दोन वर्षांपूर्वी एकदा बाहेरगांवी जाऊन १ एप्रिल रोजी मुंबईला परत येत असतांना वाटेत एक वर्तमानपत्र घेतले. तेंव्हा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न ठरले होते, पण तेजी बच्चन यांच्या आजारपणामुळे त्या लग्नाची तारीख जाहीर झाली नव्हती, तसेच ते साध्या पध्दतीने समारंभाशिवाय होईल असे ऐकिवात होते. पण त्या वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर वर दिलेली शुभमंगलाची सचित्र बातमी वाचकाचे लक्ष वेधून घेत होती. त्यात विश्वास न बसण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या पण तंबी दुराई (यांचे खरे नांव काय बरे असेल? अशोक नायगांवकर तर नसेल?) यांनी आपल्या खुमासदार भाषेत लिहिलेले वर्णन लोक चवीने वाचत होते. ही एप्रिल फूलची गंमत असणार हे वाचतांना लक्षात येतच होते. ही सारी माहिती घरकाम करता करता वार्ताहराचा डबलरोल करणा-या सखुबाई साळुंखे यांनी पुरवली असल्याची शेवटची तळटीप वाचल्यानंतर त्याबद्दल मनात शंका उरत नव्हती. अर्थातच त्यात दाखवलेले छायाचित्र (क्र.१) ग्राफिक्समधील कौशल्याचे उदाहरण असणार. यात दाखवलेली माणसे तर खरी आहेत. वेगवेगळ्या छायाचित्रामधून ती कदाचित या समारंभासाठी एकत्र आली असतील. जरा जवळून पहावे म्हणून मी स्वतःसुध्दा त्या चित्रात घुसण्याचा प्रयत्नही केला, पण ताडमाड उंच अभिषेकच्या खांद्यापर्यंत माझे डोके जेमतेम पोचले. हा सचिन माझ्यापेक्षा उंच कसा आणि कधी झाला कुणास ठाऊक? शिवाय शिकाऊ मेकअपमॅननेही माझ्या तोंडाला उठून दिसणारे जरा वेगळेच रंग लावले बघा!
वर दिलेले दुसरे चित्र वर्तमानपत्राच्या आतल्या पानावर छापले होते. पण त्यासोबत एक गंभीर स्वरूपाची बातमी होती. एका भाविक पर्यटकाने रोममधील एका चर्चला भेट दिली असतांना झरोक्यामधून येणा-या मनोहर प्रकाशकिरणांचे छायाचित्र काढले, त्यात एका देवदूताचे दर्शन दिसले आणि त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे म्हणे. ती बातमी वाचल्यावर माझ्या मनात उगाचच कांही मूलभूत शंका आल्या. हा देवदूत घनरूप आहे की द्रवरूप की वायुरूप? द्रवरूप किंवा वायुरूप असेल तर त्याला आकार असणार नाही
आणि घनरूप असेल तर तो उडेल कसा? तो एखाद्या फुग्यासारखा आहे कां? मग त्याला कान, डोळे, मेंदू, हृदय वगैरे असतील कां? असले तर ते कसल्या प्रकारचे आणि कुठल्या पदार्थांपासून बनवलेले असतील? असल्या वात्रट प्रश्नांची उत्तरे कांही केल्या सापडत नव्हती.
कांही लोकांना भूत पिशाच्च वगैरे डोळ्याने दिसतात पण त्यांचे फोटो येत नाहीत असे ऐकले होते. या देवदूतांची योनी यांच्या बरोबर उलट असावी. ते स्वतः तर कोणाच्या नजरेला पडले नाहीत पण त्यातला एकजण छायाचित्रात अवतीर्ण झाला. मी आपले सारे जुने आल्बम काढून पाहिले. कुठल्या तरी देवालयाच्या चित्रात कोणी यक्ष किंवा किन्नर दिसतो कां ते पाहू म्हंटले. पण आपले पूजारी मुळी देवळातले फोटोच काढू देत नाहीत हो! 'छायाचित्रण निषिद्ध' असे फलक सगळीकडे लावलेले असतात. इंग्लंडमधल्या चर्चेस, कॅथेड्रल्स वगैरेमध्ये तर फोटो काढायला केवढे उत्तेजन देतात? प्रवेशद्वारापाशीच फिल्म रोल वगैरे विकायलासुद्धा ठेवलेले असतात. म्हणजे तिथे भेट देणा-या लोकांनी त्यांच्या मनाला येतील तितके स्नॅप्स घ्यावेत याची चांगली सोय केलेली असते. यामुळे माझ्याकडील आल्बम्समध्ये हिंदू मंदिरांपेक्षा ख्रिस्ती प्रार्थनाघरांचीच छायाचित्रे जास्त मिळाली. पण देवदूताचे दर्शन कांही त्यात कुठेच घडले नाही. आणि घडणार तरी कसे? मी तर सगळी तेथील मूर्ती, झुंबरे व कलाकुसरीची छायाचित्रे जमवली होती. आता पुढच्या वेळेस झरोके वगैरे पहावेत असा विचार आहे.
तर मंडळी, तुम्ही ही दोन्ही छायाचित्रे पाहिल्यावर त्यातल्या कुठल्या चित्रावर जास्त विश्वास ठेवाल? पहिल्या की दुस-या?
.
.
.
.
.
.
.
.
योगायोगाने एक एप्रिलनंतर कांही दिवसांनीच मला रोमच्या त्या जगप्रसिध्द कॅथेड्रलला भेट देण्याची संधी मिळाली. तिथे फारसे झरोके नव्हतेच, जेवढे दिसले तेवढे सगळे झरोके मी न्याहाळून पाहिले. गाईडलासुध्दा या घटनेबद्दल विचारले. ही अफवा रोममध्ये कोणीही ऐकलीसुध्दा नव्हती असे त्याने सांगितले. म्हणजे ही थापदेखील कोणा भारतीयाच्याच सुपीक डोक्यातून निघाली असणार!
No comments:
Post a Comment