Monday, December 01, 2008

चोखी ढाणी - भाग २


प्रवेशपत्र घेऊन आंत शिरल्यानंतर समोर एक लांबलचक पॅसेज होता. डोक्यावर चढवलेल्या पगडीपासून पायातल्या चढावापर्यंत नखशिखांत राजस्थानी पोषाख घातलेले सेवक त्याच्या दाराशी उभे होते. पुढे याच पोशाखातले अनेक सेवक आंत ठिकठिकाणी काम करत असतांना दिसले. आमच्या हातात धरलेल्या तिकीटांकडे त्यातल्या कोणी पाहिलेसुद्धा नाही. कदाचित आमचे सोज्ज्वळ चेहेरे पाहूनच आम्ही कुंपणावरून उडी मारून आंत येणा-यातले नाही अशी त्यांची खात्री पटली असावी। दोन तीन सेवकांनी "रामरामसा " म्हणत आम्हाला अदबीने लवून नमस्कार केला. कोणी आमच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. आपण कोणा राजस्थानी राजघराण्यातल्या लग्नाला बाराती म्हणून आलो आहोत असे क्षणभर वाटले. पॅसेजमध्ये दोन्ही बाजूंना सुरेख राजस्थानी शैलीमधली चित्रे रंगवलेली होती. वातावरणनिर्मिती एकंदरीत उत्तम होती.

पॅसेज पार करून गेल्यावर एका मोठ्या पटांगणात चोखी ढाणीची जत्रा भरली होती. पण तिथे समतल जागेवर एका सरळसोट रेषेत स्टॉल ठेवलेले नव्हते. उंचसखल अशा नैसर्गिक जमीनीवर मध्ये मध्ये वाढलेल्या झाडांना वळसे घालीत वळणावळणाने जाणारे तीन चार रस्ते बांधले होते आणि त्यांच्या कडेला अंतरा अंतराने कुठे गोल तर कुठे चौकोनी आकारांच्या छोट्या इमारती किंवा चबुतरे होते. एका जागी उभे राहून कुठे काय आहे ते कळत नव्हते. त्यासाठी निवांतपणे थोडे इकडे तिकडे फिरून पहावे लागत होते.
लहान मुलांना खेळण्यासाठी लहानमोठ्या घसरगुंड्या, पाळणे, सीसॉ, पाइपांचे मेझ वगैरेंचे अनेक आकार व प्रकार त्या जागी होते. झाडांवर चढणे सोपे केलेला खाचाखाचांनी भरलेला एक झाडाचा सरळसोट बुंधा उभा केला होता आणि फांद्यांचे तुकडे कलात्मक रीतीने जोडून एक छानशी शिडी बनवलेली होती। त्यांवर चढायला मुलांना गंमत वाटत होती. एका ठिकाणी सिमेंट कॉँक्रीटच्या लादीवर मोठमोठे चौकोन आंखून सापशिडीचा प्रचंड पट रेखाटला होता. हल्ली असा पट झी टीव्हीच्या मराठी सारेगमप या कार्यक्रमात पहायला मिळतो. त्यातील घरात मुलांनी स्वतःच उभे राहून पुढे मागे जायचे अशी कल्पना असावी. पण त्याला साजेसे थर्मोकोल किंवा प्लॅस्टिकचे मोठमोठे डाईस मात्र आम्हाला त्या वेळी तरी कुठे दिसले नाहीत.
मुलांनी स्वतः खेळण्याच्या नाना त-हा होत्याच. त्याशिवाय त्यांना वर खाली झुलवणारे पाळणे असलेले जायंट व्हील, लुटुपुटूच्या घोड्यावर स्वार होऊन गोल गोल फिरवणारे मेरी गो राउंड वगैरे खेळसुध्दा होते. उंटावर स्वार होऊन फिरण्यासाठी खरा उंट होता आणि त्याच्या पाठीवर चढून बसण्यासाठी पाय-यांचा कट्टा होता. ऑटोरिक्शांचा सुळसुळाट होण्यापूर्वी, म्हणजे चिमणराव गुंड्याभाऊंच्या काळात पुण्याच्या रस्त्यांवर राज्य करणारा एक घोडे जोडलेला टांगा सुद्धा होता. त्यात बसवून मुलांना एक चक्कर फिरवून आणीत असत. पूर्वी इथे हत्तीची सवारीसुद्धा होती असे कोणीतरी सांगितले. पुढे कदाचित हत्ती पोसणे परवडेनासे झाले असेल, किंवा वन्यप्राणीसंरक्षकांनी आक्षेप घेतला असेल यामुळे ते बंद केले असेल. गर्दीला बुजून जर तो हत्ती चुकून उधळला तर अनवस्था ओढवण्यातला धोका कोणाला जाणवला असेल. पहायला गेले तर राजस्थानमधल्या जनजीवनात हत्तीला महत्वाचे स्थान असायचे कारण नाही. पूर्वेकडील अरवली पर्वतातसुद्धा हत्तींचे मोठे थवे आहेत असे कुठे वाचण्यात आले नाही. पश्चिमेतल्या मारवाडच्या वाळवंटात तो कुठून येणार? मागे एकदा जयपूरच्या आमेर किल्ल्यावर पर्यटकांना अंबारीत बसवून हत्तीवरून फिरवतांना पाहिले होते। ते कांही असो, चोखी ढाणीमध्ये त्या दिवशी तरी गजराजांचे दर्शन घडले नाही हे खरे!

जत्रांमध्ये किंवा आनंदमेळ्यांत लावतात तसले कांही कौशल्याचे खेळसुद्धा ठेवलेले होते. छ-याच्या बंदुकीने फुगे फोडणे, टेबलावर ठेवलेल्या वस्तूंभोवती रबराची रिंग टाकणे, स्प्रिंगने चेंडूला धक्का देऊन तो कुठल्यातरी खणात अडकवणे असा स्वरूपाचे अनेक खेळ होते. या सर्व खेळांसाठी किंवा राईडसाठी कुपने द्यावी लागत. प्रवेश करतांना मिळालेली कुपने पुरवून पुरवून वापरणे कठीण होते. त्यामुळे बहुतेकांना ती नव्याने विकत घ्यावी लागत होती.

यातल्या बहुतेक गोष्टी आपण पार्कांमध्ये किंवा चौपाटीवर वगैरे पाहतोच. थंडीच्या दिवसांत मुंबईतल्या अनेक मोकळ्या जागा कसल्या ना कसल्या प्रदर्शनांनी व्यापलेल्या असतात. त्या ठिकाणीसुद्धा मनोरंजनाचे हे प्रकार ठेवलेले असतात आणि त्यांना भेट देण्यासाठी आलेले बरेच लोक मुख्य प्रदर्शन पाहणे झटपट आवरून चार घटका मौजमजा करायला तिकडे धांव घेतांना दिसतात. चोखी ढाणी मात्र या सर्वांपासून अगदी वेगळी होती. तिचे आगळेपण आणणा-या काही वेगळ्याच गोष्टी सुध्दा तिथे होत्या.
. . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)

No comments: