दि.१६ व १७-०४-२००७ रोममधील उरलेसुरले
दि.१६ एप्रिलला ज्या दिवशी आम्ही मुंबईहून प्रयाण केले त्याच दिवशी योगायोगाने अलकाचा म्हणजे माझ्या पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीनंतर आमचे विमान सुटणार असल्यामुळे आम्ही दि.१५च्या रात्रीच सहार विमानतळावर येऊन पोचलो होतो. प्रयाणकक्षात बसून विमानाची वाट पहात असतांनाच बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला आमच्या ग्रुपमधल्या अद्वैतने आमच्याकडे येऊन अलकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केसरीतर्फे दिलेल्या सहप्रवाशांच्या यादीमधून त्याने ही माहिती शोधून काढली होती. आजूबाजूला इतर एक दोघे बसलेले होते त्यांनीही शुभेच्छा दिल्या. त्या जागी तरी उत्तरादाखल धन्यवादाशिवाय आणखी कांहीच देता येणे आम्हाला शक्य नव्हते. रोमला पोचल्यावर विमानतळावर सामानाची वाट पहात असतांना, तसेच नंतर रोममध्ये फिरतांना आमच्या इतर सहप्रवाशांबरोबर जसजशी आमची ओळख होत गेली, तसतशी ही बातमीसुद्धा पसरत गेली व अधिक शुभेच्छा मिळाल्या.
अलकाचा या वर्षीचा वाढदिवस रोम येथे साजरा करायचा हे आमचे आधीपासून ठरलेलेच होते. हा वाढदिवसही एरवीपेक्षा वेगळा होता. इंग्रजी तारीख व मराठी पंचांगातील तिथी या दोन्ही पद्धतीने यंदा तो एकाच दिवशी आला होता. असे येणे हा एक दुर्मिळ योगायोग असत असावा असे मला पूर्वी वाटायचे. पण वर्षातील सगळ्याच तारखा व तिथी दर एकोणीस वर्षानंतर पुन्हा त्याच क्रमाने येतात असे एका ब्लॉगच्या निमित्तानेच या विषयाचा थोडा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले होते. अलकाच्या सत्तावन्नाव्या वाढदिवसामुळे त्या पुस्तकी ज्ञानाची प्रत्यक्ष प्रचीती आली. मात्र त्या दिवशी आमचे आपल्या कुटुंबापासून दूर परदेशी असणे हा एक योगायोग होता. या वर्षी अनायासे नवीन मित्रमंडळींचा एक समूह त्या दिवशी एकत्र भेटणारच होता. त्याचा फायदा घेऊन त्या दिवशी थोडीशी मौजमजा करण्याचा आमचा विचार होता.
याआधी इंग्लंड व कॅनडाला गेलो असतांना तिथे त-हेत-हेचे आकर्षक केक दुकानांत ठेवलेले मी पाहिले होते. यामुळे या निमित्ताने रोममध्ये तसाच एखादा वैशिष्ट्यपूर्ण केक आणायचा विचार होता. पण नव्या देशातली कांही माहिती नाही आणि भाषेची अडचण यामुळे आपल्याला स्वतःला कांही शोधाशोध करता येण्यासारखे नव्हते. समूहाला सोडून एकट्याने फिरणे धोकादायक असल्यामुळे तसे करण्याला सक्त मनाई केलेली होती. अशा कारणाने मनातला विचार संदीपलाच बोलून दाखवला व कांही सहाय्य करण्याची विनंती केली. संध्याकाळी रोममध्ये फिरायला जाण्यासाठी निघतांना बसमध्येच त्याने अलकाच्या वाढदिवसाची जाहीर घोषणा करून केसरीतर्फे एक अभिनंदनपर पत्र व चॉकलेटची भेट तिला दिली आणि सगळ्यांना एक्लेअर्स वाटले.
त्या दिवशी आम्ही ट्रेव्ही फाउंटनच्या ज्या भागात फिरलो त्या भागात आम्हाला कुठेच बेकरी किंवा डिपार्टमेंटल स्टोअर दिसले नाही. त्यामुळे साधा केकसुद्धा मिळाला नाही. टाईम एलेव्हेटर राईड घेऊन रात्रीच्या जेवणासाठी ज्या भारतीय रेस्टॉरेंटमध्ये गेलो तिथे तर एखाद्या आडगांवातल्या खानावळीत असाव्यात तशा दोन तीन छोट्या छोट्या खोल्यांमध्ये टेबल खुर्च्या मांडून बसण्याची जेमतेम सोय केली होती आणि चार ठरावीक खाद्यपदार्थांचे जेवण होते. आयत्या वेळी केकच काय पण कुठलाच पदार्थ मागवण्याची मुळी सोयच त्या जागी नव्हती. अखेरीस बाहेर जाऊन सर्वांसाठी आईसक्रीम आणले आणि आमच्यातर्फे ते वाटून आम्ही वाढदिवस साजरा केला.
रोमला आल्यानंतर पुढील प्रवासासाठी जी बस मिळाली होती ती आपल्याला परिचित असलेल्या व्हॉल्व्हो आरामगाड्यांहून भारी होती तसेच वेगळी होती. एक तर युरोपमधील वाहतूक नियमांनुसार तिचा चालक डाव्या बाजूला बसायचा आणि प्रवाशांसाठी ठेवलेली दोन्ही दारे उजव्या बाजूला होती. सामानासाठी असलेले कप्पे खालच्या बाजूला असल्यामुळे बसण्याच्या सीट्स खूपच उंच होत्या व त्यामुळे चांगल्या चार पांच पाय-या चढून आंत जावे लागे. चालकाच्या हांताशी असलेली बटने दाबून तो सर्व दरवाजे उघडत किंवा मिटत असे. त्या देशात ड्रायव्हरला सन्माननीय वागणूक देणे आवश्यक आहे आणि गाडी चालवण्याव्यतिरिक्त इतर कोठलेही तो काम करणार नाही व कुणी त्याला कांही सांगायचे नाही हे त्याची कॅप्टन म्हणून ओळख करून देतांनाच संदीपने स्पष्ट केले होते. तरीही कधी कधी सामान चढवण्या व उतरवून घेण्यासाठी आपण होऊन तो आम्हाला मदत करीत होता.
त्याच्या शेजारीच संदीपच्य़ा बसण्याची जागा होती आणि त्याच्याकडे एक ध्वनिक्षेपक होता. त्याचा उपयोग करून तो रोज सगळ्या सूचना देत असे. बस हीच आमची कॉन्फरन्स रूम होती व पुढील प्रवासात त्याचा चांगला उपयोग करून घेतला. एक व्हीडिओ मॉनिटरसुद्धा होता, पण त्याचा कधीच उपयोग केला गेला नाही. कदाचित त्यासाठी जी इतर उपकरणे लागतात ती उपलब्ध झाली नसावीत. बसमध्ये खाली गालिचा अंथरलेला होता व तो स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनिंग करणे एवढाच एक उपाय होता. ती बस रोजच्या रोज स्वच्छ करण्याची कांहीच योजना नव्हती. बसमध्ये प्रवाशांनी कसलाही कचरा टाकू नये, विशेषतः ओले खाद्यपदार्थ खाली गालिचावर पडता कामा नयेत याची खबरदारी आम्ही घ्यायची होती.
बसमध्ये एक संगणक होता व संपूर्ण दौ-याचा कार्यक्रम त्यात एका सीडीद्वारे फीड केला जायचा. ड्रायव्हरने एका दिवसात बारा तासांपेक्षा अधिक काळ काम करायचे नाही, दर दोन तासानंतर सक्तीची पंधरा मिनिटे विश्रांती घ्यायची वगैरे वाहतूकीचे नियम पाळणे आवश्यक होते व बसचे इंजिन सुरू होणे व बंद होणे, ती किती किलोमीटर चालली वगैरे माहिती त्या संगणकात आपोआप जात असल्यामुळे तो संगणक एका प्रकारे नियंत्रणाचे काम करीत होता. कोठल्याही नियमाचे उल्लंघन होत आहे असे वाटल्यास तो तशी पूर्वसूचना देई व तरीही उल्लंघन झाल्यास इंजिन सुरू ठेवणे अशक्य होत असे म्हणे. या कडक नियमांमुळे आमचा प्रवास विशेष दगदग न करता आरामात होत असे हे खरे असले तरी त्यासाठी कधी लवकर उठण्याची किंवा भूक लागलेली नसतांना रात्रीचे जेवण आटोपून घेण्याची घाई करावी लागत असे ते त्रासदायक वाटत असे.
रोमला आलेल्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने थोडासा आश्चर्याचा धक्का दिला. पण गंमत म्हणजे कुठून तरी एक बांगलादेशी विक्रेता छत्र्या घेऊन रस्त्यातच त्या जागी हजर झाला आणि ब-याच जणांनी त्याच्याकडून छत्र्या खरेदी केल्या. दुस-या दिवशी आम्ही त्या छत्र्या बरोबर घेतलेल्या होत्या, तरीही दिवसभर स्वच्छ ऊन पडलेले असल्यामुळे कधीच त्या हांतात घेऊन बसखाली उतरावेसे वाटले नाही. त्यामुळे शेवटी आम्ही नोव्होना पियाझाला गेलो तेंव्हासुद्धा त्या गाडीतच राहिल्या. खरे तर ती जागा दहा पंधरा मिनिटात सहज पाहण्यासारखी होती पण आमच्या वेळापत्रकानुसार त्या ठिकाणी तास सव्वा तास दिलेला होता. तो वेळ कसाबसा घालवून आम्ही परत जायला निघालो आणि एकदम गारांचा वर्षाव सुरू झाला. मुंबईला तर गारा फारच क्वचित पडतात, पण भारतातील इतर शहरातसुद्धा मी असा गारांचा सडा पडलेला यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. बसपर्यंत पोचण्यासाठी पांच मिनिटे चालणेसुद्धा अशक्य झाल्यामुळे सर्वांनी रस्त्याच्या कडेला मिळेल तो आसरा घेतला आणि पावसाची सर थांबल्यानंतर ओल्याचिंब अवस्थेत गाडीत जाऊन बसलो.
कोलोजियम पहायला गेलो त्या जागी कांही लोक प्राचीन रोमनकालीन कपडे परिधान करून हिंडत होते व पर्यटक त्यांचे व त्यांच्याबरोबर स्वतःचे फोटो काढून घेत होते. पियाझा नोव्होनामध्ये तर चित्रविचित्र कपडे घालून कोणी पुतळ्यासारखा उभा होता तर कोणी चमत्कारिक अंगविक्षेप करीत होता. अर्थातच भीक मागण्याचेच हे विविध प्रकार होते. आपल्याकडच्या डोंबा-याने तिथे एकादा खेळ लावला असता तर तो नक्कीच चांगला चालला असता!
No comments:
Post a Comment