Sunday, September 27, 2009

महासरस्वती


महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली ही आदिशक्तीची तीन प्रमुख रूपे आहेत. त्यातली सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्या म्हणजे शिक्षण आणि ते म्हणजे शाळेत जाऊन परीक्षा पास होणे आणि कॉलेज शिकून पदव्या प्राप्त करणे असा संकुचित अर्थ यात अभिप्रेत नाही. जे जे कांही शिकण्यासारखे आहे ते शिकून घेणे असा विद्या या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. परंपरागत समजुतीनुसार १४ विद्या आणि ६४ कलांची गणती केली होती. त्या नेमक्या कोणत्या होत्या यावर एकमत नाही आणि कालमानानुसार त्यातल्या कांही आता उपयोगाच्या राहिल्या नसतील आणि अनेक नव्या विद्या आत्मसात करणे गरजेचे झाले असेल. १४ आणि ६४ या आंकड्यांनाही फार महत्व द्यायचे कारण नाही. त्यापेक्षा विद्येची संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे.
कलाकार हा प्रतिभेचे लेणे घेऊन जन्मावा लागतो असे म्हणतात ते बव्हंशी खरे आहे. पण त्या अंगभूत कलेचा विकास करण्यासाठी विद्येचा अभ्यास करावा लागतो, किंवा विद्याध्ययनाने अंगातली कला जास्त बहराला येते. उदाहरणार्थ गोड गळा जन्मजात मिळाला तरी सूर, ताल, लय वगैरे समजून घेऊन नियमित रियाज करून तयार झालेला गायक संगीताचा उच्च दर्जाचा आविष्कार करू शकतो. चित्रकाराच्या बोटात जादू असली तरी त्याने रंगसंगतीचा पध्दतशीर अभ्यास केला आणि हातात ब्रश धरून तो कागदावर सफाईदारपणे फिरवण्याचा सराव केला तर त्यातून अप्रतिम चित्रे तयार होतात. महाविद्यालयीन संस्था चालवण्याच्या व्यावसायिक गरजेतून आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स असे ढोबळ विभाग केले गेले असले तरी विद्येच्या राज्यात कला, विज्ञान आणि व्यापार असे कप्पे नसतात. पदवीपरीक्षा देण्यासाठी ठराविक विषयांमधला ठरलेला अभ्यासक्रम शिकून घ्यावा, पण विद्या प्राप्त करण्यासाठी असे बंधनही नाही आणि ते शिक्षण पुरेसेही नसते. अंगात कलागुण असतील, विज्ञानाची आवड असेल, व्यापार करण्याचे चातुर्य असेल तर या क्षेत्राची थोडी माहिती या अभ्यासक्रमांमधून मिळते आणि त्या विषयाच्या अभ्यासाला एक दिशा मिळते. विद्याध्यनासाठी पुढचा प्रवास अखंड चालत ठेवावा राहतो.
ज्ञान आणि विद्या मिळवण्यासाठी याव्यतिरिक्त अगणित क्षेत्रे उपलब्ध आहेत आणि अनेक मार्गांनी ते प्राप्त करता येते. कोणत्याही विषयाची माहिती असणे हे ज्ञान झाले आणि त्या माहितीचा उपयोग करता येणे ही विद्या असे ढोबळ मानाने म्हणता येईल. त्यामुळे ज्ञान मिळवणे महत्वाचे असले तरी ती पहिली पायरी आहे. ते ज्ञान आत्मसात करून त्याच्या आधारे निर्णय घेता येणे, कार्य करणे वगैरे विद्या संपादन केली असल्याची लक्षणे आहेत. विद्या हे असे धन आहे की जे कधी चोरले जाऊ शकत नाही, दिल्याने कमी होत नाही वगैरे तिची महती सांगणारी सुभाषिते आहेत.
सरस्वती या अशा विद्येची देवता आहे. सरस्वतीचे पूजन करून शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा रिवाज होता. बहुतेक शाळांमध्ये सुरुवातीला सरस्वतीची प्रार्थना सामूहिक रीतीने केली जाते. तिच्या रूपाचे वर्णन या श्लोकात केले आहे.
या कुंदेंदुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमंडितकरा, या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा
ही गोरी पान देवी पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून श्वेत रंगाच्याच कमळावर आसनस्थ आहे. ( शुभ्र रंग निर्मळता दर्शवतो) तिने आपल्या हातात वीणा धारण केली आहे, (कोठलेही शस्त्र नाही.) ब्रह्मा, विष्णू, महेश यांसह सर्व देव नेहमी तिला वंदन करतात. बुध्दीमधील जडत्वाचे निःशेष निर्मूलन करणारी ही सरस्वती देवी मला प्रसन्न होवो अशी प्रार्थना या श्लोकात केली आहे. सरस्वतीमातेचे असेच सुंदर, सालस आणि तेजस्वी रूप राजा रवीवर्मा यांनी वरील चित्रात रंगवले आहे. (फक्त ती कमळावर बसलेली नाही.) रंगीबेरंगी मोर हे तिचे वाहन जवळच उभे आहे. शुभ्र राजहंस हा शारदेचे वाहन आहे असे कांही ठिकाणी दाखवतात. कवयित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेली सरस्वतीची अत्यंत सुंदर आणि प्रसिध्द स्तुती खाली देत आहे.
जय शारदे वागीश्वरी ।
विधिकन्यके विद्याधरी ।।

उजळो तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा ।
तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी ।।
वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामय अंगुली ।
संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली ।
उन्मेष कल्प तरुवरी, डवरुन आल्या मंजिरी ।।
शास्त्रे तुला वश सर्वही, विद्या, कला वा संस्कृती ।
स्पर्शामुळे तव देवते, साकारती रुचिराकृती ।
लावण्य काही आगळे, भरले दिसे विश्वान्तरी ।।

No comments: