Saturday, May 09, 2009

ग्रँड युरोप - भाग १७ : स्विट्झर्लंड


दि.२२-०४-२००७ सातवा दिवस : स्विट्झर्लंड
स्विट्झर्लंड म्हणजे आल्प्स पर्वत आणि आल्प्स पर्वत म्हणजे बारा महिने बर्फाच्छादित प्रदेश अशी विचित्र समीकरणे लहानपणापासून डोक्यात घर करून बसली होती। खरे म्हंटले तर ईशान्य भारतातील प्रेक्षणीय स्थळे पाहतांनाच कांही गोष्टींची जाणीव झालेली होती. दार्जिलिंग, कालिंपॉंग, गंगटोक यासारखी प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे वेगवेगळ्या पहाडांच्या माथ्यावर वसलेली असली तरी एका शहरातून दुस-या शहराला जाण्यासाठी तो डोंगर उतरून जावे लागे आणि खाली आल्यानंतर अगदी मुंबईतल्यासारखे उकडले नाही तरी स्वेटर वगैरे उतरवून ठेवावाच लागे. जवळचेच उदाहरण घ्यायचे तर नाशिकपासून कोल्हापुरापर्यंतचा सगळाच भाग कांही सह्याद्री पर्वताने व्यापलेला नाही आणि सह्याद्री पर्वतातला प्रत्येक डोंगरमाथा कांही महाबळेश्वर नव्हे.पण युरोपमध्येही अशीच परिस्थिती आहे हे तिकडे गेल्यानंतर समजले. गेले तीन दिवस आम्ही आल्प्स पर्वताच्या आजूबाजूला फिरत होतो, आज तर प्रत्यक्ष स्विट्झर्लंडमध्ये येऊन दाखल झालो होतो तरीही कडाक्याच्या थंडीचा कुठे पत्ताच नव्हता. हल्ली वुलनचा सूट वगैरे घालणे तर फॅशनेबल राहिलेले नाही, पण साधे विंडचीटर किंवा जाडसे जॅकेटसुद्धा फारसे कोणी घातलेले दिसत नव्हते. त्याची मुळी गरजच नव्हती. झूरिचच्या तलावाच्या किना-यावर तर कित्येक लोक उघडे बंब होऊन मजेत ऊन खात पहुडलेले होते.

अर्थातच स्विट्झर्लंड हा एक फक्त थंडगार हवेचा पर्यटन करण्याचा प्रदेश ही समजूत तितकीशी बरोबर नाही. इथले सर्वसाधारण हवामान समशीतोष्ण आहे. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे लोकवस्ती तशी कमी आहे. पण झूरिच, जिनिव्हा, बर्न, बेसल व लोझान या पांच शहरांमध्ये लाखावर लोकवस्ती आहे. इथे बनणारी चॉकलेट्स आणि मनगटी घड्याळे पूर्वापारपासून जगप्रसिद्ध आहंत. अत्यंत अचूक व सूक्ष्म काम करणारी यंत्रसामुग्री, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शक यंत्रे वगैरे इथून जगभरातील कारखाने व प्रयोगशाळांकडे पाठवली जातात. या सगळ्याची निर्मिती करणारे मोठे कारखाने या देशात आहेत. हा एक औद्योगिक दृष्ट्या पुढारलेला देश आहेच, शिवाय पर्यटन क्षेत्रातही तो आघाडीवर आहे. त्याचा सविस्तर तपशील पुढच्या भागांत येणार आहे.

राजकीय दृष्ट्य़ा स्विट्झर्लंड हा नेहमी तटस्थ राहिला आहे. इतर देशांप्रमाणे त्याने इतर खंडात आपले साम्राज्य निर्माण केले नव्हते. स्वतःचा समुद्रकिनारा नसल्यामुळे ते शक्यही झाले नसते. दोन्ही महायुद्धात त्याने कोणाचीही बाजू घेतली नाही. युद्धात जखमी झालेल्या सर्वच सैनिकांची निरपेक्ष भावाने येवा करणा-या रेड क्रॉस या संघटनेचे मुख्य कार्यालय इथे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासंघाची (यूनोची) अनेक कार्यालये जिनिव्हा येथे आहेत.

स्विट्झर्लंडमधल्या लोकांची स्विस नांवाची कोणती वेगळी भाषा नाही. जर्मन, फ्रेंच व इटालियन या प्रमुख भाषा आहेत. जर्मनी, फ्रान्स व इटली या शेजारील देशांना लागून असलेल्या वेगवेगळ्या भूभागात त्या प्रामुख्याने बोलल्या जातात. जर्मन लोकांची बहुसंख्या आहे, पण इतर भाषिकही मोठ्या संख्येने आहेत. बहुभाषिक देश असला तरी त्यांच्यात आपसात सुसंवाद आहे. तसेच पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मोठ्या प्रमाणावरील व्यापामुळे मातृभाषा नसतांनाही इंग्रजी जाणणा-यांची संख्यासुद्धा मोठी आहे.

डोंगरखो-यामधील शुद्ध हवापाणी व कष्टमय जीवन यामुळे इथले लोक काटक प्रवृत्तीचे झाले आहेत. तसेच रानातील पांखराप्रमाणे स्वतंत्रताप्रेमी आहेत. प्रख्यात धनुर्धारी व वीर पुरुष विलियम टेल हा त्यांचा हीरो होऊन इथे होऊन गेला. आपल्याकडे जसे भारतभर किंवा भारताबाहेरसुद्धा सुरक्षा करण्याचे काम नेपाळमधील गुरखे लोक करतांना दिसतात, तसेच वैय़क्तिक संरक्षणासाठी स्विस गार्ड ठेवण्याची प्रथा युरोपात चालत आली होती. व्हॅटिकन सिटीमधील पोपच्या संरक्षणासाठी स्विस गार्डसची तुकडी आपल्या पारंपरिक वेशभूषेत तिथे उभी असलेली दिसली. आजच्या जमान्यात तेसुद्धा एक पर्यटकांचे आकर्षण झाले आहेत हा विनोदाचा भाग वेगळा.

स्विट्झर्लंडमधल्या आमच्या तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी तेथील पांचही 'लक्षाधीश' शहरे सोडून ल्यूसर्न या मध्यम आकाराच्या गांवाची निवड करण्यात आली होती. देशाच्या मध्यभागी असलेले हे गांव इकडे तिकडे फिरायला जाण्यासाठी सोयीचे पडत असावे. त्यामुळे मुख्यतः पर्यटनासाठीच ते प्रसिद्ध आहे आणि आमच्या वास्तव्यात जगभरातून आलेले परदेशी लोक आम्हाला तिथे मोठ्या संख्येने फिरतांना दिसत होते. अशाच एका नकट्या चपट्या लोकांच्या ग्रुपला पाहून कोणीतरी आपापसातच मराठीमध्ये बोलतांना त्यांना "जपानी" म्हंटले तर तेवढा शब्द त्यातल्या कोणाच्या तरी कानांवर पडला. त्यांच्यातल्या एकीने जोरजोरात "नो जापानी" म्हणून आपला नकार दर्शवला आणि "चायनीज?" म्हंटल्यावर खुषीने मान डोलावली. केवढा देशाभिमान ?
. . . . . . . (क्रमशः)

No comments: