Monday, August 18, 2008

विठ्ठला तू वेडा कुंभार - भाग ५


आता मी एका वेगळ्याच वेड्या कुंभाराची ओळख करून देणार आहे, म्हणजे त्याच्याकडे फक्त अंगुलीनिर्देश करणार आहे. मी त्याचा परिचय करून देणे हे ज्याचे त्याला त्याचे स्वतःचे नांव सांगण्यासारखे ठरेल. "माझे डोके, माझे हृदय, माझा स्वभाव, माझा स्वाभिमान, माझी गरज, माझी निष्ठा, माझी पारख, माझी व्यथा, माझी चिंता, माझे समाधान" किंवा "मला सुचलं, मला समजलं, मला आठवलं, मला वाटलं, मला आनंद झाला, मला कष्ट पडले" किंवा "मी जिंकलो, मी हरलो, मी हरवलो, मी हरखलो, मी थक्क झालो" किंवा "माझी बोबडी वळली, माझी चंगळ झाली, माझी वाट लागली" वगैरे गोष्टींबद्दल आपण बोलतो तेंव्हा त्यातला 'मी' म्हणजे नेमका कोण असतो? "माझे शरीर, माझी बुद्धी" असे त्यांच्याहून वेगळा कोण म्हणतो? "कोहम्?" या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडणे आणि ते समजणे अतिशय कठीण आहे. पण हा जो कोणी आत्माराम आपले सारे नियंत्रण करू पहात असतो त्याला मी सोप्या शब्दात 'वेडा कुंभार' म्हणेन. तोसुद्धा एक अत्यंत कार्यदक्ष आणि कमालीचा कुशल कारागीर असतो. रात्रंदिवस, अष्टौप्रहर कार्यरत राहून तो आपल्या व्यक्तीमत्वाचे घडे घडवीत असतो. त्यांचे ढांचा बनवतो, त्यांची जडणघडण करतो, त्यांना विविध पैलू पाडतो, वेगवेगळ्या छटांनी त्याला रंगवतो. आपलीच निरनिराळी रूपे त्यामधून निर्माण करीत असतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र, उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा, बालपण, यौवन आणि वार्धक्य अशा कालचक्राच्या वेगवेगळ्या आवर्तनांवर तो कालानुसार आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणीत असतो. त्याच्या क्रिया अनेक वेळा आपल्याला अगम्य, अतर्क्य वाटतात. आपल्यालाच तो वेडा आहे की काय अशी शंका येते.


हा वेडा कुंभार आपले घट कशातून बनवतो? मूळची माती तर प्रत्येक मनुष्य जन्मतःच आपल्यासोबत आणतो. वाटले तर त्याला पूर्वसंचित म्हणावे नाही तर जेनेटिक कोड, पण प्रत्येकाचे स्वतःचे असे वेगळे गुणधर्म असतात. त्याची बुद्धीमत्ता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, ग्रहणशीलता, सहनशीलता, सदसद्विवेकबुद्धी वगैरे अनेक गोष्टी सूक्ष्मरूपाने उपजतांनाच येतात आणि नंतर त्या वाढीला लागतात. ते सगळे या मातीचेच घटक आहेत. बालपणी आईवडिलांच्या तसेच सहवासातील इतर लोकांच्या ममतेच्या ओलाव्यात भिजून त्या मातीचा गोळा तयार होतो. वाढ होत असतांना मातीही वाढत जाते आणि त्यात अनेक भावनांचा ओलावा मिसळत जातो. संस्कारांनी तो चांगला मळला जातो, तसेच त्याला थोडा आकार येऊ लागतो. या वेळी आपल्यातला हा वेडा कुंभार आपल्या नकळत कामाला लागलेला असतो. मुळातली माती आणि ममता, संस्कार वगैरेंच्या मिश्रणातून तो आपल्या व्यक्तिमत्वाची अनंत शिल्पे घडवतो आणि ज्ञानाचे तेज व विचारप्रवाहांचा वारा यांवर त्यांना पक्की करून त्यांच्या राशी रचत राहतो. त्याचे हे कार्य आयुष्यभर अव्याहत चालत राहते.


या घटांची किती रूपे आणि त्यांचे किती आकार मोजावेत? एकच मनुष्य कोणाचा तरी मुलगा म्हणून जन्म घेतांनाच कोणाचा तरी नातू, भाचा, पुतण्या किंवा भाऊ झालेला असतो. मुलगी असल्यास ती नात, भाची, पुतणी नाहीतर बहीण होते. मोठे होता होता ते काका, मामा, मावशी, आत्या वगैरे बनतात आणि लग्न करून आधी जांवई, सून, मेहुणा, नणंद वगैरे आणि कालांतराने आई, बाप, आजी, आजोबा वगैरे पदव्या मिळवत जातात. या काळातील प्रत्येक क्षणी त्यांची अनेक आप्तांबरोबर वेगवेगळी नाती असतातच. त्याशिवाय मित्रमैत्रीण, शेजारीपाजारी, विद्यार्थी, शिक्षक, नेता, अनुयायी, ग्राहक, विक्रेता, प्रेक्षक, श्रोता, गायक, वादक, नट, नटी, खेळाडू, नागरिक वगैरे इतर भूमिकांमधून तो किंवा ती असंख्य लोकांशी जोडलेली असतात. यातील प्रत्येक भूमिकेचे वेगळे नियम व रीतीरिवाज पाळायचे, वेगळी कर्तव्ये व जबाबदा-या पेलायच्या, वेगळे निर्बंध घालून घ्यायचे, वेगळ्या मर्यादा सांभाळायच्या हे करावे लागते आणि या सगळ्यासाठी वेगळे मापदंड असतात या सगळ्यांचा विचार करून तो आपले आचरण करीत असतो. यातील भिन्न भूमिका कधी एकमेकांशी सुसंगत असतात तर कधी त्या वठवतांना विसंगत आचरणही करावे लागते. त्याच्या अंतरंगातला कुशल शिल्पकार या सगळ्याचा तोल सतत सांभाळत असतो आणि त्याच्या स्वभावानुसार पण वेगवेगळ्या आकाराची मडकी, सुरया वा रांजण त्याच्या विविध भूमिकांसाठी बनवत असतो.


जशी या भूमिकांची रूपे आगळी दिसतात तशीच त्यांची नशीबेसुद्धा वेगळी असतात. यातील कोणाच्या कांही भूमिका विलक्षण यशस्वी होऊन त्यांची खूप प्रशंसा होते तर कांही सपशेल फसतात आणि त्यामुळे त्याच माणसाची त्या बाबतीत नाचक्की होते. कधी एका चांगल्या गुणाच्या प्रदर्शनाला तत्काळ उत्स्फूर्त दाद मिळते तर कधी पुष्कळ काळ लोटल्यानंतर त्याचे महत्व लोकांच्या लक्षात येते. व्यावसायिक वा सार्वजनिक जीवनात उत्तुंग यश मिळालेल्या कोणा व्यक्तीचे पाय सुद्धा मातीचेच आहेत हे व्यक्तीगत पातळीवर तिच्या जवळ जातांच जाणवावे इतकी ती सामान्य वाटते. नोकरी वा धंद्यात फारशी प्रगती करू न शकलेल्या कित्येक माणसांना कौटुंबिक जीवनात सगळे कांही साध्य झालेले दिसते. व्यवसायातले त्याचे प्रतिस्पर्धी किंवा विरोधकसुद्धा खाजगीमध्ये प्रशंसक किंवा जिवाला जीव देणारे प्रेमळ मित्र असू शकतात. कधी तर एका क्षेत्रात निराशा पदरात पडल्यामुळे निरुपायाने दुसरीकडे वळलेली व्यक्ती तिची दिशा बदलल्यानंतर दुसरीकडे कल्पनातीत यश मिळवते. त्यामुळे पहिले अपयश हे एक प्रकारचे वरदानच ठरते. पण कदाचित त्याच वेळी त्याची कांही जवळची माणसे दुखावली जाऊन दूर गेलेली असतात आणि त्याच्याभोवती आप्पलपोट्या जीहुजूरांचा घोळका जमलेला असतो. त्यामुळे मनातून तो नाराज असतो. हे सगळे इतके विचित्र आणि विलक्षण असते की त्या वेड्या कुंभाराखेरीज इतर कोणाला ते नीटसे समजतसुद्धा नाही.


या बदलत्या भूमिकांचे एक उदाहरण द्यायचे झाले तर आता मी या लेखाचा लेखक आहे. हे रूप माझ्यातल्या कुंभाराने घडवलेले एक कच्चे बोळके आहे असे वाटल्यास म्हणता येईल. थोडी माहिती, जरासे वाचन, त्यावर मनन, चिंतन आणि किंचित कल्पकता यांच्या मिश्रणातून त्याला कांहीसा आकार आला आहे. ज्या क्षणी यातली शेवटची ओळ लिहून होईल त्या क्षणी ही अल्पकालीन भूमिका संपेल. त्यानंतर ब्लॉगरचे पात्र कामाला लागेल. मी पुन्हा कधी या ओळी वाचल्या तर ती वाचकाची किंवा टीकाकाराची एक वेगळी भूमिका असेल. या लेखकाच्या भूमिकेचे नशीब काय आहे ते मलाही माहीत नाही. हे लेखन सुजाण वाचकांच्या नजरेला पडले आणि त्यांना आवडले तर त्याच्या पसंतीचे लोणी त्याच्या पदरात पडेल, नाही तर "कसली कंटाळवाणी लांबट लावली आहे?" असा जळजळीत ताशेरा मारून ते कोठलेतरी दुसरे संकेतस्थळ गांठतील!
. . . . . . . .. . . . . . . . (क्रमशः)

No comments: