Saturday, April 24, 2010

प्रोफेश्वर

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः हा श्लोक लहानपणी पाठ केला होता त्या वेळी तो दत्ताचा श्लोक असे सांगितले गेले होते. आमच्या गांवातल्या शाळेत जेवढे स्थानिक शिक्षक होते ते सारे आपापली शेतीवाडी, घरेदारे, उद्योग व्यवसाय वगैरे सांभाळून जमेल तेंव्हा शाळेत येत असत आणि बाहेरून नोकरीसाठी आलेले गुरूजी संधी मिळाली की त्यांच्या घराकडे पळ काढीत आणि सावकाशपणे परत येत असत. शाळेचा शिपाई दर तासाचा टोला मारायचा. पण लगेच आधीच्या तासाच्या शिक्षकाने बाहेर जायचे, पुढच्या तासाच्या शिक्षकाने वर्गात येऊन शिकवायचे वगैरेची फारशी पध्दत नव्हती. विद्यार्थीसुध्दा जेंव्हा घरात त्यांचे काही काम नसले आणि त्यांचा धुडगूस असह्य झाल्यामुळे घरातल्यांनी त्यांना बाहेर पिटाळले तर शाळेकडे फिरकायचे. त्यामुळे अधून मधून शिक्षक आणि विद्यार्थी जेंव्हा योगायोगाने एकत्र येत तेंव्हा ज्ञानदानाचे थोडे काम होत असे. अशा परिस्थितीत ब्रह्मा विष्णू महेश्वर वाटावेत असे गुरू कुठे भेटणार?

कॉलेजमध्ये येणा-या नव्या मुलांना छळायची थोडी रीत त्या काळातही असायची, पण ते प्रकार फार काळ टिकत नसत, लेक्चरर आणि प्रोफेसरांची टिंगल मात्र पूर्ण काळ चालत असे. त्यामुळे आपण पुढे जाऊन प्राध्यापक व्हावे असे स्वप्नातसुध्दा कधीही वाटले नाही. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात इतर चांगल्या संधी उपलब्ध असल्यामुळे सगळी मुले सहजपणे नोकरीला लागत असत. त्यातही ज्याला इच्छा असेल अशा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेल्या कोणीही येऊन कॉलेजात लेक्चररशिप मिळवावी अशी ओपन ऑफर असायची, तरीही त्या जागा रिकाम्या पडलेल्या असायच्या. मलासुध्दा ती जागा मिळवावी असे वाटले नव्हते आणि तशी आवश्यकताही पडली नाही.

जवळजवळ चार दशके तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून निवृत्त झाल्यानंतर आरामात दिवस घालवत आलो आहे. तशी आणखी चार वर्षे होऊन गेल्यावर अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला. सध्या एकमेकांचे कसे आणि काय चालले आहे याची विचारपूस झाल्यानंतर "तू फावल्या वेळात एक काम करशील का" असे त्याने मला विचारले. कुठल्याशा विद्यापीठात स्नातकोत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना व्याख्याने द्यायचे ते काम होते. मी तर आयुष्यात कधी हातात खडू धरून फळ्यावर लिहायचा विचारही मनात आणला नव्हता आणि एकदम एमटेकसाठी शिकवायचे! "कांहीतरीच काय सांगतो आहेस?" मी उद्गारलो. तो म्हणाला, "अरे आपण सेमिनारमध्ये पॉवर पॉइंटवर प्रेझेंटेशन करतो ना तसेच करायचे. तुला चांगले जमेल." त्याने जवळ जवळ गळच घातली. एक नवा अनुभव घ्यायचा म्हणून मी त्याला होकार दिला.

पण हे काम त्याने सांगितले तेवढे सोपे नव्हते. पुन्हा एकदा एकेका विषयासंबंधी अनेक प्रकारची माहिती गोळा करायची आणि तिची जुळवाजुळव करून मांडणी करायची हे थोडे किचकटच होते. त्यात आता ऑफीसचा आधार नव्हता, पण इंटरनेटमधून हवी तेवढी माहिती उपलब्ध होत होती. महिना दीड महिना प्रयत्न करून तयारी तर केली. मागच्या महिन्यात व्याख्याने देण्याचे वेळापत्रक ठरले आणि अस्मादिक गांधीनगरला जाऊन दाखल झाले. ठरलेल्या वेळी माझी ओळख करून देण्यात आली, "हे आहेत प्रोफेसर घारे."

Thursday, April 08, 2010

पंपपुराण - भाग - १५

रॉकेलच्या डब्यातून ते बाटलीत काढण्यासाठी आणि प्रायमस स्टोव्हच्या टाकीत किंवा सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी हाताने चालवण्यात येणारे साधे पंप मी अगदी लहान असतांना पाहिले होते. त्यानंतर शेतातल्या आणि अंगणातल्या विहिरीतले पाणी उपसणारे पंप पहायला मिळाले. आपल्या शरीरातले रक्ताभिसरण करणारे हृदय हे सुध्दा पंपाचे काम करते असे शाळेत असतांना शिकलो. शरीराच्या सर्व भागातले अशुध्द रक्त ते फुप्फुसाकडे पाठवते आणि फुफ्फुसाकडून आलेले शुध्द रक्त शरीराच्या सर्व भागात पाठवून देते. शरीरातले आपले रक्त सारखे असे अशुध्द कां होत असते आणि त्या रक्ताला शरीरातल्या इतर भागातून हृदयाकडे येण्यासाठी आणि सगळीकडे परत जाण्यासाठी नीला आणि रोहिणी अशा नांवांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या का असतात हे कांही तेंव्हा समजले नव्हते. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर निरनिराळ्या पंपांची रचना आणि त्यांचे कार्य कसे चालते याचे शिक्षण मिळाले, त्यांचे डिझाइन केले, कांही प्रात्यक्षिके करायला मिळाली.

वीज निर्मितीच्या क्षेत्रात काम करू लागल्यानंतर तर पदोपदी पंपाची गाठ पडत राहिली. कारखान्याच्या इमारतीचा पाया खणतांनाच तिथे जमा होणारे भूगर्भातील पाणी डिवॉटरिंग पंपाने सारखे उपसावे लागते. बांधकाम करण्यासाठी सिमेंट, खडी आणि वाळू यांना मिसळून कॉंक्रीट तयार करणा-या मिक्सरमध्ये पंपाने पाणी सोडले जाते. तयार झालेली कॉंक्रीट स्लरी हल्ली पंपाद्वारेच बांधकामाच्या जागी पुरवली जाते. वीजनिर्मितीकेंद्रातले वाफेवर चालणारे टर्बाइन विजेची प्रत्यक्ष निर्मिती करते. ती वाफ तयार करण्यासाठी खास पंपाने बॉयलरमध्ये पाणी सोडले जाते, त्याचप्रमाणे टर्बाईनमधून निघालेल्या वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर करण्यासाठी कंडेन्सरला पाण्याचा पुरवठा करण्याचे कामही महाकाय पंपांकडून होते. त्याखेरीज वीजकेंद्रातील पाण्याचे शुध्दीकरण करणे, कॉंप्रेसरसारख्या अनेक यंत्रांना थंड करणे, निरनिराळ्या संयंत्रांमध्ये जमा झालेला कचरा धुवून वाहून नेणे अशा अनंत कारणांसाठी वेगवेगळ्या दाबाने वेगवेगळ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्याच्या कामांसाठी पंपांचा वापर केला जातो. फक्त पाण्यासाठीच नव्हे तर वंगणाची तेले आणि प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली रसायने वगैरेंचा पुरवठाही विशिष्ट प्रकारच्या पंपांद्वारे केला जातो.

वीजकेंद्रात कोठलीही घटना किंवा दुर्घटना झाली तर त्याचे विश्लेषण करतांना तसेच त्यातून मार्ग काढण्याकरता जी सविस्तर चर्चा केली जाते त्यात कुठल्या तरी पंपाचा उल्लेख येतोच. केंद्रात कुठे आग लागून ते बंद ठेवले तरी ती आग विझवण्यासाठी पंपानेच पाण्याचा फवारा केला जातो आणि तो पंप डिझेल इंजिनवर चालवतांना त्यातल्या सिलिंडरमध्ये डिझेल टाकण्यासाठी फ्यूएल इंजेक्शन पंप लागतो तसेच ते इंजिन थंड करण्यासाठी त्याच्या जॅकेटमध्ये पंपाने पाणी फिरवले जाते. पंप हा शब्द या ना त्या संदर्भात रोज कानावर पडत असायचा.

या केंद्रांमधील तसेच एकंदरीतच यंत्रउद्योगात उपयोगात येणारे बहुतेक पंप सेंट्रिफ्यूगल प्रकारचे असतात. या प्रकारच्या पंपांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची कांही वैशिष्ट्ये गेल्या कांही भागात सांगितली. याखेरीज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप या नांवाची पंपांची वेगळी शाखा आहे. लहानपणी घरात पाहिलेले तीनही पंप या प्रकारचे होते. त्यातसुध्दा खूप वैविध्य असते. सध्या कांही कारणामुळे त्यांच्याबद्दल लिहायला मला सवड मिळणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे पंपपुराणाचा हा खंड इथेच संपवत आहे. पुढचा खंड पुन्हा कधी तरी.

Monday, April 05, 2010

पंपपुराण - भाग - १४


मागील भागात लिहिल्याप्रमाणे आपल्या ओळखीचे बहुतेक पंप आकाराने लहान असतात आणि त्यांचा शाफ्ट आडव्या रेषेत असतो. अशा आडव्या पंपांसाठी जमीनीवर पुरेशी जागा लागत असली तरी कमी उंची लागते. मुद्दाम त्यासाठी खोलीची उंची वाढवावी लागत नाही. असे पंप बसवायला आणि निगा राखण्यासाठी सुलभ असतात. त्यांचा पाया भक्कम असतो. फक्त पंप किंवा मोटर बिघडली तर दुरुस्तीसाठी वेगळे काढता येतात. असे अनेक फायदे असल्यामुळे बहुतेक सर्व पंप आडवेच असतात.

पण कांही अपवादास्पद परिस्थितीत उभ्या आकाराचे पंप बसवले जातात. जेंव्हा पंपाचा आकार खूप मोठा असतो, अशा परिस्थितीत पंप आणि मोटर मिळून जमीनीवर खूप मोठी जागा व्यापली जाते. त्या ऐवजी उभ्या रेषेत बसवल्यास कमी जागा पुरते. ज्या पंपांमध्ये पंपापेक्षा मोटर, सील्स, कपलिंग वगैरेंना खूप अधिक जागा लागते त्यासाठी हे आवश्यक ठरते. अशा पंपांमधील इंपेलर शाफ्टच्या तळाशी असतो आणि इतर भाग एकावर एक उभ्या रेषेत बसवले जातात. ही गोष्ट वरील चित्रांवरून स्पष्ट होते. जेंव्हा खूप मोठ्या प्रमाणावर पाणी हवे असते अशा कामांसाठी लागणा-या पंपांचा इंपेलर पाण्यात बुडवून ठेवला जातो. त्यासाठी सक्शन पाइप, फूट व्हॉल्व्ह वगैरेंची गरजच नसते. शिवाय त्या सर्वांमधून पाण्याचा प्रवाह वहात असतांना पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे एरवी निर्वात पोकळी तयार होते आणि त्याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी पंपाचे प्रायमिंग करावे लागते. हा सगळा खटाटोपही वाचतो.

पंपाचा तळाचा भाग पाण्याच्या टाकीत किंवा तलावात बुडवलेला असतो आणि एका विजेची मोटर पाण्याच्या पातळीच्या वर सुरक्षित जागी बसवली जाते. एका उंचच उंच शाफ्टच्या सहाय्याने त्यांना जोडतात. इंपेलर आणि केसिंग यासारख्या भरभक्कम भागांना दुरुस्तीची विशेष गरज पडत नाही, पण बेअरिंग्ज, सील्स वगैरे बदलण्यासाठी सर्वात वरती असलेल्या मोटरपासून एक एक भाग उचलून बाजूला ठेवावे लागतात आणि ते पुन्हा नीटपणे जोडावे लागतात. त्या दृष्टीने त्यांची रचना केलेली असते.

सिंगल स्टेज किंवा मल्टिस्टेज या दोन्ही प्रकारचे पंप उभे असतात. मल्टिस्टेज पंपांच्या शाफ्टची लांबी फार जास्त होत असल्यामुळेसुध्दा तो उभा करणे अधिक सोयीस्कर ठरते.

. . . . . . . . . (क्रमशः)

पंपपुराण - भाग - १३


शेतातील किंवा अंगणातील विहिरीतून पाणी उपसणे किंवा सोसायटीच्या बिल्डिंगच्या ओव्हरहेड टँकमध्ये पाणी चढवणे यासाठी जे पंप वापरले जातात ते सामान्यपणे आपल्याला दिसतात. आतापर्यंतच्या भागात बव्हंशी अशाच लहान सेंट्रिफ्यूगल पंपांची माहिती दिली होती. या पंपांमध्ये एका केसिंगमध्ये एक इंपेलर असतो आणि त्याचा शाफ्ट आडव्या रेषेत असतो. एका पेडेस्टलवर पंप आणि विजेची मोटर बाजूबाजूला बसवलेले असतात आणि कपलिंगने एकमेकांना जोडून तो चालवण्याची व्यवस्था केली जाते. इंपेलरचा व्यास आणि रुंदी वाढवून, तसेच तो अधिक वेगाने फिरवून पंपातून वाहणारा पाण्याचा प्रवाह व दाब वाढवला जातो. अॅक्शियल फ्लो या प्रकारचा इंपेलर वापरूनही पाण्याचा प्रवाह वाढवला जातो. पण या सर्व मार्गांना मर्यादा असतात.

वीजकेंद्रासारख्या मोठ्या कारखान्यांमध्ये खूपच जास्त दाबाने पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण करावा लागतो. पाण्याचे रूपांतर वाफेत करण्यासाठी प्रचंड आकाराच्या बॉयलरची योजना केलेली असते. त्यात असलेल्या वाफेचा दाब प्रचंड असतो. त्यात प्रवेश करण्यासाठी पाण्याचा दाब त्याहून अधिक असावा लागतो. पाण्याचा दाब पुरेसा वाढवण्यासाठी खास प्रकारचे पंप असतात. एका पंपातून निघालेले पाणी दुस-या दुस-या पंपाला पुरवले तर त्या पंपाने त्या पाण्याचा दाब अधिक वाढेल. जर प्रत्येक पंपात पाण्याचा दाब दुप्पट होत असेल तर दोन, तीन, चार पंपांमधून तो चार. आठ, सोळा पट होईल. या तत्वाचाच उपयोग करून पण वेगवेगळे पंप न वापरता पाण्याचा दाब वाढवला जातो.

मल्टीस्टेज नांवाच्या या पंपांमध्ये अनेक इंपेलर एकाच शाफ्टवर ओळीने बसवलेले असतात. पहिल्या स्टेजमधून निघालेले जास्त दाबाचे पाणी दुस-या स्टेजच्या इंपेलरच्या केंद्रभागी पुरवले जाते, त्याचप्रमाणे तिस-या, चौथ्या, पांचव्या अशा अनेक स्टेजमधून जाता डाता त्या पाण्याचा दाब अनेक पटीने वाढत जातो.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Friday, April 02, 2010

पंपपुराण - भाग - १२


प्रेशर कूकरमधून वाफ बाहेर निघू नये यासाठी तो हवाबंद ठेवावाच लागतो, पण त्यात भांडी ठेवण्याची आणि ती बाहेर काढण्याची व्यवस्थाही करायची असते. त्यासाठी कुकरचे पात्र आणि झाकण असे वेगवेगळे भाग बनवून पाहिजे तेंव्हा त्यांना सुलभपणे जोडण्याची किंवा विलग करण्याची सोय केली जाते. पंपाच्या इंपेलरला त्याच्या केसिंगमध्ये ठेवण्यासाठी केसिंग दोन भागात केले जाते. इंपेलरशी जुळणी करतांना ते एकमेकांना जोडले जातात. त्यांचा जोड उघडण्याची गरज प्रेशर कूकर प्रमाणे रोज पडत नाही, पण रखरखाव आणि दुरुस्तीसाठी कधीतरी ती पडण्याची शक्यता असल्यामुळे ते वेल्डिंग करून कायमचे जोडत नाहीत.

पंपांच्या केसिंग्जना दोन प्रकाराने छेद दिले जातात. अॅक्शियल स्प्लिट या प्रकारात शाफ्टच्या मध्यरेषेच्या पातळीत केसिंगचे दोन भाग करतात. या प्रकारच्या पंपांचा वरील भाग उचलून बाजूला ठेवता येतो. त्यानंतर इंपेलर व इतर भागांचे निरीक्षण करणे सोपे जाते. हे काम करतांना पंपाच्या शाप्टला जो़डलेल्या बेअरिंग्जना धक्का लागत नाही.

रेडियल स्प्लिट या प्रकारात केसिंगला शाफ्टला काटकोनात उभा छेद देतात. अशा प्रकारच्या पंपांचे व्हॉल्यूट चेंबर अखंड असल्यामुळे ते मजबूत असते. या प्रकारात शाफ्टच्या एका बाजूच्या टोकाला पाणी आत शिरण्याचा मार्ग असतो. त्या भागात बेअरिंग्ज नसतातच. दोन्ही बेअरिंग्ज मोटारच्या बाजूलाच असतात.

या दोन्ही प्रकारांचे मिश्रण करून दुहेरी केसिंग बनवतात. या प्रकारात एक लांबुळके बॅरल शाफ्टच्या दिशेने बसवतात आणि त्यावर स्प्लिट केसिंगचा वरील भाग ठेवतात.

गुरुशिष्यसंवाद (उत्तरार्ध) -२

गुरू : रोजच्या आहारातल्या कांही गोष्टी आपली आवडनिवड आणि सोय पाहून मानव ठरवतो आणि कांही परमेश्वर किंवा निसर्गाने ठरवून ठेवलेल्या असतात हे आपण पाहिले. आता त्यांचे स्वरूप पाहू. तू कधीकधी घराबाहेर काही तरी खात असशीलच.
शिष्य : हो. रुचीपालटासाठी आम्ही उपाहारगृहांना भेट देत असतो.
गुरू : तिथे कांही वेगळे पदार्थ खात असाल.
शिष्य : अर्थातच.
गुरू : तू कधी परगावी जात असशीलच.
शिष्य : आमच्या शिबीरांना उपस्थित राहण्यासाठी परप्रांतातसुध्दा जात असतो.
गुरू : त्या स्थानी तुला कुठल्या प्रकारचे अन्न मिळते?
शिष्य : तिथल्या स्थानिक पध्दतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आमच्या जेवणात असतात.
गुरू : तुझ्या लहानपणी खाल्लेले कांही विशेष पदार्थ तुला आठवत असतील.
शिष्य : हो. आजोळी गेल्यावर आमची आजी खास कोकणातले कांही छान पदार्थ करून खायला घालत असे. आता ते मिळणे दुर्मिळ झाले आहे.
गुरू : तेंव्हा प्रचारात नसलेले कांही नवीन पदार्थ तू आता पाहिले असशील.
शिष्य : ते तर उदंड झाले आहेत. इंग्रज लोक फक्त पावबिस्किटे मागे सोडून गेले होते, आता पिझ्झा, बर्गर, पाश्ता, मॅकरोनी .... असल्या पदार्थांनी नुसता उच्छाद मांडला आहे. कांही विचारू नका. आपले कट्टर शत्रू म्हणजे जे चिनी, त्यांची नूडल्स आणि मांचूरियन सुध्दा लोक मिटक्या मारून खायला लागले आहेत. स्वाभिमान म्हणून कांही उरलेलाच नाही.....
गुरू : त्यांचा देशद्रोह थोडा वेळ बाजूला ठेवू. जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातात असेच दिसते नाही का?
शिष्य : हो.
गुरू : देश तसा वेष अशी म्हणसुध्दा आहे, शिवाय लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. या सगळ्या गोष्टी माणसांनी केलेल्या असल्यामुळे स्थान आणि काल यांच्याबरोबर त्या बदलत असतात. माणसांनी केलेले नियम, कायदे वगैरे गोष्टी समान आणि शाश्वत नसतात. त्या वेगवेगळ्या असतात आणि त्यात वरचेवर बदल होत राहतात. पण जगभरातली सारी जनावरे मात्र पूर्वीपासून चारा खात आली आहेत आणि भविष्यकाळातही गवताच्या कुरणात चरणार आहेत. आहार हे एक उदाहरण झाले. प्रकाशकिरण, ध्वनी, गुरुत्वाकर्षण, रासायनिक क्रिया, झाडांची वाढ वगैरे सर्व नैसर्गिक क्रियांना ही गोष्ट लागू पडते. त्याबद्दल निसर्गाचे नियम सगळीकडे समान असतात आणि काळासोबत ते किंचितही बदलत नाहीत. सृष्टीचे सर्व नियम स्थलकालातीत असतात. या नियमांचा अभ्यास विज्ञानात केला जातो.
शिष्य : विज्ञानातले नियम जर इतके शाश्वत असतात तर आइन्स्टाईनने न्यूटनला खोटे कसे ठरवले?
गुरू : आपल्याला असे ढोबळ विधान करून चालणार नाही.
शिष्य : म्हणजे?
गुरू : मी तुला एक उदाहरण देतो. आज तुला एका माणसाने कोणाच्या तरी भावाची ओळख करून दिली, उद्या दुस-या कोणी तुला सांगितले की "हा त्याच्या काकाचा मुलगा आहे", परवा तिसरा म्हणाला की "हा त्याच्या थोरल्या काकाचा मुलगा आहे", "हा त्याच्या मोठ्या काकाचा धाकटा मुलगा आहे" अशी माहिती चौथ्या माणसाने तुला तेरवा दिली. अशा प्रकारे त्यांचे नातेसंबंध अधिकाधिक स्पष्ट होत गेले, याचा अर्थ पहिले तीघे खोटे बोलत होते असा होत नाही. विज्ञानाची प्रगती देखील अशीच टप्प्याटप्प्याने होत आली आहे. मी दिलेल्या उदाहरणात चारच टप्पे आहेत, तर विज्ञानाच्या इतिहासातील प्रत्येक विषयात ते असंख्य आहेत. तुझ्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर मिळण्यासाठी आधी न्यूटनने काय काय सांगितले होते आणि नंतर आइन्स्टाईनने त्यात कसली सुधारणा केली, याचा सखोल अभ्यास करायला हवा. आज आपण विज्ञानाची फक्त तोंडओळख करून घेत आहोत. आज मी तुला एवढेच सांगेन की न्यूटन आणि आइनस्टाईन यांचे सांगणे कदाचित थोडे वेगळे वाटले तरी निसर्गाचे नियम कांही बदललेले नाहीत. फक्त माणसाला त्यांचे झालेले आकलन वाढत गेले. यालाच विज्ञानातली प्रगती असे म्हणतात.
हे थोडेसे विषयांतर झाले. विज्ञानातील नियम आणि मानवीय नियम यात एक मोठा फरक आहे.
शिष्य : कोणता?
गुरू : माणसे कायदा करतात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करतात, तरीही अनेक लोक त्याचे उल्लंघन करतात. तसे करणे त्यांना शक्य असते. निसर्गाचे नियम मात्र कोणीही कधीही मोडू शकतच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर विस्तवाला हात लावला तर त्याचा चटका बसणार किंवा पाण्यात दगड टाकला तर तो बूडणार असेच जगाच्या पाठीवर कुठेही होते, होत गेले आणि होत जाणार आहे.
शिष्य : हे मात्र बरोबर नाही हां! अहो, होलिका ज्या आगीत जळून भस्म झाली त्या आगीतून भक्त प्रल्हाद सुखरूपपणे बाहेर आला आणि रामनामाच्या महिम्यामुळे समुद्राच्या पाण्यात दगड तरंगले अशी किती तरी उदाहरणे आपल्याकडे घडलेली आहेत.
गुरू : अशी तुझी श्रध्दा आहे.
शिष्य : आपल्या पुराणांत तसे लिहिलेलेच आहे, ते घडले होते म्हणून तर इतक्या विस्ताराने लिहिले गेले असेल ना?
गुरू : उडणारे गालिचे आणि दिव्यातला राक्षस यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथा अरबी भाषेत लिहिल्या गेल्या आहेत, म्हणून त्या सत्य घटना मानायच्या का?
शिष्य : पण पुराणे हे आपले धर्मग्रंथ आहेत. आपल्या पवित्र पुराणातल्या गोष्टींबद्दल तुम्ही शंका घेत असता, आणि त्या परक्या न्यूटन आणि आइन्स्टाईनवर तुम्ही का म्हणून विश्वास ठेवता?
गुरू : तुझे म्हणणे अगदी खरे आहे. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नये. अरे, हाच विज्ञानाचा अगदी प्राथमिक नियम आहे. केवळ अमक्या तमक्याने सांगितले म्हणून कोणतीही गोष्ट ग्राह्य मानता कामा नये असा वैज्ञानिक पध्दतीचा आग्रह असतो. त्या माणसाने जे कांही सांगितले आहे ते पुराव्यांच्या आणि तर्काच्या आधारावर तपासून घेऊन सिध्द झाल्यानंतरच त्याचा स्वीकार केला जातो. न्यूटन आणि आइन्स्टाईन यांनी जे जे कांही सांगितले ते त्यांच्या काळातदेखील लगेच कोणी मानले नव्हते. त्याची व्यवस्थितपणे छाननी करून झाल्यानंतर तत्कालीन विद्वानांना ते पटले आणि त्यांनी ते मानले.
शिष्य : म्हणून तुम्ही सुध्दा मानलेत. असेच ना? आम्ही सुध्दा आमच्या आचार्यांनी सांगितले म्हणून पोथ्यापुराणांवर विश्वास ठेवतो. मग आपल्या वागण्यात काय फरक आहे?
गुरू : खूप फरक आहे. या संशोधकांनी जे सिध्दांत सांगितले ते तर्काला धरून होते. प्रत्यक्ष अनुभवलेल्या विज्ञानाच्या नियमांचे खुलासेवार स्पष्टीकरण करणारे होते. त्यातल्या कोठल्याही नियमांचा भंग करणारे नव्हते. या सगळ्या गोष्टींवर अनेक वेळा झालेले विचारमंथन, त्याबद्दल निर्माण झालेल्या शंकांचे निरसन वगैरे पाहून झाल्यानंतर ते सिध्दांत मान्य करायला कांही हरकत नाही. पुराणातील ज्या चमत्कारांचे उल्लेख तू केलेस ते सृष्टीच्या नियमांच्या विरुध्द घडलेले वाटतात आणि ते कसे घडू शकले याचे काही स्पष्टीकरण मिळत नाही. विज्ञानाच्या अभ्यासात अशा गोष्टी कोणाच्याही सांगण्यावरून विश्वसनीय समजल्या जात नाहीत.
तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. न्यूटन, पास्कल वगैरे संशोधकांनी जे सिध्दांत मांडले त्यांच्या आधाराने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली तिचा जेवढा लाभ मला मिळाला आहे तेवढाच तुलाही झाला आहे. त्याचप्रमाणे भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा लाभ परकीयांनाही मिळाला, यामुळे ते त्यांचेसुध्दा आहेत. विज्ञानाच्या जगात हे आमचे हे तुमचे असा संकुचित विचार केला जात नाही.
शिष्य : पण मग भारतीय वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधांचे श्रेय युरोपियन लोकांना कां दिले जाते?
गुरू : एकादे उदाहरण सांग.
शिष्य : या न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी आपल्या लोकांना गुरुत्वाकर्षणाची माहिती होती.
गुरू : असे तुला वाटते. पण न्यूटनचा सिध्दांत तरी तुला माहीत आहे का?
शिष्य : हेच ना की झाडावरून सुटलेले फळ जमीनीवर पडते. आकाशात् पतितम् तोयम् यथा गच्छति सागरम् या श्लोकात काय वेगळे सांगितले आहे?
गुरू : अरे एवढी साधी गोष्ट शेंबड्या पोराने सुध्दा पाहिलेली असते. ते सांगायला न्यूटनची किंवा कोण्या महर्षीची गरज नाही. न्यूटनने यापेक्षा बरेच कांही जास्त सांगितले होते.
शिष्य : हो, त्या फळाला पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करते. ही गोष्टसुध्दा आपल्या आर्यभट्टांनी की भास्कराचार्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे.
गुरू : नक्की कोणी आणि काय लिहून ठेवले आहे हे तुला ठाऊक आहे का?
शिष्य : त्याची काय गरज आहे? जे कांही लिहिले आहे त्याचा अर्थ असा निघतो असे म्हणतात.
गुरू : त्यांनी काय लिहिले आहे हे तुला माहीत नाही, न्यूटनने कोणता सिध्दांत मांडला तेही माहीत नाही आणि तरीही तू सांगतोस की आपल्या पूर्वजांना तो माहीत होता.
शिष्य : तुम्ही सांगू शकता?
गुरू : हो. पृथ्वीने ओढून घेतल्यामुळे झाडावरचे फळ खाली पडत असावे असा तर्कशुध्द विचार न्यूटनच्या आधी अनेक लोकांनी व्यक्त केला असणार. त्याचा अर्थ त्यांना गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत माहीत होता असा होत नाही. झाडावरचे फळ आणि झाडामागे दडलेला चंद्र या दोघांनाही पृथ्वी आपल्याकडे खेचून घेत असते, पण त्यातले फळ जमीनीवर येऊन पडते आणि चंद्र मात्र आभाळात फिरत कां राहतो यातले गूढ शोधता शोधता तो गुरुत्वाकर्षणाच्या सिध्दांतापर्यंत कसा पोचला हे मी तुला सविस्तर सांगू शकेन. हा सिध्दांत त्याने नुसता शब्दात सांगितला नव्हतातर एका समीकरणाच्या रूपात मांडला. फक्त पृथ्वीच नव्हे तर विश्वातील एकूण एक वस्तू एकमेकांना स्वतःकडे आकर्षित असतात या तत्वावर तो आधारलेला आहे आणि लाकूड पाण्यावर तरंगते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि लंबकाची आवर्तने ठरावीक लयीमध्ये होत असतात अशा अनेक निरीक्षणांचे स्पष्टीकरण त्यातून मिळते. यातले अवाक्षरही माहीत नसणा-या लोकांनी आपले ढोल बडवण्यात कोणाचे हंसू होत आहे?
शिष्य : या सगळ्याची मला कल्पना नव्हती.
गुरू : आता आली आहे ना? लक्षात ठेव. विज्ञानावर कांहीही बोलण्यापूर्वी त्यावर स्वतः विचार कर आणि कोणतेही विधान भक्कम आधारानिशी करत जा.

......... (समाप्त)