Thursday, August 14, 2008

वळत जाई पायवाट


समजा आपण एकाद्या माळरानात उभे आहोत. आता कृपया " तिथं कशाला तडफडायला गेलो आहोत?" असे विचारून नसते फाटे फोडू नका. तर आपल्या समोर उंचसखल अशी जमीन आहे. त्यात कुठे भुसभुशीत माती आहे तर कुठे वेडेवाकडे खडक आहेत, मध्ये मध्ये कांटेरी झुडुपे उगवली आहेत, अधून मधून एकादे वडाचे नाही तर कडुलिंबाचे मोठे झाड आहे, कुठे नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरीमुळे पाण्याची डबकी साठली आहेत, कुठे चिखल झाला आहे आणि त्या सगळ्याच्या पलीकडे दूर अंतरावर पण नजरेच्या टप्प्यात एका मंदिराचे सुंदर शिखर दिसते आहे. आपल्याला तिथे जायचेच आहे, पण तिकडे जाणारी पक्की सडक कांही कुठे दिसत नाही. अशा वेळी आपण काय करू?


जिथे उभे असू तिथून शिखराकडे नजर ठेऊन सरळ रेषेत चालत गेलो तर ते कमीत कमी अंतर असेल. त्यामुळे चालण्याचे कष्ट आणि त्यासाठी लागणारा वेळ दोन्ही किमान राहतील. एकाद्या मोकळ्या मैदानात आपण ते करू शकतो, पण या माळरानात अनेक अडथळे आहेत. आपण कुठल्याही झाडाच्या बुंध्याला मस्तवाल हत्तीसारखी धडक देऊ शकत नाही की कांट्याकुट्याच्या झुडुपात रानडुकरासारखे शिरू शकत नाही. उंच खडकावर चढू शकत नाही की तुटलेल्या खडकावरून खाली उडी मारू शकत नाही. पाण्याच्या डबक्यात शिरून आपले कपडे मळवायचे नसतात आणि चिखलात घसरून पडण्याचा धोका पत्करायचा नसतो. या सगळ्या अ़डचणी एक एक करून बाजूला सारायच्या झाल्या तर त्यासाठी केवढे श्रम लागतील आणि केवढा वेळ लागेल? म्हणजे देवदर्शन बाजूलाच राहून जाईल. त्यामुळे तसले कांही करायचा विचार आपण करत नाही. फार फार तर एकाद्या धोंड्याला अडखळून ठेच लागली तर रागाने तो उचलून फेकून देऊ किंवा जाता जाता डोळ्यावर येणारी एकादी झाडाची फांदी तोडून टाकू एवढेच करू. पायी चालतांना आपण प्रत्येक पाऊल ठेवण्यापूर्वी थोडेसे वळू शकतो, पुढचे पाऊल थोडे उंचावर किंवा खोलात, जवळ किंवा लांब टाकू शकतो आणि लहानसा अडथळा किंवा खड्डा ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. यापेक्षा मोठ्या अडथळ्यांना वळसा घालत नागमोडी मार्गाने पुढे जाऊन आपण त्या देवळापर्यंत पोचून जाऊ. जीवनातही असेच असते. आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी लहानसहान अडथळे ओलांडून आणि मोठ्या अडचणींपासून सुरक्षित अंतर राखून वळसे घेत पुढे जावे लागते.


आपण जसजसे चालत पुढे जातो तेंव्हा आपली पावले कांही खुणा मागे ठेवत जातात. ओली किंवा भुसभुशीत जमीन किंवा वाळू असेल तर त्यावर आपली पावले उमटतात, गवतातून गेतो तर पायाखाली आलेली गवताची पाती मातीत दबली जातात, कठीण खडकावर मात्र कांही परिणाम झाल्यासारखे दिसत नाही. ऊन, वारा, पाऊस, लाटा यामुळे पावलांच्या खुणा पुसून जातात, गवताची नवी पाती उगवतात आणि तरारून पुन्हा उभी राहतात. त्यानंतर त्या पाउलखुणांचा मागमूसदेखील रहात नाही. पण त्यापूर्वीच पूर्वीच्या पाउलखुणा शोधत आपण त्याच मार्गाने पुन्हा पुन्हा चालत गेलो किंवा आपल्या मागून बरेच लोक त्या वाटेने चालत गेले तर प्रत्येक पावलागणिक झालेल्या खुणा वेगळ्या रहात नाहीत. त्या एकमेकात मिसळून त्यातून एक पाउलवाट दिसू लागते. जोंवर ही पायवाट उपयोगात येत असते तोंपर्यंत ती वेगळी दिसते आणि बहुतेक लोक त्या वाटेवरूनच जातात. त्यामुळे ती अधिकाधिक गडद होत जाते. पण पावसाळ्यात त्या पायवाटेवरची रहदारी बंद झाली तर पावसाळा संपल्यावर ती वाट दिसतसुध्दा नाही. त्यानंतर कांही लोक नव्या पायवाटा तयार करतात आणि इतरेजन त्यावरून जाऊ लागतात.
रानावनात राहणारे लोक नेहमी अशा पाउलवाटांचाच उपयोग करतात. शेतक-यांना आपल्या घरातून शेतावर जाण्यासाठी आणि शेतातल्या पिकामधून एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी अशा कच्च्या वाटाच असतात. इतकेच नव्हे तर मोठ्या शहरांतल्या अनेक वसाहतींमध्ये इमारतींच्या मधून जाणारे शॉर्टकट सर्रास दिसतात. या वाटांवर पहिले पाऊल कोणी ठेवले ते कोणाला ठाऊकसुध्दा नसते. पण एकाला पाहून दुसरा असे करत त्या वाटेने लोक जा ये करू लागतात.


खूप घनदाट रान माजले असेल तर कधी कधी एका जागी सुरू झालेली पायवाट वळणे घेत कुठपर्यंत जाणार आहे याचा अंदाज लागत नाही. त्यामुळे आपण योग्य त्या मार्गाने जात आहोत की नाही अशी शंका यायला लागते. त्याची खात्री करून घेण्यासाठी वाटेतल्या कांही खाणाखुणा लक्षात ठेवायच्या असतात. अशाच एका निर्जन जागी राहणा-या आपल्या प्रियेच्या घराचा पत्ता सांगतांना कवी म्हणतात,गवत उंच दाट दाट, वळत जाई पायवाट ।वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे ।त्या तिथे पलीकडे तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे ।।

No comments: