Monday, September 07, 2009

न्यूयॉर्कची सफर - २ - स्वातंत्र्यदेवीचा पुतळा


स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या नांवाने जगप्रसिध्द असलेला स्वातंत्र्यदेवताचा पुतळा न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन या अत्यंत गजबजलेल्या मुख्य भागापासून अडीच किलोमीटर दूर असलेल्या एका निर्जन अशा बेटावर उभा केला आहे. तिथे जाण्यासाठी मोटर लाँचची व्यवस्था आहे. आम्ही रांगेत उभे राहून काढलेले तिकीट फक्त या प्रवासासाठीच होते. (असे तिथे गेल्यानंतर समजले.) मॅनहॅटमच्या बॅटरी पार्कमध्ये असलेल्या काउंटरवरून तिकीटे काढून समोरच असलेल्या फेरी स्टेशनवर गेलो आणि विमानतळावर असते तसल्या लांब रांगेत उभे राहिलो. लिबर्टी द्वीपावर जाऊ इच्छिणा-या सर्व पर्यटकांची त्या जागी कसून सुरक्षा तपासणी होत होती. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची धारदार किंवा अणकुचीदार वस्तू, विषारी द्रव्य, स्फोटक किंवा घातक रसायन, हत्यार वगैरे कांही नाही आणि तिथे असलेल्या कोणा माणसाला किंवा निर्जीव वस्तूला आमच्यापासून किंचितही धोका नाही याची पूर्ण खातरजमा झाल्यानंतर आम्हाला पुढे जायची परवानगी मिळाली.
पलीकडच्या बाजूला मोटरलाँचच्या धक्क्याकडे जाण्यासाठी एक लांबलचक मार्गिका होती. तिच्यात फारशी गर्दी नाही हे पाहून आम्ही झपाझपा चालत पुढे गेलो. पण तिच्या दुस-या टोकाला पोचेपर्यंत तिथले गेट बंद झाले. आमच्या पुढे गेलेले लोक तिथे उभ्या असलेल्या बोटीत चढत असलेले दिसत होते. ते सगळे चढून गेल्यावर तिथला तात्पुरता यांत्रिक पूल उचलला गेला, तटावरील खुंटाला बांधलेले साखळदंड सोडले गेले आणि ती बोट जागची हलली. पलीकडून परत आलेली बोट आसपास रेंगाळतांना दिसतच होती. जागा मिळताच ती पुढे येऊन किना-याला लागली. तोपर्यंत आमच्या मागे भरपूर पर्यटक येऊन उभे राहिलेले होतेच. आम्ही सर्वजण रांगेने बोटीत चढलो. खालच्या बाजूला बसण्यासाठी आसने होती, तरी आम्ही तडक डेकवर गेलो आणि मोक्याची जागा पकडून उभे राहिलो.
सागरकिना-यावर आल्यापासून समोरचे लिबर्टी आयलंड आणि त्यावरील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा आकार दिसत होता. लाँच किना-यावरून निघून जसजशी दूर जाऊ लागली तसतसा तो अधिकाधिक स्पष्ट होत गेला. तसेच मॅनहॅटनच्या अगडबंब इमारतींचा आकार हळूहळू लहान होत गेला आणि त्याच्या आजूबाजूच्या, तसेच मागील बाजूच्या इमारती दिसू लागल्या. खाडीच्या मध्यावर जाईपर्यंत न्यूयॉर्कचा ब्रुकलिन भाग, जर्सी सिटी, न्यूयॉर्क बंदरावरील राक्षसी क्रेन्स, तिथे उभी असलेली जहाजे वगैरे मनोरम दृष्य एका बाजूला आणि बेटावरील भव्य चबूतरा आणि त्यावर असलेली शिल्पकृती दुस-या बाजूला असे सगळेच पाहून डोळ्यात साठवून घेण्यासारखे होते. पहाता पहाता लिबर्टी द्वीप जवळ आले. त्याला अर्धा वळसा घालून आमची बोट पलीकडल्या बाजूला असलेल्या धक्क्यावर गेली. बेटाला वळसा घालता घालता स्वातंत्र्यादेवीच्या पुतळ्याचे सर्व बाजूने दर्शन घडत गेले. मागून, पुढून व बाजूने अशा सर्व अंगांनी दिसणारे त्याचे सौष्ठव आणि सौंदर्य पाहून सारेजण विस्मयचकित होत असलेले त्यांच्या चेह-यावर दिसत होते. जेटीला बोट लागताच उतरून आम्ही बेटावर गेलो.
सहा हेक्टर क्षेत्रफळाचे हे पिटुकले बेट म्हणजे एक मोठा खडक आहे असे म्हणता येईल. युरोपियन लोकांचे ताफे जेंव्हा न्यूयॉर्कमार्गे अमेरिकेत यायला लागले तेंव्हा त्यातल्या कोणीतरी हे बेट काबीज करून घेतले. या ठिकाणी एक दीपस्तंभ बांधून येणा-या जहाजांना धोक्याचा इशारा दिला जाऊ लागला. हस्ते परहस्ते करीत ते सन १६६७ मध्ये बेडलो नांवाच्या गृहस्थाकडे आले आणि ऐंशी वर्षे त्या कुटुंबाकडे राहिल्यामुळे त्याच्या नांवानेच ते ओळखले जाऊ लागले. आणखी कांही हस्तांतरणानंतर अखेर ते सरकारी मालकीचे झाले. या जागी कधी क्षयरोग्यांची वसाहत बनवली गेली होती तर कधी छोटीशी लश्करी छावणी. त्या काळात या बेटावर अकरा कोन असलेल्या ता-याच्या आकाराची छोटी गढी सुध्दा बनवली होती.. सम १८७७ मध्ये स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा उभा करण्यासाठी या जागेची निवड करण्यात आली.
फ्रान्सच्या जनतेच्या वतीने अमेरिकन जनतेला ही अद्भुत भेट दिली गेली आहे. सुप्रसिध्द फ्रेंच शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्ता बार्तोल्दी याने याची निर्मिती केली. त्यासाठी आलेला खर्च फ्रेंच जनतेने वर्गणी काढून उभ्या केलेल्या निधीतून झाला. अमेरिकन सरकारने हा पुतळा बेडलो बेटावर उभारण्याची परवानगी दिली, पण त्यायाठी निधी मंजूर केला नाही. अमेरिकेतल्या पुलित्झर आदी प्रभृतींनी त्यासाठी वर्गणी गोळा केली. सुमारे दीडशे फूट उंच आणि सव्वादोनशे टन वजनाचा हा पुतळा जुलै १८८४ मध्ये तयार झाल्यावर त्याची तीनशे तुकड्यात विभागणी करून ते भाग दोनशेहून अधिक पेट्यात भरून समुद्रमार्गे अमेरिकेत पाठवण्यात आले. हा पुतळा उभारण्यासाठी दीडशे फूट उंचीचा म्हणजे सुमारे पंधरा मजले उंच असा मोठा चबुतरा बांधला गेला. त्यावर सर्व भागांची जोडणी करून ऑक्टोबर १८८६ मध्ये या पुतळ्याचे काम पूर्ण झाले. या पुतळ्याचे इतके वजन असले तरी तो आंतून पोकळ आहे. भरीव असता तर ते किती हजार टन झाले असते याची कल्पना यावरून येऊ शकेल. जहाजातून आणणे तर शक्यच झाले नसते आणि दुसरा कोणता मार्गही उपलब्ध नव्हताच.
या पुतळ्याच्या आंतल्या अंगाला एक मजबूत पोलादी सांगाडा आहे. प्रसिध्द आयफेल टॉवरचा निर्माता गुस्ताव्ह आयफेल याने तो तयार केला होता. तांब्याच्या पत्र्याचे अनेक भाग साच्याच्या सहाय्याने ठोकून तयार करून त्या सांगाड्यावर बसवले आहेत आणि एकमेकांना जोडून त्यातून अखंड आकृती तयार केली आहे. दीडशे फूट उंचीची हा प्रमाणबध्द पुतळा सर्वसामान्य माणसाच्या तीसपट एवढा मोठा आहे. म्हणजेच त्याचे नाक, कान डोळे वगैरे प्रत्येकी कांही फुटात असणार. त्याच्या चबुत-याच्या आंतल्या अंगाने वर जाण्यासाठी शिड्या आहेतच, त्यातून वर चढत लिबर्टीच्या मस्तकावरील मुकुटापर्यंत जाता येते. मुकुटाच्या डिझाइनमध्येच २५ खिडक्यांचा समावेश केला आहे. त्यातून सभोवतीच्या प्रदेशाचे विहंगावलोकन करता येते.
दक्क्यावर लाँचमधून उतरल्यानंतर आम्ही जेटीवरून चालत मुख्य बेटावर आलो. पुतळ्याच्या सर्व बाजूला प्रशस्त मोकळी जागा ठेवली आहे. आमच्या आधीच सेकडो पर्यटक तिथे येऊन पोचलेले होते. त्यामुळे अगदी जत्रेइतकी दाटी नसली तरी चांगली वर्दळ होती. बरोबर खाणेपिणे नेणे वर्ज्य असले तरी त्या ठिकाणी गेल्यावर ते विकणा-यांची रेलचेल होती. त्यामुळे तोंडात कांहीतरी चघळत किंवा हातातल्या बाटलीतले घोट घेत सगळे आरामात फिरत होते. आम्ही त्यात सामील झालो.
फिरता फिरता एका जागी थोडे लोक चबुत-याच्या आंतमध्ये प्रवेश करतांना दिसले म्हणून आम्ही तिकडे गेलो. पण त्या जागी एक चौकीदार होता आणि त्यांने आमच्याकडे तिकीट मागितले. तिथे आंत जाण्यासाठी वेगळे तिकीट होते असे तो म्हणाला. त्यासाठी तिकीट काढण्याची आमची तयारी होतीच, पण हे तिकीट त्या बेटावर मिळतच नाही, नावेत बसण्याआधी ऑफीसमधूनच ते काढायला हवे होते. पण तिकीटविक्रीच्या जागी तसे कांहीच लिहिलेले नव्हते आणि इतक्या दुरून आलेल्या आम्हाला ती जागा पाहू द्यावी वगैरे आम्ही त्याला सांगितले, पण तो बधला नाही. "तुम्ही वाटले तर परत गेल्यानंतर ऑफीसात जाऊन वाटेल तेवढे भांडू शकतो, पण आता कृपया मला माझे काम करू द्या." असे त्याच्या आडदांड आकाराच्या मानाने अत्यंत सभ्य शब्दात त्याने सांगितल्यामुळे आम्हाला चबुत-याच्या आंत जाऊन वरपर्यंत चढून जाता आले नाही. अमेरिकन व्यवस्थेला शिव्या घालत आणि ही गोष्ट आम्हाला आधी न सांगितल्याबद्दल सौरभला दोष देत आम्ही पुतळ्याची परिक्रमा चालू ठेवली. हे तिकीट किना-यावरसुध्दा काउंटरवर मिळत नाही. त्यासाठी खूप आधीपासून ऑनसाइन बुकिंग करावे लागते वगैरे माहिती हळूहळू कळत गेल्यानंतर त्याबद्दल कांही करणे आम्हाला शक्यच नव्हते हे लक्षात आले. विमानातून प्रवास केल्यानंतर उंचावरून खाली जमीनीवरले दृष्य पाहण्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्यामुळे त्याचे फारसे वाईट वाटले नाही.
युरोप अमेरिकेतल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळी असते तसे सॉवेनियर्सचे दुकान इथे होतेच, ते जरा जास्तच विस्तीर्ण होते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे चित्र काढलेल्या असंख्य प्रकारच्या शोभेच्या तसेच उपयोगाच्या वस्तू तिथे ठेवल्या होत्या. त्या पाहून त्यातली निवड करण्यात मग्न झालेल्या पर्यटकांची झुम्मड उडाली होती. आम्हाला पुढील प्रवासात जवळ ठेऊन घेता येईल अशी बेताच्या आकाराची मूर्ती घेऊन आम्ही बाहेर निघालो.

. . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: