Monday, May 04, 2009

ग्रँड युरोप - भाग १२ : स्वरौस्की स्फटिकविश्व


दि.२०-०४-२००७ पांचवा दिवस : स्वरौस्की स्फटिकविश्व


व्हेनिसच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आम्ही तिथल्या एका वेगळ्या प्रकारच्या जागेलाही भेट दिली, ती म्हणजे एक कांचेचा कारखाना. एका जुन्या पुराण्या इमारतीमधील काळोखातल्या जिन्याच्या पाय-या चढून वर गेल्यावर आमचे स्वागत करून आम्हाला लगेच बाजूच्या एका लहानशा कार्यशाळेत नेले गेले. तिथल्या कुशल कारागीराने कांचेचा एक गोळा तापलेल्या भट्टीमधून बाहेर काढला व हातातील अवजारांच्या सहाय्याने त्याला विविध सुंदर आकार सफाईने देऊन दाखवले. बाजूला उभ्या असलेल्या महिलेने या
सगळ्या प्रक्रियांची थोडक्यात माहिती सांगितली. तापलेल्या कांचेला आकार देणे, त्यावर पाहिजे त्या जागेवर वेगवेगळ्या प्रकारच्या फॉइल्स, मणी किंवा वाळू चिकटवून त्याला पुन्हा भाजणे, कडांवर बारीक नक्षीकाम कोरणे वगैरेंची त्रोटक माहिती तिने सांगितली.

आमच्या समूहातील कांही शहरी मंडळींनी बहुधा "फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार" या गाण्यातला कुंभार आणि "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे" या गाण्यातला लोहार एवढ्याच कारागीरांना, ते सुद्धा सिनेमाच्या पडद्यावर पाहिलेले असावे. त्यामुळे कांचेला विविध आकार देणा-या त्या कलाकाराचे कसब ते डोळे भरून पहात होते व त्यांच्या चेह-यावरील भाव पाहतांना मला मजा वाटत होती. कार्यशाळेतील कृतीचा आविष्कार पाहून झाल्यावर आम्ही त्यांच्या दुकानात गेलो, पण असले नाजुक काचेचे सामान बरोबर घेऊन हिंडणे अवघड असल्याची जाणीव झाल्यामुळे ते विकत घेण्याचा मोह कोणी केला नाही. पुढच्या खोलीत खड्यांचे आकर्षक दागदागिने मांडून ठेवलेले होते. तिथेही इतकी किंमत घेऊन कांचेच्या खड्यांचे दागीने घ्यायला कोणी तयार झाले नाही.

व्हेनिसला व इटलीला रामराम ठोकून आमची गाडी निघाली ती ऑस्ट्रियामधील वॅटन्स या गांवी असलेल्या स्वरौस्कीच्या स्फटिकविश्वात आम्हाला घेऊन गेली. स्वरौस्की हे नांव पूर्वी ऐकले होते व त्यांची अतीशय महागडी व तितकीच आकर्षक क्रिस्टलची चमचमती चित्रे अकबरअलीजसारख्या दुकानांच्या शोकेसमध्ये ठेवलेली पाहिली होती. त्यांच्या अचाट किंमती पाहिल्यावर ती खरोखरच विकायला ठेवली असतात की फक्त शोभेसाठी मांडलेली आहेत असा संभ्रमही झाला होता. त्यामुळे त्यांचे प्रदर्शन पहाण्याची
उत्सुकता होती.

वॅटन येथे एका प्रशस्त जागेवर स्वरौस्कीने आपल्या अद्भुत कलाकृतींच्या आधारे एक आगळे वेगळे विश्वच उभे केले आहे. त्याच्या बाहेरच्या अंगानेच मोठमोठ्या अक्षरात "येस टू ऑल" हे शब्द असलेली झगझगती अक्षरे उभारलेली आहेत। आंत प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दालनात सर्व बाजूंनी डोळे दिपवणारे क्रिस्टल्स मांडले आहेत। त्यात जगातील सर्वात मोठ्या आकाराचा फुटबॉलएवढा मोठा एक अमूल्य खडा, तसेच भिंगामधून पाहिल्यावरड दिसणारा जगातील सर्वात लहान आकाराचा खडाही आहेत। कितीतरी मीटर लांब व रुंद अशी लक्षावधी स्फटिकांनी मढवलेली जगातली सर्वात मौल्यवान भिंत इथे बांधली आहे व त्या भिंतीच्या कडेकडेने एकापुढे एक अशी प्रदर्शनाची तेरा स्वतंत्र दालने आहेत.


या दालनांमध्ये संपूर्ण अंधार केलेला आहे व प्रदर्शनासाठी कांचेच्या तांवदानांत ठेवलेल्या स्फटिकांतून परावर्तन पावणारा प्रखर उजेड अगदी लख्ख दिसतो. ही सगळी मांडणी एका सरळसोट रेषेत न करता त्यासाठी वर्तुळाकृती, अर्धगोल, त्रिकोण, चौकोन वगैरे वेगवेगळ्या आकारांच्या खोल्या वेगवेगळ्या स्तरांवर ठेऊन व खाली वर चढण्याउतरण्याच्या पाय-या लावून त्यात वैविध्य आणले आहे. भारलेल्या मनाने एका दालनांतून निघून दुसरीकडे गेल्यावर तेथील वेगळे दृष्य पाहून पुन्हा चकित व्हायला व्हावे अशी सगळी व्यवस्था आहे.

इथे नुसते क्रिस्टल्स मांडून ठेवलेले नाहीत. प्रत्येक दालनांत वेगळी दृष्ये उभारलेली आहेत. यात पशु, पक्षी, फुलपाखरे, मासे वगैरे अनेक प्रकारचे जलचर व थलचर जीव आहेत तसेच युनिकॉर्न, ड्रॅगन यासारखे काल्पनिक प्राणीही आहेत आणि अमूर्त आकाराच्या कलाकृतीही. कुठे हे विविध आकारच स्फटिकांतून घडवले आहेत तर कुठे त्यांना क्रिस्टल्सने सजवले आहे. कांही दालनांत एका बाजूला त्रिमितीमधूल दृष्य व दुस-या बाजूला पडद्यावर एक चलचित्र दाखवले जाते. काही ठिकाणी माथ्यावरील छत आणि
पायाखालील जमीनसुद्धा कलात्मक रीतीने सजवून त्यावर प्रकाशाचा खेळ मांडला आहे. कुठे मंद व प्रखर होणारा प्रकाश तर कुठे फिरता किंवा नाचता प्रकाशाचा झोत, आणखीन कुठे बदलत जाणा-या रंगांच्या छटा या सगळ्यामुळे हे प्रदर्शन "यासम हे" असे केवळ अद्वितीय म्हणावे लागेल. फारतर त्याची तुलना दिवाळीतील किंवा लेजर किरणांच्या आतिशबाजीबरोबर करता येईल. पण त्या आतिशबाजीतील दृष्ये क्षणिक असतात, तर इथे ती दिसत राहतात.

प्रदर्शनातील सारी दालने पाहून झाल्यावर आपण त्यांच्या भव्य दुकानात प्रवेश करतो. हजारो प्रकारच्या अनुपम कलाकृती तिथे मांडलेल्या आहेत. इथेही त्यातील एक एक सुरेख गोष्ट पाहून ती नजरेत साठवून ठेवावी असे वाटते. इथे मात्र सगळ्यावस्तु व्यवस्थितपणे किंमतीच्या लेबलसह ओळीने मांडून ठेवलेल्या आहेत. अर्थातच त्यांच्या किंमती कांही कमी नाहीत. कुठलाही मनात भरणारा अगदी छोटासा प्राणीसुद्धा शंभर दोनशे युरोच्या खाली नसायचा. निव्वळ शोकेसमध्ये मांडून ठेवण्यासाठी इतके पैसे खर्च करणे
जिवावर येतेच. त्याशिवाय आपल्याला तो शो पीस दुकानातल्याइतका चमकदार घरात दिसायला हवा असेल तर त्यासाठी खास दिव्याच्या झोताची व्यवस्था करायला हवी हे वेगळेच. नैसर्गिक प्रकाशात त्याच्या अंतर्गत परावर्तनाची मजा कशी येणार? पण हे सगळे केले तर मात्र त्या वस्तूंना तोड नाही इतक्या त्या सुंदर दिसतात. आम्ही आपले भरपूर नेत्रसुख घेतले व जमेल तेवढे कॅमे-याने टिपण्याचा प्रयत्न केला. दागीन्यांच्या विभागात मात्र स्त्रीवर्गाने थोडी तरी खरेदी केलीच.

एक वेगळ्या प्रकारचे कल्पनातीत असे प्रदर्शन व विक्रीकेंद्र पाहिल्याचा आनंद घेऊन आम्ही तेथून बाहेर आलो.

No comments: