Tuesday, May 21, 2024

न्यू जर्सी २०२३

 मी २००८साली पहिल्यांदा अमेरिकेला म्हणजे यूएसएला गेलो होतो तेंव्हा नेवार्क इथल्या लिबर्टी इंटरनॅशनल विमानतळावर विमानातून उतरलो होतो. पण ते विमानतळ न्यूजर्सीमध्ये होते हे मला तेंव्हा माहीत नव्हते. किंबहुना न्यूजर्सी कशाला म्हणतात तेही मला ठाऊक नव्हते. त्या वेळी आम्ही नेवार्कला विमान बदलून मुलाकडे अॅटलांटाला गेलो होतो. नंतर न्यूयॉर्कदर्शनासाठी पुन्हा नेवार्कला आलो तेंव्हा पारसीपेनीला रहात असलेल्या आमच्या नातेवाइकाने आम्हाला कारने तिथून त्याच्या घरी नेले. न्यूजर्सी या नावाचे शहर नसून ते एक संस्थान किंवा राज्य(स्टेट)आहे आणि नेवार्क, पारसीपेनी यांच्यासारखी खूप गावे त्या संस्थानात आहेत एवढी माहिती त्याच्याशी बोलतांना समजली. पारसीपेनी हे टुमदार गाव न्यूयॉर्क किंवा अॅटलांटासारख्या महानगरांपेक्षा खूपच वेगळे दिसले आणि मला आवडले होते. न्यूजर्सीमधल्या दुसऱ्या कुठल्या भागात जाणे आमच्या त्या वेळच्या प्लॅनमध्ये नव्हते. मी न्यू जर्सीच्या म्हणजे मुख्यतः पारसीपेनीच्या भेटीवर तेंव्हा लिहिलेला लेख या पानावर आहे. https://anandghan.blogspot.com/2009/06/blog-post_20.html

मी पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेत गेलो होतो तेंव्हा कॅलिफोर्नियामधल्या टॉरेन्स नावाच्या शहरात माझ्या मुलाकडे रहात होतो, हे नाव भारतात कुणाच्या ओळखीचे नव्हते म्हणून मी एले किंवा लॉस एंजेलिसला राहतो असे बाहेरच्या सगळ्यांना सांगत होतो. ते मोठे शहर टॉरेन्सहून जवळ होते आणि आम्ही बऱ्याच वेळा तिथे जाऊन येत होतो. त्यामुळे तसे सांगणे मला फारसे चुकीचे वाटत नव्हते.


त्यानंतर २०२३मध्ये मी तिसऱ्यांदा अमेरिकेला गेलो तेंव्हा चार महिने न्यूजर्सीमध्येच मुक्काम ठोकून राहिलो होतो.  या वेळी मी न्यूजर्सीमध्ये जिथे रहात होतो, त्या इथल्या गावाचे नाव साउथ प्लेन फील्ड असे होते. हे गाव न्यूजर्सीमधल्या मिड्लसेक्स काउंटीमध्ये आहे. त्याला इकडे 'बरो' असे म्हणतात. हा खेडे आणि शहर यांच्या मधला प्रकार असावा. हे नाव तर अमेरिकेतल्या लोकांनासुद्धा अनोळखी वाटायचे.  या गावाला लागूनच एडिसन नावाचे लहानसे शहर आहे ते न्यूजर्सीमधल्या लोकांना माहीत होते, पण भारतातून निघायच्या आधी हे नावसुद्धा मी कधी ऐकलेले नव्हते. जवळचे खरे मोठे शहर म्हणजे न्यूयॉर्कच, पण ते आमच्या घरापासून खूपच दूर होते आणि आमचे तिथे नेहमी जाणे येणे होत नसे. माझ्या चार महिन्याच्या राहण्यात फक्त एकदा आम्ही सगळे न्यूयॉर्क सिटीमध्ये जाऊन आलो. गंमत म्हणजे मी न्यूजर्सीला जाणार आहे एवढेच सांगणे भारतातल्या लोकांसाठी मात्र पुरेसे होते. खूप भारतीय लोक तिकडे जाऊन रहात असल्यामुळे न्यूजर्सी नावाचेच एक गाव असावे असेही तिथे कधी न गेलेल्या लोकांना वाटत असावे.

न्यूयॉर्क शहर आणि आमचे साउथप्लेन फील्ड यातसुद्धा काहीच साम्य नाही. अगदी माझ्या लहानपणापासून मी असे ऐकत आलो होतो की न्यूयॉर्कमध्ये सगळ्या अवाढव्य गगनचुंबी इमारती आहेत. तिथली एंपायर स्टेट बिल्डिंग अनेक वर्षे जगातली सर्वात उंच इमारत म्हणून प्रसिद्ध होती. आता इतर काही शहरांमध्ये तिच्याहून उंच इमारती बांधल्या गेल्या आहेत आणि आणखी काही बांधल्या जात आहेत. आम्ही न्यूयॉर्कच्या ज्या भागात फिरून आलो तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रचंड उंच इमारतींचे भव्य ठोकळे आणि रस्त्यांमध्ये वाहनांची तुफान गर्दी असे त्या महानगराचे टिपिकल दृष्य होते. 

पण आम्ही न्यूजर्सीच्या ज्या भागात रहात होतो, तिथे फक्त अनेक लहान लहान दुमजली इमारती होत्या आणि त्यांच्या आजूबाजूला भरपूर मोकळी जागा आणि झाडी होती. त्या झाडांमागे या इमारती दडून जात होत्या. तिथे शांतता तर इतकी होती की नेहमीच चिमण्यांची चिवचिव सहज कानावर पडत असे. तिथल्या मुख्य रस्त्यांवरून बरीच वाहने फिरत होती, पण गावामध्ये आम्हाला क्वचितच कुठे ट्रॅफिक जॅम पहायला  मिळाला. गावाबाहेर गेल्यावर तिथल्या अगदी ग्रामीण भागातल्यासुद्धा सगळ्या मुख्य रस्त्यांवर जिकडे तिकडे उड्डाणपूल बांधलेले असल्यामुळे मैलोंगणती प्रवासात सहसा कुठे ट्रॅफिक सिग्नल लागत नसे. तरीही तिथल्या हमरस्त्यांवरच अधून मधून ट्रॅफिक जॅम लागत असे आणि जीपीएस तुलनेने कमी गर्दी असलेले पर्यायी मार्ग दाखवत असे. अशा रस्त्यांवरून जातांना केवळ जीपीएसच्या सहाय्याने किंवा त्याच्या भरोशावरच आपल्या गंतव्य ठिकाणी जाऊन पोचणे शक्य असे. छापील नकाशा पाहून रस्त्यावरून जातांना चौकाचौकात थांबून चौकशी करून योग्य त्या दिशेला जाणे ही गोष्ट आता अमेरिकेत तरी इतिहासजमा झाली आहे.

तिथे ओक ट्री अॅव्हेन्यू आणि साउथ प्लेनफील्ड अॅव्हेन्यू नावांचे दोन मुख्य रस्ते आहेत. ओक ट्री अॅव्हेन्यू  हा साउथ प्लेनफील्डमधला मुख्य मोठा रस्ता आमच्या घरातून पाहिल्यास मागच्या बाजूला थोड्याच अंतरावर दिसतो, पण घराच्या पुढच्या बाजूला असलेल्या दाराने घराबाहेर पडून तिथे जाऊन पोचायला थोडा वेळ लागतो.  ओक ट्री अॅव्हेन्यूला डॉर्सेट ड्राइव्ह नावाचा एक फाटा फुटतो. त्याच्या सुरुवातीलाच "नो एक्झिट" असे ठळक अक्षरात लिहिलेला मोठा फलक आहे. याचा अर्थ तुम्ही आपली मोटार या रस्त्यावरून आत नेली तर तुम्हाला पुन्हा तिथूनच बाहेर पडायला पाहिजे. आतल्या भागाला बाहेरच्या जगाशी जोडणारा दुसरा रस्ताच नाही. त्या आतल्या भागाला कुठले वेगळे नावही नाही. त्यात काही लहान लहान रस्ते आहेत आणि त्यांच्या बाजूला बंगले आहेत. त्यातल्या एका बंगल्यात माझे वास्तव्य होते. तिथेच एक कॉटन स्ट्रीट पार्क आहे, तिथे जाणारी एक लहानशी कॉटन स्ट्रीट आहे, पण पार्क म्हणून तिथे मोठ्या लोकांना बसायला बाकडीही नाहीत की लहान मुलांना खेळायचीही काही सोय नाही, फक्त शंभर दीडशे उंच उंच झाडांचे एक दाट रान आहे.

मी दोन तीनदा चालत चालत तिथे फिरायला गेलो तेंव्हा मला दुसरा कोणी माणूस तिथे आलेला दिसला नाही. त्यामुळे मी रोज संध्याकाळी आमच्या वसाहतीतल्या आयताकृति चौकोनातच तीन चार चकरा मारून येत होतो. इथे मात्र सगळ्याच बंगलेवाल्यांनी आपापल्या अंगणांमध्ये एकाहून एक सुंदर फुलांची झाडे लावली आहेत आणि मी समर सीझनमध्ये गेलो होतो त्या काळात सगळी झाडे छान फुललेली होती. संध्याकाळच्या वेळी काही लोक अंगणात लॉन मोविंग करतांना दिसत, काही लोक किंवा महिला कुत्र्यांना घेऊन फिरायला पडलेल्या दिसत आणि काही लहान मुले रस्त्यांच्या कडेला खेळतांना दिसत. अशा प्रकारे रोज निदान दहापंधरा लोकांशी "हॅलो हाय" होत असे. अमेरिकेतले लोक जास्त संबंध ठेवत नसले तरी अनोळखी माणूस समोर आला तरी नजरानजर होताच स्मितहास्य करतात. ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे दोघांनाही बरे वाटते.

ओक ट्री अॅव्हेन्यू या मुख्य रस्त्याने पूर्वेकडे गेल्यावर एक चौक लागतो त्या चौकापासून पुढे याच रस्त्याचे नाव ओक ट्री रोड असे ठेवले आहे. तसेच पुढे गेल्यावर एक अगदी लहानसा पूल लागतो आणि त्याच्या पलीकडे एडीसन शहर सुरू होते. ओक ट्री रोड त्या शहराच्या आरपार जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वस्ती तशी थोडी विरळच आहे, पण ती पूर्णपणे एकमेकींमध्ये मिसळून गेली असल्यामुळे आपण एका गावातून निघून दुसऱ्या गावात शिरत आहोत असे मात्र  जाणवत नाही.

ओक ट्री रोडवरून पुलाच्या पलीकडे मैल दीड मैल पुढे गेल्यावर तिथला मुख्य बाजार आहे त्यातली अनेक  दुकाने आणि हॉटेलेसुद्धा भारतीय लोकांनी चालवलेली आहेत. पटेल ब्रदर्स नावाच्या किराणा मालाच्या दुकानाच्याच दोन मोठ्या शाखा आहेत, त्याशिवाय इंडियन ग्रोसरी नावाचे वेगळे मोठे दुकान आहे.  भारतीय म्हणजे मराठी, गुजराथी, कानडी, तेलुगू वगैरे सगळ्या लोकांच्या स्वयंपाकघरात ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या इथे सहज मिळतात. कधीकधी सकाळचा नाश्ता करण्यासाठीसुद्धा आम्ही सरावणा भवन, अम्माज किचन किंवा सुखाडिया स्वीट्स सारख्या ठिकाणी जाऊन इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, फाफडा, जलेबी वगैरे खाऊन येत होतो. एडिसनमधल्या पटेल स्टोअर्समध्ये ढोकळा, समोसा, कचोरी, खाखरा, भाकरी वगैरेंचा ताजा मालही मिळत असे. आम्ही अनेक वेळा तो आणून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खात होतो. या सगळ्या गोष्टी घरी तयार करण्याची सोयही होतीच. त्यासाठी आवश्यक ती मिश्रणे, पिठे, बॅटर वगैरेही बाजारात सहज मिळत होती. त्यामुळे माझ्या इथल्या वास्तव्यात माझे सगळे खाणेपिणे अगदी भारतातल्यासारखेच होत होते.
 
मी तिकडे गेल्यावर पहिल्याच रविवारी सकाळी माझा मुलगा मला नाश्ता करण्यासाठी जवळच्या एडिसन शहरात घेऊन गेला. तिथे सरावणाभवन नावाचे दक्षिण भारतीय हॉटेल होते. ते बहुधा उडप्यांचे नसावे. आत गेल्यावर पाहिले की ते बऱ्यापैकी भरले होते. बहुतेक सगळ्या टेबलांवर कोणी कोणी बसले होते ते एकूण एक सगळे लोक भारतीय दिसत होतेच, त्यातही दक्षिण भारतीय जास्त होते. एक दोन तर चक्क लुंगी गुंडाळून आले होते. कानावर तामीळ तेलुगू शब्द पडत होते, तसे आमच्यासारखे मराठमोळेही होते. इडली, वडा, दोसा, उत्तप्पा वगैरे ओळखीच्या पदार्थांच्या निरनिराळ्या व्हरायटीज होत्या त्यांची चव आपल्या इकडल्यासारखीच होती. जोडीला चविष्ट सांभार आणि चटणी होतीच. तीसुद्धा मला मानवण्याइतपतच तिखट होती. इतर कुणाला सपकच वाटत असेल. तिथे बसलो असतांना आपण सातासमुद्रापलीकडल्या अमेरिकेत आलो आहोत असे अजीबात वाटत नव्हते. दोन तीन आठवड्यांनंतर आम्ही तिथल्या जवळच्या अम्मा किचनमध्ये नाश्ता करायला गेलो. तिथल्या एका भिंतीवर जयललिताचा खूप मोठा पोस्टर लावला होता. त्यावरून ही कोणती अम्मा आहे हे लक्षात आले. त्या हॉटेलात फक्त पाच डॉलरमध्ये एक काँबो मेन्यू होता तोसुद्धा मला पुरेसा वाटला. 

दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा नाश्त्यासाठी बाहेर पडल्यावर मी म्हंटले या वेळी वेगळे काही तरी खाऊ. मग त्याच भागातल्या सुखाडिया स्वीट्समध्ये शिरलो. हे मुख्यतः मिठाईचे दुकान आहे. पुण्यातल्या काका हलवाई किंवा चितळे बंधू यांच्याकडे जितक्या मिठाया मिळतात तशीच विविधता तिथेही होतीच. त्या मिठाया घेऊन जाण्यासाठी बरीच गिऱ्हाइके येत होती आणि आपापल्या आवडीची पॅकेट्स घेऊन जात होती. पण एका बाजूला आठदहा टेबले लावून तिथे बसून खायची व्यवस्थाही होती. त्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी इथे मात्र फारसे कोणी आले नव्हते. तिथे संध्याकाळी भेळ, पाणीपुरी खाणाऱ्यांची गर्दी होते आणि त्यांच्यासाठी बाहेर अंगणात खुर्च्या मांडाव्या लागतात असे ऐकले.  आम्ही गुजराथी स्टाइलमध्ये 'फाफडा अने जलेबी' घेतली. ती बरी होती, पण आमच्या वाशीच्या फरसाणवाल्याच्या ताज्या गरमागरम वस्तू जास्त मजेदार असायच्या. 

पुणेमुंबई महामार्गावर टोलनाक्यांजवळ फूडमॉल आहेत आणि तिथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. बहुतेक प्रवासी तिथे दहापंधरा मिनिटे थांबून आपापल्या रुचीप्रमाणे थोडी खाद्यंति करतातच. अमेरिकेतल्या महामार्गांवर थोड्या थोड्या अंतराने असे विसावे असतात आणि तिथे केएफसी, सबवे, मॅकडोनाल्ड, बर्गरकिंग, डंकिन डोनट्स वगैरे फास्टफूडचे स्टॉल्स असतात. पण या कंपन्यांना भारतात जितकी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे तशी अमेरिकेत नाही. ते दरिद्री लोकांचे 'जंकफूड' असते असे म्हणून तिथले काही शिष्ट लोक नाके मुरडतात. मी मात्र त्यांच्यावर तसा अन्याय केला नाही. जिथे जे मिळाले ते चाखून पाहिले.

आम्ही थॉमस एडिसनच्या प्रयोगशाळेला भेट देऊन परत येतांना आम्हाला तसा थोडा उशीरच झाला होता. आजूबाजूच्या भागात कोणकोणती भोजनालये आहेत याची गूगलवर चौकशी केली. काही अंतरावर एक थाइ रेस्तराँ दिसत होते, पण ते त्या वेळी लंचब्रेकसाठी बंद होते.  इकडेतिकडे शोध घेता एक पंजाबी ढाबा दिसला पण तो प्रत्यक्ष बघून कुणालाही आवडला नाही. पुन्हा थाइ रेस्तराँला फोन लावला तर त्याने आम्हाला यायला हरकत नाही असे सांगितले. मग नकाशावर ते शोधून काढले आणी तिथे शिरलो.  ती धड दुपारच्या जेवणाची वेळ नव्हती आणि रात्र पडायला तर खूपच वेळ होता.  तरीही तिथे बऱ्यापैकी जेवण मिळाले.

माझी भारतात परत यायची वेळ झाली असतांनाच आम्हाला समजले की न्यूजर्सीमध्येच एक अतिभव्य असे अक्षरधाम मंदिर बांधले गेले आहे. म्हणून आम्ही ते पहायला गेलो. यापूर्वीचा आमचा असा अनुभव होता की या स्वामीनारायण मंदिरांमध्ये उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था असते. तशी तिथेही असणार अशी आमची अपेक्षा होती. पण आम्हाला त्या देवळाच्या आवारातही प्रवेशच मिळाला नाही. शिखर दर्शन घेऊन परत फिरावे लागले. मग वाटेत एक  बावर्ची बिर्याणी पॉइंट मिळाले.

मी न्यू जर्सीमध्ये गेलो असतांना एकदा आम्ही तिथल्या एका ठिकाणी रात्रीच्या जेवणासाठी गेलो होतो. त्या जागेचे नाव होते रेनफॉरेस्ट कॅफे. वेलींच्या कमानीमधून आत शिरतांनाच एका अजस्र अजगराचा फणा फुस्सकन अंगावर आला. दचकून पाहिले तर तो एका झाडाच्या फांदीवरून खाली लटकत होता. तो खरा नव्हता पण हुबेहूब जीवंत वाटत होता. त्या हॉटेलाच्या मोकळ्या जागेत दाटीवाटीने खूप झाडे लावलेली होती, त्या झाडांना अनेक वेलींनी विळखे घातलेले होते, त्या झाडांमधली कुठली खरी होती आणि कुठली कृत्रिम होती तेही समजत नव्हते, पण एकंदरीत तिथे  घनदाट अरण्याचा आभास निर्माण केला होता. मुख्य म्हणजे त्या झाडांच्या फांद्याफांद्यांवर असंख्य लहानमोठे वन्य पशु आणि रंगीबेरंगी पक्षी बसलेले होते किंवा काही झुडुपांच्या आडून डोकावत होते. सगळीकडे मंद धूसर प्रकाश होता आणि त्या जंगलातच चाळीस पन्नास टेबले विखरून ठेवली होती. त्यातली बहुतेक टेबले भरलेली होती म्हणजे तितकी माणसेही होती पण त्यांची गर्दी जाणवत नव्हती. त्या वातावरणाला पोषक असे गूढरम्य पाश्चात्य संगीताचे स्वर घुमत होते. आम्हाला जे टेबल मिळाले होते त्याच्या जवळच एक कृत्रिम धबधबा होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एका दांडगोबाचा पुतळा होता. अँबियन्स इतका छान होता आणि खाद्यपदार्थही त्याला साजेसे होते. एकंदरीत एक लक्षात राहण्यासारखा अनुभव घेऊन आम्ही खुषीत परत आलो.  

पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहेच आणि म्हणून आपण दिवसभर पाणी पीत असतो. आपल्या डोळ्यांनासुद्धा जलाशय नुसते पहायलाही आवडतात. समुद्र किंवा मोठ्या नद्यांच्या किनारी असलेल्या गावांमधले लोक  वेळ मिळाला की किनाऱ्यावर जाऊन मंद वाऱ्याची मजा घेत इकडे तिकडे फिरतात किंवा पाण्याच्या लाटा पहात आणि त्यांचे संगीत ऐकत एकाद्या ठिकाणी बसून राहतात. भोपाळ, हैदराबाद आणि बंगलोर या शहरांमध्ये मोठ्या नद्या नसल्या तरी सुंदर विस्तीर्ण तलाव आहेत. पर्यटक ते पहायला जातात. कोल्हापूरचे रंकाळा, सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव आणि पुण्याच्या खडकवासला धरणाच्या काठावरसुद्धा संध्याकाळी चांगलीच गर्दी असते, कारण लोकांना पाण्याचे असे सान्निध्य आवडते.

मी न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात रहात होतो. अशा लहानशा गावाला लागून एक स्प्रिंग लेक पार्क आहे. त्यात एक बऱ्यापैकी मोठे तळे आहे. त्या तळ्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी कडेकडेने रस्ता बांधला आहे. तळ्याच्या एका भागात पाण्यातच सुंदर कारंजी बांधली आहेत बसून आराम करायला एक छान चबूतरा आहे, तिथे बसायला बाकडी ठेवली आहेत. आजकाल अमेरिकेतले लोक रस्त्यांवरून पायी चालतांना सहसा दिसत नाहीत, पण ते मोटारीत बसून या पार्कमध्ये येतात आणि तिथे तलावाभोवती पायी चालतात किंवा जॉगिंग करतात. इथे लहान खेडेगावातसुद्धा आपल्याला रस्त्याच्या कडेला हवी तिथे गाडी उभी करून ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही आधी गाडी पार्क करण्यासाठी योग्य अशी जागा शोधली आणि तिथून पार्कमध्ये तळ्याकाठी चालत जाऊन त्याला प्रदक्षिणा घातली.   


आपण निसर्ग म्हणजे झाडे,झुडुपे,गवत,पाने,फुले वगैरे एवढेच समजतो. खेड्यांमध्ये रहाणाऱ्यांच्या आजूबाजूला सगळीकडे असा निसर्ग पसरलेलाच असतो. तो पावसाळ्यात हिरवा गार दिसतो,  उन्हाळ्यात कोमेजून जातो, पावसाचे थेंब पडले की पुन्हा टवटवीत होतो, निरनिराळ्या फुलांच्या मोसमांमध्ये फुलांनी बहरून जातो, असे पानाफुलांमधून आपले अनेक रंग दाखवत असतो.  शहरात जाऊन निर्जीव दगडाविटांच्या घरांमध्ये रहायला लागलेल्या लोकांना निसर्गापासून दूर वाटायला लागले तेंव्हा त्यांनी बागा, उद्याने वगैरे करून दोन घटका निसर्गाजवळ रहाण्याची सोय करून घेतली. मग त्यातच लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंड्या वगैरेंनी युक्त असे पार्क झाले. प्रेमी युगुलांची आडोशाला भेटायची सोय झाली, तसेच वयस्क लोकांना सावकाशपणे पायी फिरण्यासाठी सोयिस्कर वाटा, बसून विश्रांती घेण्यासाठी बाकडी वगैरेंनी सुसज्ज असे नानानानी पार्कही झाले. 

  अमेरिकेत आमच्या घरापासून मैलभर अंतरावर खास कुत्र्यांसाठी तयार केलेले एक डॉगपार्क आहे. या भागातले श्वानप्रेमी लोक आपापल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन इथे येतात. २५ पाउंडपेक्षा कमी वजन असलेल्या आणि २५ पाउंडांहून जास्त वजन असलेल्या कुत्र्यांसाठी असे त्यात दोन वेगवेगळे भाग केलेले आहेत, पण ते मार्गदर्शनासाठी. इथे कुणीच प्रत्यक्ष वजन मोजून ते ठरवणारा सेवक असत नाही. कुत्र्याच्या मालकाने (किंवा मालकिणीने) आपल्या कुत्र्याच्या हितासाठी त्याला योग्य त्या विभागात न्यावे. तिथे ते कुत्रे इतर मित्रांबरोबर मनसोक्त बागडतात. इथे कुंपणाच्या आत कुत्र्यांना मोकळे सोडले असले तरी त्याच्या मालकाने हजर राहून त्याच्यावर नजर ठेवणे आवश्यक असते. इथे यायला कुत्र्यांना तर खूपच मजा वाटते, पण मालकमालकिणींच्याही ओळखी वाढतात आणि त्यांचे सोशल ग्रुप्स तयार होतात. मग ते इतर ठिकाणी कुत्र्यांशिवायही एकत्र जमून काही धमाल करतात.

आमच्या मायलोला या डॉग पार्कचे विलक्षण आकर्षण आहे. आम्ही त्याला रोजच त्याच्या उद्यानात घेऊन जात होतो आणि अर्धापाऊण तास तिथे ठेवत होतो. तिथे रोज येणारे त्याचे काही मित्रमैत्रिणी भेटले की ते सगळे आपापसात छान खेळत रहायचे. कसे कुणास ठाऊक पण त्याला संध्याकाळ झाली हे कळायचे आणि तो मागच्या दोन पायावर उभा राहून नाचत नाचत पुढच्या दोन पायांनी आम्हाला हलवायचा. "फिरायला जायचं" , "डॉग पार्क" हे शब्द कानावर पडले की त्याच्या अंगात उत्साह संचारायचा आणि मग तो आम्हाला जागेवर बसू द्यायचा नाही.  


पॅटरसन ग्रेट फॉल्स
नायगरा धबधब्याला इतकी प्रचंड जागतिक प्रसिद्धी मिळाली आहे की न्यूजर्सीमध्ये पॅसाइक नावाची एक नदी आहे आणि तिच्यावरही एक धबधबा आहे हे सहसा कुणाला ऐकूनही ठाऊक नसते. या धबधब्याला चक्क 'ग्रेट फॉल्स' असे नाव दिले आहे म्हणून आम्ही तो पहायला गेलो. हा धबधबा ७७ फूट उंचीचा आहे. तसा भेडाघाटचा धबधबाही यापेक्षा फार उंच नसेल, पण नर्मदा नदीचे विशाल पात्र कित्येक पटीने मोठे आहे आणि पाण्याला वेगही आहे त्यामुळे तो धुवाँधार दिसतो. इथली पॅसाइक नदीही लहानशी आणि उंचीही जास्त नाही त्यामुळे या धबधब्यात ग्रेट वाटण्यासारखे काही नव्हते. हा धबधबा जवळून पाहण्यासाठी त्याच्या समोरच एक पूल बांधला आहे, पण तो जुना होऊन असुरक्षित झाला असल्यामुळे त्या पुलावर जायला प्रतिबंध केला आहे. म्हणून आम्हाला जरा दुरूनच त्या धबधब्याचे दर्शन घ्यावे लागले. 

या धबधब्याच्या स्थळाचा इतिहास मात्र महान आहे. इथे सन १७९१ मध्ये Society for Establishing Useful Manufactures या नावाची एक कंपनी सुरू झाली आणि तिने या धबधब्याच्या पाण्याच्या ऊर्जेचा उपयोग करून त्यावर चालणारी यंत्रे बसवली. एडिसन आणि टेसला यांच्याही खूप वर्षे आधीच्या त्या काळात वीजनिर्मिती माहीत नव्हती अशा काळात या जागी पाणचक्कीवर चालणारी पिठाची गिरणी, कापडाची गिरणी, लोखंडाचे सामान किंवा यंत्रे तयार करणारे कारखाने असे उद्योग सुरू झाले होते. त्यांनी एका प्रकारे अमेरिकेच्या औद्योगीकरणाचा पाया घातला असे म्हणता येईल.   आता तिथे काहीच तयार होत नाही, पण स्मारक म्हणून ती जुनी इमारत जपून ठेवली आहे. याच्या बाजूला वसवलेले पॅटरसन हे गावसुद्धा ऐतिहासिक वाटते. तिथेही शंभर दोनशे वर्षे किंवा त्याहूनही जास्त जुन्यापुराण्या कित्येक वास्तू दिसल्या. 
Monday, May 06, 2024

हिंदी भजने आणि मराठी गीते

 निर्माता दिग्दर्शक राजा परांजपे यांनी जगाच्या पाठीवर नावाचा एक अफलातून चित्रपट दिला. त्यातली प्रमुख भूमिकाही त्यांनी स्वतः वठवली होती, पण ती एक उमदा आणि सुस्वरूप नायक म्हणून नव्हती. त्यांनी या सिनेमात एका दीन दुबळ्या सरळमार्गी माणसाच्या जीवनाची वाताहत होतांना  दाखवली होती. हा चित्रपट वेगळ्या कथेपेक्षाही त्यातल्या अनेक अप्रतिम गाण्यांमुळे खूप गाजला आणि आता सिनेमा विस्मरणात गेला असला तरी ती गाणी आजतागायत लोकप्रिय आहेत. त्यातली तीन गाणी एक अंध मुलगी रस्त्यात गात गात नाच करते. सीमाने ते काम छान केले आहे. पण रस्त्यात गायलेली ती तीनही गाणी आध्यात्मिक स्वरूपाची गाणी आहेत हे जरा आश्चर्यजनक वाटते. ग.दि.माडगूळकर हे या सिनेमाचे पटकथाकार आणि गीतकार असल्यामुळे त्यांनी ती गीते त्या गोष्टीत चपखलपणे बसवली आहेत. ती गाणी म्हणजे इतकी उत्कृष्ट काव्ये आहेत की त्यासाठी गदिमांच्या प्रतिभेला दाद द्यावीच लागेल.

पुढे मी जेंव्हा काही जुनी हिंदी भजने ऐकली तेंव्हा मला या गीतांची आठवण झाली. अशी मूळ हिंदी भजने आणि त्यावर गदिमांनी लिहिलेली मराठी गीते मी इथे देत आहे. 


१. सूरदासांचे भजन

अब मैं नाच्यौ बहुत गुपाल। . 

काम-क्रोध कौ पहिरि चोलना, कंठ बिषय की माल॥ 

महामोह के नूपुर बाजत, चलत असंगत चाल॥ 

भ्रम-भोयौ मन भयौ, पखावज, चलत असंगत चाल॥ 

तृष्ना नाद करति घट भीतर, नाना बिधि दै ताल। 

माया कौ कटि फेंटा बाँध्यौ, लोभ-तिलक दियौ भाल॥ 

कोटिक कला काछि दिखाराई जल-थल सुधि नहिं काल। 

सूरदास की सबै अविद्या दूरि करौ नँदलाल॥ 

हे गोपाल! अब मैं बहुत नाच चुका। काम और क्रोध का जामा पहनकर, विषयों की माला गले में डालकर, महामोह-ग्रस्त होने से निंदा करने में ही मुझे सुख मिलता है। मै नाचता रहा। भ्रम से भ्रमित मन ही पखावज (मृदंग) बना। कुसंगरूपी चाल मैं चलता हूँ। अनेक प्रकार के ताल देती हुई तृष्णा हृदय के भीतर नाद कर रही है। कमर में माया का फेटा बाँध रखा है ओर ललाट पर लोभ का तिलक लगा लिया है। जल-थल में स्वांग धारण कर कितने समय से (यह तो मुझे स्मरण नहीं) करोड़ों कलाएँ मैंने भली प्रकार दिखलाई हैं। हे नंदलाल! अब तो सूरदास का सारा अज्ञान दूर कर दो।

गदिमांचे गीत :

नाच नाचुनी अती मी दमले

थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला

निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला

उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला

थकले रे नंदलाला

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय अनीती नुपूर पायी, कुसंगती करताला

लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला

थकले रे नंदलाला

स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला

थकले रे नंदलाला

-----

२. संत मीराबाईचे भजन

माई री! मैं तो लियो गोविंदो मोल।

कोई कहै छानै, कोई कहै छुपकै, लियो री बजंता ढोल।

कोई कहै मुहंघो, कोई कहै सुहंगो, लियो री तराजू तोल।

कोई कहै कारो, कोई कहै गोरो, लियो री अमोलिक मोल।

या ही कूं सब जाणत है, लियो री आँखी खोल।

मीरा कूं प्रभु दरसण दीज्‍यो, पूरब जनम को कोल।


गदिमांनी लिहिलेले गीत

नाहि खर्चिली कवडीदमडी, नाहि वेचला दाम

विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम !

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी

जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम !

बाई मी विकत घेतला श्याम !

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संतांघरचा

हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम !

बाई मी विकत घेतला श्याम !

जितुके मालक, तितुकी नावे, हृदये तितुकी, याची गावे

कुणि न ओळखी तरिही याला दीन अनाथ अनाम !

बाई मी विकत घेतला श्याम !

-----

३. सूरदासांचे भजन 

श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जातो आणि तिकडेच राहतो. त्याची वाट पहात बसलेल्या प्रिय गोपींची समजूत घालण्यासाठी तो उद्धवाला वृंदावनाला पाठवतो. श्रीकृष्णाला दोष न देता आपल्या नशीबाला दोष देत त्या गोपी असे म्हणतात,

ऊधौ, कर्मन की गति न्यारी।

सब नदियाँ जल भरि-भरि रहियाँ सागर केहि बिध खारी॥

उज्ज्वल पंख दिये बगुला को कोयल केहि गुन कारी॥

सुन्दर नयन मृगा को दीन्हे बन-बन फिरत उजारी॥

मूरख-मूरख राजे कीन्हे पंडित फिरत भिखारी॥

सूर श्याम मिलने की आसा छिन-छिन बीतत भारी॥

भावार्थ :- गोपियाँ भगवान कृष्ण के प्रति अपने प्रेम के प्रतिदानस्वरूप विरह को प्राप्त करती हैं। लेकिन वे इसे विधि का विधान कहकर आश्वस्त रहती हैं। वे ऊधो से कहती हैं कि हे ऊधो, प्रकृति का नियम एकदम उलटा है। धरती पर जितनी भी नदियाँ हैं वे सब की सब अपना मीठा जल सागर में डाल रही हैं लेकिन वह फिर भी खारा ही है। छद्म-तपस्वी बगुले को उसने सफेद रंग दिया है जबकि मीठा बोलने वाली कोयल को काला बना दिया। सुन्दर नेत्रों वाला हिरन जंगल में मारा-मारा फिरता है। अनपढ़ लोग धन से खेलते हैं जबकि ज्ञानी लोग अपना जीवन भीख माँगकर पूरा करते हैं। सूरदास कहते हैं कि गोपियों ने कहा--इसी तरह श्याम से मिलने की हमारी इच्छा जितनी बढ़ती जाती है, उतना ही यह वियोग हमें भारी प्रतीत होता है।

याला थोडीशी वर्तमानकाळाची जोड देत ग.दि.माडगूळकरांनी असे गीत लिहिले आहे. या गीतात त्यांनी वेगळी उदाहरणे दिली असली तरी मुख्य मुद्दा तोच ठेवला आहे.

उद्धवा, अजब तुझे सरकार !

लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार !

इथे फुलांना मरण जन्मता

दगडाला पण चिरंजीविता

बोरिबाभळी उगाच जगती चंदनमाथि कुठार !

लबाड जोडिति इमले माड्या

गुणवंतांना मात्र झोपड्या

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !

वाइट तितुके इथे पोसले

भलेपणाचे भाग्य नासले

या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !

ग.दि.माडगूळकर

चित्रपट - जगाच्या पाठीवर

---

"उधो करमनकी गति न्यारी" याच सूरदासाच्या  भजनाचे तंतोतंत रूपांतर कवयित्री शांता शेळके यांनी असे केले आहे.

दैव किती अविचारी

उधो ! जीवनगति ही न्यारी

शुभ्रवर्ण बगळ्यास दिला तू

कोकिळतनू अंधारी;

कृष्णलोचन सुंदर हरिणे

वनि वनि भ्रमति बिचारी

मूर्ख भोगितो राजवैभवा

पंडित फिरत भिकारी

सूरदास विनवितो प्रभूला

क्षण क्षण हो जड भारी

गीत - शान्‍ता शेळके

संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी

स्वर - रामदास कामत

नाटक - हे बंध रेशमाचे

गीत प्रकार - नाट्यसंगीत

-----

जगाच्या पाठीवर हा चित्रपट आला होता त्या साठ वर्षांपूर्वीच्या काळात उद्धव नावाचा कोणी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नव्हता आणि इतिहासात किंवा पुराणातही उद्धव नावाचा कोणी राजा नाही. मग माडगूळकरांनी "उद्धवा अजब तुझे सरकार" असे शब्द का लिहावेत? हे मला गूढच वाटले होते. नंतर ते सूरदासांच्या भजनावरून उलगडले. 

 उद्धव आणि अक्रूर नावाची मथुरेतली दोन महत्वाची पात्रे भागवतपुराणात आहेत. यातल्या अक्रूराने फक्त कृष्णाला गोकुळातून मथुरेला नेण्याचे काम केले. उद्धव कृष्णाचा सखा म्हणून जन्मभर त्याच्यासोबत राहिला.  शेवटी अवतार समाप्त करण्याच्या आधी श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश उद्धवगीता या नावाने ओळखला जातो. त्यानंतर फक्त उद्धवाचा निरोप घेऊन श्रीकृष्ण अरण्यात गेला. मग पुन्हा एकदा उद्धवाने कृष्णाचा निरोप त्याच्या प्रियजनांना सांगितला अशी कथा आहे.  मध्वमुनीश्वर या जुन्या काळातल्या संतांची एक रचना माझ्या लहानपणी लोकप्रिय होती. माझ्या आईच्या काळातल्या बायका हे गाणे म्हणत असत. या गाण्यात श्रीकृष्णाने उद्धवाची काकुळतीने विनवणी केली आहे.

उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासि जनांचें ॥ध्रु०॥

बा नंद यशोदा माता मजसाठीं त्यजितिल प्राण । 

सांडुनी प्रपंचा फिरती मनिं उदास रानोरान । 

अन्नपाणी त्यजिलें रडती अति दुःखित झाले दीन । 

(चाल बदल) जन्मलों तैंहुनि झटले । 

कटि खांदे वाहतां घटले ।

 मजलागीं तिळतिळ तुटले । 

आटलें रक्त देहाचें ॥१॥

आईबाप त्यजुनी बाळें मजसंगें खेळत होतीं । 

गोडशा शिदोर्‍या आणुनी आवडीनें मजला देती । 

रात्रंदिस फिरले मागें दधि गोरस चोरूं येती । 

(चाल बदल) मी तोडुनि आलों तटका । 

तो जिवा लागला चटका । 

मजविण त्या युगसम घटका । 

आठवतें प्रेम तयांचें ॥२॥

पतिसुतादि गृहधन त्यजिलें मजवरती धरुनी ममता । 

मानिलें तुच्छ अपवर्गा मजसंगें निश्चळ रमतां । 

मद्दत्तचित्त त्या गोपी नेत्रांतरिं लेवुनि समता । 

(चाल बदल) तिळतुल्य नाहिं मनिं डगल्या । 

दृढ निश्चय धरुनी तगल्या । 

बहुधा त्या नसतील जगल्या । 

भंगले मनोरथ ज्यांचे ॥३॥

हरि आहे सुखरूप म्हणुनी भेटतांचि त्या सांगावें । 

सांग कीं समस्ता पुसिलें प्रत्युत्तर त्या मागावें । 

कथुनिया ज्ञान तयातें सांग कीं शोक त्यजावें । 

(चाल बदल) हें कार्य नव्हे तुजजोगें । 

मजसाठीं जावें वेगें । 

हे मध्वमुनीश्वर सांगे । 

त्या नपवे ज्ञान जयाचें ॥४॥

-----


Sunday, January 14, 2024

अमेरिकेतली देवळे

 अमेरिकेत आता भारतीय लोकांची बरीच वस्ती झाली आहे आणि ते सगळे सुखवस्तू लोक आहेत. त्यांनी जागोजागी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्यांच्या गुणवत्तेत तसेच संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. भारतातून अमेरिकेत फिरायला गेलेल्या लोकांना तर त्यांचे अप्रूप वाटते. ही सगळी देवळे गेल्या काही दशकांमध्येच बांधलेली असल्यामुळे त्यांना पौराणिक स्थानमहात्म्य नाही आणि अजूनतरी ती जागृत देवस्थाने झालेली नाहीत. त्यामुळे नवससायास करणाऱ्या भाविक लोकांना त्यांची ओढ नाही. सुटीच्या दिवशी किंवा विशिष्ट धार्मिक महत्वाच्या तिथींना थोडी जास्त गर्दी जमते.पण एरवीसुद्धा सगळीकडे माफक संख्येने भक्तजन दिसतात. काही देवळे वास्तुशिल्पाच्या दृष्टीने खूप सुंदर असल्यामुळे ती प्रेक्षणीय स्थळेही आहेत. आणखी काही वर्षांनी अमेरिकेतल्या मंदिरांची तीर्थयात्रा करण्याची टूम आणि टूर निघाली तर मला आश्चर्य वाटणार नाही.  मी इंग्लंडमधल्या लीड्स शहरात रहात असतांना तितल्या एकमेव 'हिंदू टेंपल'ला जात असेच, शिवाय बर्मिंगहॅम इथे बांधल्या जात असलेल्या प्रति तिरुपती व्यंकटेशाचे दर्शनसुध्दा घडले. माझी गणना 'भाविकां'त होत नसली तरी सुंदर मंदिरांमधले पवित्र आणि प्रसन्न वातावरण मला मोहित करते. आपोआप माझे पाय देवळांकडे वळतात.


मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो तेंव्हा अॅटलांटाजवळील अल्फारेटा या शहरात राहिलो होतो. तिथेही एक दोन लहानशी स्थानिक मंदिरे होतीच, पण अॅटलांटाजवळ लिलबर्न या ठिकाणी गुजराथी लोकांचे एक स्वामीनारायणाचे भव्य मंदिर होते, तसेच दक्षिण भारतीय समाजाचेही एक चांगले मोठे देऊळ होते. स्वामीनारायण मंदिराची इमारत छायाचित्रात बाहेरून जितकी सुबक दिसते त्याहूनही अधिक सुरेख ती आंतून दिसते. प्रत्येक खांबावर आणि छपरावर सुबक आणि रेखीव शिल्पकृती कोरल्या आहेत. त्यावर कलात्मक पध्दतीने टाकलेले प्रकाशाचे झोत रंग बदलत असतात. त्याने त्या शिल्पकृतींना अधिकच उठाव येतो. इंग्लंड अमेरिकेत बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये मुख्य देवतेशिवाय इतर अनेक देवांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. त्यामुळे सगळ्या भक्तांची सोय केली जाते. इथेही राधाकृष्ण, शिव- पार्वती, गणेश, श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत, पण या मंदिरात पारंपरिक हिंदू देवतांपेक्षा स्वामीनारायण संप्रदायातील गुरूंना अधिक महत्व दिलेले दिसते.


माझ्या अमेरिकेच्या दुसऱ्या भेटीत मी लॉसएंजेलिसजवळ टॉरेन्स इथे रहात होतो. तिथे आमच्या घराहून सर्वात जवळ असलेले मंदिर पंचमुखी हनुमानाचे होते. मारुतीचे हे रूप मी तरी प्रथमच पाहिले. या देवळातसुद्धा हनुमानाशिवाय इतर मुख्य देवतांची स्थापना केली आहे. गणेशोत्सव, देवीचे नवरात्र वगैरे उत्सवसुद्धा त्या मंदिरांमध्ये साजरे केले जातात.  हे दक्षिण भारतीय लोकांचे मंदिर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा, अभिषेक आणि मंत्रपठण वगैरे विधीवत प्रकार तिथे नेहमी चाललेले असतात.  त्या भेटीत मी लेक श्राइन नावाचा परमहंस स्वामी योगानंदांचा रम्य आश्रम पाहिला होता. या आश्रमात सर्वधर्मसमभाव आहे. योगानंदांची शिकवण जगातील सर्व धर्मीयांच्या कल्याणासाठी आहे.


गेल्या वर्षी मी पुन्हा अमेरिकेला गेलो तेंव्हा न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात रहात होतो. तिथल्या रहिवासामध्येसुद्धा मला अनेक देवळांचे आणि देवतांच्या मूर्तींचे दर्शन घडले. तिथे गेल्या गेल्या आम्ही जवळच्या ब्रिजवॉटर इथल्या बालाजी मंदिरात जाऊन आलो. अनादि, अनंत, निर्गुण, निराकार, जगातील कणाकणात भरलेला असे परमेश्वराचे वर्णन असंख्य वेळा ऐकूनसुद्धा त्याच्या देवळात जाऊन त्याच्या मनोहर रूपाचे दर्शन घ्यायला लोकांना अतीशय आवडते. आंध्रप्रदेशातील तिरुपति येथील वेंकटेश किंवा बालाजीचे मंदिर जास्तीत जास्त भक्तगणांच्या गर्दीसाठी प्रसिद्ध आहे. हा भगवान विष्णूचा अवतार आहे अशी श्रद्धा असली तरी "परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय" यातल्या कुठल्या कारणासाठी हा अवतार घेतला गेला याची कथा मी कधी ऐकली नाही. 


तिरुपतीचा व्यंकोबा दोन भक्तांना दर्शन देण्यासाठी आमच्या जमखंडीजवळच्या कल्हळ्ळीच्या डोंगरावर अवतरला अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही लहानपणापासून त्या देवाचे दर्शन घेण्यासाठी "व्यंकटरमणा गोविंदा" या नामाचा घोष करत तिथे अनेक वेळा जात होतो. आमच्या परिवारातले अनेक लोक मुंबईपुण्याहून त्याच्या दर्शनासाठी जमखंडीला येऊन जात होते, अजूनही जात असतात. त्यांच्या बोलण्यात त्याचा उल्लेख येत असतोच. माझ्या आईने या कल्हळ्ळीचा व्यंकटेशावर कवने रचली होती.  लहानपणापासूनच व्यंकटेश या देवाबद्दल मनात खूप आपुलकी आणि भक्तीभाव होता. आम्ही दक्षिण भारताची सहल आधी तिरुपतीला जाऊन व्यंकोबाचे दर्शन घेऊन सुरू केली होती.


या देवाचे भक्त जगभर पसरलेले आहेत. त्यांनी इतर अनेक ठिकाणी बालाजीची सुंदर मंदिरे बांधली आहेत. पुण्याजवळील केतकावली इथले प्रतितिरुपति देऊळ प्रसिद्ध आहेच, मी तिथेही  दोनदा जाऊन आलो आहे. अमेरिकेतल्या न्यूजर्सीमधील ब्रिजवॉटर नावाच्या गावातसुद्धा एक अत्यंत सुंदर असे वेंकटेशाचे देऊळ आहे आणि अमेरिकेतले भारतीय वंशाचे लोक तिथे दर्शनासाठी येत असतात.  आम्ही या देवळात गेलो तेंव्हा तळमजल्यावर आत जाताच समोरील एका हॉलमध्ये बरीच गर्दी दिसत होती, पण आत जाऊन पाहिल्यावर ते लोक एकाद्या खाजगी धार्मिक कार्यक्रमासाठी जमले होते असे समजले. मुख्य मंदिर वरच्या मजल्यावर होते म्हणून आम्ही जिना चढून वर गेलो. तिथल्या भव्य हॉलमध्ये मधोमध श्रीव्यंकटेशाचे मुख्य मंदिर होते. तिथे आत जाऊन दर्शन घेतले. बाहेर आल्यावर देवळाला प्रदक्षिणा घालण्याच्या वाटेवर श्रीदेवी, भूदेवी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वति, श्रीराम, श्रीकृष्ण, आंजनेय (मारुती), महागणपति, सुब्रह्मण्यम, नवग्रह इत्यादि सतरा देवतांच्या लहानलहान पण सुबक अशा घुमटी होत्या. मंदिराच्या संपूर्ण परिसरातली स्वच्छता आणि शांतताही वाखाणण्यासारखी होती. अपेक्षेप्रमाणे प्रसादाचा बुंदीचा लाडू मिळालाच. तिरुपतीला, केतकावलीला आणि ब्रिजवॉटरला मिळालेल्या प्रसादाची चंव अगदी एकसारखी होती इतके त्याचे जागतिक प्रमाणावर स्टँडर्डायझेशन झाले आहे.


मी अमेरिकेत असतांना आषाढी एकादशी आली होती. यानिमित्याने त्या भागात राहणाऱ्या काही मराठी मंडळींनी उत्साहाने काही कार्यक्रम केले होते. एका सुटीच्या दिवशी एका लहानशा मैदानात एक प्रतीकात्मक दिंडी काढून पालकीची मिरवणूक काढली होती. त्याला रिंगण असे नाव दिले होते. शंभर सव्वाशे लोक भारतीय पोशाख घालून हातात भरवा झेंडा घेऊन रामकृष्णहरी नामाचा घोष करत नाचत नाचत चालत होते. नंतर श्री.कुलकर्णी नावाच्या एका अमेरिकेतल्या भक्ताच्या घरी एक मोठा कार्यक्रम झाला. त्यांनी आपल्या बंगल्यातल्या एका शेडमध्ये श्रीविठ्ठलरखुमाईचे देऊळ तयार केले आहे. तिथेही आधी एका पालखीत विठोबारखुमाईच्या मूर्ती ठेऊन चाळीसपन्नास भक्तांनी त्याची मिरवणूक काढली आणि अमेरिकेतले रहदारीचे सगळे नियम पाळून तिला फूटपाथवरूनच मैलभर फिरवून आणले. त्यानंतर प्रवचन, भजन, भक्तीसंगीत वगैरेंचा सुरेल कार्यक्रम झाला, त्यालाही शंभरावर लोक आले होते.  ते आजूबाजूच्या शंभर मैलांच्या परिसरातून आले होते.माझी भारतात परतायची वेळ आली त्या सुमाराला असे कळले की न्यूजर्सीमध्येच भारताबाहेरील सर्वात मोठे असे अक्षरधाम मंदिर बांधले जात होते. त्याचे औपचारिक उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होणार होते, पण त्याआधीच ते पाहून घ्यावे असा विचार करून आम्ही कारने रॉबिन्सविले या गावी त्या मंदिराच्या प्रांगणापर्यंत जाऊन पोचलो. तिथे पार्किंग लॉटमध्ये शेकडो मोटारी दिसत होत्या आणि आतमध्येही शेकडो लोक  फिरतांना दिसत होते. पण आम्हाला गेटपाशीच अडवले आणि फक्त पासधारकांनाच प्रवेश आहे असे सांगितले. हे पास आधीपासून ऑनलाइन बुकिंग करून मिळवले जात होते आणि आयत्या वेळी आलेल्या लोकांना तिथल्या तिथे काही शुल्क आकारून पास देण्याची काही व्यवस्थाच नव्हती. तिथे कडक पोलिसबंदोबस्त होता आणि गळ्यात पास धारण न केलेला कोणी इसम दिसल्यास स्थानिक अमेरिकन पोलिस आयोजकांवरच कडक कारवाई करणार असा धाक घातला होता. त्यामुळे अगदी काकुळतीने विनवण्या करूनसुद्धा आम्हाल प्रवेश मिळालाच नाही. अखेर मंदिराचे दुरूनच शिखरदर्शन करून घरी परत जावे लागले.
Monday, December 25, 2023

शास्त्रज्ञ की राक्षस ?

 

सकाळी सूर्य उगवतो आणि सगळीकडे उजेड पसरतो, तो दिवसभर आकाशात असतो, संध्याकाळी मावळतो, त्यानंतर रात्र होते आणि सगळीकडे अंधार पसरतो, पण त्यावेळी चंद्राचा थोडा उजेड असतो. रात्रीच्या काळ्या आकाशात चांदण्या लुकलुकतात, पण दिवसा त्या दिसत नाहीत. कधीकधी आभाळात काळे ढग येतात आणि सूर्याला झाकून टाकतात, त्यातून पावसाच्या धारा पडतात आणि जमीनीवर पडलेले पाणी नदी नाले ओढे वगैरेंमधून वहात वहात दुसरीकडे जाते. मातीतून झाडे उगवतात, त्यांना पाने फुले, फळे वगैरे लागतात.  जन्माला येतांना लहानसे असलेले बाळ हळूहळू मोठे होते आणि मोठा झालेला माणूस शेवटी म्हातारा होतो. निसर्गात अशासारखे असंख्य बदल होत असतात हे आदिमानवापासून सर्वांनी पाहिलेले असते. पण हे बदल का किंवा कशामुळे होतात याचा फारसा विचार सगळे लोक गंभीरपणे करत नाहीत. अदृष्य आणि सर्वशक्तीमान असा परमेश्वर हे सगळे चमत्कार घडवून आणत असतो असे काही शहाणे लोक सांगतात आणि ते बहुतेक सगळ्या लोकांना पटते. मात्र काही लोकांचे तेवढ्यावर समाधान होत नाही. या जगात कुठलीही गोष्ट का घडते याचा ते लोक सखोल विचार करतात आणि त्यामागे असलेल्या निसर्गाच्या नियमांचा शोध घेतात, त्याची अधिकाधिक माहिती मिळवत राहतात. त्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो.  हे शास्त्रज्ञ लोक निसर्गाचे नियम आणि पदार्थांचे गुणधर्म यांचा अभ्यास करून थांबत नाहीत, तर पुढे जाऊन त्यांचा मानवाच्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचे प्रयत्नही करत असतात.  या प्रयत्नामधूनच प्रगति होत  निरनिराळ्या प्रकारची यंत्रे आणि वस्तू निर्माण होत गेल्या आणि आपण आजच्या जगातल्या सुखसोयींचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे  शास्त्रज्ञ हे जगाच्या कल्याणासाठी काम करणारे महान लोक असतात  अशी त्यांची एक प्रतिमा मनात असते.


पण जगाच्या सुरुवातीपासूनच माणसांबरोबर राक्षसही निर्माण होत गेले आहेत. ते दुसऱ्यांवर हल्ला करून त्याची मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नात असतात. राक्षसी वृत्तीच्या काही लोकांना तर विध्वंस करण्यातच आनंद मिळतो.   त्यामुळे जसजसे निरनिराळे शोध लागत गेले आणि त्यामधून निरनिराळी औजारे व यंत्रे तयार होत गेली, त्यांच्या बरोबरच अधिकाधिक तीक्ष्ण हत्यारे आणि विध्वंसक स्फोटकेही तयार होत गेली. यामुळे विज्ञान हे विकासाचे साधन आहे की विनाशाचे? असा प्रश्न काही तत्वज्ञानी विचारवंत उपस्थित करत असतात. अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या काही प्रमुख शास्त्रज्ञांची उदाहरणे मी या लेखात घेतली आहेत. 

. . . .

ऑप्पनहायमर हा हॉलिवूडचा सिनेमा आला आणि सगळीकडे त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली.

"कोण हा  ऑप्पनहायमर?"

"अरे तो नाही का, त्यानं पहिला अॅटमबाँब बनवला?"

"म्हणजे जसा एकाद्या रामू हलवायानं सामोसा तळला किंवा राधाकाकूनं उकडीचा मोदक केला तसाच या पठ्ठ्यानं एकट्यानं अॅटमबाँब केला असेल का?"  

"असेल की! अरे सामोसा म्हणजे तरी काय असतो? एका कणकेच्या कवचाच्या आत मीठमिरची, बटाटा आणि मटारचा गोळा आणि मोदक म्हणजे त्यात गूळ आणि खोबरंच ना? यानंही एक स्पेशल भांडं घेतलं असेल आणि त्यात खूप सारे अॅटम खच्चून कोंबून ठेवले असतील."

सर्वसामान्य माणसाचे या विषयातले ज्ञान इतपतच असते. हा पहिला अॅटमबाँब तयार करण्यासाठी एक मोठ्ठे मॅनहॅटन प्रॉजेक्ट होते आणि त्यात हजारो माणसे गुंतली होती हे सहसा कुणाला माहीतही नसते. हे काम इतक्या गुप्तपणे चालले होते की यातल्या बहुतेक लोकांनासुद्धा आपण नेमके कशासाठी काम करतो आहोत याचा पत्ता नव्हताच. अर्थातच या प्रॉजेक्टचा मुख्य अधिकारी असलेल्या ऑप्पनहायमरला मात्र पूर्ण कल्पना होतीच, इतकेच नव्हे तर त्याने या गोष्टीचा ध्यास घेतला होता आणि दोन तीन वर्षे अविश्रांत काम करून ते उद्दिष्ट साध्य करून दाखवले होते. विश्वातला प्रत्येक अणू म्हणजे ऊर्जेचेच वेगळे रूप असते हे त्याआधीच आइन्स्टाइनने गणिते मांडून सिद्ध करून दाखवले होते, पण प्रत्यक्षात आपल्याला वाटेल त्या अणूला फोडून त्यातली ही सुप्त ऊर्जा बाहेर काढता येत नाही. कुठकुठल्या विशिष्ट पदार्थांच्या अणूंना कशा प्रकारे फोडून हे काम करता येते यावर जगभरातल्या सगळ्या प्रगत देशांमध्ये गुप्तपणे संशोधन चालले होते त्याचा धागा धरून हे काम चालले होते.आल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाला परंपरागत भौतिकशास्त्राचा अभ्यास करत असतांना काही क्रांतिकारक नवे विचार सुचले आणि त्याने ते सापेक्षता सिद्धांत  (theory of relativity) या नावाने मांडून विज्ञानाच्या क्षेत्रात इतिहास घडवला. त्या आधीची दोनशे वर्षे प्रयोगशाळांमध्ये निरनिराळे प्रयोग करून, त्यातली निरीक्षणे पाहून त्यांवरून निष्कर्ष काढून विज्ञानातले नवे सिद्धांत मांडले जात होते, पण आइनस्टाइनने मात्र घरी किंवा ऑफिसात बसून फक्त तर्कशुद्ध विचार आणि किचकट गणिते यांच्या आधारे कागदावर असे दाखवून दिले की विश्वातले सगळे वस्तुमान आणि ऊर्जा या एकच असतात. (mass–energy equivalence formula E = mc^2) त्याने या दोन्हीमधील संबंधाचे सूत्रही सांगितले. यावरून असे दिसून आले की अगदी कणभर पदार्थातही प्रचंड ऊर्जा दडलेली असते. आइनस्टाइनने  हे समीकरण प्रयोगातून सिद्ध करून दाखवले नाही, किंबहुना ते त्याला शक्य नव्हतेच, पण इतर शास्त्रज्ञ लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आणि अशी ऊर्जा मिळवण्यासाठी जोरात संशोधन सुरू झाले.  अणुशक्ती हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे एक नवे दालन उघडले.  त्यातील संशोधनामुळेच अणूबाँब तयार करणे शक्य झाले. म्हणून त्यासाठी आइनस्टाइनलासुद्धा जबाबदार धरले जाते. याचे आणखी एक कारण आहे.  दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर आइनस्टाइनने जर्मनी सोडून अमेरिकेत आसरा घेतला होता. त्याला अशी माहिती मिळाली होती किंवा त्याचा असा विश्वास होता की हिटलरचे सरकार अॅटमबाँब तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते यशस्वी झाले तर त्याच्याकडे एक भयानक संहार करणारे अस्त्र असेल. त्या वेळी अमेरिकेत रहात असलेल्या काही शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या तत्कालिन प्रेसिडेंटला पत्र लिहून ही माहिती दिली आणि अमेरिकेनेही त्यासाठी प्रयत्न करून जर्मनीच्या आधी हे तंत्रज्ञान विकसित करावे अशी सूचना केली. त्या पत्रावर आइनस्टाइनसारख्या प्रमुख शास्त्रज्ञाने सही केली होती म्हणून प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी ते पत्र मनावर घेतले आणि मॅनहॅटन प्रॉजेक्टला मंजूरी दिली. आइनस्टाइन हा व्यक्तिशः अत्यंत मानवतावादी मानव होता तरीही अशा प्रकारे तो अप्रत्यक्षपणे या विध्वंसक कामाला कारणीभूत ठरला. भारतातल्या काही लोकांना ऑप्पनहायमरचे मोठे कौतुक वाटते. ते त्याची कार्यकुशलता किंवा त्याने केलेले संशोधन याचे कौतुक नसून ते एका वेगळ्याच कारणामुळे वाटते, ते म्हणजे या माणसाने संस्कृत भाषा आणि भगवद्गीता यांचा अभ्यास केला होता म्हणे. असेही सांगितले जाते की पहिल्या अॅटमबाँबची चाचणी पाहिल्यावर त्याला भगवद्गीतेतला एक श्लोक आठवला. पूर्वी मी असे वाचले होते की भगवंताने अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले तेंव्हा त्याचे हजार सूर्यांएवढे तेज त्याचे मर्त्य डोळे पाहू शकत नव्हते म्हणून कृष्णाने त्याला दिव्यचक्षू दिले होते, तशा प्रकारचा भयानक उजेड त्या बाँबस्फोटातून निघाला होता. पण आता जी चर्चा चालली आहे त्यात असे वाचले की ऑप्पनहायमरला दुसराच एक श्लोक आठवला होता. त्यात कृष्णाने सांगितले होते, "मी काळ आहे". ज्यांना टीव्हीवरले महाभारत आठवत असेल त्यांना हरीश भीमाणीच्या खर्जातल्या आवाजातले "मैं समय हूँ ... " ची आठवण येईल, पण या ऑप्पनहायमरने स्वतःलाच म्हंटले, "मी सर्व जगाचा संहार करणारा काळ झालो आहे." तो कदाचित पुढे "हाहाहा!!!" करून राक्षसासारखे भेसूर हसलासुद्धा असेल. गीतेमध्ये सांगितलेल्या सत्वरजतमोगुणापैकी याने तामसी गुणच उचलला असावा.

ते काही का असेना, ऑप्पनहायमरला गीता आठवली एवढ्यासाठी इथले काही लोक आपल्या महान संस्कृतीच्या नावाने आपली पाठ थोपटून घेतात आणि 'त्या लोकांना' जेवढे समजते तेवढेही आपल्या लोकांना कळत नाही, हे लोक गीतेकडे पाठ फिरवून बसले आहेत, म्हणून आपला देश मागे राहिला आहे असेसुद्धा सांगतात.  मग एकजण विचारतो, "तुम्ही ती वॉट्सॅपवरली गोष्ट वाचली नाहीत का? त्यात एक महान शास्त्रज्ञ धोतर नेसून आणि उपरणे पांघरून समुद्रकिनारी गीता वाचत बसलेला असतो. तिथे आलेला शर्टपँटमधला एक तरुण त्याची टिंगल करत असतो. तेवढ्यात एक मोठी मोटारगाडी तिथे येते आणि तिच्यातून उतरून सैन्यातले दोन अधिकारी त्या माणसाला कडक सॅल्यूट ठोकून गाडीत यायला सांगतात. त्या गोंधळलेल्या तरुणाला तो शास्त्रज्ञ आपली ओळख देतो.  मग तो तरुण शास्त्रज्ञही गीतेचा अभ्यास करायला लागतो. नंतर भारतानेही अणुस्फोट करून दाखवलाच नाही का?"


आइन्स्टाइन आणि ऑप्पनहायमर हे दोघेही ज्यू होते. दुसरे महायुद्ध सुरू झाले त्या वेळी हिटलरच्या जर्मनीत दिसेल त्या ज्यूला पकडून मारून टाकले जात होते आणि त्याच्या बातम्या अमेरिकेत पोचत होत्याच. त्यांचा या दोघांच्या मनावर काय परिणाम होत असेल? तोपर्यंत अॅटमबाँब ही फक्त एक वैज्ञानिकांच्या मनातली कल्पना होती, पण ती शक्यतेच्या जवळ येतांना दिसत होती. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनीची सरशी होत होती. अशा वेळी जर्मन शास्त्रज्ञांनी हा बाँब तयार केला तर मग तो सगळ्या जगावर आपली हुकूमत गाजवेल अशी भीती वाटणे शक्य होते. पण जर्मनीला कसे थांबवणार? म्हणून अमेरिकेने पुढाकार घेऊन आधीच हा बाँब तयार केला तर जर्मनीच्या विरुद्ध पक्षाची बाजू मजबूत होणार होती. सुरुवातीला अमेरिका दुसऱ्या महायुद्धात नव्हतीही. पण तिने युद्धात उतरल्यानंतर मॅनहॅटन प्रोजेक्टला भरपूर अर्थसहाय्य केले गेले आणि ऑप्पनहायमर त्यावर दिवसरात्र  जिद्दीने मेहनत घेत होता. जरी या प्रकल्पात इतर हजारो लोक होते, तरीही ऑप्पनहायमरलाच अॅटमबाँबचा जनक मानले जाते इतके मोठे योगदान त्याने केले होते.


प्रत्यक्षात पहिला बाँब तयार झाला तोपर्यंत जर्मनीने महायुद्धात शरणागती पत्करली होती. त्याच्या आधीच्या काळात जर्मनीने बाँब तयार करण्याइतकी मजल मारलेलीही नव्हतीच.  त्यामुळे ज्या उद्देशाने या कामाची सुरुवात आणि घाई केली होती तो मूळ उद्देश आता शिल्लक राहिला नव्हता. पण जपानने अजून लढाई सुरूच ठेवली होती.  तिकडे जास्त सैन्य पाठवून ती लढाई जिंकण्यापेक्षा जपानवर हा नव्याने निर्माण झालेला बाँब टाकून त्याला लगेच शरण यायला भाग पाडावे असे ठरले. या निर्णयात ऑप्पनहायमर सामील होता.  यात अपरिमित जीवहानी होणार होती आणि तीही सैन्याची नव्हे तर नागरिकांची होणार होती. पण महायुद्धाच्या काळात दोन्ही बाजूंनी नागरी वस्त्यांवर विमानहल्ले करून हे विनाशकारी काम चालवलेले होतेच. अॅटमबाँबने नेमकी किती हानी होणार आहे हे त्या वेळी माहीतही नव्हते आणि असा विध्वंसक बाँब तयार केला गेला आहे ही बातमीसुद्धा गुप्तच ठेवलेली होती. ६ ऑगस्ट १९४५ला अचानक हिरोशिमा या शहरावर पहिला अॅटमबाँब टाकला गेल्यानंतर जगाला त्याचे भयानक स्वरूप दिसले.ऑप्पनहायमरच्याही आधीच्या पिढीमध्ये फ्रिझ हेबर नावाचा आणखी एक ज्यू शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवले तसेच लक्षावधी लोकांना ठार मारले असे सांगितले जाते. (Fritz Haber — The Genius Scientist Who Murdered Millions And Saved Billions.)  अठराव्या शतकात होऊन गेलेल्या माल्थस या शास्त्रज्ञाने असे भाकित केले होते की ज्या वेगाने लोकसंख्या वाढते तितक्या वेगाने अन्नाचे उत्पादन वाढू शकत नाही. त्यामुळे जर लोक मारामाऱ्या व लढायांमुळे किंवा रोगराईंमुळे मेले नाहीत आणि त्यांची संख्या कमी झाली नाही तर ते दुष्काळ पडून त्यात उपाशी तडफडून मरतील. कायमच अन्नाचा तुटवडा राहणार आहे आणि तो लोकसंख्येचे नियंत्रण करणार आहे. त्या काळापर्यंत युरोपमधली बहुतेक सगळी सुपीक जमीन लागवडीखाली आणली गेली होती आणि तिथल्या थंड हवामानात वर्षात अनेक पिके घेऊन अन्नाचे उत्पादन वाढवणे शक्यच नव्हते म्हणूनही त्याने असा निष्कर्ष काढला असेल.


यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालले होते. फ्रिझ हेबर या शास्त्रज्ञाने हवेमधील नायट्रोजन वायूपासून अमोनिया हे संयुग तयार करण्याची कृति शोधून काढली आणि बॉश कंपनीच्या सहाय्याने अमोनिया आणि त्यापासून रासायनिक खते तयार करण्याचे कारखाने काढले. या खतांमुळे अन्नधान्यांचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आणि वाढत्या लोकसंख्येला खाण्यासाठी अधिक अन्नाचे उत्पादन सुरू झाले. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली तरी  त्यांची अन्नान्नदशा झाली नाही. याचे बरेचसे श्रेय हेबरकडे जाते, पण कुणीही त्याचा देवदूत म्हणून गौरव करत नाही. याचे कारण असे आहे की याच माणसाने रासायनिक युद्धाची सुरुवात करून दिली. त्यानेच तयार केलेल्या पद्धतीमधून पहिल्या महायुद्धाच्या काळात शत्रूसैनिकांवर विषारी वायूचा मारा करून झुरळे मारल्यासारखे हजारो सैनिकांचे जीव घेतले गेले. या राक्षसी कृत्यामुळे त्याची प्रचंड प्रमाणात निंदाही झाली.त्याच्याही आधीच्या शतकात होऊन गेलेल्या आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनॅमाइट तयार करण्याची प्रक्रिया शोधून काढली आणि त्याचे अनेक कारखाने काढले. या रसायनाचा उपयोग मुख्यतः खाणी किंवा बांधकाम यात खडक फोडण्यासाठी होता आणि आजही केला जातो, पण नोबेलने पुढे जाऊन तोफांसाठी उपयोगात आणायची अनेक स्फोटके तयार केली आणि त्यांचाही व्यापार करून अपार श्रीमंती मिळवली. जगभरातल्या युद्धांमध्ये त्यांचा वापर केला गेला आणि त्यात असंख्य लोक मारले गेले. नोबेल व्यावसायिक यशाच्या शिखरावर असतांना एक घटना घडली. त्याच्या भावाचा मृत्यू झाला असतांना एका वर्तमानपत्रवाल्याचा गैरसमज झाला आणि त्याने आल्फ्रेड नोबेलच्याच मृत्यूची बातमी छापून दिली. ती देतांना मर्चंट ऑफ डेथ किंवा मौतका सौदागर मेला असे छापले. ती बातमी वाचून नोबेलला धक्का बसला आणि आपली या नावाने कीर्ती शिल्लक राहील या विचाराने त्याला अस्वस्थ केले. त्याने आपल्या नावाने एक ट्रस्ट स्थापन करून आपली सगळी संपत्ती तिला दिली आणि त्या रकमेच्या व्याजातून जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ, साहित्यिक तसेच शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते शोधून काढून त्यांना आपल्या नावाने पुरस्कार द्यावा अशी योजना करून ठेवली.  आजही नोबेल प्राइझ हाच जगातला अत्युच्च सन्मान समजला जातो आणि नोबेलला आता कुणी राक्षस म्हणत नाही.


Thursday, November 23, 2023

शाश्वत ऊर्जा

 ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन अधिकाधिक चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव खूप पूर्वीपासून आजतागायत करत आला आहे. पूर्वी  वाऱ्यामधील ऊर्जेवर  शिडाची जहाजे चालत असत, हॉलंडमधले लोक पवनचक्क्यांचा उपयोग पाणी उपसण्यासाठी करत असत, लाकडाचे ओंडके आणि तराफे यांना पूर्वापारपासून नदीच्या पाण्याच्या सहाय्याने पुढे वहात नेले जात असे, मध्ययुगात काही ठिकाणी पाणचक्क्या बसवून त्यांच्या सहाय्याने यंत्रे चालवली जात होती. निसर्गामधील ऊर्जेच्या या साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी ऊर्जेचे हे स्रोत (सोर्सेस) जिथे आणि जेंव्हा उपलब्ध असतील तेंव्हा त्या ठिकाणी जाऊन तिथेच आपले काम करणे शक्य असते. दुसरी गोष्ट म्हणजे या नैसर्गिक स्त्रोतांवर माणसाचे कणभरही नियंत्रण नसते. जेवढे प्रखर ऊन पडेल, जेवढ्या जोराचा वारा सुटेल आणि ज्या वेगाने पाणी वहात असेल त्यानुसार त्याला आपली कामे करून घ्यावी लागतात. 

अग्नी चेतवणे आणि विझवणे याचे तंत्र मानवाने अवगत करून घेतल्यानंतर ऊर्जेचे हे साधन मात्र त्याला केंव्हाही, कोठेही आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळवणे शक्य झाले. अन्न शिजवणे, खनिजापासून धातू तयार करणे आणि त्यांना तापवून आणि ठोकून हवा तसा आकार देणे अशा अनेक कामांसाठी गरजेप्रमाणे चुली, शेगड्या आणि भट्ट्या वगैरे बांधून आपण आपल्याला गरज असेल तेंव्हा आणि पाहिजे त्या जागी अग्नीचा उपयोग करून घेऊ शकतो. या ऊष्णतेचा उपयोग करून यंत्रांची चाके फिरवता येतात आणि ती यंत्रे चालवून अनेक वस्तूंचे उत्पादन केले जाते. पण ऊष्णता ही ऊर्जासुद्धा जिथे निर्माण केली जाते तिथेच तिचा वापर करावा लागतो.

एका जागी असलेल्या वीजनिर्मितीकेंद्रात (पॉवर स्टेशनमध्ये) मोठ्या प्रमाणावर तयार झालेली वीज तारांमधून कितीतरी दूरपर्यंत नेता येते आणि तितक्या दूरवर पसरलेल्या शेकडो गावांमधल्या हजारो घरातले दिवे, पंखे, यंत्रे  वगैरेंना पुरवता येते.  वीज या प्रकारच्या ऊर्जेचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की  ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिज ऊर्जा (Kinetic Energy) यांच्यासारख्या ऊर्जेच्या इतर रूपांमध्ये तिचे परिवर्तन करणे सुलभ असते. त्यामुळे मानवाच्या जीवनात क्रांतीकारक बदल झाले. दिव्यांच्या उजेडात रात्री अभ्यास किंवा काम करणे शक्य झाले, कारखान्यांमधली अवजड यंत्रे विजेवर चालतात आणि आपल्याला लागणाऱ्या बहुतेक सगळ्या वस्तू तिथे तयार होतात, विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या इंजिनांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. विजेच्या उपयोगामुळेच टेलिफोन, काँप्यूटर्स, इंटरनेट वगैरे अनंत उपकरणे चालतात, आपले रोजचे जीवन आता जवळजवळ पूर्णपणे विजेवर अवलंबून असते. एकाद्या देशाचा किंवा विभागाचा किती विकास झाला आहे याचे मोजमाप आता तिथे होत असलेल्या विजेच्या वापराशी निगडित झाले आहे.जगातील विजेच्या उत्पादनातील साठ टक्क्याहून जास्त वीज आज कोळसा, तेल किंवा नैसर्गिक ज्वलनशील वायू ही इंधने जाळून तयार केली जाते. या वीजनिर्मितीकेंद्रांमध्ये इंधन जाळून निर्माण झालेल्या ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ तयार करतात आणि त्या वाफेने टर्बाइन नावाच्या यंत्राचे चाक फिरवले जाते. त्या चाकाला जोडलेल्या जनरेटरमध्ये वीज तयार होते. पण इंधनाच्या ज्वलनामधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंमुळे वातावरणाचे प्रदूषण होते आणि आता हे प्रदूषण इतके वाढले आहे की पृथ्वीवरचे तापमान वाढून सगळ्या जीवसृष्टीवरच भयानक संकटे येण्याची भीती आहे. शिवाय या भूमिगत इंधनांचा मर्यादित साठा कधीतरी संपणारही आहे. यावर जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे आणि औष्णिक वीजकेंद्रांवर कडक बंधने घालण्यात येत आहेत. त्यांची संख्या कमी कमी करत हळूहळू ती शून्यावर आणायचा विचार आहे. पण आजचे जीवन सुरळीतपणे चालवण्यासाठी विजेचा वापरही अत्यावश्यक आहे. म्हणून वीजनिर्मितीचे पर्यायी मार्ग शोधले जात आहेत.  त्यात पुनर्निर्मितीक्षम स्रोतांपासून (रिन्यूएबल एनर्जी सोर्सेसपासून) तयार केल्या जाणाऱ्या शाश्वत ऊर्जेला विशेष महत्वाचे स्थान आहे. या ऊर्जेसाठी लागणारे घटक निसर्गाकडूनच मिळणारे असल्यामुळे ते अनंत काळपर्यंत मिळत रहावेत अशी अपेक्षा आहे.

जलऊर्जा (हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर) हे शाश्वत ऊर्जेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. यात पाण्याच्या प्रवाहामुळे फिरणारे चाक वीज तयार करते. आभाळातून पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमध्ये येत राहते आणि वीज उत्पादनासाठी धरणामधून खाली सोडलेल्या पाण्याची त्यातून भरपाई होत असते. विजेचे उत्पादन करण्याच्या क्रियेत ते पाणी नष्ट होत नाही. तेच पाणी पुढे कृषी आणि इतर उपयुक्त कामांसाठी वापरता येते. या ऊर्जानिर्मितीत जमीन, पाणी किंवा वातावरणाचे प्रदूषण होत नाही. या प्रकारच्या विजेचे उत्पादन गेली शंभरावर वर्षे होत आले असल्यामुळे त्यामधील तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री चांगली परिचयाची आहे. पण आतापर्यंत बहुतेक सगळ्या नद्यांवर शक्य असतील तितकी धरणे बांधून झाली आहेत. आणखी नवीन धरणे बांधण्यासाठी जमीन संपादन करणे, त्यामधून विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे यासाठी होणारा प्रचंड खर्च पाहता या क्षेत्रात अधिक वाढ होण्याला मर्यादा आहेत. सध्या जगातले सुमारे सोळा टक्के वीज उत्पादन पाण्यापासून होते, त्यात किती वाढ करता येईल हे पहावे लागेल.

अणूऊर्जा या प्रकारातून सध्या सुमारे दहा टक्के वीजनिर्मिति केली जाते. यात युरेनियम धातूच्या अणूच्या विखंडनातून बाहेर पडलेल्या ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ तयार करतात आणि त्या वाफेवर फिरणारे टर्बोजनरेटर वीज तयार करते. अणूभट्ट्यांमध्ये काही तीव्र किरणोत्सारी द्रव्ये तयार होतात त्यांना सध्या सुरक्षितपणे वेगळे ठेवले जाते, पण त्यांना नष्ट करता येत नाही आणि अपघाताने ती माणसांच्या संपर्कात आली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या भीतीमुळे अणूऊर्जेचा प्रसार बराच काळ मंदावला होता. पण या अणुविद्युतकेंद्रांमधून औष्णिक केंद्रांसारखे विषारी वायू वातावरणात सोडले जात नाहीत  त्यामुळे पर्यावरणाचा विचार करता अणुशक्तीवर पुनर्विचार सुरू झाला आहे आणि कदाचित भविष्यकाळात अशा प्रकारची अधिक केंद्रे बांधली जातील अशी शक्यता आहे. जगामधील युरेनियमचा साठाही मर्यादितच असल्यामुळे तोही कधीतरी संपेलच. त्यामुळे या विजेलाही शाश्वत म्हणता येणार नाही. पण पूर्णपणे शाश्वत ऊर्जेकडे वळेपर्यंत मधली काही दशके अणूऊर्जा आपली विजेची गरज भागवू शकेल आणि तिच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होणार नाही. 

सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या शाश्वत ऊर्जांच्या दोन प्रकारांवरवर सध्या खूप भर दिला जायला लागला आहे. सूर्याच्या उन्हामधून पृथ्वीवर भरपूर ऊर्जा येत असते. पण त्या ऊर्जेचे विजेत रूपांतर करणे इतके सोपे नसते. आता ते तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे. सोलर पॅनेल नावाच्या तबकड्यांवर बसवलेले सोलर सेल्स हे रूपांतर करतात. आधी त्यांची किंमत फार जास्त असल्यामुळे ही वीज परवडत नव्हती. आता त्याच्या किंमती आवाक्यात येऊ लागल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा उपयोग करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. पण ही वीज फक्त सूर्यप्रकाशातच तयार होऊ शकते त्यामुळे ती दिवसाच उपलब्ध असते, पण उजेडासाठी तिची रात्री गरज असते. त्यामुळे दिवसा तयार झालेली वीज बॅटऱ्यांमध्ये साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. तेसुद्धा खूप खर्चिक असते. हे केंद्र दिवसभरातून फक्त काही तासच विजेचे उत्पादन करत असल्यामुळे या केंद्राची कार्यक्षमता कमी असते.

वाहत्या वाऱ्याने फिरणाऱ्या चक्रांमधून पवनऊर्जा तयार केली जाते. पण फक्त काही ठिकाणीच जोरात वाहणारे वारे असतात आणि तेही वर्षातल्या काही काळातच वाहतात. तेवढा वेळच ही वीज निर्मिती होऊ शकते. अशा जागा शोधून काढून तिथे पवनचक्क्या उभ्या करण्याचे काम चालू आहे, पण याला निसर्गाच्याच मर्यादा आहेत. या पवनऊर्जेतसुद्धा मिळेल तेंव्हा वीज तयार करून तिचा वापर इतर वेळी करण्यासाठी व्यवस्था करावी लागतेच. या केंद्रांची कार्यक्षमता कमीच असते.

जैवऊर्जा (बायोएनर्जी) नावाचा शाश्वत ऊर्जेचा आणखी एक प्रकार आहे. वनस्पती आणि प्राणिमात्रांची शरीरे ज्या असंख्य सूक्ष्म पेशींपासून बनतात त्यांचे रेणू (मॉलेक्यूल्स) मुख्यतः कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांनी भरलेले असतात. या सगळ्याला बायोमास असे म्हंटले जाते. झाडांची मुळे, खोडे, फांद्या, पाने. फुले, फळे वगैरे भाग आणि त्यापासून तयार केले जात असलेले कागद व कापड यासारखे कृत्रिम पदार्थ, तसेच प्राणिमात्रांचे मृतदेह, मलमूत्र वगैरे सर्वांचा समावेश या बायोमासमध्ये होतो. हे जैव पदार्थ कुजतात तेंव्हा काही सूक्ष्म जंतू या पदार्थांच्या अवाढव्य रेणूंचे विघटन करून त्यापासून लहान लहान आणि साधे रेणू वेगळे करतात. त्यातून कार्बन व हैड्रोजन यांची मीथेनसारखी वायुरूप संयुगे (काँपौंड्स) निघतात. त्यांना बायोगॅस म्हणतात. या ज्वलनशील वायूला जाळून त्यामधून ऊर्जेची निर्मिती करता येते. हीच जैवऊर्जा झाली. हा बायोगॅस स्वयंपाकघरातला एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) आणि वाहनांमध्ये भरला जाणारा सीएनजी (काँप्रेस्स्ड नॅचरल गॅस) यांच्यासारखाच असतो. गोबर गॅसच्या स्वरूपात ही ऊर्जा खेड्यापाड्यांमधून उपयोगात आणण्याचे प्रयत्न बरेच वर्षांपासून चाललेले आहेत. अधिक मोठ्या प्रमाणात या गॅसचे उत्पादन करून त्यापासून विजेची निर्मिती केली तर त्यांमुळे भारत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल. पण जितका बायोमास आपण जाळू तितकाच नवा बायोमास निर्माण करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन झाडे लावणे आणि त्यांना वाढवणे यांच्यावर लक्ष द्यावे लागेल. ते जमले तरच ही शाश्वत ऊर्जा होईल.  बायोमासच्या ज्वलनामुळेसुद्धा हवेत कार्बन डायॉक्साइड वायू टाकला जाईलच, पण नवीन वृक्षांच्या वाढीत तो शोषला जाईल आणि वातावरणातला समतोल कायम राहील. 

शहरामध्ये रोज गोळा होणारा टनावधी कचरा ही नगरवासियांपुढे असलेली एक मोठी समस्या आहे. त्याचे काय करायचे हेच उमजेनासे झाले नसल्यामुळे तो नष्ट करणे हेच महत्वाचे आहे. अशा वाया जाणाऱ्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली तर त्याचेपासून सुटका होईलच, शिवाय त्यापासून ऊर्जा निर्माण करून तिचा वापर करता येईल. यामुळे शहरांसाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. बायोगॅसच्या निर्मितीपर्यंत होणारा खर्च नगरविकासाखाली केला (म्हणजे गॅस फुकट मिळवला) आणि त्यापासून पुढे वीजनिर्मिती करण्याचा खर्च वीजग्राहकाकडून वसूल केला तर ती वीज माफक दरात प्राप्त करता येईल. या कारणाने शहरांमध्ये अशा प्रकारे ऊर्जेची निर्मिती करणे गरजेचे आहे. शहरातला नागरिक टाकाऊ जैव वस्तूंचे काहीही करू शकत नाही किंवा त्या साठवूनही ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांचा योग्य प्रकारे निचरा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येते.

पण खेड्यांमधली परिस्थिती वेगळी आहे. भाजीची साले, फोलपटे, देठ, पालापाचोळा, उरलेले अन्न, गवत वगैरे गोष्टी तिथे जनावरांना खाऊ घातल्या जातात, त्यांचे शेण आणि उरलेला चुरा, भूसा वगैरेंचासुध्दा खत म्हणून किंवा ज्वलनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे जैव कचऱ्यापासून मुक्ती मिळवणे हा तिथे इतका मोठा प्रश्न नाही. वीजउत्पादन करण्यासाठी भरपूर बायोमासाचा सतत पुरवठा करावा लागेल आणि तो उत्पन्न करण्यासाठी एलेफंट ग्रास, जट्रोपा यासारखी लवकर वाढणारी खास झाडे मुद्दाम लावून वाढवली,  अन्नधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस, पालेभाज्या, फळफळावळ यासारख्या उपयुक्त पिकांऐवजी शेतात ही झाडे लावली आणि त्यांच्यापासून तेवढेच किंवा जास्त उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा बाळगली तर त्याला लागणारा खर्चसुध्दा विजेच्या उत्पादनखर्चात धरावा लागेल आणि ते केले तर ही वीज केवढ्याला पडेल हे पहावे लागेल.

वीज निर्माण न करताही जैवऊर्जेचा उपयोग पूर्वीपासून रोजच्या जीवनात  केला जात आहेच ते ही थोडे पाहू. सूर्यप्रकाशात झाडांची पाने हवेमधील कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू ग्रहण करतात आणि त्यामधील कार्बन अणूचा पाणी व इतर क्षारांसोबत संयोग घडवून त्यातून निरनिराळ्या सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांचे अणू तयार करतात. या प्रक्रियेत कर्बद्विप्राणील वायूमधील प्राणवायूचे (ऑक्सीजनचे) हवेत उत्सर्जन केले जाते आणि सूर्यप्रकाशामधील ऊर्जा सेंद्रिय पदार्थांमध्ये सुप्त रासायनिक ऊर्जेच्या (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) स्वरूपात साठवून ठेवली जाते. हे सेंद्रिय पदार्थ झाडांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पाठवून देऊन तिकडे ते साठवले जातात. त्यांच्यावरच जगातील इतर सर्व पशुपक्षी, कृमीकीटक, मासे वगैरे सजीवांचे प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने पोषण होते. या सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होत असतांना त्यांच्यामध्ये सुप्त असलेली ऊर्जा पुन्हा प्रकट होते. ही जैव ऊर्जा दोन प्रकारांने उपयोगात आणली जाते. 

वर दिल्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थ कुजवून त्यातून जैव वायू (बायोगॅस) बाहेर काढून तो जाळणे हा अलीकडील काळातला उपाय आहे. लाकडाच्या किंवा सुकलेल्या पालापाचोळ्याच्या स्वरूपातील त्या पदार्थांनाच जाळून ऊष्णता निर्माण करणे हे माणसाला अग्नीचा शोध लागल्यापासून आजतागायत चालत राहिले आहे. भूगर्भामधील दगडी कोळसा आणि खनिज तेल हेसुध्दा लक्षावधी किंवा कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जगत असलेल्या वनस्पतींपासूनच निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्वलनातून मिळणारी ऊर्जासुद्धा मुळात सौर ऊर्जेपासून तयार झालेली आहे असेही म्हणता येईल. जैव ऊर्जेचा माणसाच्या कामासाठी उपयोग करण्यात तसे काहीच नवीन नसले तरी हा उपयोग अधिकाधिक कार्यक्षम रीतीने करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत.

खेडी आणि लहान नगरे या भागात मुख्यतः स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या चुली, शेगड्या वगैरेंमध्ये सुधारणा करून त्या जास्त कार्यक्षम कशा करता येतात यासाठी प्रयत्न होत आहेत. काही नव्या सुधारणांमुळे इंधनाची बचत होईल, तसेच धुराचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करता येईल असा तिहेरी लाभ होतो. खेड्यांमधील काही महिला जळणासाठी लाकूडफाटा गोळा करणे, शेणाच्या गोवऱ्या थापणे, त्या वाळवणे आणि ते जाळून त्यावर स्वयंपाक करणे यावरच दररोज निदान तीन चार तास घालवतात.  आधुनिक बायोगॅस शेगडीवर त्यांचा सगळा स्वयंपाक एका तासात तयार होऊ शकतो. अर्थातच उरलेल्या वेळात त्या कुक्कुटपालन, दूधदुभते यासारखे कोणतेही दुसरे उत्पादक काम करू शकतात. शिवाय स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होते.  परंपरागत पध्दतीच्या चुलीशेगड्यांमध्ये लाकूडफाटा, पालापाचोळा वगैरे जाळल्याने त्यामधील फक्त दहावीस टक्के ऊर्जेचा उपयोग होतो आणि उरलेली बरीचशी ऊर्जा वाया जाते, पण तिच्या लहान लहान चपट्या गोळ्या (पेलेट्स) किंवा कांड्या बनवून त्या खास प्रकारच्या भट्ट्यांमध्ये जाळल्या तर त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. जैववस्तुमानाचा भुगा करून त्यांना यंत्रात घालून चेपून त्याच्या गोळ्या किंवा कांड्या बनवल्यास त्यांची साठवणूक आणि वाहतूक करणे, तसेच त्यांना शेगडी किंवा भट्टीमध्ये भरणे सोपे जाते आणि ते काम स्वयंचलित यंत्रांद्वारे करता येते.

रसायने, रंग, औषधे वगैरे तयार करणाऱ्या अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये चालणाऱ्या प्रक्रियांसाठी लागणारी ऊष्णता बॉयलर्समध्ये खनिज तेल जाळून मिळवली जाते. त्यामधील  कमी तपमानावरील ऊष्णता निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करता येईल. उन्हात ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या नळ्यांमध्ये पाणी तापवून ते तप्त पाणी पुरेशा आकारांच्या पात्रांमध्ये (ड्रम्समध्ये) साठवायचे आणि ऊष्णता विनिमयस्कांद्वारे (हीट एक्स्चेंजरमार्गे) त्यामधील ऊष्णता संयंत्राला पुरवायची असे करता येते. आजकाल काही वसाहतींमध्ये गच्चीवर असे संयंत्र बसवून रहिवाशांना आंघोळीसाठी गरम पाणी नळातून पुरवले जाते. 

आता काही खाजगी कंपन्या आणि सेवाभावी संस्था अपारंपरिक ऊर्जेकडे गंभीरपणे लक्ष देऊ लागल्या आहेत. यातून नफा मिळवणे हा खाजगी कंपन्यांचा उद्देश असतो आणि निदान 'ना नफा ना तोटा' या तत्वावर सेवाभावी संस्था चालवणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यावहारिक (प्रॅक्टिकल) असण्याची अधिक शक्यता असते. पण अपारंपरिक ऊर्जेसंबंधीच्या प्रत्येक बाबतीत  आज तरी 'अनुदान', 'सहाय्य' किंवा 'कायद्यानुसार करावी लागणारी गोष्ट' अशा प्रकारचे उल्लेख येतात. या अपारंपरिक ऊर्जा असल्या कुबड्यांवर अधिक काळ किंवा मोठ्या प्रमाणात उभ्या राहू शकणार नाहीत. सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्यासाठी लागणारी सोलर पॅनेल्स किंवा पवनचक्कीमधील यंत्रसामुग्री यांचे उत्पादन करण्यासाठी आधी खूप ऊर्जा खर्च करावी लागते. ती ऊर्जा अन्य स्वस्त मार्गाने तयार करूनसुध्दा आपण स्वस्त दरात सौर किंवा वायुऊर्जा निर्माण करू शकत नसू तर त्याला फारसा अर्थ उरत नाही. फक्त सौर किंवा वातऊर्जेचाच वापर करून जर आपण त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार करू शकलो आणि तिचा उपयोग करून मिळणारी वीज वाजवी भावात मिळाली तरच हा पर्याय खऱ्या अर्थाने स्वावलंबी म्हणता येईल आणि शाश्वत ठरेल. औष्णिक ऊर्जेला ठाम नकार दिला तर भविष्यकाळात हे होऊ शकेल.

जैवऊर्जा (बायोएनर्जी) या बाबतीत बरीच आशादायी वाटते. स्वयंपाकघरात होत असलेल्या ज्वलनाच्या पारंपरिक पध्दतींमध्ये सुधारणा करून त्यातून ऊर्जेची बचत करणे आणि प्रदूषण कमी करणे हे तर उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आवश्यक आहे आणि ते शक्य होत आहे असे दिसते. युकॅलिप्टस किंवा सुबाबूळ ही जलद वाढणारी झाडे मोठ्या प्रमाणावर लावून आणि योजनाबध्द पध्दतीने त्यांची कापणी करून त्यापासून संततऊर्जा निर्माण करण्याची स्वप्ने वीस काही दशकांपूर्वी पाहिली गेली होती. पण त्याबाबतीत निराशाच पदरी आली हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे सुपीक जमीनीवर वृक्षांची लागवड करून त्यामधून ऊर्जा मिळवत राहण्याची कल्पना आजच्या घटकेला तितकीशी व्यवहार्य वाटत नाही. पण खनिज तेलाची उपलब्धता कमी होत गेली आणि त्याच्या किंमती अशाच वाढत गेल्या तर मात्र लवकरच जैवऊर्जा तुलनेने वाजवी भावात मिळू लागेल. टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबर त्यातून ऊर्जा निर्माण करणे तर नक्कीच लाभदायक आहे. त्याच्या मार्गात येणारे गैरतांत्रिक (नॉनटेक्निकल) अडथळे दूर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाजाच्या प्रबोधनाची गरज आहे. 

या सगळ्याच्या सोबतीला किंवा अधिक अग्रक्रम देऊन रोजच्या जीवनात ऊर्जेचा वापरच कमी करून तिची शक्य तितकी बचत करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व अनावश्यक वापरावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. 

----

मी हा लेख विज्ञानधारा या मासिकासाठी लिहिला होता. तो या मासिकाच्या दिवाळी विशेषांकात (ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३) प्रसिद्ध झाला आहे.

Wednesday, June 28, 2023

ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग

 माणूस निवृत्त झाल्यानंतर अध्यात्माच्या मार्गाला लागतो किंवा त्याने त्या मार्गाला लागावे अशी अपेक्षा असते. माझे वडील ५५ वर्षाचे असतांनाच त्या काळातल्या नियमांनुसार सेवानिवृत्त झाले होते आणि खरोखरच पूर्णवेळ भजन, पूजन,कीर्तन, प्रवचन वगैरेंमध्ये  मग्न असत. पण मी साठ वर्षांनंतर निवृत्त झालो तरी तेंव्हा मला तशी बुद्धी झाली नाही. ७५ वर्षे उलटून गेल्यानंतर अध्यात्म म्हणजे नेमके काय आहे याचा शोध घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला आणि मला समजले तेवढे मी एका लेखात लिहिले होते. हे काम करत असतांनाच मला तत्वज्ञान या शब्दाचा वेगळा अर्थ समजला, त्यावर मी दुसरा लेख लिहून प्रसिद्ध केला होता. या मालिकेतले हे तिसरे पुष्प ज्ञानयोग, कर्मयोग वगैरेंवर देत आहे. मी हा लेख फेसबुकवर पाच भागात दिला होता. त्याच क्रमाने तो इथे देत आहे.  


ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग  भाग -१

भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करायच्या निमित्याने सगळ्या जगाला ज्ञानयोग. कर्मयोग आणि भक्तियोग हे तीन मार्ग धरायला सांगितले आहेत. या तीन्हीपैकी आपल्या इच्छेप्रमाणे कुठलाही मार्ग धरला तरी तो अखेर त्याच शिखराकडे घेऊन जातो वगैरे गोष्टी मी अनेक वेळा ऐकल्या किंवा वाचल्या आहेत आणि इतरांना सांगितल्याही असतील. पण मला स्वतःला त्यांचा अर्थ कधीच नीट समजला नाही असे आता वाटायला लागले आहे.

बऱ्याच लोकांना असे वाटते की पहिली वीसपंचवीस वर्षे शाळाकॉलेजात शिक्षण घेतांना ज्ञानमार्ग धरावा, चाळीसपन्नास वर्षे काम करतांना कर्मयोग पाळावा आणि नंतर उरलेले आयुष्य हरीहरी करत भक्तियोगात घालवावे असे सांगण्याचा उद्देश असेल. पण ते तसे नाही.


भाग -२ ज्ञानयोग

आपण शाळाकॉलेजात अनेक विषयांचा अभ्यास करतो, घरातले मोठे लोक आणि इतर लोकही सतत काही माहिती देत असतात, उपदेश करत असतात, पुस्तके वाचून आणि टीव्ही पाहून माहिती आणि विचार मिळत असतात,  अलीकडे तर इंटरनेट आणि वॉट्सॅपमधून आपल्यावर माहितीचा भडिमार होत आहे. या सगळ्यामधले जे आपल्याला चांगले समजले आणि लक्षात राहिले त्याला आपण ज्ञान (नॉलेज) म्हणतो. या ज्ञानामधून आपल्याला शहाणपणा, हुषारी मिळेल, त्यातून काही प्रमाणात यश, कीर्ती आणि संपत्तीसुद्धा प्राप्त होईल, पण परमेश्वर कसा भेटणार? मोक्ष कसा मिळणार? असा प्रश्न मला पडला होता कारण  गीतेमधल्या तीन्ही मार्गांचे हे अंतिम लक्ष्य असावे असे मला वाटत होते.

अलीकडेच एका पंडिताने मला असे सांगितले की मी जन्मभर विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करून या विषयांमधले जे थोडेफार ज्ञान मिळवले असेल ते मुळी 'ज्ञान' नाहीच. हे विश्व म्हणजे मोहमाया आहे आणि त्याला खरे समजणे हेच अज्ञान आहे. आपल्या आत्म्यावर या अज्ञानाची अनेक पुटे चढलेली असतात. त्यांना बाजूला सारून जो आत्म्याची ओळख करून घेतो तो खरा 'ज्ञानी' आणि अंतरात्मा म्हणजेच परमात्मा हे अद्वैत समजून घेणे म्हणजे गीतेमधले 'ज्ञान'. हे ज्ञान मिळवण्यासाठी आधी मीपणा पूर्णपणे सोडून द्यायला हवा. मला, माझे असे काहीही मनातसुद्धा येता कामा नये. हे होण्यासाठी पूर्वसंचित असायला हवे आणि ज्ञानी सद्गुरु भेटला पाहिजे असेही म्हणतात.  यातले काहीच आपल्याला जमण्यासारखे नाही. ज्ञानमार्ग हा आपला मार्ग असू शकत नाही. त्या मार्गावर एक पाऊलसुद्धा टाकणे मला अशक्य वाटले.


भाग -३  कर्मयोग

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्माते संगोऽस्त्वकर्मणि ॥ 

हे गीतेच्या कर्मयोगाचे सूत्र आहे. "(हे माणसा), तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा व फलाचा उद्देशही तुझ्या मनात असता कामा नये. इतके असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको". असे या एका श्लोकात ग्रथित केलेले आहे. इथे कर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा घेतला आहे असे वाटेल. कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या हितासाठी निरनिराळी कर्तव्ये ठरवलेली आहेत आणि सर्वांनी ती पाळावीत अशी अपेक्षा असते. कर्तव्य करतांना स्वतःच्या व्यक्तिगत नफातोटा पाहिला तर त्यामुळे इतरांचे नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ बापाने आपले कर्तव्य पाळले नाही तर मुलांचे, शिक्षकाने कर्तव्य टाळले तर विद्यार्थ्यांचे आणि नागरिक बेपर्वा झाले तर देशाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कर्तव्यांच्या बाबतीत फळाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करायला हवेच. मग त्यात मोठा योग कसला आला  आणि  त्यातून मोक्ष कसा मिळणार किंवा ब्रह्म कसे भेटणार? असे वाटेल.

पण कर्तव्य हा कर्माचा एक लहानसा भाग आहे. त्याशिवायही माणूस सतत काही ना काही कर्म करतच असतो. हातापायांनी केलेले कामच नव्हे तर तोंडाने खाणेपिणे किंवा बोलणे, इतकेच काय पण मनात आलेले विचार, आखलेल्या योजना हेसुद्धा कर्मात येते. बहुतेक वेळा त्याला या कर्मांपासून काहीतरी लाभ मिळत असतो, पण कधीकधी तो मिळतच नाही. श्वास घेण्यासारखे कर्म नकळत होत असले तरी समजून उमजून केलेल्या कर्मांवर नियंत्रण ठेवावे, ते करतांना (सतत आणि फक्त) स्वार्थाचा विचार करू नये  किंवा "मी हे करून काय फायदा झाला?" असा विचारही मनात आणू नये असा कर्मयोगाचा अर्थ असावा असे मला वाटते. निरपेक्ष वृत्तीने काम करतांना हळूहळू आसक्ती कमी होते. मनासारखे न झाल्यामुळे होणारी निराशा, दुःख, राग वगैरेंचा त्रास होत नाही, मन शांत राहते, चित्तशुद्धी होते आणि त्यामुळे ज्ञानमार्ग सुकर होतो.  मानवी स्वभावानुसार त्याला काहीतरी आशा आकांक्षा असतातच, मोटिव्हेशनशिवाय काम करणे तसे सोपे नाहीच, पण तसा प्रयत्न करावा.


भाग ४  भक्तियोग 

ज्ञानयोगामध्ये अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करून स्वतःचा शोध घेणे असते, तर कर्मयोगामध्ये निरपेक्ष भावनेने निरासक्त वृत्ती बाळगून मनावर ताबा ठेवायचा असतो हे आधीच्या भागांमध्ये पाहिले आहे. या दोन्हींमध्ये कुठल्या देवाचा थेट संबंध यायची गरज नसते. पण भक्तीमार्गासाठी मात्र एकाद्या तरी देवतेवर अनन्य श्रद्धा असणे आवश्यक आहे. बहुतेक हिंदू लोकांच्या घरी दोनचार देवांच्या लहानशा मूर्ती, प्रतिमा, संतांच्या तसबिरी वगैरे असतात. ते त्यांना गंधफूलअक्षता हळदकुंकू वगैरे वाहून पूजा करतात, त्यांना निरांजनाने आणि उदबत्तीने ओवाळतात, नैवेद्य दाखवतात, अशा प्रकारचे काही उपचार करतात. अधूनमधून एकाद्या देवळात जातात, कधीकधी पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर यासारख्या तीर्थक्षेत्रांना जाऊन पाया पडून येतात. ही सगळी भक्तीमार्गावरली सुरुवातीची पाउले आहेत.  संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता जमेल तेवढा भक्ती भाव दाखवलेला असतो.

संत ज्ञानदेव, रामदास वगैरेंनी संसार केलाच नाही, तर संत नामदेव, तुकाराम यांच्यासारख्या भक्तांनी निरासक्त भावनेने संसार केला, पण ते त्यात रमले नाहीत. त्यांचे चित्त सतत विठ्ठलाला वाहिलेले होते. संत एकनाथ महाराजांनी एका अभंगात सांगितले आहे, 

आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||

नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्षुमीचा जाणतसे || २ ||

सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ ||


तर संत नामदेव म्हणतात,

देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥

चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥

वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥

नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४॥


संत तुकारामांनी देवालाच असे दान मागितले आहे,

हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ति आणि संपदा ।संतसंग देई सदा ॥३॥

तुका ह्मणे गर्भवासी ।सुखें घालावें आह्मांसी ॥४॥

त्यांना तर या जन्मात धनसंपत्ती नको आहेच, पण मोक्षमुक्तीसुद्धा नको आहे.

ही संतमंडळी  समर्पण या भक्तीमार्गाच्या शिखरावर जाऊन पोचली होती.


भाग -५  समारोप

या तीन योगांशिवाय राजयोग नावाचा आणखी एक प्रकार आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा पायऱ्यांमधून साधना केली जाते. भारतीय आणि हिंदू तत्वज्ञानामधील चार्वाक सोडून इतर सहा दर्शनांमध्ये मोक्षप्राप्ती हेच मानवाचे अंतिम ध्येय ठरवले आहे, किंबहुना त्यासाठीच मनुष्यजन्म मिळतो असे सांगितले आहे आणि त्यासाठी ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग वगैरे मार्ग सांगितले आहेत. या मार्गांच्या उपयोगाविषयी सगळ्या विद्वान आचार्यांमध्ये एकमत नाही.  व्यक्ती तितक्या प्रकृति असल्यामुळे सरसरकट सगळ्या लोकांना सगळे मार्ग शक्य, योग्य किंवा पुरेसे आहेत असे त्यांना वाटत नाही. मग सामान्य माणसाची काय कथा? जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले आहे तर नंतर आलेल्या मध्वाचार्य, रामानुजाचार्य आदींनी भक्तीमार्ग आवश्यक आहे असे सांगितले. सर्व संतांनी भक्तीमार्गच सांगितला आणि त्याचा प्रचंड प्रसार झाला.  

ज्ञानयोग हा ज्ञानाचा मार्ग आहे. सत् आणि असत् यांचा विवेक आणि शास्त्रविचार ही याची प्रमुख अंगे आहेत. अध्यात्मामधील 'ज्ञान' या शब्दाला तत्त्वज्ञानीय अर्थ अभिप्रेत आहे. त्याची सुरुवात बुद्धीवादापासून होते आणि शेवट साक्षात्कारात होतो. ज्ञानयोगात तीन प्रगतीपर साधना असतात: श्रवण (ऐकणे), मनन (विचार/चिंतन करणे) आणि निध्यासन (सदैव सखोल ध्यान करणे). उपनिषदांतील चार महावाक्ये या चिंतनाचा विषय आहेत: ‘प्रज्ञानं ब्रह्म,’ ‘तत्त्वमसि,’ ‘अयमात्मा ब्रह्म’ आणि ‘अहम् ब्रह्मास्मि.’ ‘विवेकबुद्धीने सत् आणि असत् यांच्यामधील फरक जाणून घेणे आणि शेवटी स्वत:चे आणि परब्रह्माचे रूप एकच आहे, याचे ज्ञान होणे' हेच ज्ञानयोगाचे ध्येय आहे. सर्वसामान्य कुवतीच्या संसारी माणसाला हे शक्य नाहीच. त्यासाठी आधी निरीच्छ होऊन सर्व संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारणे अवश्य आहे असे मला वाटते. 

त्या मानाने कर्मयोग हा कार्य करण्याचा मार्ग थोडा तरी समजण्यासारखा आहे. आपण काय करू नये यापासून त्याची सुरुवात होते. त्यानंतर आपण स्वार्थी इच्छांपासून प्रेरित झालेल्या कार्याचा त्याग करावा. त्यानंतर जागृत मनोवृत्तीने आपल्या जीवनातले कर्तव्य करण्याची इच्छा होते. त्यानंतर कदाचित ज्ञानमार्गाकडे जाता येईल.

भक्तियोग हा परमेश्वराच्या भक्तीचा आणि परमेश्वरावर प्रेम करण्याचा मार्ग आहे.  देवाबद्दल कथा श्रवण करणे, भक्तिगीतांचे गायन करणे, तीर्थयात्रा करणे, मंत्रजप करणे आणि देवळांत आणि स्वगृही देवपूजा करणे या कृती या मार्गाची साधने आहेत. सरतेशेवटी परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे आहे.  कुठलीही पूजा विधि केल्यानंतर अखेरीस "तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु।" असे म्हणून त्या सत्कर्माचे फळसुद्धा परमेश्वराला देऊन टाकले जाते. हा निष्काम कर्मयोगाचा प्रकार आहे. भगवद्गीतेमध्ये सत्व,रज,तम वगैरे गुण आणि प्रवृत्ती, वर्ण, आश्रम वगैरे सांगून त्यानुसार आपापला धर्म ओळखून तसे वागावे वगैरे सांगून झाल्यानंतर शेवटी अठराव्या अध्यायात "सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम् शरणम् भज। अहं त्वाम् सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥" असे सांगून भगवंताने सांगता केली आहे. परमेश्वराला शरण गेल्यानंतर तो माणसाला त्याला सर्व पापांमधून मुक्त करतो असे आश्वासन दिले आहे. गंमत म्हणजे बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि इस्लाम या सगळ्या धर्मांमध्ये अशाच प्रकारची वचने आहेत.

हा लेख लिहिण्यासाठी मी गूगलवर थोडीशी शोधाशोध करून काही माहिती मिळवून ती इथे दिली आहे. ती मला पूर्णपणे समजली किंवा पटली आहे असे माझे म्हणणे नाही.

(समाप्त)


Monday, March 06, 2023

तत्वज्ञानाची ओळख


मी आयुष्यभर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्यामुळे ते माझे आवडते विषय आहेत. विज्ञानावर मी लिहिलेले काही लेख या ब्लॉगवर एकत्र केले आहेत. ज्ञान, विज्ञान, सायन्स आणि नॉलेज https://anandghan.blogspot.com/2021/05/blog-post.html.

अलीकडच्या काळात मी अध्यात्म या विषयाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल इथे लिहिले आहे.  अध्यात्माची ओळख https://anandghan.blogspot.com/2022/11/blog-post_27.html 

यासाठी वाचन करत असतांना  माझ्या असे लक्षात आले की ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान वगैरे शब्दांचे जे अर्थ मी इतके दिवस समजत होतो  त्यापेक्षा त्या शब्दांचे मुळातले संस्कृत भाषेत अभिप्रेत असलेले अर्थ काहीसे वेगळे असतात. कदाचित सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, पण मराठी भाषेतला पहिला शब्दकोष जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कँडी या दोन इंग्रजांनी दीर्घकाळ प्रचंड मेहनत घेऊन तयार केला. श्री.दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण तयार केले, इंग्रजीमधली काही विरामचिन्हे मराठीत आणली  आणि मराठीच्या नव्या प्रमाणभाषेची सुरुवात झाली. पूर्वी सगळे संत आणि पंत कवी आपल्या रचना पद्यामध्ये करत असत. गद्यलेखन त्या मानाने अलीकडच्या काळात सुरू झाले. बहुधा त्याच सुमाराला मुद्रणकला भारतात आली, छापखाने निघाले आणि पुस्तके छापली जाऊ लागली.  त्याच काळात इंग्रजीमधील  Knowledge, Science, Ignorance आणि Philosophy या शब्दांना ज्ञान, विज्ञान, अज्ञान आणि तत्वज्ञान हे मराठी प्रतिशब्द दिले गेले. बहुतेक मराठी लेखकांनी इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला होता आणि त्यांच्या लेखनावर इंग्रजी पुस्तकांमधील विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे या शब्दांचे इंग्रजी भाषेतले मूळ अर्थ या मराठी शब्दांना येऊन चिकटले आणि रूढ झाले. निदान मी तरी, आतापर्यंत हे मराठी शब्द त्या इंग्रजी अर्थांनी वापरत आलो आहे.

पण गीता, भागवत यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये हे संस्कृत शब्द वेगळ्या अर्थांनी योजले असावेत असे वाटते. कुठल्याही विषयाचे नॉलेज म्हणजे त्याचे ज्ञान असे आपल्याला वाटते. आपण अनेक विषयांची माहिती शाळाकॉलेजात किंवा घरातल्या मोठ्या लोकांकडून शिकतो, पुस्तके वाचून किंवा आजकाल इंटरनेटवरून माहिती मिळते, त्यातले जेवढे समजते, लक्षात राहते त्याला आपण ज्ञान समजतो. असे जे ज्ञान आपल्या आजूबाजूच्या खूप लोकांना असते त्याला आपण सामान्यज्ञान म्हणतो. ज्या लोकांकडे निरनिराळ्या विषयातल्या माहितीचे भांडार असते त्यांना नॉलेजेबल समजले जाते, पण ज्ञानी आणि नॉलेजेबलमध्ये फरक आहे. ज्ञानी हा शब्द बहुतेक वेळा साधू, संत, स्वामी अशा साक्षात्कार झालेल्या लोकांसाठी वापरला जातो. 

अर्जुन एका प्रख्यात राजघराण्यात जन्मला होता, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर यासारख्या मोठ्या विद्वान गुरूंकडे धनुर्विद्या, नीतीशास्त्र वगैरे शिकला होता, तरीही गीतोपदेश मिळेपर्यंत तो अज्ञानातच राहिला होता. भगवंताकडून त्याला ज्ञान मिळाले. हे पाहता ज्ञान या शब्दाचा आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान वगैरे असा वेगळा अर्थ लक्षात येतो. हे ज्ञान सरसकट सर्व लोकांना कुणाक़डून शिकून किंवा पुस्तके वाचून समजेल असे नाही. पुराणकाळातले ऋषीमुनी एकटेच अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या करत असत आणि त्यांना ज्ञान प्राप्त होत असे, काही लोकांनी पूर्वजन्मी तपश्चर्या करून प्राप्त केलेले ज्ञान  त्यांना  जन्मतःच मिळते असे म्हणतात, तर काही लोकांना योग्य गुरु भेटला तर तो ज्ञानाचा मार्ग दाखवतो. पुराणातल्या कथांमधले ऋषीमुनी ध्यान धरून बसले की त्यांना कुणीही न सांगता अनेक गोष्टी अंतर्ज्ञानाने समजत असत. त्रिकालज्ञानी मुनींना तर भूतकाळात घडून गेलेल्या, वर्तमानकाळात कुठेही घडत असलेल्या आणि भविष्यकाळात कुठे तरी घडणार असलेल्या गोष्टी, इतकेच नव्हे तर कुणाच्या अनेक पूर्वजन्मांमधले तर कुणाच्या भविष्यातल्या जन्मातले प्रसंगसुद्धा आपोआप समजत असत असे म्हणतात. अशा अविश्वसनीय गोष्टी मी शिकलेल्या विज्ञानामध्ये म्हणजे सायन्समध्ये  बसत नाहीत, पण संस्कृतमधल्या ज्ञानविज्ञानात कदाचित ते ही शक्य असावे असे वाटते.

तत्वज्ञान असा शब्द प्राचीन काळातील संस्कृत भाषेत प्रचलित होता की नाही हे मला माहीत नाही. मी जे काही थोडे संस्कृत श्लोक वगैरे वाचले आहेत त्यात मला तत्वज्ञान हा शब्द दिसला नाही. कदाचित तो मराठीतच प्रचलित झाला असेल. हिंदी भाषेत फिलॉसॉफीला दर्शन असे म्हणतात. तत्व या शब्दातला त्व हा प्रत्यय महत्व, अस्तित्व वगैरे सारखा धरला तर तत्व याचा अर्थ तत् चे असणे असा होतो. तत् म्हणजे ते. मी आणि तू सोडून ती, तो वगैरे इतर सगळे जे काही या जगात किंवा कल्पनेतही असेल ते सगळे यात आले. इंग्लिशमधल्या  principle या अर्थानेही ‌तत्व हा शब्द मराठीत वापरला जातो. हे सगळे काय आहे, कशासाठी आहे वगैरेचे ज्ञान, तत्वांचे किंवा पदार्थांचे यथार्थ स्वरूप किंवा त्याचे सार म्हणजे तत्वज्ञान. या अर्थाने तत्वज्ञान हा शब्द फिलॉसॉफीच्या जवळ येतो. पण सर्व अर्थांनी समान वाटत नाही. वेद, उपनिषद, भगवद्गीता वगैरेंमध्ये असे सांगितले आहे की या विश्वात जे काही आहे ते सगळे परब्रह्म आहे. त्यामुळे  तत्वज्ञान म्हणजेच 'त्या'चे ज्ञान याचा अर्थ ब्रह्मज्ञान असाच अर्थ शास्त्रीपंडितांकडून घेतला जातो. हिंदू तत्वज्ञान अशा प्रकारे हिंदू धर्माशी जोडले गेले आहे.

फिलॉसॉफी हा शब्द फिलिओ (प्रेम) आणि सोफिया (ज्ञान) या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. ज्ञानाचे प्रेम असा त्याचा साधारणपणे अर्थ निघतो.  सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल वगैरे ग्रीक विचारवंत त्यांच्या काळातले अत्यंत बुद्धिमान तसेच ज्ञानी विद्वान होते. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर मांडलेले सिद्धांत, विचार, मते वगैरे गोष्टी फिलॉसॉफीमध्ये गणल्या जाऊ लागल्या आणि आजही फिलॉसॉफी या विषयात त्या शिकवल्या जातात.  हे लोक येशू ख्रिस्ताच्याही आधीच्या काळात होऊन गेले होते. नंतरच्या दोन हजारवर्षांमध्ये तर युरोपात कित्येक महान फिलॉसॉफर्स होऊन गेले. माणसाला ज्ञान संपादन करण्याची निरनिराळी साधने मिळालेली आहेत. आपली पाच ज्ञानेंद्रिये मुख्य आहेत. आजूबाजूला दिसत असलेल्या गोष्टी किंवा घडत असलेल्या घटना पाहून त्यावरून बोध घेतला जातो हा पहिला राजमार्ग, पण कधीकधी दिसते तसे नसते, दिसलेले दृष्य एकादे प्रतिबिंब, मृगजळ किंवा भास असू शकते, यामुळे ते पू्र्णपणे विश्वासार्ह नसते, कानाने ऐकलेलेही खोटे असू शकते, त्यामुळे चुका होऊ शकतात. म्हणून आपल्या बुद्धीचा उपयोग करून काय बरोबर आहे हे तर्काने ठरवणे हा एक श्रेयस्कर मार्ग आहे असा दुसरा विचार आहे. शिवाय माणसाच्या मनात काय चालते, माणसे कशी वागतात, सत्य आणि असत्य, नीती आणि अनीती, न्याय आणि अन्याय अशा अनेक प्रकारच्या गोष्टी फिलॉसॉफीमध्ये येतात. मी कोण आहे आणि हे जग म्हणजे काय आहे, माझ्या आणि या जगाच्या अस्तित्वाचे काय कारण आहे असे प्रश्न सामान्य लोकांना पडत नसतील, पण तत्वज्ञांना ते रात्रंदिवस छळत असतील आणि आपापल्या मतीने ते लोक या प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधत राहिले होते. 

या प्रकारच्या तत्वज्ञानात आत्मा, परमात्मा वगैरे आणण्याची तितकीशी गरज नसते.  पण हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन वगैरे सगळ्याच मुख्य धर्मांमध्ये या प्रश्नावर विचार करणारे धर्मगुरू होऊन गेल्यामुळे या धर्मांमध्ये त्यांच्या तत्वज्ञानाला महत्वाचे स्थान आहे. पण ख्रिश्चन धर्माशी  संबंधित असलेले किंवा नसलेले अशा युरोपमधील प्राचीन काळातील सगळ्याच मान्यवर विद्वानांनी सांगितलेले सगळे विचार, मते, तर्क, सिद्धांत, नियम वगैरे ज्ञान फिलॉसॉफीमध्ये येत गेले. नंतरच्या काळात त्यामधील नॅचरल फिलॉसॉफीला सायन्स असे वेगळे नाव  दिले गेले.  

भारतामधले तत्वज्ञान युरोपपेक्षाही काही हजार वर्षांनी पुरातन आहे. त्याची सुरुवात वेद आणि उपनिषदांपासून होते. अहम् ब्रह्मास्मि, तत्वमसि अशासारख्या सूत्रांमध्ये गहन अर्थ भरलेला आहे. पौराणिक काळातील ऋषीमुनी आणि इतिहासकाळातील आचार्यांनी  त्यांचे सखोल विश्लेषण करून त्यात भर घातली आहे. यामध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा दोन मुख्य विचारसरणी आहेत. आस्तिक विचारसरणींमध्ये  वेदांत, सांख्य, योग, न्याय, मीमांसा, वैशेषिक अशी सहा दर्शने आहेत. त्यातून पुढे द्वैत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत वगैरे प्रवाह किंवा उपप्रवाह आले आहेत. प्राचीन काळामधले विद्वान किंवा आचार्य या मतांवरून शास्त्रार्थांचा वादविवाद करत असत. वादे वादे जायते तत्वबोधः असे सुभाषित आहे. देवीच्या आरतीमध्ये "साही विवाद करता पडिले प्रवाही" या ओळीत सहा दर्शनांचा उल्लेख आहे. नास्तिक विचारसरणीमध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन ही प्रमुख तत्वज्ञाने येतात. या दोन्ही प्रकारच्या विचारसरणीमधील प्रत्येक दर्शनामध्ये अनेक तत्वे, तर्क, सिद्धांत आणि उदाहरणे दिली आहेत.  

या सगळ्यांचा विस्तार खूप मोठा आहे. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती.  तत्वज्ञान या विषयाची उत्सुकतेपोटी जेवढी ओळख झाली ती थोडक्यात दिली आहे.