार अब्जाच्या जवळ पोचली होती आणि नातवंडाच्या जन्मकाली सहा अब्जाच्या वर गेली होती. पृथ्वी मात्र जेवढी होती तेवढीच राहिली. नव्या खंडांचा शोध लागणे वगैरे संपून काही शतके उलटून गेली होती. उपलब्ध असलेल्या जमीनीवरच एकाऐवजी दोन, किंवा दोनाऐवजी तीन चार पिके घेऊन आणि रासायनिक खते वापरून अन्नधान्यांचे उत्पादन वाढवले गेले आहे. याहून जास्त ते कुठपर्यंत वाढवता येणे शक्य आहे हे सांगणे कठीण आहे.
या सर्वांची जाणीव मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे आणि या सर्वांवर उपाययोजना करण्यासाठीसुध्दा अनेक लोक प्रयत्नशील आहेत आणि त्यांना थोडे तरी यश मिळत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे आशेचे किरण नाहीतच असे म्हणता येणार नाही. विज्ञानाच्या प्रगतीमधून काही नव्या वाटा सापडतात का याकडेही लक्ष दिले जात आहे. फक्त शंभरच वर्षांपूर्वी निसर्गावर पूर्णपणे विसंबून असलेला मानव अजूनही त्याच्या सहाय्यानेच जगू शकत असला तरी काही बाबतीत त्याच्याशी संघर्ष करू लागला आहे आणि हा संघर्ष दिवसेदिवस वाढत जाणार असल्याची लक्षणे दिसत आहेत.