Monday, September 21, 2009

तुळजा भवानी माता

लहानपणी असंख्य वेळा गोष्टीरूपाने शिवचरित्र ऐकले होते, त्यातला भवानीमातेने शिवाजीवर प्रसन्न होऊन त्याला भवानी तलवार दिली आणि तिच्या जोरावर पराक्रम करून ते छत्रपती शिवाजी महाराज बनले, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली वगैरे भाग मनावर ठसला होता. आमच्या गांवात भवानीमातेचे देऊळ नव्हते, ती तुळजापूरला असते एवढेच मोठ्या लोकांकडून ऐकले होते. तिचे दर्शन घेऊन आलेल्यांची संख्या माझ्या ओळखीत कमीच होती.


महाबळेश्वरला फिरायला गेलो तेंव्हा तिथल्या स्थानिक साइटसीइंग ट्रिपमध्ये प्रतापगडावर गेलो होतो. त्या ठिकाणी भवानीमातेचे देऊळ आहे. शिवाजीराजांच्या काळात तुळजापूर हे स्थान विजापूरच्या आदिलशाही अंमलाखाली असल्यामुळे तिचे दर्शन घेणे कठीण होते. शिवाय ते राज्यकर्ते तिथल्या देवस्थानाला उपद्रव देत असत. यामुळे त्यांच्या वहिवाटीपासून दूर असलेल्या दुर्गम अशा प्रतापगडावर तिच्या प्रतिमेची स्थापना महाराजांनी केली असावी. भवानीमातेने प्रतापगडावरील याच ठिकाणी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष दर्शन देऊन भवानी तलवार दिली असे कांहीसे आमच्या वाटाड्याने सांगितले. हे मंदिर छानच वाटले. ते अनपेक्षितपणे पहायला मिळाल्यामुळे जास्तच चांगले वाटले, पण ते आरामात पहायला वेळ नव्हता. झटपट देवीचे दर्शन घेऊन लगेच पुढचा पॉइंट पहायला जायचे होते. आमच्या ग्रुपमधले पर्यटक सोडले तर इतर भाविकांची फारशी गर्दी देवळात नव्हती. कदाचित ती नेहमी दर्शन घेणा-या लोकांची येण्याची वेळ नसेल, दूरदूरहून आलेले यात्रेकरू कांही दिसले नाहीत. आम्हीही त्यावर जास्त विचार करायच्या मूडमध्ये नव्हतो.


पुढे अनेक वेळा तुळजाभवानीचा उल्लेख वाचनात आणि बोलण्यात आला, पण प्रत्यक्ष दर्शनाचा योग कांही आला नव्हता. दोन तीन वर्षांपूर्वी एकदा पुण्याहून मुलाचा अचानक फोन आला आणि त्याने वीकएंडला तुळजापूरला जाऊन यायचे ठरवले असल्याचे सांगून आम्हाला यायला जमेल कां ते विचारले. आम्ही तर एका पायावर तयार होतो. "चलो बुलावा आया है, माताने बुलाया है।" असे मनाशी म्हणत बॅगेत दोन कपडे टाकले आणि पुण्याला जाऊन दाखल झालो. सकाळी लवकर उठून आन्हिके आटोपली आणि सोलापूरच्या रस्त्याला लागलो. मी वीसपंचवीस वर्षांपूर्वी यस्टीच्या लाल डब्ब्यातून या रस्त्यावरून गेलो होतो, तेंव्हा पाहिलेले दृष्य आठवत होते, पण त्यात आता बराच फरक झाला होता. रस्ता चांगला प्रशस्त झाला होता आणि त्यावर असलेले असंख्य खळगे बुजले होते. पूर्वी मुख्यत्वे एस्टी बसगाड्या, मालगाड्या आणि जीप दिसल्या होत्या, आता आरामशीर लक्झरी कोच, वातानुकूलित टेंपो आणि कार दिसायला लागल्या होत्या. त्यांच्या वेगातही वाढ झाली असल्यामुळे फारशी गर्दी जाणवत नव्हती. जागोजागी गाड्या अडवून वसूली करणारे टोलनाके मात्र त्रासदायक वाटत होते. पूर्वी वाटेतल्या एस्टीस्टँडवर टिनाच्या टपरीत तिखटजाळ भजी खाऊन बशीत 'चा' ओतून प्यालो होतो. आता महामार्गाच्या कडेला फूडमॉल दिसत होते, कांही ढाबेसुध्दा उबे राहिले होते. चहाच्या टपरीभोवती रेंगाळणारे किंवा जमीनीवरच बसकण मारून बसलेले गांवकरी दिसत नव्हते. पागोटी आणि नऊवारी लुगडी जवळ जवळ अद्ष्य झाली होती, गांधी टोप्या आणि धोतरांची संख्या कमी होऊन जीनपँट्सची वाढली होती. मोठ्या संख्येने सलवार कमीज होत्याच, कॅप्रीसुध्दा दिसत होत्या. उजनी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय दिसला. एके काळी पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष्य असलेल्या रखरखीत दुष्काळी प्रदेशाचा अगदी कायापालट झाला नसला तरी अधून मधून हिरवळ आणि बागायतींचे दर्शन होत होते. हा बदल निश्चितच सुखद होता.


सोलापूर ओलांडून पुढे गेल्यानंतर रस्ता अरुंद झाला तरी चांगलाच होता. मध्ये थोडा खडबडीत भाग लागला तेंव्हा पेंगणारी मंडळी दचकून जागी झाली. थोड्याच वेळात तुळजापूर आलेच. गावात प्रवेश करताच कोणी मुले आली आणि त्यांनी ग्रामपंचायतीची पट्टी घेतली. पुढे पहावे तिकडे माणसांचा सागर पसरला होता. त्यात गाडी कुठे उभी करायची आणि देवळात कुठल्या बाजूने प्रवेश करायचा यातले कांहीच समजत नव्हते. तेवढ्यात गळ्याभोंवती उपरणे गुंडाळलेले एक गृहस्थ उगवले आणि "आज फार गर्दी आहे, लाइनीतून दर्शन मिळायला पाच सहा तास तरी लागतीलच" वगैरे माहिती देऊन आम्हाला शॉर्टकटने आत घेऊन जाण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. दोन लहान लेकरे आणि दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असलेला आमचा ग्रुप तळपत्या उन्हात उभे रहाण्याचे दिव्य करायचा विचारसुध्दा करणार नाही याची त्याला खात्री होती, शिवाय खाजगी मोटारगाडीतून आलेली पार्टी गबर असणार हे त्याने गृहीत धरून अवास्तव मागणी केली. आम्ही सेलफोनवरून एका अनुभवी नातेवाइकाशी बोलणे केले आणि त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे घासाघीस करून त्याचे पॅकेज ठरवले. माणसांच्या गर्दीतूनच हाडत हुडत करीत त्याने गाडीला पुढे जाण्याची वाट करून तिला आडोशाला नेऊन उभी केली आणि एका आडवाटेने आम्हाला देवळात प्रवेश मिळवून दिला. वाटेत एका जागी एक पाण्याचा नळ होता, पण त्या ठिकाणी उघड्यावर आंघोळ करण्याची कोणाचीच तयारी नव्हती. हातपाय धुवून चार शिंतोडे डोक्यावर उडवले आणि पुढे गेलो.

या देवीची जेवढी प्रचंड ख्याती ऐकली होती, त्या मानाने देऊळ जरा सामान्य वाटले. वास्तुशिल्पकलेच्या दृष्टीने त्यात भव्य, दिव्य असे फारसे कांही नजरेत भरले नाही. देवळात अफाट गर्दी होती. आम्हाला गाभा-याच्या जवळ रांगेत घुसवले गेले. पुढे जाऊन जेमतेम क्षणभर देवीचे दर्शन मिळाले, त्याने मनाचे पूर्ण समाधान कांही झाले नाही. आमच्या भाग्यात तेवढे तरी होते याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आम्ही पुढे आलो. देवीला वहायचा खण, नारळ, फुलांचा हार, उदबत्ती, नैवेद्य वगैरे सगळ्यांचा अंतर्भाव आमच्या पॅकेजमध्येच होता. उपरणेवाल्याने देवीचा प्रसाद, अंगारा, हळदकुंकू वगैरे आणून दिले आणि बाहेर जाण्याचा रस्ता दाखवून आमचा निरोप घेतला.


श्रीक्षेत्र तुळजापूर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात असले तरी सोलापूर शहरापासून जास्त जवळ आहे आणि जायला सोयीचे आहे. यमुनाचल नावाच्या टेकडीच्या माथ्यावर ते वसले आहे. तिथली भवानी देवी तुरजा, त्वरजा, तुकाई वगैरे नांवानीही ओळखली जाते. महिषासुर आणि मातंग नांवांच्या राक्षसांचा तिने या जागी संहार केल्याच्या दंतकथा आहेत, पण अशाच दंतकथा आदिशक्तीच्या इतर स्थानीसुध्दा ऐकायला मिळतात. तुळजाभवानीवर श्रध्दा असणा-या भाविकांची संख्या खूप मोठी आहे हे निश्चित. तुळजाभवानीच्या उपासनेमध्ये गोँधळ या पारंपरिक लोकगीताच्या प्रकाराला मोठे महत्व आहे. असाच परंपरागत पण अलीकडच्या काळात रचलेला एक गोंधळ खाली दिला आहे.

--------------------------------------------------------------------------------------

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ....गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


उधं उधं उधं उधं उधं !


गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ

हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संभळ

धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता

भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


उधं उधं उधं उधं उधं

No comments: