महाराष्ट्र गीत - १
उद्यापरवा महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्याने तीन जुनी महाराष्ट्रगीते सादर करीत आहे.बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
---------------------------------------------------------------
महाराष्ट्र गीत - २
दुस-या एका सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताची दोन कडवी खाली उद्धृत करीत आहे.मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।
अंजन कांचन करवंदीच्या कांटेरी देशा ।
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ।
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्थासी ।
वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।
अपर सिंधूच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या जिवलगा, महाराष्ट्र देशा ।
पाषाणाच्या देही धरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ।
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ।
मंगल वसती, जनस्थानींची श्रीरघुनाथांची ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्गासी,वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।
..... गोविंदाग्रज
-------------------------------------------------------------------
महाराष्ट्र गीत - ३
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी ।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।
भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा ।
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा ।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा ।
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी ।
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी ।
दरिद्र्याच्या उन्हात शिजला ।
निढळाच्या घामाने भिजला ।
देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।
कवि - राजा बढे
संगीत नियोजन - श्रीनिवास खळे
स्वर - शाहीर साबळे
1 comment:
dhanyavaad hi tinhi gaani ithe dilyabaddal.
karnaatakat jase rashtrgeetanantar tyanche karnaatakache gaane gaayale jaate tasech Maharashtratdekhil ya 3 geetanpaiki ekhade gaane gaayala gele pahije.
Post a Comment