Friday, March 23, 2018

हरहुन्नरी शास्त्रज्ञ रॉबर्ट हूक


झाडाच्या लवचिक फांदीला वाकवले की ती वाकते आणि सोडली की पुन्हा पहिल्यासारखी होते, रबराला ताणले की ते लांब होते आणि ताण सोडला की पुन्हा लहान होते  हे आपण नेहमीच पाहतो. इंग्रजी भाषेमधील 'इलास्टिसिटी' नावाच्या या विशिष्ट गुणधर्माला विज्ञानाच्या जगात आणि आधुनिक काळातल्या सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये महत्वाचे स्थान आहे. मी शाळेत असतांना हा गुणधर्म 'स्थितिस्थापकत्व' अशा भारदस्त नावाने  शिकलो होतो पण आताच्या भौतिकशास्त्र परिभाषाकोषामध्ये त्याचे नाव  'प्रत्यास्थता' असे दिले आहे. ओल्या लाकडाच्या या गुणधर्माचा उपयोग करून आदिमानवाच्या काळातल्या लोकांनी तीरकमठा बनवला होता आणि आजच्या काळातले वनवासी लोकसुध्दा तशा प्रकारच्या हत्याराने शिकार करतात. रामायण महाभारताच्या काळातले धनुर्धारी वीर प्रसिध्द आहेत. कांही पदार्थांचा हा गुणधर्म पूर्वीपासून माणसाच्या माहितीतला असला आणि माणसाने त्याचा चांगला उपयोग करून घेतला असला तरी सतराव्या शतकातल्या रॉबर्ट हूक या ब्रिटिश शास्त्रज्ञाने त्याचा पध्दतशीर अभ्यास करून त्यासंबंधीचा मूलभूत नियम सांगितला. तो 'हूकचा नियम' याच नावाने ओळखला जातो. 

रॉबर्ट हूकचा जन्म इंग्लंडमधल्या एका लहानशा बेटावर १६३५ साली झाला. त्याचे वडील तिथल्या चर्चमध्ये धर्मगुरु होते आणि त्या गावातली शाळाही चर्चला जोडलेली असल्यामुळे रॉबर्टला सुरुवातीला चांगले शिक्षण मिळाले. पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आर्थिक परिस्थिति बिकट झाली. त्यामुळे तो आपले गांव सोडून लंडनला गेला आणि तिथल्या एका प्रयोगशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागला. नोकरी करत असतांनाच त्याने पुढील शिक्षण घेतले. तो कुशाग्र विद्यार्थी होताच, चांगला चित्रकला आणि कुशल कारागीरही होता. बुध्दीमत्ता आणि कलाकौशल्य या दोन्ही गुणांचा संयोग दुर्मिळ असतो, पण रॉबर्ट हूकमध्ये तो होता. त्याने लॅटिन, ग्रीक, हिब्रू आदि भाषांचा अभ्यास केला, पण गणित आणि विज्ञान किंवा नैसर्गिक तत्वज्ञान हे त्याचे आवडते विषय होते आणि प्रात्यक्षिके दाखवणे किंवा प्रयोग करून पाहणे याची त्याला मनापासून आवड होती.  इंग्लंडमधला लिओनार्दो दा विंची असे त्याचे वर्णन करता येईल.


कांही वर्षांनंतर हूक लंडनहून ऑक्सफर्डला गेला. तिथे असतांना त्याने प्रसिध्द शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉइल यांच्यासोबत काम करून त्यांच्या संशोधनासाठी लागणारी खास उपकरणे आणि यंत्रे तयार केली, त्यात अनेक सुधारणा केल्या, त्यांचा वापर करून त्यावर प्रयोग आणि प्रात्यक्षिके केली आणि अशा प्रकारे बॉइल यांच्या संशोधनाला सहाय्य केले. हूकचे प्राविण्य पाहून पुढे रॉयल सोसायटीच्या प्रयोगशाळेची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली. त्यानंतर त्याने इतर संशोधकांना मदत करता करता त्याबरोबर स्वतःचे वेगळे संशोधन करणे सुरू केले. 

सतराव्या शतकाच्या काळात विज्ञान हाच एक वेगळा विषय नव्हता, तेंव्हा त्याच्या शाखा, उपशाखा कुठून असणार? त्या काळातले शास्त्रज्ञ विविध विषयांवर संशोधन करीत असत. त्यांना ज्या बाबतीत कुतूहल वाटेल, त्या गोष्टीचा छडा लावण्यासाठी ते प्रयत्न करीत असत. रॉबर्ट हूकने सुध्दा अनेक प्रकारचे संशोधन केले. रॉबर्ट बॉइलसाठी त्याने हवेच्या दाबावर काम केलेले होतेच. त्यासंबंधीचे प्रयोग आणि प्रात्यक्षिके तो पुढेही करीत राहिला, त्याचप्रमाणे त्याने निरनिराळ्या उंचीवरील ठिकाणांच्या  वातावरणातला हवेचा दाब मोजून पाहिला. निरनिराळी लांबी असलेल्या लंबंकांची आंदोलने मोजली. प्रत्यास्थतेचा नियम शोधत असतांना कोणकोणत्या पदार्थात हा गुण किती प्रमाणात आढळतो हे पहाणे आलेच. पोलादाची तार किंवा पट्टी गुंडाळून त्यापासून स्प्रिंग तयार करून या गुणाचा अभ्यास केला. त्यावरून निरनिराळ्या प्रकारच्या स्प्रिंगा तयार करून पाहिल्या. घडाळ्याच्या वेळेत अचूकता आणण्यासाठी त्याला लागणारे खास प्रकारचे दाते असलेली चक्रे तयार केली.  गॅलीलिओ आदि शास्त्रज्ञांनी दूरच्या ग्रहताऱ्यांना पहाण्यासाठी दुर्बिणी तयार केल्या होत्या. जवळच्याच वस्तूंना मोठे करून पाहण्यासाठी बहिर्गोल भिंगा पूर्वीच तयार झालेल्या होत्या. या दोन्हींवर विचार करून रॉबर्ट हूकने सूक्ष्मदर्शक यंत्रे तयार केली आणि क्षुल्लक किड्यांपासून झाडांच्या पानांपर्यंत अनेक बारीकशा वस्तूंना त्या यंत्राखाली ठेऊन लक्षपूर्वक पाहिले. त्या काळात छायाचित्राचा शोध लागलेला नव्हता पण रॉबर्ट हूक चित्रकलेमध्ये प्रवीण असल्यामुळे या यंत्रामधून त्याला जे दिसले त्यांची हुबेहूब चित्रे त्याने काढून ठेवली.  वनस्पती किंवा प्राण्यांची शरीरे सूक्ष्म अशा अनंत पेशींपासून बनलेली असतात असे त्यांचा अभ्यास करत असतांना हूकला जाणवले. त्या सूक्ष्म पेशींसाठी इंग्रजीमध्ये सेल (Cells) हा शब्दप्रयोग त्याने केला. शरीरामधील नीला (Veins) आणि रोहिणी (Arteries) या रक्तवाहिन्यांमधील रक्तात फरक असतो हे त्याने सांगितले.  अशा अनेक विषयांवर त्याने संशोधन केले.

हूकने आपला प्रसिध्द नियम लॅटिनमध्ये थोडक्यात लिहिला होता त्याचा अर्थ जसा "जोर (force) तशी वाढ (extension)" असा होत होता. वाढ या शब्दाच्या ठिकाणी विरूपणही (Deformation) घेता येते.  स्प्रिगला वजन अडकवून त्याला वजन टांगले तर त्या वजनाच्या प्रमाणात त्या स्प्रिंगची लांबी वाढते हे सहजपणे मोजता येते आणि यावरून हा नियम सिध्द करता येतो. या वाक्यात आणखी सुधारणा करून हूकचा नियम आता असा सांगितला जातो.
"प्रत्यास्थी सीमेच्या आतील घनरूप पदार्थामध्ये बाह्य बलामुळे निर्माण होणारे प्रतिबल (Stressस्ट्रेस) त्या पदार्थात झालेल्या विकाराच्या (strainस्ट्रेनच्या) समप्रमाणात असते." Within the limit of elasticity, the stress induced (σ ) in a solid due to some external force is always in proportion with the strain (ε ).
हा नियम सर्व पदार्थांना सर्व स्थितींमध्ये लागू पडत नाही. उदाहरणार्थ कांचेपासून स्प्रिंगसारखा आकार तयार केला आणि त्याला ताण दिला तर ती तुटून जाईल आणि शिशाच्या तारेला गुंडाळून तयार केलेल्या स्प्रिंगला ताण दिला तर ती लांब होईल पण ताण सोडला तरी ती त्याच आकारात राहील, पुन्हा पूर्वीचा आकार घेणार नाही. पोलादाची तारसुध्दा मर्यादेच्या बाहेर ताणली तर पुन्हा पहिल्यासारखी होत नाही कारण हूकचा हा नियम प्रत्यास्थी सीमेमध्येच लागू पडतो, पण यंत्रांचे भाग अशाच पदार्थांपासून तयार केले जातात आणि त्यांना मर्यादित ताणच दिला जातो. त्यांच्या डिझाइनसाठी हूकचा नियम खूप उपयोगी पडतो,

रॉबर्ट हूकने गुरुत्वाकर्षणावरसुध्दा संशोधन केले होते. उंचावरून पडत असतांना त्या वस्तूच्या खाली येण्याचा वेग वाढत जातो हे त्याच्या लक्षात आले होते असे त्याच्या नोंदींवरून दिसते. त्याबाबतचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आपणच आधी सांगितला होता असा दावासुध्दा हूकने केला होता. पण सर आयझॅक न्यूटनने गतीचे सुप्रसिध्द नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा क्रांतिकारक शोध लावून ते अत्यंत सुसंगत अशा तर्कांसह प्रसिध्द केले त्याला त्या काळातल्या विद्वानांची मान्यता मिळाली. बुध्दीमत्ता, चित्रकला,  चिकाटी, कार्यकुशलता आदि अनेक गुण रॉबर्ट हूकमध्ये एकवटले होते आणि त्याने विस्तृत संशोधनही केले होते, पण त्याच सुमाराला विज्ञानाच्या जगात सर आयझॅक न्यूटन नावाच्या सूर्याचा उदय झाला होता आणि त्याच्या तेजापुढे रॉबर्ट हूकचे काम फिके पडले असावे. हूक आणि न्यूटन यांच्या मधले व्यक्तीगत संबंध तितकेसे सलोख्याचे नसावेत. अशा कारणांमुळे त्या काळातील प्रस्थापित विद्वानांचे हूककडे कदाचित थोडे दुर्लक्ष झाले असावे. त्याने दाखवलेल्या कर्तृत्वाच्या प्रमाणात त्याचा गौरव झाला नाही. या हरहुन्नरी संशोधकाने केलेले संशोधन अनेक वर्षांनंतर हळूहळू जगापुढे येत गेले आणि जगाला त्याची महती कळत गेली. 
---------------------------------------------

Saturday, March 17, 2018

गेट टुगेदर्स आणि लग्न समारंभांचे आकर्षण


मागच्या महिन्यात माझ्या जवळच्या नात्यातल्या एका मुलीचे लग्न झाले. पुण्यातल्या त्या कार्यालयाचा प्रशस्त हॉल माणसांनी गच्च भरला होता. त्यातली निदान शंभरावर तरी माणसे माझ्या नात्यातली आणि ओळखीची होती. त्यातली बरीचशी माणसे पुणेवासी होती पण हिंजवडी, निगडी, घोरपडी अशासारख्या ठिकाणी राहणाऱ्या पुण्यातल्या लोकांचीसुध्दा वर्षानुवर्षे गाठ भेट होत नाही. या मंगलकार्याच्या निमित्याने मात्र त्यांनी आवर्जून येऊन हजेरी लावली होती. बाहेरगांवी राहणारे अनेक जण कार, बस, ट्रेन, विमान अशा विभिन्न वाहनांमधून पुण्याला आले होते.

तिथे जमलेल्या लोकांमध्ये कडेवरच्या बाळांपासून ते काठी टेकत चालणाऱ्या पणजोबांपर्यंत सगळ्या वयाची माणसे होती, तसेच चाळीतल्या खोलीपासून ते बंगल्यात राहणाऱ्यापर्यंत सर्व स्तरामधलीही होती. पण त्या ठिकाणी त्यांच्या वागण्याबोलण्यात तसा कसलाच भेदभाव दिसत नव्हता. सगळेचजण अत्यंत आपुलकीने एकमेकांना भेटत होते, एकमेकांची चौकशी करत होते, हंसत खिदळत होते. "ती सध्या काय करते (किंवा तो काय करतो, ते काय करतात)? तिथे येऊ न शकलेले त्यांचे आईवडील, बहीणभाऊ, मुलेबाळे वगैरे सध्या काय करतात? ते कुठे राहतात आणि कसे आहेत?" हे आपसातल्या चर्चांमधले मुख्य विषय होतेच, त्यांच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची उजळणी होत होती. आता वयस्क झालेले लोक त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणी कसे मजेदार वागत होते हे त्यांचा आब राखून पण रंगवून आणि नकला करून पुढच्या पिढीमधल्या मुलांपुढे सांगणे चालले होते आणि त्याला सगळ्यांचीच दिलखुलास दाद मिळत होती. एकंदरीतच "मस्तीभरा माहौल" होता. तिथे आलेले सगळे आप्त मराठीमधूनच बोलत होते, बोलण्याच्या ओघात संवयीमुळे एकादा उद्गार, वाक्प्रचार किंवा वाक्य हिंदी किंवा इंग्रजीमधून आला तर त्याची लज्जत वाढत होती.

त्यानंतर दहा बारा दिवसांनीच माझ्या ऑफीसमधल्या सुमारे शंभर सेवानिवृत्त सहकाऱ्यांचा नवी मुंबईमध्ये मेळावा भरला होता. तिथे जमलेले बरेचसे लोक स्थानिक असले तरी अनेक जण मुंबईच्या इतर भागामधून आले होते तर माझ्यासारखे थोडे लोक बाहेरगावाहूनही आले होते. इथला लहानातला लहान मित्र सुध्दा साठीमध्ये पोचलेला होता तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला आलेली होती.  सर्वांची मुले आपापल्या आयुष्यात स्थिरावलेली होती आणि सगळ्यांनाच रिटायर झाल्यानंतर मिळत असलेली पेनशन त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी होती. इथे आलेले बहुतेक सगळेच जण साधारणपणे एकाच स्तरावरले होते, त्यात ना कोणी गरीब चाळकरी होता ना कोणी गडगंज श्रीमंत बंगलेवाला होता. नोकरीत असतांना बॉस असलेले अधिकारी आणि तेंव्हाचे त्यांचे कनिष्ठ सहकारी आता एकाच पातळीवर आले होते आणि गळ्यात गळा घालून वावरत होते.

ऑफिसमधल्या समस्या किंवा तक्रारी घरात आणायच्या नाहीत आणि घरातल्या अडचणींवर ऑफिसातल्या कोणाशी चर्चा करायची नाही ही शिस्त आम्ही नोकरी करतांना पाळली होती आणि निवृत्त झाल्यानंतर त्यात बदल केला नव्हता. आता ऑफिसला जाणेच शिल्लक नसल्यामुळे बोलायला तिथले विषयही नव्हते. "तू सध्या काय करतोस?" किंवा "तुम्ही सध्या काय करता?" असे विचारण्यात फारसा अर्थ नव्हता. त्यावर "बस जी रहे हैं।" किंवा "मजेमें जी रहे हैं।" अशाच उत्तराची अपेक्षा होती. त्यामुळे एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करणे, न आलेल्या मित्रांची विचारपूस करणे, त्यातला कोण कुठे आणि कधी भेटला होता वगैरे सांगणे आणि सद्यःपरिस्थितीवर आपली मोघम मते मांडणे, काही ढोबळ अंदाज करणे वगैरे चाललेले होते. शिवाय जुन्या मजेदार आठवणी काढून त्यावर हंसणे खिदळणे होतेच.  तिथे चाललेले बहुतेक संभाषण इंग्रजी आणि हिंदीमध्ये होत होते, पण मधूनच एकाद्या मराठी माणसाला दुसरा मराठी माणूस, पंजाब्याला पंजाबी, बंगाल्याला बंगाली, कन्नडिगाला कन्नडिग वगैरे भेटले तर ते नकळत आपापल्या भाषेंमध्ये बोलायला लागत. भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांचे ध्वनि त्या ठिकाणी कानावर पडत होते. 

अशा प्रकारे हे दोन मेळावे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी त्या दोन मेळाव्यांमध्ये काही गोष्टी समान होत्या. दोन्हीकडे एकंदरीत "मस्तीभरा माहौल" होता. प्रत्येकाच्या मनात दांडगा उत्साह होता आणि तो त्यांच्या हंसतमुख चेहेऱ्यावर आणि वागण्याबोलण्यात दिसून येत होता. सगळेचजण एका विशिष्ट प्रकारच्या चैतन्याने भारलेले दिसत होते. हा उत्साह, ही ऊर्जा, हे आकर्षण नेमके कशामुळे येत असेल? "झाडावरले सफरचंद खाली का पडले?" या प्रश्नाने जसे न्यूटनला पछाडले होते तसेच मलाही या प्रश्नाचे गूढ पडले होते.

लग्नसमारंभाला म्हणून जमलेल्या मंडळीमधल्या कितीशा लोकांना तिथे चाललेल्या धार्मिक विधींमध्ये रस होता? त्या विधींमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि जे त्यांना सहाय्य करत होते असे मोजके लोक सोडले तर इतर लोकांमधले फारच थोडेजण तिकडे काय चालले आहे हे पहात होते. त्यातल्या महिलांच्या वेशभूषा, केशभूषा, कपडे, दागिने वगैरेंवर इतर महिलांचे बारीक लक्ष असेलही, पण पुरुषमंडळींना त्यातसुध्दा काडीचा इंटरेस्ट नव्हता. "आपल्या हातातल्या अक्षता डोक्यावर पडल्यानेच तो विवाह संपन्न होणार आणि त्या वधुवरांचे आयुष्य सुखसमृध्दीपूर्ण होणार." असे विचार आजकाल कोणाच्याच मनात येत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य लोक आपापल्या जागीच बसून समोरच्या लोकांवर अक्षता उधळतात. "मिष्टान्नम् इतरेजनाः" असे सुभाषित असले आणि पुण्यातल्या कार्यालयांमधली जेवणे चविष्ट असली तरी फक्त भोजनावर ताव मारण्यासाठी इतक्या लोकांनी एवढ्या दूर यावे इतके काही त्याचे अप्रूप नसते.  सेवानिवृत्तांच्या मेळाव्यातल्या खाण्यापिण्याला तर काहीच महत्व नसते कारण वयोमानानुसार अनेक प्रकारची पथ्ये पाळतांना अन्नाचा आस्वाद घेण्याची त्यांची क्षमताच मंद झालेली असते. त्या मेळाव्यात झालेले काव्यवाचन, गायन, जादूचे प्रयोग यासारखे मनोरंजनाचे प्रयोग यथातथाच होते. तिथे गेल्याने जुन्या ओळखी पक्क्या होतील, दोनचार नव्या ओळखी होतील आणि त्यामधून आपला व्यवसाय किंवा नांवलौकिक वाढेल अशी शक्यता कमीच असते आणि त्या भेटींमधून काही नवे ज्ञान मिळेल, व्यवहारचातुर्य वाढेल, शहाणपणात भर पडेल अशीही शक्यता नसते. तरीसुध्दा इतके लोक आपापला वेळ, पैसे आणि श्रम खर्च करून या मेळाव्यांना गर्दी का करतात ?

सफरचंदाचा विचार करता करता न्यूटनला जसा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला तसाच मलाही एक अजब शोध लागला. आपले रक्ताचे नातेवाईक असोत, सहकारी, मित्र किंवा शेजारी असोत, किंवा आता ईमेल, फेसबुक आणि वॉट्सअॅपवर भेटणारे फ्रेंड्स असोत, त्यांची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होत जाते. त्या प्रतिमेला त्या व्यक्तीबद्दल विलक्षण आकर्षण वाटत असते. आपण या दोघांची भेट घडवून आणण्यासाठी धडपड करतो. एकाच ठिकाणी अशा अनेक भेटी घडायची शक्यता असली तर ते आकर्षण तितक्या पटीने वाढत जाते. बहुधा वयोमानानुसार या आकर्षणाची शक्ती जास्तच वाढत जात असावी. प्रत्यक्ष भेट होतांना आपण त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर पाहतो तेंव्हा कसल्या तरी विलक्षण लहरी आपल्या मनात उठतात, त्या व्यक्तीने आपल्याला ओळखून प्रतिसाद दिला याचा अर्थ त्याच्याही मनात तशा लहरी उठलेल्या असतात आणि रेझोनन्स झाल्याप्रमाणे दोघांच्याही मनातल्या लहरी जास्तच उफाळून येतात. त्यामधून दोघांच्या मनात ऊर्जेचा एक झरा वहायला लागतो. अशा वेळी फक्त जवळ असणे, हातात हात घेणे, खांद्यावर किंवा पाठीवर हात ठेवणे, निदानपक्षी हात हलवून इशारा देणे, दोन शब्द बोलणे आणि ऐकणे इतकेच पुरेसे असते. त्या वेळी आपले आणखी काही बोलणे झालेच तरी त्यातले शब्द महत्वाचे नसतात आणि लगेच विस्मरणात चालले जातात.  या दोन्ही मेळाव्यांमध्ये मी कुणाला काय काय सांगितले आणि कुणी कुणी मला काय काय सांगितले यातले एक वाक्यसुध्दा आज मला आठवत नाही, कारण त्याला मुळी काही महत्व नव्हतेच. मला कुणी किंवा मी कुणाला दुखावले असले तर ते लक्षात राहिले असते, पण अशा प्रसंगी कुणी तसे करत नाही. I am OK, you are OK. असेच संवाद होतात. पण ते झाले याचाच केवढा तरी आनंद मिळतो.

आपल्या ओळखीची माणसे भेटण्यामध्ये होणारा आनंद, त्यांची खुशाली पाहून होणारे समाधान याला मोल नसते. त्यासाठी होणारा खर्च आणि पडणारे कष्ट आपण आनंदाने सहन करतो. म्हणूनच मी अशा सगळ्या मेळाव्यांना हजर रहाण्याचा आवर्जून प्रयत्न करतो.

Thursday, March 15, 2018

शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉइल आणि त्याची स्वप्नेशास्त्रज्ञ लोक फक्त अज्ञाताचे संशोधनच करतात असे नाही. तसे असते तर ते अंधारात चाचपडण्यासारखे होईल. मग त्यातून क्वचित कुणाच्या हाती काही लागले तर लागले.  त्या काळापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यामधून पुढे आणखी काय काय होण्याची शक्यता आहे याचा विचार करणे हे फक्त मनामध्ये चांगल्या इच्छा बाळगण्यापेक्षा वेगळे आहे. महान शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉइल याने स्वतः संशोधन करून कांही महत्वाचे शोध लावलेच, भविष्यात कोणकोणत्या दिशेने प्रगति व्हायला हवी याच्या इच्छा व्यक्त केल्या. त्याच्या हयातीत ते घडणे शक्य वाटत नसल्यामुळे ती त्याची स्वप्ने होती असे म्हणता येईल. एक दोन अपवाद वगळता ती सगळी स्वप्ने पुढील काळात प्रत्यक्षात उतरली.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमधील सामाजिक परिस्थिती बदलायला लागली होती.  गॅलीलिओने इटलीमध्ये सुरू केलेल्या पध्दतशीर संशोधनावरून प्रेरणा घेऊन टॉरिसेली, पास्कल, ओटो व्हॉन गेरिक आदि अनेक शास्त्रज्ञ युरोपमधील फ्रान्स, जर्मनी वगैरे इतर देशांमध्येही निरनिराळे प्रयोग करू लागले होते आणि त्यातून मिळालेले नवे ज्ञान प्रसिध्द करू लागले होते. विज्ञानातील म्हणजेच त्या काळातल्या नैसर्गिक तत्वज्ञानामधील संशोधनाचे वारे इंग्लंडकडेही वहात गेले. सर फ्रान्सिस बेकनसारख्या विद्वानांनी त्याला पोषक असे तर्कशुध्द विचारसरणीचे वातावरण तयार करायला सुरुवात केली होती. इटलीमधल्या समाजावर कट्टर धर्मगुरूंचा पगडा होता तसा तो इंग्लंडमध्ये राहिला नव्हता. परंपरागत समजुतींना आव्हान देणारे वेगळे विचार मांडण्याचे धैर्य दाखवणे तिथे शक्य होत होते. त्यामुळे त्या देशात वैज्ञानिक संशोधनाने मूळ धरले आणि त्यामधून पुढे अनेक मोठमोठे शास्त्रज्ञ निर्माण झाले. रॉबर्ट बॉइल हा त्याच्या सुरुवातीच्या काळातला एक महान शास्त्रज्ञ होता. आधुनिक विज्ञानाचा आणि त्यातही आधुनिक रसायनशास्त्राचा पाया घालण्यात त्याचा मोठा वाटा होता.

रॉबर्ट बॉइलचा जन्म एका श्रीमंत आयरिश कुटुंबात झाला. आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये त्यांची गडगंज संपत्ती होती. त्याने इंग्लिश आणि आयरिश शिवाय लॅटिन, फ्रेंच, ग्रीक आदि भाषांचे शिक्षण घेतले, परदेशांचा प्रवास केला आणि विविध विषयांमधील ज्ञान संपादन केले. इंग्लंडला परत जाईपर्यंत त्याच्या मनात विज्ञानाची तीव्र ओढ निर्माण झाली होती. बॉइलने तिकडे गेल्यानंतर प्रयोगशाळांमध्ये निरनिराळे प्रयोग करून पहाणे सुरू केले. त्याने ओटो व्हॉन गेरिकच्या हवेच्या पंपाचा अभ्यास केला आणि तशा प्रकारचा पंप तयार करून त्यात कांही सुधारणा केल्या, त्याला न्युमॅटिकल इंजिन असे नाव दिले. बॉइलने त्या यंत्राचा उपयोग करून हवेच्या दाबाचा अभ्यास करण्यासाठी अनेक प्रयोग केले आणि गेरिक आणि पास्कल यांनी  सुरू केलेले हवेच्या गुणधर्मांचे संशोधन आणखी पुढे नेले. त्याला मिळालेल्या माहितीच्या अभ्यासावरून वायुरूप पदार्थांवरील दाब विरुध्द त्यांचे आकारमान यांच्यामधला थेट संबंध सिध्द केला आणि त्याबद्दलचा आपला सुप्रसिध्द नियम मांडला. हवेवर दाब दिला की ती दाबली जाऊन कमी जागेत मावते अशा प्रकारचे निरीक्षण बॉइलच्या आधीच कांही शास्त्रज्ञांनी केले होते, पण त्यावर पध्दतशीर प्रयोग करून, सारी मोजमोपे घेऊन, सविस्तर आकडेवारी, कोष्टके आणि आलेख वगैरेंचा उपयोग करून तो नियम समीकरणाच्या रूपात मांडण्याचे काम रॉबर्ट बॉइलने केले.

बॉइलच्या नियम असा आहे की तापमान स्थिर असल्यास बंदिस्त जागेत साठवलेल्या आदर्श वायुरूप पदार्थांचे आकारमान आणि त्यावरील दाब एकमेकांशी व्यस्त प्रमाणात असतात किंवा आकारमान आणि दाब यांचा गुणाकार स्थिर असतो. (P x V = C, P1V1=P2V2). एका बंद सिलिंडरमध्ये भरलेल्या हवेवर दट्ट्याने दाब दिला की तिचे आकारमान कमी होते तसा दाब वाढतो आणि त्या दट्ट्याला बाहेर ओढून हवेचे आकारमान वाढवले की त्या हवेवरचा दाब त्याच प्रमाणात कमी होतो. उदाहरणार्थ आकारमान अर्धे केले की दाब दुप्पट होतो, एक तृतीयांश केले की तिप्पट आणि एक चतुर्थांश केले की चौपट होतो. अर्थातच हे काही मर्यादित कक्षेमध्ये घडते. शून्य किंवा अगणित अशा संख्यांना हा नियम लागू पडत नाही.

इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीची स्थापना होताच खुद्द तिथल्या राजाकडून रॉबर्ट बॉइलला त्या संस्थेचा सभासद म्हणून नेमण्यात आले. त्याच्या विद्वत्तेची दखल घेतली गेली आणि एक आघाडीचा शास्त्रज्ञ असा त्याचा नावलौकिक झाला. त्या काळामधील इतर शास्त्रज्ञांप्रमाणे बॉइलनेसुध्दा निरनिराळे सामान्य पदार्थ आणि धातू यांचेपासून सोनेचांदी यासारख्या मूल्यवान धातू तयार करण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केले. पदार्थांमध्ये अशा प्रकारचे बदल होणे शक्य आहे असे तो सुध्दा समजत होता. प्रत्यक्षात तसे कांही घडले नाही, पण त्या प्रयोगांमधून अनेक पदार्थांविषयी खूप नवी माहिती उजेडात आली आणि पुढील काळातल्या रसायन शास्त्रज्ञांना तिचा उपयोग झाला. पाण्याचा बर्फ होतांना त्याचे प्रसरण झाल्यामुळे पडणारा दाब, विशिष्ट गुरुत्व (स्पेसिफिक ग्रॅव्हिटी), प्रकाशाचे अपवर्तन (रिफ्रॅक्शन), हवेमधून होणारा ध्वनीचा प्रसार, स्फटिके, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थांचे गुणधर्म, आईवडिलांकडून त्यांच्या मुलांना मिळणारे आनुवंशिक गुण इत्यादि अनेक निरनिराळ्या प्रकारच्या विषयांवर बॉइलने संशोधन आणि चिंतन केले. त्याने मिश्रणे आणि रासायनिक संयुगे यांच्यामधला फरक दाखवला, ज्वलन आणि श्वासोछ्वास यांच्यात काही संबंध आहे असे सांगितले. अशा प्रकारे त्याने अनेक विषयांवर चौफेर संशोधन करून ते लिहून ठेवले किंवा प्रसिध्द केले. वैज्ञानिक संशोधनामधून नवे ज्ञान संपादन करणे हेच आपले एक मुख्य ध्येय असे तो मानत होता, एका प्रकारे विज्ञानामधील मूलभूत संशोधनावर त्याचा भर होता, पण त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करण्यालाही त्याचा विरोध नव्हता आणि तो त्यासाठी मदतही करत होता.

रॉबर्ट बॉइल अत्यंत धर्मनिष्ठ होता आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हेसुध्दा त्याचे एक ध्येय होते. विज्ञानाच्या अभ्यासामधून देवाचे अस्तित्व निर्विवादपणे सिध्द करता येईल अशी त्याची श्रध्दा होती. त्याने यासाठीसुध्दा जमतील तेवढे प्रयत्न केले. त्या काळात विज्ञान हा तत्वज्ञानाचाच भाग असल्यामुळे बॉइलने लिहिलेल्या काही पुस्तकांमधून त्याने धार्मिक विषयांवरील आपले विचार  मांडले होते.

रॉबर्ट बॉइलने चोवीस संभाव्य शोधांची एक इच्छांची यादी (विश लिस्ट) बनवली होती. माणसाचे आयुष्यमान वाढवणे, हवेत उड्डाण करणे, न विझणारा दिवा, न बुडणारी नाव, वेदना कमी करणारी, झोप किंवा जाग आणणारी, कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवणारी, मन शांत करणारी अशी औषधे अशांचा त्यात समावेश होता. त्या काळातल्या इतर कोणी कदाचित अशा कल्पनाही केल्या नसतील. ती बॉइलच्या कुशाग्र बुध्दीची आणि कल्पनाशक्तीची झेप किंवा त्याचा द्रष्टेपणा असेही म्हणता येईल. त्याने व्यक्त केलेल्या बहुतेक इच्छा पुढील काळात पूर्ण झाल्या. कृत्रिम रीत्या सोने बनवणे मात्र कधीच शक्य होणार नव्हते, पण तशी कल्पना करणारा तो काही एकटाच नव्हता. परीस खरोखरच अस्तित्वात असतो असे भारतासकट जगभरामधील लोकांना वाटत होते.
----------------------