संमेलनाची जागा ठरवल्यानंतर लगेच सर्वानुमते त्याची तारीखसुध्दा ठरवणे आवश्यकच होते, कारण ही पंचवीस तीस मंडळी आपापल्या घरी गेल्यानंतर परस्पर विचार विनिमय करणे कठीण झाले असते. फार दूरवरचा विचार करण्यात बरीच अनिश्चितता येते आणि तयारी करण्यासाठी किमान थोडा तरी अवधी हवा. या दृष्टीने दीड दोन महिन्यात हे संमेलन भरवून घ्यायचे असे मत पडले आणि सर्वांना मान्य झाले. चातुर्मासात अनेक सणवार येतात, कोणाकोणाची व्रते वैकल्ये असतात, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी वगैरेंचे ठरलेले कार्यक्रम चुकवता येत नाहीत वगैरेंचा विचार करता त्याआधीच हे संमेलन भरवायचे ठरले. लगेच कॅलेंडर पाहून २४-२५ जुलैच्या तारखा ठरल्या आणि त्या दिवशी दुसरा तिसरा कोणताही कार्यक्रम कोणीही ठरवायचा नाही असा सर्वांना दम दिला. परगावी राहणा-यांनी आताच रेल्वेचे रिझर्वेशन करून ठेवावे असे त्यांना सांगून टाकले.
हा कार्यक्रम करायचाच असे पक्के ठरवून सगळे आपापल्या घरी परतले. पुढच्या महिन्याभरात नक्की येणा-यांची यादी तयार झाली आणि बरेचसे पैसेही गोळा झाले. कार्यक्रमाची जागा ठरवण्याचे काम पुण्यात रहात असलेल्या संजयने इतर पुणेकर मंडळींशी सल्लामसलत करून केले. सिंहगडाच्या पायथ्याशी, खडकवासला धरणाच्या जलाशयाच्या किनारी आणि पानशेत धरणाच्या रस्त्यावर शांतीवन नावाचे एक रिसॉर्ट आहे. ध्यानधारणा, योगविद्या वगैरेंच्या कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग वगैरे तिथे चालत असावेत. शंभर लोकांची उतरण्याची आणि खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था या जागी ठेवले जाते असे रिपोर्ट मिळाले. ही जागा आमच्या बजेटमध्ये बसतही होती. जागेचे बुकिंग करून सर्वांना कळवून टाकले.
शांतीवनाची जागा इतर दृष्टीने जरी खूप चांगली असली तरी तिथे पोचण्यासाठी आवश्यक असलेली वाहतुकीची व्यवस्था मात्र फारशी सोयिस्कर नाही. किंबहुना ती जवळ जवळ अस्तित्वातच नाही असेही म्हणता येईल. बाहेरगावच्या लोकांनी आधी पुण्यातल्या नातेवाइकांकडे यायचे आणि पुण्याहून तिकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करायची असा विचार सुरुवातीला केला होता. त्यासाठी एक मोठी बस भाड्याने घ्यायची की लहान मिनिबसने दोन तीन खेपा करायच्या असे पर्याय होते. जसजशी संमेलनाची तारीख जवळ येऊ लागली तसतसे लोकांचे कार्यक्रम निश्चित होऊ लागले. वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे परिसरातल्या कांही लोकांनी आपल्या गाडीनेच पुण्याला जाऊन परत यायचा विचार केला आणि आपापल्या गाडीत आणखी कोणाकोणाला आपल्यासोबत पुण्याला नेले. नाशिक आणि बार्शीची मंडळीही आपल्या गाड्या घेऊन आली. डोंबिवलीतल्या नातेवाइकांनी ट्रॅक्स किंवा तवेरासारखे वाहन भाड्याने घेऊन एकत्र जायचे ठरवले. म्हणजे ही सगळी मंडळी थेट शांतिवनातच पोचणार असे निश्चित झाले. उरलेल्या कांही जणांनी एक दिवस आधी पुण्याला जाऊन आपल्या आप्तांच्या घरी मुक्काम केला. आता पुण्याहून जाणारी किती मंडळी आहेत आणि त्यातल्या किती जणांच्या मोटारी आहेत यांची मोजणी आणि चर्चा झाली आणि थोडी दाटी वाटी करून बहुतेकजणांना सामावून घेता आले. ते लोक पुण्याच्या वेगवेगळ्या भागात रहात असले तरी कुणी कुणी कुणाकुणाला कुठून कुठून पिक अप करायचे हे ठरवून त्याची पध्दतशीरपणे अमलबजावणी केली. कांही लोकांचे पुण्यात असलेले नातेवाईक आमच्या कुटुंबाच्या परीघात बसत नव्हते, पण त्यांनीही मदत करून काही जणांना शांतीवनापर्यंत पोचवून दिले. अखेरीस अपवादात्मक दोन तीन लोकच उरले होते, जिथपर्यंत सार्वजनिक बससेवा उपलब्ध होती तिथपर्यंत ते आले आणि कोणीतरी तिथपर्यंत जाऊन त्यांना आपल्या गाडीतून घेऊन आले. मोबाईलवरून सतत एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे कोण कोण कुठपर्यंत आणि कसे येऊन पोचले आहेत याची वित्तंबातमी कळत होती आणि एकमेकांना मार्गदर्शन करणे शक्य होते. एकमेकांबद्दल मनात असलेल्या आत्मीयतेचा प्रत्यय या पूर्वतयारीतच दिसून येत होता. ज्याला ज्याला जे जे शक्य होते ते ते तो आपणहून करत होता. कुणालाही कुणाची मदत मागायची गरज पडली नाही की कुणी त्यात आढेवेढे घेतले नाहीत. डझनभर कारगाड्या, काही मोटरसायकली आणि एक व्हॅन यातून लहानमोठी सगळी मिळून नव्वद माणसे संध्याकाळपर्यंत शांतीवनाला जाऊन पोचली.
जुलैमधला दिवस ठरवतांना पाऊस पडण्याची थोडी शक्यता धरली होती आणि त्या दृष्टीने सर्वांनी छत्र्या, रेनकोट वगैरे आणले होते, पण तो आला नसता तरी चालले असते. आदल्या दिवशी पुण्यात पाऊस पडत नव्हता, त्या दिवशीसुध्दा आधी नुसतेच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सगळे खूष होते. पण घरातून निघण्याच्या सुमाराला रिमझिम पाऊस सुरू झाला. जसजसे खडकवासला जवळ यायला लागले तसतसा पावसाचा जोर वाढत गेला आणि शांतीवनात पोचेपर्यंत तो धो धो कोसळायला लागला. या अगांतुक पाहुण्याचे स्वागत करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.
शांतीवनामध्ये वस्तीसाठी अनेक वेगवेगळी कुटीरे आहेत आणि एकत्र येऊन बसण्यासाठी प्रशस्त हॉल आहेत. आमच्या कार्यक्रमासाठी जो हॉल ठरवला होता, त्यात पावसाचे पाणी येऊन साठू लागले. त्यामुळे त्याऐवजी दुस-या जास्त बंदिस्त जागेत आमची व्यवस्था करावी लागली. खरे तर दुस-या एका हॉलमध्ये गाद्या अंथरून झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यावरच वाटले तर बसावे, वाटले तर पाय पसरावे असे करण्याची सोय होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी स्टेजच्या समोर येऊन बसायचे आणि नंतर ज्याला जेंव्हा झोप येईल तेंव्हा त्याने मागच्या बाजूला पसरलेल्या पथारीवर पहुडावे असे ठरवले. याला दुसरा पर्याय तरी कुठे होता?
निरनिराळ्या दिशेने येणारी मंडळी बरोबर ठरलेल्या वेळी येऊन पोचणार नाहीत हे माहीत होतेच. पुण्याच्या स्थानिक मंडळींनी आधी पुढे जाऊन सर्व व्यवस्था पाहिली. वृध्द, महिला आणि बालकांना आत पाठवून दिले आणि युवकवर्ग येणा-या मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी उभा राहिला. एक एक ग्रुप येताच आधी आलेल्या मंडळींना भेटत होता. वडिलाधा-यांच्या पाया पडणे, कडकडून मिठी मारणे, मुलांना उचलून घेणे, पाठ थोपटणे वगैरे अनेक मार्गांनी भावना व्यक्त होत होत्या. एकाची विचारपूस होईपर्यंत मागोमाग दुसरे येत होते आणि त्यात सामील होत होते. तासभर तरी हा कार्यक्रम चालला होता. चहा पुरवणा-याला काय इन्स्ट्रक्शन्स होत्या कोण जाणे, बाहेर कोसळणारा पाऊस पाहून खरे तर त्याने चहाबरोबर कांद्याची भजी आणावीत असे वाटत होते, पण तो काही येता येत नव्हता. याबद्दल कोणाला आणि कोणी सांगायला हवे हे जो तो एकमेकांना विचारत होता. अखेर आमची आर्जवे त्याच्यापर्यंत पोचली आणि चहाने भरलेले पिंप घेऊन तो आला तेंव्हा टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत झाले.
. . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment