Wednesday, September 30, 2009

अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस

अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस -भाग १ - प्रयाण


न्यूयॉर्कहून निघून वॉशिंग्टन डीसी आणि नायगारा धबधबा वगैरे पाहून येण्याची तीन दिवसांची सहल आम्ही ठरवली होती. अमेरिकेतल्या एका यात्रा कंपनीने आयोजित केलेल्या या सहलीची तिकीटे आम्ही इंटरनेटवरून काढली होती. त्यासाठी अॅटलांटाहून नेवार्कला येतांना विमानाचा प्रवास केल्यामुळे सुरक्षा नियमांनुसार परवानगी असलेले सामान हँडबॅगेत आणि उरलेले सूटकेसमध्ये भरून नेले होते. आता तीन दिवस बसमधून फिरायचे असल्यामुळे सामानाची उलथापालथ करावी लागली. बसमधून उतरून पायी फिरतांना लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या आणि इतर अत्यावश्यक वस्तू खांद्याला टांगून नेण्याच्या झोळीत ठेवल्या, संध्याकाळी मुक्कामाला गेल्यावर लागणाऱ्या गोष्टी आणि जास्तीचे कपडे बसच्या होल्डमध्ये टाकायच्या बॅगेत ठेवले, मळलेले कपडे आणि अनावश्यक वस्तूंचे गाठोडे बांधून बाजूला केले आणि प्रवासात घालायचे कपडे बॅगेवर ठेवले. सकाळी गडबड गोंधळ होऊ नये म्हणून रात्री झोपण्याच्या आधीच ही सारी आवराआवर करूनच गादीवर अंग टाकले.

पहाटे गजर लावून जाग आल्यावर आधी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. आदल्या दिवशी होता तसा पाऊसवारा नव्हता हे पाहून हायसे वाटले. हवामान अनुकूल नसले तरीसुध्दा वेळेवर जाऊन टूरिस्ट बस गाठायची होतीच, पण वरुणदेवाच्या कृपेने सारे कांही शांत होते. त्यामुळे अंगातला उत्साह दुणावला. झटपट सारी कामे आटपून चहाबरोबरच दोन चार बिस्किटे खाऊन निघालो. सोमवारी सकाळी न्यूयॉर्कला ऑफीसला जाणाऱ्या लोकांची गर्दी असणार हे लक्षात घेऊन आणि शक्य तर ती टाळण्यासाठी जरूरीपेक्षा थोडे आधीच घराबाहेर पडलो. बसस्टॉपवर विशेष गर्दी नव्हती, लवकरच बस आली. तिच्यातही पुरेशी जागा होती. यावेळच्या प्रवासात फक्त आम्ही दोघे आणि फडके पतीपत्नी अशी पर्यटक मंडळीच होतो, पण आदले दिवशी न्यूयॉर्कला जाण्याची रंगीत तालीम झाली असल्यामुळे निर्धास्त होतो. तिकीट काढण्यासाठी सुटे पैसै काढून तयार ठेवले होते. तिकीट काढून चांगल्या जागा पकडून बसून घेतले.

वाटेत चढणाऱ्यांची गर्दी थोडी जास्त असल्यामुळे भराभर बस भरत गेली. मी या रस्त्याने एकदा गेलेलो असल्यामुळे कांही खुणेच्या जागा पाहिल्यावर आठवत होत्या. पहिल्या वेळी नजरेतून निसटलेल्या कांही जागा या वेळी लक्ष वेधून घेत होत्या. तासाभरात पोर्ट ऑथॉरिटीचे बस टर्मिनस आले. या वेळी सबवेच्या भानगडीत न पडता टर्मिनसच्या बाहेर पडून सरळ टॅक्सी केली आणि बोवेन स्ट्रीटवरल्या टूरिस्ट कंपनीच्या ऑफीसकडे प्रयाण केले. आम्ही पोचेपर्यंत ते ऑफीस उघडलेही नव्हते. आजूबाजूची बरीच दुकानेसुध्दा बंदच होती, थोडी उघडली होती आणि कांही आमच्यादेखतच उघडत होती. दरवाजापाशीच सामान ठेऊन आजूबाजूचे निरीक्षण करत उभे राहिलो.

हा भाग म्हणजे न्यूयॉर्कचे चायनाटाउन असावे. जिकडे पहावे तिकडे चित्रलिपीतली विचित्र अक्षरे दिसत होती. ती पाहून अक्षरसुध्दा न कळणे या वाक्प्रचाराचा अर्थ समजत होता. त्या चित्रांच्या बाजूला इंग्रजी भाषेतली अक्षरे नसली तर आम्ही चीनमध्ये आलो आहोत असेच वाटले असते. सगळ्या दुकानांवर चिंगमिंग, झाओबाओ, हूचू असलीच नांवे दिसत होती. भारताप्रमाणेच युरोपअमेरिकेतसुद्धा सगळ्या जागी चिनी खाद्यगृहे असतात, भारतात कुठे कुठे चिनी दंतवैद्य दिसतात, पण न्यूयॉर्कच्या या भागात हेअरकटिंग सलूनपासून डिपार्टमेंटल स्टोअरपर्यंत आणि इलेक्ट्रीशियनपासून अॅडव्होकेटपर्यंत सगळ्या प्रकारच्या दुकांनांचे किंवा ऑफीसांचे चिनी नांवांचे फलक होते. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांत सुद्धा  प्रामुख्याने मंगोलवंशीयच दिसत होते.

थोड्या वेळाने एका चिनी माणसाने येऊन दरवाजा उघडला. समोर फक्त एक जिना होता आणि तो चढून गेल्यावर पहिल्या मजल्यावर टूरिस्ट कंपनीचे केबिनवजा ऑफीस होते. दोनतीन मिनिटात त्याचा सहाय्यकही आला. त्याच्या पाठोपाठ आम्ही जिना चढून वर गेलो. आम्ही पर्यटक असल्याचे सांगताच त्याने काँप्यूटरवर आमची नांवे पाहून घेतली आणि केबिनच्या बाहेर पॅसेजमध्ये मांडलेल्या खुर्च्यांवर बसायला सांगितले. आम्ही रेस्टरूमची चौकशी केल्यावर त्याने शेजारचा एक बंद दरवाजा किल्ली लावून उघडून दिला. रस्त्यावरची नको ती माणसे त्याचा दुरुपयोग करायला येतात म्हणून ही खबरदारी घ्यावी लागत असल्याचे त्याने कुलुप उघडता उघडता सांगितले.

आमच्या पाठोपाठ आणखी कांही माणसे चौकशी करायला माडीवर आली, तिथे ठेवलेल्या सातआठ खुर्च्या केंव्हाच भरून गेल्या. कांही तरुणांनी उठून वरिष्ठ नागरिकांना जागा दिल्या. त्यानंतर सारखी माणसे येऊन चौकशी करून जातच होती आणि खाली रस्त्यावर जमलेल्या माणसांचा मोठा गलका ऐकायला येऊ लागला होता. थोड्याच वेळात तीनचार युवक ऑफीसात जाऊन हातात पॅड्स घेऊन बाहेर आले. एटथर्टी, एटफॉर्टी, फिली, डीसी असे कांही तरी पुटपुटणाऱ्या त्यातल्या एकाला मी माझ्याकडचे ई-टिकीट दाखवले, ते पाहून त्याने दुसऱ्याला बोलावले. त्याने आपल्या पॅडवरील चार नांवांवर टिकमार्क करून मला आमचे सीटनंबर्स सांगितले. आम्ही सर्वांनी आपली ओळख दाखवण्यासाठी आपापले पासपोर्ट तयार ठेवले होते, पण त्याची गरज पडलीच नाही. बाकीचे पॅसेंजर कुठे आहेत हे सुध्दा त्या प्राण्याने मला विचारले नाही. खाली जाऊन रस्त्यावरील एका दुकानाच्या समोर जाऊन थांबायला सांगून तो धडाधडा जिना उतरून नाहीसा झाला.

आम्ही हळूहळू खाली उतरलो. रस्त्यावर शंभर दीडशे माणसांची झुम्बड उडालेली होती. ते तीनचार युवक एकेकाची तिकीटे पाहून त्याला कुठकुठल्या दुकानांच्या समोर जाऊन थांबायला सांगत होते. अशा रीतीने तीन चार वेगवेगळे घोळके तयार झाले. कांही लोक तेवढ्यात समोरच्या दुकानात जाऊन तिथे काय मिळते ते पाहून विकत घेत होते. तोंपर्यंत रस्त्यावर ओळीने तीन चार बसगाड्या येऊन उभ्या राहिल्या. प्रत्येक युवकाने आपापला घोळका त्यातल्या एकेका गाडीत नेला. आम्हीही आमच्या ग्रुपबरोबर आमच्या गाडीत जाऊन आपापल्या जागांवर स्थानापन्न झालो. त्या गाड्या साधारणपणे एकाच वेळी सुटून वेगवेगळ्या ठिकाणांना जाणार होत्या हे उघड होते. पण त्या जागी बस स्टेशनसारखे फलाट नव्हते की कसलेही बोर्ड नव्हते आणि कोणती गाडी कुठल्या गावाला जाणार आहे हे दाखवणारे कसलेच चिन्ह नव्हते. पण सगळे प्रवासी आपापल्या गाडीत पोचले असणार. अमेरिकेसारख्या प्रगत देशातले हे रस्त्यावरचे प्रिमिटिव्ह स्टाईलचे मॅनेजमेंट माझ्या चांगले लक्षात राहील.

आमच्या मार्गदर्शकाने बसमध्ये येऊन सगळे प्रवासी आले असल्याची खात्री करून घेतली. आमच्या अपेक्षेप्रमाणेच ही वॉशिंग्टन आणि नायगाराची तीन दिवसांची ट्रिप असल्याचे सांगून त्याबरोबर त्याने एक हलकासा धक्का दिला. इंटरनेटवर वाचलेल्या माहितीनुसार आम्ही पहिल्या दिवशी वॉशिंग्टन डीसीला जाणार होतो. दुसऱ्या दिवशी नायगाराला जाऊन तिसऱ्या दिवशी परतणार होतो. न्यूयॉर्कच्या मानाने वॉशिंग्टनला हवा उबदार राहील आणि अंगातले लोकरीचे कपडे काढून फिरता येईल अशी आमची कल्पना होती. त्यानुसार तिथल्या व्हाईट हाउस सारख्या शुभ्र इमारतींच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या फोटोत आपल्याला कोणता रंग खुलून दिसेल याचा सखोल विचार करून कांही महिलांनी त्या दृष्टीने आपला वेष परिधान केला होता. त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पाडणारी घोषणा त्या मार्गदर्शकाने केली. हवामानाचे निमित्य सांगून त्यामुळे आपली सहल उलट दिशेने जाणार असून आता तिसरे दिवशी परत येतांना आपण वॉशिंग्टनडीसीला जाणार आहे हे ऐकून अनेकांचा थोडा विरस झाला. पण ही सहल रद्दच झाली नाही याचे समाधान कांही थोडे थोडके नव्हते
. . . . . . . . . . . . . .

 अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस - भाग २- सहस्त्र द्वीपे


आमच्या बसमध्ये सर्वात जास्त चिनी प्रवासी होते आणि त्यानंतर भरतखंडातून आलेले दिसत होते. आमच्या चिनी वाटाड्याने हंसतमुखाने सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि प्रवासाची माहिती दिली. आम्ही ठरलेल्या मार्गावरूनच पण उलट दिशेने प्रवास करून वर्तुळ पूर्ण करणार आहोत आणि एक बिंदूसुध्दा वगळला जाणार नाही असे आश्वासन देऊन या तीन दिवसात आपण कायकाय पहाणार आहोत याची लांबलचक यादी वाचून दाखवली. आम्ही त्या सहलीची पुस्तिकाच पाहिली नसल्यामुळे नायगरा आणि वॉशिंग्टन या दोन शब्दांपलीकडे त्यातून आम्हाला फारसा बोध झाला नाही. पण खूप कांही पहायला मिळणार आहे हे ऐकून सुखावलो.

त्यानंतर त्याने या प्रवासाचे कांही नियम सांगून कांही आज्ञावजा सूचना केल्या. संपूर्ण प्रवासात प्रत्येक प्रवाशाने त्याला दिलेल्या जागेवरच बसले पाहिजे. बसचा नंबर लक्षात ठेवावा किंवा लिहून ठेवावा. कोठल्याही ठिकाणी बसमधून उतरल्यानंतर सर्व पर्यटकांनी सतत मार्गदर्शकासोबतच रहाणे उत्तम, पण घोळक्यातून कोणी वेगळा झालाच तर त्याने दिलेल्या वेळेवर बसपाशी येऊन थांबावे. गाईडचा मोबाईल नंबर आपल्याकडील मोबाईलवर सांठवून ठेवावा, पण कृपया "आमच्यासाठी बस थांबवून ठेवा." असे सांगण्यासाठी त्याचा उपयोग करू नये, पुढच्या ठिकाणाची चौकशी करून "आम्ही त्या जागी स्वखर्चाने येऊन भेटू." असे सांगण्यासाठी करावा. तीन दिवसांचा बसचा प्रवास आणि दोन रात्री झोपण्याची सोय एवढ्याचाच समावेश या तिकीटात आहे. त्याखेरीज अन्य सर्व खर्च ज्याने त्याने करायचे आहेत. पोटपूजेसाठी अधून मधून बस थांबवली जाईल, तेंव्हा जवळ असलेल्या कोणत्याही खाद्यगृहात जाऊन ज्याला पाहिजे ते आणि हवे तेवढे हादडून घ्यावे किंवा बरोबर नेण्यासाठी विकत घेऊन ठेवावे, पण वेळेवर बसपर्यंत पोचायचे आहे याचे भान ठेवावे. प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाण पाहण्यासाठी तिकीट काढावे लागते. त्यासाठी एकंदर बत्तीस डॉलर गाईडकडे सुरुवातीलाच द्यावेत. गाईड आणि ड्रायव्हर यांना दर डोई दररोज सहा डॉलर टिप द्यायची आहे, ती मात्र टूरच्या शेवटी एकत्रच गोळा केली जाईल. अशा प्रकारचे त्याचे निवेदन बराच वेळ चालले होते. प्रत्येक वाक्य एकदा इंग्लिशमध्ये बोलून त्याचे मँडारिनमध्ये भाषांतर करून तो सांगत होता. यँकीजच्या मानाने त्याचे शब्दोच्चार स्पष्ट होते आणि बंगाली लोकांशी बोलण्याची संवय असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना ते समजायला अडचण येत नव्हती. इंग्लिशमधील वाक्यच मँडारिनमध्ये सांगायला त्याला दुप्पट वेळ लागतो आहे असे वाटून तो कदाचित त्यांना जास्त सविस्तर सांगत असावा अशी शंका येत होती.

त्याचे निवेदन संपल्यानंतर आमची बस सुरू होऊन मार्गाला लागली तोंपर्यंत सव्वानऊ वाजले होते आणि सकाळच्या न्याहरीची वेळ झाली असल्याचे संदेश जठराकडून यायला लागले होते. प्रवाशांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी टूरिस्ट कंपनीकडे नव्हतीच. "सर्व पर्यटक ब्रेकफास्ट करूनच आले असावेत" असे त्यांनी गृहीत धरले होते की "हे चिनी लोक नाश्ताच करत नाहीत." यावर चर्चा करीत आम्ही आपले फराळाचे डबे उघडून जठराग्नीला आहुती दिल्या. दोन तीन तासानंतर आमची बस एका गॅस स्टेशनवर म्हणजे अमेरिकेतल्या पेट्रोल पंपावर थांबली. बस आणि प्रवासी दोघांनीही अन्नपाणी भरून घेतले.

न्यूयॉर्क शहर सोडून बाहेर पडतांना आमची गाडी अतीशय रुंद अशा महामार्गावरून धावत होती. तोंपर्यंत आम्हाला अमेरिकेत येऊन चार पांच दिवस झाले होते आणि आम्ही रोज फिरतच होतो. त्यामुळे तिकडले महामार्ग, त्यावरून सुसाट वेगाने धांवणारी वाहने, त्यांचा एकत्रित घोंघावत येणारा आवाज, मैल दीड मैल लांब रस्त्यावरील असंख्य वाहने पाहून एक अजस्त्र प्राणी सरपटत जात असल्याचा होणारा भास या सर्व गोष्टींची संवय व्हायला लागली होती. जसजसे आम्ही शहरापासून दूर जात गेलो, रस्त्यांची रुंदी, त्यांवरील वाहनांची गर्दी, बाजूला दिसणाऱ्या इमारतींची उंची आणि संख्या वगैरे सारे कमी कमी होत गेले. थोड्या वेळाने नागरी भाग संपून कंट्री साइड (ग्रामीण भाग) सुरू झाला आणि तोसुध्दा मागे पडून डोंगराळ भाग सुरू झाला. ही सारी न्यूयॉर्क राज्याचीच विविध रूपे असल्याचे समजले. त्या वेळी फॉल सीजन चालला असल्यामुळे सारे डोंगर फक्त दुरून साजरेच दिसत नव्हते, तर रंगाच्या बरसातीने चांगले सजले होते. शत्रूपासून आपला जीव वाचवण्यासाठी लहानसा सरडा रंग बदलतो आणि झाडीमध्ये किंवा झाडांच्या खोडात दिसेनासा होतो. शीत कटिबंधातले हे ताडमाड उंच असंख्य वृक्ष मात्र थंडीपासून आपला जीव वाचवण्यासाठी आपले रंग बदलतात आणि जास्तच उठून दिसतात.

संध्याकाळच्या सुमाराला आम्ही थाउजंड आयलंडच्या भागात जाऊन पोचलो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) आणि कॅनडा या दोन देशांच्या दरम्यान पांच मोठमोठी सरोवरे आहेत. त्यातल्या ओंटारिओ सरोवरात एका उथळ भागाच्या तळावर हजारोंनी उंचवटे आहेत. त्यातले जे बाराही महिने पाण्याच्या वर राहतात आणि ज्यावर निदान दोन वृक्ष बारा महिने असतात अशा बेटांची संख्याच अठराशेच्या वर आहे. त्याशिवाय पाण्याची पातळी वर जाताच अदृष्य होणारी किंवा वृक्षहीन अशी कितीतरी बेटे असतील. यातील बहुतेक बेटे त्यांवर जेमतेम एकादी इमारत, थोडीशी बाग वगैरे करण्याइतकी लहान लहान आहेत. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी लोकांचे लक्ष या बेटांकडे गेले. अनेक श्रीमंत लोकांनी यातली बेटे विकत घेऊन त्यावर बंगले बांधले आणि उन्हाळ्यात ते इथे येऊन मौजमजा करू लागले. थंडीच्या दिवसात हे सरोवरच गोठून जात असल्यामुळे या भागातली रहदारी कमी होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसात लहान मोठ्या मोटरबोटींनी कुठल्याही बेटावर जाता येते.
अंकल सॅम बोट टूर कंपनीच्या मोटरबोटीत बसून आजूबाजूची बेटे पहात आम्ही तासभर या सरोवरात फेरफटका मारला. प्रत्येक बेटावरील इमारत वास्तुशिल्पकलेचा नमूना वाटावा इतकी आगळी वेगळी वाटते. कोणी त्याला किल्ल्याचा आकार दिला आहे तर कोणी भूतबंगला वाटावा असा आकार दिला आहे. सरोवरातून जाता जाता दृष्टीपथात येणाऱ्या द्वीपांबद्दल एक मार्गदर्शक माहिती सांगत होता. कोणते बेट कोणत्या अब्जाधीश सरदाराने कधी विकत घेतले किंवा सध्या कोणत्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्या ताब्यात आहे याबद्दल मनोरंजक माहिती दिली जात होतीच, कांही बेटांसंबंधी करुण कथासुध्दा सांगितल्या जात होत्या. त्यातली कोणतीच नांवे ओळखीची नसल्यामुळे आम्हाला त्यात फारसा रस नव्हता आणि एकदा ऐकून ती नांवे लक्षात राहणे तर केवळ अशक्य असते. यांमधील अनेक बेटांवर आता हॉटेले उघडली असून जगभरातले नवश्रीमंत लोक उन्हाळ्यात तिथे सुटी मजेत घालवण्यासाठी येतात. हे कामसुध्दा आमच्या ऐपतीच्या पलीकडचे होते.

तासभर या आधीच निसर्गरम्य तसेच मानवाने जास्तच आकर्षक केलेल्या सहस्रद्वीपांची एक झलक दुरूनच पाहून आम्ही आपल्या बसमध्ये परत आलो.

अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस - भाग ३
   बफेलो सिटी - अमेरिकन महिषऊरु 


ओंटारिओ सरोवरातल्या सहस्रद्वीपांमधील चाळीस पन्नास बेटांच्या किनाऱ्याजवळून जातांना त्यांवरील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित सौंदर्यस्थळांचे अवलोकन करीत तासभर जलविहार करून परत आल्यावर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला.  सूर्य मावळतीच्या दिशेने बराच खाली उतरला होता. त्या मावळत्या दिनकराचे फिकट होत बदलत जाणारे रंग आणि डोंगरमाथ्यांच्या गडद किंवा काळपट होत जाणाऱ्या विविध रंगांच्या छटा पहात पहात पुढे जाता जाता सूर्यास्त झाला आणि हेडलाईट्सच्या उजेडात आमची बस मार्गक्रमण करत राहिली. अखेर पहिल्या दिवसाच्या मुक्कामाचे  ठिकाण आले.

कन्नड भाषेत गांवाला ऊरु म्हणतात. आपल्याकडे जशी वडगांव, पिंपळगांव, रावळगांव वगैरे नांवे असलेली खूप गांवे आहेत, त्याचप्रमाणे कर्नाटकात हुन्नूर, बसरूर, बेलूर वगैरे नांवांची असंख्य लहान लहान गांवे आहेत. अशाच प्रकारचे बंगळूरु हे गांव महानगर झाले आणि आता कर्नाटकाची राजधानी आहे, महिषासुराचे म्हैसूर हे सुध्दा मोठे शहर आहे आणि पूर्वी कित्येक शतके या भागाची राजधानी या गांवात होती. महिषऊरु या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द घेतले तर बफेलो सिटी असे भाषांतर होईल. अमेरिकेच्या मिनिटूरमधला आमचा पहिला मुक्काम या गांवी होता.

बफेलो हे न्यूयॉर्क राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, पण न्यूयॉर्क शहराशी तुलना करायची झाली तर मुंबई आणि कोल्हापूरमध्ये जेवढा फरक असेल तेवढा या दोन शहरांच्या आकारात आहे. शिवाय न्यूयॉर्क शहर त्या राज्याच्या दक्षिणेच्या किंवा आग्नेय दिशेच्या टोकाला अॅटलांटिक महासागराच्या किनारी आहे तर बफेलो सिटी त्याच्या बरोबर उलट दिशेच्या म्हणजे उत्तरेच्या किंवा वायव्य दिशेच्या टोकाला कॅनडाच्या सीमेवर आहे. एक सागरकिनाऱ्यावर आहे तर दुसरे डोंगराळ प्रदेशात आहे. बफेलो या गांवाचे नांव कुठल्याशा फ्रेंच शब्दांवरून पडले असे सांगतात. त्या गावातल्या रस्त्यांवर म्हैस पहायला मिळण्याची शक्यता नव्हतीच, पण कुठल्याही रस्त्याच्या बाजूला पाण्याच्या डबक्यात डुंबणारी एकसुध्दा म्हैस दिसली नाही, तसेच गांवाबाहेर म्हशींचे गोठे किंवा तबेले कांही दिसले नाहीत. किंबहुना अमेरिकेत म्हैस आणि रेडे हे पाळीव पशु असावेत असे वाटतच नाही. तिथल्या मुक्कामात निरनिराळे टक्के स्निग्धांश असलेले दुधाचे सारे नमूने चाखून पाहिले, पण आपल्याकडच्या म्हशीच्या सकस दुधाची सर त्यातल्या एकालाही आली नाही.

बफेलोला पोचल्यावर क्षुधाशांतीसाठी एका खूप प्रशस्त अशा चायनीज हॉटेलात नेले गेले. अमेरिकेतल्या बाजारभावांचा विचार करता अगदी क्षुल्लक दरात पोटभर इच्छाभोजनाची सोय तिथे होती. तीनचार लांबलचक टेबलांवर प्रत्येकी दहा तरी वेगवेगळे पदार्थ मांडून ठेवले होते. मक्याच्या पिठाच्या घोळात शिजवलेल्या दोन तीन भाज्या आणि उकडलेले बटाटे किंवा पांढरा भात असे मोजके पदार्थ सोडले तर इतर सर्वकांही सामिष होते. चिनी लोक त्यांच्या घरात उंदीर, पाली, झुरळे वगैरे खातात असे ऐकले असले तरी निदान इतरांना किळस येऊ नये म्हणून तरी त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करत नाहीत.  बेडूक, खेकडे आणि शिंपल्यातले किडे यांच्या कांही पाकसिध्दी होत्या, त्या कणभर चाखूनही पाहिल्या, पण त्यांचे एवढे कौतुक कशासाठी करतात हे समजले नाही. त्यामुळे चिकन आणि प्रॉन्सयुक्त नूड्ल्स आणि फ्राईडराइसच्या ओळखीच्या तऱ्हा खाणे इष्ट वाटले. कसले तरी सूप होते, त्याचे नांव लक्षात राहिले नाही, पण त्याची चंव अप्रतिम होती.

बफेलो शहरापासून नायगरा धबधबा अगदी जवळ आहे, पण सहस्रद्वीपांपासून बफेलोपर्यंत जाण्याच्या रस्त्यातून आम्हाला त्याची दुरून झलकसुध्दा दिसली नाही. रात्रीच्या वेळी लेजरच्या रंगीबेरंगी झोतातून त्यावर खूप छान रोषणाई करतात असे ऐकले होते. दुसरे दिवशी मुक्कामाला वेगळ्या गांवी जायचे असल्यामुळे आम्हाला ती पहायला मिळणार नव्हती. बारा वर्षांपूर्वी मी कॅनडाच्या बाजूने नायगराचा धबधबा रात्री पाहिला होता, पण त्यातले आता एवढे आठवत नव्हते. शिवाय बारा वर्षात त्यात केवढी तरी प्रगती झाली असणार! आमच्यासोबत आलेली बाकीची मंडळी पहिल्यांदाच या जागी येत होती. धबधब्यावरची ही रोषणाई पहायला रात्री टॅक्सीने पटकन जाऊन यावे अशी एक कल्पना डोक्यात आली. पण परदेशात अशी व्यवस्था करण्यासाठी काय करावे लागते, त्याला किती खर्च येईल आणि त्यातून काय पदरात पडेल यातल्या कशाचीच नीट कल्पना नव्हती. शिवाय दुसरे दिवशी पहाटे लवकर उठावे लागले होते, दुपारी वामकुक्षीही घेतली नव्हती आणि दिवसभर बसमधून फिरलो असलो तरी त्यातून शरीराची दमणूक झाली होती. त्यामुळे हॉटेलवर जाऊन आपली खोली ताब्यात घेण्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर आधी गादीवर पडावेसे वाटले आणि गादीला पाठ टेकताच क्षणार्धात निद्राधीन झालो.
--------------
                            -------- पुढील भाग दुसरा दिवस
   

2 comments:

leena said...

Agadi khar...
पण ही सहल रद्दच झाली नाही याचे समाधान कांही थोडे थोडके नव्हते.
Amhi hi tyach bus ne nigara tour la gelo hoto...
Amhala kahi na khai karan deun thikan radda karat hote..
Ani jithe gheun gele tithe sangayache 30 min parat ya...
Tvadhya welat baghaun sudha hot nahse..:(

Anand Ghare said...

धन्यवाद.
आम्ही खूपच सुदैवी ठरलो. आमच्या यशस्वी सफरीचा वृत्तांत टप्प्याटप्प्याने देणार आहेच.