दि. १७-०४-२००७ दुसरा दिवस - रोमन साम्राज्याचे अवशेष
व्हॅटिकन सिटीच्या ख्रिश्चन विश्वाचे धांवते दर्शन घेतल्यानंतर तिच्यातून बाहेर पडून पुन्हा आम्ही सगळे रोम शहरात आलो. व्हॅटिकन सिटीच्या कोठल्याही दारातून बाहेर पडले की आपण सरळ रोम शहरातच प्रवेश करतो इतके ते त्याला खेटून किंवा वेढा घालून वसलेले आहे. आदल्या दिवशी ट्रेव्ही फाउंटन पाहून झाल्यावर टाईम एलेव्हेटर राईड घेतांना रोमच्या इतिहासकालीन घटनांचे चलचित्र पाहतांना तेथील कांही प्रमुख इमारतींचे पडद्यावर दर्शन मिळाले होते. आज त्या इमारती प्रत्यक्ष पहायला मिळाल्या.
दोन अडीच हजार वर्षापूर्वीच्या रोमन साम्राज्यकालीन वाडे, राजवाडे, सभागृहे, किल्ले, कोट, बुरुज, खंदक वगैरेंचे भग्नावशेष, ब-यापैकी परिस्थितीत असलेले मध्ययुगीन सुवर्णकाळात बांधलेले वाडे, चर्चेस व उभारलेल्या कमानी, स्तंभ आणि आजच्या काळातील मोठमोठी कांचेची तावदाने असलेल्या आधुनिक इमारती यांचे एक विलक्षण मिश्रण या शहरात पहायला मिळते. एकमेकांच्या बाजूबाजूला तर त्या सर्रास दिसतात, पण कधीकधी इतिहासाच्या खांद्यावर वर्तमान उभे असलेले दृष्य पहायला मिळते.
येथील लोकांची राहती घरे बहुतेक करून तीन चार मजल्यांची दिसली. प्रत्येक घराला प्रशस्त बाल्कन्या आहेत आणि जवळ जवळ प्रत्येक बाल्कनीमध्ये फुलझाडांनी बहरलेल्या कुंड्या मांडून ठेवलेल्या दिसतात. कांही थोड्या ठिकाणी तर भिंतींवर जागोजागी हुक्स लावून त्यावर वेली चढवलेल्या दिसल्या. या मौसमांमध्ये आलेल्या नवपल्लवींनी त्यांनी भिंती पार झाकून टाकल्या होत्या, तसेच रंगीबेरंगी फुलांचा बहर आलेला असल्याने त्या फारच मनोहर दिसत होत्या. आमच्या ग्रुपमधील कांही वृक्षप्रेमी लोकांना तर येथून फुलझाडांची रोपे नेण्याची अनावर इच्छा होत होती, पण प्रवासात ती कशी सांभाळायची आणि विमानांतून ती नेता येतील कां हे प्रश्न पडल्यामुळे अखेरीस त्यांनी त्या झाडांची बी बियाणेच घेऊन जाण्याचा मार्ग पत्करला.
व्हॅटिकन सिटीमधून बाहेर पडल्यावर पियाझा व्हेनिझाजवळ व्हिट्टोरिय़ो स्मारक दिसले. प्राचीन ग्रीक व लॅटिन शिल्पकला आणि आधुनिक वास्तुशिल्पशास्त्र यांचा सुरेख मिलाफ या जागी पहायला मिळतो. प्राचीन मूर्तीकला व आधुनिक स्थापत्यशास्त्र यांचा संयोग करून आपल्याकडे अनेक नवी मंदिरे बांधण्यात आली आहेत. दिल्ली येथील स्वामीनारायण मंदिर किंवा पुण्याजवळ केतकावली येथील प्रति तिरुपती देवस्थान ही अलीकडची उदाहरणे सांगता येतील. रोम येथील व्हिट्टोरियो स्मारकामध्ये गेल्या शतकातल्या वास्तुशिल्पशास्त्रावर आधारलेली एक भव्य इमारत आहे, पण अनेक उत्तमोत्तम मूर्तींचा उपयोग करून ती सुबकपणे सजवलेली आहे. समोरच एका उंच चबूत-यावर एका अश्वारूढ वीराचा एक देखणा पुतळा आहे. अनेक राज्यांमध्ये विभागल्या गेलेल्या प्रदेशांचे एकत्रीकरण करून आजचा इटली देश निर्माण करणा-या व्हिट्टोरियो या पहिल्या राजाच्या स्मरणार्थ हे स्मारक उभे केले गेले. तसेच पहिल्या महायुद्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचेसुद्धा हे स्मारक आहे.
टायबर नदीच्या किना-यावरील सात टेकड्यांवर रोम हे शहर वसलेले आहे. नदीच्या किना-यावरच प्राचीन काळातील रोमचे अनेक भग्नावशेष विखुरलेले पहायला मिळतात. अगदी रोम्युलसने नगरीची सुरुवात कुठून केली तिथपासून वेगवेगळ्या सम्राटांनी कोणकोणच्या इमारती बांधल्या वगैरेचे सुरस वर्णन आमचा गाईड करीत होता. माझे इतिहासविषयक ज्ञान कधीच इतिहासजमा झालेले असल्यामुळे मधेच कुठेतरी सीजर, ऑगस्टस असे ओळखीचे शब्द कानावर पडल्यासारखे वाटायचे. इतर राजा रजवाड्यांबद्दल कांडीचेही आकर्षण नसल्यामुळे कोणी बांधले यापेक्षा काय बांधले होते इकडेच मी थोडे लक्ष देऊन ऐकत होतो.
एक तर स्वसंरक्षणार्थ बांधलेली तटबंदी, खंदक वगैरे व वाड्यांचे अवशेष दिसत होते. "खंडहर बताते हैं कि इमारत कितनी बुलंद थी।" या वाक्याचा अर्थ इथे चांगला लक्षात येतो. कांही जागी पडक्या भिंती, कांही ठिकाणी छपराशिवाय नुसतेच खांब उभे असलेले तर कांही जागी फक्त जमीनीखालच्या पायाची रचना एवढीच साक्ष आता उरली आहे. एका ठिकाणी एक इजिप्शियन पद्धतीचे पिरॅमिडसुद्धा आहे. कांही जागी पूर्वीच्या काळातील पाणीपुरवठा करपणारे अक्वेडक्ट आहेत. हे सर्व अवशेष व्यवस्थितपणे जतन करून ठेवले आहेत, तसेच त्याचा इतिहास नोंदवून ठेवला आहे. ते पाहून तत्कालिन वास्तुशास्त्र, बांधकामात उपयोगात आणलेले दगड, माती, विटा आदि सामान, त्या काळांतल्या समाजाची राहणी, त्यांचे अन्न, त्यांची करमणुकीची साधने अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणारी मंडळी इथे मुक्काम ठोकून बसतात व त्यांना भरपूर माहिती मिळते.
कोलोजियम हे पूर्वीच्या रोमन लोकांचा पराक्रम, तत्कालिन स्थापत्यशास्त्र याचप्रमाणे त्यांचा अमानुष क्रूरपणा दाखवणारे सर्वाधिक प्रसिद्ध, भव्य व उत्तम उदाहरण म्हणता येईल. आठ दरवाज्यामधून प्रत्येकी दहा हजार प्रेक्षकांना आत जाऊन बसता येईल इतके मोठे हे वर्तुळाकार स्टेडियम दोन हजार वर्षापूर्वी बांधले गेले. भरभक्कम उंच भिंती व आंतील भागात बनवलेले भूगर्भाखालील रस्त्यांचे जाळे यांवरून त्याच्या बांधकामातील कौशल्य दिसून येते. त्याच्या भिंतींवर दोन्ही बाजूंनी संगमरवराच्या फरशा बसवल्या होत्या असे म्हणतात. या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी इथे ग्लॅडिएटर्सच्या ख-याखु-या लढाया खेळल्या जात असत. गुन्हेगार, गुलाम व राजाची गैरमर्जी झालेले लोक यांना ग्लॅडिएटर बनण्यासाठी तालिमीत तयार करून इथे मृत्यूच्या दाढेत ढकलून देत असत व कोण कोणाला कसे मारतो हे प्रेक्षकगण चवीने पहात असत. एका युद्धात प्रतिस्पर्ध्याला ठार मारून मिळवलेला विजय अल्पकालच टिकत असे कारण लगेच त्या विजयी वीराला दुस-या योध्द्याशी मुकाबला करवा लागत असे. कधीकधी तर भुकेलेले वाघसिंहादि हिंस्र पशूं त्यांच्या अंगावर सोडले जात व त्यांनी केलेली चिरफाड पहातांना आणि माणसांच्या करुण किंकाळ्या ऐकतांना प्रेक्षक टाळ्या वाजवीत असत. रोमन साम्राज्याच्या -हासाबरोबरच हा रानटीपणा बंद झाला व कोलोजियम ओस पडले. त्यानंतरच्या काळात लोकांनी तेथील दगड काढून नेण्यास सुरुवात केली. रोममधील अनेक सुंदर इमारती बनवतांना कोलोजियममधून आणलेले संगमरवराच्या दगडांचा त्यात उपयोग केला गेला असे म्हणतात.
कोलोजियम पाहून झाल्यावर आम्ही पियाझा नोव्होना या ठिकाणी गेलो. पूर्वीच्या काळी इथे रथांच्या शर्यती वगैरे होत असत म्हणे. त्याचा मूळचा ओव्हल आकार अद्याप टिकवून ठेवलेला आहे. मधे कांही कारंजे व सुंदर मूर्ती आहेत. एका जागी त्या काळात माहीत असलेल्या चार प्रमुख नद्यांचे प्रतिनिधित्व करणारे पुतळे आहेत, त्यात एक आपली गंगा नदीसुद्धा आहे. इजिप्तमधून आणलेला एक कोरीव काम केलेला उभा चौकोनी उंच दगडी खांब आहे, त्याला ओबेलिस्क म्हणतात. हे एवढे अवजड धूड इजिप्तमधून अथपर्यंत कसे वाैहून आणले असेल ते देव जाणे. एका ठिकाणी लुशोभीकरण सुरू असल्यामुळे तेथील शिल्पे प्लॅस्टिकमध्ये झांकून ठेवलेली दिसली. सर्व बाजूने सुंदर इमारती आहेत. त्यात एक प्रसिद्ध चर्चसुद्धा आहे, तसेच हॉटेले, दुकाने आणि राहण्याची घरेदेखील आहेत.
No comments:
Post a Comment