Saturday, August 09, 2008

कोण गुन्हेगार? - भाग २

रॉबर्टबद्दल विचारलेली सर्व माहिती मेजरनी इन्स्पेक्टरला दिली. तो एक तिशीतला तरुण होता, पण अजूनही जीवनात स्थिरावला नव्हता. त्याने धड शिक्षण पुरे केले नव्हते की एकाही नोकरीत फार काळ टिकला नाही. कधी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले तर कधी त्यानेच नोकरी सोडली होती. सध्या तो बेकारभत्त्यावरच जगत होता. पण तो गुन्हेगारी जगापासून तसा दूरच राहिला होता. त्यामुळे त्याचे कोणाशी शत्रुत्व असेल किंवा त्याला मारण्यामुळे कोणाचा फायदा होऊ शकेल असे मेजरना वाटत नव्हते. त्याच्याजवळ कसल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते, पिस्तूल तर नव्हतेच. त्यामुळे कोणी तरी त्याचा गोळी घालून खून केला असेल हेच मेजरना खरे वाटत नव्हते. यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

बोलत असतांनाच इन्स्पेक्टरचे लक्ष भिंतीवर लटकवून ठेवलेल्या एका शोभिवंत पिस्तुलाकडे गेले. तीस पस्तीस वर्षे जुन्या पण नियमितपणे पॉलिश करून चमकवलेल्या एका चामड्याच्या पाऊचमध्ये एक तितकेच जुनाट पिस्तुल खोचून ठेवलेले होते. त्याबद्दल विचारणा करतां मेजरनी सांगितले की ते त्यांचे आयुष्यातले पहिले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होते. एका चकमकीमध्ये त्यांनी दाखवलेल्या मर्दुमकीची आठवण म्हणून त्यांच्या युनिटतर्फे त्यांना ते स्मरणचिन्ह बक्षिस मिळाले होते. आता ते निव्वळ ऐतिहासिक वस्तू झाले होते. तसल्या बोजड पिस्तुलात भरायची काडतुसेसुद्धा आता बाजारात उपलब्ध नव्हती. त्यांनी आपले ते स्मरणचिन्ह मोठ्या कौतुकाने सांभाळून ठेवले होते, इतकेच नव्हे तर कायद्याप्रमाणे त्याचा लायसेन्सही काढून ठेवला होता एवढेच. एरवी त्या पिस्तुलाचा कांही उपयोग नव्हता. निवृत्तीनंतर त्यांच्याकडे दुसरे कोठलेही पिस्तुल नव्हते.

इन्स्पेक्टरने आपल्याकडील एक प्लॅस्टिकची पिशवी काढून ते पिस्तुल काळजीपूर्वकपणे त्यात ठेवले. मेजरनी सांगितले,"आणखी कांही माहिती पाहिजे असेल तर लगेच फोन करा आणि चौकशीची प्रगती मधून मधून सांगत रहा."
पुढील दोन दिवसात पोलिसांनी भरपूर तपास केला. ज्या खिडकीतून रॉबर्ट बाहेर पडला असावा तिच्या समोरील दलदलीचा भाग पिंजून काठला पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साधने वापरूनसुद्धा कोठलेही पिस्तुल किंवा गोळीसुद्धा हाती लागली नाही. मृताच्या मेंदूमध्ये रुतलेली गोळी बाहेर काढून तिची चिकित्सा केली. तशा प्रकारच्या गोळ्या सामान्यपणे बाजारात मिळत नसल्या तरी चार पांच दिवसापूर्वीच कुठल्याशा कबाड्याच्या जुनाट वस्तूंच्या दुकानातून तशा डझनभर गोळ्या विकल्या गेल्या असल्याची माहिती मिळाली. मेजरकडून घेतलेले पिस्तुल उघडून पाहता त्यात पांच जीवंत काडतुसे सापडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे धाडी घालून आणखी सहा गोळ्या त्यांनी जप्त केल्या. त्यांबरोबर ठेवलेले एक निनावीपत्र मिळाले. रॉबर्टच्या अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आला. त्याला लागलेल्या व्यसनांच्या खुणा सापडल्या.

पुन्हा एकदा डेव्हिडला सोबत घेऊन इन्स्पेक्टर मेजर स्मिथच्या घरी गेले. या वेळेस मिसेस स्मिथने म्हणजे एल्माने दार उघडले. तिने लगेच विचारले, "खुन्याचा कांही पत्ता लागला कां हो?"
तिच्याकडे दुर्लक्ष करीत समोर बसलेल्या मेजरना अभिवादन करून इन्स्पेक्टर बोलले,"आम्हाला मर्डर वेपन मिळाले आहे. आणि त्यातल्या गोळ्यांचाही तपास लागलेला आहे."
"मग त्या बदमाश खुन्याला पकडून आधी फांसावर लटकवा ना." एल्मा किंचाळली.
इन्स्पेक्टर थोड्याशा करड्या आवाजात म्हणाले, "मेजर, रॉबर्टच्या डोक्यात घुसलेली गोळी तुमच्याच पिस्तुलातून सुटली असल्याची खात्री पटावी असा भक्कम पुरावा आम्हाला मिळाला आहे."
"म्हणजे! तुम्ही खून केलात? अरे देवा! त्या दिवशी मलासुद्धा गोळी घातली होतीत. आता मी काय करू?" एल्माने आकांत मांडला.
"मिसेस स्मिथ, मला जरा यांच्याशी बोलू द्या." इन्स्पेक्टरने एल्माला गप्प करून मेजरना विचारले,"मला तुम्ही दिलेत तेंव्हा हे पिस्तुल लोडेड होते हे खरे ना?"
"अं..अं, म..मला तशी शंका आली होती." मेजर चांचरतच बोलले."पण देवाशप्पथ खरं सांगतो, यातल्या गोळ्या कुठून, कधी व कशा त्यात आल्या यातलं मला कांहीसुद्धा ठाऊक नाही हो."
"हो तुमच्या पिस्तुलात आणखी कोण गोळ्या भरू शकतं ? आणखी कोण कोण इथे असतात किंवा इथे येतात?"
"म्हणजे आता माझ्यावरच बालंट की काय?" एल्माने आपला बचाव सुरू केला,"बाई, बाई, मी तर लंगडी मेली, आठवडाभर लंगडते आहे, कधी दाराबाहेरसुद्धा पडलेली नाही."
"तसं नाही मिसेस स्मिथ, तिसरंच कुणी येऊन गेलं असेल. गेल्या आठ दिलसात तुमच्याकडे कोण कोण आले होते ते आठवा बरं." इन्स्पेक्टर म्हणाले.
"अहो यांचेच उडाणटप्पू दोस्त आले तर येतात. फुकटचं ढोसायला मिळतं ना मेल्यांना?" एल्मा उद्गारली.
तेंव्हा डेव्हिडने ग्वाही दिली,"नाही हो. त्यातल्या कुणाचीही मेजरच्या पिस्तुलाला हांतसुद्धा लावायची हिम्मत होणार नाही. पिस्तुलाच्या बाबतीत ते किती पझेसिव्ह आहेत ते सगळ्यांना पक्कं ठाऊक आहे."
"एल्मा, मी घरी नसतांना कुणी आलं होतं कां?" मेजरने विचारले.
"म्हणजे पुन्हा माझ्यावरच रोख! आता या वयात मला भेटायला कोण कशाला येतंय् ? आणि कोणी आलं तर त्याला मी बाहेरच्या बाहेरच पिटाळून लावते हे तुम्हाला माहीत आहे ना? तरी मेला संशय घ्यायचा!" एल्माचा आक्रस्ताळेपणा अधिक भडकला.
पुन्हा एकदा इन्स्पेक्टरने एल्माला समजावीत विचारले,"तसं नव्हे हो, पण तुमच्या अगदी जवळचं कोणी आलं असेल. समजा तुमचा मुलगा आला असेल."
"हो, खरंच! रविवारी सकाळी हा चर्चला गेला होता ना, तेंव्हा आमचा मुलगा इथं आला होता. इतक्या लाडात बोलत होता?" गळ्या आलेला आवंढा गिळत एल्मा बोलू लागली.
(क्रमशः)

No comments: