Saturday, May 23, 2009

ग्रँड युरोप - भाग २७ : दूरतक निगाहोंमें हैं गुल खिले हुवे


दि.२७-०४-२००७ बारावा दिवस: दूरतक निगाहोंमें हैं गुल खिले हुवे

युरोपमध्ये उतरल्यापासूनच ट्युलिपची फुले दिसायला लागली होती. कुठे हॉटेलच्या स्वागतकक्षात त्याचा गुच्छ ठेवलेला असे, तर कुठे इमारतींच्या समोरील बगीचामध्ये त्या टवटवीत फुलांचा छोटासा ताटवा फुललेला दिसायचा. कांही ठिकाणी रस्त्यांच्या चौकांमधील वर्तुळात तर कधी रस्त्यांना विभागणा-या जागेत त्यांची रांग दिसे. साल्झबर्ग येथील मीराबेल गार्डनमध्ये तर रंगीबेरंगी ट्यूलिपच्या फुलांची जणू एक विस्तीर्ण रांगोळीच घालून ठेवलेली होती. स्विट्झरलँड आणि जर्मनीतसुद्धा जागोजागी ट्युलिपच्या कळ्या नाही तर फुले दृष्टीला पडतच होती. पण हॉलंडमध्ये गेल्यावर त्यांनी फुललेली शेते दिसू लागली. आमच्या हॉटेलच्या रस्त्यावरच रस्त्याच्या कडेपासून थेट नजर पोचेपर्यंत लाल, पिवळ्या, केशरी किंवा हिरव्या लांब रुंद पट्ट्यांचा अवाढव्य गालिचा पसरलेला पाहून डोळे तृप्त होत होते.

अॅमस्टरडॅमहून प्रस्थान ठेवल्यानंतर थोड्याच वेळांत कोकेनॉफ येथील ट्यूलिप गार्डनला जाऊन पोचलो. जगातील या सर्वात मोठ्या पुष्पवाटिकेला द्यायची भेट हा आमच्या दौ-यामधील एक महत्वाचा भाग होता. वीस मे नंतर ही बाग पहाण्याची संधी मिळणार नव्हती म्हणून आम्ही या युरोपच्या दौ-यावर जाण्याची घाई केली होती. बागेच्या बाहेरच प्रशस्त पार्किंग लॉट होते व त्यात शेकडो कार, कॅरॅव्हॅन आणि बसगाड्या उभ्या होत्या. बसगाड्यांसाठी राखून ठेवलेल्या आवारात आम्ही एक जागा मिळवली आणि बागेत प्रवेश केला. सुमारे ऐंशी एकर आकाराच्या एका मोठ्या शेताएवढ्या विस्तीर्ण जागेत ही बाग एसपैस पसरली आहे. ट्यूलिपखेरीज कितीतरी इतर सुंदर फुलझाडे, लुसलुशीत गवत आणि घनदाट झाडीसुद्धा या आवारात पद्धतशीररीत्या वाढवलेली आहे. पाण्याचे तलाव आणि त्यात तरंगणारी 'बदके पिले सुरेख'ही आहेत आणि हंससुद्धा आहेत.

ट्यूलिप ही लिलीच्या जातीची वनस्पती आहे. त्याचे हजाराहून अधिक प्रकार या बागेत लावतात. सर्वसामान्य ट्यूलिपचे झाड गुढघाभर उंचीचे असते. झाड म्हणजे एक सरळ उभा दांडा, त्याला दोन तीन कर्दळीसारखी मोठी पण दांड्याला लपेटलेली पाने आणि डोक्यावर एक मोठे फूल एवढेच. हे फुल उमलल्यावर अप्रतिम सुंदर दिसतेच, पण न उमललेली पेरूएवढी मोठी कळीसुद्धा खूप छान दिसते. एकच कळी किंवा फूल पहायला गेले तर कदाचित थोडे बटबटीत वाटेल, पण खरे नेत्रसुख एक फूल हांतात घेऊन पाहण्यात नसून एकसारख्या झाडांना एकाच वेळी लागलेल्या एकसारख्या फुलांच्या रांगा पहाण्यात आहे. याचे कंद लावल्यापासून सुमारे वर्षभराने त्यावर फुले येतात, पण ती फक्त वसंत ऋतुमध्येच येतात. म्हणजे त्यांच्या लागवडीसाठी बारा महिने खपावे लागते पण फक्त दोन महिने ती बाग प्रदर्शनीय असते. तेवढ्यात जवळ जवळ एक कोटी पर्यटक ती पाहून जातात म्हणे. म्हणजे रोज किती लोक येत असतील त्याचा हिशोब करावा.

ट्यूलिपच्या फुलांच्या शेकडो रंगछटा तर इथे पहायला मिळतातच, पण दोन दोन रंग असलेली फुलेही आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळे आकारसुद्धा आहेत. कांहींच्या पाकळ्या सरळ असतात, तर कांही फुलांच्या पाकळ्यांना दंतुर कडा असलेल्या दिसतात. कांही ताटवे एकाच रंगाच्या फुलांनी भरलेले होते तर कांहींमध्ये दोन किंवा अधिक रंगांचे डिझाईन केलेले दिसले. वसंत ऋतूमध्ये फुलणारी इतर अनेक फुलझाडेसुद्धा इथे आहेत. कांही झाडांची पानेच फुलांसारखी सुंदर आहेत, तर कांहींची फुले पानांसारखी हिरवी गार दिसतात. निसर्गाचे वैभव असे अनंत त-हांनी मुक्तपणे खुललेले पहायला मिळते. कांही नाजुक वनस्पतींच्या लागवडीसाठी एक प्रचंड ग्रीन हाऊस उभारले आहे. सगळ्या बाजूने संपूर्णपणे कांचेने बंद अशा या भागात प्रकाश, हवा, पाणी वगैरे सगळ्याच गोष्टी कृत्रिम साधनांनी नियंत्रित करून दिल्या जातात. यामुळे युरोपचे वातावरण सहन करू न शकणा-या झाडांची फुलेसुद्धा इथे पहायला मिळतात. ट्यूलिपसारख्या युरोपची हवा मानवणा-या झाडांवर देखील नवनवे प्रयोग करून पाहणे या कृत्रिम विश्वात चाललेले असते.

या बागेत साठ सत्तर लाख एवढी फुलझाडे तर आहेतच. मधून मधून सुंदर पुतळे ठेवून तिच्या आकर्षकतेत भर घातली आहे. यांत ग्रीक देवता डायनासारखी प्राचीन कालीन शिल्पे आहेत तसेच नव्या युगातील कलेचे प्रतिनिधीत्व करणा-या कलाकृतींचे नमूने आहेत. हे विश्व पहायला येणारे जगभरातून आलेले पर्यटक होते. यात आबालवृद्ध सगळ्या वयोगटांमधील लोक होते. चिमण्या बाळांना बाबागाडीतून फिरवीत हिंडणारे आईवडील होते तसेच अपंगत्वामुळे किंवा वृद्धापकालामुळे चालू न शकणारे लोक स्वतःच व्हीनचेअरवर बसून फिरत होते. सगळ्यांच्या चेहे-यावर तिथल्या असंख्य फुलांचा उल्हास फुललेला दिसत होता.

कांही हिंदी सिनेमातसुद्धा या ट्यूलिपच्या बागांची दृष्ये दाखवली जातात. त्यातील सर्वात प्रसिद्ध सीन अमिताभ बच्चन व रेखा यांच्या सिलसिला चित्रपटातील आहे. ही बाग पाहिल्यावर "देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुवे। दूरतक निगाहोंमें हैं गुल खिले हुवे।" या अजरामर गाण्याच्या ओळी ओठावर आल्याखेरीज रहात नाहीत.

नेदरलँडमधून फिरतांनासुद्धा जागोजागी दिसणा-या विंडमिल्स हे सहज नजरेला पडणारे तेथील आणखीन एक महत्वाचे वैशिष्ट्य. वाफेच्या इंजिनाचा शोध लागून यंत्रयुग सुरू होण्याच्याही आधीपासून माणसाच्या कामासाठी वाहत्या वा-याचा उपयोग करणे सुरू झालेले होते. शिडांत वारा भरून त्याच्या जोरावर मार्गक्रमण करणारी जहाजे व नौका तर शेकडो वर्षापूर्वीपासून माणूस तयार करून वापरीत होता. त्या शिडांची पाती बनवून त्यापासून पवनचक्की बनवण्यात आली आणि त्याच्या जोरावर यंत्रांची चाके फिरू लागली. त्या चाकांना जाते जोडून त्यातून धान्याचे पीठ करणे, घाणा जोडून त्यातून तेल काढणे आणि करवत जोडून तिने लाकूड कापणे अशा कामांसाठी त्याचा उपयोग होऊ लागला. अशा प्रकारच्या पवनचक्क्या युरोपातील अनेक देशात सुरू झाल्या असल्या तरी हॉलंडमध्ये त्यांच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळाली. समुद्रसपाटीखाली असलेल्या जमीनीवर साठणारे पाणी उपसून समुद्रात टाकण्यासाठी जागोजागी पवनचक्क्या उभारल्या गेल्या. दीपस्तंभासारख्या पण कमी उंचीच्या दगडी मनो-यावर या जुन्या पवनचक्क्या बसवलेल्या असत. लाकडाची चौकट बनवून त्यावर कॅनव्हाससारख्या जाड कापडाची पाती बसवली जात. जत्रेत मिळणारे कागदाचे भिरभिरे जसे वा-याच्या दिशेने धरले की गोल गोल फिरते त्याच तत्वावर हे प्रचंड आकाराचे चाक वारा सुटला की फिरत राहते.

इंजिनांचा शोध लागल्यावर त्यांचा उपयोग करून पाणी उपसण्याचे पंप वेगाने चालवले जाऊ लागले. विजेचा वापर सुरू झाल्यावर ते काम अधिक सुलभ झाले. त्यामुळे कांही काळ पवनचक्क्यांकडे माणसाचे दुर्लक्ष झाले होते. पण पर्यावरणाचा विचार गांभीर्याने सुरू झाल्यावर आणि हलक्या वजनाचे पण मजबूत असे नवनवे पदार्थ बनायला लागल्यानंतर आता नव्या तंत्राने बनवलेल्या अधिक कार्यक्षम विंडमिल्स सुरू झाल्या आहेत. म्हणजे विजेने चाक फिरवणा-या पंख्याऐवजी वाहत्या हवेने पंख्याचे चाक फिरवून त्यापासून विद्युतनिर्मिती सुरू झाली आहे. हॉलंडमध्ये यासाठी अनुकूल परिस्थिती आधीपासूनच असल्यामुळे नवीन विंडमिल्स मोठ्या संख्येने जिकडे तिकडे दिसू लागल्या आहेत. जुन्या काळच्या उरल्यासुरल्या पवनचक्क्या पर्यटकांना दाखवण्यासाठी शाबूत ठेवल्या आहेत. तशीच एक इतिहासकालीन विंडमिल कोकेनॉफच्या बागेत उभी आहे. तिच्या आंतील गोल जिन्यावरून चढून वरपर्यंत जाता येते आणि तेथून खाली पसरलेल्या बगीच्याचे तसेच आजूबाजूच्या ट्युलिपच्या मळ्यांचे विहंगम दृष्य पहायला मिळते.

. . . . . (क्रमशः)

No comments: