Sunday, July 18, 2010

मराठी गाणी भाग २

कै.राम गणेश गडकरी यांनी लिहिलेली एकच प्याला आणि भावबंधन ही नाटके १९१९ साली रंगभूमीवर आली. त्यापूर्वीच्या नाटकांची पात्रे दाढी, मिशा, जटा वगैरे वाढवून किंवा मुकुट घालून शेला पांघरून रंगमंचावर येत असत आणि गर्जना करून संस्कृत प्रचुर भाषेत पल्लेदार संवाद बोलत असत. राजमहाल, पर्णकुटी, बाग किंवा अरण्य यांची चित्रे असलेले पडदे पार्श्वभूमीवर दिसत. हे सगळे बदलून थेट तत्कालिन समाजातल्या घराघरात घडणारे नाट्य गडक-यांनी त्यांच्या या नाटकांमध्ये सादर केले. त्यांचे कथानक प्रेक्षकांना कुठल्या तरी पौराणिक किंवा काल्पनिक काळातल्या अद्भुत वाटणा-या जगात नेत नाही. त्या नाटकांमधील घटना आपल्याच शहरात घडल्या असाव्यात असे प्रेक्षकांना वाटावे आणि त्यातली भाषा रोजच्या बोलीभाषेसारखी असावी अशा पध्दतीने ही नाटके लिहिली आहेत. रोज बोलतांना कोणी गाणी गाऊन त्यात आपल्या मनातला आशय व्यक्त करत नाहीत, पण संगीत नाटकांनी प्रेक्षकांना एवढी मोहिनी घातलेली होती की गद्य नाटके त्यांना पसंत पडतील याची खात्री नव्हती. तसेच बालगंधर्वासारखा नटश्रेष्ठ त्यात काम करणार असेल तर त्याच्या अलौकिक गायनकौशल्याला पुरेसा वाव द्यायलाच हवा. नाटकाच्या व्यवसायातला हा एक अत्यंत महत्वाचा भाग होता. या कारणांमुळे गडक-यांच्या या नाटकात त्यांनी पदे घातलीच. एकच प्याला या नाटकातली कशि या त्यजू पदाला, प्रभु अजि गमला, लागे हृदयी हुरहुर, सत्य वदे वचनाला वगैरेसारखी नाट्यगीते अजरामर झाली आहेत. भावबंधन मधले कठिण कठिण कठिण किती हे गाणे त्या काळी तर गाजले असेलच, पुढे आशा भोसले यांच्या रेकॉर्डमुळे ते अतीशय लोकप्रिय झाले.

पारतंत्र्याच्या काळात १९२७ साली आलेल्या रणदुंदुभी या नाटकातल्या दिव्य स्वातंत्र्यरवि आणि परवशता पाश दैवे या नाट्यगीतांमध्ये उघड उघड स्वातंत्र्याचे गुणगान आणि आवाहन केले आहे तर जगी हा खास वेड्यांचा पसारा मांडला सारा या गाण्यात तत्कालीन समाजावर कोरडे ओढले आहेत. इंग्रज सरकारने हे नाटक कसे खपवून घेतले की त्यावर बंदी आणली होती ते मला माहीत नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी पाहिलेल्या काळात ही गाणी चांगली गाजली होती. १९३१ साली आलेल्या संन्यस्त खड्ग या अशाच वेगळ्या प्रकारच्या नाटकातली मर्मबंधातली ठेव ही, शतजन्मशोधतांना आणि सुकतातची जगी या ही गाणी आधी दीनानाथ मंगेशकरांनी आणि नंतर वसंतराव आणि आशाताईंनी गाऊन अजरामर केली. त्याच वर्षी आलेल्या संत कान्होपात्रा नाटकात घेतलेले अगा वैकुंठीच्या राया, अवघाची संसार सुखाचा करीन, जोहार मायबोप जोहार आणि पतित तू पावना हे अभंग बहुधा पहिल्यांदाच पारंपरिक चाली सोडून शास्त्रीय संगीताच्या आधारावर रचलेल्या नव्या चालींनर गायिले गेले आणि आजसुध्दा ऐकायला मिळतात. १९३३ सालच्या ब्रह्मकुमारी नाटकातले विलोपले मधुमीलनात या हे गाणेही आशा भोसले यांच्या आवाजात सर्वांनी ऐकले असेल.

वीसाव्या शतकाच्या तिस-या दशकात मराठी बोलपट येऊ लागले आणि त्याबरोबर त्यात गाणीही आली. १९३७ साली आलेल्या कुंकू चित्रपटातील भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे।।, मन सुद्द तुझं गोष्ट हाये प्रिथिवीमोलाची। तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची ।।, १९३८ सालच्या ब्रह्मचारीमधले यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता, १९३९ च्या माणूस मधले आता कशाला उद्याची बात, बघ उडुनि चालली रात ।। आणि १९४१ मधील शेजारी सिनेमातले लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ङी कांही उल्लेखनीय आणि अविस्मरणीय गाण्यांची उदाहरणे आहेत. त्या काळात लोकप्रिय असलेले नाट्यसंगीत तसेच हिंदी, बंगाली वगैरे परभाषांमधील संगीत यांचा प्रभाव या गाण्यांवर पडला असणार. वेळेच्या बंधनामुळे आलाप ताना न घेता ही गाणी गायली गेली आहेत. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार.

जसा नाट्यसंगीताचा चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर परिणाम झाला तसाच सिनेसंगीताचा परिणाम त्या काळात आलेल्या नाटकांच्या गाण्यांवरही झालाच असणार. १९४२ साली आलेल्या कुलवधू नाटकातली बोला अमृत बोला, मनरमणा मधुसुदना, क्षण आला भाग्याचा ही गाणी तसेच १९४४ च्या देवमाणूस मधली चांद माझा हा हासरा।. दिलरुबा मधुर हा जिवाचा । ही गाणी पूर्वीच्या काळातल्या नाट्यसंगीतापेक्षा कितीतरी निराळी आणि साधी सोपी वाटतात. चित्रपटसृष्टीच्या उदयानंतर संगीत रंगभूमी जवळजवळ इतिहासजमाच झाली.

. . . . . . . . (क्रमशः)

No comments: