Friday, August 08, 2008

यांत्रिक शेती

माणूस सोडून जगातील इतर सर्व पशुपक्षी आपले अन्न निसर्गात आपोआप जसे उत्पन्न होईल त्याच स्वरूपात मिळवून त्याचे भक्षण करतात. सुरुवातीला मनुष्यप्राणीसुद्धा रानोमाळ हिंडून आपले अन्न शोधत असे. कालांतराने त्याने शेती, बागायती, पशुपालन वगैरे सुरू करून आपल्याला हव्या तशा अन्नाचे उत्पादन करायला सुरुवात केली. त्याबरोबरच तो लाकूड, कापूस यासारख्या इतर उपयुक्त वस्तू मिळवू लागला. शेतामधून मिळणा-या या वस्तूंचा सोयिस्कररीत्या उपयोग होण्यासाठी धान्य दळायचे जाते, तेल काढण्याचा घाणा, उसाचा रस काढायचा चरक, कापसापासून सूत बनवण्याचा चरखा यासारखी यंत्रे निर्माण केली. पूर्वीच्या काळात ही यंत्रे तो आपल्या हाताने किंवा जनावरांच्या सहाय्याने चालवीत असे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इंजिने किंवा विजेची मोटर यावर चालणारी मोठमोठी यंत्रे तयार झाली. त्याबरोबरच कापडाच्या गिरण्या, साखरेचे व कागदाचे कारखाने वगैरे कृषीमालावर आधारलेले उद्योग उभे राहिले. त्यापाठोपाठ प्रत्यक्ष कृषीक्षेत्रातच यंत्रांचा उपयोग होणे हे ओघानेच आले.
अमेरिका व ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात चारी बाजूला क्षितिजापलीकडे पोचणारी विशाल शेते असतात आणि अशा अवाढव्य शेतांमध्ये शेतीची सगळी कामे यंत्रानेच केली जातात असे ऐकले होते. भारतात मात्र लोकसंख्येमधील वाढीनुसार प्रत्येक पिढीला जमीनीच्या वाटण्या होत जाऊन लहान आकाराची शेते निर्माण झाली आहेत. तसेच कमाल जमीन धारणा कायदा, कूळकायदा वगैरेसारख्या सामाजिक सुधारणांमुळे ती अजून लहान होत जाणार असल्याने आपल्या देशात यांत्रिक शेती कधी येणार नाही अशी भाकिते कांही लोकांनी वर्तवली होती. पण यांत्रिकीकरणामुळे होणा-या आर्थिक लाभाचा जोर इतका जबरदस्त असतो की कोठल्याही क्षेत्रात प्राप्त परिस्थितीतून कांही ना कांही मार्ग काढून कधी ना कधी ते झाल्याशिवाय रहात नाही. यांत्रिकीकरणाच्या विरोधात स्थापन झालेल्या खादी व ग्रामोद्योगाचे भरपूर सरकारी पाठिंबा मिळूनसुद्धा काय झाले ते आपण पाहिलेच आहे. त्याच प्रकारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतीकामाची विविध यंत्रे आता भारतात सर्रास उपयोगात येऊ लागली आहेत.
शेतातील पिकांच्या वाढीसाठी लागणारा 'माती, पाणी, उजेड, वारा' हा सगळा मूलभूत 'पसारा' परमेश्वराकडून वा निसर्गाकडूनच मिळतो. मानवाने त्यात आपल्या सोयी व गरजेनुसार थोडा फेरफार केला. जमीनीतले दगडगोटे काढून टाकले, तिला जमेल तितके समतल बनवले. नांगरणी करून मातीत भुसभुशीतपणा आणला. वाहून जाणारे पाणी बंधारे घालून अडवून ठेवले व त्याचे पाट काढून ते पाणी आपल्या शेतांना पुरवले. भूगर्भातील पाणी वापरण्यासाठी विहिरी खणल्या. रहाट, मोटा आणि पंपाद्वारे त्याला जमीनीखालून वर उचलले. उजेड व वारा यांना मात्र अद्याप फक्त कांही विशिष्ट प्रयोगातच नियंत्रित केले जाते. ग्रीन हाउससारख्या सुविधा अजून व्यापारी तत्वावर फारशा निघालेल्या नाहीत.
शेतकामासाठी कोठली यंत्रे बनवली गेली आहेत ते आता थोडक्यात पाहू. माणूस आणि यंत्र यांच्या काम करण्यात दोन महत्वाचे फरक आहेत. अनेकविध प्रकारच्या हालचाली करू शकणारे पण ठराविक आकाराचे दोनच हात माणसाकडे असतात पण ठराविक काम अत्यंत वेगाने करू शकणारे अनेकपटीने शक्तीशाली असे लागतील तितके लहान वा मोठे पुर्जे यंत्रात घालता येतात, त्यामुळे कठीण व अशक्य वाटणारी कामे ती लीलया आणि झटपट करू शकतात. हा सकारात्मक फरक झाला. दुस-या बाजूने पाहता माणसाला त्याचे नाक, कान, डोळे यामधून सतत संवेदना मिळून आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान होत असते, मुख्य म्हणजे तो स्वतः काय करतो आहे याचे त्याला भान असते. यामुळे त्यात जराशी अडचण आली किंवा धोका दिसला तरी तो लगेच थांबून विचार करू शकतो व आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करू शकतो. सर्वसाधारण यंत्रांना अशी संवेदनाशील ज्ञानेंद्रिये नसतात आणि बुद्धी तर अजीबात नसते. त्यांची एका प्रकारची हालचाल सुरू करून दिली की सर्व शक्तीनिशी तीच हालचाल ती करीत राहतात. पिठाच्या चक्कीमध्ये गव्हाऐवजी चुकून खडे किंवा वाळू पडली तरी ती खडखडाट करून त्याचा भुगा करीत राहील अथवा पुरेशी शक्ती न मिळाल्यास बंद पडेल, कदाचित खराबही होईल. पण जात्यावर दळण दळणारी बाई असे कांही होऊ देणार नाही. या कारणाने बहुतेक यंत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनुभवी व कुशल कामगाराची गरज लागतेच. पण तो सुद्धा स्वतःच्या शरीरावर जितके नियंत्रण ठेवू शकतो तितके त्या यंत्रावर ठेवू शकत नाही. त्यावर अनेक मर्यादा येतात. त्यामुळे यंत्रांकडून ठराविक साचेबंद कामच होऊ शकते.
जमीन नांगरून तयार करणे, त्यात बिया पेरणे, उगवलेल्या रोपांची काळजी घेणे, आलेल्या पिकांची कापणी करणे व मळणी करून त्यातून धान्य वेगळे करून घेणे ही शेतीमधील मुख्य कामे असतात. आपल्याकडे नांगरणी व पेरणी ही कामे पूर्वीपासून बैलांच्या सहाय्याने केली जात आहेत. नांगरतांना जमीनीचा वरचा थर खणून भुसभुशीत केला जातो व पेरणी करतांना धान्याचे बी जमीनीखाली ठराविक खोलीवर व एका ओळीत ठराविक अंतरावर पेरतात. जमीनीवर पडलेले बी पक्ष्यांनी खाऊन टाकण्याची शक्यता असते तसेच पेरलेले बी चांगले रुजून त्यातून कोंब फुटून तो जमीनीच्या वर येण्यासाठी ते योग्य तितक्याच खोलीवर पेरणे आवश्यक असते. त्यातून आलेली रोपेसुद्धा एका ओळीत ठराविक अंतराने उगवतात व प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी योग्य तितकी हवा, खत व पाणी मिळते. किर्लोस्करांनी पहिल्यांदा परंपरागत लाकडाच्या नांगराला लोखंडाचा फाळ बसवून त्याची उत्पादकता वाढवली ही आपल्याकडल्या यांत्रिकीकरणाची सुरुवात म्हणता येईल. आता नांगर ओढण्यासाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्याला अनेक फाळ जोडलेले असतात. त्यामुळे हे काम अनेकपट वेगाने होऊ लागले आहे. सपाट रस्त्यावरून धांवणा-या मोटरगाड्यांच्या आकारात मोठे बदल करून शेतामधील खांचखळग्यातून जाऊ शकणा-या ट्रॅक्टरची निर्मिती झाली हा सुद्धा एक महत्वाचा विकासाचा टप्पा आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारची अवाढव्य चाके तसेच अधिक शक्तीशाली इंजिनाचा विकास केला गेला. हैड्रॉलिक शक्तीच्या योगाने नांगराच्या फाळांना जमीनीत खुपसून ठेवण्यासाठी दाब पुरवणारी खास यंत्रणा बनवली गेली. पूर्वी त्यासाठी शेतकरी स्वतः त्यावर तोल धरून उभा रहात असे. तसेच एका वेळेस सारे फाळ जमीनीत खुपसून ते बरोबरीने ओढून पुढे नेण्याची योजना करण्यात आली.
कोरडवाहू शेतीमध्ये जमीनीतून उगवलेल्या रोपांची राखण करण्यापलीकडे फारसे कांही करता येत नाही. रोपांच्या ओळींमध्ये जमीनीत उगवलेले तण काढले जातात व रोगजंतुनाशके वापरून किडींचा नायनाट करतात. पूर्वी बागायती जमीनीत मोटेने पाणी दिले जाई. सिंचनाखाली घेतलेल्या पिकांना नियमित रूपाने पाणी देण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात यंत्रांचा उपयोग होऊ लागला आहे. पिकापर्यंत पाणी पोचवण्यासाठी ते पंपाने जमीनीतून वर खेचले जातेच, पण ओघळीतून वहात जाण्याबरोबरच ते आता होजपाइपातून दूरवर पाहिजे तिकडे नेऊ लागले आहेत. पाणी वाया न जाऊ देता त्याचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल ते आता ठिबक सिंचन व फवारासिंचन पद्धतीचा उपयोग करून पाहिले जात आहे. पिकांची कापणी म्हंटल्यावर "दुखभरे दिन बीते रे भैया अब सुख आयो रे" हे प्रसिद्ध गाणे डोळ्यासमोर येते. दोन तीन महिने शेतात घाम गाळल्यानंतर त्यातून आलेले भरघोस मोत्याचे पीक पाहून हरखून गेलेला शेतकरी व त्याचे सहकारी त्याची कापणी पूर्वीच्या काळी सगळीकडे हातानेच करीत असत व बहुतेक जागी अजूनही करतात. पूर्वीच्या काळी मळणी करतांना कापलेली कणसे वा ओंब्या आधी काठीने झोडपून काढीत असत किंवा ती बैलांकडून तुडवली जात असत. त्यातून निघालेले धान्य व भुसा यांचे मिश्रण उंचावर उभे राहून, सुपाने हवेत सोडून, वाहणा-या वा-याच्या सहाय्याने भुसा उडवून देत आणि त्यातील धान्य भुशापासून वेगळे होत असे. त्यानंतर ते चाळून उरलासुरला भुसा व कचरा वेगळा करत असत. मानवी प्रयत्नाने केले जात असलेले हे किचकट काम मात्र गेल्या कित्येक वर्षापूर्वीपासून सोप्या थ्रेशर यंत्राने करण्यात येऊ लागले आहे. या यंत्रात आत घातलेल्या ओंब्यांचे व चिपाडांचे आधी फिरत्या दात्यांमुळे तुकडे तुकडे होतात व गव्हाचे दाणे कोषातून बाहेर पडतात. दुस-या भागातील पंखा हलक्या भुशाला बाजूला उडवतो व जड धान्याचे दाणे आतील पात्रात जमा होतात. आजकाल कंबाइंड हार्वेस्टर यंत्राद्वारे कापणी आणि मळणी या दोन्ही क्रिया एकत्र करता येतात. उभ्या पिकातून हे अवजड यंत्र फिरवले की त्याची समोरील पाती उभ्या पिकाच्या दांड्यांना सपासप कापून त्यावरची कणसे वा ओंब्या यांना यंत्राच्या पोटात टाकतात व आतील पाती थ्रेशरप्रमाणेच गव्हाचे दाणे वेगळे करून ते एका मोठ्या टाकीमध्ये साठवतात. टाकी भरली की कन्व्हेयरच्या सहाय्याने ते गहू एका ट्रॉलीमध्ये ओतले जातात. ट्रॉलीला घेऊन ट्रॅक्टर गोदामाकडे जातो आणि हार्वेस्टर पिकांच्या पुढल्या रांगांकडे वळतो. हाताने कापणी करायला जिथे दहा पंधरा दिवस लागत, ते काम तासाभरात संपून जाते. हार्वेस्टरने कापणी करून झाल्यावर त्या शेतात एक भुसा बनवण्याचे यंत्र फिरवतात. हार्वेस्टरने मागे टाकलेला तसेच अजून उभा असलेला चारा कापून हे यंत्र त्याचे भुसकट बनवते आणि एका मोठ्या टाकीत ते साठवते. त्याचा उपयोग गुरांना द्यायच्या खाद्यात केला जातो. हे खास भारतातले तंत्रज्ञान आहे. अमेरिकेत भुसकटाला कांही महत्व नाही, पण भारतात त्याचाही उपयोग केला जावा या उद्देशाने ते इथे विकसित केले गेले आहे.
अशा प्रकारची यंत्रे भारतात कधी येणे शक्यच नाही असे ज्या ग्रामीण भागात कोणाकडून तरी छातीठोकपणे सांगितलेले ऐकले होते त्याच भागात आता ही यंत्रे काम करतांना मला दिसली आणि गंमत वाटली. हे स्थित्यंतर कसे झाले व त्याचे काय परिणाम झालेले दिसले हे पुढच्या भागात पाहू.

No comments: