'चोखी ढाणी' याचा अर्थ 'आदर्श खेडे' असा होतो म्हणे। भारतासारख्या कृषीप्रधान देशात खेडेगांवातले बहुतेक लोक शेतकरीच असणार. पण ते करत असलेली नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी यासारखी कष्टाची कामे 'दुखभरे दिन बीते रे भैया' किंवा 'मेरे देशकी धरती' यासारख्या सिनेमातल्या गाण्यातच पहायला छान वाटतात. प्रत्यक्षात ती अतीशय किचकट असतातच शिवाय त्यांचे दृष्य परिणाम लगेच दिसतही नाहीत. त्यामुळे कृषीव्यवसाय सोडून गांवात चालणारी इतर कामे दाखवण्याची व्यवस्था या 'चोखी ढाणी' मध्ये केली आहे.
चोखी ढाणीच्या आवारात शिरल्यानंतर अगदी सुरुवातीलाच एक माणूस अंगावर गोंदल्यासारखे कांहीतरी करीत बसला होता। ईशा आणि इरा दोघीही आपले चिमुकले हात समोर धरून त्याच्या पुढ्यात फतकल मारून बसल्या. तो गोंदण्यासारखे दिसणारी फक्त चित्रे रंगवत होता आणि ती साबणाने धुवून पुसून टाकता येतील याची खात्री करून घेतल्यानंतरच आम्ही डिझाइनचे पॅटर्न निवडले आणि ते गोंदायची परवानगी दिली. त्या माणसाच्या बोटांत खरोखरच जादू होती. ब्रशच्या अगदी मोजक्या फटका-यात तो सांगितलेले चित्र हुबेहूब हांतावर किंवा अंगावर काढत होता. त्याचा प्रत्येक स्ट्रोक अगदी परफेक्टच असायचा. त्यात कांही दुरुस्ती करायला वावच नसायचा. त्याचे ते 'गोंदणे' होईपर्यंत आम्ही शेजारच्याच खाण्यापिण्याच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. आम्हाला फक्त चहा हवा असला तरी तिथले पुडी-कचौडी, समोसे आणि पकौडे खुणावत असल्यामुळे चाखून पाहिले.
जवळच एक चारपांच फूट व्यासाची धातूची तबकडी टांगून ठेवली होती. त्यावर हाणण्यासाठी चार पांच किलो वजनाच्या लाकडाच्या ओंडक्याला दांडा बसवून तो तिथे ठेवला होता. जास्तीत जास्त शक्ती लावून शक्य तितक्या जोरात टोला मारायचा प्रयत्न करायचा मोह कोणाला आवरत नव्हता. त्यामुळे अधून मधून त्यातून होणारा घंटानाद आसमंतात घणघणायचा. दुस-या बाजूला एक कुंभार आपले चाक मांडून बसला होता। मळून लोण्यासारख्या मऊ केलेल्या मातीचा एक मोठा गोळा त्याने आपल्या जवळच ठेवलेला होता. त्यातला एक छोटासा गोळा चांकावर ठेऊन त्याला विविध आकार देण्याचे आपले कसब तो दाखवत बसला होता. त्याच्या समोर बसून आपणसुद्धा आपल्या बोटांनी त्या गोळ्याला आकार देण्याचा अनुभव घेऊ शकत होतो आणि ते करण्यासाठी लोकांची रांग लागली होती. पण तो आकार भाजून पक्का करण्यासाठी जवळपास भट्टी ठेवलेली नव्हती. त्यामुळे ते कच्चे आकार तो बाजूला ठेवत होता आणि त्या हौशी कारागिराची पाठ फिरतांच त्यांना मळून पुन्हा उपयोगाला आणत होता.
एक कलाकार लाखेच्या बांगड्या तयार करून देत होता। मुलीच्या हांताचे माप घेऊन त्यानुसार तो एक सांचा निवडत असे. पुढ्यातल्या शेगडीवर तापवल्यानंतर मोल्डिंग क्लेसारखा दिसणारा लाखेचा गोळा घेऊन त्याला लाटून त्याची लांब सळी बनवून तिला त्या सांच्याच्या भोवती गुंडाळीत असे. त्या प्रक्रियेत मध्ये मध्ये विविध रंगांची पूड आणि चमकी वगैरे मिसळून त्यातून बेमालूम छटा निर्माण करायचा. दहा मिनिटांत कड्यांचा एक नाविन्यपूर्ण जोड सहजपणे तयार करून देण्याचे त्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते.
राजस्थानतले लोकसंगीत आणि नृत्य तर आता जगप्रसिद्ध झाले आहे. त्यातली मांड, घूमर वगैरे नांवेसुद्धा आपल्या परिचयाची झाली आहेत. चोखी ढाणीमध्ये निदान तीन वेगवेगळ्या छोट्या मंचांवर कलाकार आपापली कला सादर करत होते. धुंद करणारे त्यांचे ढोलकीचे वादन आणि थक्क करणारे नृत्यातले आविर्भाव पाहून पैसे वसूल झाले. थाळीवर उभे राहून केलेले किंवा हांतात व डोक्यावर पणत्या ठेऊन किंवा डोईवर मडक्यांची उंच रास तोलून धरून केलेले नाच मी पूर्वीसुद्धा पाहिले होते. तरीही एकाद्या मुलीचे अंग इतके लवचिक असू शकेल यावर विश्वास बसत नव्हता. एका मुलीने जमीनीवर एक सुई ठेवली आणि नाचत नाचत खाली वाकून ती सुई आपल्या डोळ्यांच्या पापणीने उचलून दाखवली. एका वादकाने हांतापायाला अनेक झांजा बांधून त्या सगळ्या झांजा व्यवस्थित तालावर वाजवून दाखवल्या.
एका मोकळ्या जागी चक्क डोंबा-याचा खेळ चालला होता। बांबूच्या दोन तिगाडांना एक दोरी बांधून त्यावर तोल सांवरत त्या डोंबा-याने ढोलकीच्या तालावर अजब कसरती करून दाखवल्या. दुसरीकडे जादूचा खेळ होता. त्या जादूगाराने दाखवलेल्या सगळ्या जादू मी दोन दिवसांपूर्वी आमच्या वसाहतीतल्या गणेशोत्सवात त्याच क्रमाने पाहिल्या होत्या. ती सगळी हांतचलाखी असते हे माहीत असूनसुद्धा आपण नेमके कसे फसवले जातो ते कांही समजत नाही. अखेरीस त्याने काय केले कोणास ठाऊक पण आमच्या हातांच्या पाठीला अत्तर लावल्यासारखा सुगंध आणून दाखवला. आणखी एका जागी कठपुतलीचा खेळ पहायला मिळाला. नवराबायकोंचे प्रेम, भांडण, रुसणे, समजूत घालणे वगैरे सगळे प्रकार त्यातील विनोदी संभाषणासह त्यात होते.
फिरताफिरता मध्ये एका ठिकाणी बाजरीची भाकर, तिच्यावर तूप, बरोबर गुळाचा खडा आणि झणझणीत चटणी यांची सोय केलेली दिसली. तव्यावर गरम गरम भाकर भाजून देणा-या बाईंचे उच्चार मराठी वाटल्यामुळे आम्ही तिच्याशी मराठीतच बोलायला सुरुवात केली. हे खाणे फक्त टाईमपाससाठी होते. मुख्य मेजवानी एका खास भोजनगृहात होती. तिथे पार्टिशन घालून अनेक छोट्या छोट्या खोल्या केल्या होत्या. प्रत्येक खोलीत रांगेने पाट मांडून समोर चौरंग ठेवले होते. येणारा प्रत्येकजण शेठ किंवा शेठाणी याच नांवांनी संबोधित केला जात होता. समोरच्या चौरंगावर ताट ठेऊन त्यात मावतील तेवढे निरनिराळे पदार्थ आणून वाढत होते आणि ते खाण्याचा भरपूर आग्रह करत होते. चवीला जेवण ठीकच होते, पण त्यातल्या नाविन्यामुळे कांही पदार्थ छान वाटत होते तर कांही तितकेसे रुचत नव्हते. पंजाबी आणि उडपी पद्धतीचे जेवण असंख्य वेळा खाल्ले असेल, गुजराथी रसोडाही तसा ओळखीचा आहे, पण खास मारवाडी पद्धतीचे जेवण घेण्याचा हा अनुभव नवीन होता. तो चांगला वाटला. एकंदरीत तृप्त होऊन आम्ही घरी परतलो.
3 comments:
येथे प्रवेशशुल्क किती आहे व ही जागा नक्की कोठेशी आहे ? आम्ही सिंहगड रोडवरुन जाणार आहोत.
प्रवेशशुल्क भरपूर आहे. पहिल्या भागात त्या ठिकाणचा पत्ता दिला आहे. तो खाली दिला आहे. मला पुण्यातील इतर रस्त्यांची एवढी माहिती नाही.
पुणे सोलापूर रस्ता सोडून मगरपट्ट्याच्या परिसरात येतांच रस्त्याच्या कडेला 'चोखी ढाणी' कडे जाणारा रस्ता दाखवणारे फलक जागोजागी दिसू लागले. त्यांचा मागोवा घेत पुणे नगर रस्त्याला लागल्यावर एका ठिकाणी उजवीकडे वळण्याची सूचना तिथल्या फलकांवर दिली होती. ते वळण घेताच आमची ग्रामीण भागातली वाटचाल सुरू झाली. खाचखळग्यांनी भरलेला रस्ता आणि धूळ उडवीत जाणारे ट्रक यांमधून मार्ग काढीत एकदाचे 'चोखी ढाणी' पर्यंत येऊन पोचलो.
धन्यवाद.
Post a Comment