Wednesday, May 06, 2009

ग्रँड युरोप - भाग १४ : साल्झबर्ग


दि।२१-०४-२००७ सहावा दिवस : साल्झबर्ग

आदल्या दिवशी इन्सब्रुकला पोचल्यानंतर तिथल्या 'सुप्रसिद्ध' गोल्डन धाचीसकट त्या शहराची सफर थोड्या फार खरेदीत घालवलेल्या वेळासकट दोन तासात आटोपली होती. त्यामुळे नेमके काय पहाण्यासाठी आपण इतक्या दूर आलो आहोत असा एक प्रश्न मनात येत होता. दुस-या दिवशीसुद्धा आल्प्स पर्वतराजीच्या कडेकडेने चालत आलेला आमचा प्रवास तसाच पुढे साल्झबर्ग येईपर्यंत चालत राहिला. प्रसन्न वातावरण व अनुपम सृष्टीसौंदर्य याची मजा लुटत राहिलो व प्रसिद्ध साल्झबर्ग शहरी येऊन पोचलो. तेंव्हा मनातल्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळाले.

साल्झबर्गला सर्वात आधी आम्ही मीराबेल बागेत प्रवेश केला. याच नांवाच्या एका राजवाड्यापाशी या बागेची निर्मिती केलेली आहे. 'मीराबेल' या शब्दाचा अर्थ "मी सांगतो की तू छान आहेस" असा आहे असे आमच्या मार्गदर्शिकेने सांगितले. कोणी कां सांगेना, पण ही बाग खरोखरच छान आहे. एका प्रशस्त आवारात टुलिपसह वेगवेगळ्या फुलझाडांचे सुंदर ताटवे आहेत तर त्याच्या बाजूच्या त्याहूनही मोठ्या दुस-या आवारात वेगवेगळ्या पोजमधल्या माणसांचे मोठमोठ्या आकारांचे कलात्मक पुतळे जागोजागी उभे करून ठेवले आहेत आणि मधोमध उंच उडणारे एक सुंदर कारंजे आहे. शिवाय त-हेत-हेची झाडेझुडुपे तर आहेतच. आपल्याकडे भरपूर वेळ असेल तर मनमोकळेपणे हिंडायला, बसायला, हंसत खेळत पिकनिक साजरी करायला इथे भरपूर जागा आहे. पण आम्हाला तिथे घालवण्यासाठी मर्यादित वेळ दिलेला असल्याकारणाने जमतील तेवढ्या शिल्पांची छायाचित्रे काढीत एक फेरफटका मारून आम्ही पुढे सरकलो.

या बागेला लागूनच येथील सुप्रसिद्ध संगीताचे विश्वविद्यालय आहे. त्या दिवशी बहुधा तिथे एखादी कॉन्फरन्स भरलेली असावी, कारण बरेचसे स्कॉलर टाईप मध्यमवयीन लोक कॉरीडॉरमध्ये हिंडतांना दिसत होते. ते विद्यार्थी तर नक्कीच नव्हते. जवळच एक भव्य सभागृह आहे. चांगल्या कलाकारांच्या कार्यक्रमाला तेसुद्धा तुडुंब भरते असे ऐकले. ज्यांनी पुण्याचा सवाई गंधर्व महोत्सव किंवा मुंबईच्या स्टेडियमवर भरणारे कार्यक्रम पाहिले असतील त्यांना यात कांही विशेष वाटणार नाही. पण आजच्या पाश्चिमात्य जीवनपद्धतीचा विचार करता शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने श्रोते इथे गर्दी करतात हे ऐकून जरासे नवल वाटले.

साल्झबर्गला एक बरोक शैलीमध्ये बांधलेले सुंदर कॅथेड्रल आहे. मोठमोठ्या कमानी, त्यांच्या शेजारी ऐतिहासिक काळातील धर्मगुरूंचे पूर्णाकृती पुतळे, भव्य घुमट, बारीक कलाकुसर वगैरे या मध्ययुगीन वास्तुशिल्पपद्धतीची सर्व वैशिष्ट्ये इथे दिसतात. दुस-या महायुद्धात झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये साल्झबर्ग शहरातील अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले होते त्यात या कॅथेड्लचीही नासधूस झाली होती, ती कधीच भरून काढली आहे.

कॅथेड्रलजवळच 'सेंट पीटर्स एबी' हे स्थान आहे. येथील दफनभूमी ही एक जगप्रसिद्ध जागा आहे. केवळ निवडक लोकांनाच मरणोपरांत इथे चिरकाल विसावा घेण्याची परवानगी मिळते. तरीसुद्धा ते अगदी एकाला खेटून एक समाधिस्त झालेले दिसतात. कांही ठिकाणी शेजारीच भावपूर्ण व सुरेख शिलाखंड उभे केलेले आहेत. ब-याच जागी रोजच्या रोज फुलांचे गुच्छ वा चक्रे वाहिली जातात. या ठिकाणी फिरतांना तोंडाने कांहीही भाषण न करता शांतपणे व गंभीरपणे चालत जावे लागते.

याच भागात सुप्रसिद्ध संगीतज्ञ मोझार्ट याचे जन्मस्थान आहे तसेच तो आपल्या आयुष्यात साल्झबर्गला असतांना जिथे कुठे राहिला होता त्या इमारती आहेत. या महान संगीतकाराने अपूर्व अशा कित्येक संगीत रचना केल्या होत्या व त्याने रचलेल्या मेलडीच आजसुद्धा चवीने वाजवल्या व ऐकल्या जातात, इतकेच नव्हे तर अभिजात संगीताचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून संगीताच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. असे असले तरी त्याच्या जीवनकालात त्याला स्वतःच्या मालकीच्या घरात राहणे कांही बहुधा परवडले नाही.
त्यामुळे या सगळ्या जागी तो भाड्याच्या घरात रहात होता. त्यातील एका जागी आता त्याच्या स्मरणार्थ वस्तुसंग्रहालय करून त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असलेल्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. दुर्दैवाने मोझार्ट अल्पायुशी ठरला व वयाच्या छत्तीसाव्या वर्षीच व्हिएन्ना मुक्कामी त्याने जगाचा निरोप घेतला. जवळच्याच एका चौकातील थोड्याशा निवांत जागेवर एक तरूण आपले गिटार घेऊन बसलेला होता व येणा-या जाणा-या रसिक पर्यटकाकडून पैसे घेऊन त्याच्या आवडीची मोझार्टची कॉंपोझिशन त्याला ऐकवीत होता.

साल्झबर्गच्या या जुन्या भागात 'लिन्झर गॅसे' नांवाची एक गल्ली आहे. ही गल्ली येथील दुकानांवर लावलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पाट्यांसाठी प्रसिद्ध आहे. आंतर्जालावर गाजलेल्या पुणेरी पाट्यांप्रमाणे या इनोदी किंवा खवचट नाहीत. पूर्वीच्या काळातल्यासारखी रेखीव वळणदार अक्षरे, वेलबुट्ट्या व इतर सजावट, त्या काळातील मथळे वगैरे या पाट्यांवर दिसतात. एका जागी तर शंभर दोनशे वर्षापूर्वीच्या काळातले वाटावे असे एक रेस्टॉरेंट आहे. त्यात पुरातन कालातल्या टेबल खुर्च्यावर तसल्याच प्रकारच्या कटलरीमध्ये ताजे
जेवण दिले जाते व ते वाढणारे लोकही ऐतिहासिक पोशाख परिधान करून येतात. आम्ही ते फक्त एका नजरेत पाहून घेतले कारण आमच्या जेवणाची व्यवस्था दुसरीकडे होती.

साउंड ऑफ म्यूजिक या जुन्या इंग्रजी सांगीतिक चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय साल्झबर्गचे वर्णन अपुरेच राहील. मारिया व्हॉन ट्रॅप नांवाच्या येथील एका महिलेच्या जीवनातील कांही सत्य घटनांवर आधारलेला हा चित्रपट आहे. यातील गोष्ट याच भागात घडलेली दाखवली आहे व याचे बरेचसे चित्रीकरण इथेच झालेले आहे. पर्यटकांना अशा सगळ्या जागा दाखवणारी एक सहलसुद्धा इथे उपलब्ध आहे. गोव्याला गेल्यावर 'एक दूजेके लिये' किंवा उदयपूरला गेल्यास 'गाईड' या सिनेमातील शूटिंग कुठे झाले ते हमखास दाखवतात ना, तसेच.

मारिया व्हॉन ट्रॅप ही संगीतप्रेमी महिला आधी नन बनण्याठी एबीमध्ये रहात असते, पण तिचे मन तिथल्या गंभीर वातावरणात तितकेसे लागत नसते. त्यानंतर आपल्या प्रमुख 'मदर'च्या सल्ल्यानेच ती कॅप्टन ट्रॅप या एका सेवानिवृत्त सैनिकी अधिका-याच्या सात मुलांची गव्हर्नेस बनून त्याच्या घरी येते. या मुलांना तोपावेतो अत्यंत कडक अशा मिलिटरी शिस्तीत व धाकातच ठेवलेले असते पण त्यामुळे ती विद्रोही व व्रात्य झालेली असतात. तिथे संगीताचे तर वारेसुद्धा त्यांना लागू दिलेले नसते. मारिया मुलांना माया लावून हळूहळू ही सर्व परिस्थिती कशी बदलते याचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. ज्यूली अँड्र्यूज या तारकेने फारच सुंदर अभिनय करून कांहीशा प्रौढत्वाकडे झुकलेल्या नायिकेची व्यक्तीरेखा साकार केली आहे. मुलांना पिकनिकच्या निमित्ताने घराबाहेर नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात 'डो अ डीअर' या गाण्यातून ती त्यांना सात सुरांच्या सरगमची ओळख करून देते हा प्रसंग तर अप्रतिम आहे. अशाच प्रकारचा सीन 'परिचय' या हिंदी चित्रपटात 'सारेके सारे गमको लेकर गाते चले' या गाण्यात
दाखवला आहे.

साउंड ऑफ म्यूजिक या चित्रपटाच्या अखेरीस नाझी सैनिकांची तुकडी साल्झबर्गमध्ये प्रवेश करते. पूर्वी ऑस्ट्रियाच्या नौदलात काम केलेल्या कॅप्टन ट्रॅपने जर्मनीने साल्झबर्गचा ताबा घेतल्यानंतर हिटलरच्या सेवेत पुन्हा कामावर रुजू व्हावे असे फर्मान निघालेले असते पण देशभक्त कर्नल ट्रॅपला हे मान्य नसते. त्यामुळे त्यांना त्याला पकडून न्यायचे असते, पण सर्व हितचिंतकांच्या सहाय्याने ते कुटुंब त्या सैनिकांना गुंगारा देऊन तेथून निसटून जाते इथे या चित्रपटाची अखेर होते. यात मारियाच्या एबीमधील पूर्वीच्या सहकारिणी नन्सचा मोठा वाटा आहे आणि कांही क्लायमॅक्सची दृष्ये सिमेटरीमध्ये घडलेली दाखवलेली आहेत. पण प्रत्यक्षात सेंट पीटर हे असले प्रकार सहन करणार नाही. त्यामुळे या दफनभूमीची प्रतिकृती स्टूडिओमध्ये बनवून तिथे हे चित्रीकरण झाले अशी माहिती आमच्या गाईडने दिली.

साल्झबर्गची भेट थोडे निसर्गसौंदर्य, थोडी वास्तुशिल्पकला, थोडे संगीत, थोडी चित्रपटाची आठवण अशा विविध प्रकारच्या अनुभवामुळे कायम आठवणीत राहील. या सहलीनंतर आम्ही पुन्हा रात्रीच्या मुक्कामासाठी इन्यब्रुकला परतलो.
......... (क्रमशः)

No comments: