Tuesday, April 21, 2009

ग्रँड युरोप - भाग ४ - व्हॅटिकन सिटी


दि। १७-०४-२००७ दुसरा दिवस - व्हॅटिकन सिटी

मागच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे पोपच्या धर्मसत्तेचा मान राखण्यासाठी त्याचे निवासस्थान असलेली 'व्हॅटिकन सिटी' हे एक स्वतंत्र राष्ट्र बनवण्यात आले. फक्त एकशे नऊ एकर म्हणजे अर्धा वर्ग किलोमीटरपेक्षाही लहान आकाराचे क्षेत्रफळ असलेले हे जगातील सर्वात लहान राष्ट्र आहे व त्याची लोकसंख्या एक हजाराच्याही आंत आहे. आपल्या सर्वसामान्य खेड्यापेक्षासुद्धा लहान जागा आणि कमी लोकवस्ती असलेला हा देश! पण कोठल्याही महानगरात मिळतील अशा सर्व सुखसोयी मात्र तिथे उपलब्ध आहेत बरे. पोप आणि त्याचे निकटवर्गीय धर्मगुरू यांचाच बहुधा या लोकसंख्येत समावेश होत असावा. कारण तिथली व्यवस्था पाहण्यासाठीच मुळी तीन हजारावर कर्मचारी काम करतात. बहुधा बाजूच्याच रोममधून ते रोज तेथे जातात. यापेक्षाही कित्येक पटीने जास्त पर्यटक तिथे रोज भेट देण्यासाठी येत असतील! त्यांची सेवा सुविधा वगैरेसाठी आणखी लोक तेथे येत असणार.
व्हॅटिकन पाहण्यासाठी आम्ही सकाळी थोडे लवकरच उठून निघालो होतो, तरीही त्या दिशेला जाणारे रस्ते वाहनांनी तुडुंब भरलेले असल्याकारणाने सव्वा दीड तासानंतर तेथे पोचलो, तोपर्यंत भरपूर गर्दी झालेली होती. व्हॅटिकनच्या संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी बांधलेली उंच भिंत अजून शाबूत आहे. तिच्या बाहेरच्या बाजूलाच असलेल्या एका प्रचंड भूमीगत पार्किंग लॉटमध्ये बस उभी करून बाहेर निघालो. जमीनीखाली असलेल्या त्या अवाढव्य तळघरात पूर्वीच्या काळच्या इमारतींसाठी त्या काळी घातलेल्या पायाच्या मजबूत दगडी भिंती मध्ये मध्ये दिसत होत्या. त्या पायाच्या आधारावरच आज त्या ठिकाणी जमीनीच्या वर दिसत असलेल्या इमारती उभ्या आहेत. जमीनीखाली प्राचीन किंवा मध्ययुगातील पाया व त्यावर शेकडो वर्षानंतर बांधलेल्या इमारती असे जुन्या नव्याचे मिश्रण रोममध्ये सर्रास पहायला मिळते.
स्वतंत्रपणे येणा-या पर्यटकांसाठी लांबलचक रांग लागलेली होती, पण पर्यटकांच्या समूहांसाठी वेगळा दरवाजा होता. त्यामधून लगेच प्रवेश मिळाला. तिथेच आमचा स्थानिक मार्गदर्शक भेटला. या जागी एकाच वेळी अनेक ग्रुप येत असल्यामुळे प्रत्येक गाईड वेगवेगळ्या प्रकारचा झेंडा हातांत घेऊन हिंडत होता. त्या झेंड्याकडे पाहून आपला गाईड कुणीकडे चालला आहे हे समजत असे. त्या ग्रुपमधील प्रत्येकाला एक हेडफोन दिला जाई व गाईडकडे एक मायक्रोफोन असे. त्यातून वायरलेस संदेशवहनामधून त्याचे बोलणे सर्वांना ऐकू जात असे. अशा प्रकारे त्या प्रचंड गर्दी व गोंगाटामधून आपला मार्ग न चुकता सर्वांबरोबर हिंडणे व शक्य तितकी माहिती ऐकून व समजून घेणे शक्य झाले.
गेल्या अनेक शतकांपासून या ठिकाणी मोठमोठ्या चॅपेल्स, चर्चेस वगैरेंचे बांधकाम चालले होते. मध्ययुगात जेंव्हा धर्मगुरू हेच सर्वेसर्वा झाले तेंव्हा तर त्यांना राजवाड्यांचेच स्वरूप आले होते. मात्र ती धार्मिक श्रद्धास्थाने असल्यामुळे कोठल्याही लढायांमध्ये त्यांची विशेष हानी करण्यात आली नाही. नैसर्गिक आपत्तींमध्येच जी कांही पडझड होत गेली तिची डागडुजी तत्परतेने केली गेली. या कारणाने अत्यंत भव्य अशा ऐतिहासिक इमारती आजही येथे चांगल्या स्थितीमध्ये पहायला मिळतात. कलाकारांच्या पिढ्यान पिढ्या शतकानुशतके या इमारतींच्या सुशोभिकरणाच्या कामाला लागलेल्या होत्या. त्यांनी अनेक प्रकारे त्यांच्या सौंदर्यात भर घातली आहे.
यांत संगमरवराच्या व इतर प्रकारच्या दगडातून कोरलेल्या असंख्य मूर्ती आहेत, तसेच कलाकुसर केलेले खांब, कमानी, कोनाडे वगैरेंची लयलूट आहे. भिंतीवर रंगवलेली भव्य फ्रेस्कोज आहेत. ती बनवतांना भिंतीवरील गिलावा ओला असतांनाच ब्रशाने त्यावर चित्रे रंगवली जातात. त्यामुळे दोन्ही एकजीव होऊन एकमेकाबरोबरच सुकतात. अशी फ्रेस्कोज वक्राकृती सीलिंग्जच्या किंवा घुमटांच्या आंतल्या बाजूने सुद्धा काढलेली आहेत. ती रंगवण्यासाठी त्या कलाकारांनी इतक्या उंचावरील मचाणावर चढून व आडवे झोपून कसे काम केले असेल व त्यातून इतक्या सुंदर कलाकृती कशा निर्माण केल्या असतील या विचाराने मन थक्क होते. सर्वसामान्य कलाकारच नव्हेत तर मीकेलँजिलोसारख्या तत्कालिन सर्वोत्तम कलावंतांनी देखील अशा प्रकारे काम या ठिकाणी वर्षानुवर्षे केलेले आहे. जमीनीवर तर अगणित प्रकारांनी रंगीबेरंगी फरशा बसवून त्यातून तरत-हेच्या आकृती निर्माण केल्या आहेतच, छोट्या छोट्या रंगीबेरंगी दगडांच्या मोझेकमधून भिंतीवर देखील सुंदर चित्रे बनवली आहेत. टॅपेस्ट्री नांवाच्या आणखी एका प्रकारात प्रचंड आकाराचे गालिचे विणतांनाच त्यामधील धाग्यांना योग्य प्रकारचे रंग देऊन त्यातून सुंदर चित्रे निर्माण केलेली आहेत व ते गालिचे उभे करून भिंतींवर चिकटवले आहेत. बहुतेक खिडक्यांच्या कांचेच्या तावदानांवर सुंदर आकृती रंगवलेल्या आहेत. त्यासाठी आधी कांच बनवतांना ती वितळलेल्या स्थितीत
असतांनाच त्यात रंग मिसळले जातात व त्यावर विशिष्ट रंगांनी चित्र काढून ती कांच भट्टीमध्ये भरपूर भाजली जाते.
कांही चित्रांतील चेहेरे अशा खुबीने बनवले आहेत की त्यांच्याकडे पहात या टोकांपासून त्या टोकापर्यंत दहा बारा पावले चालत जातांना ती व्यक्ती सतत आपल्याकडे टक लावून पहात असल्याचा भास होतो किंवा पन्नास माणसांचा घोळका ते चित्र पहात असतांना त्यातील प्रत्येकाला ते आपल्याकडे पाहते आहे असे वाटते. एका जागी तर सपाट छपरावर एक चित्र रंगवून त्यावरील छायाप्रकाशाच्या खेळाने त्या जागी त्रिमितीमध्ये रेखीव कलाकुसर कोरली असल्यासारखे दिसत होते. महाभारतातील मयसभेबद्दल फक्त ऐकले किंवा वाचले होते. इथे आल्यावर अशा प्रकारची दिशाभूल प्रत्यक्ष पहायला मिळाली. याशिवाय तत्कालिन युरोप खंडातील व इजिप्तसारख्या देशातून जिंकून आणलेले कलाकृतींचे कित्येक नमूने जागोजागी मांडून ठेवले आहेत. आज ही सगळी चर्चेस उत्कृष्ट वस्तुसंग्रहालये झाली आहेत.
व्हॅटिकनमध्ये अशा प्रकारची चार स्वतंत्र म्यूजियम्स आहेत. वेळे अभावी आम्हाला त्यातील सिस्टीन चॅपेल ही जगप्रसिद्ध इमारत व सेंट पीटर्स बॅसिलिका हे जगातील सर्वात मोठे चर्च एवढेच आंतून पहायला मिळाले. पंधराव्या व सोळाव्या शतकातील युरोपमधील सर्वोत्तम कलाकारांच्या चित्रकला व शिल्पकला यांनी सिस्टीन चॅपेल सजले आहे. सिक्स्टस नांवाच्या पोपने चौदाव्या शतकात याचे उद्घाटन केले म्हणून त्याचे नांवावरून सिस्टीन हे नांव पडले. मीकेलँजिलोने या चॅपेलच्या छपरावर आंतल्या बाजूला रंगवलेली 'दि क्रीएशन' व 'दि लास्ट जजमेंट' ही अनुक्रमे मानवजातीची परमेश्वराद्वारे करण्यात आलेली उत्पत्ती आणि शेवटी त्यांची स्वर्गात वा नरकात रवानगी दाखवणारी चित्रे जगप्रसिद्ध आहेत. ईव्हची उत्पत्ती, ईडन बाग, निषिद्ध असलेले फळ खाणे वगैरे दाखवणारी याच मालिकेतील आणखी कांही चित्रेही आहेत. गेल्या शेकडो वर्षांत धुरामुळे या चित्रांवर साठलेला कार्बनच्या कणांचा थर हलकेच काढून कांही वर्षांपूर्वीच त्यांना पुन्हा एकदा पूर्वीचा तजेला प्राप्त करून दिला आहे. हे काम सुद्धा कित्येक वर्षे चालले होते म्हणे. त्यामुळे आम्हाला मात्र ती चित्रे स्वच्छ व चांगल्या स्वरूपात पहायला मिळाली. बायबलमधील ओल्ड व न्यू टेस्टामेंटमध्ये वर्णिलेले अनेक प्रसंग दाखवणारी भव्य चित्रे जिकडे तिकडे आहेत. ग्रीक व लॅटिन पुराणांतील वेगवेगळ्या देवता, राजे, महापुरुष तसेच खलनायक वगैरेंच्या चित्रांची व पुतळ्यांची गणतीच करता येणार नाही.
सेंट पीटर्स बॅसिलिका हे जगातील सर्वात मोठे चर्च हे एक स्थापत्यशास्त्राचे अद्भुत आश्चर्य मानावे लागेल. त्याच्या भिंतीच पंचेचाळीस मीटर उंच उभ्या आहेत आणि मधला घुमट तर तब्बल एकशे छत्तीस मीटर उंच आहे. क्रेन किंवा लिफ्टसारखी कोठलीही यांत्रिक साधने नसतांना माणसांनी आपल्या ताकतीने व हिंमतीने इतक्या उंचीवर दगडविटा नेऊन हे बांधकाम कसे केले असेल? ते काम सुरू असतांना अर्धवट बांधलेल्या भागाला खालून आधार कसा दिला असेल? आपल्याकडल्या ताजमहाल व गोलघुमटाबद्दल सुद्धा असेच कौतुक वाटते. या ठिकाणी भव्य असा घुमट तर आहेच पण त्यावर सुरेख चित्रे देखील रंगवली आहेत. त्याच्या भिंतींच्या बाह्य कठड्यावर वेगवेगळ्या ख्रिश्चन साधूसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची रांगच उभी केली आहे. आंत जाण्यासाठी समोरील मुख्य दरवाजाच्या बाजूलाच उपद्वारे आहेत. त्यातील एक दरवाजा फक्त अतिविशिष्ट अतिथींसाठी राखून ठेवलेला आहे तर एका दरवाजातून आंत प्रवेश केल्यास सर्व पापांचा नाश होऊन ती व्यक्ती नक्की स्वर्गाला जाते अशी भाविकांची समजूत आहे. मात्र हा दरवाजा बंद करून व त्याची किल्ली त्याच दाराच्या आड ठेऊन त्याच्या मागच्या बाजूला एक भिंती बांधून ठेवली आहे. पंचवीस वर्षातून एकदा ही भिंत फोडून ती चावी बाहेर काढली जाते व प्रत्यक्ष पोपमहाराज त्या किल्लीने तो दरवाजा उघडून आंत प्रवेश करतात. अर्थातच त्या वेळी त्यांच्या मागोमाग जाऊ
इच्छिणा-या लोकांची भाऊगर्दी नक्की उडत असणार. प्रवेशद्वारातून आंत गेल्यावर किती तरी प्रशस्त व उंच दालने आहेत. तिकडे जाण्यासाठी मोठमोठे पॅसेजेस आहेत. त्यात जागोजागी चित्रे व पुतळे यांची रेलचेल आहे.
मीकेलँजेलो याचे पिएटा हे सुप्रसिद्ध शिल्पही येथेच आहे. तळघरांमध्ये पूर्वी होऊन गेलेल्या अनेक पोपांची दफनभूमी आहे, तर कांही विशिष्ट संतांची शरीरे जतन करून ठेवलेली आहेत. त्यांचे दर्शन घेणा-यांचीही गर्दी असते. घुमटावर चढून जाण्यासाठी सोय आहे पण तिकडे जाण्यासाठी इच्छुक लोकांनी लावलेली रांगच नजर पोचेल तिथपर्यंत लागलेली होती. अर्थातच आमच्याकडे इतका वेळ नव्हता.
सेंट पीटर्स बॅसिलिका पाहून झाल्यावर सेंट पीटर्स पियाझामध्ये बाहेर आलो. पियाझा म्हणजे चौक. हा चौक तर एखाद्या पटांगणासारखा अवाढव्य आहे. सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या दोन्ही अंगाने पसरलेले खांबावर उभे असलेले लांब रुंद व उंच असे प्रशस्त आडोसे पाहून ती वास्तू दोन्ही हांत पसरून आपल्याला आवाहन करीत असल्याचा भास होतो. येथील सर्व वास्तुशिल्प मुख्यतः बेनिनी या सुप्रसिद्ध इटालियन वास्तुशिल्पकाराच्या अचाट कल्पनाशक्तीतून निर्माण झाले आहे. त्याने सुरू केलेली बरोक ही शैली पुढे युरौपभर आणि तेथून जगभर पसरली व उंच कमानी, भव्य दरवाजे, भरपूर कलाकुसर वगैरे वैशिष्ट्याने नटलेल्या अनेक भव्य वास्तू त्या शैलीमध्ये बनवल्या गेल्या.
पोपचे वसतीस्थान इथे उभे राहून दिसते. दर आठवड्यात ठरलेल्या वेळी आपल्या खिडकीत उभे राहून पोप महाराज दर्शन देतात व हांत हलवून अभिवादन करतात. ते पाहण्यासाठी खूप गर्दी होते. तसेच वर्षातील ठरलेल्या उत्सवांच्या दिवशी ते धार्मिक प्रवचन देतात. ते इथे येऊन ऐकण्यासाठी निमंत्रणाची आवश्यकता असते.
व्हॅटिकन सिटीमधून बाहेर येतांना कांही तरी अचाट, भव्य, दिव्य असे पाहिल्याचा अनुभव येतो व ख्रिश्चन धर्माबद्दल मनात यत्किंचित प्रेमभावना नसलेल्यांनासुद्धा "तेथे कर माझे जुळती" असे म्हणावेसे वाटते.

No comments: