Wednesday, August 27, 2008

विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान

पाण्यात दगड टाकला तर तो बुडतो, पण लाकूड पाण्यावर तरंगते, जमीनीवर पडलेला दगड त्याला कोणी ढकलले, ओढले किंवा उचलले तरच तो जागेवरून हलतो, नाही तर जागीच पडून राहतो, सरळ वर उचलून सोडलेला दगड त्याच जागी खाली येतो आणि समोर भिरकवलेला दगड थोड्या अंतरावर जाऊन खाली पडतो वगैरे निसर्गात घडणा-या अनंत गोष्टी अशिक्षित माणसालासुध्दा अनुभवाने समजलेल्या असतात.

आदिमानवाच्या काळापासून माणसाला त्या माहीत होत्या. जग हे असेच असते असे समजून सहसा त्यावर कोणी जास्त विचार करत नाही. आर्किमिडीज आणि न्यूटन वगैरेंसारख्या विद्वानांनी असा विचार केला आणि त्यातून निसर्गाचे कांही मूलभूत नियम शोधून ते सूत्रांच्या किंवा समीकरणांच्या रूपात जगापुढे मांडले. त्या शोधांची नोंद त्यांच्या नांवावर झाली. अशा प्रकारच्या अनेक अनुभवांचा, निरीक्षणांचा आणि त्यावरून काढलेल्या निष्कर्षांचा विचार करून जे सिध्दांत मांडले गेले त्या सर्वांना एकमेकांशी प़डताळून पाहिल्यानंतर त्यातले कांही सर्वमान्यता पावले. त्यांचा एकत्रित विचार करून त्यातून एक शास्त्र बनत गेले. त्याला 'सायन्स' असे नांव दिले गेले. परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण आणि निष्कर्ष या पध्दतीने अधिकाधिक माहिती मिळवण्याचे एक प्रभावी तंत्र बनले, ते 'सायंटिफिक मेथड' या नांवाने प्रचारात आले. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीतून भारतात आल्यावर 'सायन्स'ला मराठीत 'विज्ञान' या नांवाने संबोधले गेले आणि आजही जात आहे.

वैज्ञानिक पध्दतींचा उपयोग करून माहिती मिळवतांनासुध्दा शारीरिक ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा आड येतातच. जगात जे कांही अस्तित्वात असते वा घडत असते त्यातला अत्यंत थोडा भागच आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवतो. त्यापलीकडे खूप कांही असते. शिवाय आरशात दिसलेले प्रतिबिंब म्हणजे खरी वस्तू नसते किंवा परावर्तनातून आलेला प्रतिध्वनी मूळ आवाज नसतो. त्यामुळे जे जाणवते त्यातलासुध्दा कांही भाग शंकास्पद असतो. यातून मार्ग काढण्यासाठी बुध्दीचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतांना डोळ्यांना दिसतो पण तो एका जागेवर स्थिर आहे आणि आपण फिरत आहोत अशी कल्पना मनाने करावी लागते. अगणित विद्वानांनी अशा विविध कल्पना करून त्यांच्या आधारे निरनिराळे सिध्दांत मांडले आणि तर्काने व प्रयोगाने त्यांची सत्यता पटवली.

न्यूटन, पास्कल वगैरे पूर्वीच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी मांडलेले सिध्दांत अशा प्रकाराने प्रयोगशाळेत सिध्द केले गेले आणि आजही विज्ञानाच्या प्राथमिक शिक्षणासाठी शाळाकॉलेजांमधून ते करून दाखवले जातात. त्यांच्या आधारावर निसर्गातल्या अनेक घटनांचे तसेच विविध पदार्थांच्या गुणधर्मांचे अर्थ समजून घेता आले आणि त्या माहितीचा उपयोग करून नवनवी साधने व यंत्रे बनवण्यात आली. यातून यंत्रयुग सुरू होऊन त्याचा विकास होत गेला. पण कांही निरीक्षणांचे स्पष्टीकरण जुन्या सिध्दांतातून समाधानकारकरीत्या होत नव्हते. ते समजून घेण्यासाठी नवनव्या संकल्पना मांडल्या गेल्या आणि त्यांच्या आधारे तर्कशुध्द विचाराने नवे सिध्दांत मांडले गेले. अणुपरमाणूंची आंतरिक रचना, सापेक्षता सिध्दांत यासारख्या गोष्टी डोळ्यांना किंवा कानाला जाणवू शकत नाहीत, पण त्या तशा आहेत असे गृहीत धरून गणिताच्या आधाराने अनेक दृष्य परिणामांचे स्पष्टीकरण देता येते. विज्ञानातल्या या संकल्पनांनादेखील शंभरावर वर्षे होऊन गेली आहेत. पण त्या नीट समजण्यासाठी उच्च दर्जाच्या गणिताची बैठक तसेच जेवढी कुशाग्र बुध्दीमत्ता लागते त्यांची अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून करता येणार नाही. त्यामुळे शाळेत शिकवले जाणारे बहुतेक विज्ञान निदान शंभर वर्षे जुने असते. त्यानंतर झालेल्या विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल सामान्य लोकांना फारसे माहीत नसते.

असे असले तरी नवनव्या संशोधनाच्या आधाराने ज्या तंत्रज्ञानाचा विकास होतो त्याचा फायदा सामान्य लोकांना मिळतोच. पूर्वीच्या काळात तलवारबाजीत निपुण असलेल्या वीराला पोलाद कसे बनते ते ठाऊक असण्याची गरज नव्हती, पण कणखर पोलादाची तलवार चालवून तो पराक्रम गाजवू शकत असे. त्याचप्रमाणे हातात मोबाईल धरणा-या माणसाला त्यातल्या मायक्रोप्रोसेसर चिपसंबंधी कांहीही माहिती नसली तरी तो त्या साधनाचा उपयोग करून कोणाशी बोलू शकतो, फोटो काढू शकतो, गाणे ऐकू शकतो आणि आता इंटरनेटसुध्दा पाहू शकतो. हे सगळे कसे साध्य होते याबद्दल मात्र तो अनभिज्ञच असतो. आज ज्या वेगाने विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात रोज नवी भर पडत आहे तो कोणत्याही माणसाच्या आकलनशक्तीच्या असंख्यपटीने अधिक आहे. वैज्ञानिकांच्या विनयामुळे म्हणा किंवा सत्यपरिस्थितीच्या जाणीवेमुळे ते नेहमीच आपण एक प्रवासी आहोत असे सांगत असतात. विज्ञानातल्या सिध्दांतांबद्दल थोडी अनिश्चितता बाळगतात. आज हे असे दिसते आहे, उद्या काय दिसेल ते सांगता येत नाही असा सूर लावतात. या सर्वांमुळे विज्ञानाबरोबरच त्याविषयीचे अज्ञान आणि अविश्वास जास्त वाढत चालले आहेत की काय असे कधीकधी वाटते.

मला असे वाटते की अज्ञान हे अमावास्येच्या रात्रीतल्या काळोखासारखे अथांग असते. आपण आपल्या ज्ञानाच्या पणतीच्या उजेडात आपल्या आसपासच्या कांही गोष्टी पाहू शकतो. यात आणखी अशी गंमत आहे की आपल्या शेजारी एकादा माणूस हजार वॉटचा दिवा लावून लख्ख उजेडात बसला असला तरी आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. आणखी दूरवर पहायचे असेल तर ज्याने त्याने स्वतःच्या पणतीतली वातच मोठी करावी लागते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रसाराबरोबर त्यासंबंधीचे अज्ञान आणि अविश्वास आपोआप दूर होईल अशी भाबडी आशा बाळगणा-यांची निराशा होते.

आज बहुतेक लोकांच्या घरी टीव्ही, कॉम्प्यूटर आणि खिशात मोबाईल असतात. त्यातल्या प्रत्येक साधनातून तो चित्रे पाहू शकतो आणि ध्वनी ऐकू शकतो. जगभरातून असंख्य ठिकाणांहून आणि अगणित लहरींच्या माध्यमामधून या संदेशांचे प्रसारण होत असते. त्यातले त्याला हवे ते संदेश त्याचे यंत्र ग्रहण करते, पण इतर असंख्य विद्युतचुंबकीय लहरीसुध्दा त्याच्या किंवा आपल्याही आसपास आणि आरपार सारख्या वहातच असतात. पण आपल्याला त्याचा पत्ता नसतो. आपण त्याबद्दल पूर्णपणे अज्ञानाच्या अंधारात असतो.

मात्र अदृष्यपणे येणारे संदेश आपल्याला समजतात असा कांही लोकांचा दावा असतो, किंवा त्यांना ती विद्या प्राप्त आहे अशी इतर लोकांची त्यांच्याविषयी समजूत असते. कोणाला पूर्वपुण्याईने, कोणाला सद्गुरूच्या अनुग्रहाने, कोणाला मंत्रतंत्र, ध्यान धारणा वगैरेंमुळे ही सिध्दी प्राप्त होते, कोणाच्या अंगात ही दैवी शक्ती असते तर कोणाकडे पैशाचिक, अशा अनेक शब्दात आपण त्याचा उल्लेख ऐकतो. या सगळ्या प्रकारांचा समावेश मी 'अंतर्ज्ञान' या शब्दात करीत आहे.

माझ्या लहानपणी अशा अद्भुत शक्तीबद्दलच्या असंख्य कथा मी ऐकल्या आहेत. पण ती शक्ती धारण करणारे सिध्दपुरुष कधीकाळी होऊन गेलेले असत किंवा जीवंत असलेच तर त्यांची भेट घडणे माझ्या आंवाक्याबाहेरचे असे. त्यामुळे मला स्वतःला कसलाही चमत्कार पहायला मिळाला नाही. माझ्या आजूबाजूला असणा-या ज्या व्यक्तींच्या 'अंगात' येत असे त्यांची वागणूक पाहता मला कधीच त्यांचा विश्वास वाटला नाही. अशिक्षित लोकांचा त्यांवर जास्त विश्वास असल्यामुळे शिक्षणाच्या प्रसाराबरोबर चमत्कारांचे प्रमाण कमी होईल अशी माझी समजूत होती. आज मात्र मला एक वेगळेच चित्र दिसत आहे.

एनर्जी (ऊर्जा) आणि व्हायब्रेशन्स ( कंपन) या पदार्थविज्ञानात विशिष्ट अर्थ असलेल्या शब्दांचा उपयोग करून त्यातून निर्माण होत असलेल्या अचाट अशा सामर्थ्याबद्दल आजच्या सुशिक्षित लोकांना बोलतांना मी सर्रास ऐकतो. एनर्जी ही वेगवेगळ्या स्वरूपात असते आणि त्यानुसार योग्य त्या परिमाणात ती मोजली जाते. तिच्या वहनाबद्दल निश्चित असे नियम असतात. तसेच तिच्यामुळे होणारे परिणाम माहीत आहेत, व्हायब्रेशन्सना एक कंपनसंख्या असते आणि अँप्लिट्यूड असतो, त्यापासून निर्माण झालेल्या लहरींना या दोन्हीशिवाय वेव्हफॉर्म असतो एवढे मी कॉलेजमध्ये असतांना फिजिक्समध्ये शिकलो होतो. आता आत्मिक, प्राणिक, कॉस्मिक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यासारख्या त-हेत-हेच्या एनर्जी तसेच कल्याणकारी, दुःखदायक, मैत्रीपूर्ण, वितुष्ट वाढवणारे, निर्मळ, कलुषित किंवा दूषित वगैरे प्रकारची व्हायब्रेशन्स आणि त्यांचे मानवाच्या व्यवसायातल्या नफ्यातोट्यावर, सुखशातीवर, आरोग्यावर, आयुष्यमानावर होणारे बरेवाईट परिणाम वगैरेंची वर्णने ऐकून मी थक्क होतो.

या ऊर्जा आणि ही कंपने कशाकशातून निर्माण होतील याचा तर कांहीच नेम नाही. दारावर टांगलेले तोरण, घराची खिडकी, त्यात बसवलेली लोखंडाची जाळी, भिंतीवरची तसबीर, टेबलावरले धातूचे कासव, गळ्यातला रुद्राक्ष किंवा ताईत, मनगटावर बांधलेला दोरा किंवा कडे, कुपणावरची जास्वंदी किंवा बोगनवेल, जन्मपत्रिकेतले ग्रह, तोंडाने किंना मनातल्या मनात एकादा श्लोक म्हणणे वगैरेमधून ती येतातच शिवाय टाळी किंवा चुटकी वाजवणे, डोळ्यांना ओली बोटे लावणे, हात जोडणे, मांडी घालून बसणे वगैरे क्रियांमधून होणा-या नाना प्रकारच्या व्हायब्रेशन्समधून ही एनर्जी वहात राहते असे सांगतात. कोणाच्या पायावर डोके ठेवले की त्याच्या पायातून ती आपल्या मस्तकात येते आणि आपल्या मस्तकावर त्याने हात ठेवला तर त्याच्या पंजातून आपल्या शरीरात त्याचा धोधो ओघ वहात येतो. या गोष्टी आदर व्यक्त करण्यासाठी करतात अशी माझी समजूत होती. त्यातून कंपने निर्माण होऊन ऊर्जेचा प्रवाह वाहता होतो असे कधी वाटले नव्हते. अशा प्रकारच्या तथाकथित विज्ञानाच्या गर्दीत आपल्या देशातले खरेखुरे सायन्स कुठेतरी हरवून जाईल की काय अशी आशंका मला वाटायला लागली आहे.

No comments: