Thursday, May 21, 2009

आपण सारे कोट्याधीश!..... नाही होणार!

१५०० अब्ज डॉलर!' या विषयावर कांही दिवसांपूर्वी मिसळपाव या संकेतस्थळावर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक सदस्यांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते.
"१.स्वीस बॆंकेतले पैसे काढून सर्व उधा-या (जागतिक बॆंकेच्या कर्जासहीत ) देऊन टाकू आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर प्रश्नांची सोडवणूक करायची."
"२. हा पैसा जर भारतात आणला, समजा जर तो पैसा वाटायचा ठरवला प्रत्येक भारतीयाला तर, सर्वजण लखपती होतील एवढा पैसा आहे हा."

शेकड्यांनी अब्ज बिब्ज आणि ते सुध्दा डॉलर्स !(म्हणजे कित्त्त्ती रुपये होतील!) यासारख्या अगडबंब संख्या वाचूनच आपली मती गुंग होते. पण या चर्चेची हजाराच्या वर वाचने झाली आहेत. या वाचकांपैकी कोणीही वरील विधानांना आक्षेप घेतला नाही त्या अर्थी त्यातले आंकडे आणि हिशोब बरोबरच असणार असे समजायला हरकत नसावी. शिवाय भारताच्या एका थोर नेत्याने ही आंकडेवारी जाहीर सभेत सांगून ते पैसे ताबडतोब भारतात परत आणण्याची मागणी केल्याचे वृत्त वाचले. हे सद्गृहस्थ कोणत्याही क्षणी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी कधीचे सज्ज होऊन बसले आहेत. त्यामुळे ते बेजबाबदार विधाने किंवा अशक्यप्राय मागण्या करणार नाहीत अशी किमान अपेक्षा आहे. पंतप्रधान होताच लगेच याबाबत कारवाई करण्याचे वचनही त्यांनी जाहीरपणे जनतेला दिले. सत्यवचनी प्रभू श्रीरामचंद्र या चांगल्या कार्याला आपले आशीर्वाद देतील, त्यांच्या कृपाप्रसादाने हे नेताजी पंतप्रधानपद भूषवतील आणि दिलेल्या वचनाला जागून या कामासाठी तत्परतेने पाउले उचलतील असे मला त्या वेळी वाटले. त्यानंतर एकदाचा स्विस बँकेतल्या पैशाचा ओघ भारताच्या दिशेने वहायला लागला की सगळीकडे आबादी आबाद होईल या विचाराने मी हरखून गेलो होतो.

रस्त्यावरल्या दुकानांच्या कांचेच्या खिडक्यांतून दिसणा-या कांही छुटपुट वस्तू कधीपासून मला खिजवत आहेत, पण पैशांअभावी तूर्तास नको म्हणत आतापर्यंत त्या घेतल्या गेल्या नव्हत्या. आता लवकरच आपल्या घरात माणशी रोकड लाखलाख रुपये येणार. ते पैसे आले की एका दमात त्या सगळ्या एकदाच्या घरात आणून टाकता येतील. याबद्दल आश्वस्त झाल्यानंतर "ये दिल माँगे मोअर" या उक्तीप्रमाणे आणखी काय काय मिळू शकते याचे स्वप्नरंजन सुरू झाले. जर स्विस बँकेतले पैसे जप्त करून इकडे आणता येत असतील तर इतर ठिकाणी दडवलेली संपत्तीसुध्दा ताब्यात घेता येईल. तसे झाले तर आपल्याला किती धनप्राप्ती होऊ शकेल याची आकडेमोड करायला सुरुवात केली. हजारो अब्जावधी, म्हणजे खर्व, निखर्व का काय म्हणतात तसली ही प्रचंड संख्या आपल्याने पेलवली जात नसल्यामुळे बीजगणितातल्या पहिल्या धड्यात शिकल्याप्रमाणे ही संख्या 'क्ष' इतकी आहे असे मी समजून घेतले. कोणाला 'क्ष' हे जोडाक्षर पसंत नसेल, लिहिता येत नसेल किंवा उच्चार करायला कठीण वाटत असेल तर त्याने ती संख्या (स्वतः नव्हे) 'ढ' आहे असे मानले तरी तिच्यात कांही फरक पडत नाही.

जगातल्या कुठल्याही देशातली कुठलीही बँक लोकांनी दिलेले पैसे आपल्याकडे ठेवून घ्यायला नेहमीच तयार असते. ते काम फक्त स्विस बँकांनाच जमते अशातला भाग नाही. अल्बानियापासून झांबियापर्यंत (ए टू झेड्) शेकडो देश या जगात आहेत. कांही माणसे ऊठसूट मॉरिशस, दुबई किंवा सिंगापूरला जात येत असतात म्हणे. सगळ्या पैसेवाल्या लोकांनी स्विस एअरमध्ये जाऊन गर्दी करण्यापेक्षा वेगवेगळ्या दिशांना जाण्याने इतरांपासून आपले तोंड लपवायलाही त्यांना सोय़ीचे पडत असेल. त्यामुळे स्विट्झरलंडशिवाय जगातल्या इतर देशातील बँकांतसुध्दा त्या लोकांनी बरेचसे पैसे ठेवलेले असण्याची दाट शक्यता वृत्तपत्रातूनच व्यक्त केली जात होती. यासंबंधी निश्चित माहितीच्या अभावी जरी फिप्टीफिफ्टी परसेंट धरले तरी भारतीय कुबेरांची जितकी माया स्विस बँकांत ठेवलेली आहे तितकी तरी इतर सर्व देशांत मिळून आहे असे मानले तर एकंदर '२ क्ष' झाले.

धनवान लोक आपल्याकडचे सगळे पैसे कधीच रोकड्यात ठेवत नाहीत. अनेक प्रकाराने त्याची गुंतवणूक करतात. या लोकांनी सुध्दा परदेशात जमीनी, बागबगीचे, बंगले, हॉटेले, कारखाने, इतर इमारती, मोटारगाड्या, जहाजे, विमाने वगैरे घेऊन ठेवली असतीलच. कांही लोकांनी तर कुठकुठल्या महासागरांमधली अख्खी बेटे विकत घेऊन ठेवली आहेत असे ऐकले. पुन्हा एकदा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या लोकांची परदेशातली एकंदर मालमत्ता '४ क्ष' इतकी होईल. आज हातात पैसे आले की लगेच ते तिकडे नेऊन ठेवले किंवा कशात गुंतवले असे कोणालाही इतक्या सहजासहजी करता येणार नाही. परदेशाची वारी करण्यासाठी कांही वेळ लागतो आणि खर्च येतोच. त्यासाठी लागणा-या वर्किंग कॅपिटलचा विचार करता या लोकांची परकीय चलनातील संपत्ती '५ क्ष' इतकी असेल असा अंदाज करता येईल.

परदेशात इतकी अपार माया राखून ठेवणारे लोक आपल्या देशातसुध्दा रुबाबानेच राहणार. कांहींच्या घरातल्या मंडळींच्या अंगावर सोने, हिरे, माणके, मोती वगैरे नवरत्नांचे अलंकार असतील, तर कांही लोकांच्या मालकीचे बंगले, राजवाडे, फार्महाउसेस, मॉल्स वगैरे जागोजागी घेऊन ठेवलेले असणार आणि सुंदर व महागड्या हंड्या, झुंबरे, पुतळे, गालिचे वगैरेंनी त्या इमारती सुशोभित केलेल्या असतील. त्याशिवाय जमीनजुमला, बागबगीचे, बड्या कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स वगैरे असतीलच. पॅन कार्डाची भानगड सुरू झाल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या नांवाने त्यातल्या सगळ्या गोष्टी नसतील; त्यांचे आप्तेष्ट, विश्वासू नोकरचाकर, कुत्री, मांजरे, पोपट वगैरेंची नांवे रेकॉर्डवर असतील, पण कसल्या ना कसल्या रूपात ही संपत्ती अस्तित्वात असेलच. पुन्हा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या लोकांची स्वदेशातली संपत्ती धरून एकंदर मालमत्ता '१० क्ष' होईल.

ही फक्त जे स्विस बँकांत खातेधारक आहेत अशा बड्या लोकांची गोष्ट झाली. बक्षिसी, खुषी, चिरीमिरी, वर्गणी, निधी, हप्ता वगैरे मार्गांनी सामान्य माणसांकडून ज्यांना लाभप्राप्ती होते ते सगळे लोक आपली कमाई थेट स्विस बँकांत नेऊन ठेवू शकत नाहीत. त्यातल्या हजारात फार फार तर एकादा कधीतरी एकदा परदेशी जाऊन आला असेल आणि तिथे खाते उघडून त्यात पैसे ठेवणारा तर दशसहस्रेषु एक सुध्दा मिळेल की नाही याची शंका आहे. या लोकांच्या मानाने बड्या लोकांची क्षमता दहा हजारपट आहे असे जरी धरले तरीसुध्दा जेवढी माया त्यांनी जमवली असेल तेवढी तरी या सर्व लहान सहान लोकांकडे मिळून असेलच. म्हणजे पुन्हा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या सर्व लोकांनी गैरमार्गाने मिळवलेली एकंदर मालमत्ता '२० क्ष' इतकी होईल. म्हणजेच या अवैध मार्गाने मिळवलेल्या धनाच्या हिमनगाचा 'क्ष' इतक्या आकाराचा भाग आता स्विस बँकेतल्या ठेवींच्या रूपात पाण्याच्या वर दिसू लागला असला तरी त्याचा अंतर्गत विस्तार '२०क्ष' इतका असावा.

हा सगळा हिशोब पैसे घेणा-या लोकांचा झाला. पण इतका पैसा त्यांना कोणी आणि कशासाठी दिला असेल? याचाही विचार करायला पाहिजे. कोणाही माणसाच्या मनात कधी वैराग्याची किंवा औदार्याची भावना जागृत झाली तर तो आपली जास्तीची संपत्ती गरीब आणि गरजू लोकांना दान करेल. जेंव्हा त्याला स्वतःला भरपूर लाभ होईल किंवा होण्याची खात्री वाटेल तेंव्हाच तो त्यातला कांही भाग त्या कामात सहाय्य करणा-या दुस-या कोणाला तरी खाऊ घालेल. सर्वसामान्य माणसाला शंभर रुपये मिळाले तर खूष होऊन तो त्यातला एकाद दुसरा रुपया बक्षिसी देईल किंवा पाचदहा रुपये कमिशन कुरकुरत देईल. कशाचा तरी गैरफायदा उठवायचा असेल तर त्यातली टक्केवारी वाढून कदाचित वीसपंचवीसावर जात असेल. म्हणजेच जर पैसे घेणा-या लोकांनी अवैध मार्गाने मिळवलेली मालमत्ता '२० क्ष' इतकी असेल तर ते पैसे देणा-या लोकांना त्यातून '१०० क्ष' इतका फायदा मिळाला असणार. 'क्ष'चा अर्थ माणशी लाख रुपये असेल तर '१०० क्ष' म्हणजे दर डोई कोटी रुपये इतका झाला. याचाच अर्थ आपला देश केवढा श्रीमंत आहे! अर्थातच हे सगळे धन आपल्या अर्थव्यवस्थेतच कुठे तरी असायला हवे, कदाचित असेलही. आपल्या चर्मचक्षूंना ते दिसून येत नाही, पण अर्थशास्त्रज्ञ ते शोधून काढू शकतील.
आता हरिदासाची कथा मूळ पदावर आणतो. आपले संभाव्य पंतप्रधान स्विस बँकेतून 'क्ष' इतकी संपत्ती परत आणणार होते. त्यांनी भारतातल्या सर्व जनतेला ते पैसे वाटले तर आपल्याला प्रत्येकी लाख लाख रुपये मिळाले असते. एकदा कां त्या खातेधारकांची नांवे समजली की आणखी एक पाऊल पुढे टाकून त्यांची '१० क्ष' इतकी सारी बेहिशेबी संपत्ती जप्त करून ती जनतेमध्ये वाटली तर प्रत्येकी दहा दहा लक्ष रुपये मिळतील. लांच खाणे हा जसा गुन्हा आहे तसेच ती देणेसुध्दा गुन्हाच आहे. त्यामुळे ती देऊन ज्यांचे उखळ पांढरे झाले असेल त्यांची संपत्तीसुध्दा ('१०० क्ष' इतकी) सरकारने ताब्यात घेऊन लांच घेणारे आणि देणारे यांच्यासकट तमाम जनतेला ती सम प्रमाणात वाटली तरी प्रत्येकाच्या वाट्याला एक कोटी रुपये येतील. मग तर सर्वांची मज्जाच मज्जा ! तिथेही सगळे पैसे मिळाले नाहीत आणि फिफ्टीफिफ्टीचा नियम लावला तरी सुध्दा घरटी एक एक कोटी रुपये येतील.

इतका मोठा पांढरा पैसा विनासायास आणि बिनाटेन्शन मिळाला तर अपवादास्पद अशा कांही फार मोठ्या अब्जाधीश व्यक्ती वगळता बहुतेक सर्वसामान्य पैसेखाऊ लोकसुध्दा खूषच होतील आणि कदाचित आपले आचरण सुधारतीलसुध्दा. लांच देऊन कामे करवून घेणारे लोक कांही न देताच त्यांना मिळणा-या लाभाने नक्कीच सुखावणार. इतर सर्वसामान्य लोकांना तर प्रत्यक्ष देवानेच छप्पर फाडून त्यांचेवर खैरात केल्याचा आनंद मिळेल. अशा रातीने सर्व जनता सुखसागरात डुंबू लागेल. पण एक अडचण येण्याचा धोका मात्र दिसतो. आपले घरकाम, घराची रखवाली, साफसफाई वगैरे करणारे, कोप-यावरले छोटे दुकानदार, भाजीविके, पेपरवाले, दूधवाले, भेळपुरी किंवा वडापाव विकणारे, रिक्शाचालक, बस ड्रायव्हर-कंडक्टर वगैरे वगैरे वगैरे सगळे सर्वसामान्य लोक एकाएकी कोट्याधीश झाले तर कदाचित आपापल्या कामावर येणार नाहीत, त्यांच्याविना आपली सारी कामे अडतील, घरात किंवा घराबाहेर आपल्याला कोणीच विचारणार नाही आणि आपण कोट्याधीश कशाला झालो? असे वाटू लागेल.

या भीतीमुळे माझे गणित मी कुणालाही सांगितले नव्हते. पण आता तो प्रश्नच मिटल्यामुळे मी हळूच एका मित्राच्या कानात पुटपुटलो. त्यावर तो लगेच उद्गारला,"अरे तुला आता वेडा म्हणायचं कां खुळा म्हणायचं? (जाऊ द्या, हे नेहमीचेच आहे आणि हा त्याचा प्रॉब्लेम आहे.) तुझ्या त्या नेताजींनी स्विट्झर्लंडमधले पैसे आणू असं म्हंटलं असेल, पण ते तुला मला त्यातले लाख लाख रुपये देतो असे कांही म्हणाले होते कां? त्यांनी पैसे आणलेही असते तरी त्याच्या बातमीनेच महागाई तेवढी वाढली असती मात्र आणि त्याच्या झळा आपल्यालाच लागल्या असत्या. म्हणूनच कदाचित लोकांनी त्यांना निवडून आणलं नसेल!"

तळटीपः- या लेखात वर्तवलेले सगळे निव्वळ अंदाज आहेत, त्यामागे कोठलेही शास्त्र नाही. ते ज्यांच्या आधारावर केले आहेत ती कारणे वर वर पटण्यासारखी वाटली तरी त्यात कांही ढोबळ मूलभूत चुका आहेत. चाणाक्ष वाचक त्या दाखवून देतीलच.

No comments: