Thursday, July 08, 2010
पंपपुराण - द्वितीय खंड -३
पिचकारीसारखा दिसणारा किंवा पिचकारीमध्ये जरासा बदल करून तयार केलेला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आपण पहिल्या भागात पाहिला. तीनशे वर्षांपूर्वी ज्या वेळी वाफेवर चालणारे इंजिन अस्तित्वात आले नव्हते त्या काळात अशा प्रकारचे पंप बनवले जात असावेत. न्यूकॉम याने तयार केलेले जगातले पहिले वाफेचे इंजिन सिलिंडर आणि पिस्टनचा वापर करून बनवले गेले होते आणि त्याचा उपयोगसुध्दा अशा प्रकारच्या पंपाला जोडून पाणी उपसण्यासाठीच त्याने केला होता. पुढे जेम्स वॅट याने या इंजिनात खूप सुधारणा करून त्याला स्वयंचलित केले. त्यामुळे जेम्स वॅटलाच वाफेच्या इंजिनाचा जनक मानले जाते. त्याने तयार केलेल्या पहिल्या इंजिनाचा उपयोग देखील पाणी उपसण्यासाठीच केला होता. या दोन्ही इंजिनांची चित्रे वर दिली आहेत.
या इंजिनांची रचना आणि पंपाची रचना साधारणपणे सारखीच आहे. बॉयलरमध्ये निर्माण झालेली खूप जास्त दाब असलेली ऊष्ण वाफ सिलिंडरला जोडलेल्या एका झडपेमधून आत शिरते आणि पिस्टनला जोराने वर ढकलते. त्यामुळे त्याचा दांडा वर सरकतो. तो खाली येतांना वाफेला खाली ढकलतो. त्यामुळे थंड आणि कमी दाबाची वाफ दुस-या व्हॉल्व्हमधून बाहेर पडून कंडेन्सरकडे जाते. अशा रीतीने आलटून पालटून इंजिनाचा दांडा वर खाली होत राहतो. एका तरफेमार्फत हा दांडा पंपाच्या दांड्याला जोडला असल्यामुळे तोही खाली वर होत राहतो आणि त्यामुळे विहिरीतले पाणी उपसले जाते.
वाफेच्या इंजिनाचे प्रात्यक्षिक दाखवतांना नुसताच त्याचा दांडा आत बाहेर झालेला दाखवला तर ते कदाचित त्या काळातल्या लोकांना फारसे आवडले नसते. "याचा उपयोग काय?" असा खंवचट प्रश्न त्यांनी विचारला असता. त्यापेक्षा विहिरीतले पाणी कसे आपोआप बाहेर येते हा चमत्कार पहायला लोकांनी गर्दी केली असती, त्याचे कौतुक केले असते. असे असले तरी विहिरीशेजारी एवढे अवजड धूड बसवायला फारसे कोणी उत्सुक असणार नाही आणि पारंपारिक रहाटगाडग्याची जागा कांही हे इंजिन घेणार नाही हे हुषार वॅटच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने लगेचच त्याच्या इंजिनाचा दांडा एका क्रँकला जोडून त्याने एक चांक फिरवण्याची सोय करून दाखवली. आपोआप फिरणारे चक्र पाहताच त्याचे असंख्य उपयोग सुरू झाले. धान्य दळण्यासाठी पिठाची चक्की, सूत कातण्याचे चरखे, कापड विणण्याचे माग वगैरे मूलभूत गरजांपासून रुळावर धांवणा-या आगगाड्या आणि समुद्रात जाणारी जहाजे यांपर्यंत अनेक कामासाठी वाफेच्या इंजिनांचा वापर सुरू होऊन यंत्रयुग अवतरले.
पाणी उपसण्यासाठी आणि इतर द्रवपदार्थांना वाहते करण्यासाठी अशा प्रकारच्या पंपांचा उपयोग होत राहिलाच. मात्र गरजेनुसार आणि सोयीसाठी त्यांच्या रचनेत आमूलाग्र फरक होत गेले. मुख्य म्हणजे या पंपाचा लांब दांडा हा हाताने वर खाली करण्यासाठी सोयीचा असला आणि इंजिनाच्या दांड्याला थेट जोडता येत असला तरी त्याला फिरत्या चांकाबरोबर जोडणे गैरसोयीचे असते. त्यासाठी खूप मोठे चाक बनवावे लागते. त्यामुळे लहानशा आकाराच्या विजेच्या मोटरला जोडण्यासाठी या पंपाचा आकार लहान होत गेला आणि पिस्टनची लांबी लहान होत होत पिस्टनचा प्लंजर झाला. अशा प्रकारचे निरनिराळे पंप पुढे येणा-या भागांमध्ये पाहू.
. . . . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment