Thursday, August 14, 2008

ही वाट दूर जाते


अन्नाच्या शोधात रानावनात भटकणारा आदिमानव शेती करून आणि घर बांधून एका जागी रहायला लागला त्या काळापासून जवळच्या ठिकाणी चालत जाण्यासाठी त्याने पाउलवाटा तयार केल्या. चाकांचा उपयोग लक्षात आल्यावर माणसाने चाके लावलेली गाडी तयार केली आणि तिला ओढण्यासाठी पाळीव जनावरांना जुंपले. पाऊल उचलून टाकतांना आपण मधले अडथळे किंवा खड्डे ओलांडू शकतो, पण चाकांना फिरत फिरत पुढे जाण्यासाठी खाली सलग असा जमीनीचा पृष्ठभाग लागतो. माणसांना बसण्यासाठी किंवा सामान ठेवण्यासाठी गाडीचा उपयोग करायचा असेल तर तिचे आकारमान ब-यापैकी असायला हवे आणि त्यासाठी तिला पुरेशी लांबी रुंदी द्यायला हवी. त्यांच्यामुळे गाडीला वळण्यासाठी जास्त जागा लागते. या सगळ्या अडचणींमुळे अरुंद आणि वळणावळणाच्या पायवाटा गाडी ओढत नेण्यासाठी अपु-या पडतात. थोडी मोकळी जागा पाहून, तिथले मोठे दगडधोंडे बाजूला करून आणि खड्डे बुडवून गाड्या नेण्यासाठी कच्चे रस्ते तयार केले गेले. चालणा-या माणसांच्या पावलाखाली पायवाटा आपल्या आप निसर्गतःच तयार होतात. त्या मुद्दाम बनवाव्या लागत नाहीत. गाडीचे रस्ते मात्र मानवी प्रयत्नाने बनतात. ज्याला त्याची सर्वात आधी गरज पडेल तो सुरुवात करतो. इतर लोकांनी त्याचा उपयोग करून घेता घेता त्यात सुधारणा होत जाते. अशा रीतीने ते बनत जातात. मातीवर जशी माणसाची पावले उमटतात तसेच गाडीच्या चाकांच्या रेघांचे पट्टे दिसतात. गाडीचा भार माणसापेक्षा अनेकपट जास्त असल्यामुळे या चाको-या पाऊलखुणांपेक्षा खोल बनतात. मागाहून त्या मार्गाने जाणा-या गाड्यांची चाके त्या चाको-यांना अधिकाधिक ठळक बनवत जातात आणि त्यामागून आलेल्या गाड्यांची चाके आपोआपच त्यातून जातात. यावरूनच ठराविक पध्दतीने रुळलेल्या जीवनशैलीला चाकोरी म्हणायची पध्दत पडली.


माणसांनी एकत्र राहायला लागून खेडी आणि नगरे वसवली तेंव्हा घरांसोबतच त्यांना जोडणारे रस्तेही बांधले. तसेच एका गांवातून दुस-या गांवी जाण्यासाठी त्यांना जोडणा-या वाटा तयार केल्या. जिथे भौगोलिक परिस्थिती अनुकूल होती आणि माणसांची ये जा चांगली होती अशा ठिकाणी गाडी जाण्याइतपत रुंद रस्ते बनले. दुर्गम डोंगराळ भागात ते तयार करणे कठीण असल्यामुळे पायवाटाच राहिल्या. गांवातसुध्दा कांही ठिकाणी प्रशस्त रस्ते तर कुठे अरुंद असे बोळ बनले. सामान्य माणसे बैलगाड्यांचा उपयोग करीत असत, पण राजघराण्यातले लोक सजवलेल्या प्रशस्त रथात बसून फिरत. त्यासाठी तसे चांगले रुंद रस्ते हवेत. राज्याचे संरक्षण आणि विस्तार करण्यासाठी पायदळ, अश्वदल, गजदल वगैरेंची सेना इकडून तिकडे जलद गतीने नेण्यासाठी चांगले रस्ते हवेत. त्यामुळे इतिहासकाळातल्या बहुतेक राजांनी स्वतः, राज्यकारभार आणि प्रजा या सर्वांच्या उपयोगासाठी आपल्या राज्यात रस्ते बांधवून घेतले. अशा त-हेने वेगवेगळ्या कारणांसाठी रस्ते तयार होतच गेले.


" अमक्या तमक्या सम्राटाने किंवा सुलतानाने कोणती लोकोपयोगी कामे केली?" असा एक प्रश्न आम्हाला इतिहासाच्या पेपरात बहुतेक वेळा यायचा आणि त्यावर "त्याने नद्यांवर घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, रस्ते बांधले, रस्त्यांच्या कडेला झाडे लावली. " हे ठराविक उत्तर दिले की मार्क मिळत असत. हे न करणारा कोणी सम्राट किंवा सुलतान इतिहासात कधी झालाच नसणार आणि असलाच तर त्याच्या नांवाने हा प्रश्न विचारला जात नसणार! कांही मुले तर " त्याने रस्त्यांच्या मध्ये दिव्याचे खांब उभे केले." असे देखील उत्साहाच्या भरात लिहून जात !


राजा किंवा प्रजा यातल्या कोणीही रस्ते बांधले तरी त्यासाठी दगड, माती, वाळू हीच सामुग्री उपलब्ध असायची आणि पहार, कुदळ, फावडे, धुम्मस अशा अवजारांचा उपयोग करून माणसांच्या शक्तीनेच ते काम होत असे. यामुळे जिथे सपाट आणि मऊ जमीन असेल त्या भागात रस्ते बांधणे सोपे असे. तेवढ्यासाठी डोंगर फोडता येत नसे. बारमाही पाण्याचा प्रवाह असलेल्या मोठया नद्या नौकेमधूनच ओलांडाव्या लागत. त्यांवर रस्त्यासाठी पक्का पूल बांधणे जवळ जवळ अशक्य होते.


जुन्या काळी बांधल्या गेलेल्या देवळांकडे जाणा-या आणि विशेषतः त्यांना प्रदक्षिणा घालण्यासाठी तयार केलेल्या वाटांवर अनेक जागी फरशा बसवलेल्या दिसतात. या ठिकाणी भाविकांची रहदारी जास्त असते म्हणून त्यांची सोय करण्यासाठी कोणी उदार अंतःकरणाचा दानशूर भक्त ते काम करून जात असेल. कदाचित मंदिरात जमा झालेल्या दक्षिणेचा कांही भाग भक्तांच्या सोयीसाठी त्यावर खर्च होत असेल किंवा त्यामुळे अधिकाधिक भक्त यावेत आणि त्यांनी अधिक दान करावे यासाठी ही गुंतवणूक केली जात असेल. अशा प्रकारे हा त्या संस्थेच्या आस्थापनाच्या अर्थकारणाचा भाग असेल. कांही लोक त्या फरशांवर आपली नांवे खोदून ठेवीत. संतमहंतांच्या पावलांचा स्पर्श होऊन आपण पावन व्हावे ही भावना त्यात असेल. युरोपमधील म्हणजे आजकालच्या आधुनिक जगातील कांही शहरात बाजारातले कांही रस्ते खास पादचा-यांसाठी राखून ठेवलेले असतात. त्या रस्त्यांवरसुध्दा फरशा बसवलेल्या पाहिल्यावर मला आमच्या गांवातल्या पुरातन मंदिराची आठवण झाली.


एका गांवाहून दुस-या गांवापर्यंत जाणा-या रस्त्यांवर अशा फरशा बसवणे व्यवहार्य नसणार, कदाचित त्या चोरीला जायचीच शक्यता जास्त असेल, शिवाय बैलगाडी किंवा टांग्यासाठी त्या त्रासदायकच ठरणार. यामुळे मुख्य रस्ते मातीचेच राहिले. पूर्वीच्या काळात त्यावरील रहदारीसुध्दा अगदी कमी प्रमाणात असे. एकतर लोकसंख्याच कमी होती. त्यातले सर्वसामान्य लोक आपल्या पंचक्रोशीच्या बाहेर फारसे जातच नसत. सैनिक, व्यापारी आणि यात्रेकरू तेवढेच नेहमी परगांवी जात असत. त्याखेरीज अवर्षण, महापूर, परचक्र यासारख्या आपत्तींमध्ये इतर लोकांना वाट फुटेल तिकडे पळावे लागत असे. त्या वेळी रस्त्याची पर्वा कोण करेल? त्यामुळे मातीच्या रस्ते त्यावरील नेहमीच्या रहदारीसाठी पुरे पडत.


ग्रामीण भागात ही परिस्थिती भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत होती. माझ्या लहानपणी आमच्या गांवातले एकूण एक रस्ते मातीचे होते. मी शाळेत शिकत असतांना त्यांच्या डांबरीकरणाची प्रक्रिया आधी गांवाबाहेर सुरू झाली. नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर पीडब्ल्यूडीने हे काम ज्या वेळी सुरू केले तेंव्हा ते पाहण्यासाठी गांवकरी मुद्दाम वेशीबाहेर फिरत जात. रस्त्याचा थोडा थोडा भाग खोदणे, त्यावर मुरुमाचे थर पसरवून ते रोडरोलरखाली चेपणे, त्यावर वाळू पसरून आणि वितळलेले डांबर ओतून पुन्हा रोडरोलरने त्यावर इस्त्री करणे वगैरे प्रकार आम्ही डोळे विस्फारून पहात असू आणि तयार झालेल्या गुळगुळीत रस्त्याचे कौतुक एकमेकांपाशी करत असू.


ही सुधारणा आमच्या गांवापर्यंत उशीराने आली असली तरी तिचा प्रारंभ सुधारलेल्या जगात कधीच झाला होता. यंत्रयुगात मोटारींचा वापर सुरू होताच गाड्यांचा वेग आणि त्यांची वहनक्षमता यांत प्रचंड फरक पडला आणि दळणवळणाच्या बाबतीत आमूलाग्र बदल झाला. पण मोटारगाड्यांसाठी चांगले रस्ते असणे जरूरीचे झाले. त्याबरोबर आस्फाल्ट आणि सिमेंट काँक्रीटसारखी नवी द्रव्ये निघाली आणि रस्ते बनवण्याच्या कामात यंत्रांचा उपयोग सुरू झाल्याने ते सुकर झाले. डोंगर फोडून त्यातून बोगदे करणे आणि डोंगराला उभ्या आडव्या खांचा करून त्यातून सपाट रस्ते तयार करणे शक्य झाले. मोठमोठ्या नद्यावरसुध्दा पूल बांधता आले. त्यामुळे नदीच्या पात्रांमुळे विभागले गेलेले भाग जोडले गेले. अर्थातच रस्ते सुधारल्यावर आणि नवे रस्ते उपलब्ध झाल्यावर वाहतूक वाढत गेली. अशा प्रकारे रस्ते आणि वाहने या दोन्हींमध्ये कल्पनातीत अशी वाढ झाली आणि अजून होतेच आहे.


लवकरच देशभर रस्त्यांचे जाळे विणले गेले. समोर दिसणारा रस्ता आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाईल किंवा कुठल्या गांवचा रहिवासी त्यावरून आपल्यापर्यंत येऊन पोचेल याला मर्यादा राहिली नाही. त्यातून कुणाकुणाच्या कुणाकुणाबरोबर गांठीभेटी होतील त्याचा नेम नाही. अजून जिला आपला प्रियकर भेटलेला नाही अशा एक स्वप्नाळू युवतीचे मनोगत सांगतांना श्रीमती शांताबाई शेळके लिहितात,


ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा ।माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?
स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे ।स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे ।

स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा ।।

No comments: