Monday, March 30, 2009

चार दिवस सासुरवाडीचे


दशमग्रह बनून सासरेबुवांच्या राशीला लागायचा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. पाठीवरून मायेने फिरणारा त्यांचा प्रेमळ हात आता राहिला नाही. पण त्यांनी जन्मभर केलेल्या वास्तव्याने पुनीत झालेली माझ्या सासुरवाडीची वास्तू माझ्यासाठी तीर्थस्थानासारखीच आहे. आदरयुक्त प्रेमाचा निर्मळ झरा त्या जागी अखंड वाहतो आहे. त्यात डुंबून घेण्यासाठी तिकडे जायचे निमित्त मी अत्यंत उत्सुकतेने शोधत असतो.
असेच एकदा चार दिवस सासुरवाडीमध्ये जाऊन मजेत व आरामात घालवले. पहायला गेल्यास आजकाल इथे मुंबईतसुद्धा मी त्याशिवाय फारसे दुसरे कांही करीत नाही. तरीही घर म्हंटल्यावर दोन चार वस्तू इकडच्या तिकडे करणे, कधी तरी बाजारातून आणणे, निदान घंटी वाजल्यावर दरवाजा उघडणे किंवा टेलीफोन उचलणे असल्या किरकोळ हालचाली कराव्या लागतात. विविध प्रकारची बिले भरायची असतात. बॅंक, पोस्ट, रेशनिंग, इंशुरन्स, पेन्शन, इन्कम टॅक्स वगैरेची कांही ना कांही खुसपटे निघत असतात. स्वतःची नसतील तरी सोसायटीची कामे गळ्यात पडतात. हल्ली या ब्लॉगवर जमेल तितके लिहून काढायचा नसता उद्योग मागे लावून घेतला आहे. त्यासाठी थोडीफार तयारी करावी लागते व संगणक चालवावा लागतो. एवढेच करता करता दिवसामागून दिवस, आठवडे, महिने चालले जात आहेत.
सासुरवाडी घालवलेले चार दिवस मात्र अगदी शंभर टक्के आराम होता. इकडची काडी उचलून तिकडे करणे नाही की जिवाला कसली म्हणून चिंता नाही. तीन्ही त्रिकाळ चांगले चुंगले पदार्थ हादडायचे, इतर वेळी ग्रामीण भागातली शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यायची, सकाळ संध्याकाळी मोकळ्या हवेत व निसर्गरम्य परिसरात दूरवर फिरायला जायचे, दुपारी आणि रात्री मस्त ताणून द्यायचे असा रोजचा दिनक्रम होता. नात्यातली आणखीन दोन कुटुंबे सासुरवाडीच्याच आवारात राहतात. त्यांच्याकडेही जाऊन त्यांची भेट आणि पाहुणचार घेणे झाले. त्यांव्यतिरिक्त गांवात माझ्या ओळखीचे कोणी नव्हतेच. तेंव्हा इतर कोणाकडे जाऊन बसायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पत्नी तिच्या माहेरच्या मंडळीत विरघळून गेली होती. दिवसातला सगळा वेळ मला स्वतःसाठीच मिळाला होता.
कोणी म्हणेल की हा इतका रिकामा वेळ कसा घालवलात? माझ्या सुदैवाने मला हा प्रश्न आतापर्यंत कधीच पडला नाही. जेंव्हा जेंव्हा मला मोकळा वेळ मिळाला तेंव्हा तो चांगल्या प्रकारे घालवण्याचे साधनही त्याबरोबर मिळत गेले. या वेळेस माझ्याकडून मीही थोडी पूर्वतयारी केली होती. मी शाळेत असतांनापासून महात्मा गांधीजींच्या 'सत्याचे प्रयोग' या आत्मकथेबद्दल ऐकून होतो. त्या लहान वयात हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न व्यर्थ होता कारण त्यातले कांहीही समजले नसते. मोठे झाल्यानंतर असले गंभीर पुस्तक सलगपणे वाचू शकण्यासाठी लागणारा निवांतपणा मिळत नव्हता, त्यामुळे राहून गेले. या वेळेस मात्र प्रवासाचा बेत ठरताच मी ते पुस्तक विकत घेऊन हॅंडबॅगमध्ये ठेऊन दिले. चार दिवसांच्या मुक्कामात त्यातले रोज थोडे थोडे करीत बरेचसे वाचून झाले.
'सुडोकू' नांवाचे आंकड्यांचे कोडे आणि त्यापेक्षाही त्यात आपले सुपीक डोके घालून तल्लीन होणारे लोक यांच्याबद्दल मला कधीपासून आदरयुक्त कुतूहल वाटत होते. शब्दकोडे सोडवण्यासाठी उभ्या व आडव्या रांगेतील शब्दांसाठी क्ल्यूज दिलेले असतात. त्यांच्या आधाराने कुठून तरी सुरुवात करून मिळालेल्या अक्षरांच्या आधारे पुढे जाता येते. सुडोकूमधले पंचवीस तीस आंकडे भरलेले खण आणि साठ पासष्ठ रिकामे खण पाहिल्यानंतर ते भरण्याची सुरुवात कोठून करायची तेच आधी समजत नव्हते. यासंबंधीचे कुतूहल शिगेला पोचल्यावर एका सुडोकूवेड्यालाच गांठून विचारणा केली. आधी दिलेल्या आंकड्यामध्येच याचे मर्म असते हे त्याच्याकडून समजल्यानंतर त्याचा शोध घेता येऊ लागला पण त्यावेळी त्याची गोडी कांही मनात निर्माण झाली नाही.
मध्यंतरी पुणे मुक्कामात मिळालेल्या अशाच निवांत फुरसतीच्या वेळेत माझी थोडी प्रगती होऊन कांही कोडी सुटू लागली होती. पण या कोड्यात अनेक वेळा सुरुवातीला केलेली चूक त्या वेळेस लक्षात येत नाही. तिच्या आधारानेच पुढले कित्येक आंकडे भरून झाल्यानंतर एकाद्या उभ्या ओळीतला शेवटचा आंकडा भरतांना तो आडव्या ओळीत आधीच बसलेला दिसतो. त्यानंतर मागल्या नेमक्या कोठल्या पायरीवर पाय घसरला ते शोधून काढणे अशक्य असते. या चार दिवसाच्या सासुरवाडीच्या मुक्कामात तिथे मिळणा-या हिंदी वर्तमानपत्रात रोज एक सोपे सुडोकू येत असे. नेलेले पुस्तक वाचणे व टीव्ही पहाणे या गोष्टी करीत असतांना मध्ये रुचिपालट म्हणून थोडा वेळ हे कोडे घेऊन बसत असे. लक्षपूर्वक हळूहळू आंकडे भरीत दिवसभरात ते सोडवून होऊ लागले. सोडवता येऊ लागल्यामुळे अंगात उत्साह संचारला आणि रद्दीमध्ये गेलेले जुने पेपर काढून त्यातली कोडी सोडवायला लागलो.
मी तिकडे गेलेल्या वेळी तिकडच्या शेतात गहू व हरभ-याची पिके तयार होती. त्यांची कापणी करून झाल्यावर त्या जागेवर लगेच नांगर फिरवून उन्हाळी मुगाची पेरणी करायची कामे जोरात सुरू होती. या निमित्ताने यांत्रिक शेतीबद्दल माहिती मिळाली तसेच कांही खास प्रकारची यंत्रे पहायला मिळाली. यंत्र हा माझ्या आवडीचा विषय असल्याने त्यावर एक वेगळा लेखच लिहिला.
त्या लहानशा गांवी सुध्दा आता दूरध्वनी, दूरदर्शन इत्यादि सुविधा घरोघर पोचल्या असल्या तरी मला इंटरनेटशी संपर्क साधता येणार नव्हता हे आधीच ठाऊक होते. मुंबईला परत येतो तो नेटवरील माझ्या एका पत्रमैत्रिणीकडून एक छानसे शुभेच्छापत्र आलेले होते. माझ्या पानभर लिहिलेल्या मजकुराने दाखवता येणार नाहीत इतके सुंदर भाव त्यातील एका चित व्यक्त झाले होते. तेच चित्र वर दिले आहे.

No comments: