भाग -१
नायगाराच्या धबधब्याहून खूप उंच असलेले धबधबे आणि नायगारा नदीच्या कांहीपट रुंद पात्र असलेल्या विशाल नद्या आपल्या भारतात आहेत. यातल्या कांही नद्यांना पूर आलेला असतांना त्याना घातलेल्या बंधा-यांवरून खाली झेपावत जाणारे प्रचंड जलौघही मी पाहिले आहेत. नायगारासारखे रुंद धबधबे मी फारसे पाहिले नसले तरी कदाचित जगात इतरत्र असतील असे मला वाटते. पण नायगाराला जेवढी उदंड प्रसिध्दी मिळाली आहे तेवढी इतर कुठल्याही जागेला मिळत नाही. नायगारा नदी फारशी मोठी नसली तरी ती पहायला येणा-या पर्यटकांना ओघ मात्र नेहमीच प्रचंड असतो. या पाहुण्यांना निरनिराळ्या प्रकारचा अनुभव देऊन तृप्त करणारे अनेक कल्पक उपक्रम या जागी चालतात. त्या सगळ्याच ठिकाणी हौशी पर्यटकांच्या लांब रांगा लागतात. यात आपली पाळी लवकर येऊन जावी म्हणून आम्हाला शक्य तितक्या लवकर तिथे न्यायचे आमच्या सहलीच्या आयोजकांनी ठरवले होते.आमच्या भ्रमणकाळात त्या भागात चांगलीच थंडी पडू लागली होती. आम्ही तर मुंबईच्या उकाड्यातून तिकडे गेलो असल्यामुळे आम्हाला जरा जास्त हुडहुडी भरत होती. सांगितले गेल्याप्रमाणे आम्ही भल्या पहाटे उठलो तेंव्हा हवेतले तपमान शून्याच्या जवळपास पोचलेले होते. नळाचे पाणी गोठले नसले तरी बर्फासारखे थंडगार होते, त्यामुळे लगेच गीजर सुरू केला. झोपायच्या खोलीत गालिचा अंथरलेला होता, पण बाथरूममधल्या बर्फासारख्या लादीला पाय टेकवत नव्हता. दोन दिवसाच्या प्रवासात ओझे नको म्हणून आम्ही चपला बरोबर नेल्या नव्हत्या. एक टर्किश टॉवेल जमीनीवर अंथरून पायाला लागणारा थंडीचा चटका घालवला. थंडीमुळे दिवसभरात घाम आलेला नव्हताच आणि धुळीशीही संपर्क झालेला नसल्यामुळे शारीरिक स्वच्छतेसाठी सचैल स्नान करण्याची आवश्यकता नव्हती, ते करण्याची तीव्र इच्छा होत नव्हती आणि त्यासाठी पुरेसा वेळही नव्हता. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर अमेरिकनांसारखे रहायचे ठरवून गरम पाण्याने हातपायतोंड धुवून घेतले आणि कपडे बदलून तयार झालो.
युरोपच्या दौ-यावर गेलो असतांना प्रत्येक मुक्कामात रोज सकाळी भरपूर काँटिनेंटल ब्रेकफास्ट मिळत होता. आम्हाला एकादे दिवशी सकाळी लवकर निघायचे असले तरी खास आमच्या ग्रुपसाठी तो देण्याची व्यवस्था असे. या मिनिटूरमध्ये खाण्यापिण्याची जबाबदारी आयोजकांवर नव्हतीच. हॉटेलची रेग्युलर सर्व्हिस सुरू व्हायला अवधी होता. पण याची कल्पना आधीच देऊन ठेवलेली असल्यामुळे आम्ही आदल्या रात्रीच बन, वेफर्स, फळे वगैरे खाद्यसामुग्री आणून ठेवली होती. शिवाय न्यूजर्सीहून आणलेले फराळाचे डबे सोबतीला होतेच, पण इतक्या लवकर काही खाण्याची इच्छा नसल्य़ामुळे गीजरच्या पाण्यात डिपडिप करून गरम गरम चहा बनवला आणि बिस्किटांबरोबर प्राशन केला.
सकाळी उजाडताच आम्ही बफेलो शहर सोडले आणि वीस पंचवीस मिनिटांत नायगराच्या परिसरात जाऊन पोचलो. तो जगप्रसिध्द धबधबा पाहण्याची सर्वांना उत्कंठा असली तरी आधी आम्हाला तिथल्या एका सभागृहात नेले गेले. तिथला शो सुरू व्हायला वेळ होता, म्हणून बाजूच्या स्टॉलवरून सर्वांनी सँडविचेस, बर्गर यासारखे कांही विकत घेतले आणि एका हातात ती डिश आणि दुस-या हातात कोकची बाटली धरून अमेरिकन स्टाइलने हॉलमध्ये प्रवेश केला. अलीकडे मॉल्समध्ये असतात तशासारखे हे लहानसे सभागृह होते, पण त्यात समोरच्या बाजूला अवाढव्य आकाराचा पडदा होता. नायगारा लीजेंड्स ऑफ अॅड्व्हेंचर या नांवाचा एक माहितीपट त्यावर दाखवला गेला. हजारो वर्षांपूर्वी त्या भागात वास्तव्य करणा-या रेड इंडियन लोकांच्या टोळक्यांचे दृष्य सुरुवातीला पडद्यावर आले. त्यात लेलावाला नांवाची एक सुंदर, धीट आणि मनस्विनी युवती असते. तत्कालीन रिवाजाप्रमाणे टोळीमधील सर्वात बलदंड अशा पुरुषाबरोबर तिचे लग्न ठरवले जाते. पण वडिलांच्या आज्ञेखातर त्या आडदांड धटिंगणाशी विवाह करणे लेलावालाला मान्य नसते. लग्नसमारंभाच्या रात्रीच ती आपल्या झोपडीतून निसटते आणि घनदाट जंगलात पळून जाते. खलनायकाची माणसे शिकारी कुत्र्यांसारखी तिच्या मागावर जातात. त्यांना चुकवण्यासाठी एका लहानशा नांवेत बसून ती नायगारा नदीत शिरते आणि धबधब्याच्या परिसरातल्या दाट धुक्यात अदृष्य होते. अशी कांहीशी दंतकथा त्या भागातील आदिवासी लोकांमध्ये प्रसृत आहे. त्यानंतर चांदण्या रात्री अधूनमधून तिची अंधुक पण कमनीय आकृती त्या धबधब्याच्या कोसळत्या पाण्यात कोणाकोणाला दिसत राहते अशी समजूत आहे. या प्रेमकथेचे अत्यंत मनोवेधक चित्रण या लघुपटात केले आहे.
त्यानंतर एकदम पंधरासोळाव्या शतकात येऊन युरोपातल्या लोकांनी अमेरिकेतील मिळेल त्या भागाचा ताबा घ्यायला सुरुवात केल्याची दृष्ये पडद्यावर आली. इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी आधी आदिवासी लोकांना तिथून पिटाळून लावले आणि त्यानंतर आपसात मारामा-या सुरू केल्या. अमेरिकन राज्यक्रांती झाल्यानंतर तो भाग स्वतंत्र झाला, पण पलीकडचा कॅनडा ब्रिटीशांच्या ताब्यात राहिला. नायगाराच्या परिसरात होऊन गेलेल्या त्या काळातल्या कांही चकमकी आणि लढायांचे छायाचित्रण पडद्यावर जीवंत केले गेले. त्या ऐतिहासिक काळातले गणवेश, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांच्या रणनीती वगैरे सर्व गोष्टी अत्यंत लक्षवेधी स्वरूपात दाखवल्या गेल्या.
सगळी युध्दे संपल्यानंतर त्या भागातल्या नागरी वाहतुकीचा कसा विकास होत गेला, कोणकोणत्या प्रकारच्या नौकांचा उपयोग करून इथल्या नदीचा खळखळता प्रवाह ओलांडण्याचे प्रयत्न करण्यात यश आले, त्यात यशस्वी झालेल्या तसेच कधीकधी अपयशी ठरलेल्या साहसी वीरांच्या गाथा सांगितल्या गेल्या. नायगराचा धबधबा, त्याच्या वरच्या भागात अतीशय वेगाने धांवणारा आणि खाली खळाळत जाणारा पाण्याचा प्रवाह या तीन्ही गोष्टी साहसी लोकांना कांही तरी अचाट करून दाखवण्याची प्रेरणा नेहमीच देत आल्या आहेत. अनेक लोकांनी त्या प्रयत्नात आपले प्राण गमावले आहेत, कांही लोक त्या दिव्यातून सुखरूपपणे बाहेर आले आहेत, तर कांही लोक त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट असल्याकारणाने जेमतेम बचावले. यातल्या कांही लोकांच्या चित्तथरारक कथा दाखवल्या गेल्या. विशेषतः एक लहान मुलगा नांवेत बसून वरच्या भागात नदी ओलांडत असतांना ती नांव भोव-यात सापडते त्याची कथा मनाला स्पर्श करते. अनेक धाडशी लोक जिवावर उदार होऊन त्याला वाचवण्याचा आटेकाट प्रयत्न करतात आणि अगदी अखेरच्या क्षणी त्या प्रयत्नांना यश येऊन त्याचे प्राण वाचतात. तसेच एक प्रौढ बाई लाकडाच्या पिंपात बसून धबधब्याच्या पाण्याबरोबर खाली कोसळते. खालच्या बाजूला असलेले नावाडी तिचा शोध घेऊन ते पिंप कांठावर घेऊन येतात. आजूबाजूला जमा झालेले तिचे आप्त जसे श्वास रोखून ते पिंप उघडण्याची वाट पहात असतात तसेच प्रेक्षकसुध्दा मुग्ध होऊन पुढे काय होणार याची वाट पहात असतात. ती बाई हंसत हंसत पिपातून बाहेर आलेली पहाताच सर्वजण सुटकेचा निःश्वास सोडतात.
अशा प्रकारची अनेक चित्तथरारक नाट्ये एकमेकात गुंफून या लघुपटात पेश केली गेली. पार्श्वभूमीवर सतत नायगराचा धबधबा निरनिराळ्या अँगलमधून दाखवला जात होता. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिसणारी त्याची अनंत रूपे मंत्रमुग्ध करणारी होती. त्याच्या जोडीला रहस्यमय कथा उलगडत जात होत्या. आकर्षक दृष्ये आणि मनोरम पार्श्वसंगीत यांच्या मिश्रणाने तो कार्यक्रम बहारदार असाच होता. त्यात तासभर गेल्याचे कोणालाही वैषम्य वाटले नाही. बहुतेक पर्यटक इतके प्रभावित झाले होते की घरी गेल्यानंतर इतरांना दाखवण्यासाठी या लघुपटाच्या डीव्हीडी त्यांनी विकत घेतल्या.
. . . .. . . . .. . . .
अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस - नायगारा धबधबा - भाग २
नायगारावरील चित्रफीत पाहून झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष धबधबा पहायला निघालो. आपल्याला माहीत असलेल्या बहुतेक सर्व नद्या पर्वतावर उगम पावतात आणि समुद्राला किंवा दुसर्या मोठ्या नदीला जाऊन मिळतात. पण नायगरा नदी ही या नियमाला अपवाद आहे. कॅनडाच्या सीमेवर असलेल्या पाच महासरोवरांपैकी ईरी या सरोवरातून नायगारा नदी निघते आणि ओंटारिओ या दुसर्या सरोवराला जाऊन मिळते. थोडक्यात ईरी सरोवराचा ओव्हरफ्लो या नदीतून ओंटारिओ सरोवरात होतो. या नदीची लांबी जेमतेम छप्पन मैल आहे. आणि तिला सलग उतार नसून ती एका कड्यावरून धाडकन उडी मारून एकदम खालच्या पातळीवर येते. यातूनच हा धबधबा तयार झाला आहे.
धबधब्याच्या वरच्या अंगाच्या प्रदेशात कांही बेटे आहेत. त्यातल्या गोट आयलंड नावाच्या बेटाने नदीचा प्रवाह दुभंगून त्याचा एक भाग कॅनडाच्या प्रदेशातून आणि दुसरा यूएसएमधून वहात जातो आणि वेगवेगळ्या जागी खाली कोसळतो. यूएसएमधील नदीच्या प्रवाहाचे पुन्हा दोन वेगळे भाग होतात आणि एकमेकांच्या जवळच पण वेगळ्या कड्यांवरून खाली येतात. अशा तर्हेने एका परिसरातच तीन स्वतंत्र धबधबे आहेत.
सर्वात लहानसा ब्राइडल वील हा सुमारे १७ मीटर रुंद आणि २५ मीटर उंच आहे, दुसरा अमेरिकन फॉल तीनशे मीटर रुंद आणि असाच २५-३० मीटर उंच आहे आणि तिसरा म्हणजेच सर्वात मोठा हॉर्सशू फॉल मात्र ८०० मीटर रुंद आणि ५० मीटरावर उंच आहे. या भागातली जमीन अतीशय उंचसखल असल्यामुळे हे आंकडे वेगवेगळ्या बिंदूंपाशी वेगळे असणार आणि पाण्याचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने या आंकड्यांत सारखा बदलही होत असतो. ही मोजमापे फक्त अंदाज येण्यापुरती आहेत. या ठिकाणी खूप मोठे जलविद्युत केंद्र आहे आणि पाण्याचा बराचसा भाग तिकडे वळवला जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी कधी कधी धबधब्यावरून पडणारा मुख्य प्रवाह अर्ध्यावरसुध्दा आणला जातो. तरीदेखील तो दर सेकंदाला दीड हजार घनमीटर इतका प्रचंड असतो. हिवाळ्यात सरोवरातले पाणी गोठून गेल्यामुळे त्याचा प्रवाह कमी होतो आणि उन्हाळ्यात ते वितळल्यामुळे नायगरा नदीला पूर येतो.
पावसाळ्याच्या दिवसात पुणे मुंबई प्रवासात खंड्याळ्याच्या घाटातून जात असतांना आपल्याला अनेक जलौघ कडेकपारावरून खाली झेपावतांना दिसतात. तशाच प्रकारचा पण मोठ्या आकाराचा ब्राइडल वील हा धबधबा आहे. त्याच्या पाण्याच्या झिरझिरीत पापुद्र्यातून अनेक झिरमिळ्या लोंबतांना पाहून कोणा कवीमनाच्या संशोधकाला नववधूचा चेहरा आठवला. कपाळाला फुलांच्या मुंडावळ्या किंवा सेहरा बांधलेली भारतीय नववधू किंवा अत्यंत तलम कापडाचा बुरखा (ब्राइडल वील) पांघरलेली ख्रिश्चन ब्राइड यांचा चेहरा म्हंटले तर झाकलेला असतो पण त्या पडद्यातून दिसतही असतो, तसेच या धबधब्याचे रूप आहे, म्हणून त्याला ब्राइडल वील फॉल असे नाव दिले आहे. हा धबधबा पाहण्यासाठी एक जागा ठेवली आहे, त्या ठिकाणाहून तो व्यवस्थितपणे पाहता येतो.
ब्राइडल वील पाहणे आणि फोटो काढणे वगैरे झाल्यानंतर आम्ही अमेरिकन फॉल्स पहायला गेलो. हा धबधबा खूप मोठा आहे. ज्या डोंगरावरून नायगारा नदी खाली उडी मारते त्याला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे प्रत्येक धबधब्याच्या समोरच्या बाजूला दुसर्या कंगोर्यावर उभे राहून त्याचे छान दर्शन घेता येते. अमेरिकन धबधब्याचा आकार विशाल आहे, तसेच खाली पडत असलेले पाणी खाली पडतांना खालच्या खडकावर आपटून पुन्हा वर उसळी घेते त्यामुळे उडणारे तुषार खूप उंचवर उडत असतात. ते एकमेकात मिसळून धुक्याचा एक प्रचंड पडदाच उभा असल्यासारखे वाटते. आम्ही सकाळच्या वेळी गेलो असल्यामुळे सूर्याचे किरण या पडद्यावर पडून त्यातून अत्यंत सुरेख असे इंद्रधनुष्य तयार होत होते. खाली पाण्याला टेकलेले आणि वर आभाळापर्यंत पोचलेले ते इंद्रधनुष्य आपल्याबरोबर पुढे पुढे जात असतांना पाहून खूप गंमत वाटत होती.
अमेरिकन फॉल मनसोक्त पाहून झाल्यावर आम्ही हॉर्सशू फॉल पहायला गेलो. कॅनेडियन बाजूला असलेला हा खरा नायगरा धबधबा! घोड्याच्या नालेसारखा वक्राकार असलेल्या या भव्य धबधब्याचे दर्शन खरोखरच स्तिमित करणारे आहे. आम्ही यूएसएच्या बाजूला असल्यामुळे आम्हाला या वेळी तो बाजूनेच पहायला मिळाला, पण पूर्वी मी हा धबधबा कॅनडामधून पाहिला होता तेंव्हा त्याचे अगदी समोरून दर्शन झाले होते. त्यावेळी त्या धबधब्याला नजरेसमोर ठेऊन आम्ही निदान तासभर तरी समोरच्या रुंद रस्त्यावर पायी येरझारा घालत होतो. त्याशिवाय कॅनडाच्या भागात असलेल्या उंच मनोर्याच्या सर्वात टोकाच्या मजल्यावर असलेल्या फिरत्या रेस्टॉरेंटमध्ये बसून धबधब्याकडे पहात पहात रात्रीचे भोजन घेतले होते. या वेळी पलीकडच्या तीरावर असलेला हा मनोरा सहप्रवाशांना दाखवून मी तिथे गेलो होतो असे सांगून थोडा भाव खाऊन घेतला.
अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस - नायगारा धबधबा - भाग ३
नायगाराच्या धबधब्यावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्या जागी एक लांब, रुंद आणि खोल अशी दंतुर आकाराची मोठी घळ तयार झाली आहे. या घळीच्या कांठाकांठाने वेगवेगळ्या ठिकाणांवरून तिथल्या तीन धबधब्यांचे दर्शन घेण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. त्यातील प्रत्येक पॉइंटला जाण्यासाठी पक्का रस्ता, त्या जागी निरीक्षण करीत उभे राहण्यासाठी विस्तीर्ण जागा, सुरक्षेसाठी मजबूत असे कठडे अशा सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत. त्याखेरीज घळीच्या तळाशी जाऊन समोरून खाली पडणारे पाण्याचे प्रवाह पाहण्यासाठी अनेक सोयी आहेत. त्यातल्या दोन व्यवस्था पाहण्याचा समावेश आमच्या सहलीच्या कार्यक्रमात होता.
मेड ऑफ दि मिस्ट या नांवाची वाहतूक कंपनी मोटर लाँचमधून या नदीतून फिरवून आणते. तीन्ही जागी धबधब्यातून पडणारे पाणी खालच्या एकाच मोठ्या डोहात एकमेकांमध्ये मिसळते आणि त्याचा खळाळता प्रवाह नदीच्या पात्रातून वहात वहात पुढे ओंटारिओ सरोवराकडे जातो. धबधब्याच्या पातळीवरून खाली उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केलेली आहे. कॉलेजात असतांना मी गिरसप्पाचा धबधबा पहायला गेलो होतो. त्या काळी खाली उतरण्यासाठी मातीच्या उतारावर पायऱ्या होत्या. त्यातून घसरत आणि पडत पडत आम्ही मित्रमंडळी खाली उतरून गेलो होतो आणि रांगत रांगत वर चढून आलो होतो. त्या वयात ते शक्य होते आणि त्यात खूप मजाही वाटली होती, पण आता त्याचा विचारसुध्दा केला नसता. नायगाराला मात्र अपंग माणूस सुध्दा व्हीलचेअरवर बसून खालपर्यंत जाऊ शकतो. त्या खोल घळीच्या एका किनाऱ्यावर एक उंचच उंच पोकळ खांब उभा करून त्यावर मोठा प्लॅटफॉर्म केला आहे. वरील बाजूच्या इमारतीतून तिथपर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पुलावरून तिथपर्यंत गेलो आणि लिफ्टने खाली उतरलो. याचे इंजिनिअरिंगसुध्दा थक्क करणारे आहे.
खाली मोटर लाँचचा धक्का आहे. त्यात जाण्यापूर्वी सर्व पर्यटकांना एक निळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा रेनकोट देतात. तो अंगावर चढवणे आवश्यक आहे. खळाळत्या पाण्यातून ती बोट हिंडकळत पुढे पुढे जाते आणि एकेका धबधब्याचे दृष्य अगदी जवळून पहायला मिळते. इतक्या उंचीवरून खाली पडतांनाच त्या पाण्याचा शॉवर झालेला असतो. त्याची धार शिल्लक रहात नाही. शिवाय खाली पडलेल्या पाण्याचे असंख्य तुषार पुन्हा कारंज्यासारखे उंच उडत असतात. ते अंगावर घेत घेत फिरायला अपूर्व मजा येते. जोराचा थंडगार वारा सुटलेला असल्यामुळे अंगावर पुरेसे गरम कपडे असणे आवश्यक होते. त्या डोहात अर्धा पाऊण तास चक्कर मारून एक वेगळा अनुभव गांठीला बांधून परत आलो.
त्यानंतर केव्ह ऑफ दि विंड नांवाच्या जागी गेलो. धबधब्याच्या खाली डोंगराच्या कड्याच्या कांठाकांठाने चालत जायची एक वळणावळणाची वाट बांधली आहे. या ठिकाणी अंगावर पिवळा रेनकोट आणि पायात प्लॅस्टिकचे सँडल्स घालून त्या निसरड्या वाटेवरून फिरून यायचे. काही कांही ठिकाणी अनेक पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागतात. या पदयात्रेत सगळीकडेच जवळ जवळ मुसळधार पाऊस पडत असल्याचा भास होतो. थेट धबधब्याच्या खाली उभे राहून वरून बदाबदा पडणारे पाणी त्याचा प्रचंड आवाज ऐकत पहाणे हा एक अभूतपूर्व अनुभव आहे. त्या जागेच्या नांवावरून तिथे एकादे विंड टनेल असेल असे मला आधी वाटले होते. तसा गार वारा वहात होता, पण भुयार मात्र नव्हते. पैसे खर्च करून आणि शरीराला कष्ट देऊन असा थरारक अनुभव घ्यावा असे माणसाला कां वाटते याचे मात्र कोडे पडते.
या परिसरात एक पार्क आहे. त्याच्या प्रवेशद्वारापाशी निकोला टेसला या संशोधकाचा पुतळा उभा केला आहे. नायगारा धबधब्यापासून वीजनिर्मिती करणारी यंत्रसामुग्री बसवून त्याचा उपयोग करण्याचे काम त्याने केले. या खेरीज अनेक चित्तवेधक जागा या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या आम्ही पाहू शकत नव्हतो. पुरेसा वेळ आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर त्या ठिकाणी दोन तीन दिवस मुक्काम करूनच त्या पाहता येतील. पण महत्वाच्या आणि प्रसिध्द गोष्टी पाहून त्या सहलीचे सार्थक झाल्याचे समाधान बरोबर घेऊन आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.
दुसरा दिवस -भाग ४ नायगारा - न पाहिलेल्या गोष्टी
चाळीस वर्षांपूर्वी मी जेंव्हा गिरसप्पाचा धबधबा पहायला गेलो होतो त्या काळात त्या जागेपर्यंत जाऊन पोचणे हेच एक दिव्य होते आणि ते करायला आलेल्या माणसांना पहायला कुतूहलाने जे कोणी पशुपक्षी बाहेर आले असतील तेवढेच जीव तिथे आमच्यासोबत होते. गोकाकजवळ असलेला घटप्रभा नदीवरचा धबधबा तसा मनुष्यवस्तीपासून जवळ असला तरी तो पहाण्यासाठी ज्या वेळी आम्ही तेथे गेलो होतो तेंव्हा तरी आमच्याव्यतिरिक्त आणखी कोणीच तेथे दिसले नाही. भेडाघाटचा धबधबा जेंव्हा मी पहिल्यांदा पाहिला त्या वेळी वाळूतून मैलभर चालत जातायेतांना वाटेत भेटलेली माणसे धरून एकंदर पन्नाससाठजण भेटले होते. पण अलीकडे मी तेथे गेलो तेंव्हापर्यंत तिथल्या रस्त्यात खूप सुधारणा झाली होती, एवढेच नव्हे तर धबधब्यावरून खाली कोसळणारे पाणी अगदी जवळून पहाता यावे यासाठी खास प्लॅटफॉर्म उभे केलेले दिसले. परगांवाहून आलेले पर्यटक आणि सहलीला आलेले स्थानिक यांनी तो भाग फुलून गेला होता. नायगाराचा धबधबा पाहायला जगभरातून येणारे पर्यटक आणि त्यांची पैसे खर्च करण्याची ऐपत यांचा विचार करता ही एक खूपच मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे आणि मार्केटिंगच्या बाबतीत अग्रणी असलेल्या अमेरिकन लोकांनी त्या दृष्टीने जे जे कांही उभे करून ठेवले आहे ते कल्पनातीत आहे असे म्हणता येईल.
अमेरिकेतल्या तीन वेगवेगळ्या पॉइंटवरून आम्ही या धबधब्याच्या तीन धारा पाहिल्याच, यापूर्वी कॅनडामधून हॉर्सशूफॉलकडे पहात पहात मी चांगला तासभर तिथल्या घळीच्या कांठाकांठाने बांधलेल्या रस्त्यावर फिरलो होतो. मेड ऑफ द मिस्ट च्या बोटीत बसून आम्ही खळाळणाऱ्या प्रवाहातून धबधब्याच्या जवळजवळ खाली पोचलो आणि केव्ह ऑफ द विंडमध्ये जमीनीवरून धबधब्याच्या आंतल्या अंगाला जाऊन समोर कोसळणाऱ्या पाण्याच्या धागा जवळून पाहिल्या. नायगाराचा इतिहास सांगण्याच्या निमित्याने त्याची विविध रूपे दाखवणारी चित्रफीत पाहिली होती. त्याशिवाय उंच मनोऱ्यावरून दिसणारे खालचे विहंगम दृष्यसुध्दा पूर्वी पाहिले होते. याहून आणखी वेगळे काय पहायचे राहिले असे कोणालाही वाटेल. पण अमेरिकन लोकांच्या कल्पकतेला दाद द्यावीच लागेल इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या सोयी या ठिकाणी करून ठेवल्या आहेत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्यावर लेजरबीम्सचे झोत सोडून त्याला रंगीबेरंगी करण्यात येते याबद्दल मी ऐकले होते, पण हे पाहण्याची व्यवस्था आमच्या टूरमध्ये समाविष्ट नसल्याचे ऐकल्यावर थोडा खट्टू झालो होतो. नायगाराला आलेल्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी केलेल्या त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी तिथे गेल्यानंतर समजल्या. त्यांचा लाभ घेण्यासाठी आम्हाला वेळही नव्हता, आमच्याकडे जास्तीचे पैसेही नव्हते आणि मुख्य बाबी पाहून झाल्यानंतर त्याचे एवढे वैषम्य वाटले नाही.
नायगाराच्या व्हिजिटर सेंटरच्या बाहेरच एक मोठे फुलांचे उद्यान आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या सरोवरांचे आकार हिरवळीतून त्यात दाखवले आहेत. नायगरा गॉर्ज डिस्कव्हरी सेंटरमध्ये ही सरोवरे आणि नद्या कशा तयार झाल्या याची कुळकथा चित्रांमधून दाखवली आहे. तिथल्या मत्स्यालयात दीड हजार प्रकारचे जलचर तसेच पेंग्विनसारखे पक्षी पहायला मिळतात. डेअरडेव्हिल म्यूजियममध्ये साहसवीरांची साहसी कृत्ये चित्रे आणि चलचित्रे यांतून उभी केली आहेत. भयानक दृष्ये दाखवून घाबरवून सोडण्यासाठी एक भुताटकीचे घर (हाँटेड हाऊस) आहे. इथल्या एरोस्पेस म्यूजियममध्ये आधुनिक युगातली प्रगती पहायला मिळते. आर्ट अँड कल्चरल सेंटरमध्ये नानाविध कलांचे दर्शन घडते. लंडनच्या प्रसिध्द मादाम तूसाद म्यूजियमच्या धर्तीवर बनवलेल्या हाउस ऑफ वॅक्समध्ये मोठमोठ्या प्रसिध्द व्यक्तींचे पूर्णाक़ती पुतळे ठेवले आहेत. स्कूबा सेंटरमध्ये जाऊन पाण्यात खोलवर डुबकी मारून येण्याची सोय आहे, तर हॅलिकॉप्टरमध्ये बसून वरून खालचे दृष्य पहायची व्यवस्था आहे. अॅनिमेटेड राइडमध्ये बसून चक्क धबधब्यावरून पाण्याबरोबर खाली कोसळल्यासारखा अनुभव घेण्याची व्यवस्था एका ठिकाणी केलेली आहे. ही कांही उदाहरणे झाली, अशासारख्या अनंत गोष्टी त्या जागी आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या सुखसोयींनी युक्त अशी ज्याच्या त्याच्या खिशाला परवडणारी किंवा कापणारी अनेक हॉटेले, कॅसिनोज आणि रेस्तराँज तर आहेतच.
---------------------------
अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस - ५ - कॉर्निंग ग्लास सेंटर
नायगाराच्या धबधब्याच्या सान्निध्यात तीन तास घालवतांना त्याचे सौंदर्य सर्व बाजूंनी पाहून डोळ्यात भरून घेतले, कड्यावरून खाली झेपावणाऱ्या पाण्याचा कल्लोळ कानात घुमत राहिला होता, पोटपूजा करून पोटही भरून घेतले आणि आमची बस पुढील प्रवासाच्या मार्गाला लागली. अमेरिकेतल्या फॉल सीजनमध्ये रंगीबेरंगी साजशृंगाराने नटलेल्या वृक्षराईचे सौंदर्य दोन्ही बाजूला पसरले होते. ते न्याहाळत तीन साडेतीन तासांनंतर आम्ही कॉर्निंग ग्लास सेंटरला जाऊन पोचलो. या ठिकाणी कांचेच्या खास वस्तूंचे सुंदर संग्रहालय आहे, तसेच पर्यटकांनी, विशेषतः लहान मुलांनी या जागी भेट देऊन कांचेबद्दल माहिती मिळवावी यासाठी छान व्यवस्था केली आहे.
कॉर्निंग ही कांचसामान तयार करणारी जगातली एक अग्रगण्य कंपनी आहे. अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेल्या नाजुक शोभिवंत वस्तूपासून ते बंदुकीच्या गोळ्यांनासुध्दा दाद न देणाऱ्या बुलेटप्रूफ कांचेपर्यंत आणि ग्लासफायबरसारख्या बारिक तंतूपासून ते विकिरणांना प्रतिरोध करणाऱ्या जड लेडग्लासपर्यंत सारे कांही कांचेचे सामान ही कंपनी तयार करते. बाहेरून दिसणारा त्या इमारतीचा आकार आणि जेथपर्यंत आम्हाला नेले गेले तिथून दिसणारा अंतर्भाग पाहता या कारखान्याच्या अवाढव्य पसाऱ्याचा अंदाज आला.
कांचेपासून वस्तू कशा प्रकारे निर्माण करतात याचे प्रात्यक्षिक दाखवणारा एक कार्यक्रम दिवसभर चाललेला असतो. आमच्या आधी तेथे पोचलेली पर्यटकांची तुकडी बाहेर निघताच आम्ही त्या खास सभागृहात प्रवेश केला. तिथेच ठेवलेल्या एका छोट्याशा भट्टीमधून एका कुशल कारागीराने रसरसत्या कांचेचा एक छोटासा गोळा बाहेर काढला, त्यात जोराने फुंकर मारून त्याला चांगले फुलवले आणि विविध हत्यारांच्या सहाय्याने त्याला वेगवेगळे आकार दिले, त्या गोळ्याला निरनिराळ्या रंगांच्या भुकटीत लोळवून त्याला वेगवेगळ्या छटा दिल्या आणि बोलता बोलता त्यातून एक सुरेख फ्लॉवरपॉट तयार करून दाखवला. माझे सारे सहप्रवासी अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन त्याचे कसब पहात राहिले. तांत्रिक दृष्टीने पाहता मला त्यात कांही नवीन गोष्ट दिसली नसली तरी त्या कलाकाराचे कौशल्य मात्र निश्चितपणे वाखाणण्याजोगे होते.
वीस पंचवीस मिनिटांचे हे प्रात्यक्षिक पाहून झाल्यानंतर आम्ही त्या जागी असलेले प्रदर्शन पाहिले. ऐतिहासिक काळापासून अद्ययावत जमान्यापर्यंत वेगवेगळी तंत्रे वापरून तयार केलेल्या असंख्य वस्तू त्या ठिकाणी आकर्षक रीतीने मांडून ठेवल्या होत्या. जवळजवळ साडेतीन हजार वर्षांपासून माणूस कांच बनवत आला आहे हे मला माहीत नव्हते. संपूर्णपणे कांचेपासून तयार केलेला एक राजमहाल आणि एक नौका या वस्तू मला फार आवडल्या. याशिवाय अनेक प्रकारचे पेले, सुरया, तबके वगैरे नक्षीदार वस्तू होत्याच.
कॉर्निंग ग्लास सेंटर पाहून झाल्यानंतर आम्ही पुढला प्रवास सुरू केला आणि वॉशिंग्टन डीसीच्या जवळपास कुठेशी रात्रीच्या मुक्कामाला जाऊन पोचलो. अमेरिकन बर्गर किंवा सँडविचेस वगैरे खाण्यापेक्षा चिनी भोजन खाणे बरे वाटले आणि मिळालेसुध्दा. आदल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळी करायच्या नास्त्याची बेगमी करून घेतली आणि हॉटेलातल्या उबदार अंथरुणावर अंग टाकले.
--------------------------------------
2 comments:
मला तुमचा ब्लोग आवडला.
-अभि
धन्यवाद. लोभ ठेवावा आणि वाचत रहावे अशी विनंती.
Post a Comment