Wednesday, June 04, 2025

विस्फोटके आणि रॉकेट्स

सुमारे हजार बाराशे वर्षांपूर्वी चिनी लोकांनी गनपावडर (बारूद किंवा स्फोटक दारू) तयार करण्याचा शोध लावला. कोळसा, गंधक आणि सॉल्टपीटर नावाचे खनिज यांना कुटून एकत्र करून त्यात थोडासा मधासारखा चिकट पदार्थ मिसळून त्याचे गोळे  केले तर ते एक प्रकारचे ज्वालाग्राही पदार्थ किंवा सौम्य विस्फोटक होतात. त्यांना पेटवले तर ते काडेपेटीतल्या काडीसारखे स्वतः लगेच भडकतात आणि दुसऱ्या पदार्थांना आगी लावू शकतात.

प्राचीन काळातले चिनी लोकसुद्धा ज्वालाग्राही आणि स्फोटक पदार्थांपासून तयार केले जाणारे फटाके आणि रॉकेट्स यांचा उपयोग गंमत, मनोरंजन आणि उत्सवातला जल्लोश यासाठी करत होते. त्याचे लोण युरोपियन लोकांमध्ये पसरले आणि ते लोक नववर्ष, ख्रिसमस यासारखे सण फटाके उडवून साजरा करायला लागले. आजसुद्धा नववर्षाचे स्वागत आणि स्वातंत्र्यदिवस अशा समारंभात असंख्य रॉकेट्स हवेत उडवून नेत्रदीपक असे फायरवर्क केले जाते. त्यातील रॉकेट्सचे अनेक भाग असतात आणि रॉकेट हवेत उंच उडल्यानंतर त्यांचे स्फोट होऊन रंगीबेरंगी चमकत्या कणांचा प्रचंड वर्षाव करतात. आपल्याकडेही आजकाल लग्नाची वरात असू दे किंवा गणपती किंवा देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक असू दे त्यात भरपूर फटाके आणि रॉकेट्स हवेतच. दिवाळी तर आता मुख्यतः फटाक्यांचाच उत्सव झाला आहे.

 दिवाळीला उडवण्याच्या फटाक्याबद्दल कोणाला किती तांत्रिक माहिती असते? फटाक्याची वात पेटवून झटक्यात दूर व्हायचे कारण कोणत्याही क्षणी तो मोठ्याने धडाड्धुम् करेल आणि आपण जवळ असलो तर आपल्याला इजा होईल एवढेच सर्वांना माहीत असते. पण फटाक्याचा स्फोट क्षणार्धात का होतो ? फटाक्यामध्ये ज्वालाग्राही पदार्थाची ‘दारू’ भरलेली असते. पटकन पेट घेऊ शकणारे रासायनिक पदार्थ आणि ज्वलनासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूचा पुरवठा करणारी रासायनिक द्रव्ये त्यातच मिसळलेली असतात. त्यांच्या ज्वलनासाठी हवेतील प्राणवायूची आवश्यकता नसते. त्यामुळे वातीच्या जळण्यातून पुरेशी ऊष्णता मिळताच ते ज्वालाग्राही पदार्थ बंदिस्त जागेतसुध्दा पेट घेतात. त्यातून निर्माण होणाऱ्या ऊष्णतेने त्यातील आग लगेच पसरते आणि उपलब्ध असलेले सर्व स्फोटक द्रव्य जाळून टाकते. फटाक्यातली दारू बाहेर काढून त्यावर ठिणगी टाकली तर त्याचा भडका उडतांना दिसतो. यावेळी प्रखर असा जाळ भडकतो पण फारसा आवाज होत नाही किंवा स्फोट होत नाही. 


फटाक्याचा स्फोट घडवून आणण्याच्या दृष्टीने त्याची मुद्दाम खास प्रकारे रचना केलेली असते. त्यातील दारूला सर्व बाजूंनी कागदाच्या अनेक पापुद्र्यांचे घट्ट असे वेष्टण दिलेले असते. त्यामुळे आतल्या ज्वालाग्राही पदार्थांच्या ज्वलनातून निर्माण होणारे वायू लगेच त्या वेष्टणाबाहेर पडू शकत नाहीत आणि आत पुरेशी जागा नसते, यामुळे त्यांचा दाब निर्माण होतो, तसेच ज्वलनातून निर्माण झालेल्या ऊष्णतेने त्यांचे तापमान वाढत गेल्यामुळे त्यांचे आकारमानही वाढत जाते व त्यांचा दाब अधिकच वेगाने वाढत जातो. त्याचबरोबर वेष्टनाचा कागद आंतल्या बाजूने जळून कमकुवत होत जातो. ज्या क्षणी आतल्या वायूंचा दाब वेष्टणाच्या सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे जातो तेंव्हा ते कागदाचे वेष्टण टराटरा फाटून त्याच्या चिंधड्या उडतात आणि आत दबलेला अतिऊष्ण वायू सर्व बाजूंनी जोरात बाहेर पडतो. यामुळे हवेत मोठ्या लहरी निर्माण होतात. त्या ध्वनिरूपाने आपल्या कानांवर आदळतात. आतील वायू अतीशय तप्त झालेले असल्यामुळे त्वचेच्या संपर्कात आल्यास ते तिला भाजून काढतात.

आपल्याला हवा तेंव्हा फटाक्याचा स्फोट करता यावा यासाठी त्याला एक वात जोडलेली असते. ती वात एका ज्वालाग्राही पदार्थात भिजवलेली असते आणि मुख्य फटाक्याच्या मानाने ती हळूहळू जळते यामुळे आपल्याला दूर पळायला अवधी मिळतो. पेटवलेली वात जळत जळत फटाक्याच्या अंतर्भागात जाऊन ठिणगी टाकण्याचे काम करते. ही ठिणगी पडताच आतील रासायनिक पदार्थांचा भडका उडून स्फोट होतो. फटाक्यात निर्माण झालेली ऊर्जा वेष्टणाच्या आत साठत जाते आणि एकदम क्षणार्धात बाहेर येते. त्यालाच स्फोट म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ज्वलनातून निर्माण झालेली ऊर्जा कांही मर्यादेपर्यंत साठवून ठेऊन एकदम तिचा बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करून देणे हे विस्फोट घडवण्याचे मर्म असते. मग तो फटाका असो, सुरुंग असो किंवा बाँब असो. फटाक्याचा उद्देश फक्त एका प्रकारची धमाल करणे एवढाच असतो, सुरुंगाचा उपयोग कठीण असे खडक फोडण्यासाठी होतो आणि बाँबस्फोटांमागे विध्वंसक कृत्य करण्याची भावना असते. पण तीन्हींचे मुख्य स्वरूप समानच असते. त्यांमधील विस्फोटक द्रव्ये, त्यांचे कवच आणि त्यांना कार्यान्वित करणारी फ्यूज यांचे मात्र अनंत प्रकार निघाले आहेत.

स्फोटांमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा जेंव्हा कांही विशिष्ट कामासाठी उपयोग करायचा असतो तेंव्हा तिच्या बाहेर पडण्याच्या मार्गाला एक विवक्षित दिशा दिली जाते. तोफा, बंदुका वगैरेंमध्ये दारूच्या ज्वलनातून निर्माण झालेल्या ऊष्ण आणि उच्च दाबाच्या वायूंना त्या आयुधांच्या जाडजूड नलिकेमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो व त्या मार्गावर तोफेचा गोळा किंवा बंदुकीची गोळी ठेवलेली असते. स्फोटानंतर वेगाने बाहेर पडणारे वायू तिला जोराने बाहेर ढकलतात. सुरुवातीला नलिकेतून जातांना तिला जी दिशा मिळते त्याच दिशेने ती वेगाने बाहेर प़डते आणि दूरवर जाते. रॉकेटमधले तप्त वायू खालच्या दिशेने बाहेर पडतात आणि या क्रियेच्या प्रतिक्रियेमुळे रॉकेट वरच्या दिशेने आकाशात झेपावते. विमानांच्या जेट इंजिनातून तप्त वायू मागे फेकले जातात त्यामुळे विमान पुढे जाते. रॉकेटमधील इंधन अतीशय वेगाने लवकर जळते आणि जेट विमानाच्या इंजिनात ते बराच काळ थोडेथोडे जळत असते एवढा फरक त्या दोघात असतो. कार किंवा स्कूटरच्या इंजिनातसुध्दा ठराविक कालांतराने थोडे थोडे इंधन कार्ब्युरेटरद्वारे आत टाकले जाते आणि स्पार्क प्लगने दिलेल्या ठिणगीमुळे त्याचा स्फोट होऊन इंजिनाचा दट्ट्या (पिस्टन) पुढे ढकलला जातो. तो एका चाकाला जोडलेला असल्याने ते चाक स्वतः फिरते आणि गिअर्सच्या माध्यमातून गाडीची चाके फिरवते.

अशा प्रकारांनी विस्फोटांचा उपयोग विधायक कामासाठी केला जातो. इंजिने आणि टर्बाईन्समध्ये जळणाऱ्या इंधनांतून निर्माण होत असलेली ऊर्जा कामाला जुंपली जाते तर अणुभट्ट्यांमध्ये सूक्ष्म अणूंच्या विघटनांतून ती ऊर्जा मिळते. दोन्ही ठिकाणी निदान अणुरेणूंच्या पातळीवर इस्कोट होतच असतो. आज जे यंत्रयुग आपण पाहतो त्याची वाटचाल इंधनाच्या स्फोटांवर नियंत्रण ठेवता येण्याच्या मानवी कौशल्यातूनच होत आली आहे असेही म्हणता येईल. आणि अखेरीस हे स्फोटच त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल की काय अशी भीतीसुध्दा सर्वांच्या मनात आहे.

चिनी लोकांचे गनपॉवडर तयार करायचे तंत्र मंगोलांच्या मार्फत मध्य आशियातल्या तुर्क लोकांना मिळाले आणि त्यांच्याकडून ते युरोपियन लोकांनी शिकून घेतले. पुढील काळात त्यांनी त्यात इतर निरनिराळ्या ज्वालाग्राही रसायनांची भर घालून त्यातून अधिकाधिक विध्वंसक दारूगोळे बनवले, तसेच निरनिराळ्या धातूंच्या तोफा आणि बंदुका तयार केल्या आणि त्यांचा उपयोग करून दूरवर जोरदार मारा करण्याचे तंत्र विकसित होत गेले. अशा नव्या प्रकारच्या शस्त्रांचा उपयोग करून  आक्रमकांनी अनेक लढाया जिंकल्या आणि आपल्या सत्ता दूरवर पसरवल्या. 

धनुष्यातून सोडलेल्या बाणासारखे रॉकेटसुद्धा  सूँ SSSSS करत वेगाने सरळ समोर झेपावते आणि ते अग्नीच्या बलाने जाते म्हणून  रॉकेट या शब्दाला 'अग्निबाण' हा मराठी प्रतिशब्द दिला गेला असावा. पण खरे तर इंग्लिश भाषेतला रॉकेट हा शब्दच आजकाल अधिक प्रचलित आहे. अग्निबाणांचा किंवा रॉकेट्सचा उपयोग मुख्यतः तीन प्रकारे केला जातो, १.मनोरंजन, २.आयुध, ३.वाहन. या प्रकारांचा इतिहास आणि त्यात होत गेलेली प्रगति यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.


विमानाचा शोध फक्त शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच लागला असला तरी रॉकेटचा इतिहास खूप जुना आहे. चिनी लोकांनी तयार केले गनपॉवडरचे गोळे बाणाला लावून धनुष्यामधून सोडता येणारे फायर अॅरोज (अग्निबाण?) आणि भाल्याला बांधून फेकता येणारे फायर लान्सेस तयार करून त्यांचा काही युद्धांमध्ये उपयोग करण्यात आला. (आकृति -१) बांबूमध्ये किंवा नळकांड्यांमध्ये हे मिश्रण भरून उडवता येणारी रॉकेट्सही तयार झाली आणि काही प्रमाणात वापरली गेली. पण ती कदाचित मनोरंजनासाठीही  असावीत.


(आकृति - २) दिवाळीतल्या फटाक्यांमधले रॉकेट हे आपल्या ओळखीचे असणारे रॉकेटचे प्राथमिक रूप असते. त्यात भरलेल्या दारूमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि प्राणवायूचा पुरवठा करणारी रसायने यांचे मिश्रण असते. या रॉकेटची वात पेटवल्या नंतर वातीमधून ती आग या मिश्रणापर्यंत जाते आणि त्याचे क्षणार्धात ज्वलन होऊन त्यातून कार्बन डायॉक्साइड, सल्फर डायॉक्साइड यांच्यासारखे खूप आकारमान असलेले वायुरूप पदार्थ तयार होतात. रॉकेटच्या छोट्याशा पण भक्कम अशा पुठ्ठ्याच्या नळकांडीमध्ये ते कोंडले गेल्यामुळे त्यांचा दाब वाढत जातो. नॉझलच्या अरुंद वाटेने या वायूंचा झोत वेगाने बाहेर पडतो आणि त्याची प्रतिक्रिया त्या रॉकेटला विरुध्द दिशेने म्हणजेच वरच्या बाजूला वेगाने फेकण्यात होते. रॉकेटला जोडलेल्या लांब काडीमुळे त्याला एक दिशा मिळते आणि त्या दिशेने तो वर उडतो आणि हवेत झेपावतो. साध्या फटाक्यामध्ये या वायूला बाहेर पडायला वाट न मिळाल्यामुळे त्याचा दाब वाढत जातो आणि कागदी कवचाच्या चिंध्या उडवून तो बाहेर पडतो. त्याचा मोठा धमाका होतो. आजकाल मिळणाऱ्या रॉकेटांची रचना विशिष्ट प्रकाराने केलेली असते. त्यात अनेक कप्पे असतात. सर्वात खाली ठेवलेला कप्पा रॉकेटला उंच उडवतो. आकाशात गेल्यानंतर इतर कप्प्यातील स्फोटकांचा स्फोट होतो, त्याचा मोठा आवाज येतो आणि त्या कप्प्यात ठेवलेली रंगीत भुकटी पेट घेऊन सगळ्या बाजूंना पसरते. यामुळे आकाशातून रंगीत ठिणग्यांची असंख्य फुले पडत असल्याचे मनोहर दृष्य  दिसते.

युरोपमधल्या पुनर्जागरणाच्या काळानंतर (Renaissance) तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये प्रचंड वेगाने प्रगति झाली, अनेक प्रयोगशाळा आणि कारखाने सुरू झाले आणि त्यात निरनिराळे धातू, मिश्रधातू, रसायने वगैरे गोष्टी मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागल्या. त्यातून तयार होत गेलेल्या अधिकाधिक शक्तिशाली आयुधांमुळे त्यांचे सैनिकी सामर्थ्य वाढत गेले. काही युरोपियन लोकांनी रॉकेट्सही तयार केली आणि ते आपापसामधल्या युद्धांमध्ये त्यांचा वापर करत राहिले. अमेरिकन स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सैन्याविरुद्ध केलेल्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये दोन्ही बाजूंनी रॉकेट्सचा उपयोग  केला गेला होता. मैसूरचा सुलतान हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांनी भारतीय बनावटीची रॉकेट्स तयार केली, त्यात लोखंडाच्या नळकांडीमध्ये गनपावडर भरलेले असे. इंग्रजांच्या विरुद्ध झालेल्या लढायांमध्ये त्यांचा वापर केला गेला. (आकृति -३)


 दुरून सोडलेल्या आणि अचानक जवळ येऊन पडून भडकणाऱ्या या रॉकेटची आग आणि स्फोटाचा मोठा आवाज यामुळे शत्रूच्या सैन्यातले हत्ती, घोडे घाबरून बिथरत आणि इकडे तिकडे पळायला लागत, त्याच वेळी मुख्य सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढवला तर ते ती लढाई  जिंकू शकत. अशा प्रकारे रॉकेट्सचे काम मुख्य सैन्याला सहाय्य करण्याचे असे. पण रॉकेट्स तयार करायला खूप सामुग्री लागते, त्याला बराच खर्च येतो आणि रॉकेट एकदा उडवले की नष्ट होऊन जाते, ते पुन्हा वापरता येत नाही, त्याचा मारा अचूक नसतो. अशा कारणांमुळे पूर्वीच्या काळात त्यांचा उपयोग केला तरी तो मर्यादित प्रमाणावर केला जाऊ शकत असे. पहिल्या महायुद्धाच्या काळापर्यंत बहुतेक युद्धांमध्ये रॉकेट्सपेक्षा तोफांचाच जास्त वापर केला जात असे. त्यानंतर रॉकेटच्या शास्त्रात खूप प्रगति झाली असल्यामुळे अलीकडल्या लढायांमध्ये मात्र रॉकेट्सचे सुधारलेले रूप असलेले मिसाइल्स हे मुख्य शस्त्र झाले आहे.

बंदुका, तोफा आणि रॉकेट्स या गनपॉवडरसारख्या विस्फोटकांचा उपयोग करून चालवायच्या  तीन्ही शस्त्रांचा उपयोग दुरून शत्रूवर मारा करण्यासाठी केला जातो. त्यांचा पल्ला आणि विध्वंस करण्याची क्षमता यात मोठा फरक असतो. या तीन्हींमध्ये सुधारणा होतच गेल्या आणि अजून होत राहिल्या आहेत. एका वेळी एकच गोळी मारणाऱ्या बंदुकांच्या जागी धडाधडा गोळ्या मारणाऱ्या मशीनगन्स आल्या. अधिकाधिक दूरवर मारा करून प्रचंड विध्वंस करणाऱ्या तोफा तयार होत गेल्या, तसेच रॉकेट्सच्या बाबतीत क्रांतिकारक बदल होत गेले. युद्धात डागलेले तोफांचे गोळे किंवा रॉकेट्स यांचा मारा करतांना ते जिथे पडतील तिथे विध्वंस करू शकतात, पण युद्धात जिंकलेला प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी किंवा आक्रमकांना रोखण्यासाठी तिथे सैनिकांनीच लढायला पाहिजे. त्यांच्यासाठी बंदुका बाळगणे अपरिहार्य असते. तोफेच्या नळीतून गोळा बाहेर फेकण्यासाठी त्या नळीतच स्फोटकांचा स्फोट होऊन खूप मोठा दाब निर्माण होतो, त्या धक्क्याने एका दिशेने गोळा दूरवर फेकला जातो तर तोफेलासुद्धा मागे ढकलणारा तितकाच मोठा धक्का बसतो. तो रिकॉइल सहन करण्यासाठी तोफ खूप जाडजूड आणि वजनदार केलेली असते. किल्ल्यांवर संरक्षणासाठी ठेवलेल्या तोफा एका जागी ठेवलेल्या असतात, पण रणांगणावर नेण्यासाठी त्यांना एक मजबूत गाडा पाहिजे. पूर्वीच्या काळात त्यांना ओढून नेले जात असे. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यासाठी रणगाडे तयार करण्यात आले. दोन्ही महायुद्धांमध्ये त्यांचा भरपूर उपयोग केला गेला आणि आजसुद्धा सैन्याची मारक क्षमता वाढवण्यासाठी अधिकाधिक अद्ययावत असे रणगाडे तयार केले जात आहेत. पण ते मुख्यतः फक्त जमीनीवरील लढायांसाठी उपयुक्त असतात. 


रॉकेटच्या आतच स्फोटकांचा स्फोट होऊन त्यात जो वायूंचा दाब निर्माण होतो त्यामुळे एका दिशेने त्या वायूचा झोत बाहेर पडतो आणि त्याच्या उलट दिशेने ते रॉकेट फेकले जाते. ते रॉकेट ज्या वाहनावर ठेवलेले असते त्याला ते फार मोठा झटका देत नाही. या कारणामुळे  रॉकेट हे शस्त्र सैन्य, नौदल आणि हवाईदल या तिघांसाठी उपयुक्त ठरू शकते.(आकृति-४) जसा जमीनीवरील काही युद्धांमध्ये रॉकेट्सचा उपयोग केला गेला होता त्याचप्रमाणे काही वेळा समुद्रावरील दोन नौकांच्या युद्धातसुद्धा रॉकेट्सचा उपयोग केला जात होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये दोन्ही बाजूंनी रॉकेट्सचा उपयोग केला गेला. त्यात रॉकेटमध्ये बसवलेल्या बाँबचा स्फोट होऊन त्यातून विध्वंस होत असे. एका वेळी अनेक रॉकेट्सचा मारा करणारी यंत्रे चिलखती ट्रकवर किंवा टँकवर बसवून त्यांच्याकडून जमिनीवरच्या लढाईत शत्रूच्या ठिकाणावर बाँब्सचा भडिमार केला गेला. नौदलाच्या नौकांमधून किनाऱ्यावरच्या शहरांवर किंवा समुद्रातल्या शत्रूच्या नौकांवर बाँबिंग केले गेले, विमानामधून जमीनीवरील  लक्ष्ये किंवा हवेतील शत्रूची विमाने यांच्यावर रॉकेट्सचा मारा केला गेला. काही वेळा जमीनीवरून उडवलेल्या रॉकेटने आकाशातल्या विमानांचाही वेध घेतला जात होता. अशा प्रकारे रॉकेट्सचा उपयोग जमीन, समुद्र आणि आकाश या तीन्ही ठिकाणच्या युद्धांमध्ये केला गेला.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात रॉकेटवरील संशोधनावर  जास्तच भर दिला गेला. त्यातून गाइडेड मिसाइल हे नवे अत्यंत परिणामकारक किंवा घातक असे शस्त्र निर्माण झाले आणि त्याचा विकास होत राहिला. पूर्वीची रॉकेटे एकदा अंदाजाने उडवली की ती नेमकी कुठे जाऊन पडतील ते नक्की सांगता येत नव्हते. इलेक्ट्रॉनिक्स आणि काँप्यूटर यांच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगति होत गेली. त्यामुळे उडवलेल्या रॉकेटवर काही उपकरणे बसवून ते आकाशात उडत असतांनाही त्याचे नियंत्रण करता येणे शक्य झाले. या मिसाइल्सचा आकार एरोडायनॅमिक्सचा विचार करून केलेला असतो. त्यांची समोरची बाजू निमुळती असते आणि मागच्या बाजूवर स्थैर्य देण्यासाठी फिन्स बसवलेल्या असतात. उपग्रहांमधून मिळालेल्या जीपीएससारख्या  माहितीचा उपयोग करून घेऊन ते क्षेपणास्त्र (मिसाइल) त्याला दिलेल्या आज्ञेनुसार अचूक जागी जाऊन पोचणे शक्य झाले. एकादे विमान पाडायचे असल्यास त्याच्या दिशेने सोडलेले मिसाइल त्या चालत्या विमानाचा वेध घेत त्याच्या मागे जाऊन नेमके त्याच्यावर आदळते. इतकेच नव्हे तर प्रचंड वेगाने येत असलेल्या शत्रूच्या रॉकेटला आधीच हवेतच गाठून त्याचा खातमा करणारी मिसाइल्सही आता तयार झाली आहेत. या मिसाइल्सवर विध्वंसक बाँबगोळे ठेवलेले असतात आणि ती त्यांना दिलेल्या लक्ष्यावर जाऊन कोसळून त्या लक्ष्याचा धुव्वा उडवतात, त्यात जमीनीवरील ठिकाणे असतील, आकाशातून उडणारी विमाने किंवा मिसाइल्स असतील किंवा समुद्रातून चाललेली जहाजे किंवा पाणबुड्याही असू शकतील. आता तर चक्क अवकाशात फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहालासुद्धा निकामी करण्याची क्षमता निर्माण झाली आहे असे सांगितले जाते. हजारो किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी जाऊन पडण्याची क्षमता असलेली इंटर काँटिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स (आयसीबीएम) तयार झाली आहेत.(आकृति -५) या मिसाइलमध्ये अनेक स्टेजेस असतात आणि ती क्रमाक्रमाने गळून पडून मुख्य गाभा अंतिम लक्ष्यावर जाऊन पोचतो. ती अणूबाँबने सज्ज असतात आणि इतक्या दूरवरच्या ठिकाणांवर ते बाँब टाकून तिथे सर्वनाश करू शकतात. 


वरील सर्व प्रकारांमध्ये रॉकेटचा उपयोग स्फोटक पदार्थांना उचलून घेऊन जाण्यासाठीच होतो, या अर्थी तीही वाहक असतात, पण उपग्रहांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या खास अग्निबाणांना सॅटेलाइट लाँचिंग  व्हेइकल म्हणजे 'उपग्रहांना उडवण्याचे वाहन' असे म्हंटले जाते. या उपग्रहांना पृथ्वीभोवती फिरत राहण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून खूप दूर अंतरिक्षामध्ये नेऊन सोडायचे असते. सर आयझॅक न्यूटन यांनी ज्या काळात गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडला तेंव्हा जमीनीवर चालणारे कोठलेही स्वयंप्रेरित वाहनसुद्धा उपलब्ध नव्हते. त्यामुळे आकाशात उडवलेल्या वस्तूला ती आकाशात गेल्यानंतर कोठलेही बाह्य बल मिळणार नाही असे गृहीत धरले होते. त्याचप्रमाणे तिला वाटेत होणाऱ्या हवेच्या अडथळ्याचाही विचार केलेला नव्हता. पृथ्वीपासून जसजसे दूर जाल तसतसे तिचे गुरुत्वाकर्षण कमी कमी होत जाते. एवढ्याच एका कारणाचा विचार केला होता. जमीनीवरून एकाद्या वस्तूला एक जोराचा फटका देऊन दर सेकंदाला सुमारे ११००० मीटर इतक्या वेगाने आभाळात उडवून दिले तर ती वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर परत येणार नाही. एवढाच निष्कर्ष त्या वेळी सोप्या गणितातून काढला गेला होता. त्या वेगाला एस्केप व्हेलॉसिटी असे नाव दिले गेले.  

पण दर सेकंदाला अकरा कि.मी. म्हणजे तासाला चाळीस हजार कि.मी. एवढ्या प्रचंड वेगाने एकादी वस्तू हवेतून जायला लागली तर तिला हवेकडून होणाऱ्या प्रचंड विरोधामुळे त्या वस्तूची गती कमी होत जाणारच. हवेच्या विरोधातल्या घर्षणामुळे त्यातून ऊष्णता निर्माण होते आणि त्या वस्तूचे तापमान वाढत जाते. तापवल्यानंतर लोखंडसुध्दा मऊ होते, वितळते आणि जळून त्याचे भस्म होऊ शकते. अतिशय वेगाने पृथ्वीवर पडणाऱ्या बहुतेक उल्का याच कारणाने हवेतच जळून नष्ट होतात आणि जमीनीपर्यंत पोचतच नाहीत. त्याचप्रमाणे अतीशय वेगवान असा अग्निबाण वातावरणातून बाहेर निघण्यापूर्वीच जळून नष्ट होण्याचा धोका असतो. शिवाय रॉकेट जमीनीवरून हवेत उडाल्यानंतर त्याला पूर्ण वेग घेण्यासाठी कमीत कमी कांही क्षण लागतीलच. तेवढ्या अवधीतसुद्धा  गुरुत्वाकर्षण आणि हवेच्या अवरोधाने त्याची गती कमी होत जाणार. 

अशा सगळ्या कारणांमुळे अंतराळात जाणाऱ्या रॉकेटने एका झटक्यात एस्केप व्हेलॉसिटी गाठावी यासाठी प्रयत्न केला जात नाही. त्या रॉकेटमध्येच निदान दोन तीन स्टेजेस असतात. जमीनीवरून उडतांना त्यातल्या पहिल्या स्टेजमधला सगळा जोर क्षणार्धात न लावता तो इंजिनाप्रमाणे काही क्षण सतत लावला जातो. रॉकेटमधून बाहेर पडणाऱ्या ऊष्ण वायूच्या झोताची प्रतिक्रिया त्याची गती वाढवत नेत त्याला पृथ्वीपासून कित्येक कि.मी. इतक्या उंचीवर नेते. तोपर्यंत पहिल्या स्टेजचे इंधन जळून जाते. तेंव्हा आकाराने सर्वात मोठ्ठा असलेला पहिला भागही रॉकेटपासून विलग होतो. रॉकेटचा पहिला भाग आणि त्यातले इंधन दोन्ही वगळले गेल्यामुळे उरलेल्या रॉकेटचे वजन बरेचसे कमी होते, तसेच हवा अत्यंत विरळ झालेली असल्यामुळे तिचा विरोध जवळ जवळ मावळलेला असतो. त्यानंतर योग्य त्या क्षणी त्याची दुसरी स्टेज आणि त्यानंतर तिसरी स्टेज कार्यान्वित केली जाते. अशा टप्प्याटप्प्यांमधून मिळालेल्या अधिकाधिक ऊर्जेने  त्या रॉकेटचा वेग वाढत जातो आणि तो एस्केप व्हेलॉसिटीहून अधिक होतो.

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून रॉकेटला अवकाशात सोडणे आणि त्याच्या सोबत पाठवलेल्या उपकरणांनी अवकाशातून पाठवलेले संदेश पृथ्वीवर ग्रहण करणे शक्य झाल्यानंतर ते किती उंच गेले आहे हे समजणे शक्य झाले. तसेच पृथ्वीकडे दुरून पाहण्याची एक नवी दृष्टी मानवाला प्राप्त झाली. अंतराळात राहून आणि या दिव्यदृष्टीचा उपयोग करून घेऊन पृथ्वीवरील माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. रशिया, अमेरिका आणि भारतासह इतर अनेक देशांनी आपापले कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडणे सुरू केले आणि त्यांची संख्या वाढतच चालली आहे. या उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग आधी मुख्यतः संरक्षण, हवामान, भूसर्वेक्षण आदि  सरकारी विभागांसाठी केला जात होता. उपग्रहामार्फत संदेशवहन सुरू झाल्यावर त्याचा उपयोग दूरचित्रवाणी, दूरध्वनी, आंतर्जाल, जीपीएस वगैरे माध्यमातून आम जनतेसाठी होऊ लागला आहे. यामुळे आता खाजगी क्षेत्रातल्या उद्योजकांनीही आपापले उपग्रह उडवून पृथ्वीभोवती फिरत ठेवले आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यानेही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला अग्रक्रम दिला आणि त्यात अंतरिक्षाच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान दिले. (आकृति-६) डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतरिक्षसंशोधनाचा श्रीगणेशा झाला. नवनवे प्रयोग करीत आणि अडचणीतून मार्ग काढीत भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी या तंत्रज्ञानाचा विकास करून वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट्स आपल्या देशातल्या कारखान्यांमध्ये तयार करवून घेतली. या काळात आपल्या देशातल्या यंत्रोद्योगाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली तिचाही फायदा मिळाला. 

साध्या गनपॉवडरपासून मिळू शकणारी शक्ती अशा शक्तिशाली रॉकेट्ससाठी पुरेशी नसते. त्यांच्यासाठी खास प्रकारची इंधने वापरली जातात, त्यांना प्रोपेलंट म्हणतात. त्यातही सॉलिड, लिक्विड, क्रायोजनिक, मिक्स्ड वगैरे प्रकार आहेत. रॉकेटमधील इंधनातच प्राणवायूचा पुरवठा करणारी रसायने असतात.  क्रायोजिनिक रॉकेटमध्ये तर द्रवरूप  प्राणवायू (लिक्विड ऑक्सीजन) वापरला जातो. रॉकेट उडतांना हवेच्या घर्षणामुळे त्याचे तापमान खूप वाढते आणि अवकाशात गेल्यावर ते खूप कमी होते. या दोन्ही प्रकारच्या प्रतिकूल तापमानात टिकून राहण्यासाठी रॉकेटचे कवच विशिष्ट मिश्रधातूंपासून तयार केले जाते. प्रयोगशाळांमध्ये संशोधन करून खास इंधने, मिश्रधातू आणि विशिष्ट उपकरणे वगैरे सगळे तयार केले गेले. या रॉकेट्सना अधिकाधिक शक्तीशाली बनवत नेऊन रोहिणी, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही यांच्यासारख्या सक्षम रॉकेट्सची निर्मिती केली गेली. त्यांना उडवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तळ (रॉकेट लाँचिंग स्टेशन्स) बांधले. (आकृति-७) रॉकेट्सबरोबर कोण कोणती खास उपकरणे अवकाशात पाठवायची ते ठरवून ती जागतिक बाजारपेठेमधून मिळवली किंवा मुद्दाम तयार करवून घेतली. उडवलेल्या रॉकेट्समधून  आणि उपग्रहांमधून मिळणारे संदेश ग्रहण करणे आणि त्यांचा सुसंगत अर्थ लावून व त्याचे विश्लेषण करून त्या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणे यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा उभी केली.

ही उपग्रहांना घेऊन उडणारी रॉकेट्स म्हणजे अनेक रॉकेट्सचा समूह असतो. ती प्रचंड आकारांची असतात. भारतीय रॉकेट्सच ४०-४५ मीटर उंच म्हणजे चारपाच मजली इमारतींएवढी उंच असतात आणि उड्डाण घेतांना त्यांचे वजन तीन सव्वातीनशे टन इतके असते. जगातील सर्वात मोठ्या रॉकेटची उंची शंभर सव्वाशे मीटर म्हणजे दहा बारा मजली इमारतींएवढी आणि वजन शेकडो टन इतके असते. हाताच्या बोटाएवढे छोटे दिवाळीच्या फटाक्यातले रॉकेट यापासून दहाबारा मजले उंच असलेले सॅटर्न किंवा स्टारशिप यांच्या सारखे अजस्त्र अग्निबाण या सगळ्यांचा समावेश रॉकेट्समध्ये होतो. या लेखात त्यांची ही संक्षिप्त तोंडओळख करून दिली आहे.


Tuesday, April 29, 2025

फांदी ती पडली शेजारची

मी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या न्यूजर्सी स्टेटमधील एका लहानशा खेडेगावात चार महिने राहून आलो होतो. आमच्या बंगल्याच्या आजूबाजूला चांगली चारपाचपट मोकळी जागा आहे, त्यामुळे तिथे अंगणही आहे आणि परसही आहे. त्या संकुलातल्या सगळ्याच बंगल्यांच्या आवारात भरपूर मोकळ्या जागांमध्ये  मोठमोठी  आणि खूप उंच उंच अशी असंख्य झाडे आहेत. त्या झाडांच्या जंगलात अधूनमधून घरे बांधली असावीत असेही म्हणता येईल. ती सगळी मेपल, ओक यासारखी माझ्या ओळखीची नसलेली अमेरिकेतली झाडे आहेत. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक प्रशस्त पडवी आहे. तिथे आणि बागेतही खुर्च्या ठेवल्या होत्या.  मी दिवसातला बराचसा वेळ तिथेच बसून रहात असे.

त्या वेळी तिथे उन्हाळा असला तरी पावसाळासुद्धा होता. क्षणात येते सरसर शिवरे क्षणात फिरुनी ऊन पडे असा ऊनपावसाचा लपंडाव चाललेला होता. त्यात एकदा थोडा जोराचा वारा आणि पावसाची झड लागली होती. तिचा जोर कमी झाल्यावर आम्ही गरमगरम कांद्याची भजी आणि चहा यांचा आस्वाद घेत आमच्या घराच्या मागच्या बाजूच्या पडवीमध्ये बसलो होतो. मागच्या परसात नजर गेली तर एक अवाढव्य फांदी जमीनीवर पसरलेली दिसली. ही कुठून आली म्हणून लक्ष देऊन पाहिले तर आमच्या शेजाऱ्याच्या अंगणातल्या एका पन्नास साठ फूट उंच झाडाची  फांदी म्हणण्यापेक्षा वर जाणाऱ्या तीन खोडांपैकी एक उभे खोड आडवे होऊन त्याच्या काही फांद्यांसह आमच्या भागात पडले होते. त्याचे एक टोक पंधरावीस फूट उंचावर अजून मुख्य झाडाला जुळलेले होते, पण चांगला पंचवीस तीस फूट लांबीचा त्याचा विस्तार त्याच्या अनेक फांद्यांसह खाली वाकून आमच्या परसातल्या जमीनीवर टेकला होता.  त्या वेळी सुटलेला वारा तितकासा भन्नाट नव्हता आणि तेवढे एक झाड सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला जरासुद्धा धक्का लागलेला दिसत नव्हता. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचे आश्चर्यच वाटले. ही एवढी मोठी फांदी पडल्याचा आवाजही कुणाच्याही कानावर आला नव्हता. ती केंव्हा पडली होती कोण जाणे?


सत्यभामेने स्वर्गातून आणलेले पारिजातकाचे झाड हौसेने आपल्या दारासमोर लावले होते, त्या झाडाला फुलांचा बहरही आला होता, पण अवखळ वारा त्या नाजुक फुलांना उडवून शेजारी राहणाऱ्या रुक्मिणीच्या अंगणात त्यांचा सडा घालत होता. त्यामुळे उद्विग्न होऊन सत्यभामा "बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी?" असा विलाप करत होती. ती फुले पाहून रुक्मिणीला मनातून आनंद झाला असेल, पण आम्हाला मात्र ही अवाढव्य फांदी तुटून आपल्या अंगणात पडल्याने कणभरही आनंद झाला नाही. ते झाड आमच्या मालकीचे नसल्यामुळे त्याचे जास्त दुःखही झाले नाही. त्या झाडाच्या मालकाला म्हणजे आमच्या शेजाऱ्याला तर या गोष्टीचा पत्ताही लागला नव्हता.  


आमचे अर्धे अंगण व्यापून अस्ताव्यस्त पसरलेले ते धूड बाजूला कसे करायचे ? हाच विचार आम्हाला सतावत होता. ते ज्या भागात पडले होते तिथे आमची फुलझाडे किंवा भाजीचा वाफा नव्हता, तिथे आपोआप उगवलेले रानटी गवतच होते, त्यामुळे तसे आमचे काहीच नुकसान झालेले नव्हते. ते कसले अमेरिकन झाडे होते हेही आम्हाला माहीत नव्हते. ते खोड, त्याच्या फांद्या आणि पाने यांचा आम्हाला तर काही उपयोग नव्हताच आणि असला तरी शेजाऱ्याच्या मालकीची वस्तू फुकट मिळते म्हणून ठेऊन घ्यायची तर आम्हाला बिलकुल इच्छा नव्हती. पण ते खोड आणि त्या फांद्यांची विल्हेवाट लावायसाठी काँट्रॅक्ट द्यायचे असेल तर ते किती डॉलरना पडेल याचा विचार अस्वस्थ करत होता. त्याबद्दल आपण काहीही करायच्या आधी त्या झाडाच्या मालकाला त्या पडलेल्या फांदीची माहिती देणे हे पहिले काम करायचे असे ठरवले.

शेजारच्या बंगल्याचा मालक संध्याकाळी घरी आल्यावर त्याला भेटून पडलेल्या फांदीबद्दल सांगितले. त्या समजूतदार भल्या माणसानेही तिला पाहून सांगितले की त्याच्या ओळखीच्या कुणा ट्रीमॅनला सांगून तो आमची जागा मोकळी करून देण्याची व्यवस्था करून देईल. त्यामुळे आमच्या मनावरचे ओझे हलके झाले. हे काम व्हायला दोन चार दिवस लागणार होते, त्याला आमची काहीच हरकत नव्हती. 

दोन दिवसांनंतर सकाळी सकाळी आमच्या दुसऱ्या बाजूच्या शेजारच्या बंगल्याच्या आवारामधून भयानक कर्कश आवाज यायला लागले. मी पडवीत जाऊन पाहिले तर तिथे एक अजस्त्र आकाराचे यंत्र आणून ठेवले होते ते जोरजोरात आवाज करीत होते. तीन चार मजल्यांच्या अवैध इमारती मोठ्या जेसीबींनी पाडल्या जात असल्याचे काही व्हीडिओ मी अलीकडे पाहिले होते, तशाच प्रकारचे हे यंत्र होते.  एरवी आडवा करून ठेवला जात असणारा त्याचा पंधरावीस फूट लांब दणकट बाहू उभा केला होता आणि त्याला जोडलेला पंधरावीस फुटांचा हात आणि त्याच्या पुढे सातआठ फुटांचा पंजा उभा आडवा, तिरपा कसाही होऊ शकत होता. त्याला जोडलेल्या एका करवतीसारख्या हत्याराने समोरच्या झाडाच्या उंचीवरल्या फांद्यांना कराकरा कापून ते यंत्र त्यांना जमीनीवर आणून ठेवत होते आणि तिथे उभे असलेले पाचसहा मजूर ते फांद्यांचे तुकडे उचलून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रेलरमध्ये नेऊन टाकत होते. वीसपंचवीस फांद्यांना छाटून त्यांचे तुकडे करून त्यांनी  बघताबघता ते संपूर्ण झाड कापून टाकले. सकाळी जिथे चाळीसपन्नास फूट उंच आणि जवळजवळ तितकाच रुंद असा एक मोठा वृक्ष उभा होता ती जागा संध्याकाळच्या आतच पूर्णपणे रिकामी झाली होती. अमेरिकेमध्येही यासंबंधी कायदे असणार आणि त्या लोकांनी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या असतीलच. आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने किती लीलया वृक्षतोड करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक मला इथे पहायला मिळाले. आमच्या घराच्या अंगणात पडलेली एक फांदी हलवणे हे तर अशा यंत्रासाठी फारच किरकोळ काम होते.

आमच्या दुसऱ्या बाजूच्या शेजारी आलेले झाड तोडायचे जंगी यंत्र आपले काम संपवून परत गेले. ते धूड आमच्या अंगणाकडे येऊ शकेल इतका रुंद रस्ता किंवा बंगल्याचे फाटकही नव्हते त्यामुळे त्याला थोड्या वेळासाठी इकडे वळवण्याचा प्रश्नच नव्हता. पण लहान आकाराचे तसेच एखादे यंत्र आणावे लागेल असे मला वाटले होते. दोन तीन दिवस काहीच हालचाल झाली नाही तेंव्हा आमच्या झाडाच्या मालकाला आठवण करून दिली तेंव्हा त्याने सांगितले की शनिवारी सकाळी तो स्वतःच यांत्रिक करवत घेऊन येणार आहे. त्याप्रमाणे तो आपल्या सातआठ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन शनिवारी सकाळी आमच्या अंगणात हजर झाला.


त्याने आपली करवत चालवून दोन तीन लहान फांद्यांना वेगळे केले, पण नंतर ते यंत्र बंद पडले. कदाचित त्यातले इंधन संपले असेल असे म्हणून त्याने त्या यंत्राची टाकी फुल करून आणली, पण तरीही त्याच्या चाकांनी फिरायला ठाम नकार दिला. मग तो गृहस्थ घरी गेला आणि एक मोठी कुऱ्हाड घेऊन आला. कुऱ्हाडीने अंगणातले झा़ड तोडायची परंपरा तर जॉर्ज वॉशिंग्टनपासून चालत आलेली आहे, पण आजच्या काळातला हा तरुण त्या कलेत इतका निपुण असेल याची कल्पना आम्हाला नव्हती.  त्याने सटासट घाव घालून  मुख्य खोडातून निघालेल्या सगळ्या लहान फांद्या तोडून टाकल्याच, मुख्य खोडाच्याही अर्ध्याहून अधिक भागाचे तुकडे तुकडे केल्यावर उरलेला पंधरा फुटांचा ओंडका वरच्या बाजूने त्या झाडाला चिकटलेला होता. त्याला जमीनीवर उभे राहून तोडणे शक्यच नव्हते.


फांद्या तोडून आणि पाने बाजूला केल्यानंतर आम्हाला ते खोड दिसले. ते तर आतून पूर्णपणे पोकळ झालेले होते. वाळवीसारख्या किड्यांनी त्याला पोखरून टाकले होते. त्यामुळे ते खोड फांद्यांच्या वजनाने आणि वादळी वाऱ्याच्या धक्क्याने तुटून खाली आले होते, पण एका बाजूने मुख्य झाडाला चिकटलेले होते.  दुसरे दिवशी शेजाऱ्याचा मित्र ट्रीमॅन एक चांगली यांत्रिक करवत घेऊन आला आणि त्याने झाडावर चढून ती फांदी कापून टाकली. त्यातून निघालेले ओंडके आमच्याने जागचे हलवतासुद्धा येत नव्हते, पण त्या अमेरिकन बाहुबलींनी त्यांना उचलून बागेच्या बाहेर नेले आणि ट्रकमध्ये घालून कुठे तरी पाठवून दिले. तो सगळा पोकळ झालेला भाग  यांत्रिक करवतीने कापून टाकल्यावर उरलेले झाड उभे दिसत तर होते, पण त्याची इतर खोडे किती मजबूत होती की तीही आतून पोकळ झाली होती कोण जाणे. या घटनेतून मला एक वेगळ्या प्रकारचे काम केले जात असतांना पहायचा अनुभव  मिळाला.





Monday, April 28, 2025

मी आहे तरी कोण ??? - भाग ४

 मी आहे तरी कोण ??? 

मी लहानपणापासून परंपरागत संस्कारांमध्ये वाढलो असलो तरी तथाकथित धार्मिक रूढींवर आणि कर्मकांडांवर माझा विश्वास बसत नव्हता. त्यांचा अध्यात्माशी काहीही संबंध नाही असेच मला वाटत आले आहे. त्यामुळे मी 'अध्यात्म' हा शब्द असंख्य वेळा ऐकला असला तरी नेमके कशाला अध्यात्म म्हणतात या विषयी मला गूढ वाटत होते. ते निवांतपणे थोडेसे समजून घ्यावे म्हणून मी चार वर्षांपूर्वी यू ट्यूबवर काही प्रवचने ऐकायचा प्रयत्न केला होता. "माझे शरीर, माझे मन, माझ्या भावना, माझी कीर्ती, माझा मीपणा" वगैरे म्हणणारा हा 'मी' कोण असतो, (कोSहम्) हा प्रश्न पुराणकालापासून अनेक महान तत्वज्ञानी विचारत आले आहेत आणि ऋषीमुनींपासून ते आधुनिक काळातल्या कित्येक संत महंत विद्वानांनी  याची खूप विस्ताराने उत्तरे दिली आहेत. मी त्यातली अत्यल्प अशी काही उदाहरणे ऐकायचा प्रयत्न केला. इतर सगळे विचार बाजूला ठेवून एकाग्रचित्ताने अंतर्मुख होऊन विचार केला आणि तुमची पात्रता असली तर ते तुमचे तुम्हाला समजेल असे काही तरी हे महात्मे सांगत होते. काही लोकांनी तर असेही सांगितले की ज्याला हे नीट समजले आहे असा गुरु तुमच्या पूर्वसंचितातून तुम्हाला मिळाला तरच आणि  तोच तुम्हाला अध्यात्माची वाट दाखवू शकेल. बहुतेक वेळा ती प्रवचने माझ्या डोक्यावरूनच गेली.  मला कधी या निर्गुण निराकार अगम्य आणि अदृष्य अशा अंतरात्म्याचा शोध घेण्याची मनापासून ओढही लागली नाही. त्यापेक्षा या जगातलेच निरनिराळे लोक मला कोण समजत आले असतील किंवा माझे मलाच मी कोण असावा असे वाटत गेले होते हे पहायला थोडे सोपे आहे असे वाटले होते म्हणून मी फेसबुकवर एक लेखमाला सुरू केली होती आणि ती तब्बल दोन तीन वर्षे चालवली होती. त्यातले काही भाग एकत्र करून मी  ते  "मी आहे तरी कोण ??? - भाग १, २, ३" मध्ये प्रकाशित केले होते. ते इथे वाचावेत. 

भाग १ : https://anandghan.blogspot.com/2021/04/blog-post.html

भाग २ : https://anandghan.blogspot.com/2021/12/blog-post.html

भाग ३ : https://anandghan.blogspot.com/2022/08/blog-post.html

त्यानंतर काही कारणाने त्यात खंड पडला. मधल्या काळात माझा जुना संगणक बंद पडला होता आणि नव्या संगणकात जुन्या फाइली भरतांना त्यातल्या काही फाइली कुठेतरी हरवून गेल्या होत्या. मी ते सगळे विसरून गेलो होतो आणि मला दुसरे काही आकर्षक विषय मिळाले होते म्हणून मी तिकडे वळलो होतो. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला त्या जुन्या लेखांची आठवण करून दिली. मी त्यानंतर लिहिलेल्या स्फुटलेखांचा गठ्ठा मला शोधाशोध केल्यावर सापडला. त्यावर थोडा हात फिरवून मी हा चौथा भाग तयार केला आहे. या सगळ्या पन्नास वर्षांपूर्वीच्या घटना असल्यामुळे त्यांच्या तपशिलात काही फरक पडण्याची शक्यता नव्हतीच. हे लिखाण तेंव्हा जसे होते तितकेच आजही आहे.


मी आहे तरी कोण ? असा प्रश्न तर बहुतेक सर्वांनाच पदोपदी पडत असणारच. माझ्या शाळा आणि कॉलेजमधल्या आणि नोकरी शोधतांना आलेल्या अनुभवांमध्ये मी वेळोवेळी कोण होतो आणि तो कसा बदलत गेलो होतो हे मी पहिल्या भागात लिहिले होते. ट्रेनिंग स्कूलमधल्या शिक्षणाच्या काळात एका पूर्वीपेक्षा वेगळ्या जगात आणि वेगळ्या प्रकारच्या लोकांच्या सहवासात वावरत असतांना मला आलेल्या अनुभवांबद्दल मी थोडे विस्ताराने दुसऱ्या भागात लिहिले होते आणि नोकरीवर रुजू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात आलेले अजब अनुभव तिसऱ्या भागात होते. त्यानंतर पुढे आलेल्या अनुभवांची कथा या चौथ्या भागात दिली आहे. 


मी कोण आहे ?  भाग ७६

ट्रेनिंग स्कूलमधले शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आमच्यातल्या चौदा जणांना बीएआरसीमधल्या रिअॅक्टर्सवर काम करून प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक वर्षासाठी तिकडे पाठवले होते. पण ते वर्ष संपायच्या आधीच पीपीईडीमध्ये गरज होती म्हणून त्यातल्या पाच मुलांना तिकडे काम करायला पाठवले होते. वर्षाअखेरीस उरलेल्या नऊ मुलांना डिव्हिजन हेड  मेकोनीसाहेबांनी भेटीला बोलावले. पुढील प्लेसमेंटसाठी कुठल्या उपविभागात किती रिकाम्या जागा आमची वाट पहात आहेत याची कुणालाही काडीमात्र कल्पना नव्हती. मेकोनीसाहेबांनी माझ्यासह रामकृष्णन, दास आणि वागडिया यांना पीपीईडीमध्ये पाठवले. ही प्लेसमेंट करतांना त्यांनी कोणता विचार केला, कोणता निकष लावला हे कुणालाच कधी सांगितले गेले नाही. दुसरे दिवशी आम्हाला आपापले नेमणूकपत्र दिले गेले आणि ताबडतोब त्या ऑफीसात जाऊन हजर होण्याचा हुकूम मिळाला.

 आमच्यातल्या ज्या चार जणांना पीपीईडीमध्ये पाठवले होते, त्यातल्या दोघांचे ऑफिस कुलाब्याला आणि दोघांचे भायखळ्याला होते. मला आणि मानबेंद्र दासला भायखळ्याला जाऊन तिथले मुख्य एस एल काटी यांना रिपोर्ट करायला सांगितले होते. त्या काळात बीएआरसीमधील डायरेक्टर, हेड ऑफ डिव्हिजन अशा मोठ्या हुद्यावरील लोकांनाच सरकारी गाडी मिळत असे. बाकीच्या कर्मचाऱ्यांना दादर, चेंबूर अशा स्टेशनांपासून फक्त ऑफिसच्या वेळी बीएआरसीत जाण्यायेण्यासाठी बसेस होत्या. एरवी लोकल ट्रेन किंवा बीईएसटी बसनेच प्रवास करावा लागत असे. त्या काळात आम्हाला टॅक्सीने जाणे परवडण्यासारखे नव्हते आणि बीएआरसी गेटवर रिकामी टॅक्सी मिळणे हेही अशक्य होते.


मी आणि दास दोघांनी बीएआरसी गेटपसून एक बस घेतली आणि सायनला बस बदलून भायखळा गाठले. तिथे रिचर्डसन आणि क्रूडास कंपनी शोधून पीपीईडीचे ऑफिस गाठले. आमच्या बॅचची तीन मुले तिथे आधीच आलेली होती. त्यांनी आमचे स्वागत करून आम्हाला पंख्याखाली बसायला दिले. घाम पुसून आणि ग्लासभर पाणी पिऊन थोडे ताजेतवाने झाल्यावर आम्ही काटीसाहेबांना भेटायला गेलो.


तिथल्या एका लहानशा केबिनमध्ये एका साधारण टेबलाच्या मागे असलेल्या साध्या खुर्चीवर सौजन्यमूर्ती असे काटी सर बसले होते. त्यांच्या समोरच्या बाजूला मांडलेल्या चार खुर्च्यांपैकी दोनांवर आम्ही बसलो आणि आमचे हुकूमनामे त्यांना सादर केले. त्यांनी लगेच पीएला बोलावून त्याला काहीतरी सांगितले. काटीसाहेबांचे दोन तीन मिनिटे आमच्याशी थोडे औपचारिक बोलणे होत असतांना नटराजन आणि रस्तोगी नावाचे दोन वरिष्ठ अधिकारी आत आले आणि आमच्या दोन्ही बाजूंना बसले. काटीसाहेबांनी त्यांना सांगितले की त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी दोन नवे इंजिनियर आले आहेत, त्यांना घेऊन जावे. मग नटराजन सर मला  त्यांच्या क्युबिकलमध्ये घेऊन गेले आणि रस्तोगी सर दासला. आम्ही दोघांनी पुढे आयुष्यभर काय काम करायचे होते ते असे त्या दिवशी चुटकीसरशी ठरले गेले होते. आमचा शैक्षणिक इतिहास, पूर्वानुभव, आवडनिवड, अॅप्टिट्यूड असली कुठलीही भानगड विचारात घेण्याची कुणालाच काही गरज वाटली नाही.


(क्रमशः)


मी कोण आहे ?

भाग ७७


डॉ.होमी भाभांनी भारतामध्ये अणुशक्तीच्या विकासासाठी कोणकोणती कामे करायची याचा खूप विस्तृत स्वरूपाचा आराखडा तयार केला होता आणि त्यांच्या मनात आणखीही बऱ्याच गोष्टी होत्या, पण १९६६मध्ये ते अचानक एका विमान अपघातात स्वर्गवासी झाले आणि डॉ.विक्रम साराभाई या बाहेरच्या शास्त्रज्ञाची त्यांच्या जागी नेमणूक झाली. त्याच्या आधी चार वर्षात दोन युद्धे आणि दोन पंतप्रधानांचे निधन झाल्यामुळे देशातले राजकीय वातावरण थोडे अस्थिर होते. अशा त्या काळात अणुशक्तीसारख्या खास विषयाकडे कोण आणि किती लक्ष देणार होते?


मी नोकरीला लागल्यानंतर अणुशक्तीपासून वीजनिर्मिती करण्यासाठी पीपीईडी या नावाचे वेगळे खाते सुरू केले असले तरी त्याला बहुधा केंद्र सरकारकडून कायम स्वरूपाची मंजूरी मिळालेली नव्हती. त्यामुळे आमची नेमणूकही तात्पुरती, पण अनिश्चित काळपर्यंत चालण्याची शक्यता असलेली ( Temporary, but likely to continue indefinitely) अशा स्वरूपाची होती आणि पीपीईडीमध्ये झालेली बदलीही तशाच तात्पुरत्या स्वरूपाची होती. (Appointed in RED and seconded to PPED). तरीही आमच्याकडून तीन वर्षांचा बाँड घेतलेला असल्यामुळे निदान तितकी वर्षे तरी नोकरीवरून काढणार नाहीत असा भरवसा आम्हाला वाटत होता. त्या वेळी पीपीईडीसाठी वेगळी इमारत नव्हतीच आणि ती बांधायची काही योजनासुद्धा नव्हती. कुलाबा आणि भायखळा भागातल्या तीनचार इमारतींमध्ये काही खोल्या भाड्याने घेऊन तिथे आमची ऑफिसे सुरू केली गेली होती.


बीएआरसीचे संचालक डॉ.होमी सेठना हेच पीपीईडीचेही संचालक होते, आरईडीचे प्रमुख श्री.मेकोनी यांना पीपीईडीचे हेड, डिझाइन ग्रुप हे दुसरे पद दिले होते, बीएआरसीमध्ये चीफ सिव्हिल इंजिनियर असलेले श्री.वेंगुर्लेकर आणि चीफ इलेक्ट्रिकल असलेले श्री.नरसिंगराव यांच्याकडे पीपीईडीमधले सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे जास्तीचे काम दिले होते. हे सगळे उच्च अधिकारी आपापल्या बीएआरसीमधल्या ऑफीसांमध्ये बसूनच या जबाबदाऱ्या सांभाळत होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल्स या  विभागाचे काम बीएआरसीमधल्या श्रीनिवासन यांच्या हाताखाली केले जात होते, पण त्यांचीच हैद्राबादच्या ईसीआयएलमध्ये बदली झाली होती. प्रॉजेक्ट प्लॅनिंगचे काम पाहण्यासाठी पर्ट (PERT)आणि एस्टिमेशन असा एक वेगळा ग्रुप बीएआरसीमधल्या बॅनर्जी यांच्या हाताखाली दिला होता. उरलेले आम्ही लोक श्री.काटी यांच्या हाताखाली भायखळ्याच्या ऑफिसात नेमले गेलो होतो.


(क्रमशः)  



मी कोण आहे ?

भाग ७८


बीएआरसीमध्ये १२-१३ वर्षे उत्कृष्ट काम करून पुढे आलेले श्री.सुरेश लक्ष्मण काटी यांना पॉवर प्रॉजेक्ट्स इंजिनियरिंग डिव्हिजन मध्ये प्रिन्सिपाल डिझाइन इंजिनियर असे मानाचे पद देऊन त्यांच्या हाताखाली १०-१२ वर्षे अनुभव असलेल्या बीएआरसीमधल्या सात आठ अभियंत्यांची टीम दिली होती. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली कुणाकडे एकदोन, तर कुणाकडे तीनचार असे आमच्यासारखे कनिष्ठ इंजिनियर होते. माझे बॉस नटराजनसाहेब तिथे नवेच होते आणि त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मी एकटाच आणि पहिलाच सहाय्यक होतो.

 

मला त्यांच्यासोबत काम करण्याचा तोंडी आदेश मिळाल्यानंतर मी त्यांच्यामागोमाग त्यांच्या क्युबिकलमध्ये गेलो. एका पत्र्याच्या टेबलाच्या उजव्या बाजूच्या आणि समोरच्या बाजूच्या कडांना पुरुषभर उंच पत्र्याची पार्टिशन्स ठोकून थोडासा आडोसा तयार केला होता. त्यांच्या खुर्चीच्या मागे लगेच दुसऱ्या अधिकाऱ्याचे पार्टिशन होते. त्यांनी मला डाव्या बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर बसायला सांगितले आणि  टेबलावर पसरलेले कागदपत्र जरासे आवरून माझ्यासाठी एक फूट बाय दीड फूट रिकामी जागा करून दिली. राजस्थानमधील कोटा या शहराजवळ एक नवे अणुविद्युतकेंद्र उभारले जात आहे आणि त्यासाठी यंत्रसामुग्री पुरवायचे काम आपल्याला करायचे आहे वगैरे थोडक्यात प्रस्तावना करून त्यांनी मला एक जाडजूड ग्रंथ वाचायला दिला.


कॅनडामध्ये उभारल्या जात असलेल्या एका अणुविद्युतकेंद्रामधल्या रिअॅक्टरच्या सेफ्टी रिपोर्टच्या झेरॉक्स कॉपीजचे बाइंडिंग करून ते पुस्तक तयार केलेले होते. मी आपल्या नव्या साहेबाच्या इतके जवळ बसून ते गहन पुस्तक वाचायचा प्रयत्न करत असलो तरी मी जे वाचत होतो त्यातले काहीही माझ्या डोक्यात शिरायला तयार नव्हते. पंधरावीस मिनिटांनी मी काही तरी सबब सांगून त्यांच्या क्युबिकलमधून बाहेर पडलो. बहुधा त्यांनाही तेच हवे असावे. त्यामुळे त्यांनाही त्यांचे काम जरा निवांतपणे करता येत होते.


(क्रमशः) 



मी कोण आहे ?

भाग ७९


तिथे एका बाजूला सगळ्या वरिष्ठ इंजिनियरांच्या क्युबिकल्स होत्या आणि मोठ्या हॉलमध्ये खूप टेबले दाटीवाटीने मांडून ती कनिष्ठ इंजिनियरांना दिलेली होती. त्यात माझे तीन बॅचमेट होते आणि बाकीची मुले आम्हाला एक दोन वर्षांनी सीनियर, पण एकाच वयोगटातली होती. त्या सर्वांचे एकमेकांशी चांगले मेतकूट जमलेले होते. मी बाहेर आल्यावर माझ्या मित्रांनी माझी सर्वांशी ओळख करून दिली. त्या सगळ्या ग्रुपमध्ये मी पहिलाच मराठीभाषी होतो, बाकीच्या मुलांमध्ये हिंदी, पंजाबी, बंगाली, तामीळ, मल्याळी, कानडी वगैरे निरनिराळ्या भाषा बोलणारी आणि भारताच्या निरनिराळ्या राज्यांमधून आलेली मुले होती. मी बीएआरसी ट्रेनिंग स्कूलमध्ये आल्यापासून अशा संमिश्र वातावरणाला सरावलो होतो आणि इंग्रजीमिश्रित हिंदी भाषाही सफाईने बोलायला लागलो होतो.  कोण कुठून आला आहे आणि मुंबईत कुठे रहात आहे वगैरे जुजबी माहिती विचारून झाल्यावर तो इथे काय काम करत आहे यावर थोडी चर्चा झाली आणि त्यातून मला इथे रोज काय काम करायचे आहे याची अंधुक कल्पना आली.


तिथले बहुतेक लोक बीएआरसीमधून आलेले होते आणि त्यांच्या टेबलखुर्च्यासुद्धा तिथूनच आणलेल्या होत्या. मी सायरसमध्ये ट्रेनिंग घेत असतांनाही मला वेगळे टेबल आणि खुर्ची मिळालेली नव्हतीच, त्यामुळे मी हात हलवतच तिथे आलो होतो. निदान तिथे तरी मला लगेच हक्काची खुर्ची मिळेल अशी माझी अपेक्षा होती, पण तिथेही कुठलीच खुर्ची माझी वाट पहात बसलेली नव्हती. आमच्यासाठीसुद्धा बीएआरसीमधून जुने फर्निचर मागवले गेले आहे आणि ते येण्यात आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. पण ते काम ज्यांना दिले होते ते बॅनर्जीसाहेब स्वतः भायखळ्याच्या ऑफिसमध्ये बसतच नव्हते आणि त्या काळातली टेलिफोन प्रणाली दिव्य असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे अशक्य नसले तरी संभवनीयही नव्हते.


(क्रमशः) 




मी कोण आहे ?

भाग ८०


त्या वेळी भायखळ्यातल्या पीपीईडीच्या ऑफिसात काम करणाऱ्या ज्यूनियर लोकांपैकी कोणी ना कोणी परगावी गेलेला असला किंवा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेला असला तर त्याची जागा रिकामी असायची. मी तिथे बसून घेऊ शकत होतो. अशी रिकामी जागा नसलीच तरी बॉसच्या शेजारी बसण्यापेक्षा एकाद्या मित्राच्या शेजारी बसणे ठीक होते. त्यामुळे मी पुन्हा नटराजनसाहेबांच्या खोलीत जाऊन बसण्यासाठी तिथे परत गेलो नाही.  मला वेगळी टेबल खुर्ची मिळाली नव्हती म्हणून त्यांना कदाचित ओशाळवाणे वाटले असेल आणि त्यांनी मला आपल्या शेजारी बसवून घेतले असेल. पण मी माझी सोय करून घेतली असल्याचे त्यांना सांगितले आणि तो सेफ्टी रिपोर्ट घेऊन बाहेर आलो. एक नोटिंग पॅड आणले आणि तो रिपोर्ट वाचून त्याच्या नोट्स काढायला लागलो.


शेजारी दुसऱ्या हॉलमध्ये टायपिंग पूल होता. चार पाच टायपिस्ट तिथे बसून सगळ्या ऑफिसचे टायपिंगचे काम करत होते, पण तिथे त्यांच्यापेक्षा जास्त टेबले होती. मी त्यांच्यातल्या प्रमुखाला त्यातले एक टेबल मागितले. तो आधी म्हणाला की हे लहान आकाराचे कारकुनांचे टेबल आहे, अधिकाऱ्यांसाठी नाही. मी म्हंटले की तरीही मला ते चालेल. मग त्याने सांगितले की लवकरच आणखी स्टाफची भरती होणार आहे, त्यांना ते टेबल लागेल.  मी सांगितले की माझ्यासाठीही नवीन अधिकाऱ्यांचे टेबल येण्यातच आहे. ते आले की मी लगेच हे टेबल परत करेन. ते नाही आले तरी तुमचा नवा स्टाफ आला की हे टेबल घेऊन जा.  त्या काळापर्यंत आमच्या ऑफिसमधले स्टाफचे लोक मुजोर झाले नव्हते, ते अजून ऑफिसर्सना मान देत होते. त्यामुळे तात्पुरते का होईना, पण मला ते टेबल मिळाले. मी ते दुसऱ्या हॉलमध्ये आणले. आता मीही इतरांप्रमाणे काही तरी काम अंगावर घेऊन ते करू शकत होतो.


(क्रमशः)




मी कोण आहे ?

भाग ८१


श्री.मेकोनी, हेड डिझाइन ग्रुप आणि श्री.काटी, प्रिन्सिपाल डिझाइन इंजिनियर यांच्या हाताखाली असणाऱ्या आमच्या ऑफिसला डिझाइन ऑफिस या नावाने ओळखले जात असे, पण मी त्याऑफिसात दाखल झालो तेंव्हा तिथे प्रत्यक्षात फारशी डिझाइन अॅक्टिव्हिटी होत नव्हती. त्यावेळी उभारणीचे काम सुरू असलेल्या राजस्थान अॅटॉमिक पॉवर प्रॉजेक्ट (आरएपीपी)चे डिझाइन त्याच वेळी कॅनडामध्ये बांधल्या जात असलेल्या डग्लस पॉइंट पॉवर प्रॉजेक्टसारखेच होते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी एका कॅनेडियन कंपनीवर होती. त्यांनी काढलेल्या ड्रॉइंगमधली एक रेषा किंवा स्पेसिफिकेशनमधला एक स्वल्पविराम यालासुद्धा आम्ही स्पर्श करू शकत नव्हतो. त्या वेळी आम्ही कसलीही नवीन डिझाइन कॅल्क्युलेशन्स, अॅनॅलिसिस, ड्रॉइंग्ज वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता.  यातली आणखी गंमत म्हणजे ही सर्व कॅनेडियन डॉक्युमेंट्सही तेंव्हा आमच्यासाठी उपलब्धच झालेली नव्हती.  ती हळूहळू कदाचित जहाजाने येत होती आणि तीही कुठल्याच क्रमाने येत नव्हती. 


काटीसाहेबांच्या केबिनच्या बाजूलाच पी.एन.अरुमुगम नावाच्या साहेबांचे केबिन होते. ते पीपीईडीचे प्लॅनिंग इंजिनियर होते. आम्ही सर्वजण कागदोपत्री काटीसाहेबांच्या हाताखाली असलो तरी प्रत्यक्षात अरुमुगमसाहेबांनी सांगितलेले काम करत होतो. ते प्रत्येक इंजिनियरला रोज बोलावून त्याने काय काम केले ते विचारत होते आणि त्यावर चर्चा करत होते. आरएपीपीसाठी भारतातून किंवा कॅनडामधून जी काही सामुग्री लागणार असेल ती पुरवणे हे आमच्या ऑफिसचे काम होते. परदेशातून मागवायचे असलेले कुठलेही सामान फक्त कॅनडामधूनच आयात करायचे होते आणि त्यासाठी एक ग्रीन शीट रिक्विझिशन एईसीएल या कॅनेडियन कंपनीकडे पाठवली की काम झाले. मग कालांतराने कधी तरी ते सामान भारतात येऊन पोचले की जहाजातून उतरवून घेऊन रेल्वे किंवा ट्रकने कोट्याला पाठवायचे काम बीएआरसीमधल्या स्टोअर्स ऑफिसरकडे होते, पण आम्हाला त्याचा मागोवा घेत रहायचे होते. भारतात खरेदी करायच्या सामानासाठी एक इंडेंट तयार करून तेही बीएआरसीच्या परचेस डिव्हिजनकडे पाठवायचे, पण त्यानंतरही ते कुणाकडून घ्यायचे ते ठरवणे, त्या कंपनीशी संपर्क साधून तिचा पिच्छा पुरवत राहणे, त्या वस्तूचे कसून इन्स्पेक्शन करणे वगैरे सगळी जबाबदारी पीपीईडी वर होती. या सगळ्या इंडेंट्स आणि रिक्विजिशन्सवर सही करण्याचा अधिकार फक्त अरुमुगम साहेबांकडे होता, इतकेच नव्हे तर सगळ्या इंजिनियरांनी केलेल्या सर्व पत्रव्यहाराची एक प्रत त्यांना पाठवली जात असे आणि मुख्य म्हणजे ते स्वतः ती सगळी पत्रे वाचत असत. त्यांच्याकडे अचंभित करणारा असा कामाचा अवाका होता.


(क्रमशः)



मी कोण आहे ?

भाग ८२


राजस्थानात उभारल्या जात असलेल्या अणुविद्युतकेंद्रात प्रत्येकी २२०मेगावॉट इतकी वीज पुरवणारी दोन युनिट्स असणार होती. तोपर्यंत भारतात इतकी मोठी वीजकेंद्रे अजून सुरू झालेली नव्हती. त्यामुळे हीच केंद्रे फार मोठी समजली जात होती. त्यापैकी पहिल्या युनिटमधली सर्व यंत्रसामुग्री कॅनडामधून येणार होती आणि दुसऱ्या युनिटमधली बरीचशी यंत्रसामुग्री त्याच ड्रॉइंग्ज आणि स्पेसिफिकेशन्सनुसार भारतात तयार करून घ्यायची होती. ते काम आम्ही करायचे होते. 


आपल्याला शिलाईमशीन किंवा रेफ्रिजरेटर आणायचा असला तर ते विकणाऱ्या अनेक कंपन्यांची दुकाने आणि शो रूम्स असतात, तिथे त्यांची नवनवी मॉडेल्स मांडून ठेवलेली असतात. आपण तिथे जाऊन ती पहायची, त्यांचे आकार आणि ती कोणकोणती कामे करतात वगैरे पहायचे, किंमत विचारायची आणि आपल्याला पाहिजे ते यंत्र विकत घ्यायचे. आजकाल तर मोठमोठ्या आकर्षक जाहिरातींमधून त्यांची सगळी माहिती आधीच प्रसिद्ध केलेली असते आणि ती पाहूनच लोक आपल्यालाही ही वस्तू आणायची आहे असे ठरवतात.


पण आम्हाला तयार करून घ्यायची यंत्रसामुग्री जगभरात कुठेच अशी रेडीमेड मिळण्यासारखी नव्हती. आमचे वीजकेंद्र सोडून दुसरीकडे कुठेच त्यांचा काही उपयोगही नव्हता, त्यामुळे कुठलाही कारखानदार ती तयार करून विकायला ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातला प्रत्येक पार्ट  ड्रॉइंगनुसार तयार करून झाल्यावर त्यांची जुळवाजुळव करून एक एक यंत्र तयार होणार होते आणि ते कसे करायचे याचा विचार आम्ही करायचा होता. आधीचा काहीच अनुभव नसतांना तर हे मोठे आव्हान होते.


(क्रमशः)


मी कोण आहे ?

भाग ८३


आपल्याला स्वयंपाकघरात एकादा नवा वेगळा खाद्यपदार्थ तयार करायचा असला तर त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि तो पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी सगळी  उपकरणे जवळ असायला हवीत, तसेच त्याची कृति माहीत असायला पाहिजे किंवा ती शिकून घेतली पाहिजे.  इंजिनियरिंगमध्येही तसेच असते.  कुठलेही यंत्र तयार करायचे असले तर त्यासाठी आधी कुठकुठले निरनिराळे सुटे भाग लागतील हे ठरवून त्यातला प्रत्येक भाग (पार्ट) कुठल्या धातू किंवा अधातूपासून कसा बनवायचा याचा विचार केला जातो.  ती तांत्रिक माहिती इंजिनियरिंगच्या भाषेत म्हणजे रेखाचित्रांमध्ये (ड्रॉइंग्जमध्ये) लिहून ठेवली तर ती दुसऱ्या अभियंत्यांना समजेल अशा प्रकारे सांगता येते.


आम्हाला जी यंत्रे तयार करवून घ्यायची होती त्याची रेखाचित्रे कॅनडामधल्या इंजिनियरांनी त्यांच्या भाषेत तयार करून पाठवायची होती आणि ती इकडे यायला लागली होती. ती रेकॉर्डसेक्शनमधून आणून त्यांचा अभ्यास करणे हे माझे पहिले काम होते आणि त्यातून मिळत असलेल्या माहितीवरून त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळतो हे शोधायचे होते.  मेकॅनिकल इंजिनियरांची एक सर्वसाधारणपणे समान जागतिक भाषा असली तरी त्यात देशानुसार काही पाठभेद असतात. तोपर्यंत भारतात  कायद्यानेच दशमान पद्धत (मेट्रिक सिस्टम) सक्तीची झाली होती, पण ही सगळी कॅनेडियन ड्रॉइंग्ज इंच आणि फुटात होती. आम्हाला लहानपणापासून फूटपट्टी वापरायची सवय असल्यामुळे त्यांचा अर्थ लागण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण सात अष्टमांश किंवा सत्तावीस बत्तीसांश असले अपूर्णांक ओळखीचे वाटत नव्हते.  निरनिराळे व्ह्यूज दाखवण्याच्या पद्धति, वेल्डिंगचे तसेच आणखी काही सिम्बॉल्स वगैरेही थोडे वेगळे होते. मी अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहाय्याने ते शिकून घेतले.


(क्रमशः)



मी कोण आहे ?

भाग ८४


१९६३-६४ च्या काळात मी इंजिनियरिंग कॉलेजात शिकत होतो तेंव्हा लोखंडाचे विविध प्रकार असतात एवढे आम्हाला शिकवले गेले होते. आम्ही त्यांना CI, MS, CS, SS अशा नावांनीच ओळखत होतो आणि तीच नावे ड्रॉइंगमध्ये लिहित होतो. त्यांचे पुन्हा अनेक उपप्रकार असतात वगैरे माहिती धातूविज्ञान (मेटॅलर्जी) या विषयात शिकवली होती, पण तीसुद्धा जास्त सखोल नव्हती. तोपर्यंत ISI ची भारतीय मानके अजून फारशी प्रचलित झाली नव्हती आणि आमच्या अभ्यासक्रमात येऊन पोचली नव्हती. मी जेव्हा कॅनेडियन ड्रॉइंग्ज उघडून पाहिली तर त्यात प्रत्येक पार्टच्या मटीरियलचे नाव  ASTM A--- किंवा B--- असे लिहिलेले आणि त्यात पुढे एकादी ग्रेड दाखवलेली होती. मला त्यावरून लगेच काही बोध होत नव्हता. आमच्या ऑफिसात लायब्ररीच्या नावाने एका शेल्फमध्ये काही पुस्तके ठेवलेली होती, त्यात एएसटीएमचे काही जुने व्हॉल्यूम्स होते. ते फक्त तिथे बसून पहायला मिळत होते.


ते वाचून एवढे समजले की अमेरिकेत एएसटीएम नावाची एक मोठी संस्था आहे ती सगळ्या धातू किंवा अधातूंसाठी मानके तयार करते आणि तिथले कारखाने त्यानुसार आपला माल विकतात. प्रत्येक मानकामध्ये काही प्रकारच्या तपासण्यांची यादी दिलेली होती आणि त्या तपासणीमधून मिळणारे गुणधर्म कमीतकमी इतके असावेत आणि दोष इतक्यापेक्षा कमी असावेत यांची कोष्टके दिली होती. रासायनिक पृथक्करण (केमिकल काँपोझिशन) केल्यावर त्यातून कार्बन, मँगेनीज, सल्फर, फॉस्फरस, निकेल, क्रोमियम आदि मूलद्रव्यांच्या मर्यादा दिल्या होत्या, मेकॅनिकल टेस्टिंगमधून मिळणाऱ्या यूटीएस, यील्ड, इलाँगेशन, इम्पॅक्ट आदि गुणधर्मांवर किमान आणि कमाल मर्यादा दिल्या होत्या, अल्ट्रासॉनिक टेस्टिंगआणि रेडिओग्राफीमध्ये किती आकाराचे डिफेक्ट मिळाले तरी चालतील ते दिले होते. या सगळ्या तपासण्या एएसटीएमने प्रमाणित केलेल्या प्रयोगशाळांमध्येच करणे बंधनकारक होते आणि त्या कोणत्या उपकरणांचा उपयोग करून कशा प्रकारे केल्या पाहिजेत यावरही वेगळी स्टँडर्ड्स होती.  कालांतराने या सगळ्या गोष्टी आम्हालाही तोंडपाठ झाल्या. पण सुरुवातीला एवढेच समजले की या प्रकारच्या तपासण्या केलेला कच्चा माल भारतातल्या बाजारात कुठेही मिळणार नव्हता, तो आयात करणे आवश्यक होते.



(क्रमशः)



मी कोण आहे ?   -  भाग ८५


आमच्या यंत्रांचे सांगाडे आणि त्यावर बसवायचे सुटे भाग यांचे आकार आणि मोजमापे दाखवणारी रेखाचित्रे कोलॅबोरेटरकडून हळूहळू मिळाली. हे भाग कुठल्या पदार्थांपासून तयार करायचे हे त्यात दाखवले होते. पण त्याशिवायही मोटर्स, गिअरबॉक्सेस, कपलिंग्ज, बेअरिंग्ज यासारखे अनेक स्टँडर्ड पार्ट्स त्या ड्रॉइंग्जमध्ये दाखवले होते आणि ते प्रोप्रायटरी आयटेम्स कुठल्यातरी कॅनेडियन किंवा अमेरिकन कंपनीचे पार्ट नंबर अमूक तमूक एवढेच दिले होते. त्यांची माहिती मिळवण्यासाठी आम्ही त्या सगळ्या कंपन्या आणि त्यांचे ते प्रॉडक्ट्स यांची नावे कॅनडामध्ये रहात असलेल्या आमच्या प्रतिनिधीला पाठवली आणि त्यांचे कॅटलॉग गोळा करून पाठवून द्यायची विनंति केली. ते मिळायला बराच वेळ लागणार होता आणि ती माहिती मिळाली तरीही नेमके तेच प्रॉडक्ट्स वापरणे करारानुसार बंधनकारक होते. शिवाय पेटंट अॅक्टनुसार दुसरा कोणी ते निर्माण करू शकत नाही. त्यात कसलाही बदल करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला नव्हतेच. इतकेच नव्हे तर हे सगळे भाग एकमेकांना जोडण्यासाठी जे नट, बोल्ट,स्क्र्यू, वॉशर वगैरे लागणार होते तेसुद्धा अनब्रेको नावाच्या कंपनीचे किंवा कुठल्या तरी एएसटीएमनुसारच असायला हवे होते. त्यामुळे सुरवातीला तरी या सगळ्या गोष्टी आयात करण्यावाचून गत्यंतर नव्हतेच.


भारत सरकार आणि कॅनडाचे सरकार यांमध्ये उच्च पातळीवर जो सहकार्याचा करार झालेला होता त्याप्रमाणे ती संपूर्ण यंत्रसामुग्री आयात करणे शक्य होते आणि आम्ही ती करावी अशीच कॅनेडियन लोकांची इच्छा असावी किंवा त्या काळात ती भारतात तयार होणे शक्यच नाही अशी त्यांची कल्पना असली तरी त्यात काही आश्चर्य नव्हते. पण आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणे ही दिशा आमच्या नेतृत्वाने ठरवली होती आणि हे आव्हानात्मक काम आमच्यावर सोपवले होते. या कराराचा एक फायदा असा झाला की त्यात संपूर्ण यंत्रांसाठी जितक्या डॉलर्सची तरतूद केलेली असेल त्याच्या अर्ध्या किंमतीमध्येच आम्ही सगळा कच्चा माल आणि प्रोप्रायटरी आयटेम्स मागवून घेऊ शकत होतो. त्यासाठी वेगळे इम्पोर्ट लायसेन्स आणि परकीय चलन मिळवण्याचीही गरज नव्हती.


(क्रमशः)




मी कोण आहे ?   -  भाग ८६


मला बीएआरसीमधून पीपीईडीमध्ये पाठवले होते तेंव्हा माझे ऑफिस भायखळ्याच्या रिचर्डसन अँड क्रूडास नावाच्या कंपनीच्या आवारात होते. तिथे त्या कंपनीचा मोठा कारखाना होता, त्यात हजारो कामगार कामाला होते. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका मोठ्या इमारतीत त्यांची कार्यालये होती. त्यातल्याच एका मजल्यावर असलेला एक मोठा हॉल त्यांनी पीपीईडीला कदाचित तात्पुरत्या वापरासाठी भाड्याने दिला होता. तिथे आमचे ऑफिस होते. ती कंपनी कुणासाठी कसले उत्पादन करत होती याचा आम्हाला गंधही नव्हता आणि त्यांच्या कारखान्यात आम्ही पाऊलसुद्धा टाकायचे नाही अशी सूचना आम्हाला  दिलेली होती. तिथले पहारेकरी आम्हाला तिकडे फिरकूही देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या कँटीनचा आम्हाला काही उपयोग नव्हता. आमच्या ऑफिसात जेमतेम  पंचवीस तीसजण होते. तेवढ्या लोकांसाठी वेगळे कँटीन नव्हतेच. एका नंबरवर फोन करून ऑर्डर दिली की ट्रेमध्ये दोन किंवा चार कप चहा येत होता आणि मागवल्यास बिस्किटाचा पुडा मिळत होता.  त्याच्या आधी मी हॉटेलातही बहुधा कपात किंवा ग्लासमध्येच चहा घेतला होता, चहाचा ट्रे मागवला नव्हता,  त्यामुळे सुरुवातीला आम्हाला त्या ट्रेचेच अप्रूप वाटायचे. त्यात किटलीत कढत चहाचा अर्क, निरनिराळ्या भांड्यांमध्ये गरम दूध, साखर वगैरे वेगवेगळे असायचे आणि आपण आपल्याला हवे असेल त्या प्रमाणात मिसळून ढवळून घ्यायचे. हे पारंपरिक इंग्रजी तंत्र असले तरी ते आमच्यासाठी नवे होते 


आमच्या ऑफिसातली वरिष्ठ मंडळी घरातूनच जेवणाचा डबा आणून खात असत, पण माझ्यासारख्या ब्रह्मचाऱ्यांना बाहेर कुठेतरी जाऊनच काहीतरी खाऊन यावे लागायचे. चांगली म्हणजे परवडणाऱ्या किंमतीत सुग्रास जेवण देणारी अशी हॉटेले तिथे जवळपास  नव्हतीच. रोज आम्ही त्यांच्या शोधात इकडे तिकडे वणवण करत होतो. त्या रस्त्यावरच सोडालिटी हाऊस नावाची एक इमारत होती, त्यात ख्रिश्चन धर्मगुरु आणि जोगिणी यांच्या शिक्षणासंबंधित काही तरी व्यवस्था होती आणि त्यासाठी बाहेरगावाहून आलेले शिक्षणार्थी रहात होते. त्यांच्या जेवणासाठी एक मेस होती. आमच्या एका ख्रिश्चन सहकाऱ्याला त्याचा सुगावा लागला आणि त्याच्या प्रयत्नातून आम्हालाही तिथे प्रवेश मिळाला. तिथले जेवण आम्हाला मानवण्यासारखे होते. काही दिवस आम्ही तिथे जेवायला जात होतो.


आमच्या ऑफिसची भायखळ्याची ही जागा एक तात्पुरती व्यवस्था आहे हे सगळ्या सीनियर लोकांना चांगले माहीत होते, त्यामुळे कुठल्याही गैरसोयीबद्दल त्यांना सांगायला गेलो तर थोडा दम धरा असाच सल्ला मिळत असे. एक दोन महिन्यातच आमचे तिथले वास्तव्य संपले आणि अणुशक्तीखात्याच्याच गेटवेजवळ असलेल्या इमारतीत आमचे स्थलांतर झाले.


(क्रमशः)




मी कोण आहे ?   -  भाग ८७



भारतावर इंग्रजांचे राज्य असतांना मुंबईत राहणाऱ्या इंग्रजांच्या करमणुकीसाठी त्यांनी काही क्लब निर्माण केले होते, त्यातच एक रॉयल यॉट क्लब होता. शिडांवर चालणाऱ्या लहानशा होडीला यॉट म्हणतात.  गेटवेऑफ इंडियाच्या आजूबाजूला समुद्रात अनेक यॉट्स फिरत असतांना दिसतात. गेटवेच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावरच या यॉट क्लबसाठी एक सुरेख इमारत बांधली होती. कालांतराने त्यांनी समोरच दुसरी आणखी भव्य इमारत बांधली आणि क्लबचा कारभार तिकडे हलवला. तिथे  हा क्लब अजूनही चालू आहे.


होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा टाटा इन्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सुरू करण्यात आले तेंव्हा ते बंगलोर इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये होते. ते मुंबईला हलवल्यावर सुरुवातीच्या काळात ओल्ड यॉट क्लबची इमारत टीआयएफआरला दिली गेली. नंतर कुलाब्याच्या पलीकडे नेव्हीनगरमध्ये टीआयएफआरचा भव्य कँपस बांधण्यात आला. भारत सरकारने अणुशक्ती खात्याचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये ओवायसी बिल्डिंगमध्ये ठेवले.


मी १९६६मध्ये ट्रेनिंगस्कूलमध्ये दाखल झालो तेंव्हा या इमारतीत अणुशक्तीखात्याचे मुख्य ऑफिस होते. शिवाय या खात्याशी संबंधित असलेली आणखी काही ऑफिसे होती. १९६८च्या अखेरीस त्यातली काही ऑफिसे दुसरीकडे हलवली गेली आणि तळमजल्यावरचा बराचसा भाग रिकामा करून पीपीईडीला देण्यात आला. तेंव्हा आमचे ऑफिस भायखळ्यातल्या रिचर्डसन अँड क्रूडासच्या इमारतीतून ओवायसीमध्ये शिफ्ट झाले.  आम्ही सर्वात कनिष्ठ कर्मचारी असल्यामुळे या हलवाहलवीच्या कामातले मुख्य उत्साही स्वयंसेवक होतो. सगळ्या सामानांची व्यवस्थित गाठोडी बांधणे, ती ट्रक्समधून नेण्यासाठी चढवणे, उतरवणे आणि नव्या जागी व्यवस्थित जागी नेऊन पोचवणे वगैरे कामे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करून घेण्याचा तो माझा पहिलाच एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता.


(क्रमशः)

---


मी कोण आहे ?   -  भाग ८८


ओल्ड यॉट क्लब ही ब्रिटिशकालीन जुनी इमारत तोपर्यंत सुस्थितीत होती. त्यालाही आता पन्नास वर्षे होऊन गेली असली आणि मध्यंतरी तिचा काही भाग कोसळला असला तरी ही मुख्य इमारत बहुधा अजूनही शाबूत आहे. पूर्वीच्या काळातल्या एका ब्रिटिश आर्किटेक्टने तिथल्या राजरजवाड्यांच्या आवडीनुसार त्यांच्या मनोरंजनासाठी बांधलेली ती एक राजेशाही वास्तू होती.  गेटमधून आत गेल्यावर मोठे उद्यान होते. तिथे येणारे साहेब लोक आपल्या मडमांना घेऊन कदाचित त्या काळातल्या व्हिक्टोरिया नावाच्या मोठ्या बगीमधून येत असतील. त्या बगीतून उतरल्यावर त्यांच्यावर पावसाचे थेंब पडू नयेत म्हणून तिला झाकणारे भले मोठे पोर्च होते. इमारतीत शिरल्यावर समोरच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी रुंद असा सुंदर लाकडी जिना होता. तो चढून वर गेल्यावर डान्स करण्यासाठी मोठा हॉल होता. तळमजल्यावरही दोन तीन प्रशस्त दिवाणखाने होते. खूप उंच हेडरूम असल्यामुळे हवा चांगली खेळत होती आणि त्या मानाने उकाडा कमी होत असे. कदाचित तिथे आम्ही उभी आडवी पार्टिशन्स घालून त्या वास्तूची शान थोडी बिघडवली असावी.


त्या जागेचे लोकेशन तर फारच छान होते. बोरीबंदर (मुंबई सीएसटी) आणि चर्चगेट या दोन्ही मुख्य रेल्वेस्टेशनपासून आणि हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन)या मुख्य बस टर्मिनसपासून ते चालत जाता येण्यासारखे होते, शिवाय तिथून बस आणि टॅक्सीने लवकर जाऊन पोचणेही सहज शक्य होते. गेटवर उभे राहिल्यास डाव्या बाजूला गेट वे ऑफ इंडियाची भव्य कमान, त्याच्या समोर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि समोरच सुप्रसिद्ध ताजमहाल हॉटेल होते. मुंबई पहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण पहाणे आवश्यकच असल्याने त्यांची गर्दी सतत वहात असायची. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणारेही ओघाने आलेच. जवळपास अनेक प्रकारची चांगली खाद्यगृहे होती आणि सिनेमाथिएटरेही होती. जिथे आम्ही मित्र किंवा नातेवाइकांबरोबर मौजमजा करायला जात होतो अशा ठिकाणी रोज नोकरीसाठी जाणे याचेच आम्हाला खूप अप्रूप वाटत होते आणि मित्रांना आमचा हेवा वाटत होता.


(क्रमशः)


मी कोण आहे ?   -  भाग ८९


ओवायसीच्या मुख्य इमारतीत आत गेल्यानंतर उजव्या बाजूचा सगळा तळमजला आम्हाला मिळाला होता. आमच्या भायखळ्यातल्या ऑफिसच्या मानाने दोनतीनपट एवढी प्रशस्त जागा आम्हाला तिथे दिली गेली होते. तिथे गेल्यावर कुणी कुठे बसायचे याचे नियोजन करून एक नकाशा तयार केला गेला होता आणि तिथल्या जमीनीवर खडूने रेघा मारून चौकोन आखले होते, त्यात कुणाचे टेबल कुठे ठेवायचे हे दाखवले होते. पहिल्या हॉलमध्येच मागच्या बाजूला माझे बॉस नटराजनसाहेबांची क्युबिकल होती आणि त्याला लागूनच असलेल्या मोठ्या क्युबिकलमध्ये तीन चार इंजिनियर बसणार होते, त्यात माझीही जागा होती. असे तीन हॉल ओलांडून आत गेल्यानंतर टोकाला तीन लहान लहान वातानुकूलित खोल्या होत्या. त्या केबिन्समध्ये श्री.काटी, श्री.अरुमुगम आणि श्री.पीके भटनागर नावाचे साहेब बसणार होते.

श्री.काटी आमचे प्रिन्सिपाल डिझाइन इंजिनियर होते आणि आम्ही सगळे काटीसाहेबांना रिपोर्ट करत होतो. श्री.अरुमुगम आमचे प्लॅनिंग इंजिनियर होते आणि आमच्याकडून काम करवून घेत होते. या दोघांशी चांगला परिचय झाला होता. श्री.भटनागर यांच्याकडे कुठली महत्वाची जबाबदारी किंवा कामगिरी दिलेली होती हे मात्र आम्हाला नीट समजले नाही. ते नेहमी सुटाबुटात असायचे, रुबाबदार होते, तितकेच शांत आणि सोज्वळ होते, त्यांचे वागणे आणि बोलणे सफाईदार आणि छाप पाडणारे असे असायचे. हे मी दुरूनच पहात होतो. मला त्यांच्या केबिनमध्ये जायची वेळच कधी आली नाही. ते थेट पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अणुशक्तीखात्याचे प्रमुख डॉ.विक्रम साराभाई यांच्या संपर्कात असतात आणि दिल्लीला किंवा परदेशात जात असतात असे ऐकले होते. काही काळानंतर भारत सरकारने पॅरिसला एक ऑफिस उघडले तिथे त्यांची नेमणूक झाली.


भायखळ्याच्या ऑफिसात मी एक कारकुनांचे टेबल उसने घेतले होते, ते माझ्या नावावर झाले नव्हतेच, त्यामुळे या हलवाहलवीमध्ये ते अंतर्धान पावले. ते माझ्या नव्या जागेवर येऊन पोचले नाही. त्या सुमाराला बीएआरसीमधूनही काही टेबलखुर्च्या आल्या होत्या, त्यातले एक मला दिले गेले होते. पण ट्रकमध्ये चढताउतरवतांना त्याचा एक पाय मोडला होता. मग पुन्हा थोडा नेट लावून प्रयत्न केला आणि मला त्याच्या बदल्यात गोदरेजचे ब्रँडन्यू टेबल मिळवले.


(क्रमशः)


मी कोण आहे ?   -  भाग ९०


भायखळ्याच्या ऑफिसमध्ये मला पुढील काही दिवस करायचे काम दिले गेले होते आणि मी त्याची हळूहळू सुरुवातही केली होती, पण तिथे सर्वांना बसायला पुरेशी जागा नव्हती आणि आपला बाडबिस्तरा आवरून केंव्हाही तिथून दुसरीकडे जावे लागणार आहे असे सांगितले जात असल्यामुळे अनिश्चितता होती. त्यामुळे बॉसकडूनही कुठले टार्गेट्सही दिले जात नव्हते. ओवायसीमध्ये गेल्यावर मला हक्काची टेबलखुर्ची मिळाली आणि ड्रॉइंग्ज वगैरे ठेवायला एक पत्र्याचे रॅकही मिळाले. आता मी जोमात काम करायला सुरुवात केली.


आम्हाला जी यंत्रसामुग्री तयार करवून घ्यायची होती त्याची दोनतीनशे ड्रॉइंग्ज कॅनडामधून टप्प्याटप्याने येत होती. रेकॉर्ड सेक्शनकडे रोज चौकशी करून आणि तगादा लावून मी त्यांच्या प्रिंट्स काढवून घेतल्या. जितकी ड्रॉइंग्ज हातात आली ती टेबलावर पसरून त्यांचा कसून अभ्यास केला. त्यातले निरनिराळे पार्ट कुठकुठल्या मटीरियल्सपासून तयार करायचे आहेत हे पाहून त्यानुसार निरनिराळ्या याद्या तयार केल्या. त्यावरून निरनिराळ्या प्रकारचे प्रत्येक मटीरियल किती लागणार आहे याचे अंदाज केले. 


खरे तर ज्या कारखान्यांमध्ये ही यंत्रे तयार केली जाणार होती त्या कारखान्यातल्या इंजिनियरांनी हे किचकट काम करायचे असते, पण कोणते कारखाने हे काम करणार आहेत हे अजून ठरले नव्हते. हे सगळे मटीरियल निरनिराळ्या एएसटीएम स्पेसिफिकेशननुसार असणे आवश्यक असल्यामुळे ते भारतातल्या बाजारात उपलब्ध नव्हतेच आणि त्या काळात असलेल्या नियमांनुसार ते आयात करण्यासाठी इंपोर्ट लायसेन्स काढावे लागत होते. त्यासाठी खूप वेळ असे. तो विलंब टाळण्यासाठी आम्हीच ते काम करून सगळे मटीरियल कॅनडामधून आयात करायचे असे ठरवले होते.


आमच्या यंत्रांचे सांगाडे आणि इतरही काही मुख्य भाग पोलादाच्या पत्र्यांचे तुकडे कापून आणि ते वेल्डिंगने एकमेकांना जोडून तयार करायचे होते.  ज्याप्रमाणे शिंपी लोक ग्राहकाच्या शरीराची मापे घेऊन शर्ट किंवा पँट बेततात आणि किती मीटर कापड लागेल हे सांगतात तशाच प्रकारे आम्ही प्लेट कटिंग डायग्रँम्स तयार करून किती आकाराच्या किती प्लेट्स लागतील याचे अंदाज बांधले.


(क्रमशः)

-- 

१५-०३-२०२३

 

मी कोण आहे ?   -  भाग ९१


गेली दोन वर्षे मी या लेखमालिकेमध्ये माझ्या जुन्या आठवणी क्रमाक्रमाने लिहीत आलो आहे. आज थोडे विषयांतर.

"मी कोण आहे ?" या प्रश्नावर मी एका विचारवंताच्या ध्वनिचित्रफितीमधले विचार ऐकले.  कुठल्या तरी पाश्चात्य विद्वानाने  असे सांगितले आहे म्हणे की "मी स्वतःला जो समजतो तो मी नसतो, तू मला जो समजतोस तोसुद्धा मी नसतो. तू मला काय समजतोस असे मला वाटते तो म्हणजे मी असेन."

किती गोंधळ आहे ना ? पण त्यात थोडे फार तथ्य असावे. मी स्वकेंद्रित वृत्तीचा असलो तर कदाचित स्वतःला महान किंवा सर्वश्रेष्ठ समजत असेन, बाकीची सगळी माणसे मला तुच्छ वाटतील. पण माझ्या मनात इंफिरिऑरिटी काँप्लेक्स असला तर मी उगाचच स्वतःला तुच्छ समजत असेन. दुसरा कोणी मला काय समजत असेल ते त्याच्या मनात असते. सहसा कोणीही ते स्पष्टपणे उघड उघड सांगत नाही. पण त्याच्या मनात माझी काय प्रतिमा असेल त्याचा काहीसा अंदाज मला त्याच्या वागण्यातून येतो. मानसशास्त्रज्ञाच्या नजरेतून पाहिले तर मी म्हणजे लोकांच्या मनातली माझी प्रतिमा असते. तिला जपायचा आटोकाट प्रयत्न आपण सतत करत असतो.

अध्यात्मामध्ये "मी कोण आहे ?" या प्रश्नाच्या उत्तरात  माझे शरीर आणि त्याचे नाव गाव, गुणदोष याला काहीच स्थान नसते. तिथे मी म्हणजे माझा आत्मा असतो. तो कसा असतो हे गूढ मला तरी अजून समजलेले नाही.


(क्रमशः)

--

19-03-2023

मी कोण आहे ?   -  भाग ९२


राजस्थानमधील कोटा इथे बांधल्या जात असलेल्या अणुशक्तीकेंद्रासाठी यंत्रसामुग्री तयार करून घेणे हे आमचे काम होते. यातल्या एका उपकरणाच्या (Equipment) निर्मितीचे काम मी नोकरीला लागायच्या काही दिवस आधीच आमच्या बीएआरसीच्या वर्कशॉपमध्ये सुरू झाले होते. उपकरण या शब्दावरून ती एकादी हातात धरता येण्यासारखी लहानशी वस्तू वाटेल, पण या इक्विपमेंटचे नाव 'कॅरेज अॅक्सेस डोअर'असे होते. हा डोअर म्हणजे दरवाजा एकाद्या हत्तीखान्याला शोभेल असा जंगी होता आणि त्यातून हत्तीच्या सोबत जिराफसुद्धा ताठ मानेने आत बाहेर करू शकेल इतका मोठा होता. खरे म्हणजे ती एक सरकणारी भिंत होती. 


पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी भिंतीवर बसून तिला चालवत नेले होते अशी कथा आहे.  चित्रांमध्ये ती भिंत एकाद्या कट्ट्याएवढी दाखवतात. इथे आकाराला महत्व नाही, जड वस्तूला सचेतन करणे हा अद्भुत चमत्कार होता. आम्ही तयार करत असलेली ही भिंतसुद्धा मागेपुढे सरकवता येणार होती. त्यासाठी कुणीही तिच्या डोक्यावर जाऊन बसायचे नव्हते, तशी सोयही नव्हती. शंभरदीडशे टन वजनाचा  तो दरवाजा हाताने ढकलून उघडण्यासाठी कोणी सॅमसन पहिलवान आमच्याकडे नोकरीला ठेवला नव्हता आणि तो दरवाजा उघडल्याबरोबर रिअॅक्टरमधून निघणारे तीव्र किरण आणि तिथली दूषित हवा यांच्याशी संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे  कुणीही त्या वेळी त्याच्या जवळपास जाणेही धोक्याचे होते. दूर आडोशाला उभे राहून एक बटन दाबले की दरवाजा आपोआप उघडेल अशी व्यवस्था करायची होती. अलीबाबाच्या गोष्टीतला चोरांच्या गुहेचा दरवाजा "खुल जा सिमसिम" म्हणताच उघडतो हे वाचतांना ती कल्पनाच मजेदार वाटली होती. आपण तसा दरवाजा तयार करून घेण्याची कल्पना एकदम भन्नाट वाटली होती.


(क्रमशः)

--

02/04/2023

मी कोण आहे ?   -  भाग ९३


आम्ही तयार करत असलेली ही चालणारी भिंत दगडाविटांची नव्हती. तो वीसबावीस फूट उंच, बारातेरा फूट आडवा आणि तीन फूट जाड असा एक अवाढव्य आकाराचा डबा होता. निरनिराळ्या जाडीच्या पोलादी पत्र्यांचे तुकडे कापून आणि ते एकमेकांना वेल्डिंग करून जोडून हा डबा तयार करायचा होता आणि त्यानंतर भल्यामोठ्या यंत्रांवर त्याच्या अनेक भागांचे मशीनिंग करायचे होते.  इथे मुंबईच्या कारखान्यात तयार केलेला हा डबा रावतभाटा इथे उभारल्या जात असलेल्या प्रकल्पामध्ये नेऊन जागेवर उभा केल्यानंतर त्यात सिमेंट काँक्रीट भरले जाणार होते. पण हा डबा साधा सरळ चौकोनी आकाराचाही नव्हता. तांत्रिक कारणासाठी त्याच्या एका कोपऱ्यात मोठे भगदाड ठेवले होते तर दुसऱ्या कोपऱ्याजवळ आकार वाढवून त्याची भरपाई केली होती, त्यामुळे त्याचा आकार वेडावाकडा झाला होता. गोगलगाईच्या पोटात तिचे पाय असतात असे म्हणतात. त्याप्रमाणे आमच्या या दरवाजाच्या पोटातच सोळा चाके बसवायची होती, ती फक्त नखाइतकीच बाहेर डोकावत होती. या दरवाजाला ढकलण्यासाठी दोन मोठे हैड्रॉलिक सिलिंडरही त्याच्या पोटातच बसवायचे होते. त्याला ढकलले जात असतांना त्याने आपल्या मार्गावरून तसूभरही बाजूला जाऊ नये यासाठी बारा मार्गदर्शक चक्रे लावायची होती. याशिवाय तो पूर्णपणे बंद किंवा उघडलेल्या स्थितीत असतांना त्याला जागचे हलू न देण्यासाठी चार कुलुपे लावायची होती. यातले प्रत्येक कुलुप एकाद्या पहारीसारखे होते. काही अपघातामुळे आतल्या हवेचा दाब दुप्पटपर्यंत वाढला किंवा एकादा जबरदस्त धरणीकंप झाला तरीही या दरवाज्याला घट्ट धरून ठेवण्याएवढी या मजबूत लॉक्सची क्षमता होती. 

या सगळ्यांचे मूळ डिझाइन एका कॅनेडियन कंपनीने केले असले तरी पुढील प्रकल्पासाठी आम्हीच ते करायचे होते म्हणून आम्ही सगळी कॅलक्युलेशन्स स्वतः करून पहात होतो आणि खात्री करून घेत होतो.  त्याची निर्मिती सुरू असतांना पहायला मिळत असल्यामुळे आम्हाला वर्कशॉपच्या निरनिराळ्या भागातली कामे कशी चालतात हे ही जवळून पहायला मिळत होते.


(क्रमशः) 


Sunday, April 13, 2025

सत्य, असत्य, आभास आणि कल्पना

 सत्य, असत्य, आभास आणि कल्पना


आपल्या जीवनात रोजच आपण जे काही पहातो, वाचतो किंवा ऐकतो त्याबद्दल काही वेळा आपल्या मनात शंका उठतात. हे खरोखरच असे असेल का असा विचार पडतो, कारण कधीकधी तो आपला भ्रम असतो किंवा दुसऱ्या कुणीतरी मुद्दाम थाप मारलेली असते किंवा कदाचित त्याचाच गैरसमज झालेला असू शकतो. औषधाच्या कडू गोळीवर एक गोड थर दिलेला असतो अशा वेळी ती आपल्या नकळत केलेली फसवणूक चांगल्या हेतूनेही केलेली असते.  कोणती गोष्ट खरी समजावी आणि तिच्यावर विश्वास ठेवावा की तो एक आभास आहे असे समजावे असा प्रश्न काही वेळा मनात येतो.  कधीकधी 'त' वरून ताकभात ओळखण्याच्या नादात मनात उठलेली एक निव्वळ कल्पना असू शकते. मनोरंजनाचे सगळे विश्वच कल्पनारंजनातून उभे राहिलेले असते. नाटक, सिनेमात जे दाखवले जात असते ते काल्पनिक आहे हे माहीत असले तरी ते पहातांना आपण सुखावतो. प्रत्येक बाबतीतले सत्य काय आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे का असा विचार करून आपण नेहमीच खोलात जातही नाही. पण तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या मार्गावर जाणाऱ्या विद्वानांनी सत्य शोधण्याचे चिकाटीने प्रयत्न केले आणि ते अजूनही करत आहेत यामुळे आतापर्यंत प्रगति होत गेली आणि अजून होत आहे. या विषयाच्या अशा अनेक पैलूंचा विचार करून ते दाखवण्यासाठी मी फेसबुकावर एक स्फुट लेखांची मालिका लिहिली होती ती या पानावर संकलित केली आहे.  


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १

एका बाजूला सत्य आणि दुसऱ्या बाजूला असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया वगैरे यांचे द्वंद्व अनादि काळापासून चालत आलेले आहे आणि अनंतकाळापर्यंत चालत राहणारच आहे असे वाटते. असत्य म्हणजे धडधडीत खोटेपणा कदाचित वेगळा दिसून येऊ शकतो, पण आभास आणि सत्य दोन्ही वरून सारखेच वाटतात. खरे खोटे याबद्दल काही ठोकताळे दिले जातात. ऐकीव गोष्टींवर जास्त विश्वास ठेवू नये, प्रत्यक्ष पाहून खात्री करून घ्यावी असे सांगितले जाते. "चक्षुर्वै सत्यम् " असे म्हंटले जाते, पण 'दिसते तसे नसते, म्हणून जग फसते' असाही एक वाक्प्रचार आहे.



रोज सकाळी पूर्व दिशेला क्षितिजावर सूर्याचे लालचुटुक बिंब उदयाला येते. हा सूर्य प्रखर होता होता आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हीला माथ्यावर येतो. त्यानंतर पश्चिमेकडे खाली उतरत संध्याकाळी त्याचे फिकट पडत जाणारे बिंब क्षितिजाला टेकून अदृश्य होते. हे दृश्य आपण रोज आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहात असतो. त्याच्या सत्य असण्याबद्दल काही शंका घेण्याचे कारणच नसते. पण संत ज्ञानेश्वरांनी असे लिहून ठेवले आहे, "आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे || जैसे न चालता सूर्याचे चालणे || तैसे नैष्कर्म्यत्व जाणे || कर्मेची असता ||" आणि "उदय-अस्तासाठी ज्याप्रमाणे सूर्य चालत नसतांनाही चालल्यासारखा वाटतो " असा दाखला देऊन "त्याचप्रमाणे कर्मात असूनही नैष्कर्म्य असते." असे तत्वज्ञान त्यांनी सांगितले आहे. याचा अर्थ आपल्याला दिसतो त्याप्रमाणे सूर्य आकाशातून चालत नसतो हे त्यांना माहीत होते. त्यांच्याही कित्येक शतके आधी होऊन गेलेल्या आर्यभटाने "नावेत बसलेल्या माणसाला काठावरील झाडे मागे गेल्यासारखी दिसतात त्याप्रमाणे स्थिर असलेल्या नक्षत्रांचा उदय-अस्त झाल्याचा आभास होतो "असे सांगितले होते, पण पुढील शेकडो वर्षे सामान्य लोकांना ते समजलेच नाही किंवा मान्य झाले नव्हते. आपल्या डोळ्यांना सपाट आणि स्थिर दिसणारी पृथ्वी चेंडूसारखी गोल असेल, ती अवकाशात अधांतरी तरंगत असेल आणि सतत स्वतःभोवती गिरक्या घेत असेल हे कुणाला खरे वाटेल? पण शेकडो किंवा हजारो शास्त्रज्ञांनी तसे एकमुखांनी अनेक वर्षे सांगितल्यानंतर लोकांना पटायला लागले की आपल्याला जे दिसते तो आभास असतो आणि सत्य वेगळेच आहे. इथे डोळ्यांना दिसते ते खरे नसते, ते आभासी असते, पण शाळेतल्या मास्तरांनी सांगितलेले बरोबर असते असे म्हणावे लागते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २

चांदोबाची गोष्ट तर जास्तच मजेदार आहे. तो महिन्यात एक दिवस अमावास्येला आभाळात दिसतच नाही, त्यानंतर प्रतिपदेला त्याची फिकट कोर काही मिनिटे दिसली नी दिसली तोपर्यंत अदृष्य होते. द्वितीयेला मात्र अत्यंत रेखीव अशी आल्हाददायक चंद्रकोर तासभर दिसते. त्यानंतर रोजच्या रोज तिचा आकार वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार तेजस्वी चंद्र दिसतो. त्याच्या चांदण्याच्या मंद प्रकाशात आपले जग उजळून निघते. त्यानंतर त्याची कोर दिवसेंदिवस खंगत जाऊन अमावास्येला ती दिसेनाशी होते. ही सगळी मजा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पहातो. पुराणात अशी गोष्ट आहे की चंद्राचा सासरा दक्ष प्रजापती याने दिलेल्या शापामुळे त्याचा क्षय होत जातो आणि देवाने दिलेल्या वरदानामुळे त्याचा पुनर्जन्म होऊन तो पुन्हा पूर्णाकृति होतो. हजारो वर्षे लोक हे खरेच मानत आले होते.  महिन्यातले पहिले पंधरा दिवस आपल्याला चंद्र मावळतांना दिसतो, तर दुसरे पंधरा दिवस तो उगवतांना दिसतो. संकष्ट चतुर्थीचे दिवशी तर काही लोक चंद्रोदयाची आतुरतेने वाट पहातात आणि त्याचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. 


पण शास्त्रज्ञांनी असे शोधून काढले की चंद्राकडे मुळी स्वतःचे तेजच नसते. सूर्याच्या किरणांनी त्याचा अर्धा भाग उजळून निघतो आणि उरलेला अर्धा भाग अंधारातच राहतो. पृथ्वीभोवती फिरतांना  अमावास्येच्या दिवशी तो दिवसभर आकाशात दिसणाऱ्या सूर्यबिंबाच्या जवळपास असतो त्या वेळी त्याचा अंधारात दडलेला भाग पृथ्वीकडे असतो त्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. तो जसा जसा आभाळातल्या सूर्यबिंबापासून दूर जात जातो तसा तसा त्याचा सूर्यकिरणांनी उजळलेला अधिकाधिक भाग आपल्याला दिसत जातो त्यामुळे त्याची कोर अंगाने वाढत जाते. पौर्णिमेच्या संध्याकाळी पश्चिमेकडे सूर्य मावळत असतो तेंव्हा पूर्वेच्या क्षितिजावर चंद्राचा उदय होत असतो. याचाच अर्थ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग आपल्या समोर असतो आणि आपल्याला तो दिसतो.  पण एकाद्या पौर्णिमेला या चंद्राला ग्रहण लागते तेंव्हा पाहता पाहता त्याचा काही भाग अंधारात जातो, खग्रास ग्रहणात तर पूर्ण चंद्रच झाकाळतो आणि काही वेळानंतर तो पुनः  पहिल्यासारखा होतो. हे सगळे आभास चंद्रावर पडणाऱ्या पृथ्वीच्या सावलीमुळे होतात.  


थोडक्यात सांगायचे झाल्यास चंद्राचे हे सगळे दिसणे किंवा न दिसणे हे सत्य नसून भास असतात. प्रत्यक्षात बाराही महिने चोवीस तास चंद्र अवकाशात असतोच. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे तो कधी उगवतांना तर कधी मावळतांना दिसतो आणि त्याच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे त्याच्या कला म्हणजे त्याचा उजळलेला भाग आपल्याला दिसतात आणि पृथ्वीच्या हलत्या सावलीमुळे त्याला ग्रहण लागते आणि सुटते.

(क्रमशः)



सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ३

मंगळ. बुध. गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह आपण आकाशात पाहू शकतो. सूर्य आणि चंद्र या आकाशातल्या तेजस्वी गोलांसह या पाचही ग्रहांची नावे वारांना देऊन सात दिवसांचा आठवडा बनवला गेला आणि तो जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये पाळला जातो. आपल्या पूर्वजांनी या सात जणांचा समावेश ग्रह या एकाच सदराखालील देवतांमध्ये केला. याशिवाय राहू आणि केतू या नावाचे दोन ग्रह कल्पिले गेले. ते साध्या डोळ्यांनी तर दिसत नाहीतच, कुठल्याही दुर्बिणीमधूनसुद्धा दिसू शकत नाहीत, तरीही ते काल्पनिक बिंदूंच्या रूपात आकाशात वावरत असतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सूर्य पूर्वेकडून ते पश्चिम क्षितिजापर्यंत एका अर्धवर्तुळासारख्या मार्गाने जात असतो तर चंद्र त्याच मार्गाने न जाता जराशा वेगळ्या मार्गाने आकाशातून जात असतो. या दोन मार्गांची वर्तुळे दोन ठिकाणे एकमेकांना छेद देतात त्या बिंदूंना  राहू आणि केतू अशी नावे दिली आहेत.  सूर्य आणि चंद्र या दोघांचेही आकाशातले मार्ग रोज किंचित बदलत असतात. त्यामुळे हे बिंदूही पुढे पुढे सरकत असतात. अमावास्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र आपापल्या मार्गाने जात असतांना एकमेकांच्या जवळ येत असतात. ते जर एकाच वेळी या बिंदूपाशी आले तर त्या वेळी सूर्याला ग्रहण लागते. आपल्या पूर्वजांनी या बिंदूंची कल्पना कशी केली, त्यांचा कसा अभ्यास केला आणि ग्रहणकाळ वगैरेंचे अचूक अंदाज आधीच लावले हे खरोखर आश्चर्य वाटण्यासारखे आणि कौतुक करण्यासारखे आहे. 



या नवग्रहांना देव मानून त्यांची पूजा केली जाते, त्यांचे स्तोत्र आहे आणि पुराणामध्ये त्यांच्या विषयीच्या कथा आहेत. इतकेच नव्हे तर ते आकाशात भ्रमण करत असतांना पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांवर बारीक नजर ठेवून असतात आणि त्यांच्या जीवनामधल्या घटना घडवून आणतात असा समज पसरवला गेला आणि असंख्य लोक आजही तसे मानतात. या नवग्रहांमधला सूर्य हा एक तारा आहे आणि फक्त तोच स्वयंप्रकाशी आहे. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा तिचा उपग्रह आहे आणि मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे सूर्याभोवती फिरणारे ग्रह आहेत. हे सगळे ग्रह सूर्याच्या प्रकाशामुळे उजळून निघतात आणि सूर्यापासून मिळालेले प्रकाशकिरण आकाशात सगळ्या दिशांना पसरवत असतात.  शुक्र हा ग्रह पृथ्वीपासून सगळ्यात जवळ आहे आणि तो सूर्यापासूनही जवळ असल्यामुळे त्याला जास्त प्रकाश मिळतो. यामुळे रात्रीच्या आकाशात दिसणारा तो सर्वात जास्त तेजस्वी ग्रह आहे. गुरु हा ग्रह शुक्राच्या अनेकपटीने मोठा असला तरी तो सूर्यापासूनही आणि पृथ्वीपासूनही दूर असल्यामुळे शुक्राच्या नंतर त्याचा क्रमांक वागतो. शनि हा ग्रह त्याच्यापेक्षाही दूर असल्यामुळे आकाराने मोठा असूनही फिक्कट दिसतो. 

या सगळ्या ग्रहांच्या बाबतीत सत्य, आभास, भ्रम आणि कल्पना या सगळ्यांचे एक अजब मिश्रण आहे. 

------

सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ४

माझ्या लहानपणी आमच्या गावात रात्री आठ साडेआठपर्यंत जेवणे आटोपून सामसूम होत असे आणि आम्ही बहुतेक वेळा गच्चीवर अंथरूण पसरून गप्पा मारत मारत उघड्या आकाशाखाली झोपत होतो. त्या काळात त्या भागात सगळीकडे रात्रीच्या वेळी अंधारगुडुप होत असल्यामुळे आकाश निरभ्र असले तर त्यात लाखो चांदण्या लुकलुकतांना दिसत असत. तेंव्हा झोप लागेपर्यंत आमचे आभाळाचे निरीक्षण चाललेले असे. मृग आणि हस्त नक्षत्रे, वृश्चिक रास, सप्तर्षी आणि ध्रुव तारा ही काही ठळकपणे दिसणारी मंडळी माझ्या ओळखीची झाली होती. माझ्या वडिलांना तर बहुतेक सगळी नक्षत्रे आणि सगळ्या राशी माहीत होत्या. आज चंद्र मकर राशीत आहे किंवा सध्या गुरु सिंह राशीत असतो असे ते मला दाखवतांना सांगत असत. एखादा ग्रह कुठल्या राशीत असतो किंवा त्या राशीमधून निघून पुढच्या राशीत जातो म्हणजे नेमके काय होते याचा अर्थ त्यामधून मला समजला होता. 

   


राशीभविष्य वाचतांना असे वाटते की आकाशाच्या एका मोठ्या कॉफी हाउसमध्ये बारा टेबले मांडून ठेवलेली असावीत आणि त्यातल्या कुठल्या टेबलावर दोघे तिघे तर इतर काही टेबलांवर एकेकटे ग्रह बसलेले असतात आणि ते अधून मधून उठून पुढच्या टेबलावर जाऊन बसतात. त्यातला रवि दर महिन्यात एकदा टेबल बदलतो, त्याचा सवंगडी बुध त्याच्याच टेबलावर किंवा लगतच्या टेबलावर बसतो, शुक्रही कधीही रवीपासून जास्त दूर जात नाही, मस्त कलंदर मंगळ जरा अनियमितपणे टेबले बदलत असतो, गुरु एक पूर्ण वर्ष त्याच टेबलावर बसून राहतो आणि शनि तर अडीच वर्षे टेबल बदलत नाही. प्रेमळ चंद्र मात्र दर दोन अडीच दिवसात टेबल बदलून महिनाभरात सगळ्या ग्रहांना भेटून येतो आणि अमावास्येला मात्र न चुकता रवीच्या टेबलावर हजेरी लावतो.  

जेंव्हा आपल्याला कुंडलीमध्ये  दोन किंवा तीन ग्रह एका घरात (राशीत) दिसतात तेंव्हा आकाशात सुद्धा ते एकमेकांच्या जवळ आल्यासारखेच दिसतात. ते जास्तच जवळजवळ दिसले तर त्याला युति म्हणतात. प्रत्यक्षात मात्र चंद्र आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये असला तर मंगळ कोथरूडला, गुरु कऱ्हाडला आणि शनि कोल्हापूरला इतके ते दूर दूर असतात. प्रत्येक ग्रह आणि उपग्रह आपापल्या कक्षांच्या  किंचितही बाहेर जात नाहीत आणि कुठलाही ग्रह किंवा उपग्रह कधीही दुसऱ्या कुठल्याही ग्रहाच्या जवळपाससुद्धा जात नाही आणि  तेच बरे आहे. समजा कधी मंगळ किंवा बुध महाकाय गुरूच्या जवळपास गेला तर तो गुरुत्वाकर्षणाने त्या लहान ग्रहांना गिळून टाकेल आणि कुठलाही ग्रह सूर्याच्या जवळपास गेला तर  क्षणार्धात त्याची वाफ होऊन जाईल.

नक्षत्रे आणि राशी हे चांदण्यांचे समूह आहेत. ज्या तारका मिळून हे समूह बनतात त्या आकाशात एकमेकींच्या जवळ दिसतात. पण त्यासुद्धा प्रत्यक्षात एकमेकींपासून खूप दूर दूर असतात.  मृग नक्षत्रातला व्याध (Sirius) हा तारा सूर्यमालिकेपासून सर्वात जवळ म्हणजे सुमारे आठ प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहे, तर या व्याधाने मारलेल्या बाणातले तीन तारे एक हजार ते दोन हजार प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहेत, म्हणजे ते सुद्धा एकमेकांपासून हजार प्रकाशवर्षे इतक्या अंतरांवर आहेत. साध्या डोळ्यांनी मात्र हे सगळे जवळजवळच दिसतात. विज्ञानामध्ये झालेल्या प्रगत संशोधनामुळे ही अंतरे मोजता आली आहेत.

आकाशातले सूर्य, चंद्र. ग्रह आणि तारे यांचे साध्या डोळ्यांनी निरीक्षण करून मिळणारी माहितीसुद्धा एका दृष्टीने बरोबरच असते, पण त्यात काही प्रमाणात आपले अज्ञान असते. त्यात थोडा आभास असतो आणि विज्ञानामधून त्यांच्या बाबतीतले अधिक सखोल ज्ञान प्राप्त झाल्यावर तो भ्रम दूर होतो.

(क्रमशः)  


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ५

आपल्याला आकाशात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी जशा दिसतात तशाच नसतात किंवा तितक्याच नसतात, आपल्याला जे दिसत नाही असेही बरेच काही तिथे असते, पण ते आपल्याला समजत नाही हे आपले अज्ञान आहे. त्यात कुणीही ठरवून केलेली कसली लपवाछपवी नाही. पण अनेक वेळा असेही होते की जे प्रत्यक्षात नसतेच ते  आहे असे कुणाकडून तरी काही उद्देशाने दाखवले जाते. हे सुद्धा प्राचीन काळापासून होत आले आहे.


रामायणात मारीच राक्षस सोन्याच्या हरिणाचे रूप घेऊन सीतेला मोहात पाडतो आणि तो हरिण पकडून आणण्यासाठी राम वनात जातो.  तो राक्षस नंतर रामाच्या आवाजात "लक्ष्मणा धाव धाव" असे ओरडतो आणि तो रामाचाच आवाज आहे असे वाटून लक्ष्मणही रानात धाव घेतो. तेवढ्यात रावण एका याचकाचा वेष घेऊन सीतेकडे जातो आणि तिला पळवून लंकेला घेऊन जातो अशी रचून केलेली बनवाबनवी आहे.

महाभारतात मयासुर राक्षस पांडवांना एक मयसभा बांधून देतो. त्यात जिथे जमीन दिसते तिथे पाणी आणि जिथे पाणी आहे असे वाटते तिथे जमीन असे भास होत असत. याला फसून दुर्योधनाची फजिती होते आणि द्रौपदी त्याला खदखदा हसून "आंधळ्याचा मुलगा आंधळा" असा टोमणा मारते. दुर्योधनाला हा अपमानाचा घाव सहन होत नाही आणि तो जन्मभर त्याचा सूड घेण्यासाठी दुष्ट कारवाया करत राहतो असा कथाभाग आहे.

पुढे कौरवपांडवांच्या युद्धात अभिमन्यूच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सूर्यास्ताच्या आत जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केलेली असते आणि ती पूर्ण नाही केली तर अग्नीत उडी घेईन असे सांगितले असते.  त्या वेळी कौरव जयद्रथाला एका गुप्त जागी लपवून ठेवतात. ती जागा अर्जुनाला सापडत नसते. अर्जुनाला या धर्मसंकटातून वाचवण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या सुदर्शनचक्राने सूर्याला झाकून टाकतात आणि काळोख पडतो. आपली प्रतिज्ञापूर्ति करण्यासाठी अर्जुन तयार होतो आणि ते पहाण्यासाठी जयद्रथ समोर येतो. तेवढ्यात श्रीकृष्ण आपले सुदर्शन चक्र हटवतो आणि अर्जुनाला सांगतो, "हा पहा सूर्य आणि हा जयद्रथ."

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ६

सर्वशक्तिमान देवांना तर काहीही करणे शक्य असते आणि राक्षसांकडे काही मायावी शक्ती असतात त्यामधून ते आपल्याला अशक्य असलेल्या गोष्टी करू शकतात या दोन गृहीतकांवर पुराणातल्या कथा आधारलेल्या असतात.  माणसांच्या जगात होत नसलेल्या घटना त्या कथांमध्ये घडत असतात. त्यामुळे त्या अद्भुत वाटतात.  त्या खऱ्या म्हणायच्या की कल्पित म्हणायच्या यावर वाद घालण्यात अर्थ नसतो.  ते ज्याने त्याने आपापल्या मनाप्रमाणे किंवा बुद्धीने ठरवावे किंवा ठरवले नाही तरी काही फरक पडत नाही. पण या अद्भुतरम्य कथा हजारो वर्षे टिकून राहिल्या आहेत आणि अजूनही सांगितल्या जातात कारण त्या मानवी मनाचे काही पैलू दाखवतात. या रूपक कथांच्या अनुषंगाने 'कांचनमृग', 'लक्ष्मणरेखा' यासारखे शब्द  उदाहरणादाखल वापरले जातात.


आपल्याकडे जे नसेल ते मिळावे अशी इच्छा कुणालाही होणे साहजिक आहे. ते तुम्हालाही सहज मिळू शकेल अशी प्रलोभने दाखवली जात असतात. आजकाल जाहिरातबाजीच्या काळात तर त्यांचा सतत भडिमार होत असतो. त्यामुळे असा सोन्याचा हरिण अस्तित्वात तरी असेल का याचा विचार न करता काही लोक त्या कांचनमृगाच्या मागे वेड्यासारखे धावत सुटतात. प्रलोभन पाहून लगेच तिकडे आकर्षित होऊ नये, चकाकते ते सगळेच सोने नसते, त्या आकर्षक दिसणाऱ्या गोष्टीची आपल्याला काही गरज किंवा उपयोग तरी आहे का? यावर जरा विचार करावा. 


प्रत्येक माणसाला नेहमी स्वातंत्र्य हवे असते, मनात येईल तसे वागायचे असते, पण त्याचे आईवडील, नातेवाइक, शिक्षक, मित्र , समाज, शासन वगैरे सगळे लोक त्यावर काही बंधने घालत असतात.  केंव्हा कुठे कसे वागायचे याचे काही नियम घालून दिले जात असतात. ते पाळण्यात त्याचे हित असते आणि नाही पाळले, या लक्ष्मणरेखा ओलांडल्या तर त्याचे घातक परिणाम होण्याची शक्यता असते.


असे काही संदेश या कथांमधून मिळतात. या कथा सत्य आहेत की काल्पनिक यापेक्षा ते संदेश महत्वाचे असतात.

(क्रमशः)


---


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ७

दोन हजार वर्षांपूर्वी भरत मुनींनी सविस्तर नाट्यशास्त्र लिहून ठेवले आहे म्हणजे भारतामध्ये त्यांच्याही आधीच्या काळापासून नाटके दाखवली आणि पाहिली जात असणार. कित्येक शतकांपूर्वी भास, कालिदास, शूद्रक वगैरे नाटककारांनी संस्कृत भाषेत नाटके लिहिली. विलियम शेक्स्पीअर या प्रसिद्ध इंग्लीश नाटककाराने अनेक नाटके लिहिली आणि ती रंगमंचावर आणली. मराठी भाषेतही अनेक नाटके लिहिली गेली आणि लिहिली जात आहेत. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सुरु करून दिलेली मराठी रंगभूमीवरीवरील नाटकांची परंपरा  गेली सुमारे दीडशेहून अधिक वर्षे अखंड चालत आली आहे. याचे कारण कोणतेही नाटक प्रेक्षकांना थोड्या वेळासाठी एका वेगळ्या आभासी जगात घेऊन जाते,  नाटक पहातांना त्याला एक वेगळा भावनिक अनुभव येतो आणि प्रेक्षकांना ते आवडते, ते हवे असते म्हणून ते नाटक पहायला येतात. 


"जग ही एक रंगभूमी आहे" असे एक शेक्स्पीअरचे सुप्रसिद्ध वचन असले तरी रंगभूमीवरचे नाटक बाहेरच्या जगापेक्षा वेगळे असतेच. तिथे एक पात्र होऊन थोडा वेळ वावरणारा नट त्याच्या आयुष्यात एक वेगळा माणूस असतो. रंगमंचावर चाललेल्या घडामोडी खऱ्या नसतात, प्रेक्षकांना दाखवण्यासाठी त्या मुद्दाम घडवून आणलेल्या असतात हे प्रेक्षकांनाही माहीत असते आणि कलाकारांनाही माहीत असते. तरीही कलाकार जीव ओतून ती कामे करतात आणि प्रेक्षकही समरस होऊन त्याचा आनंद घेतात, ते नाटकातल्या विनोदावर हसतात, खिदळतात, सुखद प्रसंग पाहून खूष होतात आणि दुःखद प्रसंग पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. एखादे नाटक सत्यकथेवर आधारलेले असले तरी त्यातले प्रसंग त्या नाटकातल्या नटनट्यांच्या आयुष्यात आलेले नसतात, पण रंगमंचावर ते तसा आभास निर्माण करतात, त्यातले संवाद तर नाटककाराने त्याच्या प्रतिभेनुसार कल्पनेतूनच लिहिलेले असतात. बहुतेक नाटके तर पूर्णपणे काल्पनिकच असतात. त्यातली पात्रे, त्यांच्यामधले संवाद आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना हे सगळे खोटेच असते, हे सुद्धा माहीत असते, तरीही ते नाटक पहात असतांना ते खरे वाटते.


नाटकातली दृष्ये खरी वाटावीत यासाठी रंगमंच सजवला जातो. पूर्वीच्या काळी निरनिराळी चित्रे रंगवलेले मोठमोठे पडदे गुंडाळी करून वर लटकवून ठेवलेले असत आणि जसा नाटकाचा प्रवेश असेल त्याप्रमाणे केंव्हा बाग, केंव्हा अरण्य, तर केंव्हा देऊळ किंवा घराचा दिवाणखाना दाखवणारा पडदा खाली सोडून त्या दृष्याच्या पार्श्वभूमीवर कलाकार आपले संवाद बोलत असत. नंतरच्या काळात निरनिराळ्या दृष्यांसाठी लगेच हलवता येण्यासारखे सेट मांडले जाऊ लागले. ते काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी फिरते रंगमंच आणि सरकते रंगमंच आले. या सगळ्यांचा उद्देश जे प्रत्यक्ष अस्तित्वात नाही ते आहे असे तात्पुरते दाखवणे हाच असतो.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ८

पूर्वीच्या काळात आतासारखे तयार रंग, ब्रश आणि ड्रॉइंग पेपर वगैरे गोष्टी बाजारात मिळत नसत. निरनिराळ्या वनस्पतींची पाने, फुले, फळे, मुळे, बिया आणि रंगीत दगड, खनिजे, कोळसे वगैरेंना कुटून त्यांची पूड विशिष्ट प्रकारची तेले, मेण, चरबी वगैरेंमध्ये मिसळून रंग तयार केले जात असत, प्राण्यांचे मऊ केस कापून त्यांचे कुंचले तयार केले आत असत आणि चित्र काढण्यासाठी खास तयार केलेला जाड कागद किंवा दडस विणलेले कापड यावर ती चित्रे काढली जात असत. हे सगळे कष्टाचे आणि खर्चिक काम सामान्य लोकांच्या आवाक्यात नव्हतेच. तत्कालिन राजे रजवाडे, जहागीरदार वगैरे लोक गुणी चित्रकारांना आपल्या आश्रयाला ठेवून घेत असत. माणसाचा चेहेरा पाहून त्याचे हुबेहूब चित्र काढता येणे ही एक अद्भुत आणि अत्यंत दुर्मिळ कला आहे. त्यात पारंगत असलेले चित्रकार वर्षानुवर्षे परिश्रम करून राजघराण्यातल्या लोकांच्या मोठमोठ्या तसबिरी काढत असत. जगभरातल्या अनेक म्यूजियम्समध्ये अशी भव्य जुनी पोर्ट्रेट्स पहायला मिळतात. हे चित्रकार चित्र काढतांना त्या व्यक्तीमधल्या वैगुण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यातल्या पुरुषांना जास्तीत जास्त रुबाबदार आणि स्त्रियांना जास्तीत जास्त सुंदर असेच दाखवत असत. त्यांच्या अंगाखांद्यावर भरजरी उंची कपडे आणि बहुमोल रत्नांनी भरलेले भरपूर दागदागिने दाखवत असत.  त्या चित्रकारांनी वस्तुनिष्ठ कला म्हणून काही वेडेवाकडे दाखवले असते तर त्यांची धडगत नव्हती. 



गेल्या शतकात फोटोग्राफी करण्याचे तंत्र विकसित झाल्यानंतर हुबेहूब छायाचित्र लगेच तयार व्हायला लागले. त्यामुळे दीर्घ काळ घालवून हुबेहूब चित्र काढणाऱ्या चित्रकारांना तितकेसे महत्व राहिले नाही. पण उत्कृष्ट छायाचित्र घेण्यासाठी एकाहून एक चांगले कॅमेरे तयार होत गेले. विशेष प्रकाशयोजना करता येतील असे स्टूडिओ आले. निरनिराळ्या अँगल्समधून पाहून योग्य त्या अँगलने चेहेऱ्याकडे पाहून त्यावरचे भाव स्पष्ट दिसतील अशा प्रकारे नेमक्या क्षणी कॅमेराला क्लिक करणे ही एक नवी कला जन्माला आली आणि त्यात वाकबगार असे छायाचित्रकार नावारूपाला आले. "प्रत्यक्षाहुनि प्रतिमा सुंदर" कशी येईल याचा प्रयत्न करणे हाच या सर्वांचाही उद्देश होता. मग त्यातही जरा वेगळेपणा येण्यासाठी अत्यंत भेसूर असे चेहेरे दाखवणाऱ्या काही 'रिअॅलिस्टिक' छायाचित्रांनाही प्रसिद्धी मिळायला लागली.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ९

सत्यम् शिवम् सुंदरम् हे शब्द नेमके कुठून आले हे मला माहीत नाही, पण त्या नावाचा सिनेमा येण्याच्या खूप वर्षे आधीपासून ते शब्द प्रचारात आहेत.  कदाचित परमेश्वर हा सत्य आहे, शिव म्हणजे कल्याणकारी मंगलमय असा आहे आणि तो मनमोहक, सुंदर असा आहे अशा अर्थाने ते स्तोत्रांमध्ये म्हंटले गेले असेल. भारतातली प्राचीन काळातली शिल्पकला आणि चित्रकला ही मंदिरांच्या आधारानेच प्रगट होत गेली असावी.  बहुतेक मंदिरांमधल्या मूर्ती पहायला सुंदरच दिसतात, देवीदेवतांची चित्रेसुद्धा सुंदरच असतात असा पायंडाच पूर्वीपासून पडला होता आणि तो आजवर चालत आला आहे. कुठल्या देवाचे खरे रूप कुणी पाहिले आहे? पण परमेश्वर हा निर्गुण निराकार असला तरी त्याची उपासना करण्यासाठी जे सगुण रूप डोळ्यांसमोर आणले जाते ते कलाकारांनी आपल्या कल्पनेमधून ते साकारलेले असते तरी ते नेहमी सुंदरच असते. 

लिओनार्दो दा विंचि आणि मायकेलांजेलो यांच्यासारख्या युरोपातल्या जुन्या काळातल्या कलाकारांनी आपल्या कलाकृतींमध्ये सौंदर्याला महत्व दिले होते आणि त्यात एक उच्च दर्जा स्थापन केला होता. त्यांच्या चित्रकलेचे अनुकरण पुढील काही शतके होत गेले आणि अनेक चित्रकारांनी तशाच प्रकारच्या एकाहून एक सुंदर कलाकृती निर्माण केल्या. पण शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या पाश्चिमात्य कलाकारांनी वेगळा विचार करायला सुरुवात केली. जरी वीर सावरकरांनी स्वतंत्रतेला उद्देशून "जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते" असे म्हंटले असले तरी या बंडखोर कलाकारांनी मात्र आपल्या कलात्मक स्वातंत्र्यासाठी कलेमध्ये  त्याहून वेगळे असे काही आणणे आवश्यक आहे असे सांगायला सुरुवात केली.  पूर्वीच्या काळात या कलाकांरांचे राजघराण्यातले आश्रयदाते असत त्यांच्या कलाने घेणे आवश्यक होते. पण आर्ट गॅलरीज उघडल्या आणि त्यात सामान्य लोकही  मोठ्या संख्येने येऊन तिथे मांडलेल्या कलाकृती पहायला लागले हे पाहून त्या काळातल्या कलाकारांना नवीन प्रयोग करायचा धीर आला. शिवाय फोटोग्राफी आल्यानंतर हुबेहूब आकृति काढण्याचे महत्व कमी होऊन कल्पनेतून वेगळे काही तरी काढावे असे वाटायला लागले होते. जर प्रत्यक्ष जीवनात गलिच्छपणा आणि ओंगळपणा अस्तित्वात असेल तर तो चित्रांमध्ये का नको? असे म्हणणारे लोक एका दृष्टीने कलेला सत्याच्या जवळच नेत होते. त्यांनी उघडपणे ते दाखवायला सुरुवात केली. पण कला ही मुख्यत्वे कल्पनेची भरारी असते असे म्हणून काही कलाकारांनी त्यांना सुचतील तशा विकृति त्यात घुसवल्या. पुढे पुढे तर मॉडर्न आर्ट किती अनाकलनीय असावी याची चढाओढ सुरु झाली तेंव्हा मात्र ती पूर्णपणे सत्यापासून दूर भरकटत गेली.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १०

कॅमेरा हे एक निर्जीव यंत्र असते, त्याला भावना, बुद्धी वगैरे काही असत नाही. तो खोटे चित्रण करत नाही.  त्याच्या भिंगाच्या समोर जे काही दृष्य असते तेच तो प्रामाणिकपणे फोटोमध्ये उतरवतो. असे असले तरी त्या कॅमेराला हाताळणारे लोक लबाड असू शकतात. जवळच्या गोष्टी मोठ्या दिसतात आणि दूरच्या लहान दिसतात या निसर्गाच्या नियमाचा उपयोग करून घेऊन ते गंमतशीर फोटो काढू शकतात. त्यात कोणी ताजमहालला आपल्या डोक्यावर घेतले आहे, अख्ख्या कुतुबमिनारला तळहातावर तोलून धरले आहे, आ वासून चंद्राला गिळतो आहे किंवा मावळत्या सूर्याला चिमटीत पकडून धरले आहे अशी चित्रे पहायला मिळतात. एक नूर आदमी दस नूर कपडा असे म्हंटले जाते. बहुतेक लोकांना चित्रविचित्र कपडे घासून आपले फोटोकाढून घेण्याची हौस असते.  त्या पोशाखात ते जसे दिसतात तसे ते प्रत्यक्ष आयुष्यात नसतात. जे लोक हिमाचल प्रदेश, गोवा, दार्जिलिंग, स्विट्झर्लंड अशा सारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात तिथल्या स्थानिक लोकांचे कपडे घालून आपले फोटो काढून घेतात आणि त्या सहलीची एक वेगळी आठवण आपल्यापाशी ठेवतात. 



कधी कधी आपल्याला दृष्टिभ्रमामुळे जे आहे त्यापेक्षा वेगळे काही तरी दिसते. काही हुषार लोक अशा दृष्यांना कॅमेरामध्ये कैद करून किंवा तसे चित्र रंगवून ती दृष्ये लोकांना दाखवतात. या सोबत दिलेल्या एका दृष्यात आपल्याला गणपतीचा भास होत असला तरी ती फक्त नारळाची झाडे आहेत. सतत बदल होत राहणे हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे.  त्यानुसार शहरे, आसमंत आणि माणसांचे चेहेरेही हळूहळू बदलत असतात. फोटोग्राफीची सोय झाल्यामुळे जुन्या आठवणीतली दृष्ये साठवून ठेवून आपण ती कालांतराने पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वीचे पुणे, मुंबईतले रस्ते, इमारती वगैरेंचे फोटो आपल्याला बरेच वेळा पहायला मिळतात आणि आपल्या जन्मापूर्वी ही शहरे कशी होती याचा अंदाज येतो. खाली दिलेल्या फोटोमधले जोडपे आता शंभर वर्षांहून मोठे आहे, ते विशीत असतांना कसे दिसत होते हे त्या फोटोच्या वरच्या भागात दिसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ११

चित्रपटाच्या शोधाने मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाला.  नाटकामधील पात्रे एका वेळी एकाच रंगमंचावर आपला खेळ करू शकत असत आणि फक्त तिथे असलेले प्रेक्षकच ते पाहू शकत असत. रंगमंचावरील पडदे किंवा सेट यामधून एका नाटकात किती वेगवेगळ्या जागा दाखवता येतील आणि एका वेळी किती माणसे स्टेजवर असू शकतील याला मर्यादा असत. तिथे फार कमी घटना प्रत्यक्ष घडतांना दाखवता येत असत. त्यामुळे नाटकाचा सगळा भर संवादावर असायचा. 


चित्रपटांनी या सगळ्या मर्यादा झुगारून दिल्या. त्यांचे शूटिंग निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या ठिकाणी करून ती चित्रे नंतर एकत्र आणली जातात. त्यात घोडे दौडतांना, मोटारी पळतांना किंवा विमाने उडतांना दाखवता येतात. माणसांची प्रचंड गर्दी, प्राण्यांचे कळप किंवा पक्ष्यांचे थवे दाखवता येतात. अनेक प्रकारच्या घटना घडत असतांना दाखवता येतात. चेहेऱ्यावर कॅमेरा फोकस करून डोळ्यातून प्रकट होणारे सूक्ष्म हावभावसुद्धा दाखवता येतात. हत्ती, उंट, वाघ, सिंह, सुसरी अशासारख्या ज्या मोठमोठ्या जनावरांना नाटकाच्या रंगमंचावर आणणे शक्य नसते, त्यांना तर सिनेमामध्ये पडद्यावर दाखवता येतेच, बारीक किडामुंग्यांनाही मोठे करून दाखवता येते. इंद्राच्या महालापासून ते शहरातल्या गजबजलेल्या वस्तीपर्यंत कुठल्याही वास्तवातल्या किंवा कल्पनाविलासातल्या जागा आणि तिथे घडणाऱ्या काल्पनिक घटना दाखवता येतात. त्यांना सुमधुर अशा गाण्यांची जोड देता येते.  एकदा तयार केलेल्या फिल्मच्या अनेक प्रती काढून त्या अनेक चित्रपटगृहांमध्ये अनेक वेळा दाखवता येतात. या सगळ्या फायद्यांमुळे नाटके मागे पडत गेली आणि सिनेमांनी त्यांच्यावर मात करून ते अनेकपटीने जास्त पाहिले जाऊ लागले. 


सिनेमाचा दुसरा फायदा असा असतो की  जुन्या झालेल्या फिल्मसुद्धा कित्येक वर्षांनंतरही पुन्हा दाखवता येतात. तोपर्यंत त्यात काम करणारे कलाकार म्हातारे किंवा दिवंगत झाले असले तरी त्यांचे तारुण्यातले सौंदर्य सिनेमाच्या फिल्ममध्ये टिकून राहिलेले असते. सिनेमाच्या पडद्यावर दिसणारे सगळे १००टक्के भासच असतात, तरीही तो पहात असतांना पहाणाऱ्यांना गुंगवून ठेवतात. चित्रपट भास असला तरी तो पहाणाऱ्याच्या मनावर होणारे परिणाम खरे असतात.  काही काही चित्रपट तर जन्मभर लक्षात राहतात. मधुमती हा चित्रपट १९५८ साली प्रकाशित झाला तरी तो पन्नास वर्षांनंतरही मला खडा न खडा आठवत होता आणि अजूनही माझ्या आठवणीत राहिला आहे.

(क्रमशः)

https://anandghan.blogspot.com/2008/04/blog-post_29.html


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १२

पूर्वीच्या काळात प्रवासाची सुलभ साधने कमी होती आणि मध्यमवर्गाकडे ओढाताणीची आर्थिक परिस्थिति होती. अत्यावश्यक काम असेल तरच लोक प्रवास करत असत. अनेक लोकांना पर्यटन हा शब्दच माहीत नसायचा. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे अनुभव विश्व संकुचित असायचे. म्हैसूरची वृंदावन गार्डन किंवा काश्मीरचे सृष्टिसौंदर्य हेसुद्धा प्रत्यक्ष पहायला जाणे अवघड असायचे. परदेशगमन तर फारच कमी लोकांच्या नशीबात  असे. पण वाचनसंस्कृतीचा प्रसार होत असल्यामुळे वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके यामधून जगभरातल्या प्रेक्षणीय स्थळांची रसभरित वर्णने वाचनात येत असत आणि त्यांचेबद्दल कुतुहल वाटत असे. यामुळे हे सगळे अद्भुत वाटणारे वेगळे जग सिनेमाच्या पडद्यावर अगदी स्वस्तात पहायला मिळते याचे अप्रूप वाटत असे. ईव्हनिंग इन पॅरिस, नाइट इन लंडन, लव्ह इन टोकियो अशा नावांमुळेच लोक थेटरांकडे खेचले जात असत.


दूरचित्रवाणी आल्यावर आणखी एक चमत्कार झाला. घरात बसूनच सगळ्या जगाचे दर्शन व्हायला लागले. यात हे सगळे चित्रपट, त्यातली गाणी, निवडक दृष्ये वगैरेही पहायला मिळतातच, तसेच जगभरातल्या बातम्या दाखवल्या जात असतात, त्यांमध्ये तिथला निसर्ग, तिथले रस्ते, घरे, इमारती हे सगळे आपोआप दिसतेच. मुख्य म्हणजे त्यासाठी उठून कुठल्या थेटरात जाण्याची गरज नाही. आता तर अनेक वाहिन्यांवरील टी.व्हीचे प्रक्षेपण चोवीस तास चाललेले असते. त्यात बातम्या, चर्चा, संगीत, नृत्य, खेळांचे सामने अशा अनंत गोष्टी असतात. आपल्याला इच्छा आणि वेळ असेल तेंव्हा टीव्ही सुरु करावा आणि आपल्याला जे आवडते ते पहावे अशी सोय झाली आहे. आपण फक्त एका निर्जीव काचेकडे पहात असतो हे सत्य असले तरी त्यात जे दाखवले जाते ते जीवंत वाटते आणि त्यातला काही भाग खराखुरा आणि काही भाग काल्पनिक असे मिश्रण असते.  

(क्रमशः)  

 

सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १३

मी नोकरीला लागलो तेंव्हा फक्त टी.आय.एफ.आर.सारख्या महत्वाच्या प्रयोगशाळांमध्ये संगणक आला होता. एका मोठ्या हॉलमध्ये अनेक रॅक्समध्ये रचून ठेवलेल्या हजारो इलेक्ट्रॉनिक काँपोनंट्समधून तो एक काँप्यूटर होत होता. तेंव्हा मला त्या खोलीत शिरायची परवानगीसुद्धा मिळत नव्हती. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होत आलेल्या प्रगतीमुळे मी रिटायर व्हायच्या आधी चक्क माझ्या घरात एक पर्सनल काँप्यूटर (पीसी) आला आणि मी तो चालवायला लागलो. तसेच त्याच्याबरोबर इंटरनेटही आले. अक्षरे, चित्र आणि ध्वनि या तीन्ही माध्यमांमधून प्रकट होत असलेली माहिती आणि संदेश मला त्यातून मिळायला लागले, इतकेच नव्हे तर मीसुद्धा ते पाठवायला लागलो. सिनेमा किंवा टीव्हीमध्ये इतर काही लोकांनी मिळून तयार केलेले कार्यक्रम मी फक्त प्रेक्षक होऊन पहात होतो. पण  मी स्वतः संगणकावर ब्लॉग लिहून ते इंटरनेटवर पाठवायला लागलो. 


त्याच्या पाठोपाठ स्मार्ट फोन आला आणि या सगळ्या गोष्टी जास्तच सोप्या झाल्या. इतकेच नव्हे तर त्याच्या अंतर्गत एक उत्कृष्ट कॅमेराही आला.  हा तर मी जेथे जातो तेथे माझा सांगाती असल्यामुळे जगभरात कुठेही असलो तरी संपर्कक्षेत्रात रहायला लागलो आहे आणि मला हे संदेश मिळायला लागले आहेत, तसेच मी फोटो काढून तेही पाठवू शकतो.


या आंतर्जालातून एक वेगळेच आभासी जग निर्माण झाले आहे. विशेषतः फेसबुक, वॉट्सॅप आणि यू ट्यूब यांच्यामुळे असंख्य प्रकारच्या निरनिराळ्या मति गुंग करणाऱ्या गोष्टी फारच सहजासहजी उपलब्ध व्हायला लागल्या आहेत. लोकांना ते पाहण्याचे वेड किंवा व्यसन लागले आहे. अनेक लोक दिवसातला बराच वेळ खऱ्याखुऱ्या आपल्या माणसांच्या सोबत घालवण्याऐवजी या मायावी विश्वात रमायला लागले आहेत. त्यामुळे नातेसंबंध कमकुवत होत चालले आहेत. खऱ्या जगातले काही लोकसुद्धा अनेक मुखवटे धारण करून वावरत असतातच, या आभासी जगात तर कोण खरी व्यक्ती आहे आणि कोण बनावट किंवा फ्रॉड आहे, कुणावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हेच समजत नाही. ऑन लाइन व्यवहारांमधून कुणाकुणाला कसे आणि किती फसवले याच्या बातम्या रोजच येत असतात.  त्याचबरोबर अनोळखी माणसाशी बोलूसुद्धा नका असे उपदेशही दिले जातात. हे भीतीदायक सगळे वाटते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १४

आपल्या खऱ्या जगामधल्या माणसांचे नाव, गाव, पत्ता यावरून त्यांची ओळख निर्माण होते आणि त्यांची अमोरासमोर भेट होते. आपल्या ओळखीतली अशी अनेक माणसे इंटरनेटच्या आभासी जगातही वावरत असतात, ती आपल्या मित्रांच्या यादीमध्ये असतात आणि आजकाल प्रत्यक्ष भेटींपेक्षा तिथेच त्यांच्या जास्त वेळा भेटी होत असतात. 


पण त्या आभासी जगात त्यांनी कधी कधी यूजर नेम म्हणून स्वेच्छेने वेगळे (खोटे) नाव धारण केले असते किंवा तिथल्या काही नियमांमुळे त्यांना ते करावे लागते. आभासी विश्वाला सायबर स्पेस असे म्हंटले जाते आणि तिथल्या जागांना वेबसाइट म्हणतात, पण त्यांना पुणे, मुंबई, कोल्हापूर यासारखे भौगोलिक अस्तित्व नसते किंवा त्या स्पेस म्हणजे अवकाशात नसतात. ज्या मोठमोठ्या कंपन्यांनी हे वैश्विक महाजाल तयार करण्यात पुढाकार घेतला त्यांनी जगभरात ठिकठिकाणी स्थापन केलेल्या अजस्त्र संगणकांमधल्याच कुठल्या तरी सर्व्हरमध्ये त्या वसत असाव्यात असे मला वाटते. या प्रत्येक वेबसाइटला एक पत्ता असतो. ईमेल प्रोव्हाइडर्स किंवा फेसबुकसारख्या संस्था जगातील कोट्यावधी लोकांना त्यांच्या वेबसाइटवरच  अगदी फुकटात एकेक कप्पा देतात, त्या कप्प्यालाही वेगळा पत्ता मिळतो.  या वेब स्पेसमध्ये डोमेन नावाची जागा भाड्याने घेऊन तिथे आपली स्वतःची वेबसाइट बांधता येते आणि तिला एक वेगळा पत्ता मिळतो.  तो कप्पा किंवा ती साइट नेमकी कुठल्या सर्व्हरमध्ये असते ते त्या माणसालाही कधीच समजत नसते, तरीही तो आपल्या घरी बसूनच तिचा उपयोग करून घेऊ शकतो. प्रत्येक संगणकाला आयपी अॅड्रेस नावाचा एक पत्ता असतो त्याची नोंद कुठेतरी केली जात असते आणि त्या माणसाला येणारे संदेश त्या पत्त्यावर जाऊन पोचतात. आज या जगात सुमारे दोन अब्ज वेबसाइट आहेत आणि सुमारे पाच अब्ज लोक त्यांचा वापर करत असतात.


आपल्या खऱ्या जगातल्या कुणी दुसऱ्या कुणाला पत्र लिहून ते पोस्टाच्या पेटीत टाकले तर कितीही सक्षम पोस्ट खाते असले तरी ते पत्र त्या दुसऱ्या माणसाच्या हातात पडायला काही दिवस लागतात, पण आपण पाठवलेली ईमेल या आभासी जगातल्या पाच अब्ज लोकांपैकी नेमक्या आपल्याला हवे असलेल्या माणसांच्या टपाल पेटीत जाऊन पडायला काही सेकंद पुरेसे असतात. असे काही होऊ शकेल असे कुणी २५-३० वर्षांपूर्वी सांगितले असते तर ते कुणालाही खरे वाटले नसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १५

मी लहानपणी अल्लाउद्दिनच्या जादूच्या दिव्याची गोष्ट ऐकली होती तेंव्हा तीसुद्धा मला खरीच वाटली होती. आपल्यालाही असा एखादा दिवा मिळावा  म्हणजे त्याला घासल्यावर त्यातून बाहेर आलेल्या जिन्नला सांगितले की आपल्याला हव्या असतील त्या वस्तू तो आणून देईल असे वाटले होते. पण खऱ्या जगात तसे काही असत नाही, आपल्याला हवे असलेल्या वस्तू स्वतःच परिश्रम करून मिळवाव्या लागतात याची जाणीव झाली. पूर्वी वस्तूच काय, माहितीसुद्धा सहजासहजी मिळत नसे. पुढे निरनिराळी जाडजूड पुस्तके आधी शोधून काढायची, मग  ती वाचून त्यातली माहिती मिळवायची आणि ती आपल्या वहीत लिहून काढायची हे करण्यात माझा सगळा जन्म गेला. अनेक वेळा इतर लोकांनी अशा प्रकारे जमवलेली माहिती त्यांच्या व्याख्यानांमधून किंवा लेखांमधून मिळत असे तीही टिपून ठेवावी लागत असे. आपल्याला हवी असेल ती माहिती लगेच मिळवण्याचे काही सोपे साधन नव्हते आणि कधी तरी ते उपलब्ध होऊ शकेल असेही वाटले नव्हते.


एका संगणकातली माहिती दुसऱ्या संगणकाकडे कशी पोचवायची यावर संशोधन करत असतांनाच नेटवर्किंग करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. पुढे त्याचा जगभर विस्तार करून इंटरनेटचा शोध लावला गेला. या महाजालावर असंख्य प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी ती आपल्याला कोण देणार हा मोठा प्रश्न होताच. मग काही हुषार लोकांनी सर्च इंजिनांचा शोध लावला आणि ती इंजिने सगळ्या पब्लिकला फुकट उपलब्ध करून दिली.  या इंजिनांच्या चढाओढीत गूगलने बाजी मारली आणि ते इतके लोकप्रिय झाले की आंतर्जालावर माहिती शोधणे या अर्थाचे गूगलणे हे क्रियापद तयार झाले आहे.

गूगल नावाचा हा ब्रह्मराक्षस खरोखरच अल्लाउद्दिनच्या जिन्नसारखा महापराक्रमी आहे. त्याला नुसता एक शब्द सांगितला तरी तो शब्द  वेबस्पेसमधल्या कुठकुठल्या लेखात आला असेल त्या सगळ्या लेखांचे पत्ते निमिषार्धातआणून देतो. मग ते लेख वाचून त्यातून आपल्याला हवी असेल ती माहिती मिळवावी आणि आपल्या संगणकावरच साठवून ठेवावी किंवा आणखी कुणाला ती पुरवावी हे आता किती सोपे झाले आहे.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १६

पुराणकाळात एक विश्वामित्र नावाचे महर्षि होऊन गेले.  पुराणातले देव आणि दानव तर अनेक प्रकारचे चमत्कार करू शकत असतच, या ऋषींनीही  घोर तपश्चर्या करून अद्भुत सामर्थ्य प्राप्त करून घेतले होते. त्रिशंकु नावाच्या एका राजाला जिवंतपणीच स्वर्गात जायचे होते. त्याने विश्वामित्र ऋषींना शरण जाऊन आपली मनोकामना सांगितली.  विश्वामित्रांनी त्रिशंकूसाठी एक विशेष यज्ञ करून असे सामर्थ्य मिळवले त्यातून त्याला रॉकेटसारखे आकाशात उडवून दिले आणि त्याची स्वर्गाकडे रवानगी केली. पण स्वर्गाचा राजा इंद्र त्रिशंकूला स्वर्गात घ्यायला तयार नव्हता. त्याने त्रिशंकूला वरून खाली ढकलून दिले, पण विश्वामित्राने लावलेला जोर त्याला पृथ्वीवर येऊन खाली पडू देत नव्हता. त्यामुळे तो आकाशात अधांतरीच लटकत राहिला. मग विश्वामित्राने त्या त्रिशंकूसाठी त्याच्या आजूबाजूला एक प्रतिश्रृष्टी तयार करून दिली. त्याला लागणारे खाणेपिणे आणि इतर सगळ्या वस्तू त्याला तिथे बसून मिळायला लागल्या.


अल्लाउद्दिनच्या जिन्नसारखा महापराक्रमी गूगल इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या सगळ्या कोठारांच्या चाव्या आणून देतो, पण त्यातली कोठारे उघडून तिथे असलेली माहिती आपणच गोळा करायची असते.  त्यातली कुठली माहिती खरी आहे, कुठली भ्रामक आहे, कुठली मार्गदर्शक आहे, कुठली दिशाभूल करणारी आहे हे आपणच ठरवायचे असते आणि त्यानुसार तिचा उपयोग करून घ्यायचा असतो.


त्यानंतर आलेल्या एआयने याच्या पुढची पायरी गाठली आहे. ते वापरून काम करणारे आधुनिक विश्वामित्र फक्त माहिती मिळवून थांबत नाहीत तर तिचा उपयोग करून तुम्हाला हवा असेल तसा लेख, कविता किंवा कथा लिहून देतात, तुम्ही सांगाल तसे चित्र काढून देतात, गाण्याला चाल लावून तशी रील तयार करून देतात. ते  एक प्रकारचे प्रतिविश्व निर्माण करायला लागले आहेत. ते लोकही अजून नवखे असल्यामुळे त्यांच्या कामात कधीकधी चुका होतात, पण लवकरच ते सगळ्या जगाचा विश्वास संपादन करतील असे सांगितले जात आहे.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १७

अलीबाबा आणि चाळीस चोरांच्या गोष्टीतल्या गुहेला जादूचा दरवाजा होता. "खुल जा सिमसिम" असा मंत्र म्हंटल्यावर तो आपोआप उघडत असे आणि दुसरा एक मंत्र म्हंटला की तो आपोआप बंद होत असे. एरवी कुणीही कितीही जोर लावून तो दरवाजा उघडू किंवा बंद करू शकत नसे. लहानपणी ही गोष्ट ऐकतांना त्याची खूप मजा वाटत असे.


संत ज्ञानेश्वरांची एक आख्यायिका सांगितली जाते. त्यात एकदा ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे एका कट्ट्यावर किंवा अर्धवट बांधलेल्या भिंतीवर सकाळचे कोवळे ऊन खात बसले असतांना समोरून महायोगी चांगदेव महाराजांचे आगमन होतांना त्यांना दिसले. हे योगीराज एका वाघावर आरूढ झाले होते आणि त्यांचे हजारो शिष्यगण त्यांचा जयजयकार करत त्यांच्यासोबत चालत येत होते. ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला आज्ञा केली की चल, आपण पुढे जाऊन त्यांचे स्वागत करू आणि ती भिंत चालायला लागली. चांगदेवांने पाहिले की आपण सजीव वाघावर ताबा मिळवला असला तर हे महात्मे निर्जीव भिंतीला चालवत घेऊन येत आहेत. त्याचा सगळा ताठा तत्काळ गळून पडला आणि त्याने ज्ञानेश्वरांचे पाय धरले.


मी अणुशक्ती खात्यात नोकरीला लागल्यानंतर जे पहिलेच काम माझ्यावर सोपवण्यात आले त्यात एक सहा मीटर उंच, चार मीटर रुंद आणि एक मीटर जाड असा अजस्त्र आकाराचा दरवाजा तयार करून घ्यायचा होता. दोनतीन सेंटिमीटर जाड पोलादी पत्र्यांचे तुकडे कापून आणि त्यांना पुन्हा वेल्डिंगने जोडून एक इतका मोठा रिकामा डबा तयार करायचा होता आणि त्याच्या तळाशी चाके आणि काही यंत्रसामुग्री जोडायची होती. ती सगळी त्या डब्याच्या आतच बसवली होती. कोटा इथे बांधल्या जात असलेल्या आमच्या अणुविद्युतकेंद्रात या दरवाजाला उभे केल्यानंतर तो सिमेंट काँक्रीटने भरला गेला. तो दरवाजा म्हणजे एका भिंतीचा भाग होता आणि भिंतीसारखाच दिसत होता. त्याच्यापासून काही अंतरावर एका सुरक्षित जागी ठेवलेल्या पॅनेलवरील एक बटन दाबले की तो दरवाजा किंवा ती भिंत दोन मीटर मागे सरकून एका व्हॉल्टमध्ये जायचा मार्ग मोकळा करून देत असे. एक अजस्त्र आकाराचे यंत्र त्यातून व्हॉल्टच्या आत गेल्यावर पॅनेलवरील दुसरे बटन दाबले की ती भिंत पुढे सरकून ती मोकळी जागा भरून टाकत असे.  सगळी यंत्रसामुग्री अंतर्गत असल्यामुळे बाहेरून पहाणाऱ्याला असेच वाटायचे की ती भिंत स्वतःच चालत असावी.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १८

मी कॉलेजात शिकत असतांनाच ऐकले होते की जर्मनी जपानमध्ये कारखान्यातली काही कामे कामगार न करता रोबो करतात. रोबोसाठी मराठीमध्ये यंत्रमानव हा शब्द वापरला जातो. पण त्याला माणसासारखे हातपाय, नाकतोंड, कान आणि डोळे असायलाच हवेत असे काही नाही हे मला नंतर समजले. त्या काळातच मी जे कारखाने पाहिले त्यात काही ठिकाणी ऑटोमॅटिक यंत्रे होती. त्यांना एक प्रोग्रॅम दिला की ती ते ठराविक काम आपल्याआप करून तंतोतंत एकासारखे एक अनेक पार्ट धडाधड तयार करत असत. नंतरच्या काळात अशी यंत्रे अधिकाधिक प्रमाणात तयार होत गेली आणि आता पारंपरिक साधी यंत्रेच दुर्मिळ झाली आहेत. आमच्या अणुभट्टीमध्ये तीव्र विकिरण (रेडिएशन) होत असल्यामुळे तिथल्या काही भागात मानवी कामगार जाऊच शकत नाही. अशा ठिकाणची यंत्रे दुरूनच म्हणजे कंट्रोल रूममधून चालवावी लागतात.  ती डिझाइन करून तयार करवून घेणे हेच काम माझ्याकडे होते. ते सगळे आपोआप चालणारे रोबोच होते. ते अशा प्रकारच्या हालचाली करायचे की त्यांना पाहून ते सजीव आहेत की काय अशी शंका यावी.


अलीकडच्या काळात हुबेहूब माणसासारखे दिसणारे, चालणारे आणि बोलणारे रोबो तयार होत आहेत. केरळमधल्या शाळेत अशी एक शिक्षिका मुलांना शिकवण्याचे काम करते असा व्हीडिओ प्रसृत झाला होता.  इतर कामे करणारे रोबोही तयार झाले आहेत आणि होत राहतील. कपड्यांच्या दुकानांमध्ये हुबेहूब माणसांसारखे दिसणारे पुतळे तर सर्रास असतात, यापुढे ते ग्राहकांशी बोलायलाही लागतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि यंत्रमानवशास्त्र (रोबोटिक्स) यांच्या संयोगातून पुढे कशा प्रकारची खोटी माणसे तयार होतील आणि ती या जगातल्या खऱ्या लोकांमध्ये बेमालुम मिसळून काय काय गोंधळ घालतील याची चिंता वाटायला लागली आहे.


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १९

माणसाला जी बुद्धिमत्ता मिळाली आहे त्यात आकलनशक्ती, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती हे मुख्य भाग आहेत. माणसाला त्याच्या ज्ञानेंद्रियांकडून सतत कोणते ना कोणते संदेश मिळत असतात. डोळ्यांनी पाहिलेली दृष्ये किंवा अक्षरे, कानावर पडलेले स्वर किंवा शब्द, जिभेला मिळालेली चव, नाकाने घेतलेले वास आणि त्वचेला झालेले स्पर्श या सारखे असंख्य संदेश क्षणोक्षणी त्याच्या अफाट स्मरणात साठवले जातात आणि पुन्हा तशा प्रकारचा संदेश आला की पूर्वीच्या अनुभवांची आठवण आपोआप जागी होते. यावरूनच त्याला परिस्थितीचे आणि घटनांचे आकलन होत असते. 


त्याला कुठलीही घटना नेहमीपेक्षा वेगळी वाटली तर तो तिकडे जास्तच लक्ष देऊन पाहतो, कान टवकारून ऐकतो, चौकशी करतो आणि ती घटना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ती आपले नातेवाईक, शेजारी, मित्र वगैरेंना सांगतो, कधीकधी तर अनोळखी लोकांना सुद्धा सांगतो. ते लोक ती गोष्ट तिखटमीठ लावून आणखी अधिक लोकांना सांगतात. यामधूनच ती बातमी पसरत जाते. त्यातला बराचसा भाग खरा असला तरी  कधी कधी दिसते तसे नसते यातून होणाऱ्या गैरसमजामुळे किंवा सांगण्यातल्या ऐकण्यातल्या चुकीमुळे त्यात फरक पडत जातो आणि काही लोक  जाणून बुजून मुद्दाम खोट्या अफवा पसरवण्याचे काम करत असतात.  या सगळ्यांमुळे मौखिक माध्यमातून पसरणाऱ्या ऐकीव माहितीत सत्य आणि असत्य याची सरमिसळ असते.  प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार त्यातले काय समजण्यासारखे आणि किती पटण्यासारखे आहे हे ठरवत असतो. प्रत्येकाने ते करायला हवे. कुणीही काहीही सांगितले तर त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये. पण पूर्णपणे तसे होत नाही असे दिसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २०

पूर्वीच्या काळात जेंव्हा काही महत्वाचे कारण असेल तेंव्हा राजाचा शिपाई गावागावांमध्ये जाऊन दवंडी पिटत असे.  तो चौकात उभारून आपल्याकडच्या वाद्यातून ढण् ढण् असा आवाज काढून लोकांना  गोळा करत असे आणि चार लोक जमले की "ऐका हो ऐका" अशी सुरुवात करून बातमी, संदेश किंवा सूचना जोरात ओरडून सांगत असे. ग्रामपंचायत आणि नगरपालिकासुद्धा दवंड्या पिटत असत. आता पद्धत थोडी बदलली आहे. आमच्या हिंजवडी ग्रामपंचायतीची व्हॅन गावभर फिरते आणि त्यात बसलेला माणूस लाउडस्पीकरवरून अनाउन्समेंट करत असतो.


छापखान्यांचा प्रसार झाल्यानंतर कुठलीही माहिती, विचार आणि कल्पना कागदावर छापून आणि त्याच्या अनेक प्रती काढून त्या अनेक वाचकांपर्यंत पोचवण्याची सोय झाली. काही लोक छापील पत्रके वाटून आपले विचार जनतेपर्यंत पोचवायला आणि त्यांना काही कृति करायचे आवाहन करायला लागले. रोजच्या रोज कुठे काय घडते याची बातमी छापून तिचा प्रसार करण्यासाठी अनेक वर्तमानपत्रे निघाली. त्यात स्थानिक बातम्यांशिवाय जिल्ह्यात, राज्यात, देशात, परदेशात आणि अगदी अंतरिक्षात घडणाऱ्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली जायला लागली. जसजसे लोकांचे भूगोलाचे ज्ञान वाढत गेले तसतसे लोकांना आपल्या परिसराच्या बाहेर कुठे काय चालले आहे हे समजून घेण्याची उत्सुकता वाढत गेली. त्यातून वर्तमानपत्रे लोकप्रिय होत गेली.


पण रोज कुठे तरी खूप महत्वाची घटना घडतेच असे नाही. पण जी बातमी असेल तिला आकर्षक मथळा देऊन सनसनाटी करायचे तंत्र निघाले. त्याशिवाय लोकांनी आपले वर्तमानपत्र विकत घेऊन वाचावे यासाठी  बातम्यांबरोबरच अग्रलेख, व्यंगचित्रे, विनोदी चुटकुले, माहितीपूर्ण किंवा मनोरंजक लेख, राशी भविष्य, शब्दकोडे वगैरेंची खोगिरभरती होत गेली. अनेक वस्तूंच्या जाहिराती छापून यायला लागल्या. आम्ही खरे तेच छापतो असे बहुतेक सगळे वर्तमानपत्रवाले पूर्वीपासून सांगत आले आहेत आणि बहुतेक लोक त्यावर विश्वास ठेवतात. पण बहुतेक वर्तमानपत्रे चालवणारा एक वर्ग असतो. त्याचे काही राजकीय व सामाजिक विचार आणि हितसंबंध असतात.  त्या वर्तमानपत्रातल्या मजकुरावर त्यांची छाप पडत असते. आजकाल नॅरेटिव्ह या नावाची अर्धसत्ये सांगितली जातात. त्यात काही भाग खरा असला तरी त्यावर वेगळे रंग चढवलेले दिसतात.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २१

ब्रिटिशांच्या काळातच त्यांनी मुंबईसारख्या महानगरांमध्ये रेडिओ स्टेशन्स सुरू केले होते. गुरुदेव टागोरांनी त्याला आकाशवाणी असे नाव दिले. पुराणातल्या कथांमध्ये आकाशवाणीमधून प्रत्यक्ष देवच काहीतरी सांगत असे.  ते १००% सत्य असणार यात काही शंकाच नव्हती. स्वातंत्र्यानंतर पुणे, नागपूर, सांगली यासारख्या अनेक शहरांमधून आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. त्यात बातम्यांना खूप महत्व होते. एखादी घटना घडल्यानंतर त्याची बातमी वर्तमानपत्रात छापून ते वर्तमानपत्र लहान लहान गावापर्यंत पोचेपर्यंत दोन तीन दिवस उलटून जायचे. रेडिओवरील बातम्या त्याच्या आधी पोचायच्या. या कारणामुळे माझ्यासारखे रोज पेपर वाचणारे लोकसुद्धा रोज आवर्जून रेडिओवरच्या बातम्या ऐकत असत. १९७०च्या दशकात दूरदर्शन आल्यानंतरही काही वर्षे आम्ही रोज रेडिओ ऐकत होतो. हळू हळू ते कमी होऊन बंद झाले. पण अजूनही आकाशवाणी सुरू आहे आणि ती ऐकणारे श्रोते आहेत.


आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बातम्या सांगणाऱ्या व्यक्ती एका काळी स्टार असायच्या. त्यांनी सांगितलेल्या बातम्या विश्वसनीय असायच्या.  हे दोन्ही केंद्रे सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्या बातम्यांवर काही बंधने असली, त्यात मोघमपणा असला तरी त्यात ठरवून केलेला खोटेपणा नसायचा. नंतरच्या काळात असंख्य खाजगी चॅनेल्स निघाली, त्यातली काही तर चोवीस तास फक्त बातम्याच प्रसारित करणारी आहेत.  त्यामुळे प्रेक्षकांना बातम्यांचे भरपूर वैविध्य मिळाले आहे. पण प्रत्येक वाहिनी चालवणाऱ्या लोकांचे विचार आणि हितसंबंध यामुळे  यात इतका गोंधळ आणि गोंगाट सुरू झाला आहे की शिरा ताणून तावातावाने भांडणाऱ्या लोकांमधल्या कुणाचे सांगणे खरे आहे आणि कुणाचे नाही हेच समजत नाही. त्यामुळे कंटाळून मी त्यांच्या बातम्या पाहणे सोडून दिले आहे.  

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २२

अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही समांतर मार्गांवरून जाणारे वाटसरू आपण सत्याचा शोध घेत आहोत असेच सांगतात. अध्यात्मामध्ये उच्च पातळीवर जाऊन पोचलेल्या ऋषिमुनींनी  "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या।" असा एका वाक्यात निर्णय देऊन टाकला आहे. पण हे जगच मिथ्या असेल तर त्यातल्या आपल्याला जाणवणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त आपल्याला होणारे भास असतात  हा विचार पचनी पडणे फारच कठीण आहे, हे सर्वसामान्य माणसाच्या कुवतीपलीकडचे आहे. 

विज्ञान मात्र आपल्या विश्वातल्याच निरनिराळ्या गोष्टींची अधिकाधिक माहिती मिळवून पुढे पुढे जाते आणि त्या माहितीच्या आधाराने विकसित होत जाणारे तंत्रज्ञान नवी नवी साधने तयार करायला मदत करते. जसजसे नवे शोध लागतात आणि नव्या तंत्रज्ञानाने नव्या गोष्टी समोर येतात तसतसे आपल्या सत्याबद्दलच्या जुन्या कल्पना कशा बदलत जातात याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न मी या लेख मालिकेत केला आहे.


विज्ञानाच्या जगात काही भिन्न प्रवाह निर्माण होऊन त्यातून तात्विक वाद निर्माण झाले यावर मी "विज्ञानातले द्वैत आणि अद्वैत" ही मालिका लिहिली होती. त्याला पूरक असे मुद्दे घेऊन ही मालिका सुरू केली आणि तिचा विस्तार होत गेला. आधीच्या मालिकेतले लेख एकत्र करून या ब्लॉगवर दिले आहेत.

https://anandghan.blogspot.com/2024/12/blog-post.html


(समाप्त)