Sunday, September 13, 2009

न्यूयॉर्कची सफर - ४ एलिस द्वीप


स्वातंत्र्यदेवतेच्या भव्य आणि सुंदर प्रतिमेचे सर्व बाजूंनी मनसोक्त अवलोकन करून घेतले. तिच्या स्मरणिका विकत घेतल्या, जिकडे तिकडे चोहिकडे आनंदीआनंदाने भारलेल्या वातावरणात कांही काळ स्वतःला डुंबून घेतले आणि मनसोक्त पेटपूजाही झाली. त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी आम्ही जेटीवर परत आलो. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीला जाण्यासाठी तिथे दोन वेगवेगळ्या रांगा होत्या. आम्ही न्यूजर्सीहून आलो असलो तरी न्यूयॉर्कमार्गे आलो होतो. त्यामुळे तिथेच परत जाणे आवश्यक होते म्हणून न्यूयॉर्कच्या रांगेत उभे राहिलो. थोड्याच वेळात आमची बोट आली. क्षुधाशांती झालेली असल्यामुळे अंगात सुस्ती आली होती आणि आता आजूबाजूला पहाण्यासारखे फारसे उरले नव्हते. खुर्च्यांवर बसकण मारून गप्पा मारत राहिलो. बोट सुटल्यानंतर पाचसहा मिनिटांमध्येच किना-याला लागली. "इथे ज्यांना उतरावयाचे असेल त्यांनी उतरून घ्यावे" अशा अर्थाची कसली तरी सूचना अर्धवट ऐकली आणि तिचा त्याहून कमी बोध झाला. येतांना न्यूयॉर्कहून निघून आम्ही थेट लिबर्टी आयलंडलाच पोचलो होतो. मध्ये कुठला थांबाच नव्हता. त्यामुळे "परत जातांना आपली उतरावयाची जागा किती पटकन आली" असे म्हणत आम्ही उभे राहिलो. बोटीतले जवळजवळ सर्वच पर्यटक खाली उतरत असल्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही सुध्दा पायउतार झालो. तो स्टॉप पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा वाटत असला तरी ते एवढ्या तीव्रतेने जाणवले नाही, पण किना-यावरल्या इमारती पहाता त्या फारच वेगळ्या दिसत होत्या. आपण भलत्याच जागी उतरलो आहोत याची खात्री पटली. पण तोपर्यंत आमची बोट पुढे चालली गेली होती. मुकाट्याने इतर उतारूंच्या पाठोपाठ चालत गेलो. हे एलिस आयलंड नांवाचे वेगळे बेट आहे आणि या जागेला भेट देण्याचा सहभाग आमच्या तिकीटात आहे असे थोडी चौकशी केल्यावर समजले.
एकादी मोठी नदी समुद्राला मिळते त्या जागी तिच्या प्रवाहाचे अनेक भाग होतात आणि वेगवेगळ्या वाटांनी जाऊन समुद्राला मिळतात. त्यामुळे त्या भागात पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश तयार होतो. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी या प्रवाहांत शिरून जमीनीची झीज घडवते आणि तिथली दगडमाती ओढून नेते. यातून अनेक लहान लहान खाड्यांचे जाळे तयार होते, तसेच सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले अनेक लहान लहान भूभाग तयार होतात. अशा बेटांच्या आडोशाला बोट उभी केली तर त्याला समुद्रातील लाटा आणि तुफानी वारे यापासून थोडे संरक्षण मिळते. न्यूयॉर्क हे हडसन नदीच्या मुखापाशी अशाच प्रकारे तयार झालेले एक नैसर्गिक बंदर आहे. तिथल्या समुद्रात अनेक लहान लहान बेटे आहेत. त्यातल्याच एका बेटावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा केला आहे. त्या बेटापासून जवळच हे एलिस बेट आहे. न्यूयॉर्क बंदरावर तैनात असलेल्या सैनिकांकडेच या सगळ्या बेटांच्या संरक्षणाची जबाबदारी असल्यामुळे त्यांचा अंतर्भाव न्यूयॉर्क या शहरात आणि राज्यात करण्यात आला. पिटुकल्या न्यूजर्सीच्या मानाने बलाढ्य असलेल्या न्यूयॉर्कने ती सारी बेटे आपल्या ताब्यात ठेऊन घेतली आहेत.
लिबर्टी द्वीप प्रत्यक्षात न्यूजर्सीच्या किना-यापासून जास्त जवळ आहे. त्यामुळे त्या जागेला वीज, पाणी वगैरे सुविधा जर्सी शहरातून दिल्या जाताच. अशा प्रकारे भौगोलिक कारणांमुळे ते बेट न्यूजर्सीचा भाग असल्यासारखे दिसत असले तरी ऐतिहासिक कारणांमुळे न्यूयॉर्कने त्यावरील आपला हक्क कधी सोडला नाही. एलिस आयलंड तर जर्सीला जास्तच जवळ आहे. एकंदर एक हेक्टर एवढ्या आकाराच्या या चिमुकल्या बेटाचे क्षेत्रफळ भरतीच्या वेळी कमी आणि ओहोटी आल्यावर जास्त होत असे. या बेटाच्या आसपास कोणाला मोती असलेले शिंपले सापडल्यामुळे त्याचे नांव लिट्ल् ऑइस्टर आयलंड असे पडले. पण ते मोती कांही फार काळ मिळाले नसावेत. एलिस कुटुंबाच्या ताब्यात हे बेट बराच काळ असल्यामुळे त्यांच्या नांवाने ते ओळखले जाऊ लागले.
त्याची मोक्याची जागा लक्षात घेऊन या बेटाचा एका महत्वाच्या कामासाठी उपयोग करून घ्यायचे ठरले. त्याच्या किना-यावरील दलदलीमध्ये भर टाकून त्यावर एक देखणी इमारत बांधण्यात आली. यानंतर इथले बांधकाम चाळीस पन्नास वर्षे चालले होते. जवळच्या न्यूजर्सीमधूनच त्यासाठी दगडमाती आणलेली असणार. ती वाहून नेण्यासाठी एक कामचलाऊ पूलसुध्दा बांधला होता. पण बेटावर कोठलेही वाहन न्यायचे नाही असे ठरले होते आणि लोक पायी चालत जाऊ लागले तर आपल्या धंद्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल या भीतीने नावा चालवणा-या लोकांनी चाव्या फिरवल्या. त्यामुळे हा पूल कधीच सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. हे बेट आपल्या राज्यात असल्याचा दांना न्यूजर्सीने केला आणि तो अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयात चालला. या बेटाचा सुमारे १५-२० टक्के असलेला मूळचा भाग न्यूयॉर्कमध्ये आहे आणि पाण्यात भर घालून बांधलेला ८०-८५ टक्के नवा भाग न्यूजर्सीमध्ये आहे असा निवाडा मिळाल्यामुळे त्यावर बांधल्या गेलेल्या इमारतींच्या कांही खोल्या एका राज्यातल्या एका महानगरात तर उरलेल्या खोल्या दुस-या अशी परिस्थिती आहे. या यगळ्याच इमारती फेडरल गव्हर्नमेंटच्या म्हणजे अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या मालकीच्या असल्यामुळे तिथला कारभार त्याच्या अखत्यारातच चालतो. सगळ्या प्रकारच्या सेवा अमेरिकेत खाजगी क्षेत्रात चालतात. यामुळे ही दोन राज्ये आणि दोन महानगरे यांचा शासकीय व्यवस्थेत कितपत सहभाग असतो कुणास ठाऊक.
सन १८९२ ते १९५४ च्या दरम्यान अमेरिकेत स्थलांतर करणा-या लोकांच्या नोंदणीचे काम या ठिकाणी केले गेले. त्यासाठीच एक भव्य इमारत बांधली गेली आणि ती आजसुध्दा उत्तम स्थितीत आहे. एकूण एक कोटी वीस लाख लोकांनी इथून अमेरिकेत प्रवेश केल्याची नोंद आहे. त्यात १९०७ या एकाच वर्षात दहा लाखांहून अधिक लोक आले. त्यात १७ एप्रिल या तारखेला एका दिवसात ११७४७ इतकी विक्रमी नोंद आहे. यावरून हे काम केवढ्या मोठ्या प्रमाणावर चालले होते याची कल्पना येईल. परदे्शातून आलेल्या प्रत्येक माणसाचे नांव, गांव, देश वगैरे माहिती लिहून तो अमेरिकेत कशासाठी आला आहे, कुठे जाणार आहे वगैरे चौकशी केली जात असे, तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अमेरिकेत प्रवेश देण्याबद्दल निर्णय घेतला जात असे. सरासरी सुमारे दोन टक्के लोकांना प्रवेश नाकारून त्यांची परत पाठवणी होत असे. यात कांही हजार दुर्दैवी लोकांना हकनाक प्राणाला सुध्दा मुकावे लागले. जगभरातल्या दीनदुबळ्यांनी या ठिकाणी यावे असे आवाहन करीत उभ्या असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पायाशी बसून काम करणा-या अधिका-यांनी आलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा असली तरी कसले तरी खुसपट काढून आलेल्या लोकांना माघारी पाठवण्यात अनेकांना धन्यता वाटत असे अशा तक्रारी सुध्दा झाल्या असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी एक कोटीहून अधिक लोक या ठिकाणी येऊन पुढे अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांचा वंशावळ वाढून आजच्या अमेरिकेतील दहा कोटी लोकांचे पूर्वज इथून आले असावेत असा अंदाज आहे.
या पुरातन कालीन पध्दतीच्या भव्य इमारतीत आज एक अनोखे म्यूजियम आहे. इथे येऊन गेलेल्या लोकांच्या सविस्तर नोंदी या ठिकाणी आहेतच, शिवाय त्या काळची छायाचित्रे, तसेच अनेक प्रकारची सचित्र आंकडेवारी, इथे येऊन पुढे नांवलौकिक कमावलेल्या मोठ्या आणि प्रसिध्द लोकांची माहिती वगैरे खूप मनोरंजक गोष्टी मोठमोठ्या फलकांवर मांडलेल्या आहेत. अनेक अमेरिकन लोक या ठिकाणी येऊन आपल्या पणजोबा किंवा खापरपणजोबांची नांवे शोधत असतात. एक प्रचंड आकाराचा पृथ्वीचा गोलसुध्दा ठेवला आहे. कोणकोणत्या काळात, जगातील कोणकोणत्या भागातून किती लोकांनी इथे स्थलांतर केले या माहितीवरून त्या भागाच्या इतिहासाची कल्पनाही येते. आम्हाला त्यात कांहीच व्यत्तीगत रस नसल्यामुळे असली माहिती भराभरा नजरेआड करून पूर्वीची छायाचित्रे, त्याकाळचे प्रवासात न्यायचे सामान वगैरे पहाण्यावर जास्त भर दिला. तासाभरात या संग्रहालयातली सगळी दालने पाहून आम्ही धक्क्यावर परत आलो आणि न्यूयॉर्कला जाणारी बोट घेतली.

No comments: