Saturday, May 02, 2009

ग्रँड युरोप - भाग १० : व्हेनिसची सफर
दि.१९-०४-२००७ चौथा दिवस : व्हेनिसची सफरफ्लॉरेंन्सहून व्हेनिसपर्यंत पुन्हा बसने चार तासांचा प्रवास आहे. त्यासाठी चांगला पोटभर नाश्ता घेऊन तयार झालो. युरोपमध्ये सगळीकडे कॉंटिनेंटल ब्रेकफास्ट मिळत होता. त्यात दोन तीन प्रकारचे फळांचे रस असायचे, शिवाय कांही कांही जागी सफरचंद, मोसंबी, पियर, केळी अशी ताजी फळे मिळायची. दुधाबरोबर खाण्याचे कॉर्न फ्लेक्स व तशासारखेच गहू, ओट वगैरे धान्यांचे पदार्थ असायचे. ब्रेड, टोस्ट, क्रॉइसॉं, मुफिन्स. केक वगैरेचे निरनिराळे प्रकार असायचे व त्यांना लावण्यासाठी लोणी, चीज, जॅम्स व मध ठेवीत असत. नॉन व्हेज खाणा-यासाठी स्क्रँबल्ड एग, पॅन केक, सलामी व सॉसेजेस मिळायची. अशा प्रकारे ब-यापैकी विविधता असल्यामुळे "भारतातल्यासारखे चमचमीत कांही इथे खायला मिळत नाही" अशी कुरकुर करीतसुद्धा सगळेजण व्यवस्थित न्याहारी करून घेत होते.
बसच्या खिडकीतून आजूबाजूचे इटलीच्या ग्रामीण भागातील सृष्टीसौंदर्य पहात होतो. एप्रिल मे महिन्यांच्या दिवसात आपल्याकडील शेतातसुध्दा गहू किंवा भात नसतोच. तिथेही दिसला नाही. बहुतेक शेतांमध्ये कसल्यातरी कडधान्याची किंवा तेलबियांची लागवड केल्यासारखे दिसत होते. अनेक ठिकाणी त्याला फुलोरा आल्याने संपूर्ण शेत पिवळे धम्मक दिसायचे. ते खूपच मोहक वाटायचे. कित्येक जागी द्राक्षांचे मळे लावलेले होते तर कांही जागी अवाढव्य आकाराची ग्रीन हाउसेस दिसत होती. मध्येच असे एखादे
अनोखे कांहीतरी दिसले की एकमेकांना ते दाखवायचे. कांहीजण लगेच कॅमेरे सरसावून त्याचे फोटो काढायचे किंवा व्हीडिओ रेकॉर्डिंग करायचे.

भूक लागली म्हणून नसली तरी तोंड चाळवण्यासाठी अधून मधून फराळाच्या सामानाची पाकिटे पिशवीच्या बाहेर निघत. केसरीतर्फे सगळ्यांना छोट्या छोट्या पाकिटात भरून चांगला घसघशीत खाऊ मिळाला होताच, शिवाय कित्येक लोकांनी आपापल्या खास आवडीच्या खाद्यवस्तू बरोबर आणल्या होत्या. एक पाकिट फोडले की आपण त्यातील थोडे खाऊन शेजारच्याला चवीसाठी देऊन ते संपवून टाकायचे असे चालले होते. सांगलीच्या मंडळींनी तिकडची खास रुचकर भडंग आणली होती, ती तर पहाता पहाता फस्त झाली.

दुपार होईपर्यंत व्हेनिसला पोचलो. हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक शहर खरे तर समुद्रातील अनेक बेटांवर वसलेले आहे. पण त्याची आधुनिक वस्ती युरोपच्या किना-यावर पसरली आहे. किना-यावरील बंदरापर्यंत बसने जाऊन एका मोठ्या नौकेमध्ये बसून खाडीमधून व्हेनिसच्या बेटावर गेलो. हा प्रवास फारच रम्य होता. अथांग पसरलेल्या शांत पाण्यातून दूरवर व्हेनिसच्या सुंदर इमारती दिसू लागल्या व दोन्ही बाजूंनी त्या पहात पहात हळू हळू पुढे पुढे सरकत आमची नौका तेथील धक्क्याला लागली. नौकेमधून चढण्या व
उतरण्यासाढी खूपच सोयिस्कर पाय-यांची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे तोल सावरण्याची कसरत करावी लागली नाही की कोणाचा हांत धरावा लागला नाही.

धक्क्यावरून पुन्हा खाडीच्या कांठाकांठाने रस्त्याने जाताजाताच तेथील कांही सुंदर ऐतिहासिक इमारती दिसतात. 'डोगचा राजवाडा' या जागी इथला ड्यूक म्हणजे प्रमुख वास्तव्य करीत असे. त्याच्या इतमामाला साजेशी अशी ही एक सुंदर वास्तू आहे. त्यावर अनेक प्रकारची कलाकुसर करून ती सजवलेली आहे. त्याच्याच शेजारच्या इमारतीमध्ये पूर्वी बंदीखाना होता. खिडक्यासुद्धा नसलेली ती एक अंधारकोठडीच होती म्हणा! या दोन्ही इमारतींना जोडणारा एक उंच पातळीवरील पूल आहे तो 'ब्रिज ऑफ साय' किंवा 'निश्वाससेतू' या नांवाने ओळखला जातो. असल्या जीवघेण्या तुरुंगातून सुटतांना नक्कीच ते कैदी सुटकेचा उसासा टाकीत असणार!

व्हेनिस हे शहर पाण्यावरचे शहर म्हणूनच ओळखले जाते. एका काळी सगळीकडे सगळ्या इमारतींना जोडणारे कालवेच कालवे होते. तसे ते आतासुद्धा आहेत, पण एक दोन राजमार्गही आहेत. त्यावरूनच आम्ही चालत होतो. पण थोडे अंतर चालले की कालवा ओलांडणारा एक पूल येत असे. त्यावरून चढ उतार करूनच पुढे जावे लागे. इथे जवळजवळ दीडशे कालवे आहेत व त्यावर चारशे लहान लहान पूल आहेत.

पियाझा सेंट मार्को (सेंट मार्क स्क्वेअर) हे येथील प्रमुख ठिकाण आहे. कोठलेही वाहन तेथे न येणारा हा जगातील सर्वात मोठा चौक असेल. इथे आपल्याला दिसतात ती फक्त माणसे आणि कबूतरे. बहुतेक माणसे हे देशोदेशाहून आलेले पर्यटकच असतात. आम्ही गेलो त्या वेळेस तरी आशिया खंडातील लोक मोठ्या संख्येने दिसत होते. त्यात भारतीय होते तसेच चिनी वा जपानीसुद्धा खूप होते. माणसे जास्त होती की कबूतरे असा प्रश्न पडावा इतकी कबूतरे होती. त्यांना खायला घालण्यासाठी दाणे विकणारे होते
आणि ते खायला चटावलेली कबूतरे अजीबात न भिता सराईतपणे आमच्या आजूबाजूला फिरत होती व येऊन बसतसुद्धा होती.

सेंट मार्क बॅसिलिका हे येथील प्रमुख आकर्षण आहे. इतिहासकालात उभे केलेले हे चर्च अत्यंत देखणे आहे. बाहेरून त्याचे घुमट व कमानीयुक्त दर्शनी भाग जितका आकर्षक दिसतो त्याहूनही सुंदर त्याच्या आतली सजावट आहे. देशोदेशीचे विविध प्रकारचे संगमरवर व अन्य दगड आणून त्यातून याचे कलात्मक स्तंभ बनवलेले आहेत व अनेक सुंदर पुतळे या चर्चची शोभा वाढवतात. चर्चच्या समोरच ऐतिहासिक बेल टॉवर आहे. चहूकडे पाण्याने वेढलेल्या व कच्च्या जमीनीवर उभा केलेला हा उंच मनोरा कलला कसा नाही याचेच आश्चर्य वाटते. पूर्वीच्या त्या काळी कसल्या प्रकारचा पाया त्यासाठी घातला गेला असेल? बाजूच्याच इमारतीत एक क्लॉक टॉवर उभारलेला आहे. त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ पांचशे वर्षापूर्वी प्रथम बसवले होते असे म्हणतात. या घड्याळावर बारा ऐवजी चोवीस आंकडे आहेत, म्हणजे दिवसाचे चोवीस तास ते दाखवते. आंतल्या तबकडीवर बारा राशींची चिन्हे आहेत व फिरणारा तास कांटा सूर्याचे चित्र धारण करतो. आहे की नाही अफलातून? इमारतीच्या माथ्यावर 'विंग्ड लायन' (पंख लावलेला सिंह) हे येथील खास चिन्ह आहे.

सेंट मार्क स्क्वेअर ओलांडून तेथील प्रसिद्ध 'गोंडोला राईड' घेतली. एका वेळी फक्त सहा पर्यटक व एक नावाडी बसू शकतील अशा एका छोट्या नांवेत बसून एका कालव्यात शिरतात व अक्षरशः कालव्यांच्या गल्लीबोळातून जात, दोन्ही बाजूंना असलेल्या जुन्यापुराण्या इमारतीमधून वाट काढीत व वेगवेगळ्या पुलांखालून अर्धा पाऊण तास फिरवून आणतात. सिनेमा पाहातांना हा प्रकार जेवढा रोमांचकारी वाटतो तसा तो प्रत्यक्षात जाणवत नाही. एका काळी कदाचित इथे स्वच्छ निर्मळ पाणी या कालव्यामधून वहात
असेलही, पण आता मात्र त्याचा रंग पाहून व सुटलेल्या दुर्गंधाने शिसारी येते व केंव्हा एकदा आपण कालव्याच्या मुख्य प्रवाहात व थोड्या मोकळ्या जागेवर येऊ असे वाटायला लागते. वेळ घालवण्यासाठी "आम्ही वल्हव रे नाखवा हो" वगैरे गाणी म्हणून घेतली. हा प्रवास करून आल्यावर आमच्यातल्या एकाने "या गोंडोला राईडनं सगळ्यांना बरं गंडवलं!" असा कॉमेंट दिला.

. . . . . . . (क्रमशः)

No comments: