अनीशच्या मुंजीला खूप लोक आले होते. त्याच्या आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक, बिल्डिंगमधले शेजारी, अनीशच्या शाळेतले त्याचे दोस्त, त्याच्या आईवडिलांची आणि आजोबाआजींची घनिष्ठ मित्रमंडळी आणि त्यांच्या ऑफिसांमधले सहकारी वगैरे वेगवेगळ्या कारणांनी त्या कुटुंबाशी जोडले गेलेले लोक आपापल्या ओळखीतल्या लोकांच्या लहान लहान कोंडाळ्यात जमून गप्पा मारत होती. त्यातले काही लोक एक ग्रुप सोडून त्यांच्या परिचयातल्या दुस-या तिस-या घोळक्यांमध्ये सामील होत होते, पण आधीपासून असलेल्या ओळखीच्या पलीकडे कोणीच फारसा जात नव्हता. तो समुदाय एकजिनसी असा वाटत नव्हता. प्रसादच्या डोक्यात त्यावेळीच एक कल्पना चमकून गेली की आधीपासून तो ठरवून आला होता कोण जाणे, त्याने आमच्याकडच्या सगळ्या आप्तांना बोलावून एकत्र जमवले. तो पंचवीस तीस लोकांचा जमाव झाला असेल. त्यांच्यापुढे त्याने एक प्रस्ताव मांडला, "इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे, आपले जे नातेवाईक आज उपस्थित नाहीत त्यांनाही बोलवायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. प्रत्येकजण आपापल्या येण्याजाण्याचा खर्च करतोच, त्या दिवशी राहण्याजेवण्याचा खर्च सर्वांनी समान वाटून घ्यायचा, यात कोणी यजमान नसेल की कोणी पाहुणा नसेल. आदरातिथ्य, मानपान, देणे घेणे असले कांही नाही. किती लोकांची तयारी आहे?"
आधी तर सर्वांना ही कल्पना जराशी धक्कादायक वाटली. पूर्वीच्या काळी वाहतुकीची फारशी सोय नसल्यामुळे प्रवास करणे जिकीरीचे वाटत असे. माझ्या मागच्या पिढीतले लोक फक्त महत्वाच्या कारणापुरता अगदी किमान अत्यावश्यक तेवढाच प्रवास करत असत. माझ्या पिढीतल्या लोकांनी कधी तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी, तर कधी निसर्गसौंदर्य, प्रेक्षणीय स्थान किंवा ऐतिहासिक स्थळे पहाण्यासाठी पर्यटन करायला सुरुवात केली होती. कधी ऑफीसकडून मिळणा-या लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन किंवा असिस्टन्स वगैरेमधून तर कधी स्वतःच्या खर्चाने यासाठी भ्रमण करणे सुरू झाले होते. पुढच्या पिढीमधली मुले एक दोन दिवस मजेत घालवण्यासाठी एकाद्या रिसॉर्टमध्ये सर्रास जायला लागली होती. पण अशा रीतीने सगळ्या आबालवृध्द नातेवाइकांनी एका ठिकाणी जमायचे ही कल्पना भन्नाट वाटत होती. एक दोन सेकंद सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहून अंदाज घेत राहिले. सर्वांना ती कल्पना आवडली आणि ती प्रत्यक्षात आणायचे एकमुखाने ठरले. ठरले खरे, पण कशी हा प्रश्न होता. लग्नकार्य वगैरे ज्याच्याकडे असेल ते कुटुंब सारी व्यवस्था करते, पण अशा संमेलनाची व्यवस्था कोण करणार? अशी शंका अनेकांच्या मनांना चाटून गेली.
या प्रश्नावर सविस्तरपणे विचार विनिमय झाला. व्यवस्था करण्यासाठी ती किती माणसांची आणि कुठे करायची याचा अंदाज करायचा होता. त्यासाठी या कार्यक्रमात कोणाकोणाला सहभागी करून घ्यायचे हे आधी ठरवायला पाहिजे. एरवी पिकनिकसाठी जातांना एकाद्या भागात राहणारे लोक एका जागी जमून बसने प्रयाण करतात. बसमध्ये जागा शिल्लक असली तर जवळचे आप्त, मित्र वगैरेंना घेऊन जातात, तसे केले तर सर्वांना बांधणारे समान सूत्र त्यात राहणार नाही आणि हे टाळायचे होते. त्यामुळे फक्त जे एकमेकांचे नातेवाईक आहेत अशांनाच बोलवायचे असे ठरले. माझे आजोबा आणि त्यांची मुले म्हणजे आमचे बाबा, काका आणि आत्या यातले कोणीच आता हयात नाहीत. पण या लोकांच्या पुढल्या पिढीतले आम्ही सर्वजण सख्खे, चुलत, आत्तेमामे भावंडे आहोत. ते आणि त्यांची मुले, नातवंडे एवढाच परिवाराचा आवाका निश्चित करण्यात आला. एका बहिणीचा दीर आणि तिच्या भावाची मेहुणी असे नातेवाईक त्यांना कितीही जवळ वाटत असले तरी इतरांना ते परकेच वाटणार. त्यामुळे समान सूत्र रहाणार नाही. असा गोंधळ होऊ नये याचा विचार करून नातेवाइकांसाठी ही मर्यादा ठरवण्यात आली. त्या दिवशी मुंजीच्या ठिकाणी ज्या लोकांना या चर्चेसाठी एकत्र आणलेले होते ते सारे या व्याख्येत बसणारे असेच होते. ते आणि त्यांच्या परिवारातले इतर मेंबर किती आहेत त्यांची संख्या मोजली. तसेच जे आले नव्हते त्यांची नांवे लिहून संपूर्ण यादी तयार केली आणि तिथल्या तिथे त्यांना मोबाईलवरून फोन करून त्यांचे मत विचारले गेले. एकंदरीत सगळ्यांनाच उत्साह दिसत असल्यामुळे ही कल्पना पुढे रेटायचे एकमताने ठरले.
माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात संततीनियमन, कुटुंबनियोजन वगैरे शब्दसुध्दा निर्माण झाले नव्हते. त्यामुळे सरसकट सगळ्या कुटुंबांमध्ये आठ दहा मुले असतच. त्यातले अपमृत्यू, वैराग्य, आजारपण वगैरेमध्ये गाळले गेलेले वगळून घरटी सरासरी पाच धरले तरी दोन पिढ्यांमध्ये त्यांची संख्या पंचवीसपर्यंत जायचीच. माझ्या पिढीमधल्या भावंडांची संख्या त्यांच्या जोडीदारांसह पन्नासापर्यंत पोचते. त्यांनी हम दो हमारे दो या मंत्राचा अवलंब केला तरी माझ्या मुलांच्या पिढीत घरातल्या चाळीस पन्नास व्यक्ती आणि तितकेच त्यांचे जोडीदार धरून ऐंशी नव्वद होतात. त्यांच्या पुढच्या पिढीमधल्या म्हणजे आताच्या लहान बालकांची गणना धरून एकंदर संख्या दीडशेच्या वर गेली. यातली अर्ध्याहून अधिक मंडळी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर या भागात राहतात आणि उरलेली मंडळी कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखुरली आहेत. काही जण परदेशात गेलेले आहेत. त्यातले कोणी मुद्दाम या संमेलनासाठी येतील अशी शक्यता फार कमी होती. महाराष्ट्रातले ऐंशी टक्के आणि इतर राज्यांमधले पन्नास टक्के लोक येतील असे धरले तरी ऐंशीच्या वर उपस्थिती अपेक्षित होती. सर्वांना येण्याच्या दृष्टीने पुणे हे मध्यवर्ती शहर सोयिस्कर पडत असल्यामुळे त्याची निवड झाली. शहरातल्या एकाद्या कार्यालयात किंवा हॉलमध्ये जमलो तर लोक तेवढ्यातल्या तेवढ्यात बाजारात जाऊन खरेदी करायचा किंवा दुसरे एकादे काम करून यायचा विचार करतात असा अनुभव येतो. ते करायची संधी मिळू नये म्हणून शहरापासून दूर एकाद्या निवांत जागी असलेल्या रिसॉर्टवर जमायचे असे सर्वानुमते ठरले आणि पुण्यातल्या उत्साही तरुण मंडळींनी त्याची चौकशी करायची असे ठरले. दोन तीन आठवड्याच्या काळात सर्वांनी आपापल्या कुटुंबातल्या माणसांची संख्या सांगायची आणि लगोलग दर डोई पाचपाचशे रुपये जमा करायचे असेही ठरवण्यात आले.
. . . . . . . . . . . . . (क्रमशः)
1 comment:
पुढचा भाग लवकर टाका.
Post a Comment