Thursday, July 01, 2010

ती

पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो. अशाच एका लहानशा प्रवासात मला 'तो' भेटला होता, 'त्या'च्यावर मी लिहिलेला लेख थोडासा जमला असे माझे मलाच वाटले आणि दोन चार लोकांनी तो (लेख) वाचून तसे मला सांगितलेही. पुन्हा एकदा अशाच आणखी कोणा अनामिक व्यक्तीबद्दल लिहावे असा विचार मनात येत होता, तेवढ्यात योगायोगाने बसच्या प्रवासातच मला 'ती' भेटली. म्हंटले, चला आता 'ति'च्याबद्दल लिहून मोकळे व्हावे.

वाशीहून मुंबईच्या दिशेने जाणा-या बसच्या थांब्यावर बस येण्याच्या दिशेकडे पहात मी उभा होतो. सकाळच्या वेळी वाहनांच्या गर्दीनेच तो रस्ता दुथडीने भरून वहात होता. त्या जागी घोळका करून उभे राहण्यासाठी मुळी जागाच नव्हती. बसची वाट पहाणा-या लोकांना रस्त्याच्या कडेलाच ओळीत उभे रहावे लागत होते म्हणून त्याला रांग म्हणायचे. पण रांगेत शिस्तीने उभे रहाणे, बस आल्यानंतर क्रमवार बसमध्ये चढणे वगैरे गोष्टी आता सुरूवातीच्या स्थानकावरच दिसल्या तर दिसतात. इतर ठिकाणी त्या इतिहासजमा झाल्या आहेत. पण त्यामुळे बस येण्याच्या आधी कोणी कुठे उभे रहावे यावरून आता भांडणे होत नाहीत.

आपल्या सहप्रवासोत्सुक मंडळींबरोबर मीही बसची वाट पहात उभा होतो. त्यांच्यात वैविध्य होतेच, पण त्या सर्वांपेक्षा खूप वेगळी अशी 'ती' समोरून येतांना दिसली. यौवनाने मुसमुसलेला सुडौल बांधा, विलक्षण लक्षवेधक चेहरा ...... (बाकीच्या वर्णनासाठी एकादी शृंगारिक कादंबरी वाचावी किंवा फर्मास लावणी ऐकली तरी चालेल.) 'लटपट लटपट', 'ठुमक ठुमक' वगैरे सगळी विशेषणे चोळामोळा करून फेकून द्यावीत अशा जीवघेण्या चालीमध्ये हाय हीलच्या शूजने टिकटॉक टिकटॉक करत ती आली आणि चक्क आमच्या रांगेच्या सुरुवातीलाच उभी राहिली. रांगेमधल्या सा-या नजरा आता कोणच्या दिशेने वळल्या हे सांगायची गरज नाही. तिच्या बुटांची हील्स किती उंच होती आणि केशसंभारामध्ये खोचलेल्या क्लिपांची लांबी रुंदी किती होती वगैरे तपशीलाकडे बघ्यांमधल्या स्त्रीवर्गाचे लक्ष असले तर असेल. तिच्या अंगाला घट्ट चिकटून तिची कमनीय आकृती इनामदारीने दाखवणारी जीन पँट चढवून त्यावर भडक रंगाचा टीशर्ट (किंवा टॉप?) तिने घातला होता. 'ही दौलत तुझ्याचसाठी रे, माझ्या राया' अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य त्यावर गिचमीड अक्षरांत छापलेले होते. कोणाला निरखून पहायचे असेल तर ते वाक्य वाचण्याचे निमित्य तो करू शकला असता आणि ज्याला वाचनाचीच आवड असली तर अशाला त्या 'शब्दांच्या पलीकडले' दिसल्यावाचून राहिले नसते.

कोणत्याही प्राण्याच्या कोणत्याही वयातल्या नराच्या मनात अशा प्रसंगी कोणत्या प्रकारच्या लहरींचे तरंग उठायला हवेत ते या विश्वाचा निर्माता, निर्माती, निर्माते जे कोणी असतील त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवले आहे आणि त्याचा अंतर्भाव त्यांच्या जीन्समधल्या प्रोग्रॅमिंगमध्ये करून ठेवलेला आहे. इतर प्राणी अशा वेळी कान उभे करून, नाक फेंदारून, फुस्कारून किंवा शेपूट हालवून त्या तरंगांना मोकळी वाट करून देतात. मनुष्यप्राणी मात्र सुसंस्कृत वगैरे झाल्यानंतर ही गोष्ट जाहीरपणे मान्य करायला धजत नाही. शिवाय तो लबाड असल्यामुळे ही गोष्ट आपल्या चेहे-यावरही आणू देत नाही. तरीसुध्दा आपण त्या भावनेला एका नजरेत ओळखतो असा दावा केलेला दिसतो. 'ती' आली, 'ति'नेही एक नजर रांगेतल्या लोकांवर टाकली आणि आपला सेलफोन कानाला लावून कोणाशी तरी खिदळत मोत्यांचा सडा घालत राहिली.

त्या दिवशी बसला यायला थोडा उशीर लागला असला तरी कदाचित कोणी फारशी कुरकुर केलीही नसती, पण कांही सेकंदातच ती (बस) येऊन धडकली. बसच्या ड्रायव्हरनेस्ध्दा 'ति'ला पाहिले असणार. थांबा येण्याच्या आधीच बसचे मागचे दार बरोबर 'ति'च्या समोर येईल अशा अंदाजाने ती बस उभी राहिली. बसमध्ये गच्च भरलेली उभ्या प्रवाशांची गर्दी नसली तरी बसायलाही जागा नव्हती. 'ती' बसमध्ये चढल्यानंतर चपळाईने पुढे गेली. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या एका जागेवर बसलेल्या मुलाला तिने उठायला लावले आणि ती जागा तिने पकडली. बस आल्यानंतर रांग मोडून सारे लोक धांवले आणि धक्काबुक्की करत आत घुसले. अशा धक्काबुक्कीपासून स्वतःचा जीव आणि खिशातले पाकीट सांभाळण्याच्या दृष्टीने मी त्यात सहभागी झालो नाही. सरळ पुढच्या दरवाजाने प्रवेश करून ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवलेली जागा गाठली. बहुतेक वेळी त्या जागेवर 'चुकून' बसलेला एक तरी बकरा सापडतो आणि मला ती जागा मिळते. पण त्या दिवशी त्या जागांवर बसलेले सगळेच माझ्यासारखेच ज्येष्ठ दिसत होते. त्यामुळे मला उभ्याने प्रवास करणे भागच होते.

एका मिनिटाच्या आत ती बस वाशीच्या टोलनाक्यापर्यंत आली. तोंवर माझे तिकीट काढून झाले होते. आता खाडीवरील पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतरच कोणी जागेवरून उठला तर मला बसायला मिळणार होते. पण त्यानंतर लगेच मला उतरायचे होते. एक हात खिशावर ठेवून आणि दुस-या हाताने खांबाला धरून हिंदकळत आणि आपला तोल सांवरत मी उभा राहिलो. अधून मधून आपली क्षमता पाहणेही आवश्यकच असते असे म्हणत मी स्वतःची समजूत घातली. खरोखर मला त्याचा फारसा त्रास वाटतही नव्हता. ही बस सोडली असती तर पुढच्या बससाठी स्टॉपवर पंधरा वीस मिनिटे उभे रहावे लागले असतेच. तेवढा वेळ बसच्या आत उभे राहिलो असे समजायला हरकत नव्हती.

राखीव सीट काबीज करून तिच्यावर आरूढ झालेली 'ती' जवळच बसली होती. अचानक 'ती' उठून उभी राहिली. 'ति'च्या ओळखीचे कोणी तरी मागून येत असेल असे समजून मी मागे वळून पाहिले. तिकडे कोणतीच हालचाल दिसली नाही. मला गोंधळलेला पाहून 'ति'ने मला खुणेनेच त्या जागेवर बसायची सूचना केली. मीही खुणेनेच 'स्त्रियांसाठी राखीव'चा फलक तिला दाखवला. आता मात्र ती बोलली, "मी माझी जागा तुम्हाला देते आहे."
"ते ठीक आहे. पण ..." असे म्हणत मी माझ्या मागेच उभ्या असलेल्या दुस-या मुलीकडे हळूच बोट दाखवले.
"तिची काळजी करू नका, तिला मी सांगेन." त्या मुलीला ऐकू येईल अशा पध्दतीने 'ती' अधिकारवाणीत बोलली. त्यावर कसलेही भाष्य करायची हिंमत त्या दुस-या मुलीला झाली नाही.
आता तिने दिलेल्या सीटचा स्वीकार करणे मला भागच होते. मात्र वर लिहिलेली तिच्याबद्दलची सर्व विशेषणे मी आता पार विसरून गेलो. त्यांऐवजी माया, ममता, करुणा वगैरे मूर्तिमंत होऊन माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आहेत असा भास मला होत राहिला.

No comments: