Friday, May 15, 2009

ग्रँड युरोप - भाग २१ : युरोपच्या माथ्यावरील हिमप्रासाद


दि।२४-०४-२००७ नववा दिवस : युरोपच्या माथ्यावरील हिमप्रासाद

वळणा वळणाच्या चढावरून चढून आणि कांही बोगदे पार करून आमची गाडी युंगफ्राऊ स्थानकावर येऊन पोचली. लोटरब्रूनन स्टेशनावरून आम्ही पहाडावर चढायला निघालो तेंव्हा ती जागा समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर होती. तेथून थेट सुमारे अकरा हजार फूट उंचावर आल्याने हवा विरळ झालेली जाणवत होती. रेल्वे गाडीत बसलो असतांनाच वर चढतांना थोडे गरगरायला लागायला सुरुवात झाली होती. स्टेशनावर उतरल्यावर चालतांना तो फरक चांगला जाणवला. मदतीला कापराच्या वड्या खिशात
होत्याच, त्या नाकाला लावल्या. त्याने लगेच तरतरी आली.

युंगफ्राऊ स्टेशनला लागूनच एक पांच मजली इमारत आहे. ती बांधतांना एका बाजूला डोंगर पोखरून तिच्यासाठी थोडी जागा बनवली आहे तर दुस-या बाजूला ती हवेत लटकते आहे असे वाटते. अर्थातच तिला मजबूत आधार दिलेले आहेत आणि पर्वतावर भन्नाट वेगाने वाहणा-या सोसाट्याच्या वा-याला खंबीरपणे तोंड देऊ शकेल इतके तिचे बांधकाम भक्कम आहे यात शंका नाही. या जागेला युरोपचा माथा (टॉप ऑफ युरोप) असे नांव दिले आहे. अनेक रेस्टॉरेंट्स, दुकाने, संग्रहालये, सभागृहे, विश्रामालये वगैरे या
इमारतीत आहेत. एक वैशिष्ट्यपूर्ण फोटो स्टूडिओसुद्धा आहे. परंपरागत स्विस पोषाख परिधान करून तिथे आपला फोटो लगेच काढून मिळतो. या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण म्हणून असा फोटो काढून घेण्याचा मोह सहसा कुणाला आवरत नाही. त्यामुळे तेथे नेहमी गर्दी असते.

तिथून आणखी सुमारे चारशे फूट उंचावर एका टेकडीच्या शिखरावर स्फिंक्स नांवाची इमारत बांधली आहे. तेथे जाण्यासाठी जवळ जवळ चारशे फूट उंच वर नेणा-या लिफ्टने जावे लागते. या ठिकाणी गेल्यावर चारही बाजूचे सृष्टीसौंदर्य पहात फिरण्यासाठी एक प्रशस्त गच्ची आहे. तिथे उभे राहून युंगफ्राऊ व मोंच ही तेरा हजार फुटाहून अधिक उंच असलेली आल्प्सची शिखरे अगदी जवळून दिसतात. पण त्यासाठी हवामान अनुकूल असणे आवश्यक आहे. कधी फारच जोराचा सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस यामुळे तिथे उघड्यावर जाणेच अशक्य होऊन जाते, तर कधी ढगाळ वातावरण, गडद धुके किंवा हिमवर्षावामुळे डोळ्यासमोर कांहीसुद्धा दिसत नाही. साडेअकरा हजार फुटावर गेल्यानंतर आपल्याला वर आभाळातच नव्हे तर खालीसुद्धा ढगच दिसतात. ढगाळ हवामानात खालची जमीन नजरेला पडतच नाही. आम्ही त्या दृष्टीने खरेच सुदैवी होतो असे सगळ्या जाणकारांनी सांगितले. कारण त्या दिवशी आमच्या माथ्यावर निरभ्र आकाश होते आणि आल्प्सची हिमाच्छादित शिखरे सूर्यप्रकाशात न्हाऊन निघून चांगली चमचमत
होती. हवेत धुलीकणांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे हा बर्फावरून परावर्तित होणारा प्रकाशसुद्धा कधी कधी असह्य होतो. यासाठीच गिर्यारोहकांना नेहमी काळा चश्मा घालावा लागतो. खालच्या बाजूला थोडे काळे पांढरे ढग छोट्या टेकड्यांबरोबर लपंडाव खेळतांनाही दिसत होते. साडेअकरा हजार फूट उंचीच्या सुळक्यावर उभे असल्यामुळे खूप दूरवरचा भाग नजरेच्या टप्प्यात येत होता. त्यात फ्रान्स, जर्मनी व इटली या तीन्ही देशांचे भाग दिसतात म्हणे. आम्हाला ते सारे सारखेच होते. काही बर्फाने झांकलेल्या तर कांही हिरव्या गर्द जंगलाने मढवलेल्या टेकड्या, त्यातून वाहणारे पाण्याचे प्रवाह, तलाव, सरोवरे, कुठे उतारावर लावलेल्या बागा, कुठे गुरांच्या चा-यासाठी मोकळी कुरणे, कुठे रोपवेला लोंबकळून जात असलेल्या ट्रॉलीज, एकादी रुळावरून धांवणारी चिमुकली आगगाडी असे सगळे मजेदार दृष्य होते.

याच स्फिंक्स बिल्डिंगमध्ये युरोपातील सर्वात उंचावर असलेली एक अद्ययावत प्रयोगशाळा आहे. भूगर्भांतर्गत खडकांच्या अभ्यासापासून खगोलशास्त्रातील रहस्ये सोडवण्यापर्यंत अनेक प्रकारचे संशोधन या प्रयोगशाळोत चालते. आपला हिमालय पर्वत जसा एके काळी समुद्राच्या पोटात दडला होता, तसाच आल्प्सचा पर्वत भूगर्भातून बाहेर आलेला असल्यामुळे आणि कधीकाळी तो बर्फाच्छादितही नसल्यामुळे अनेक प्रकारच्या खडकांचे आणि इतिहासपूर्वकालीन पशु पक्षी व वनस्पतींचे नमूने या बर्फाच्या ढिगा-याखाली निसर्गानेच जतन करून ठेवलेले आहेत. तसेच हवेत धूलिकण नसल्यामुळे व मानवनिर्मित कृत्रिम प्रकाशाची पार्श्वभूमी नसल्याने अवकाशातून येणारे किरण व लहरींचा अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण इथे आहे. यामुळे इथे खास प्रकारचे संशोधन चालते आणि जगभरातील वैज्ञानिक त्यात भाग घेतात. अर्थातच आम्हाला तिथे जाण्याची परवानगी नव्हती.

स्फिंक्सवरून खाली परत आल्यावर 'बॉलीवुड' नांवाच्या रेस्टॉरेंटमध्ये जेवण घेतले. ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित आदि चित्रतारकांच्या पोस्टर्सनी येथील भिंती सजवल्या आहेत. पंजाबी ढंगाचे पदार्थही खाण्यात होते. युरोपच्या माथ्यावरसुद्धा भारतीयांनी या प्रकारे आपला झेंडा फडकावत ठेवला आहे. पर्यटकांमध्ये भारतीय वंशाचे बरेच लोक रोज इथे येत असणार.

जेवून झाल्यावर बर्फाचा राजवाडा (आईस पॅलेस) पहायला गेलो. टॉप ऑफ युरोपमधूनच एक भुयारी वाट तिकडे जाते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर बर्फातच खोदलेली एक लांबुळकी गुहा लागते. त्यात खाली, वर व दोन्ही बाजूला सगळे बर्फच बर्फ. बर्फाच्याच भिंती, बर्फाचीच जमीन आणि त्याचेच डोक्यावर छप्पर. एका हाताने कठड्याला धरून बरेच अंतर चालत गेल्यानंतर बाजूला एकेक खोल्या दिसायला लागतात. बर्फामध्ये खोदून ठेवलेल्या वेगवेगळ्या सुंदर शिल्पकृती त्यात मांडून ठेवल्या आहेत. रिसेप्शनच्या
पार्टीमध्ये सॅलडसोबत बर्फाचा एक मोठा ठोकळा ठेऊन त्याला तासून कसला तरी आकार देण्याची फॅशन आपल्याकडे हल्ली निघाली आहे. या आईस पॅलेसमध्ये तसेच पण खूप मोठमोठे आकार दिलेली अनेक कलात्मक शिल्पे ओळीने मांडून ठेवली आहेत. नैसर्गिक तपमानच शून्याखाली असल्यामुळे ती न वितळता जशीच्या तशी टिकून राहतात. त्या वातावरणात ती पहायला अधिकच मोहक वाटतात.
. . . . . . . . (क्रमशः)

Thursday, May 14, 2009

ग्रँड युरोप - भाग २० : अद्भुत आल्प्स


सलग दुसरे दिवशी पुन्हा आल्प्स पर्वतावर चढाई करायची होती. आदले दिवशी माउंट टिटलिसच्या माथ्यावरील बर्फात खेळलो होतो. दुसरे दिवशी आल्प्समधील कांही निसर्गनिर्मित तर कांही मानवनिर्मित चमत्कार पहायचे होते. ल्यूसर्नहून निघाल्यानंतर सर्वात आधी ट्रमेलबॅशला गेलो. इथला चमत्कार तर पूर्वी कधी ऐकलासुद्धा नव्हता किंवा अशी कांही जागा अस्तित्वात असेल याची कल्पनासुद्धा मनात आली नव्हती. वास्तव हे कधी कधी कल्पनेच्याही पलीकडे असते असे म्हणतात ते यासाठीच!

पावसाळ्यात मुंबईहून पुण्याला किंवा कोणत्याही डोंगराळ प्रदेशातून जातांना डोंगरावरून खळाळत खाली येणारे पाण्याचे हजारो ओघळ आपल्याला दिसतात. एकमेकात मिसळून त्यांचे आधी छोटे प्रवाह निर्माण होतात, ते वाट मिळेल तसे वळणा वळणाने वहात आणि कडयाकपा-यावरून कोसळत खाली येत असतात. पाऊस थांबल्यावर यातले बरेचसे आटून जातात, पण वरच्या बाजूला कपारीत साठलेले पाणी त्यातील कांही झ-यातून नंतरही खाली येत राहते. सखल भागात आल्यावर ते एकत्र येऊन त्याचा बारमहा
वाहणारा प्रवाह दिसायला लागल्यावर त्याला नदी हे नांव मिळते. जमीनीवर पडलेल्या पावसाचे पाणीही ओढ्या नाल्यांतून वहात त्यात येऊन मिसळते. अशा लहान लहान नद्या मिळून त्यातून मोठी नदी बनते. ही नदी वाहता वाहता वाटेत येणारी दगड माती वाहून नेते, त्यामुळे जमीनीमध्ये घळ पडून तिचे पात्र बनते. वाटेत एखादा उंचवटा आला तर ती त्याला वळसा घालून पुढे जाते. तिच्या मार्गात मातीचा ढिगारा आला तर त्यामधून ती आपली वाट लवकर खोदून काढते पण कठिण पत्थर असेल तर तो मात्र
खूपच हळू हळू झिजतो. एखादा उभा कडाच वाटेत आला तर ती त्यावरून खाली झेप घेते आणि त्या ठिकाणी धबधबा निर्माण होतो.

पण या गोष्टी नदीच्या जन्माआधीच झाल्या तर? आपण तशी कल्पनाही करू शकत नाही ना? नेमका हाच चमत्कार लोटरब्रूनन या स्विट्झर्लंडमधील गांवाजवळच्या पहाडात घडला आहे. ईगर, युंगफ्राउ आणि मुंच या तीन बर्फाच्छादित पर्वतशिखरांवरील हिमनद्यांमधील बर्फ वितळून जे पाणी बनते त्यातला कांही भाग त्या डोंगरांच्या खडकांमधील भेगांतून आंत झिरपत जातो. त्या पाण्याने या डोंगरांना आंतून पोखरून विविध आकाराच्या पोकळ्या त्यात आंतल्या बाजूला निर्माण करून ठेवल्या आहेत. मानवाच्या कवटीच्या आत जशा सायनस कॅव्हिटीज असतात तशा प्रकारची पण त्यापेक्षा शेकडो पटीने मोठी अशी ही वेडीवांकडी अनंत विवरे आहेत. बर्फ वितळून निघालेले पाणी या गुफांमधून कधी उड्या मारीत तर कधी अचाट वळणे घेत खळाळत वहात असते. एकापाठोपाठ एक अशा एकंदर दहा धबधब्यांवरून खाली कोसळत अखेरीस ते पायथ्याशी असलेल्या प्रवाहातून वाहू लागते. यामधील वरच्या अंगाचे पहिले पांच धबधबे गुहांच्या आंत दडलेले आहेत तर खालच्या बाजूचे पांच धबधबे बाहेरून दिसू शकतात. दर
सेकंदाला शंभर घनफुटांहून अधिक या वेगाने हे पाणी वहात असल्यामुळे त्यातून मोठा आवाज निघतो व तो त्या पोकळ्यांमध्ये घुमून अधिक घनगंभीर बनतो. 'ट्रमेलबॅश' या शब्दाचा अर्थ 'पडघमांचा ध्वनी' असा आहे व या जागेचे नांव या आवाजावरून पडले असणार.

हे दहा धबधबे पहाण्यासाठी या महाबिकट जागी प्रत्यक्ष जाऊन पोचायला तर हवे. इथे माणसाने आपले कसब पणाला लावून ते काम सोयिस्कर केले आहे. या डोंगराच्या जवळ जवळ मध्यापर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी हे पाणी एका गुहेतून बाहेर झेप घेते तिथपर्यंत जाणारी एक वाट आहे. तेथून वरचे पांच धबधबे पाहता येण्यासाठी कुठे घळीतून तर कुठे गुहेतून तिथपर्यंत जाणारे पाय-या पाय-यांचे जिने बनवले आहेत. ते अतिशय निसरडे असल्यामुळे कठड्याला घट्ट धरून त्यावरून जरा जपूनच चालावे लागते। त्यात सात जागी अशा प्रकाराने झरोके बनवले आहेत की त्यातून समोर किंवा खाली फेसाळणारे पाणी दिसते पण ते पाणी त्यांतून जिन्यावर येत नाही. आपल्या मार्गानेच ते खाली वहात जाते. यातील कांही भगदाडे नैसर्गिक वाटतात तर कांही कृत्रिम. सूर्यप्रकाशाचा किरण तिथपर्यंत पोचणेच शक्य नाही म्हणून या सगळ्या जागी विजेचे दिवे लावून थोडा उजेड केला आहे. नाही तर त्या गाभा-यातले पाणी डोळ्यांना दिसणार कसे? खालचे पांच बाह्य धबधबे पहाण्यासाठी प्रवाहाच्या बाजूबाजूने खाली उतरण्याचा जिनासुद्धा आहे. पण आधीच जवळजवळ दहा मजल्याइतकी चढउतार झालेली असल्यामुळे आमची दमछाक झाली होती आणि पुन्हा तेवढी चढउतार करायला पुरेसा वेळही नव्हता. त्यामुळे "असे बाहेरचे धबधबे तर आपण खूप पाहिले आहेत, त्यातला -हाईन नदीवरचा विशाल धबधबा नुकताच पाहिला आहे" असे म्हणत त्या जागेचा निरोप घेतला.

तेथून आम्ही लोटरब्रूनन या रेल्वे स्टेशनवर आलो. इथून युंगफ्राऊ या शिखरावर जाण्यासाठी ट्रेनने जावे लागते. ट्रेन म्हंटल्यावर निदान दहा पंधरा डब्यांची झुकझुक गाडी आपल्या डोळ्यासमोर येते. इथे मात्र एका गाडीला दोन किंवा तीन एवढेच डबे असतात पण खूप गाड्या असतात. आम्ही स्टेशनात पोचल्यावर लगेच एक गाडी आली. पण अचानक आलेली आमच्या ग्रुपमधली सत्तर माणसे सामावून घेण्याइतकी जागा त्यात नसते. त्यामुळे तिच्या नंतर सुटणा-या गाडीचे आरक्षण आमच्यासाठी केले होते, आम्हाला
त्याच गाडीने जाणे आवश्यक होते. इथे रेल्वेमार्गाला मोठा चढाव आहे आणि बर्फामुळे रूळ गुळगुळीत होतात, यामुळे साध्या रुळाने काम भागत नाही. दोन रुळाच्या मधोमध एक दांतेरी पट्टा (रॅक) असतो व रेल्वेच्या चाकांमध्ये एक दांतेरी चाक (कॉग व्हील) असते. त्यांचे दाते गाडीला पुढे खेचण्याचे काम करतात. युंगफ्राऊपर्यंतचे अंतर जास्त नसले तरी त्यासाठी वाटेत क्लीन या जागी आगगाडी बदलावी लागते. पहिल्या टप्प्यात आपण समुद्रसपाटीपासून अडीच हजार फुटावरून सहा हजार फुटावर जातो तर दुस-या
टप्प्यात त्याहूनही कमी अंतर कापीत अकरा हजार फुटावर जाऊन पोचतो. यामुळे या दोन्ही गाड्यांच्या रचनांमध्ये कांही तांत्रिक फरक असावा असे वाटले. या रेल्वेची सुरुवात शंभर वर्षापूर्वी होऊन गेली असे लिहिलेला एक फलक तिथे आहे. अजूनही त्यात नव्या सुधारणा करण्याचे काम सुरूच आहे.

हा रेल्वेमार्ग अपेक्षेप्रमाणे वळणावळणाचा होता. कांही ठिकाणी इंग्रजीतील यू आकाराची वळणे होती. मधल्या दरीच्या पलीकडच्या रुळावरून आपल्याच मार्गावरील पुढील गाडी आपल्या उलट दिशेने आणि विरुद्ध बाजूने येणारी गाडी आपल्या गाडीच्याच दिशेने येतांना पाहून गंमत वाटली. कांही भागात मोठ्या मुश्किलीने एकेरी मार्ग बनवलेला होता. त्यामुळे समोरून येणा-या गाडीच्या क्रॉसिंगसाठी अधून मधून थांबावे लागत होते. चढ इतका जबरदस्त होता की डब्यातल्या डब्यात इकडून तिकडे जाणे कठीण होते. सीटला हाताने घट्ट धरून एक एक पाऊल जपून टाकावे लागत होते. बाहेरील दृष्ये मात्र अवर्णनीय होती. या मनमोहक प्रवासाच्या अखेरीस युंगफ्राऊ या युरोपातील सर्वोच्च शिखराचे दर्शन घडले आणि स्तिमित झालो.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, May 10, 2009

ग्रँड युरोप - भाग १९ : ल्यूसर्नमधील जलविहार


दि.२३-०४-२००७ आठवा दिवस : ल्यूसर्नमधील जलविहार

माउंट टिटलिसहून परततांना ल्यूसर्न शहराचा धांवता दौरा केला. हे एक जुने पुराणे गांव आहे याच्या खुणा दाखवणा-या जुन्या इमारती अजून शाबूत आहेत. त्यात वांद्र्याच्या माउंट मेरीसारखी दोन उंच शिखरे असलेले एक जुन्या धर्तीचे कॅथेड्रल आहे, तसेच इथल्या रियस नदीवर एक सातशे वर्षे जुना 'चॅपेल ब्रिज' नांवाचा दोनशे मीटर लांबीचा लाकडी पूल आहे. आता हा पूल शोभेपुरताच उरला आहे आणि तिथे जुनी चित्रे मांडून ठेऊन त्याच्या शोभेत भर घातली आहे. आजही इथल्या जुन्या भागातील कांही घरे
लाकडांची बनवलेली आहेत. लाकडाचे खांब, लाकडाच्या तुळया, त्यावर लाकडाचे उतरते छप्पर, इतकेच नाही तर लाकडाच्या फळ्या ठोकून भिंती बनवलेल्या आणि कुठे खालची जमीनसुद्धा. त्याचे आगीपासून रक्षण करायची काय व्यवस्था असेल कोण जाणे. अशा प्रकारची घरे स्विट्झरलंडच्या पहाडावर तर अधिक संख्येने दिसतात. सारख्या आकारात कापलेल्या ओंडक्यांचे गठ्ठे कांही घरांच्या बाहेर व्यवस्थित रचून ठेवले होते.

ल्यूसर्न येथे एका छोट्याशा सार्वजनिक उद्यानात 'लायन मेमोरियल' ही एक प्रसिद्ध शिल्पकृती ठेवली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये बळी पडलेल्या फ्रान्सच्या राजघराण्याच्या स्विस गार्डसच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे बनवले गेले. अत्यंत दयनीय अवस्थेतील एका जखमी सिंहाचे भव्य चित्र या ठिकाणी एका मोठ्या खडकात खोदलेले आहे. पराक्रमी आणि हिंस्र किंवा क्रूर समजल्या जाणा-या सिंहाच्या चेहे-यावर इतके दयनीय भाव मला तरी यापूर्वी कुठेच पहायला मिळाले नव्हते.

ल्यूसर्नचे सर्वात मोठे आकर्षण तिथला विस्तीर्ण तलाव. त्यात जलतरणक्रीडेच्या सगळ्या सोयी आहेतच, दिवसा किंवा रात्री नौकेतून फेरफटका मारण्याचीसुद्धा व्यवस्था आहे. माउंट टिटलिसवर दिवसभर बर्फात खेळून झाल्यानंतर श्रमपरिहारासाठी रात्रीच्या क्रूजचा कार्यक्रम आमच्यासाठी ठेवला होता. केसरीच्या दोन ग्रुपमधले मिळून सुमारे सत्तर प्रवासी होते. आमच्यासाठी एक वेगळी दुमजली स्टीमर घेतली होती. खालच्या मजल्यावर दाटीवाटीने टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या. थोडी मोकळी हवा खात बाहेरचे सौंदर्य
पहावे म्हणून आम्ही डेकवर गेलो. तिथेही थोड्या खुर्च्या होत्या. ल्यूसर्न शहर दूर दूर जातांना दिसत होते व जवळ तलावाचे नितळ पाणी, त्याच्या पलीकडे सभोवतालची हिरवी गर्द झाडी, त्यापलीकडे डोंगर, आणि दूरवर एक दोन बर्फाच्छादित शिखरे असे अनुपम दृष्य दिसत होते.

खास आमच्या मनोरंजनासाठी दोन स्थानिक कलाकार आणले होते. त्यातील एकाने गायनासाठी माईक हातात धरला आणि दुसरा स्वरवाद्य घेऊन उभा राहिला. आमच्यातल्याच एका उत्साही पर्यटकाने तालवाद्य वाजवायला घेतले व त्यावर आपल्या परीने ताल धरला. गाण्याचा मुळातला ताल समजण्यासारखा तरी होता की नाही कोण जाणे. गाण्यातला एकही शब्द कळत नव्हता आणि त्याचा भावही लक्षात येत नव्हता. त्यामुळे थोड्यात वेळात लोकांची आपसातली कुजबुज सुरू झाली आणि ती ऐकू यावी म्हणून अधिकाधिक मोठ्याने होत जाऊन त्याने गोंगाटाचे रूप घेतले. गायकवादकांना या गोष्टीची रोजची संवय असावी अशा निर्विकार वृत्तीने त्यांनी आपले काम चालू ठेवले. त्यामुळे एका तरी माणसाचे मनोरंजन झाले की नाही ते सांगता येणार नाही. "आम्ही स्विट्झर्लंडमधले लोकसंगीतसुद्धा ऐकले आहे." एवढी फुशारकी मारायची सोय तेवढी झाली.

रात्रीचे भोजन बोटीवरच घ्यायचे होते. खाद्यपदार्थ मांडून ठेवलेले पाहून काउंटरच्या जवळ बसलेले लोक उठून उभे राहिले. त्यांना पाहून बाकीचे लोक उठले. "लोकांनी घाई न करता वाट पहावी, एकेका टेबलावरील लोकांनी क्रमाक्रमाने येऊन जेवण वाढून घ्यावे." अशा सूचना आमचे मार्गदर्शक देत होते पण त्या कितीशा लोकांना ऐकू जाणार? अरुंद मार्गिकेमध्ये जितके लोक उभे राहू शकत होते तेवढे उभे राहून आपला नंबर लावीत होते. भारतीय पद्धतीचेच जेवण होते व त्यात नेहमीचेच पदार्थ होते. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" म्हणत आम्ही चार घास खाऊन घेतले आणि पुन्हा डेकवर पळालो. आता सूर्यास्ताची वेळ होत होती व आभाळात वेगवेगळ्या रंगांचा खेळ चालला होता.

हळू हळू बाकीची मंडळीसुद्धा डेकवर आली. आता खुर्च्या बाजूला करून मधोमध मोकळी जागा केली. लाउडस्पीकरवर हिंदी, मराठी गाणी लावली आणि त्यावर नाच सुरू झाले. शास्त्रशुद्ध स्टेप्स घेत करायचा बॉल डान्स वगैरे आता कालबाह्य गोष्टी झाल्या आहेत. उडत्या चालीच्या गाण्याच्या जलद तालावर हात पाय झाडत कंबर लचकवत राहणे हेच मुख्य. एका उत्साही जोडप्याने पुढाकार घेऊन स्वतः नाचायला व बाकीच्यांना त्यात ओढायला सुरुवात केली. हळू हळू बहुतेक लोक त्यात सामील झाले. "मेहबूबा, मेहबूबा"
किंवा "ऐका दाजिबा ऐका दाजीबा" च्या तालावर उड्या मारून घेत होते. नौकेने तलावाला प्रदक्षिणा मारून परत फिरेपर्यंत नाचगाण्याचा जल्लोष चालू राहिला.
. . . . . . (क्रमशः)

मातृदिन


आज मातृदिनानिमित्य कांही अजरामर काव्ये आठवणीतली गाणी च्या सौजन्याने देत आहे.

’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे
कवी - यशवंत
---------------------------------
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई

कवी - ग. दि. माडगूळकर
------------------------------------
आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते

वात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते

आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें

हांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें
कवी - बाळ कोल्हटकर
---------------------------------------

ग्रँड युरोप - भाग १८ : माउंट टिटलिस


दि.२३-०४-२००७ आठवा दिवस : माउंट टिटलिस
आज माउंट टिटलिस या आल्प्सच्या बर्फाच्छादित शिखराची चढाई करायची असल्याने सगळ्यांनाच त्या दृष्टीने तयार व्हायला सांगितलेले होते. मुंबईहून निघतांनाच आम्ही त्या तयारीने आलो होतो. इतके दिवस बॅगेत पडून राहिलेले खास कपडे बाहेर काढायची वेळ आता आली होती. पहायला गेलो तर यापूर्वीसुद्धा काश्मीर व सिक्कीमच्या सफरीमध्ये आम्ही तेथील बर्फाळ प्रदेशात गेलो होतो, त्यामुळे त्याचा थोडा संमिश्र प्रकारचा पूर्वानुभव होता. चहू बाजूला नजरेचे पांग फेडणारे पांढरे शुभ्र बर्फ, ताज्या हिमवर्षावानंतर जमा झालेल्या भुसभुशीत बर्फात खेळण्याचा एक आगळाच अनुभव वगैरे जमेच्या बाजू होत्या, तर पायापासून मस्तकापर्यंत अंगांगात होत असणा-या शारीरिक वेदना सहनशक्तीच्या सीमा शोधत होत्या. असे असले तरी कांही काळानंतर सोसलेल्या यातनांचा भार हलका होतो व सुखद स्मृती तेवढ्या शिल्लक राहतात. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा हा अनुभव घेण्यास उत्सुक झालो होतो.

माणसाचे मन खरेच फार विचित्र असते. निसर्गातील ऊन, पाऊस, थंडी, वारा यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी तो दगड विटांची घरे बांधतो, त्याच्या आंतल्या जमीनीवर गालिचा बिछवून आणि खिडक्यांना पडदे लावून अधिक संरक्षण मिळवतो, हिंवाळ्यात हीटर आणि उन्हाळ्यात कूलर लावून तपमानावर नियंत्रण ठेवतो. पण हे सगळे करीत असतांना त्याचे वेडे मन वेगळाच ध्यास घेऊन बसते. समुद्राच्या पाण्यात यथेच्छ डुंबून त्याच्या लाटा अंगावर घ्याव्यात, किना-यावरच्या वाळूत निवांत लोळावे, भन्नाट
सुटलेल्या वा-यात तरंगावे, मुसळधार पावसात चिंब भिजावे आणि बर्फाच्या गालिच्यावर नाचावे बागडावे असा कसला तरी ध्यास घेऊन तो आपल्या वातावरण सुनियंत्रित केलेल्या घराबाहेर पडतो आणि परिणामाची पर्वा न करता दूर कुठे तरी पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो. मनाची लीला खरेच अगम्य आहे!

पूर्वीच्या अनुभवावरून शहाणपण शिकण्यासाठी आणि यावेळी अधिक काळजी घेण्यासाठी मी आमच्या ग्रुपमधल्याच डॉक्टरांना आरोग्य विषयक सल्ला विचारला. वयोमानानुसार संवयीची झालेली आपली नित्यनेमाची औषधे न विसरता नियमितपणे घेणे, वेळोवेळी भरपूर खाऊनपिऊन आपल्या कॅलरीज कमावीत राहणे व कुवतीच्या बाहेर श्रम न करणे ही त्रिसूत्री त्यांनी सांगितली. पुरेसे म्हणण्यापेक्षाही भरपूर कपडे आमच्याकडे होतेच. सकाळी निघतांना अंगात आधी थर्मलवेअर घालून त्यावर शर्टपँट चढवली. ल्यूसर्नच्या वातावरणात तेवढ्यानेच उकडायला लागले. त्यामुळे बंद गळ्याचा स्वेटर, ओव्हरकोट, हातमोजे, कानटोपी वगैरे गोष्टी पिशवीतच ठेवाव्या लागल्या. औषधाचा साठा, खाण्यापिण्याच्या वस्तू वगैरे बरोबर घेतल्या. शिवाय केसरीकडून सगळ्या लोकांना कापराच्या वड्या देण्यात आल्या. समुद्रसपाटीपासून उंच जातांना हवा विरळ होत जाते, त्यामुळे श्वसनाला त्रास झाला तर ही वडी नाकाला लावायची. त्यामधून प्राणवायूचा पुरवठा होतो म्हणे.

असा सगळा जामानिमा करून आम्ही ल्यूसर्नहून निघून एंजलबर्गपर्यंत बसने गेलो. तेथून पुढचा प्रवास केबलकारने करायचा होता. पर्वताच्या पायथ्यापासून वर जाणारा चढ मर्यादेच्या पलीकडे असल्यामुळे व त्यावर सतत भरपूर बर्फ पडत असल्याने इथे रस्ता बांधणे शक्यच नाही. त्यामुळे केबल कार आणि आणीबाणीच्या सहाय्यासाठी हेलिकॉप्टर एवढीच वाहतूकीची साधने इथे उपलब्ध आहेत. रोटेअर नांवाची स्वतःभोवती फिरत फिरत जाणारी आगळीच केबल कार या ठिकाणी ठेवली आहे. त्यामुळे रिव्हॉल्व्हिंग
रेस्टॉरेंटमध्ये बसल्याप्रमाणे एका जागेहून चारी बाजूचे दृष्य पहायला मिळते. मात्र इथे बसायची सोय नाही. जो आधार सांपडेल त्याला धरून उभेच रहावे लागते, कारण ती ब-याच वेगाने वर खाली जात असते तसेच गोल फिरत असते.

माथ्यावर पोचल्यावर एक प्रशस्त दालन आहे. तेथून बाहेर पडले की जिकडे तिकडे चोहीकडे बर्फच बर्फ. त्यातच थोडी सपाट जागा आणि थोडा उतार बनवला आहे. उतारावर हाताने धरून चालण्यासाठी दोरखंड बांधले आहेत। एका बाजूला कठडा बनवला आहे। तेथून दूरवरचे दृष्य पहायला मिळते। काश्मीर व सिक्कीममध्ये पाहिलेल्या बर्फाच्छादित जागा सपाट किंवा सखल होत्या। त्या ठिकाणी तेथील डोंगरांच्या माथ्यावर जाण्यासाठी शेरपा तेनजिंगप्रमाणे गिर्यारोहण करणेच आवश्यक होते. इथे मात्र कांही कष्ट न घेता यंत्रांच्या सहाय्याने आम्ही अलगदपणे थेट शिखरावर पोचलो होतो व सर्व दिशांना पसरलेल्या बर्फाने झांकलेल्या टेकड्यांच्या लहान मोठ्या रांगा पाहू शकत होतो. एका टोपलीवजा स्लेजमध्ये बसून थोडे घसरत जाण्याची सोयसुद्धा आहे.

आम्ही गेलो तेंव्हा वर वर थोडा ताजा भुसभुशीत बर्फही होता आणि त्याखाली कांही जागी घट्ट जमलेला कांचेसारखा सुळसुळीत बर्फाचा थर होता. हा अतिशय खतरनाक असतो, त्यावरून केंव्हा आणि कोणत्या ठिकाणी घसराल याचा नेम नसतो. आम्ही कांही गिर्यारोहणायाठी लागणारे तळाला खिळे असलेले खास प्रकारचे बूट आणले नव्हते. एवढे महाग बूट दोन दिवसासाठी कोण घेणार? इतर प्रवासांत त्याचे उगाचच ओझे होणार. आम्ही आपले साधेच किंवा स्पोर्टस शूज आणले होते आणि त्यामुळे सारखे पाय घसरत
होते. प्रत्येकाने कुठे तरी तोल सावरता न आल्याने एक तरी आपटी खाल्लीच. असे होणार याची कल्पना असल्यामुळे लगेच आपण होऊन खाली बसून पडण्याचा धक्का कमी करणे एवढेच शक्य होते. मी तर एका उतारावर पाय घसरल्यानंतर बर्फावर बसकण मारूनच घसरत खाली जाणे पसंत केले. पुन्हा पुन्हा कशाला पडायचे? अशा वेळी कपड्यांची पर्वा कोण करतोय्? पण अशा पडण्या उठण्यामध्ये सुद्धा एक मजा येते. पण जवळच्याच मोठ्या उतारावर स्कीइंग करणारा एक खेळाडू पडून जायबंदी झाला होता. हॅलिकॉप्टरमध्ये घालून त्याला हॉस्पिटलात न्यावे लागले. त्या हॅलिकॉप्टरने उतरतांना व पुन्हा उड्डाण करतांना जो झंझावात त्या ठिकाणी निर्माण झाला त्यावरून अशा बर्फाच्छादित पर्वतावर चढाई करतांना उठलेल्या वादळांची जी वर्णने नुसती वाचली होती ती कशी असत असतील याची चुणुक पहायला मिळाली. मर्यादित वेळेचे बंधन असल्यामुळे आम्हाला फारसे दमायलाही झाले नाही. पण बरीच हौस पुरी झाली.
. . . . . . . (क्रमशः)

Saturday, May 09, 2009

ग्रँड युरोप - भाग १७ : स्विट्झर्लंड


दि.२२-०४-२००७ सातवा दिवस : स्विट्झर्लंड
स्विट्झर्लंड म्हणजे आल्प्स पर्वत आणि आल्प्स पर्वत म्हणजे बारा महिने बर्फाच्छादित प्रदेश अशी विचित्र समीकरणे लहानपणापासून डोक्यात घर करून बसली होती। खरे म्हंटले तर ईशान्य भारतातील प्रेक्षणीय स्थळे पाहतांनाच कांही गोष्टींची जाणीव झालेली होती. दार्जिलिंग, कालिंपॉंग, गंगटोक यासारखी प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे वेगवेगळ्या पहाडांच्या माथ्यावर वसलेली असली तरी एका शहरातून दुस-या शहराला जाण्यासाठी तो डोंगर उतरून जावे लागे आणि खाली आल्यानंतर अगदी मुंबईतल्यासारखे उकडले नाही तरी स्वेटर वगैरे उतरवून ठेवावाच लागे. जवळचेच उदाहरण घ्यायचे तर नाशिकपासून कोल्हापुरापर्यंतचा सगळाच भाग कांही सह्याद्री पर्वताने व्यापलेला नाही आणि सह्याद्री पर्वतातला प्रत्येक डोंगरमाथा कांही महाबळेश्वर नव्हे.



पण युरोपमध्येही अशीच परिस्थिती आहे हे तिकडे गेल्यानंतर समजले. गेले तीन दिवस आम्ही आल्प्स पर्वताच्या आजूबाजूला फिरत होतो, आज तर प्रत्यक्ष स्विट्झर्लंडमध्ये येऊन दाखल झालो होतो तरीही कडाक्याच्या थंडीचा कुठे पत्ताच नव्हता. हल्ली वुलनचा सूट वगैरे घालणे तर फॅशनेबल राहिलेले नाही, पण साधे विंडचीटर किंवा जाडसे जॅकेटसुद्धा फारसे कोणी घातलेले दिसत नव्हते. त्याची मुळी गरजच नव्हती. झूरिचच्या तलावाच्या किना-यावर तर कित्येक लोक उघडे बंब होऊन मजेत ऊन खात पहुडलेले होते.

अर्थातच स्विट्झर्लंड हा एक फक्त थंडगार हवेचा पर्यटन करण्याचा प्रदेश ही समजूत तितकीशी बरोबर नाही. इथले सर्वसाधारण हवामान समशीतोष्ण आहे. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे लोकवस्ती तशी कमी आहे. पण झूरिच, जिनिव्हा, बर्न, बेसल व लोझान या पांच शहरांमध्ये लाखावर लोकवस्ती आहे. इथे बनणारी चॉकलेट्स आणि मनगटी घड्याळे पूर्वापारपासून जगप्रसिद्ध आहंत. अत्यंत अचूक व सूक्ष्म काम करणारी यंत्रसामुग्री, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शक यंत्रे वगैरे इथून जगभरातील कारखाने व प्रयोगशाळांकडे पाठवली जातात. या सगळ्याची निर्मिती करणारे मोठे कारखाने या देशात आहेत. हा एक औद्योगिक दृष्ट्या पुढारलेला देश आहेच, शिवाय पर्यटन क्षेत्रातही तो आघाडीवर आहे. त्याचा सविस्तर तपशील पुढच्या भागांत येणार आहे.

राजकीय दृष्ट्य़ा स्विट्झर्लंड हा नेहमी तटस्थ राहिला आहे. इतर देशांप्रमाणे त्याने इतर खंडात आपले साम्राज्य निर्माण केले नव्हते. स्वतःचा समुद्रकिनारा नसल्यामुळे ते शक्यही झाले नसते. दोन्ही महायुद्धात त्याने कोणाचीही बाजू घेतली नाही. युद्धात जखमी झालेल्या सर्वच सैनिकांची निरपेक्ष भावाने येवा करणा-या रेड क्रॉस या संघटनेचे मुख्य कार्यालय इथे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासंघाची (यूनोची) अनेक कार्यालये जिनिव्हा येथे आहेत.

स्विट्झर्लंडमधल्या लोकांची स्विस नांवाची कोणती वेगळी भाषा नाही. जर्मन, फ्रेंच व इटालियन या प्रमुख भाषा आहेत. जर्मनी, फ्रान्स व इटली या शेजारील देशांना लागून असलेल्या वेगवेगळ्या भूभागात त्या प्रामुख्याने बोलल्या जातात. जर्मन लोकांची बहुसंख्या आहे, पण इतर भाषिकही मोठ्या संख्येने आहेत. बहुभाषिक देश असला तरी त्यांच्यात आपसात सुसंवाद आहे. तसेच पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मोठ्या प्रमाणावरील व्यापामुळे मातृभाषा नसतांनाही इंग्रजी जाणणा-यांची संख्यासुद्धा मोठी आहे.

डोंगरखो-यामधील शुद्ध हवापाणी व कष्टमय जीवन यामुळे इथले लोक काटक प्रवृत्तीचे झाले आहेत. तसेच रानातील पांखराप्रमाणे स्वतंत्रताप्रेमी आहेत. प्रख्यात धनुर्धारी व वीर पुरुष विलियम टेल हा त्यांचा हीरो होऊन इथे होऊन गेला. आपल्याकडे जसे भारतभर किंवा भारताबाहेरसुद्धा सुरक्षा करण्याचे काम नेपाळमधील गुरखे लोक करतांना दिसतात, तसेच वैय़क्तिक संरक्षणासाठी स्विस गार्ड ठेवण्याची प्रथा युरोपात चालत आली होती. व्हॅटिकन सिटीमधील पोपच्या संरक्षणासाठी स्विस गार्डसची तुकडी आपल्या पारंपरिक वेशभूषेत तिथे उभी असलेली दिसली. आजच्या जमान्यात तेसुद्धा एक पर्यटकांचे आकर्षण झाले आहेत हा विनोदाचा भाग वेगळा.

स्विट्झर्लंडमधल्या आमच्या तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी तेथील पांचही 'लक्षाधीश' शहरे सोडून ल्यूसर्न या मध्यम आकाराच्या गांवाची निवड करण्यात आली होती. देशाच्या मध्यभागी असलेले हे गांव इकडे तिकडे फिरायला जाण्यासाठी सोयीचे पडत असावे. त्यामुळे मुख्यतः पर्यटनासाठीच ते प्रसिद्ध आहे आणि आमच्या वास्तव्यात जगभरातून आलेले परदेशी लोक आम्हाला तिथे मोठ्या संख्येने फिरतांना दिसत होते. अशाच एका नकट्या चपट्या लोकांच्या ग्रुपला पाहून कोणीतरी आपापसातच मराठीमध्ये बोलतांना त्यांना "जपानी" म्हंटले तर तेवढा शब्द त्यातल्या कोणाच्या तरी कानांवर पडला. त्यांच्यातल्या एकीने जोरजोरात "नो जापानी" म्हणून आपला नकार दर्शवला आणि "चायनीज?" म्हंटल्यावर खुषीने मान डोलावली. केवढा देशाभिमान ?
. . . . . . . (क्रमशः)

Friday, May 08, 2009

ग्रँड युरोप - भाग १६ : -हाईन धबधबा


दि.२२-०४-२००७ सातवा दिवस : -हाईन धबधबा


वडूजहून निघताच लगेच स्विट्झर्लंडची सीमा पार करून त्या देशात प्रवेश झाला. सर्वात आधी त्या देशाच्या उत्तरेच्या टोकाला जवळजवळ जर्मनीच्या सरहद्दीवर असलेल्या शॅफोसन गांवाजवळील -हाईन नदीवरचा धबधबा पहायला गेलो. युरोपातील ही महत्वपूर्ण व मोठी नदी स्विट्झर्लंडमध्ये उगम पावते, लीस्टनस्टाईन व ऑस्ट्रियाला स्पर्श करून फ्रान्स व जर्मनीच्या मधून वहात जर्मनीत शिरते आणि अखेरीस हॉलंडमध्ये जाऊन उत्तर सागराला मिळते. शॅफोसन गांवाजवळ असलेला -हाईन नदीवरचा धबधबा हा युरोपमधील सर्वात मोठा धबधबा आहे. सुमारे १५० मीटर रुंद व २३ मीटर उंचीच्या या धबधब्यातून थंडीच्या दिवसात सुद्धा कमीत कमी दर सेकंदाला २५० घनमीटर इतके पाणी पडते आणि उन्हाळ्यात पडणारा पाऊस व वितळणारे बर्फ यांमुळे त्याचा प्रवाह वाढत जाऊन दर सेकंदाला ६०० घनमीटरपर्यंत जातो. आम्ही गेलो त्यावेळेस थंडी संपलेली होती व वसंत ऋतु सुरू होता. त्यामुळे नदीला ब-यापैकी पाणी होते आणि धबधब्यातून उसळी घेऊन ते खाली झेपावत होते. हा धबधबा जगप्रसिद्ध नायरा-याइतका विशाल नसला तरी भेडाघाट इथल्या नर्मदा नदीवरील धुवांधारपेक्षा मोठा होता. हे तीन्ही धबधबे रुंदीला अधिक आणि उंचीला कमी आहेत, तर गिरसप्पाचा धबधबा इतका उंच आहे की खाली पोचेपर्यंत त्याच्या पाण्याची धारच शिल्लक रहात नाही, तिचे असंख्य बारीक बारीक तुषार झालेले असतात. खाली गेल्यावर सगळीकडे धुके पसरल्यासारखे वाटते.

-हाईन धबधब्यापासून जवळच एका सोयिस्कर जागी बस थांबवली. तिथून समोर धबधबा दिसतच होता. खालच्या अंगाला नदीची रुंदी व खोली भरपूर असल्यामुळे तिचा प्रवाह संथ होतो व त्यात व्यवस्थितपणे नाव चालवता येते. यासाठी अनेक नावाडी आपल्या नौका घेऊन जय्यत सज्ज असतात, तसेच खांद्याला कॅमेरे लटकावून फिरायला आलेल्या पर्यटकांचा ओघही अव्याहत सुरू असतो. एका नावेत बसवून आम्हालाही धबधब्याच्या अगदी जवळपर्यंत नेले. तिथे पाण्यात मध्येच उभ्या असलेल्या एका मोठ्या
खडकाच्या उंच सुळक्यावर पाय-यावरून चढून जाता येते. खाली पडत असलेल्या धबधब्याचे विहंगम दृष्य तेथून वरून पाहण्याची सुंदर सोय केली आहे. धबधब्याचे पाणी जिथे खाली पडते त्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन त्याचे मनाला थक्क करणारे दृष्य अगदी समोरून तर दिसतेच.

इथली एक गंमत सांगायची झाली तर इथे भारतीय मंडळींनी चालवलेला एक फास्ट फूड स्टॉल होता आणि तिथे चक्क वडा पाव खायला मिळत होता. सोबतीला रगडा पॅटिस आणि मसाला चहा, कॉफी वगैरे तर होतेच. आठवडाभर भारताबाहेर बर्गर आणि सँडविचच्या प्रदेशात काढल्यानंतर अर्थातच सर्वांनी त्या संधीचा लाभ घेतला आणि नंतर मात्र त्यावर केलेला युरोतला खर्च रुपयात कितीला पडला याचा हिशोब केला.

-हाईन धबधबा पाहून झाल्यावर सुप्रसिद्ध झूरिक शहराला जाऊन तेथील झूरिक लेकवर गेलो. स्विट्झरलंडमध्ये सगळ्याच ठिकाणी विस्तीर्ण तलाव आहेत. सगळ्या तलावांच्या किना-यांवर पर्यटकांना फिरण्यासाठी आणि वाटल्यास पहुडण्यासाठी प्रशस्त जागा करून ठेवलेली आहे. झूरिक लेकमध्ये एक नाचणारे प्रचंड कारंजे आहे व त्यावर सोडलेल्या प्रकाशझोतातून इंद्रधनुष्य दिसते. एक मोठा सिंहाचा पुतळादेखील तेथील शोभेत भर टाकतो. संध्याकाळच्या वेळी झूरिक लेकच्या किना-यावर फिरणा-यांनी चांगली गर्दी केली होती. कांही प्रेमी युगुले बघ्यांची पर्वा न करता आपल्यातच धुंद झालेली होती. तिथे कुणाला त्याचे कांही वाटत नाही. थोडे फिरून व फोटो वगैरे काढून झाल्यावर आम्ही रात्रीच्या मुक्कामाला ल्यूसर्न या गांवाला गेलो.
. . . . . . . (क्रमशः)

Thursday, May 07, 2009

ग्रँड युरोप - भाग १५ : लीस्टनस्टीनचे वडूज


दि.२२-०४-२००७ सातवा दिवस : लीस्टनस्टीनचे वडूज


आज आमच्या सहलीचा पहिला आठवडा पुरा होत होता. ऑस्ट्रियाला निरोप देऊन आता 'पृथ्वीवरील नंदनवन' असा लौकिक असलेल्या स्विट्झरलँडला जायचे म्हणून सगळ्यांनाच खूप उत्साह आला होता. दोन दिवस आल्प्स पर्वताच्या बाजूबाजूने जात होतो. आता त्याच्या माथ्यावर पोचण्यासाठी चढाई करायची होती. त्यासाठी सगळे जय्यत तयारीला लागले होते.

घाटामधल्या वळणावळणाच्या रस्त्यावरून झालेल्या तीन चार तासांच्या प्रवासानंतर 'वडूज' नांवाच्या गांवी पोचलो. पुण्याहून कात्रजचा घाट चढून साता-याकडे जातांना उंब्रज, वडूज वगैरे गांवे लागतात ते आठवले. पण इथं कंचेबी फेटेवाले नाईतर टोपीवाले पावने अजाबात दिसल्ये न्हाईत! आता इकडल्या वडूजच्या मानसांनी आपल्या म्हाराष्ट्रात येऊनशानी तिकडंबी येक वडूज वसवलं की काय याचं संशोधन का काय म्हंतात ते करायला पायजेल हाय!

तर हे 'वडूज' नांवाचे गांव चक्क 'लीस्टनस्टाईन' नांवाच्या एका देशाची राजधानी निघाली. मी तर ही दोन्ही नांवे पूर्वी कधी ऐकली नव्हती. आणि कशी ऐकणार? मी वर्तमानपत्र वाचायला लागल्यानंतर तिथली बातमी छापून येण्यासारखे कांही तिथे घडलेच नव्हते. या देशाचे क्षेत्रफळ आहे फक्त सुमारे दीडशे स्क्वेअर किलोमीटर. ते सुद्धा सगळे डोंगरद-यांनी भरलेले. लोकसंख्या फक्त ३३०००. आमच्या वाशीमध्ये याहून कितीतरी जास्त लोक रहात असतील. शिक्षणाची व्यवस्था म्हणायला फक्त शाळा. कॉलेजला जायचे असल्यास युरोपमध्ये कुठेही जा, त्याची सोय केली जाते. युरोपातील एक लोहमार्ग या देशातून आरपार जातो, त्यावरून दुस-या देशांच्या आगगाड्या धांवतात. पण त्यातील सुपरफास्ट गाड्या इथल्या स्टेशनांवर थांबतच नाहीत. हा एक डबल लँडलॉक्ड देश आहे. म्हणजे इथून समुद्रापर्यंत पोचण्यासाठी निदान दोन देशांच्या सरहदी पार कराव्या लागतात कारण याची सरहद्द एका बाजूने ऑस्ट्रिया व इतर सर्व बाजूने स्विट्झरलँडशी भिडली आहे व या दोन्ही देशांना स्वतःचा समुद्रकिनारा नाही.

हा देश गेली दोनशे वर्षे एक प्रिन्सिपालिटी आहे. अधून मधून इथे येऊन राहणारा एक प्रिन्स निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार येथील राज्यकारभार पाहतो. पण त्याच्याकडे सैन्यदलच नाही. कदाचित म्हणून त्याला 'राजा' म्हणत नसतील! ट्रॅफिक कंट्रोल, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी थोडे पोलिस असावेत. मला तरी जाता येता ते कुठे दिसले नाहीत. परेड वगैरे करायला गेले असतील. हा देश स्वतंत्र असला तरी जवळ जवळ सगळ्या गोष्टींसाठी शेजारच्या स्विट्झर्लँडवर अवलंबून आहे. त्यांचे चलनसुद्धा
स्विस फ्रँक हेच आहे पण युरोसुद्धा कांही दुकानात चालतो. टपालाची तिकीटे मात्र स्वतःची आहेत. इथे अत्यंत कमी कर आकारले जातात. याचा फायदा घेण्यासाठी कांही मोठ्या कंपन्या इथून आपला व्यवहार चालवतात. मात्र अँकरबोल्ट या खास पद्धतीचे हार्डवेअर बनवणारी हिल्टी ही आघाडीची कंपनी आपले उत्पादनसुद्धा इथेच करते.

वडूज हे एक छोट्याशा हिल स्टेशनसारखे टुमदार शहर आहे. अगदी दार्जिलिंग किंवा गंगटोक इतके नसले तरी लोणावळा खंडाळ्याहून अधिक चढउतार असलेले रस्ते आहेत. तरीही इथे सायकली खूप दिसल्या. येथील शुद्ध हवेचा परिणाम असावा. या गांवाची सहल घडवणारी दोन डब्यांची एक छोटीशी आगगाडीसारखी दिसणारी ट्रॅम आहे. त्यात बसवून फिरवतांना गांवातील प्रमुख रस्ते, इमारती, मैदाने वगैरेंचे दर्शन घडते. शिवाय वाटेत थांबून आजूबाजूचे, विशेषतः खालच्या बाजूचे सृष्टीसौंदर्य पहाण्याचे एक दोन पॉइंटसुद्धा दाखवले. येथील प्रिन्सचे निवासस्थान डोंगरमाथ्यावर आहे. गांवातील बहुतेक जागेवरून ते दृष्टीस पडते. ज्या वेळी प्रिन्स इथे येतो त्या वेळी एक झेंडा उंचावून त्याची उपस्थिती दाखवली जाते. आम जनतेला हा राजवाडा पहायला परवानगी आहे की नाही ते माहीत नाही. आम्हाला तरी तो दुरूनच पहावा लागला.
. . . . . . . . . . (क्रमशः)

Wednesday, May 06, 2009

ग्रँड युरोप - भाग १४ : साल्झबर्ग


दि।२१-०४-२००७ सहावा दिवस : साल्झबर्ग

आदल्या दिवशी इन्सब्रुकला पोचल्यानंतर तिथल्या 'सुप्रसिद्ध' गोल्डन धाचीसकट त्या शहराची सफर थोड्या फार खरेदीत घालवलेल्या वेळासकट दोन तासात आटोपली होती. त्यामुळे नेमके काय पहाण्यासाठी आपण इतक्या दूर आलो आहोत असा एक प्रश्न मनात येत होता. दुस-या दिवशीसुद्धा आल्प्स पर्वतराजीच्या कडेकडेने चालत आलेला आमचा प्रवास तसाच पुढे साल्झबर्ग येईपर्यंत चालत राहिला. प्रसन्न वातावरण व अनुपम सृष्टीसौंदर्य याची मजा लुटत राहिलो व प्रसिद्ध साल्झबर्ग शहरी येऊन पोचलो. तेंव्हा मनातल्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळाले.

साल्झबर्गला सर्वात आधी आम्ही मीराबेल बागेत प्रवेश केला. याच नांवाच्या एका राजवाड्यापाशी या बागेची निर्मिती केलेली आहे. 'मीराबेल' या शब्दाचा अर्थ "मी सांगतो की तू छान आहेस" असा आहे असे आमच्या मार्गदर्शिकेने सांगितले. कोणी कां सांगेना, पण ही बाग खरोखरच छान आहे. एका प्रशस्त आवारात टुलिपसह वेगवेगळ्या फुलझाडांचे सुंदर ताटवे आहेत तर त्याच्या बाजूच्या त्याहूनही मोठ्या दुस-या आवारात वेगवेगळ्या पोजमधल्या माणसांचे मोठमोठ्या आकारांचे कलात्मक पुतळे जागोजागी उभे करून ठेवले आहेत आणि मधोमध उंच उडणारे एक सुंदर कारंजे आहे. शिवाय त-हेत-हेची झाडेझुडुपे तर आहेतच. आपल्याकडे भरपूर वेळ असेल तर मनमोकळेपणे हिंडायला, बसायला, हंसत खेळत पिकनिक साजरी करायला इथे भरपूर जागा आहे. पण आम्हाला तिथे घालवण्यासाठी मर्यादित वेळ दिलेला असल्याकारणाने जमतील तेवढ्या शिल्पांची छायाचित्रे काढीत एक फेरफटका मारून आम्ही पुढे सरकलो.

या बागेला लागूनच येथील सुप्रसिद्ध संगीताचे विश्वविद्यालय आहे. त्या दिवशी बहुधा तिथे एखादी कॉन्फरन्स भरलेली असावी, कारण बरेचसे स्कॉलर टाईप मध्यमवयीन लोक कॉरीडॉरमध्ये हिंडतांना दिसत होते. ते विद्यार्थी तर नक्कीच नव्हते. जवळच एक भव्य सभागृह आहे. चांगल्या कलाकारांच्या कार्यक्रमाला तेसुद्धा तुडुंब भरते असे ऐकले. ज्यांनी पुण्याचा सवाई गंधर्व महोत्सव किंवा मुंबईच्या स्टेडियमवर भरणारे कार्यक्रम पाहिले असतील त्यांना यात कांही विशेष वाटणार नाही. पण आजच्या पाश्चिमात्य जीवनपद्धतीचा विचार करता शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने श्रोते इथे गर्दी करतात हे ऐकून जरासे नवल वाटले.

साल्झबर्गला एक बरोक शैलीमध्ये बांधलेले सुंदर कॅथेड्रल आहे. मोठमोठ्या कमानी, त्यांच्या शेजारी ऐतिहासिक काळातील धर्मगुरूंचे पूर्णाकृती पुतळे, भव्य घुमट, बारीक कलाकुसर वगैरे या मध्ययुगीन वास्तुशिल्पपद्धतीची सर्व वैशिष्ट्ये इथे दिसतात. दुस-या महायुद्धात झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये साल्झबर्ग शहरातील अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले होते त्यात या कॅथेड्लचीही नासधूस झाली होती, ती कधीच भरून काढली आहे.

कॅथेड्रलजवळच 'सेंट पीटर्स एबी' हे स्थान आहे. येथील दफनभूमी ही एक जगप्रसिद्ध जागा आहे. केवळ निवडक लोकांनाच मरणोपरांत इथे चिरकाल विसावा घेण्याची परवानगी मिळते. तरीसुद्धा ते अगदी एकाला खेटून एक समाधिस्त झालेले दिसतात. कांही ठिकाणी शेजारीच भावपूर्ण व सुरेख शिलाखंड उभे केलेले आहेत. ब-याच जागी रोजच्या रोज फुलांचे गुच्छ वा चक्रे वाहिली जातात. या ठिकाणी फिरतांना तोंडाने कांहीही भाषण न करता शांतपणे व गंभीरपणे चालत जावे लागते.

याच भागात सुप्रसिद्ध संगीतज्ञ मोझार्ट याचे जन्मस्थान आहे तसेच तो आपल्या आयुष्यात साल्झबर्गला असतांना जिथे कुठे राहिला होता त्या इमारती आहेत. या महान संगीतकाराने अपूर्व अशा कित्येक संगीत रचना केल्या होत्या व त्याने रचलेल्या मेलडीच आजसुद्धा चवीने वाजवल्या व ऐकल्या जातात, इतकेच नव्हे तर अभिजात संगीताचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून संगीताच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. असे असले तरी त्याच्या जीवनकालात त्याला स्वतःच्या मालकीच्या घरात राहणे कांही बहुधा परवडले नाही.
त्यामुळे या सगळ्या जागी तो भाड्याच्या घरात रहात होता. त्यातील एका जागी आता त्याच्या स्मरणार्थ वस्तुसंग्रहालय करून त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असलेल्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. दुर्दैवाने मोझार्ट अल्पायुशी ठरला व वयाच्या छत्तीसाव्या वर्षीच व्हिएन्ना मुक्कामी त्याने जगाचा निरोप घेतला. जवळच्याच एका चौकातील थोड्याशा निवांत जागेवर एक तरूण आपले गिटार घेऊन बसलेला होता व येणा-या जाणा-या रसिक पर्यटकाकडून पैसे घेऊन त्याच्या आवडीची मोझार्टची कॉंपोझिशन त्याला ऐकवीत होता.

साल्झबर्गच्या या जुन्या भागात 'लिन्झर गॅसे' नांवाची एक गल्ली आहे. ही गल्ली येथील दुकानांवर लावलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पाट्यांसाठी प्रसिद्ध आहे. आंतर्जालावर गाजलेल्या पुणेरी पाट्यांप्रमाणे या इनोदी किंवा खवचट नाहीत. पूर्वीच्या काळातल्यासारखी रेखीव वळणदार अक्षरे, वेलबुट्ट्या व इतर सजावट, त्या काळातील मथळे वगैरे या पाट्यांवर दिसतात. एका जागी तर शंभर दोनशे वर्षापूर्वीच्या काळातले वाटावे असे एक रेस्टॉरेंट आहे. त्यात पुरातन कालातल्या टेबल खुर्च्यावर तसल्याच प्रकारच्या कटलरीमध्ये ताजे
जेवण दिले जाते व ते वाढणारे लोकही ऐतिहासिक पोशाख परिधान करून येतात. आम्ही ते फक्त एका नजरेत पाहून घेतले कारण आमच्या जेवणाची व्यवस्था दुसरीकडे होती.

साउंड ऑफ म्यूजिक या जुन्या इंग्रजी सांगीतिक चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय साल्झबर्गचे वर्णन अपुरेच राहील. मारिया व्हॉन ट्रॅप नांवाच्या येथील एका महिलेच्या जीवनातील कांही सत्य घटनांवर आधारलेला हा चित्रपट आहे. यातील गोष्ट याच भागात घडलेली दाखवली आहे व याचे बरेचसे चित्रीकरण इथेच झालेले आहे. पर्यटकांना अशा सगळ्या जागा दाखवणारी एक सहलसुद्धा इथे उपलब्ध आहे. गोव्याला गेल्यावर 'एक दूजेके लिये' किंवा उदयपूरला गेल्यास 'गाईड' या सिनेमातील शूटिंग कुठे झाले ते हमखास दाखवतात ना, तसेच.

मारिया व्हॉन ट्रॅप ही संगीतप्रेमी महिला आधी नन बनण्याठी एबीमध्ये रहात असते, पण तिचे मन तिथल्या गंभीर वातावरणात तितकेसे लागत नसते. त्यानंतर आपल्या प्रमुख 'मदर'च्या सल्ल्यानेच ती कॅप्टन ट्रॅप या एका सेवानिवृत्त सैनिकी अधिका-याच्या सात मुलांची गव्हर्नेस बनून त्याच्या घरी येते. या मुलांना तोपावेतो अत्यंत कडक अशा मिलिटरी शिस्तीत व धाकातच ठेवलेले असते पण त्यामुळे ती विद्रोही व व्रात्य झालेली असतात. तिथे संगीताचे तर वारेसुद्धा त्यांना लागू दिलेले नसते. मारिया मुलांना माया लावून हळूहळू ही सर्व परिस्थिती कशी बदलते याचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. ज्यूली अँड्र्यूज या तारकेने फारच सुंदर अभिनय करून कांहीशा प्रौढत्वाकडे झुकलेल्या नायिकेची व्यक्तीरेखा साकार केली आहे. मुलांना पिकनिकच्या निमित्ताने घराबाहेर नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात 'डो अ डीअर' या गाण्यातून ती त्यांना सात सुरांच्या सरगमची ओळख करून देते हा प्रसंग तर अप्रतिम आहे. अशाच प्रकारचा सीन 'परिचय' या हिंदी चित्रपटात 'सारेके सारे गमको लेकर गाते चले' या गाण्यात
दाखवला आहे.

साउंड ऑफ म्यूजिक या चित्रपटाच्या अखेरीस नाझी सैनिकांची तुकडी साल्झबर्गमध्ये प्रवेश करते. पूर्वी ऑस्ट्रियाच्या नौदलात काम केलेल्या कॅप्टन ट्रॅपने जर्मनीने साल्झबर्गचा ताबा घेतल्यानंतर हिटलरच्या सेवेत पुन्हा कामावर रुजू व्हावे असे फर्मान निघालेले असते पण देशभक्त कर्नल ट्रॅपला हे मान्य नसते. त्यामुळे त्यांना त्याला पकडून न्यायचे असते, पण सर्व हितचिंतकांच्या सहाय्याने ते कुटुंब त्या सैनिकांना गुंगारा देऊन तेथून निसटून जाते इथे या चित्रपटाची अखेर होते. यात मारियाच्या एबीमधील पूर्वीच्या सहकारिणी नन्सचा मोठा वाटा आहे आणि कांही क्लायमॅक्सची दृष्ये सिमेटरीमध्ये घडलेली दाखवलेली आहेत. पण प्रत्यक्षात सेंट पीटर हे असले प्रकार सहन करणार नाही. त्यामुळे या दफनभूमीची प्रतिकृती स्टूडिओमध्ये बनवून तिथे हे चित्रीकरण झाले अशी माहिती आमच्या गाईडने दिली.

साल्झबर्गची भेट थोडे निसर्गसौंदर्य, थोडी वास्तुशिल्पकला, थोडे संगीत, थोडी चित्रपटाची आठवण अशा विविध प्रकारच्या अनुभवामुळे कायम आठवणीत राहील. या सहलीनंतर आम्ही पुन्हा रात्रीच्या मुक्कामासाठी इन्यब्रुकला परतलो.
......... (क्रमशः)

Tuesday, May 05, 2009

ग्रँड युरोप - भाग १३ : इन्सब्रुक


दि.२०-०४-२००७ पांचवा दिवस : इन्सब्रुक


इटलीमधील व्हेनिसहून निघाल्यापासून ऑस्ट्रियाकडे जाणारा सारा प्रवास नयनरम्य अशा प्रदेशात झाला. समुद्रकिनारा सोडल्यानंतर लवकरच डोंगराळ भाग दिसू लागला व टेकड्या आकाराने वाढतच गेल्या. थोड्याच वेळात कोणाला तरी दूरवर एक बर्फाच्छादित शिखऱ दिसले आणि बसमधले सगळेजण त्या दिशेने पाहू लागलो. ते दिसेनासे होत होते एवढ्यात दुस-या बाजूला दुसरे शिखर दिसू लागले. असे करता करता आमची बस बर्फाच्छादित पर्वतशिखरांच्या रांगामधूनच जाऊ लागली. त्यामुळे अर्थातच
वळणावळणाचा रस्ता, हिरवीगार वनराई, मधूनच एका बाजूला असलेल्या खाईमध्ये दूर दिसणारी एकादी वस्ती, कुठे गर्द झाडांमधून डोके वर काढून उभा असलेला एकाद्या चर्चचा मनोरा, तर कुठे नाचत बागडत जात असलेला खळखळता पाण्याचा प्रवाह अशी नयनमनोहर दृष्ये पहात कसा वेळ जात होता ते कळत नव्हते. मधूनच एखादा सपाट प्रदेश लागे. अशाच एका जागी स्वरौस्कीचे अद्भुत विश्व उभे केले आहे व दुस-या एका जागेवर इन्सब्रुक हे शहर वसले आहे.

आल्प्स पर्वताच्या अगदी कुशीत वसलेले 'इन्सब्रुक' हे एक टुमदार शहर आहे. इन्स नांवाच्या नदीवर बांधलेला पूल असा त्याचा अर्थ आहे. डोंगराळ प्रदेशातून वेगाने वाहणारी इन्स नदी पार करण्यासाठी पूर्वापारपासून इथे पूल बांधलेला असावा व त्याच्या आजूबाजूने वस्ती वाढत गेली असावी. इतक्याशा पिटुकल्या गांवाला इतिहासकाळात बरेच राजनैतिक महत्व प्राप्त झाले होते असे दिसते. इकडच्या टायरॉल या विभागाची ही राजधानी आहे. कुठल्या तरी काळात इथल्या सम्राटाने बराच मोठा भूभाग आपल्या अंमलाखाली आणला होता. पण इतर काळात तो कधी स्वतंत्र राहिला तर कधी बव्हेरियाच्या व हिटलरच्या जमान्यात जर्मनीच्या अंमलाखाली आला. सध्या तो ऑस्ट्रिया या देशाचा भाग आहे.

'गोल्डन ढाची' नांवाची येथील एक इमारत प्रेक्षणीय म्हणून पर्यटकांना आवर्जून दाखवली जाते. गजबजलेल्या वस्तीमध्येच ही एक तीन मजल्यांची इमारत आहे. पांचशे वर्षापूर्वी जेंव्हा ती बांधली गेली तेंव्हा आजूबाजूला सगळी मोकळी जागा असणार. त्या इमारतीच्या तिस-या मजल्याच्या गॅलरीला एक तिरपी शेड बांधून त्यावर सोन्याने मढवलेली अडीच हजार कौले लावलेली आहेत. त्या इमारतीच्या समोरच रस्ता असल्याने दूरवरून ती कौले चमकतांना दिसतात. पूर्वीच्या काळातला एक सम्राट जेंव्हा इथे मुक्कामाला रहात असे तेंव्हा या बाल्कनीत उभा राहून खालचे दृष्य पहात असे किंवा खालच्या लोकांना आपले दर्शन देत असे म्हणून त्याने ही कौले लावून घेतलेली होती.

आजच्या काळात इन्सब्रुक हे गांव बर्फावरील खेळांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच आल्प्सची बर्फाच्छादित शिखरे व पाहिजे तसा उतार असल्यामुळे स्कीइंगसाठी लागणारे क्रीडांगण इथे बनवले असून अनेक आंतरराष्ट्रीय चढाओढी या ठिकाणी होऊन गेल्या आहेत. त्या निमित्ताने व या रम्य ठिकाणाचे निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात. आता पर्यटन हा एक येथील प्रमुख उद्योग म्हणता येईल इतके विविध रंगाचे व भाषा बोलणारे लोक रस्त्यात किंवा दुकानांत दिसतात. आपण ऑस्ट्रिया नांवाच्या अप्रसिद्ध देशातल्या एका आडगांवाला आलो आहोत असे केंव्हाच वाटले नाही. इथे सुद्धा भारतीय जेवण खायला मिळाले एवढेच नव्हे तर 'रस्तेका माल सस्तेमे' विकणारे बरेच विक्रेते भारतीय, पाकिस्तानी किंवा बांगलादेशी होते आणि आमच्याशी हिंदीमधून बोलून आपला माल खपवण्याचा प्रयत्न करीत होते.

Monday, May 04, 2009

ग्रँड युरोप - भाग १२ : स्वरौस्की स्फटिकविश्व


दि.२०-०४-२००७ पांचवा दिवस : स्वरौस्की स्फटिकविश्व


व्हेनिसच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आम्ही तिथल्या एका वेगळ्या प्रकारच्या जागेलाही भेट दिली, ती म्हणजे एक कांचेचा कारखाना. एका जुन्या पुराण्या इमारतीमधील काळोखातल्या जिन्याच्या पाय-या चढून वर गेल्यावर आमचे स्वागत करून आम्हाला लगेच बाजूच्या एका लहानशा कार्यशाळेत नेले गेले. तिथल्या कुशल कारागीराने कांचेचा एक गोळा तापलेल्या भट्टीमधून बाहेर काढला व हातातील अवजारांच्या सहाय्याने त्याला विविध सुंदर आकार सफाईने देऊन दाखवले. बाजूला उभ्या असलेल्या महिलेने या
सगळ्या प्रक्रियांची थोडक्यात माहिती सांगितली. तापलेल्या कांचेला आकार देणे, त्यावर पाहिजे त्या जागेवर वेगवेगळ्या प्रकारच्या फॉइल्स, मणी किंवा वाळू चिकटवून त्याला पुन्हा भाजणे, कडांवर बारीक नक्षीकाम कोरणे वगैरेंची त्रोटक माहिती तिने सांगितली.

आमच्या समूहातील कांही शहरी मंडळींनी बहुधा "फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार" या गाण्यातला कुंभार आणि "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे" या गाण्यातला लोहार एवढ्याच कारागीरांना, ते सुद्धा सिनेमाच्या पडद्यावर पाहिलेले असावे. त्यामुळे कांचेला विविध आकार देणा-या त्या कलाकाराचे कसब ते डोळे भरून पहात होते व त्यांच्या चेह-यावरील भाव पाहतांना मला मजा वाटत होती. कार्यशाळेतील कृतीचा आविष्कार पाहून झाल्यावर आम्ही त्यांच्या दुकानात गेलो, पण असले नाजुक काचेचे सामान बरोबर घेऊन हिंडणे अवघड असल्याची जाणीव झाल्यामुळे ते विकत घेण्याचा मोह कोणी केला नाही. पुढच्या खोलीत खड्यांचे आकर्षक दागदागिने मांडून ठेवलेले होते. तिथेही इतकी किंमत घेऊन कांचेच्या खड्यांचे दागीने घ्यायला कोणी तयार झाले नाही.

व्हेनिसला व इटलीला रामराम ठोकून आमची गाडी निघाली ती ऑस्ट्रियामधील वॅटन्स या गांवी असलेल्या स्वरौस्कीच्या स्फटिकविश्वात आम्हाला घेऊन गेली. स्वरौस्की हे नांव पूर्वी ऐकले होते व त्यांची अतीशय महागडी व तितकीच आकर्षक क्रिस्टलची चमचमती चित्रे अकबरअलीजसारख्या दुकानांच्या शोकेसमध्ये ठेवलेली पाहिली होती. त्यांच्या अचाट किंमती पाहिल्यावर ती खरोखरच विकायला ठेवली असतात की फक्त शोभेसाठी मांडलेली आहेत असा संभ्रमही झाला होता. त्यामुळे त्यांचे प्रदर्शन पहाण्याची
उत्सुकता होती.

वॅटन येथे एका प्रशस्त जागेवर स्वरौस्कीने आपल्या अद्भुत कलाकृतींच्या आधारे एक आगळे वेगळे विश्वच उभे केले आहे. त्याच्या बाहेरच्या अंगानेच मोठमोठ्या अक्षरात "येस टू ऑल" हे शब्द असलेली झगझगती अक्षरे उभारलेली आहेत। आंत प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दालनात सर्व बाजूंनी डोळे दिपवणारे क्रिस्टल्स मांडले आहेत। त्यात जगातील सर्वात मोठ्या आकाराचा फुटबॉलएवढा मोठा एक अमूल्य खडा, तसेच भिंगामधून पाहिल्यावरड दिसणारा जगातील सर्वात लहान आकाराचा खडाही आहेत। कितीतरी मीटर लांब व रुंद अशी लक्षावधी स्फटिकांनी मढवलेली जगातली सर्वात मौल्यवान भिंत इथे बांधली आहे व त्या भिंतीच्या कडेकडेने एकापुढे एक अशी प्रदर्शनाची तेरा स्वतंत्र दालने आहेत.


या दालनांमध्ये संपूर्ण अंधार केलेला आहे व प्रदर्शनासाठी कांचेच्या तांवदानांत ठेवलेल्या स्फटिकांतून परावर्तन पावणारा प्रखर उजेड अगदी लख्ख दिसतो. ही सगळी मांडणी एका सरळसोट रेषेत न करता त्यासाठी वर्तुळाकृती, अर्धगोल, त्रिकोण, चौकोन वगैरे वेगवेगळ्या आकारांच्या खोल्या वेगवेगळ्या स्तरांवर ठेऊन व खाली वर चढण्याउतरण्याच्या पाय-या लावून त्यात वैविध्य आणले आहे. भारलेल्या मनाने एका दालनांतून निघून दुसरीकडे गेल्यावर तेथील वेगळे दृष्य पाहून पुन्हा चकित व्हायला व्हावे अशी सगळी व्यवस्था आहे.

इथे नुसते क्रिस्टल्स मांडून ठेवलेले नाहीत. प्रत्येक दालनांत वेगळी दृष्ये उभारलेली आहेत. यात पशु, पक्षी, फुलपाखरे, मासे वगैरे अनेक प्रकारचे जलचर व थलचर जीव आहेत तसेच युनिकॉर्न, ड्रॅगन यासारखे काल्पनिक प्राणीही आहेत आणि अमूर्त आकाराच्या कलाकृतीही. कुठे हे विविध आकारच स्फटिकांतून घडवले आहेत तर कुठे त्यांना क्रिस्टल्सने सजवले आहे. कांही दालनांत एका बाजूला त्रिमितीमधूल दृष्य व दुस-या बाजूला पडद्यावर एक चलचित्र दाखवले जाते. काही ठिकाणी माथ्यावरील छत आणि
पायाखालील जमीनसुद्धा कलात्मक रीतीने सजवून त्यावर प्रकाशाचा खेळ मांडला आहे. कुठे मंद व प्रखर होणारा प्रकाश तर कुठे फिरता किंवा नाचता प्रकाशाचा झोत, आणखीन कुठे बदलत जाणा-या रंगांच्या छटा या सगळ्यामुळे हे प्रदर्शन "यासम हे" असे केवळ अद्वितीय म्हणावे लागेल. फारतर त्याची तुलना दिवाळीतील किंवा लेजर किरणांच्या आतिशबाजीबरोबर करता येईल. पण त्या आतिशबाजीतील दृष्ये क्षणिक असतात, तर इथे ती दिसत राहतात.

प्रदर्शनातील सारी दालने पाहून झाल्यावर आपण त्यांच्या भव्य दुकानात प्रवेश करतो. हजारो प्रकारच्या अनुपम कलाकृती तिथे मांडलेल्या आहेत. इथेही त्यातील एक एक सुरेख गोष्ट पाहून ती नजरेत साठवून ठेवावी असे वाटते. इथे मात्र सगळ्यावस्तु व्यवस्थितपणे किंमतीच्या लेबलसह ओळीने मांडून ठेवलेल्या आहेत. अर्थातच त्यांच्या किंमती कांही कमी नाहीत. कुठलाही मनात भरणारा अगदी छोटासा प्राणीसुद्धा शंभर दोनशे युरोच्या खाली नसायचा. निव्वळ शोकेसमध्ये मांडून ठेवण्यासाठी इतके पैसे खर्च करणे
जिवावर येतेच. त्याशिवाय आपल्याला तो शो पीस दुकानातल्याइतका चमकदार घरात दिसायला हवा असेल तर त्यासाठी खास दिव्याच्या झोताची व्यवस्था करायला हवी हे वेगळेच. नैसर्गिक प्रकाशात त्याच्या अंतर्गत परावर्तनाची मजा कशी येणार? पण हे सगळे केले तर मात्र त्या वस्तूंना तोड नाही इतक्या त्या सुंदर दिसतात. आम्ही आपले भरपूर नेत्रसुख घेतले व जमेल तेवढे कॅमे-याने टिपण्याचा प्रयत्न केला. दागीन्यांच्या विभागात मात्र स्त्रीवर्गाने थोडी तरी खरेदी केलीच.

एक वेगळ्या प्रकारचे कल्पनातीत असे प्रदर्शन व विक्रीकेंद्र पाहिल्याचा आनंद घेऊन आम्ही तेथून बाहेर आलो.

Sunday, May 03, 2009

ग्रँड युरोप - भाग ११ : ऐतिहासिक व्हेनिस


दि.१९-०४-२००७ चौथा दिवस : ऐतिहासिक व्हेनिस


दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळात युरोपमध्ये सर्वत्र रोमन साम्राज्याचा दबदबा होता व त्यामुळे रोम हे तिकडील सर्वात महत्वाचे शहर होते. त्या काळाची निशाणी दाखवणारी अवाढव्य वास्तुशिल्पे आजही पहायला मिळतात. गेल्या चार पांच शतकांपूर्वीपासून इंग्लंड व फ्रान्स हे देश आघाडीवर आले व त्यांनी जगभर आपली साम्राज्ये स्थापन केली. त्यामुळे लंडन व पॅरिस ही शहरे युरोपातीलच नव्हे तर जगातील अव्वल क्रमांकाची शहरे झाली. गेल्या शतकात झालेल्या दोन विश्वयुद्धांनंतर आता अमेरिकेने आपले वर्चस्व जगभर पसरवले आहे. पण मधल्या काळात म्हणजे सुमारे सातआठशे वर्षांपूर्वीच्या कालखंडात व्हेनिस हे युरोपातील सर्वात समृध्द शहर झाले होते. आजचा व्हेनिसचा आकार व तेथील लोकसंख्या पाहता यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

हा मान व्हेनिसनगरीने मोठ्या साम्राज्याच्या विस्तारातून किंवा तलवारीच्या धारेच्या जोरावर मिळवला नव्हता तर तो तत्कालिन अर्थव्यवस्थेतून तिला प्राप्त झाला होता हे आणखी एक आश्चर्य म्हणावे लागेल. व्हेनिसच्या व आसमंतातील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेमुळे एक नैसर्गिक बंदर बनण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टी इथे उपलब्ध असल्याने फार पूर्वीपासून नौकानयनाचा विकास या ठिकाणी होत गेला. हजार वर्षापूर्वीच्या काळात व्हेनिसमधील रहिवाशांकडे तीन हजारावर नौका होत्या. त्यातील कांहींमधून मालाची
व प्रवाशांची वाहतूक होत असे तर कांही युद्धनौका होत्या. बहुतेक नौका या दोन्ही कामासाठी उपयुक्त अशा बनावटीच्या बनत असत.

समुद्रमार्गे होणारा व्यापार जसजसा वाढत गेला तसतसे व्हेनिसचे महत्व वाढले. आशिया खंडाबरोबर होणा-या व्यापारासाठी व्हेनिस हे युरोपचे प्रवेशद्वार बनले. त्यामुळे आसपासच्या भागातील धाडसी दर्यावर्दी, हुशार व्यापारी व नौकाबांधणीसाठी कुशल कारागीर हे सगळे तिकडे आकर्षिले गेले. त्यांनी अगणित संपत्ती कमावली व येथील विभागात खर्चही केली. या संपत्तीच्या संरक्षणासाठी कडवे लढवय्येही इथे गोळा झाले. आजूबाजूच्या प्रदेशातून सतत होत राहणा-या आक्रमणांमुळे सैनिकी प्रशिक्षणाची परंपराच या भागात राहणा-या लोकांत निर्माण झाली. ख्रिश्चन व मुस्लिम जगांतील झालेल्या धर्मयुद्धांच्या काळात तर व्हेनिसला आणखीनच अधिक महत्व प्राप्त झाले.

समुद्र व खाड्या यांच्यापासून मिळणा-या नैसर्गिक संरक्षणामुळे व्हेनिसच्या लोकांनी बरेच वेळा परचक्रापासून आपला बचाव करून घेतला आणि कधी कधी प्रतिहल्ले करून गमावलेल्या वस्तू पुन्हा परत मिळवून आणल्या. सेंट मार्क बॅसिलिकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थापित केलेल्या अश्वाकृती पुतळ्यांचा याचे उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल. पण दीर्घकालपर्यंत व्हेनिस हे एक मुख्य शहर व आजूबाजूचा थोडा भाग इतक्यापुरते मर्यादित असे एक लोकतांत्रिक राज्य राहिले. कधी त्यावर तुर्कस्तान, ऑस्ट्रिया, फ्रान्स आदि आजूबाजूच्या देशांचा अल्प काळासाठी अंमल बसत असे, पण संधी मिळताच तेथील लोक तो अंमल झुगारून देत व स्वतंत्रपणे राहू लागत.

यामुळे इतर देशांच्या राजधानीत दिसतात तसे राजा महाराजांचे भव्य राजवाडे, किल्ले वगैरे इथे नाहीत, पण सर्वसामान्य लोकच समृद्ध झाल्यामुळे त्यांनी अत्यंत सुंदर अशा इमारती इथे बांधल्या होत्या। अशा प्रकारचे अनेक वाडे आणि हवेल्या इथे दिसून येतात. या समृद्धीच्या आधारावर कलागुणांना आश्रय मिळाला व मध्ययुगातील अनेक सुप्रसिद्ध कलाकार इथे निपजले किंवा स्थिरावले.

युरोपमधील मध्ययुगातील वाङ्मयातसुद्धा व्हेनिसचा उल्लेख येतो. व्यापार उद्योग म्हंटल्यावर त्यासाठी भांडवल हवे व ते पुरवणारे सावकार आलेच. अशाच एका निर्दय यहुदी सावकाराचे 'शायलॉक' हे पात्र शेक्सपीयरच्या 'मर्चंट ऑफ व्हेनिस' या नाटकाने इतके प्रसिद्धीला आणले आहे की कोठल्याही निष्ठुर माणसासाठी त्याचे उदाहरण देण्यात येते. शेक्सपीयरचीच 'ऑथेल्लो' ही शोकांतिका व्हेनिसमध्येच घडलेली दाखवली आहे. या नाटकाच्या कथेवर आधारलेली अनेक नाटके व चित्रपट जगभर निघाले. कपटी मित्राच्या आगलाव्या बोलण्यावर विसंबून आपल्या प्रामाणिक पत्नीचा संशय घंणारा पति कसा सर्वनाशाला कारणीभूत होतो हे दाखवणारा 'ओंकारा' हा हिंदी चित्रपट ऑथेल्लोच्याच कथेवरून घेतला आहे.

व्हेनिसमध्ये फिरत असतांना या सगळ्या भूतकालाची आठवण जागी झाल्याखेरीज कशी राहील?

Saturday, May 02, 2009

ग्रँड युरोप - भाग १० : व्हेनिसची सफर




दि.१९-०४-२००७ चौथा दिवस : व्हेनिसची सफर



फ्लॉरेंन्सहून व्हेनिसपर्यंत पुन्हा बसने चार तासांचा प्रवास आहे. त्यासाठी चांगला पोटभर नाश्ता घेऊन तयार झालो. युरोपमध्ये सगळीकडे कॉंटिनेंटल ब्रेकफास्ट मिळत होता. त्यात दोन तीन प्रकारचे फळांचे रस असायचे, शिवाय कांही कांही जागी सफरचंद, मोसंबी, पियर, केळी अशी ताजी फळे मिळायची. दुधाबरोबर खाण्याचे कॉर्न फ्लेक्स व तशासारखेच गहू, ओट वगैरे धान्यांचे पदार्थ असायचे. ब्रेड, टोस्ट, क्रॉइसॉं, मुफिन्स. केक वगैरेचे निरनिराळे प्रकार असायचे व त्यांना लावण्यासाठी लोणी, चीज, जॅम्स व मध ठेवीत असत. नॉन व्हेज खाणा-यासाठी स्क्रँबल्ड एग, पॅन केक, सलामी व सॉसेजेस मिळायची. अशा प्रकारे ब-यापैकी विविधता असल्यामुळे "भारतातल्यासारखे चमचमीत कांही इथे खायला मिळत नाही" अशी कुरकुर करीतसुद्धा सगळेजण व्यवस्थित न्याहारी करून घेत होते.
बसच्या खिडकीतून आजूबाजूचे इटलीच्या ग्रामीण भागातील सृष्टीसौंदर्य पहात होतो. एप्रिल मे महिन्यांच्या दिवसात आपल्याकडील शेतातसुध्दा गहू किंवा भात नसतोच. तिथेही दिसला नाही. बहुतेक शेतांमध्ये कसल्यातरी कडधान्याची किंवा तेलबियांची लागवड केल्यासारखे दिसत होते. अनेक ठिकाणी त्याला फुलोरा आल्याने संपूर्ण शेत पिवळे धम्मक दिसायचे. ते खूपच मोहक वाटायचे. कित्येक जागी द्राक्षांचे मळे लावलेले होते तर कांही जागी अवाढव्य आकाराची ग्रीन हाउसेस दिसत होती. मध्येच असे एखादे
अनोखे कांहीतरी दिसले की एकमेकांना ते दाखवायचे. कांहीजण लगेच कॅमेरे सरसावून त्याचे फोटो काढायचे किंवा व्हीडिओ रेकॉर्डिंग करायचे.

भूक लागली म्हणून नसली तरी तोंड चाळवण्यासाठी अधून मधून फराळाच्या सामानाची पाकिटे पिशवीच्या बाहेर निघत. केसरीतर्फे सगळ्यांना छोट्या छोट्या पाकिटात भरून चांगला घसघशीत खाऊ मिळाला होताच, शिवाय कित्येक लोकांनी आपापल्या खास आवडीच्या खाद्यवस्तू बरोबर आणल्या होत्या. एक पाकिट फोडले की आपण त्यातील थोडे खाऊन शेजारच्याला चवीसाठी देऊन ते संपवून टाकायचे असे चालले होते. सांगलीच्या मंडळींनी तिकडची खास रुचकर भडंग आणली होती, ती तर पहाता पहाता फस्त झाली.

दुपार होईपर्यंत व्हेनिसला पोचलो. हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक शहर खरे तर समुद्रातील अनेक बेटांवर वसलेले आहे. पण त्याची आधुनिक वस्ती युरोपच्या किना-यावर पसरली आहे. किना-यावरील बंदरापर्यंत बसने जाऊन एका मोठ्या नौकेमध्ये बसून खाडीमधून व्हेनिसच्या बेटावर गेलो. हा प्रवास फारच रम्य होता. अथांग पसरलेल्या शांत पाण्यातून दूरवर व्हेनिसच्या सुंदर इमारती दिसू लागल्या व दोन्ही बाजूंनी त्या पहात पहात हळू हळू पुढे पुढे सरकत आमची नौका तेथील धक्क्याला लागली. नौकेमधून चढण्या व
उतरण्यासाढी खूपच सोयिस्कर पाय-यांची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे तोल सावरण्याची कसरत करावी लागली नाही की कोणाचा हांत धरावा लागला नाही.

धक्क्यावरून पुन्हा खाडीच्या कांठाकांठाने रस्त्याने जाताजाताच तेथील कांही सुंदर ऐतिहासिक इमारती दिसतात. 'डोगचा राजवाडा' या जागी इथला ड्यूक म्हणजे प्रमुख वास्तव्य करीत असे. त्याच्या इतमामाला साजेशी अशी ही एक सुंदर वास्तू आहे. त्यावर अनेक प्रकारची कलाकुसर करून ती सजवलेली आहे. त्याच्याच शेजारच्या इमारतीमध्ये पूर्वी बंदीखाना होता. खिडक्यासुद्धा नसलेली ती एक अंधारकोठडीच होती म्हणा! या दोन्ही इमारतींना जोडणारा एक उंच पातळीवरील पूल आहे तो 'ब्रिज ऑफ साय' किंवा 'निश्वाससेतू' या नांवाने ओळखला जातो. असल्या जीवघेण्या तुरुंगातून सुटतांना नक्कीच ते कैदी सुटकेचा उसासा टाकीत असणार!

व्हेनिस हे शहर पाण्यावरचे शहर म्हणूनच ओळखले जाते. एका काळी सगळीकडे सगळ्या इमारतींना जोडणारे कालवेच कालवे होते. तसे ते आतासुद्धा आहेत, पण एक दोन राजमार्गही आहेत. त्यावरूनच आम्ही चालत होतो. पण थोडे अंतर चालले की कालवा ओलांडणारा एक पूल येत असे. त्यावरून चढ उतार करूनच पुढे जावे लागे. इथे जवळजवळ दीडशे कालवे आहेत व त्यावर चारशे लहान लहान पूल आहेत.

पियाझा सेंट मार्को (सेंट मार्क स्क्वेअर) हे येथील प्रमुख ठिकाण आहे. कोठलेही वाहन तेथे न येणारा हा जगातील सर्वात मोठा चौक असेल. इथे आपल्याला दिसतात ती फक्त माणसे आणि कबूतरे. बहुतेक माणसे हे देशोदेशाहून आलेले पर्यटकच असतात. आम्ही गेलो त्या वेळेस तरी आशिया खंडातील लोक मोठ्या संख्येने दिसत होते. त्यात भारतीय होते तसेच चिनी वा जपानीसुद्धा खूप होते. माणसे जास्त होती की कबूतरे असा प्रश्न पडावा इतकी कबूतरे होती. त्यांना खायला घालण्यासाठी दाणे विकणारे होते
आणि ते खायला चटावलेली कबूतरे अजीबात न भिता सराईतपणे आमच्या आजूबाजूला फिरत होती व येऊन बसतसुद्धा होती.

सेंट मार्क बॅसिलिका हे येथील प्रमुख आकर्षण आहे. इतिहासकालात उभे केलेले हे चर्च अत्यंत देखणे आहे. बाहेरून त्याचे घुमट व कमानीयुक्त दर्शनी भाग जितका आकर्षक दिसतो त्याहूनही सुंदर त्याच्या आतली सजावट आहे. देशोदेशीचे विविध प्रकारचे संगमरवर व अन्य दगड आणून त्यातून याचे कलात्मक स्तंभ बनवलेले आहेत व अनेक सुंदर पुतळे या चर्चची शोभा वाढवतात. चर्चच्या समोरच ऐतिहासिक बेल टॉवर आहे. चहूकडे पाण्याने वेढलेल्या व कच्च्या जमीनीवर उभा केलेला हा उंच मनोरा कलला कसा नाही याचेच आश्चर्य वाटते. पूर्वीच्या त्या काळी कसल्या प्रकारचा पाया त्यासाठी घातला गेला असेल? बाजूच्याच इमारतीत एक क्लॉक टॉवर उभारलेला आहे. त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ पांचशे वर्षापूर्वी प्रथम बसवले होते असे म्हणतात. या घड्याळावर बारा ऐवजी चोवीस आंकडे आहेत, म्हणजे दिवसाचे चोवीस तास ते दाखवते. आंतल्या तबकडीवर बारा राशींची चिन्हे आहेत व फिरणारा तास कांटा सूर्याचे चित्र धारण करतो. आहे की नाही अफलातून? इमारतीच्या माथ्यावर 'विंग्ड लायन' (पंख लावलेला सिंह) हे येथील खास चिन्ह आहे.

सेंट मार्क स्क्वेअर ओलांडून तेथील प्रसिद्ध 'गोंडोला राईड' घेतली. एका वेळी फक्त सहा पर्यटक व एक नावाडी बसू शकतील अशा एका छोट्या नांवेत बसून एका कालव्यात शिरतात व अक्षरशः कालव्यांच्या गल्लीबोळातून जात, दोन्ही बाजूंना असलेल्या जुन्यापुराण्या इमारतीमधून वाट काढीत व वेगवेगळ्या पुलांखालून अर्धा पाऊण तास फिरवून आणतात. सिनेमा पाहातांना हा प्रकार जेवढा रोमांचकारी वाटतो तसा तो प्रत्यक्षात जाणवत नाही. एका काळी कदाचित इथे स्वच्छ निर्मळ पाणी या कालव्यामधून वहात
असेलही, पण आता मात्र त्याचा रंग पाहून व सुटलेल्या दुर्गंधाने शिसारी येते व केंव्हा एकदा आपण कालव्याच्या मुख्य प्रवाहात व थोड्या मोकळ्या जागेवर येऊ असे वाटायला लागते. वेळ घालवण्यासाठी "आम्ही वल्हव रे नाखवा हो" वगैरे गाणी म्हणून घेतली. हा प्रवास करून आल्यावर आमच्यातल्या एकाने "या गोंडोला राईडनं सगळ्यांना बरं गंडवलं!" असा कॉमेंट दिला.

. . . . . . . (क्रमशः)

Thursday, April 30, 2009

महाराष्ट्र गीते -१,२, ३

महाराष्ट्र गीत - १

उद्यापरवा महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्याने तीन जुनी महाराष्ट्रगीते सादर करीत आहे.

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
---------------------------------------------------------------

महाराष्ट्र गीत - २

दुस-या एका सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताची दोन कडवी खाली उद्धृत करीत आहे.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।
अंजन कांचन करवंदीच्या कांटेरी देशा ।
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ।
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्थासी ।
वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

अपर सिंधूच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या जिवलगा, महाराष्ट्र देशा ।
पाषाणाच्या देही धरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ।
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ।
मंगल वसती, जनस्थानींची श्रीरघुनाथांची ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्गासी,वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।


..... गोविंदाग्रज

-------------------------------------------------------------------

महाराष्ट्र गीत - ३

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी ।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा ।
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा ।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा ।
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी ।
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी ।
दरिद्र्याच्या उन्हात शिजला ।
निढळाच्या घामाने भिजला ।
देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

कवि - राजा बढे
संगीत नियोजन - श्रीनिवास खळे
स्वर - शाहीर साबळे

Tuesday, April 28, 2009

मराठी दिवस

लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे। या निमित्याने मी मराठी दिवस या विषयावर लिहिलेला लेख देत आहे. दर वर्षी मराठी दिवस पाळला जातो. पण कोणते लोक आणि कशा पध्दतीने तो साजरा करतात ते कांही समजत नाही. माझ्या परिसरात तरी कसलाच उत्सव किंवा उत्साह मला कधी दिसला नाही. मातृभाषेच्या अशा वेगळ्या दिवसाची गरज तरी कां भासावी हा सुध्दा एक प्रश्न आहे. पण या बाबतीतले एकंदरीत औदासिन्य पाहता कांही लोक सातत्याने मराठी भाषेच्या भविष्याबद्दल जी चिंता व्यक्त करत असतात ती खरी वाटू लागते.

सन १९२२ मध्ये कवीराज माधव ज्यूलियन यांनी लिहिलेल्या "मराठी असे आमुची मायबोली" या सुप्रसिध्द कवितेत "जरी आज ही राजभाषा नसे"अशी तत्कालिन परिस्थितीनुसार वेगळ्या प्रकारची खंत व्यक्त केली होती, त्यासोबतच "नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे" अशी आशा व्यक्त केली होती. तसेच आम्ही ते करून दाखवू असा आत्मविश्वास प्रकट केला होता. त्या काळच्या मानाने आज मराठीला खूपच चांगले दिवस आले आहेत, तरीही त्याबद्दल असंतुष्ट असलेल्या लोकांचे वेगळ्या प्रकारचे गार्‍हाणे गाणे चालले आहे. एका पत्रलेखकाने माधव ज्यूलियनांची क्षमा मागून "मराठी असो आमुची मायबोली, तरीही खरी राजभाषा नसे। नसे आज ऐश्वर्य या माउलीला, भविष्यात ना शष्प आशा दिसे।।" अशा शब्दात आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.

नेहमीप्रमाणेच मी अशा टोकाच्या विचारांबरोबर सहमत होऊ शकत नाही. माझ्या मते साक्षरतेचे प्रमाण वाढल्यामुळे शुध्द मराठी लिहिण्या वाचण्याच्या बाबतीत प्रचंड वाढ झालेली आहे. जीवनशैलीत होत असलेल्या बदलांमुळे कांही परभाषी शब्द रोजच्या वापरात आले तर त्यामुळे आपली भाषा अधिक समृध्द होते, ती भ्रष्ट किंवा नष्ट होत नाही. ज्या इंग्रजीच्या नांवाने सारखे खडे फोडले जातात तिच्यात रोज असंख्य नवनव्या शब्दांची भर पडते आहे. संत ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी बोलीभाषा संत तुकारामाच्या काळात नव्हती आणि संत तुकारामांनी वापरलेली भाषा आजकाल प्रचलित असलेल्या व्याकरणाला धरून नाही. काळाबरोबर असे बदल होत जातातच. आजकाल जीवनचर्येतला बदल फार झपाट्याने होत आहे, त्यामुळे भाषेत होणारा बदल लगेच जाणवतो एवढेच. मला तर त्याबद्दल फारशी काळजी वाटत नाही.

'आठवणीतली गाणी'च्या सौजन्याने माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे. निदान कांही अंशाने त्यातल्या आकांक्षा पूर्ण होतील अशी मला आशा वाटते.
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।
न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

माधव ज्यूलियन

Monday, April 27, 2009

ग्रँड युरोप - भाग ९ : इटलीचा ग्रामीण भाग


दि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : इटलीचा ग्रामीण भाग


इटालियन भाषेतील 'रोमा' ते 'पिसा' आणि 'पिसा' ते 'फिरेंझे'पर्यंत प्रवास करतांना आम्ही दिवसभर त्यांच्या 'कंट्रीसाईड' मधून म्हणजेच ग्रामीण भागातून जात होतो. शहरातल्यासारखेच सरळ व रुंद पक्के रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, करमणुकीची व खेळाची साधने इत्यादी सगळे कांही युरोपातील खेड्यांमध्येही उपलब्ध असते, तेथील घरेसुद्धा आकाराने कदाचित लहान असतील, संख्येने नक्कीच कमी असतील पण ती सर्व सुखसोयींनी युक्त पक्की घरे असतात, तिथे कुठेही झोपड्या, अस्ताव्यस्तपणा, कच-याचे ढीग वगैरे दिसत नाहीत हे सगळे मी वीस बावीस वर्षापूर्वीच पाहिले होते. आता शहरात गगनचुंबी इमारतींची संख्या बरीच वाढली आहे, वाहतूक तर बेसुमार वाढली आहे व तिला तोंड देण्यासाठी जागोजागी उड्डाणपूल नाहीतर भुयारी मार्ग बनवले गेले आहेत एवढाच फरक मधल्या दोन दशकात पडला आहे.
आपल्याकडे परंपरागत परकर पोलके, घाघरा चोली, सलवार कमीज, नऊ वार लुगडी, सहा वार साड्या, त्यातही उलटे सुलटे पदर घेण्याच्या पद्धती आणि आधुनिक फ्रॉक, स्कर्ट, जीन्स, टॉप्स वगैरेचे वैविध्य असल्याने लोकांच्या समूहाकडे पाहून आपण कुठे आहोत याचा अंदाज बांधता येतो. युरोपमध्ये मात्र शहरात व खेड्यात राहणा-या लोकांच्या पोशाखात जाणवण्याजोगा फरक तेंव्हाही नव्हता व आताही नसावा. नसावा म्हणण्याचे कारण एवढेच की या वेळेस मला खेड्यातली माणसे कुठे दिसलीच नाहीत. शहरात फिरतांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, पर्यटनस्थळ अशा जागी मोठ्या संख्येने माणसांचे दर्शन घडत असे, पण ग्रामीण भागातील हायवेवरून आमची बस जात असतांना तेथील रस्त्यांवरून पायी चालतांना कोणी दिसतच नव्हते. सगळे लोक आपापल्या कारमधूनच हिंडत असणार आणि शेतात गेले तर ट्रॅक्टरवर स्वार होत असतील. उन्हातान्हात काबाडकष्ट करून आपल्या घामाच्या धारांनी जमीनीचे सिंचन करणारा शेतकरी तिकडे आता अदृष्यच झाला असावा. जितकी शेती दिसली ती सगळी यांत्रिक
पद्धतीनेच केली जात होती. जणु कांही ते धान्य पिकवण्याचे कारखानेच असावेत असे वाटते. शेतांमधून यंत्रांना फिरवणे सोपे जावे यासाठी सरळ रेषेमधील बांध वा कुंपणे
घालून चौरस वा आयताकृती आकाराची शेते केलेली होती. त्यात मध्ये कडमडणारी झाडे नव्हती. झाडांझुडुपांसाठी वेगळे प्लॉट ठेवलेले होते. इटलीमध्येच काय, पण युरोपभरात कोठेही बैल किंवा घोडा जोडलेला नांगर किंवा गाडी दिसली नाही. शेतात काम करणारी माणसेसुद्धा क्वचितच दिसली. ट्रॅक्टरच्या वापराने सगळी कामे फारच वेगाने होत असल्यामुळे त्यांना दिवसरात्र राबण्याची गरज पडत नसावी. ज्या शेतांमध्ये कापणी झालेली होती त्यात प्लॅस्टिकच्या मोठमोठ्या रोलमध्ये कांहीतरी भरून ठेवलेले
दिसत होते, तो बहुधा चारा असावा. हार्वेस्टरमधून निघालेले धान्य सरळ कोठारात भरले जाते. कुठेच कसलीही उघडी रास किंवा ढीग दिसत नव्हता.
इटलीमधील हमरस्त्यावरून जातांना दोन्ही बाजूला सुंदर दृष्य होते. इटली हा डोंगराळ प्रदेश असल्याने तेथे नजर पोचेपर्यंत पसरलेली विस्तीर्ण शेते फारशी नव्हती. लागवडीखाली आणलेल्या जमीनीइतकाच भाग जंगलांनी व्यापलेला दिसत होता. त्यात कांही नैसर्गिक वनराई होती तर कांही जागी एकाच प्रकारची झाडे रांगांमध्ये दिसत होती. डोंगर असो वा सपाट प्रदेश, सगळा हिरवा गर्द होता. त्यात आपल्याकडच्या वड, पिंपळ, निंब, आंबा यासारखे डेरेदार वृक्ष नव्हते. बहुतेक सगळी पाईनसारखी उभी झाडे होती. त्यातली कांही ख्रिसमस ट्रीप्रमाणे खाली रुंद व वर निमूळती होत जाणारी होती तर कांही एखाद्या छत्रीच्या आकाराची म्हणजे खाली उभा उंच दांडा व वर पानांनी गच्च भरलेला अर्धगोल अशी होती. जमीनीवर ताठ उंच वाढणारे तुरेदार गवत नव्हते, तर हरळीप्रमाणे आडव्या पसरत जाणा-या वनस्पती होत्या. त्यामुळे सगळीकडे गालिचे पसरून ठेवल्यासारखे वाटत होते. वसंत ऋतु सुरू होऊन गेलेला होता. सगळीकडे नवी तजेलदार पालवी फुटलेली होती तसेच फुले बहरली होती. वीस पंचवीस छोट्या छोट्या पाकळ्या असलेली दुरून शेवंतीसारखी भासणारी अगणित पिवळी फुले आणि बटमोग-यासारखी दिसणारी असंख्य पांढरी फुले या गालिचांना सजवीत होती.
हायवेवर कुठेही कसलाही अडसर नव्हता. त्याला छेद देणारे रस्ते पुलावरून किंवा जमीनीखालील बोगद्यामधून जात. ते येणार असल्याची सूचना देणारे फलक आधीपासून दिसू लागत व तो पाहून चालकाने आपली गाडी बाजूला काढायची. अशी व्यवस्था आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिसते. मार्गात अनेक ठिकाणी टोल द्यावा लागतो, पण त्यासाठी गाडी थांबवावी लागत नाही. तिथे ठेवलेला स्कॅनर चालत्या गाडीची नोंद करून तो टोल तत्काल त्या गाडीच्या मालकाच्या बँकेतील खात्यातून परस्पर वसूल करतो. एखाद्या गाडीच्या बाबतीत कांही अडचण आलीच तर रस्त्यावरील बॅरियर आडवा करून ती थांबवली जाते, पण असे क्वचितच घडते कारण त्यासाठी जबरदस्त भुर्दंड पडतो.
दर दोन तासानंतर चालकाने दहा पंधरा मिनिटे विश्रांती घेणे सक्तीचे आहे. त्यासाठी जागोजागी हायवेच्या बाजूला उपरस्त्यांवर विश्रामगृहे आहेत. पेट्रोल पंप, किरकोळ दुकान, अल्पोपाहारगृह आणि स्वच्छतागृह हे सगळे या ठिकाणी एकत्र असतात. अशी सुविधाकेन्द्रे आता भारतातसुद्धा दिसायला लागली आहेत. युरोपमधील टॉयलेट्स मात्र अत्यंत स्वच्छ ठेवलेली असतात. अनेक ठिकाणी प्रत्येक उपयोगानंतर ती स्वच्छ करणारी यांत्रिक उपकरणे होती. नळाच्या तोट्यांना पाणी असते व त्यानंतर हांत कोरडे करण्याची
व्यवस्था असते. यासाठी कोठेही हस्तस्पर्श करण्याची गरज नसते. नळाखाली हांत धरला की आपोआप त्यातून पाणी पडते आणि हांत सुकवण्याच्या यंत्राखाली हांत धरला की त्यातून ऊष्ण हवेचा झोत येतो. अशा प्रकारची यंत्रे आपल्याकडे पंचतारांकित हॉटेलांत किंवा अत्याधुनिक कार्यालयात दिसतात. तिथे ती आम जनतेसाठी आहेत.
ही सगळी यंत्रे आणि उपकरणे बसवण्यासाठी व त्याची निगा राखण्यासाठी खर्च येणारच. या सोयींचा वापर करणा-या लोकांकडूनच तो वसूल केला जातो. त्यामुळे बहुतेक जागी तिथे प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशमूल्य आकारले जाते व ते गोळा करण्यासाठी स्वयंचलित यंत्रे बसवलेली असतात. त्यात नाणे टाकल्यावर दारामधले चक्र फिरून एका व्यक्तीला आत जाऊ देते. भारतासारख्या देशातून आलेल्या लोकांना नैसर्गिक विधीसाठी असे पैसे खर्च करणे जिवावर येते. असाच एक भारतीय पर्यटकांचा समूह युरोप पहायला आला होता. भ्रमंतीला सुरुवात करतांनाच त्यांच्या मार्गदर्शकाने आता वाटेत सगळीकडे 'पेड टॉयलेट्स' असणार आहेत असे सांगितले. पहिला थांबा आल्यावर तो खाली उतरून विश्रामगृहात गेला व बरेचसे प्रवासी त्याच्या मागोमाग गेले. मागच्या बाजूला बसलेले एक बूढे बाबा थोड्या वेळानंतर उतरले व विश्रांतीगृहाच्या विरुद्ध दिशेला गेले. दहा पंधरा मिनिटांनी बाकीचे सारे प्रवासी आपापले विधी, खाणेपिणे, खरेदी वगैरे आटोपून परत आले तरी बाबांचा पत्ताच नव्हता. अखेरीस एकदाचे ते धांपा टाकीत आले
आणि म्हणाले, "अरे तुमने तो बोला की यहॉंपर सभी जगहापर पेड टॉयलेट हैं, मगर मुझे पेड ढूँढनेमें कितनी तकलीफ हुई? तुम सब लोग कहॉं गये थे?"
. . . . . . . (क्रमशः)

Sunday, April 26, 2009

ग्रँड युरोप - भाग ८ : पिसा ते फ्लॉरेन्स


दि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : पिसा ते फ्लॉरेन्स


पिसा येथील मनो-याच्या तिरकसपणाला इतके अवास्तव महत्व दिले गेले आहे की त्याच्या वास्तुशिल्पाच्या सौंदर्याकडे कोणाचे जायला पाहिजे तितके लक्षच जात नाही. संपूर्णपणे पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडांनी हा मनोरा मढवलेला आहे. त्यात ठराविक जागी काळ्या रंगाच्या संगमरवराचे तुकडे बसवून सुंदर कलाकृतींची रंगसंगति साधलेली आहे. कलात्मक व प्रमाणबद्ध कमानी आणि स्तंभ यांनी युक्त असे वर्तुळाकृती सज्जे, त्यावर लावलेल्या कलाकुसर केलेल्या झालरी, आकर्षक चौकोनी जाळीदार गवाक्षे वगैरेमुळे ते एक मनोहारी वास्तुशिल्प आहे. हा मनोरा सरळ रेषेत उभा राहिला असता तरीसुद्धा तो पहायला रसिक पर्यटकांनी गर्दी केली असती. पण केवळ कलता मनोरा म्हणूनच तो प्रसिद्धीला आला आहे.


याच्या वाकडेपणाचे भांडवल करून प्रचंड व्यापार होतो व त्यावर आधारलेला व्यवसायच उभा राहिला आहे. इथे येणा-या पर्यटकांना स्मरणचिन्हे विकणा-या दुकांनांच्या लांबच लांब रांगा आहेत. त्यात संगमरवरापासून तसेच कांच, चिनी माती, लाकूड व अनेक प्रकारच्या धातूंमध्ये बनवलेल्या मनो-याच्या विविध आकारमानाच्या प्रतिकृती आहेत. अगदी मुठीत मावतील इतक्या छोट्या मॉडेलपासून ते पुरुषभराहूनही उंच अशा आकृती येथे मिळतील. त्याखेरीज की चेन, वॉल हँगिंग्ज, टेबल लँप, टी शर्ट यासारखे सर्वसामान्य प्रकार तर आहेतच, पण मनो-यासारख्या वाकड्या आकाराच्या कपबशा, तिरकस कॉफी मग, वाकडे मद्याचे प्याले, टेढ्यामेढ्या बाटल्या, तशाच विचित्र आकाराच्या पिशव्या, इतकेच काय पण त्या आकाराची मूठ असलेल्या छत्र्यासुद्धा दिसल्या. कलाकारांच्या कल्पकतेला मर्यादा नसते म्हणतात, पण इतर कोठल्याही व्यंगाचा एवढा मोठा व्यापार होत असण्याची शक्यता कमी आहे.
या तिरकसपणाबद्दल एक तिरकस किस्सा ऐकायला मिळाला. उन्हाने लालबुंद झालेले गोरे, अंधाराहून काळेकुट्ट हबशी, गहूवर्णी, पीतवर्णी वगैरे सगळ्या वंशाचे प्रवासी लोक या जागी आवर्जून आलेले तर दिसतातच, पण त्यात कांही उणीव राहू नये यासाठी जगभरातले भामटेगिरी आणि उचलेगिरी करणारेसुद्धा इकडे येऊन आपले कसब दाखवून नशीब आजमावून पहातात. अशाच एका शर्विलकाने तेथील गर्दीचा फायदा घेऊन दुस-या एका पर्यटकाचा खिसा कापला. पण त्याच्या हातात युरो किंवा डॉलर्सच्या नोटांनी भरलेले पाकीट पडण्याऐवजी कसल्याशा भलत्याच प्रकारच्या उत्तेजक द्रव्याचे पाकीट पडले. निराशेच्या भरात त्याने ते भिरकावून दिले आणि ते मनो-याच्या पायथ्यापाशी पडले. त्यानंतर पावसाची एक सर आली व त्यातील पदार्थ भिजून जमीनीत पसरला. त्याचा परिणाम असा झाला की कलता मनोरा ताठ उभा राहिला! अर्थातच त्याचा असर थोड्याच वेळात उतरला.
पिसाला पोचेपर्यंत जेवणाची वेळ झालेलीच होती. या ठिकाणी भारतीय पद्धतीचे जेवण मिळेल याची मला सुतराम कल्पना नव्हती, कारण आजूबाजूला दिसत असलेली एकूण एक हॉटेले पाश्चात्य पद्धतीचीच दिसत होती. फार तर एखाद दुसरे चायनीज होते एवढेच. पण आमच्या मार्गदर्शकाने एका लांबलचक गल्लीच्या दुस-या टोकाला असलेले एक भारतीय भोजनगृह शोधून काढून तिथे आमच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. आम्ही तिथे जाऊन पोचलो तोपर्यंत विवेकच्या नेतृत्वाखालील केसरीचाच दुसरा ग्रुपही जेवण करून तेथून बाहेर पडण्याच्या तयारीत होता. परदेशातील असल्या आडगांवी येऊन भारतीय पद्धतीचे भोजन पुरवणा-या त्या उद्योजकाचे आधी कौतुक वाटले, पण ते खाणारे बहुतेक सगळे भारतीय पर्यटकच होते हे पाहिल्यानंतर या उद्योजकांनी आणखी प्रगती करून भारतीय पद्धतीच्या खान्याला आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवले पाहिजेत असे वाटले. युरोपमध्ये बहुतेक ठिकाणी मोक्याच्या जागांवर चायनीज हॉटेलांचे फलक लावलेले दिसले तसे भारतीय दिसले नाहीत. इंग्लंडमधील परिस्थिती जरा वेगळी आहे. तिथे अनेक जागी इंडियन फूड देणारी रेस्टॉरेंट्स दिसतात, पण त्यातील बरेच जागी प्रत्यक्षात पाकिस्तानी किंवा बांगलादेशी लोक ती चालवत असलेले दिसते. कदाचित पाश्चात्यांना हवे तसे मांसाहारी पदार्थ पुरवण्यात भारतीयांचे कौशल्य कमी पडत असावे.
पिसाच्या मिरॅकल चौकातील चमत्कृती पाहून व स्मरणचिन्हे खरेदी करून झाल्यावर तेथून निघालो तो पुढच्या मुक्कामाला फ्लॉरेन्स (फिरेंझे) या गांवी पोचलो. आधी थेट एका उंच टेकडीवरील मीकेलँजिलो पॉइंटवर गेलो. या ठिकाणी डेव्हिडचा पाच मीटर उंच असा भव्य पुतळा ही मीकेलँजिलो याची सुप्रसिद्ध शिल्पकृती एका उंच चबुत-यावर उभारलेली आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क येथील स्वातंत्र्यदेवतेच्या मूर्तीनंतर कदाचित डेव्हिड हाच जगातील सर्वाधिक प्रसिद्ध पुतळा असेल. हा पुतळा देखील एका मोकळ्या मैदानाच्या मधोमध उघड्या जागेवर ठेवला आहे. यापूर्वी पाहिलेली मीकेलँजिलोने बनवलेली पियाटा ही शिल्पकृती सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये बंदिस्त जागेत जपून ठेवलेली होती.
पाश्चात्य पुराणातील डेव्हिड हा कथानायक त्याने अवाढव्य अंगाच्या गोलियाथ या दुष्टाला मारल्याबद्दल प्रसिद्ध आहे. आपल्याकडे राक्षसाच्या उरात त्रिशूल रोवून उभ्या ठाकलेल्या महिषासुरमर्दिनी दुर्गामातेची प्रतिमा असते त्याप्रमाणेच खाली कोसळलेल्या गोलियाथच्या महाकाय देहाजवळ हांतात तलवार धरून विजयी मुद्रेने उभ्या असलेल्या डेव्हिडचा पुतळा बनवण्याची पद्धत प्राचीन काळात तिकडे होती. पण मीकेलँजिलोने तसे केले नाही. महापराक्रमी पुरुषाची आकृती घडवतांना त्याला भरपूर दाढीमिशा, अंगभर वाढलेले केस, अतिशयच पिळदार मांसल हात पाय, विक्राळ चेहेरा वगैरेनी युक्त असा एक राकटपणा त्याच्या व्यक्तिमत्वात पूर्वीच्या काळी दाखवला जात असे. मीकेलँजिलोने या सगळ्या परंपरा सोडून देऊन डेव्हिडला एक आगळेच नवीन रूप दिले. सौष्ठवपूर्ण शरीरयष्टी, मोहक व गुळगुळीत चेहरा, त्यावर दृढनिश्चयाचे भाव वगैरे आणून एक अजरामर कलाकृती त्याने निर्माण केली आहे. मोजून पहायला गेले तर त्याच्या डोके व छातीचा भाग पायांच्या मानाने मानवी देहाच्या सर्वसामान्य प्रमाणापेक्षा मोठा आहे. तो इतरांपेक्षा अधिक बुद्धीमान व शक्तीशाली होता असे यातून दाखवायचे असेल असा तर्क कोणी करतात, तर उभा असलेला पुतळा पायथ्यावरून पहातांना तो प्रमाणबद्ध दिसावा अशी त्याची योजना केली आहे असे कांहीजणांना वाटते.
या शिल्पामागेसुद्धा मोठा इतिहास आहे. मीकेलँजिलोच्या जन्माच्याही दहा अकरा वर्षे आधी प्रसिद्ध शिल्पकार डोनॅटेलो याचा सहाय्यक अगोस्तिनो यांने सुरुवात करून थोडासा पायांचा भाग बनवला आणि दोन पायांच्या मधल्या जागेत एक भोक पाडून ठेवले. त्यानंतर हे काम बंद पडले. हे शिल्प कोणी पूर्ण करायचे यावर फ्लॉरेन्सवासियांत मतभेद होते. त्यात पस्तीस वर्षे गेली. त्यासाठी लिओनार्दो दा विंची आदि तत्कालिन दिग्गज शिल्पकारांना विचारून झाल्यावर अखेरीस मीकेलँजिलो या स्थानिक तरुण कलाकाराची निवड झाली. त्याने तब्बल तीन वर्षे हातात छिनी घेऊन संगमरवराचा तो अर्धवट तोडून ठेवलेला विचित्र आकाराचा प्रचंड प्रस्तर फोडून काढला व त्यातून हे अद्वितीय शिल्प घडवले.
हा पुतळा बनवण्यापूर्वी तो तेथील कॅथेड्रलच्या समोर उभा करण्याचा विचार होता. पण त्याचे रूप पाहून तो दुसरीकडे ठेवला गेला. त्या काळी त्याच्या लज्जारक्षणासाठी एक ब्रॉंझचा कंबरपट्टा त्याला नेसवला होता असे म्हणतात. या पुतळ्याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. कोणीतरी मीकेलँजिलोला विचारले की "हा इतका प्रचंड पुतळा तू नेमका कसा बनवलास? त्यासाठी कुठून सुरुवात करायची व कसे खोदत जायचे हे कसे ठरवलेस?" त्यावर मीकेलँजिलो शांतपणे म्हणाला, "अहो त्या दगडात दडलेला हा पुतळा मला दिसतच होता. मी फक्त त्याच्या आजूबाजूला असलेला दगडाचा अवांतर भाग काढून बाजूला केला."
या टेकडीवरून फ्लॉरेन्स शहराचे विहंगम दृष्य दिसते. हे एक ऐतिहासिक शहर आहे. मध्ययुगीन युरोपची ते सांस्कृतिक राजधानी होते असे म्हणता येईल इतके प्रसिद्ध कलाकार या शहराने जगाला दिले आहेत. अनेक वर्षे इटलीच्या या भागाची राजधानी इथे होती. इथेही कांही पुरातन सुंदर इमारती, कॅथेड्रल वगैरे आहेत, पण ती पाहण्याएवढा वेळ आमच्याकडे नव्हता. शिवाय दोन दिवसांपासून रोममध्ये तशाच प्रकारच्या जगप्रसिद्ध इमारती पहात फिरत होतो. त्यामुळे फ्लॉरेन्सचे दुरूनच दर्शन घेण्यात समाधान मानून घेतले.

Friday, April 24, 2009

ग्रँड युरोप - भाग ७ : पिसा येथील कलता मनोरा


दि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : पिसा येथील कलता मनोरा

दोन दिवस रोमचे रोमहर्षक दर्शन घेतल्यानंतर तिस-या दिवशी आमचे युरोपमधील खरे भ्रमण सुरू झाले. त्यासाठी सगळेच जण उत्साहाने लवकर उठून तयार झाले. पुढील चार दिवस रोज थोडा प्रवास व थोडे पहाणे होते. त्यातील तीन दिवस रोज प्रवास केल्यानंतर मुक्कामाला एका वेगळ्या हॉटेलात जायचे होते. त्यासाठी सगळ्या सामानाची उचलाउचली आणि हलवाहलवी टाळायची असेल तर चार दिवसापुरते कपडे व आवश्यक वस्तू एका लहान बॅगेत वेगळ्या ठेऊन इतर सामान, विशेषतः न लागणारे जाडजूड लोकरीचे कपडे वगैरे मोठ्या बॅगेत ठेवावेत आणि ती बॅग बसमध्येच राहू द्यावी अशी कल्पना निघाली. त्यानुसार सामानाची जमवाजमव करून ते बसच्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवण्यात आले.

रोम ते पिसा हा चांगला चार पांच तासांचा प्रवास होता. या वेळाचा उपयोग करून घेण्यासाठी कांही कार्यक्रम पाहिजे. सदस्यांच्या औपचारिक ओळखींच्या कार्यक्रमाने सुरुवात केली. तशा पहिल्या दोन दिवसात आमच्या सर्वांशी अनौपचारिक ओळखी झाल्याच होत्या, पण आता आसन क्रमांकाप्रमाणे एकेकाने समोर येऊन आपली थोडक्यात ओळख करून द्यायची, त्यात नांव, गांव, व्यवसाय, आवडी निवडी, गुणविशेष वगैरे सांगायचे होते. त्याप्रमाणे सर्वांनी आपापली माहिती सांगितली.

आमच्या बत्तीस जणांच्या समूहात तेरा पतिपत्नींची जोडपी होती. गंमत म्हणजे त्यातील एकानेही आपल्या मुलांना सोबत आणलेले नव्हते. कांही जणांची मुले मोठी होऊन त्यांनी आपापले संसार थाटलेले होते तर कांही जणांनी आपल्या शाळा कॉलेजात जाणा-या मुलांना घरी किंवा कोणा आप्तांकडे ठेवले होते. उरलेल्या सहा जणापैकी एक पितापुत्रांची जोडी होती व दोन वयस्कर मैत्रिणींची एक जोडी होती आणि फक्त दोन सद्गृहस्थ एकेकटे आलेले होते. केसरीने या सहलीपुरती त्या दोघांची एक जोडी बनवून दिली.

पुरुष वर्गातील पाच सहा लोक नोकरी करून सेवानिवृत्त झालेले होते व बाकीचे सर्वजण व्यावसाय़िक होते. त्यात कोणी चार्टर्ड अकौंटंट, कॉंट्रॅक्टर, लघु उद्योजक, व्यापारी वगैरे होते. एक डॉक्टर पतिपत्नी व एक दंतवैद्य होते. डॉक्टरीणबाई सोडल्यास महिलावर्गातील इतर बहुतेकजणी मुख्यतः गृहकाम करणा-या होत्या, पण त्यातल्या बरेच जणी पतीच्या व्यवसायात त्याला हातभारसुद्धा लावीत होत्या तर कोणी संगीत, कला वगैरेची साधना करणे व शिकवणे यांत मग्न होत्या. अद्वैत हा एकटाच अजून विद्यार्थीदशेत होता आणि ठराविक चाकोरीबद्ध नोकरी करणारे असे बहुधा कोणी नव्हतेच. अर्थातच याला प्रातिनिधिक समूह म्हणता येणार नाही कारण त्याच सहलीमध्ये सगळीकडे आमच्या बरोबरच येत असलेल्या केसरीच्या दुस-या ग्रुपमध्ये कांही निराळ्या प्रकारचे लोक व अगदी कडेवरच्या बाळापासून ते शालेय शिक्षण घेणारी वेगवेगळ्या वयातली मुले होती. आमच्या ग्रुपमधील लोकांच्या वैशिष्ट्यांबद्दलची माहिती हळूहळू पुढे येईल.

दुपार होईपर्यंत आमची बस पिसाला पोचली. पिसा या आधुनिक काळातील शहरापासून थोडेसे दूर प्राचीन काळातील 'स्क्वेअर ऑफ मिरॅकल' आहे. या ठिकाणी बॅप्टिस्ट्री, कॅथेड्रल व लीनिंग टॉवर या तीन प्रमुख इमारती आहेत. बॅप्टिस्ट्रीमध्ये ख्रिस्ती धर्माची संथा दिली जाते, कॅथेड्रलमध्ये नेहमीच्या प्रार्थनाविधी होतात आणि टॉवर हा मुख्यतः घंटाघर म्हणून बांधला गेला. सर्वसामान्यपणे चर्चमध्येच उंचावर किंवा शिखरावर घंटा बांधलेली असते, पण आपल्या समृध्दीचे प्रदर्शन करण्यासाठी म्हणा किंवा दूरवरचे निरीक्षण करता यावे यासाठी स्वतंत्र घंटामीनार (बेलटॉवर) बनवायचे पिसावासियांनी ठरवले व इसवीसन ११७३ साली या बांधकामाला सुरुवात झाली. लढाया व अशांत परिस्थिती यामुळे सुरुवातीपासूनच हे काम रेंगाळत चालत होते. सुमारे दहा वर्षांमध्ये पहिले तीन मजले बांधून झाले. पण एका बाजूचा पाया कच्चा राहिल्यामुळे ते त्या बाजूस खचत चालले असल्याचे त्या वेळेसच लक्षात आले व काम थांबवण्यात आले. ते कधी कोसळेल याचा नेम नाही असे वाटत असल्यामुळे जवळ जवळ शंभर वर्षे तसेच पडून राहिले होते. तिसरा मजलासुद्धा तोंवर पूर्ण बांधला गेला नव्हता.

इसवी सन १२७५ साली एका नव्या वास्तुशिल्पशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली बांधकामाला पुनश्च सुरुवात झाली. खचलेला पाया दुरुस्त करणे त्याला शक्य नव्हते, पण गेल्या शंभर वर्षात तो फारसा अधिकाधिक खचत गेला नव्हता की ती इमारत कोसळली नव्हती हे महत्वाचे होते. या आधारावर पुढील बांधकाम हातात घेण्यात आले. तिरप्या झालेल्या इमारतीच्या मजल्यावरील जमीन शक्य तेवढी समतल रहावी या दृष्टीने नवीन मजले बांधतांना मुद्दामच प्रत्येक मजल्याची एक बाजू दुसरीपेक्षा थोडी अधिक उंचीची बांधण्यात आली. यामुळे हा टॉवर नुसता कललेलाच नव्हे तर थोडासा वक्राकारसुद्धा झाला आहे. सहावा मजला बांधल्यावर हे काम पुन्हा बंद पडले. त्यामुळे सातवा मजला सन १३१९ मध्ये पुरा झाला आणि त्याच्या मस्तकावरील घंटागृह तर सन १३५० मध्ये. अशा रीतीने या इमारतीचे बांधकाम तब्बल पावणे दोनशेहे वर्षे चालले होते. त्यानंतरही वेळोवेळी त्यावर किंवा त्याच्या पायाखाली कधी शिसे तर कधी कॉंक्रीट लादून त्याचा कलणारा तोल सांवरण्याचे प्रयत्न होतच राहिले.

अलीकडच्या काळात पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षिततेचा पूर्ण अभ्यास करून कांही भूमीगत सुधारणा तसेच त्याची संपूर्ण साफसफाई व डागडुजी करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाने कदाचित त्याला सरळसुद्धा करता येईल, पण मग तो पहायला कोण येणार व त्या निमित्ताने येणा-या पर्यटकांवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेचे काय होईल? सुमारे छप्पन मीटर उंचीच्या या मनो-याचा बाहेरील व्यास तळापाशी साडेपंधरा मीटर एवढा आहे तसेच भिंतीची जाडी सुमारे अडीच मीटर इतकी आहे. जसजसे आपण वर जाऊ तसतसा त्याचा व्यास तसेच भिंतीची जाडी कमी होत जाते. सध्या तो सरळ उभ्या रेषेशी साडेपांच अंशाचा कोन करून उभा आहे व त्याचे शिखर पायापासून साडेचार मीटर एका बाजूला ढळलेले आहे. पण हा आंकडा गेल्या आठशेहे वर्षात वेळोवेळी मोजला गेला व वेगवेगळा मिळाला. वरपर्यंत चढण्यासाठी आंतून जिना आहे, त्याला २९४ पाय-या आहेत. इतक्या पाय-या चढण्या व उतरण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता.

या टॉवरवरून लहान व मोठ्या आकाराचे गोळे खाली टाकून ते एकाच वेगाने जमीनीवर पोचतात असे गॅलीलिओने दाखवून दिले होते असे म्हणतात, पण या गोष्टीला कांही पुरावा नाही असेही मत मांडले जाते. कांही असले तरी गॅलीलिओच्या या निरीक्षणाचा चांगला उपयोग त्याच्या नंतर आलेल्या आयझॅक न्यूटनने करून घेतला व त्याचे पर्यवसान अखेरीस गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतात होऊन विज्ञानाच्या अभ्यासालाच त्यातून एक नवीन दिशा मिळाली एवढे खरे.

या कलत्या टॉवरच्या शेजारी असलेल्या दोन्ही इमारतीसुद्धा तत्कालिन वास्तुशिल्पकलेचे उत्तम नमूने म्हणून पाहण्याजोग्या आहेत आणि हा प्रशस्त असा परिसरच पर्यटकांचे नंदनवन म्हणता येईल इतका विकसित केला गेलेला आहे. जगभरातील सर्व खंडातले वेगवेगळ्या वंशाचे, रंगाचे आणि भाषा बोलणारे पर्यटक इथे हिंडतांना दिसत होते.
पिसाच्या मनो-याला इतकी प्रसिद्धी मिळाली की वेळोवेळी त्याचा उल्लेख वाङ्मयामध्येही होत गेला तसेच त्याच्यावर आधारलेले विनोद रचले गेले. असाच एक नमूना इथे देत आहे.
प्रश्न: बिग बेन पिसाच्या मनो-याला काय म्हणाला असेल?

उत्तर: तुझा कल असेल तर माझ्याकडे वेळ आहे.(If you have the inclination, I have got Time.)