Friday, May 08, 2009

ग्रँड युरोप - भाग १६ : -हाईन धबधबा


दि.२२-०४-२००७ सातवा दिवस : -हाईन धबधबा


वडूजहून निघताच लगेच स्विट्झर्लंडची सीमा पार करून त्या देशात प्रवेश झाला. सर्वात आधी त्या देशाच्या उत्तरेच्या टोकाला जवळजवळ जर्मनीच्या सरहद्दीवर असलेल्या शॅफोसन गांवाजवळील -हाईन नदीवरचा धबधबा पहायला गेलो. युरोपातील ही महत्वपूर्ण व मोठी नदी स्विट्झर्लंडमध्ये उगम पावते, लीस्टनस्टाईन व ऑस्ट्रियाला स्पर्श करून फ्रान्स व जर्मनीच्या मधून वहात जर्मनीत शिरते आणि अखेरीस हॉलंडमध्ये जाऊन उत्तर सागराला मिळते. शॅफोसन गांवाजवळ असलेला -हाईन नदीवरचा धबधबा हा युरोपमधील सर्वात मोठा धबधबा आहे. सुमारे १५० मीटर रुंद व २३ मीटर उंचीच्या या धबधब्यातून थंडीच्या दिवसात सुद्धा कमीत कमी दर सेकंदाला २५० घनमीटर इतके पाणी पडते आणि उन्हाळ्यात पडणारा पाऊस व वितळणारे बर्फ यांमुळे त्याचा प्रवाह वाढत जाऊन दर सेकंदाला ६०० घनमीटरपर्यंत जातो. आम्ही गेलो त्यावेळेस थंडी संपलेली होती व वसंत ऋतु सुरू होता. त्यामुळे नदीला ब-यापैकी पाणी होते आणि धबधब्यातून उसळी घेऊन ते खाली झेपावत होते. हा धबधबा जगप्रसिद्ध नायरा-याइतका विशाल नसला तरी भेडाघाट इथल्या नर्मदा नदीवरील धुवांधारपेक्षा मोठा होता. हे तीन्ही धबधबे रुंदीला अधिक आणि उंचीला कमी आहेत, तर गिरसप्पाचा धबधबा इतका उंच आहे की खाली पोचेपर्यंत त्याच्या पाण्याची धारच शिल्लक रहात नाही, तिचे असंख्य बारीक बारीक तुषार झालेले असतात. खाली गेल्यावर सगळीकडे धुके पसरल्यासारखे वाटते.

-हाईन धबधब्यापासून जवळच एका सोयिस्कर जागी बस थांबवली. तिथून समोर धबधबा दिसतच होता. खालच्या अंगाला नदीची रुंदी व खोली भरपूर असल्यामुळे तिचा प्रवाह संथ होतो व त्यात व्यवस्थितपणे नाव चालवता येते. यासाठी अनेक नावाडी आपल्या नौका घेऊन जय्यत सज्ज असतात, तसेच खांद्याला कॅमेरे लटकावून फिरायला आलेल्या पर्यटकांचा ओघही अव्याहत सुरू असतो. एका नावेत बसवून आम्हालाही धबधब्याच्या अगदी जवळपर्यंत नेले. तिथे पाण्यात मध्येच उभ्या असलेल्या एका मोठ्या
खडकाच्या उंच सुळक्यावर पाय-यावरून चढून जाता येते. खाली पडत असलेल्या धबधब्याचे विहंगम दृष्य तेथून वरून पाहण्याची सुंदर सोय केली आहे. धबधब्याचे पाणी जिथे खाली पडते त्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन त्याचे मनाला थक्क करणारे दृष्य अगदी समोरून तर दिसतेच.

इथली एक गंमत सांगायची झाली तर इथे भारतीय मंडळींनी चालवलेला एक फास्ट फूड स्टॉल होता आणि तिथे चक्क वडा पाव खायला मिळत होता. सोबतीला रगडा पॅटिस आणि मसाला चहा, कॉफी वगैरे तर होतेच. आठवडाभर भारताबाहेर बर्गर आणि सँडविचच्या प्रदेशात काढल्यानंतर अर्थातच सर्वांनी त्या संधीचा लाभ घेतला आणि नंतर मात्र त्यावर केलेला युरोतला खर्च रुपयात कितीला पडला याचा हिशोब केला.

-हाईन धबधबा पाहून झाल्यावर सुप्रसिद्ध झूरिक शहराला जाऊन तेथील झूरिक लेकवर गेलो. स्विट्झरलंडमध्ये सगळ्याच ठिकाणी विस्तीर्ण तलाव आहेत. सगळ्या तलावांच्या किना-यांवर पर्यटकांना फिरण्यासाठी आणि वाटल्यास पहुडण्यासाठी प्रशस्त जागा करून ठेवलेली आहे. झूरिक लेकमध्ये एक नाचणारे प्रचंड कारंजे आहे व त्यावर सोडलेल्या प्रकाशझोतातून इंद्रधनुष्य दिसते. एक मोठा सिंहाचा पुतळादेखील तेथील शोभेत भर टाकतो. संध्याकाळच्या वेळी झूरिक लेकच्या किना-यावर फिरणा-यांनी चांगली गर्दी केली होती. कांही प्रेमी युगुले बघ्यांची पर्वा न करता आपल्यातच धुंद झालेली होती. तिथे कुणाला त्याचे कांही वाटत नाही. थोडे फिरून व फोटो वगैरे काढून झाल्यावर आम्ही रात्रीच्या मुक्कामाला ल्यूसर्न या गांवाला गेलो.
. . . . . . . (क्रमशः)

No comments: