Thursday, April 16, 2009

ग्रँड युरोप - भाग १ - प्रास्ताविक


दोन वर्षांपूर्वी १६ एप्रिललाच आम्ही युरोपच्या दौ-यावर जायला निघालो। त्या प्रवासात आलेले अनुभव शब्दबध्द करून ठेवले आहेत ते क्रमाक्रमाने देण्यास आजपासून सुरुवात करत आहे. ही मालिका जरा लांबच असल्यामुळे थोड्या थोड्या कालावधीने अधून मधून इतर विषयांवरील लेख देत राहणार आहे.
२००७चे नवे वर्ष सुरू होताच नव्या वर्षात काय काय करायचे याचा विचारही सुरू झाला होता. कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक वगैरे सगळ्या परिस्थिती व अवस्था विचारात घेतल्यानंतर आम्ही उभयतांनी या वर्षी टूरिस्ट कंपनीबरोबर एक छानशी सहल करून येणे ही सर्वोत्कृष्ट कल्पना आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले. वर्तमानपत्रात व टीव्हीवर रोज दिसणा-या अनेक प्रकारच्या अतिशय आकर्षक जाहिरातींचासुद्धा या निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याची दाट शक्यता आहे. काश्मीर, कन्याकुमारी व सिक्कीम ही भारताची तीन टोके माझी पाहून झालेली होती. मधला बराचसा भाग नजरेखाली येऊन गेला होता. उरलेला भाग थोडा थोडा करीत पाहणे चालूच होते. युरोप पहायची इच्छा मात्र बालपणापासून मनात घर करून राहिली होती, त्यामुळे युरोपची निवड होणे ओघानेच आले.
कुठल्या कंपनीची कुठली सहल निवडायची हा एक यक्षप्रश्न होता. ज्या कंपन्यांच्या मोठ्या जाहिराती पाहण्यात येतात त्यात केसरीचे नांव ठळकपणे नजरेसमोर येत होते. दोन तीन लोकांनी त्यांच्या व्यवस्थेसंबंधी अनुकूल मतही दिले होते म्हणून केसरीच्याच ऑफीसात प्रथम चौकशी करायला गेलो. त्यांच्या अद्ययावत पद्धतीच्या वातानुकूलित ऑफीसात प्रवेश करताच सस्मित स्वागत करून आम्हाला एका कॉन्फरन्स रूममध्ये बसायला सांगितले. तिथे एका मोठ्या स्क्रीनवर वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे व्हीडिओवर दाखवत होते. तिथे बसलेल्या सगळ्यांना शीत पेय व चहा देण्यात आला. येणा-यावर पहिले चांगले इम्प्रेशन कसे पाडायचे असते हे इथे येऊन पहावे असे वाटले.
थोड्याच वेळात आम्हाला बोलावून एका एक्झिक्यूटिव्हकडे नेण्यात आले. परदेशी सहलीला जायचे आहे म्हणताच तिने केसरीचेच एक माहिती पुस्तक उघडले. दर दोन पानात मिळून एक अशा पन्नास साठ तरी वेगवेगळ्या सहलींची सविस्तर माहिती त्यात दिली होती. युरोपला जायचे आहे असे सांगितल्यावर त्यातही अनेक पर्याय होते. आमच्या वयोमानाचा विचार करता त्यातील 'ग्रँड युरोप' ही सर्वोत्तम सहल आहे असे तिने सुचवले. फार धांवपळ होणार नाही आणि कांही चांगल्या गोष्टी पाहिल्याचे समाधानही मिळेल अशा हृष्टीने या सहलीची योजना केली असल्याचे तिने सांगितले. हॉलंडमधील ट्यूलिप्सच्या बागा पहायच्या असल्यास लवकरच जायला हवे होते, तशा लवकर सुरू होणा-या सहलींमध्ये थोड्याच जागा शिल्लक राहिल्या होत्या आणि दोन दिवसात कागदपत्रे आणून दिली तरच वेळेवर व्हिसा मिळणे शक्य होते, असे असल्याने लगेच आमचे बुकिंग करून टाकले. साधी चौकशी करायला गेलो असतांना तत्क्षणी निर्णय
घेऊन टाकण्याची मला संवय झाली आहे. त्यावर पश्चात्ताप करायची वेळ कधी आली नाही. त्यामुळे कोणाला त्याचे आश्चर्य वाटत नाही आणि "इतकी घाई कशाला केली?" असेही कोणी सहसा म्हणत नाही.
परत येतांयेतांच व्हिसासाठी आवश्यक असणारे फोटो काढायला स्टूडिओमध्ये जायचे मनात होते पण पत्नी त्यासाठी सजून 'तयार' नव्हती म्हणून घरी जावे लागले. "हा फोटो फक्त व्हिसावर लावण्यासाठी हवा आहे. विमानाचा लांबचा प्रवास करून झाल्यानंतर इमिग्रेशनवरच्या काउंटरला तुझा चेहेरा यातल्या फोटोसारखा दिसला पाहिजे. त्या वेळी तू तिच्याकडे मेक अप वगैरे करून जाणार आहेस कां?" वगैरे तिला समजावून सांगितल्यानंतर 'तयारी'च्या वेळेतली पांच मिनिटे कमी करण्यात आली. दुस-या दिवशी बँकेची
स्टेटमेंट्स वगैरे गोळा करून झाल्यावर आमचे अस्तित्व सिद्ध करणारे उरले सुरले सगळे भरभक्कम पुरावे जमवले, त्याच्या तीन तीन प्रती काढल्या, दोन अप्लिकेशन फॉर्मांच्या चार चार प्रती हांताने लिहून भरल्या आणि एकदाचे सगळे कागद केसरीकडे नेऊन दिले. तिकडे जग 'पेपरलेस' कार्याच्या युगात जायला निघाले आहे आणि ते जग पाहण्यासाठी जाणारे आम्ही तेवढ्या कारणासाठी बॅग भरून कागदपत्रे तयार करीत होतो.
व्हिसाचे काम सुरळीतपणे चालू आहे हे पाहिल्यावर उरलेले पैसे भरून टाकले. व्हिसासह पासपोर्ट, विम्याची पॉलिसी व विमानाचे तिकीट हे सगळे विमानतळावरच मिळणार असल्याचे समजले. प्रवाशांसाठी उपयुक्त सूचना देणारी एक सीडी मिळाली. त्यांत खूप मनोरंजक माहिती दिली होती. एक सज्जन म्हणे नवे कोरे पायजमे घेऊन युरोपला गेले पण त्यांत घालायला नाडी न्यायला विसरले! मग टूर ऑपरेटरला त्यांच्यासाठी परदेशांत नाडी शोधत हिंडावे लागले. सामान भरण्यासाठी केसरीकडून छानशा बॅगा भेट दिल्या गेल्या. त्यात मावतील तेवढे कपडे ठेऊन उरलेले सामान आपल्याकडील बॅगांमध्ये भरले आणि सहार विमानतळावरील ठरलेल्या जागी १५ एप्रिलला रात्री दिलेल्या वेळी जाऊन पोचलो.
टूरचे बुकिंग करतांना आपले सहप्रवासी कोण आहेत याची कांही कल्पना नव्हती. आमच्या जोडीला आमच्या ओळखीचे कोणीच नव्हते. इतर प्रवासी कदाचित दोन्ही खिसे भरभरून युरोच्या नोटांच्या गड्ड्या आणतील आणि जिकडे तिकडे ते युरो उधळत जातील, पण आपल्याला तसे करणे जमणार नाही, किंवा ते सगळे तरुण लोक टणाटण उड्या मारीत धावत पुढे जातील आणि आपण त्यांच्या पाठीमागे धापा टाकीत खुरडत जात असू असे स्वप्नात दिसू लागल्यामुळे मनात अस्वस्थता वाटत होती. विमानतळांवर जेंव्हा सगळा ग्रुप जमा झाला तेंव्हा त्यांना पाहून सुखद आश्चर्य वाटले आणि मनांतल्या धाकधुकींची सांवटे अदृष्य होऊन गेली. तिथे जमलेली बहुतेक सगळी मंडळी आमच्यासारखीच, एकाच स्तरातली आणि वयोगटातली दिसत होती. केसरीच्या ग्रुप्समध्ये बहुसंख्य मराठी लोकच असतात एवढे ऐकले होते. पण आमचा गट तर अगदी शंभर टक्के मराठी होता. त्यामुळे गाईडबरोबर व आपापसातले सारे बोलणेमाय मराठीतच झाले.
विमानतळावर पोचल्यावर केसरीकडून ज्याला त्याला ज्याचे त्याचे पासपोर्ट, तिकीटे व विम्याची पॉलिसी वगैरे तर मिळालेच, प्रवासात त्या गोष्टी जपून ठेवण्यासाठी गळ्यात अडकवण्याचा सुरेख तसाच मजबूत पाउचसुद्धा दिला गेला. दुस-या एका छोट्या पाउचमध्ये टूथ ब्रश, टूथपेस्ट, रेझर, क्रीम, बँडएड, गाउज वगैरेचा संच होता. एका वेगळ्या पॅकेटमध्ये पुरणपोळी, चकली, खाकरा, वेफर्स, डिंकाचे लाडू, चॉकलेट व लिमलेटच्या गोळ्या, सुका मेवा, मुखशुद्धी, चटणी, लोणचे वगैरे अनेक प्रकारच्या टिकाऊ वस्तू भरलेली छोटी छोटी पॅकेट्स होती. प्रवासात वाटेत कुठेही भूक लागली किंवा खाण्याची इच्छा झाली तर कांही तरी तोंडात टाकायची सोय केलेली होती. मात्र या गोष्टी केबिन बॅगेजमध्ये कदाचित नेऊ देणार नाहीत, तेंव्हा प्रत्येकाने त्या चेक्ड इन बॅगेमध्ये टाकून घ्याव्यात अशी सूचना मिळाल्यावर प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. घरून निघतांना त्यांनी कांही विचार करून प्रवासाच्या बॅगा भरल्या होत्या. आता त्यातल्या कांही गोष्टी बाहेर काढून हे फराळाचे पदार्थ आंत ठेवावे लागले व जास्तीच्या गोष्टी हांतात धराव्या लागल्या. एअरपोर्टवर
असलेल्या रेस्तरॉंमध्ये स्नॅक्स घेतांघेताच सामानाची ही जमवाजमवी करून घेतली.
त्याच दिवशी ग्रँड युरोपच्या सहलीवर निघालेले केसरीचे दोन ग्रुप होते. आमचा ग्रुप ऑस्ट्रियन एअरने व्हिएन्नामार्गे रोमला जाणार होता आणि दुसरा ग्रुप अलइटालियाने मिलानमार्गे तेथेच पोचणार होता. आतापर्यंत आम्ही एकत्रच बसलो होतो. आमचे ग्रुप एस्कॉर्टस आल्यावर त्यांनी आपापल्या सदस्यांना वेगवेगळे बोलावून घेतले आणि महत्वाच्या सूचना दिल्या. आमच्या ग्रुपमधील प्रत्येकाचे नांव व पत्ता लिहिलेला एक कागद आणि प्रवासातील प्रत्येक टप्प्यावरील उतरण्याच्या ठिकाणांची यादी विमानतळावर आल्यावरच प्रत्येकाला दिलेली होती. संदीप पाटील हा आमचा वाटाड्या होता. याच नांवाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूशी त्याचा कांही संबंध नाही हे त्याने आल्या आल्याच सांगितले. त्याच्या बरोबर आम्ही इमिग्रेशन, कस्टम, सिक्यूरिटी वगैरे चेक्स पार करून प्रयाणकक्षात गेलो. जे लोक प्रथमच परदेशी जात होते त्यांना थोडेसे मार्गदर्शन करावे लागले. पण त्यासाठी फारसे कांही प्रयास पडले नाहीत. आजकाल एवढे सामान्यज्ञान प्रत्येकाकडे असते. ठरलेल्या वेळी आमच्या विमानाने व्हिएन्नाच्या दिशेने उड्डाण केले.
. . . . . . . (क्रमशः)

No comments: