Friday, July 16, 2010

पंपपुराण - द्वितीय खंड - ४



पिचकारीच्या तत्वावर चालणारे पंप पूर्वीच्या काळापासून अस्तित्वात आहेत आणि या पंपासारखीच रचना करून त्यावर जगातले पहिले स्वयंचलित यंत्र निर्माण करण्यात आले हे आपण मागील भागात पाहिले. हाताने दांडा वर खाली करून पाणी उपसण्याचे हँडपंप त्यापूर्वीच्या काळापासून वापरले जात होते आणि ते आजपर्यंत लहान गांवांमध्ये पहायला मिळतात. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा भरंवशाचा नसतो अशा जागी हे पंप हमखास उपयोगी पडतात. या प्रकारच्या पंपांमध्ये जेंव्हा आपण पिस्टनने पाण्याला ढकलतो तेंव्हाच ते पंपामधून बाहेर पडते. जेंव्हा पिस्टनला मागे ओढतो तेंव्हा पाण्याचा पुरवठा थांबतो. अशा प्रकारे पाण्याचा पुरवठा आलटून पालटून मिळत राहतो. दांड्याला मागेपुढे किंवा वरखाली करण्यासाठी जी शक्ती लागते तीसुध्दा त्या प्रमाणात कमी जास्त होत राहते. त्यानुसार हाताने दांड्यावर कमी जास्त दाब देऊन आपण ते सहजपणे करू शकतो. या क्रियेत हाताला थोडी विश्रांती मिळत राहते आणि श्वास घ्यायला फुरसत मिळते वगैरे फायदे असल्याने त्यात गैरसोय वाटत नाही. शिवाय थांबून थांबून पाणी आले तरी आपली बादली किंवा कळशी भरतेच.

पण पंपाचा हा दांडा विजेवर चालणा-या मोटारीला जोडला तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. याचे कारण विजेवर चालणारी मोटर ठराविक गतीने सतत फिरत असते. पण त्याला जोडलेल्या दांड्याची गती क्षणाक्षणाला बदलत राहते. एका टोकाला असलेला पिस्टन हळू सरकत असतो. सरकता सरकताच त्याची गती वाढत जाते आणि तो मध्यावर येतो तेंव्हा ती सर्वात जास्त असते. त्यानंतर ती कमी कमी होत दुस-या टोकांशी पोचेपर्यंच शून्यावर येते आणि त्यानंतर दिशा बदलून विरुध्द दिशेने वाढत जाते. अर्थातच त्यानुसार बाहेर ढकलल्या जाणा-या पाण्याचा प्रवाह वाढत आणि घटत जातो आणि त्यासाठी लागणा-या ऊर्जेचे प्रमाण सारखे बदलत जाते. त्याबरोबर पंपाला लागणा-या विजेचा प्रवाहसुध्दा कमी अधिक होत राहतो. या सगळ्या कारणांमुळे पंप झटके देत चालतो आणि त्याला जोडलेल्या मोटरचा उपयोग तिच्या संपूर्ण कार्यक्षमतेइतका करता येत नाही.

हे तोटे टाळण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात आणि अनेक प्रकारचे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप तयार केले जातात. पिस्टन किंवा प्लंजरच्या रचनेत बदल करू अनेक प्रकारांनी त्यांचा उपयोग केला जातोच, शिवाय सरळ रेषेत मागेपुढे सरकण्याऐवजी त्यांना गोल फिरवून त्यातून तशाच प्रकारचा परिणाम साधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्याच्या काळात चार प्रमुख प्रकारांचे पंप पहायला मिळतात.
१. पिस्टन पंप
२. व्हेन पंप
३. गियर पंप
४. स्क्रू पंप

वाफेवर चालणा-या इंजिनामध्येसुध्दा पिस्टनपंपासारखेच प्रॉब्लेम येतात. एका स्ट्रोकमध्ये सिलिंडरमध्ये जाणारी वाफ पिस्टनला बाहेर ढकलते आणि त्याला जोडलेल्या चाकाला ऊर्जा मिळून ते फिरू लागते. त्या चाकाकडून थोडी ऊर्जा परत घेऊनच पिस्टन मागे येऊ शकतो. यामुळे चाकाची गती कमी जास्त होत राहते. यावर उपाय म्हणून दुहेरी काम करणारे इंजिन बनवले गेले. त्यात सिलिंडरच्या दोन्ही टोकांना म्हणजेच पिस्टनच्या दोन्ही बाजूंना व्हॉल्व्ह बसवले गेले आणि दोन्ही बाजूंनी वाफेला सिलिंडरच्या आत शिरण्याची व बाहेर पडण्याची व्यवस्था केली गेली. वरील चित्रात दाखवलेले डबल अॅक्टिंग पिस्टन पंप याच तत्वाच्या आधारावर चालतात. त्यामुळे या पंपामधून प्रत्येक स्ट्रोकमध्ये पाणी बाहेर येत राहते.

. . . . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)

No comments: