Sunday, September 20, 2009

कुलस्वामिनी अंबाबाई

कोल्हापूरची अंबाबाई


महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाचे एक कुलदैवत असते. घरात एकादे मंगल कार्य ठरले तर त्याचे निमंत्रण सर्वात आधी त्या कुलदैवताला देऊन ते निर्विघ्न पार पाडण्याची विनंती केली जाते, तसेच कधीकधी त्यासाठी नवस बोलला जातो आणि ते कार्य यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी किंवा निदान नव्या जोडप्याला पाया घालण्यासाठी पुन्हा त्या देवस्थानाची यात्रा केली जाते. माझ्या नात्यातली कांही कुटुंबे नोकरी व्यवसायासाठी पुण्यामुंबईला स्थाईक झाली असली तरी आमच्या जमखंडीजवळ असलेल्या कल्हळ्ळीच्या प्रति तिरुपती व्यंकोबाच्या किंवा मुत्तूरच्या मुत्तूरव्वा देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या घरातले कोणी ना कोणी नेहमी आमच्याकडे येत असत. कोल्हापूरची अंबाबाई ही आमची कुलदेवता आहे असे बोलले जात असे, पण हा कुळाचार मात्र नव्हता.


त्या काळात जमखंडीहून कोल्हापूरला जाणे तसे कठीणच होते. आधी बसने कुडची नांवाच्या एमएसएम रेल्वेच्या स्टेशनाला जायचे. बंगलोर किंवा हुबळीकडून येणा-या एक दोनच गाड्या त्या स्टेशनावर थांबत असत. त्यातल्या भयानक गर्दीत कसेबसे चढून मिरजेपर्यंत जायचे आणि तिथून वेगळ्या रेल्वेगाडीत बसून कोल्हापूरला जायचे. घरातल्या सगळ्या पोराबोळांना घेऊन असला तीन टप्प्यांचा प्रवास करणे अशक्यच असायचे. त्यामुळे घरात त्याचा विचारसुध्दा कधी झाला नाही. कुठल्या तरी इतर कामासाठी कोणी एकट्या दुकट्याने सांगली मिरजेकडे जाऊन आला तर जमल्यास कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन तिथले हळदकुंकू, अंगारा आणि प्रसादाचे पेढे वगैरे घेऊन येत असे. त्यांच्याकडून ऐकलेल्या रसभरीत वर्णनामुळे माझ्या मनातले कुतूहल मात्र वाढत गेले. कोल्हापूरला दक्षिण काशी असे म्हंटले जात असे. हिंदू धर्मीयांचे सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र काशी मानले जाई. तिथे गेल्याचे पुण्य कोल्हापूरला जाण्याने मिळते अशी अनेकांची श्रध्दा असे. त्या काळात काशी रामेश्वराची यात्रा तर जवळ जवळ अशक्यप्राय असल्यामुळे आयुष्यात कधी तरी कोल्हापूरला जाणे घडले तर लोकांना प्रचंड आनंद होत असे. तिथल्या महालक्ष्मीच्या देवळाला अगणित खांब आहेत. एकदा कोणी तरी ते मोजण्याचा प्रयत्न केला आणि तो आंधळा होऊन गेला. अशा प्रकारच्या दंतकथासुध्दा त्यावेळी प्रचलित होत्या आणि त्यावर विश्वास असल्यामुळे कोल्हापूरला गेलात तर तेवढे मात्र करू नका अशा सूचना तिथे जाणा-यांना दिल्या जात असत.


लहानपणी मोठ्या माणसांच्या बरोबर कोल्हापूरला जाण्याचा योग कांही मला आला नाही, पण मनातली इच्छा मात्र तीव्र होत गेली. त्यामुळे मुंबईला वेगळा संसार थाटल्यानंतर आम्हीच कोल्हापूरची यात्रा केली, खणानारळाने देवीची ओटी भरली, पेढ्यांचा नैवेद्य दाखवला, श्लोक आणि स्तोत्रे म्हंटली आणि जेवढे कांही करायचे असते असे ऐकले होते ते करून घेतले. मंदिराची पुराणकालीन हेमाडपंती वास्तू मात्र तिच्याबद्दल जेवढे ऐकले होते त्याच्या अनेकपटीने भव्य आणि आकर्षक वाटली. तोपर्यंत मी इतके मोठे आणि कलाकुसरीने सजवलेले दुसरे कोणते देऊळ पाहिलेच नव्हते. त्यानंतरच्या काळात मी जगभरातली अनेक प्रसिध्द मंदिरे पाहिली असली तरी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या आवारात गेल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता वाटते. देवीच्या दर्शनाचे सुखसुध्दा अनुपम असते. देवाच्या मूर्तीविषयी बोलतांना सौंदर्यशास्त्र किंवा तिचा पेहराव, अंगावरले दागिने वगैरेचा विचार करण्याची पध्दत नाही, पण आपल्या नकळत त्याची छाप मनावर पडत असते आणि या सगळ्या निकषांवरसुध्दा अंबाबाईची मूर्ती छानच वाटते. तिच्याकडे पहात रहावे असेच वाटत राहते.


नंतर पुढील आयुष्यात अनेक वेळा कोल्हापूरला जाण्याचा योग आला. सांगली मिरजेच्या बाजूला गेल्यास कोल्हापूरला जाऊन येण्याची परंपरा मी कायम ठेवली. त्यामुळे नरसोबाची वाडी किंवा किर्लोस्करवाडीला कांही कामानिमित्य गेलो तर परतीच्या वाटेवर कोल्हापूर होऊन जात असे. देवाच्या किंवा देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी दिवसातल्या अमूक वेळेलाच जायचे असली बंधने पाळायची मला गरज वाटत नसल्यामुळे बहुतेक वेळी मी सगळी कामे आटोपून संध्याकाळीच तिथे पोचत असे आणि रात्री उशीरा निघणारी बस घेऊन परतत असे. त्याशिवाय मुद्दाम कोल्हापूरलाच महालक्ष्मी एक्सप्रेसनेही जाणे झाले. आता तर एनएच ४ हा हमरस्ता इतका चांगला झाला आहे की गेल्या वेळी आम्ही फक्त चार तासांत कोल्हापूरहून पुण्याला पोचलो.


कोल्हासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी महालक्ष्मीने हा अवतार धारण केला अशी कथा आहे आणि ती त्यानंतर इथेच वास्तव्य करून राहिली अशी श्रध्दा आहे. या ठिकाणी बांधलेले मूळ मंदिर खूप प्राचीन काळापासून या जागी आहे. त्याचे कांही भाग सातव्या किंवा दहाव्या दशकात बांधलेले असावेत असे तज्ज्ञांना वाटते. पंचगंगा नदीच्या काठी वसलेल्या कोल्हापूर गांवाला मराठी साम्राज्याच्या काळात महत्व प्राप्त झाले. त्या काळात मंदिराचा अधिक विस्तार करण्यात आला. कलाकुसर केलेल्या अनेक चौकोनी उभ्या दगडी खांबांवर आडव्या शिळा ठेऊन त्याचे छत तयार केले आहे. त्यांना जोडणारे चुनागच्चाचे काम कोठे दिसत नाही. लाकडाच्या तुळया वगैरेही नाहीत. लाकूडकाम आहे ते चौकटी, दरवाजे, कमानी वगैरेंपुरतेच आहे. गाभा-यावरील शिखर मात्र विटांचा वापर करून वेगळ्या तंत्राने बांधले आहे. मंदिराला भव्य प्रवेशद्वार आहे, त्याला महाद्वार म्हणतात. आत गेल्यानंतर अनेक दीपमाळा दिसतात. मंदिरासमोर गरुडध्वजाचा उंच खांब आहे. देवळाच्या सभोवार प्रशस्त असे प्रांगण आहे. ते नेहमीच भाविकांनी भरलेले दिसते. महालक्ष्मीशिवाय तिच्या आजूबाजूला महाकाली आणि महासरस्वती आहेत, तसेच इतर अनेक देवतांच्या मूर्ती या परिसरात आहेत. मंदिराची रचना अशी केली आहे की वर्षातल्या विशिष्ट दिवशी मावळणा-या सूर्याचे किरण थेट महालक्ष्मीच्या मूर्तीपर्यंत येतात. प्रत्यक्ष सूर्यनारायण त्यावेळी तिच्या दर्शनाला येतो असे मानले जाते.


ब्रिटीशांच्या काळात कोल्हापूरच्या पुरोगामी संस्थानिकांनी अनेक समाजोन्मुख कामे करून या शहराला आघाडीवर आणले आणि ते पुणे बंगलोर महामार्गावर असल्यामुळे त्याला व्यापारी क्षेत्रात महत्व प्राप्त झाले. यंत्रयुगाचा काळ आल्यानंतर अनेक लहान आणि मध्यम आकाराचे कारखाने या भागात उभे राहिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराला येणा-या लोकांची संख्या वाढली आणि तिथे गेलेला माणूस बहुधा अंबाबाईचे दर्शन घ्यायला जातोच.
या मंदिराचा इतिहास आणि अधिक माहिती इथे दिली आहे.

-------------------------------------------------------------------

अंबे हासत ये, अंबे नाचत ये । फुलांचा झेला झेलत ये ।।

पायीचे पैंजण वाजवत ये ।

भक्तांच्या मेळ्यासाठी धांवत ये, अंबे हासत ये ।।


गोंधळ गोंधळ गोंधळ घालिते ।

आईचा जोगवा जोगवा मागिते ।।

काम क्रोध हे, क्रोध हे, क्रोध महिषासूर ।

आईने मर्दुनी, मर्दुनी, मर्दुनि केले चूर ।

सत्वगुणाची, गुणाची, गुणाची तलवार ।

गोंधळ गोंधळ गोंधळ घालीते ।। आईचा जोगवा जोगवा मागिते ।।


सूक्ष्म स्थळीच, स्थळीच, स्थळी आईचं हो देणं ।

अंबा भवानी, भवानी, तेथे तूझं ठाणं ।

चैतन्य स्वरूपी, स्वरूपी, होता नित्य लीन ।

गोंधळ गोंधळ गोंधळ घालीते ।। आईचा जोगवा जोगवा मागिते ।।

3 comments:

Unknown said...

Ti aamachihi kuldevata aahe.

Chhaan lekh, changali mahiti.

BTW FM radio var marathi ganachya karyakramat tumachya bhavache naav aikale.

Anand Ghare said...

धन्यवाद,
माझा कोणता भाऊ रेडिओवर गायला? त्याचे पहिले नाव काय सांगितले? कदाचित आडनावबंधू असेल.

www.in-marathi.com said...

nice artical also read this kolhapur mahalaxmi

https://www.kolhapurmahalaxmi.com/2019/12/kolhapur-mahalaxmi-temple-history.html