Saturday, August 16, 2008

सात घोडचुका (पूर्वार्ध)


सर्वसामान्य माणसाला जगातील सात आश्चर्ये चकित करतील किंवा आकर्षक वाटतील. पण महात्मा गांधींना मानवाचे रोजचे जीवन आणि समाजाचे सहजीवन यांची विशेष काळजी होती. ते चांगले व्हावे यासाठी माणसांनी कोणत्या चुका करणे टाळावे याची एक यादी त्यांनी बनवली होती आणि मृत्यूपूर्वी कांहीच दिवसापूर्वी त्यांनी ती आपल्या नातवाला दिली होती. 'सेव्हन ब्लंडर्स' या नांवाने ती प्रसिद्ध आहे. त्या घोडचुकांचा साधारण मराठी अनुवाद खालीलप्रमाणे करता येईल.
१. काम न करणा-याकडील संपत्ती
२. सदसद्विवेकबुद्धी न बाळगता सुखोपभोग
३. शीलाची जोड नसलेले ज्ञान
४. नैतिकतेवाचून व्यापार
५. मानवताशून्य विज्ञान
६. त्यागाविना भक्ती
७. तत्वांवर न आधारलेले राजकारण

पहिल्या मुद्द्याचा अर्थ दोन प्रकारे लावता येईल. एक तर कोणाला कांही कष्ट न घेता अगदी विनासायास संपत्ती मिळाली असेल तर त्याला तिचे मूल्य समजणार नाही. असा 'आयत्या बिळातला नागोबा' ती वाटेल तशी उधळेल, तिचा गैरवापर करेल, ती निरुपयोगी ठरेल किंवा "हपापाचा माल गपापा" म्हणतात तशी ती नष्ट होऊन जाईल. दुसरा अर्थ असा की संपत्ती मिळवतांना ती सनदशीर मार्गाने जमा केली असली तरी तिचा मालक त्यानंतर निष्क्रिय बनला तर त्याच्या रिकाम्या मनात सैतान आपली कार्यशाळा उघडून कामाला लागेल. यातले तात्पर्य असे आहे की धनवान माणसाने सुद्धा काम करीत राहिले पाहिजे. "आता आपल्याला गरज नाही" असे म्हणून त्याने स्वस्थ बसून राहणे ही एक घोडचूक ठरेल.

मिळालेल्या सुखाचा उपभोग घेतांना नेहमी आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत असली पाहिजे. आपल्याला ज्यातून मौजमजा वाटते त्यापायी इतर कोणाला त्रास होणार नाही याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या उपभोगासाठी दुस-याकडून कोणतीही गोष्ट हिसकावून किंवा लबाडी करून घेऊ नये. मांसाहार वर्ज्य करणे, क्रूरतेविना सौंदर्य वगैरे गोष्टी याच भावनेतून आल्या. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या घरात वाजणा-या संगीताचा उपद्रव आपल्या शेजा-याला होऊ नये इतपतच त्याचा आवाज ठेवला नाही तर त्यातून गुंतागुंती निर्माण होतात.

ज्ञान हे एक दुधारी शस्त्र असते. सरळमार्गी माणूस नेहमीच त्याचा उपयोग भल्यासाठी करतो तर वांकड्या वाटेने जाणारा त्याचाच वाईट उपयोग करू शकतो. आजकाल टीव्हीवरची कोणतीही हिंदी किंवा मराठी मालिका पहा. त्यातली ओठ मुडपत आणि तिरका कटाक्ष टांकून हंसणारी खलनायिका खूप हुषार असते, तिला सगळ्या गोष्टींचे अद्ययावत ज्ञान असते आणि ती त्या माहितीचा उपयोग भोळसट नायिकेला त्रास देण्यासाठी सतत करीत असतांना दिसेल. त्यामुळे ज्ञानवंत होण्याबरोबरच शीलवंत होणे अगत्याचे आहे.

ग्राहकाची फसवणूक करून त्याला लुबाडण्याने तात्पुरता फायदा झाल्यासारखे वाटेल, पण ही गोष्ट ग्राहकाच्या लक्षात आल्याखेरीज रहात नाही आणि त्यानंतर तो पुन्हा त्या व्यापा-याकडे जाणार नाही. गेलाच तर तक्रार घेऊन जाईल. यामुळे व्यापारामध्ये सचोटीला पूर्वीपासून महत्व दिलेले आहे. "ग्राहक हा तुमचा अतिथी आहे..." वगैरे महात्मा गांधींची वचने लिहिलेला फलक आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतो. तिथले कर्मचारी तो कधी वाचत नाहीत आणि त्यांच्या मनासारखेच वागतांना दिसतात ही गोष्ट वेगळी.

विज्ञान हे विशिष्ट प्रकारचे ज्ञान असते. त्याचा उपयोगसुद्धा चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारे करता येतो. आजच्या विज्ञानयुगात विज्ञानाच्या उपयोगाने मनुष्य खूपच बलवान झालेला आहे. मानवतेचा विचार करून तो आपली शक्ती विधायक कामासाठी वापरू शकतो. पण त्याच्या मनात मानवतावादी विचार नसतील तर त्याच विज्ञानाचा उपयोग विध्वंसक रूपाने होतो. आजकाल दहशतवादी जो धुमाकूळ जगभर घालीत आहेत ती त्यांची अमानुष कृत्ये विज्ञानामधील प्रगतीमुळे शक्य झाली आहेत. तो अमानुष खेळ विज्ञानामधील प्रगतीचा दुरुपयोग आहे.

भक्ताच्या मनात त्यागभावना नसेल तर त्याचा अर्थ त्याच्या मनात स्वार्थ आहे असा होतो. "माझे एवढे काम झाले तर मी देवासमोर नारळ फोडीन किंवा देवाच्या दर्शनाचा जाईन" असला नवस करणे ही खरी भक्ती नव्हे. खरी भक्ती नुसती निरपेक्षच नसले तर तिच्या जोडीने त्यागाची भावना येते. देव असो किंवा नेता असो किंवा घरातलीच कोणी वडीलधारी व्यक्ती असो, तिच्यासाठी कांहीतरी सोडायला मनापासून तयार असणे हा भक्तीचा मार्ग आहे. त्याने प्रसन्न होऊन आपल्याला कांहीतरी लाभ व्हावा एवढीच इच्छा मनात असेल तर ती घोडचूक ठरेल.

मूल्याखेरीज राजकारण केल्यास त्यातून समाजाचा तोटा होण्याची शक्यता असते. समाजातील हजार लोक हजार वेगळ्या मार्गाने जातील, त्यामुळे अनागोंदी माजेल, समाज एकत्र राहिला नाही तर तो नष्ट होण्याचा धोका असतो, या कारणाने कोणीतरी पुढाकार घेऊन सर्व समाजाचा व्यवहार पाहणे हे आवश्यक आहे. त्या गरजेमधून राजा, मुखिया, पंच वगैरे मंडळी निर्माण झाली. आता सगळीकडे लोकशाही आल्यामुळे राज्यकारभार कोणी करायचा हे ठरवण्याचे कांही नियम झाले आहेत. राज्य चालवण्याच्या या सर्व प्रक्रियेला राजकारण म्हणतात. निवडणुका हा त्याचा फक्त एक भाग आहे. समाजामधील सर्व व्यक्तींसाठी आचरणाचे नियम बनवणे आणि त्याचे पालन करवून घेणे हा राजकारणाचा मुख्य गाभा आहे. ते काम मूल्याधिष्ठित असणे अत्यंत महत्वाचे आहे.

ही एक बाजू झाली. पण या सर्वच घोडचुका वारंवार घडत असतांना आपण रोज पाहतो. त्याबद्दल थोडेसे पुढील भागात पाहू.
. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: