चार भागात लिहिलेली ही कथा आज एकत्र करून दिली आहे.
२१ जून २०१८
अगदी आडबाजूला असलेल्या एका लहान गांवातल्या एका बाळबोध वळणाच्या कुटुंबात जन्या जन्माला आला, तिथल्या सरकारी शाळेत गेला आणि तिथेच लहानाचा मोठा झाला. शाळेत जाऊन तो नक्की काय काय शिकला ते सांगणे थोडे कठीण आहे, पण त्या काळातली बहुतेक मुले शाळेत जाऊन जे कांही करायची तेच तोसुध्दा करत असे. शिक्षकांच्या नेमणुका, बदल्या वगैरेंची सूत्रे दूर कुठेतरी असलेल्या शिक्षणखात्याच्या मुख्यालयातून हलवली जात असल्यामुळे त्या लहान गांवातल्या शाळेतल्या वर्गांची आणि ते सांभाळणार्या शिक्षकांची संख्या यातले गणीत कांही नेहमीच सरळ सोपे नसे. नेमून दिलेल्या मास्तरांपैकी कोणाची गांवाजवळच शेतीवाडी नाही तर गांवात दुकान असायचे, आणिक कोणी पूजाअर्चा, अभिषेक वगैरेमध्ये मग्न असत. त्या व्यापातून वेळ मिळेल तसे ते शाळेत येत, वर्गातल्या मुलांना बाराखड्या, जोडाक्षरे किंवा पाढे लिहून काढायला सांगत आणि खुर्चीवर बसून आराम करत असत. परीक्षेत मात्र ते मुलांना सर्वतोपरी प्रयत्न करून वरच्या वर्गात ढकलत असत. बहुतेक सारी मुलेसुध्दा शेतीची कामे, दूधदुभते, सुतारकाम, लोहारकाम, विड्या वळणे वगैरे घरातल्या उद्योग व्यवसायाला हातभार लावत असत. जेंव्हा त्यांना देण्याजोगे काम नसे त्या वेळी घरातला दंगा कमी व्हावा म्हणून त्यांना शाळेत पिटाळले जात असे. वर्गात डोकावून पाहून गुरूजी दिसले नाहीत की ते शाळेच्या प्रशस्त आवारात गोट्या, विटीदांडू, लपंडाव वगैरे खेळू लागत किंवा चिंचा, आवळे, बोरे, कैर्या वगैरे ऋतुकालोद्भव फळांच्या झाडांकडे आपला मोर्चा वळवत. कांही मुले वर्गातच बसून गप्पा व थापा मारणे, नवनव्या गोष्टी सांगणे, कविता किंवा गाणी म्हणणे वगैरे गतिविधींमध्ये आपला वेळ घालवत आणि मास्तर येतांना दिसले तर बाहेर जाऊन आपल्या वर्गातल्या मुलांना गोळा करून आणत. जन्याचे कधी या गटात तर कधी त्या गटात असे आंतबाहेर चालले असे. प्राथमिक शाळेत असा आनंद होता.
माध्यमिक शाळेत गेल्यानंतर वर्गात उपस्थित असणारे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या संख्येत थोडी वाढ झाली. त्याबरोबरच वर्गात बसल्या बसल्या टिंगल-टवाळ्या, कुचाळक्या वगैरें करण्याचे नवनवे प्रयोग मुले करू लागली. जन्या त्यात उत्साहाने सहभागी होत राहिला. मॅट्रिकच्या परीक्षेचे पेपर बाहेरून येत आणि तपासण्यासाठी बाहेर पाठवले जात यामुळे त्या परीक्षेची सर्वांनाच धास्ती वाटत असे. शाळेतले त्यातल्या त्यात कामसू आणि अनुभवी शिक्षक जास्तीचे खास वर्ग घेऊन परीक्षेचा सारा अभ्यासक्रम संपवत असत. जन्याला अभ्यासची गोडी कधी लागली नसली तरी त्याचे डोके तल्लख असल्यामुळे कानावर पडलेल्या कांही गोष्टी त्याच्या लक्षात राहिल्या, नशीबाने त्याला थोडी साथ दिली आणि शाळेचा मॅट्रिक परीक्षेचा निकाल जेमतेम वीस बावीस टक्के लागला असला तरी त्यात जन्याचा नंबर लागून गेला. एकदाचे गंगेत घोडे न्हाले.
जन्याच्या गांवात महाविद्यालय नव्हते आणि त्याने शहरात राहून शिक्षण घेण्याइतकी त्याच्या कुटुंबाची ऐपत नव्हती. त्यामुळे कॉलेज शिकण्याचे स्वप्न त्याने कधी पाहिलेच नव्हते. किंबहुना स्वप्नरंजन हा प्रकारच त्याला माहीत नव्हता. आज मिळते तेवढी मौजमजा करून घ्यायची, उद्याचा विचार उद्या करू, त्याचा ताप आज कशाला ? असे तो वर्तमानकाळातच जगत आला होता. पण मॅट्रिकचा अडसर त्याने पहिल्या फटक्यात ओलांडल्याचे ऐकून शहरात राहणार्या त्याच्या कांही आप्तांनी मदतीचा हात पुढे केला. त्या काळात तांत्रिक शिक्षणाला आजच्याइतकी मागणी नव्हती, पण भविष्यकाळाचा विचार करून कांही नवी तंत्रशिक्षणाची केंद्रे उघडली गेली होती. तशा एका तंत्रनिकेतनात त्याला प्रवेश मिळवून दिला, आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर नादारी मिळाली आणि कोणा उदार गृहस्थांकडे राहण्याजेवण्याची सोय झाली. अशा प्रकारे कांहीशा अनपेक्षित रीतीने जन्याचे उच्च शिक्षण सुरू झाले.
पण त्यापूर्वी त्याने कधीही मन लावून अभ्यास केला नव्हता किंवा अंग मोडून कामही केले नव्हते. तंत्रनिकेतनातील शिक्षणात रोज तीन चार तास कार्यशाळेत किंवा चित्रशाळेत उभे राहून काम करावे लागे आणि त्याशिवाय तीन चार तास कधी न ऐकलेल्या विषय़ांवरील व्याख्याने ऐकावी लागत असत. त्यानंतर घरी येऊन त्याचा अभ्यास करायचा. हे बहुतेक सारे विषय विज्ञान आणि गणितावर आधारलेले होते आणि ते इंग्रजी माध्यमातून शिकायचे होते. गणीत, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय जन्याचे जरा जास्तच कच्चे राहिले असल्यामुळे वर्गात शिकवलेले समजत नव्हते आणि ते शिकण्यात रस वाटत नव्हता. आलेला दिवस जनार्दन कसाबसा ढकलत होता. अखेर पहिल्याच परीक्षेत तो एकूण एक विषयात नापास झाला आणि त्याचे बिंग फुटले. ज्यांनी त्याला मदत केली होती त्यांना ती वाया गेल्याचा राग आला आणि ज्यांनी त्यासाठी आपला शब्द टाकला होता ते तोंडघशी पडले. शहरातला आधार न राहिल्यामुळे जनार्दन गांवाकडे परत गेला.
पण तिथले चित्र तोंपर्यंत बदलले होते. त्याच्या वर्गात शिकणारी धनिक लोकांची मुले कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरांत गेली होती. त्यातली कांही मुले तिथे अभ्यासात चांगली प्रगती करत होती, पण ज्यांना ते एवढे जमत नव्हते ती सुध्दा त्या निमित्याने शहरात राहू शकत होती. गरजू मुले वेगवेगळ्या जागी नोकरीला लागली होती किंवा नोकरीच्या शोधात हिंडत होती. ज्या मुलांचा घरचा उद्योग व्यवसाय होता ती पूर्णवेळ कामाला लागली होती. जनार्दनाबरोबर घालवण्यासाठी आता त्यातल्या कोणाकडेच फारसा वेळ नव्हता. घराची सांपत्तिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरातले लोक त्याच्याकडे डोळे लावून बसलेले होते. त्यांची बोलणी आणि शेजार्यांचे टोमणे सहन करणे दिवसेदिवस कठीण होत चालले होते. थोड्याच दिवसात आपले बालपण संपले असल्याचे त्याच्या ध्यानात आले आणि तो नोकरीच्या शोधाला लागला.
. . . . . . . .
------------------------------------
२१ जून २०१८
भाग १

भाग २
'अन्नासाठी दाही दिशां'ना शोध घेता घेता जनार्दनाला मुंबईजवळच्या एका गांवात नोकरी मिळाली. तिथल्या नगरपालिकेच्या जकातनाक्यावर कारकुनाच्या जागेवर त्याची नेमणूक जाली. 'पोटापुरता पसा' मिळण्याची सोय झाली आणि त्या गांवात राहणार्या एका नातलगाच्या बाल्कनीत पथारी पसरून झोपायला आडोसा मिळाला. अशा प्रकारे त्याच्या जीवनाचा दुसरा खंड सुरू झाला. तिथले काम फारसे कठीण नव्हते, पण नोकरीच्या तीन पाळ्या असत, त्यामुळे कधी भल्या पहाटे, कधी भर दुपारच्या उन्हात, तर कधी अपरात्री तंगड्या तोडत गांवाच्या वेशीपर्यंत जावे यावे लागत असे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊसवारा सहन करत पाण्यातून व चिखलातून जाणे त्याच्या जीवावर येत असे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत हे त्याला पूर्णपणे कळून चुकले.
कामावर नसतांना तसेच असतांनाही त्याला भरपूर मोकळा वेळ मिळायचा. त्याचा सदुपयोग करून घेऊन त्याने सार्वजनिक आरोग्यावरचा एक लहानसा अभ्यासक्रम पुरा केला आणि त्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याच्या आधारावर त्याला नगरपालिकेच्या आरोग्यविभागात बदली मिळाली. महिन्याचा पगार, कामाची जागा आणि कामाचे तास या तीन्ही गोष्टीत चांगला फरक पडला. दीड दोन वर्षे लक्षपूर्वक काम करून त्याने त्या कामाबाबतची सगळी माहिती शिकून घेतली. शिवाय इकडे तिकडे त्याचे लक्ष होतेच. मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कांही जागा रिकाम्या असल्याचे कळताच त्याने त्यासाठी अर्ज केला.
चांगल्या व्यक्तीमत्वाची देण जनार्दनाला जन्मतःच मिळालेली होती, त्याचा स्वभाव बोलका होता आणि कामाबद्दलची माहिती आणि अनुभव यातून त्याचा आत्मविश्वास वाढला होता. इंटरव्ह्यूमध्ये त्या जागेसाठी त्याची निवड झाली आणि मुंबईच्या सीमेच्या पलीकडे असलेल्या लहान गांवातून तो मुख्य महानगरात आला. तरी त्याची पहिली नेमणूक मुंबईच्या पार सीमेवरच्या एका उपनगरात झाली होती. त्या काळात दळणवळणाची आणि संदेशवहनाची एवढी साधने नव्हती तसेच त्या भागात इतर नागरी सुखसोयीसुध्दा फारशा सुलभ नव्हत्या. त्या बाबतीत तो भाग थोडा गैरसोय़ीचा असल्याने मुंबईमधील रहिवासी तिथे जाऊन राहण्यास फारसे उत्सुक नसायचे. योगायोगाने जनार्दन नोकरीला लागल्यानंतर लवकरच तिथल्या महानगरपालिकेच्या कर्मचार्यांच्या वसाहतीतली एक जागा रिकामी झाली आणि जनार्दनाला ती विनासायास मिळून गेली.
पंचविशी गाठेपर्यंत जनार्दन नोकरीत चांगला रुळला होता, रहायला जागा मिळाली होती आणि कामावर जाण्यायेण्यासाठी त्याने हप्त्यांवर एक स्कूटर घेतली होती. साहजीकच उपवर कन्यांच्या पालकांची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. या बाबतीतही त्याचे दैव जोरावर होते. फार काळ वाट पहावी न लागता अनुरूप अशी जीवनसंगिनी त्याला सापडली आणि जान्हवीबरोबर तो विवाहबध्द झाला. जान्हवी सर्व दृष्टीने जनार्दनाला हवी तशीच, किंबहुना त्याला पूरक अशी होती. प्राप्त परिस्थितीतील अडचणी व गैरसोयींबद्दल कुरकुर करत न बसता त्यात जमेल तेवढी सुधारणा करायची आणि उरलेल्यांची खंत मनात न बाळगता त्या शांतपणे सोसायच्या असे तिचे जीवनसूत्र होते. त्याचबरोबर मिळत असलेले सुख आनंदाने उपभोगायची तिची वृत्ती होती. जीवनात जास्त आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करायला ती नेहमी तयार असे. घराजवळच असलेल्या महानगरपालिकेच्या इस्पितळात तिलाही नोकरी मिळाली आणि दुहेरी अर्थार्जनाचे सुपरिणाम दिसू लागले. रंगीत टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, टेलीफोन, धुलाईयंत्र वगैरे उपयोगाच्या एकेक आधुनिक काळातल्या वस्तू त्यांच्या घरात येत गेल्या.
जनार्दन आणि जान्हवीच्या संसारात प्राजक्ताने चिमुकले पाऊल टाकले आणि एका अनोख्या सुगंधाने तो दरवळला. लहानग्या प्राजक्ताचे अत्यंत मायेने लालन पालन होत गेले. तिला वसाहतीमधल्या इतर मुलांबरोबर तिथल्या महापालिकेच्या शाळेत न घालता मैलभर अंतरावरील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात शिकायला पाठवले. शाळेत जायच्या आधीच घरच्या घरी तिचा अभ्यास सुरू झाला होता. जान्हवीने तिच्या शिक्षणाकडे बारीक लक्ष ठेवले होते आणि प्राजक्ता सुध्दा अभ्यासात हुषार निघाली. पहिल्या इयत्तेत तिने वर्गात पहिला क्रमांक मिळवला आणि शालांत परीक्षेपर्यंत तो टिकवून धरला. त्यानंतर ती इंजिनियरिंग कॉलेजला गेली आणि तिथेही प्रत्येक वर्षी पहिला वर्ग टिकवून धरून ती उत्तम टक्केवारी घेऊन पदवीधर झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तेंव्हा चांगले जोरात प्रगतीपथावर होते. एका प्रतिष्ठित कंपनीतली चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी प्राजूकडे आपणहून चालून आली. आयुष्याच्या सुरुवातीलाच ती आपल्या आई वडिलांच्या दुप्पट तिप्पट अर्थार्जन करू लागली. तिची प्रगती पहात असतांना जनार्दन आणि जान्हवी मनोमन हरखून जात होते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळतांना पाहून त्यांना अपूर्व समाधान वाटत होते.
. . . . . . . .
भाग ३
प्राजक्ता नाकीडोळी नीटस तसेच रंगाने उजळ होती, गोडवा आणि शालीनता हे तिचे दोन्ही गुण तिच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसायचे, तिच्या बोलण्यात माधुर्य होते, ती बुध्दीमान होतीच, इंजिनियरिंगची पदवी तिने मिळवली होती आणि एका प्रख्यात कंपनीत ती चांगल्या पदावर नोकरी करत होती. तिचे लग्न तर अगदी चुटकीसरशी जमून जाईल याबद्दल सर्वच आप्तेष्टांना पूर्ण खात्री होती. तिला चांगला मनाजोगता जोडीदार मिळावा असेच सर्वांना आपुलकीपोटी वाटत होते आणि त्यातले थोडे श्रेय़ आपल्याला मिळाले तर तेही हवे होते. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून प्राजू नोकरीला लागताच जो तो आपापल्या वर्तुळात तिच्यासाठी वरसंशोधन करू लागला. वय, उंची, शिक्षण आणि उत्पन्न या चार बाबतीत नवरा मुलगा मुलीच्या मानाने सरस असावा असा सर्वमान्य संकेत आपल्याकडे आहे. त्यात दोघांचे शिक्षण समान असले तरी चालते आणि उत्पन्नाचा आकडा सारखा बदलत असतो, पण लग्न जुळवण्याच्या वेळी तरी वराचेच उत्पन्न वधूपेक्षा जास्त असावे लागते. ठरवून केलेल्या विवाहात सहसा कोणीही परभाषिक, परजातीचे किंवा परधर्माचे स्थळ पहात नाही, सुचवत तर नाहीच नाही. एवढी किमान अवधाने पाळूनसुध्दा प्राजक्तासाठी योग्य अशा विवाहोत्सुक युवकांची कमतरता नव्हती. त्यामुळे सर्वच आप्तस्वकीयांनी आपापल्या परिचयातली दोन चार स्थळे सुचवली. प्राजक्ताचे लग्न जुळवण्याचा विचार मनात येतो न येतो तोंपर्यंत निदान शंभर तरी स्थळांची नांवे, माहिती, पत्ते आणि फोन नंबर जनूभाऊंच्याकडे आले. त्यांनी त्याची छाननी सुरू केली. या बाबतीत मात्र जनूभाऊ, जान्हवी आणि प्राजू यांचे निकष वेगवेगळे होते. त्यामागे तशीच सबळ कारणे होती.
जनार्दनाचा जनूभाऊ होण्यापर्यंत त्याची प्रगति झाली असली तरी महापालिकेचे सफाई कामगार आणि त्यांनी गोळा केलेला कचरा ट्रकमध्ये भरून तो डंपिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकणारे ट्रक ड्रायव्हर यांच्यावर देखरेख ठेवणे हे त्याच्या कामाचे स्वरूप कांही बदलले नव्हते. त्यामुळे दिवसातला त्याचा बराचसा वेळ या लोकांच्या सहवासात जात असे. त्यातील अशुध्द शब्दोच्चारासह त्यांची गांवढळ भाषा त्याच्या जिभेवर बसली होती. कधी कधी अनवधानाने एकादा अपशब्द त्याच्या तोंडातून निघून जात असे. त्याचे दांत तंबाखूच्या सेवनाने रंगले होते आणि त्या लोकांचे हांतवारे, अंगविक्षेप वगैरे जनूभाऊंच्या देहबोलीचा भाग झाले होते. त्याच्या विचारसरणीवरही त्या कामगारांच्या सहवासाचा थोडा प्रभाव पडला असावा. जान्हवीचा संपर्क जास्त करून मध्यम वर्गातील पांढरपेशा महिलांबरोबर येत असे. त्यामुळे तिचे बोलणे, वागणे त्या वर्गाच्या प्रातिनिधिक स्वरूपाचे झाले होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ती जुन्या काळातल्या काकूबाईंची पण खूप सुधारलेली आधुनिक आवृत्ती वाटायची. प्राजूला लहानपणापासून जसे घरापासून दूर असलेल्या चांगल्या दर्जेदार अशा शाळेत घातले होते, तसेच घराच्या आसपासच्या मुलांपासूनही तिला थोडे दूरच ठेवले गेले होते. तिच्या बहुतेक वर्गमैत्रिणी उच्च मध्यवर्गीयांच्या हाउसिंग सोसायट्यातल्या फ्लॅटमध्ये रहात असत. प्राजू जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे आपल्या मैत्रिणींकडे जाणेयेणे वाढत गेले. इंजिनियरिंगसाठी ती कॉलेजच्या हॉस्टेलवर रहात होती, तिथल्या मैत्रिणी सांपत्तिक व सामाजिक दृष्ट्या अधिकच वरच्या स्तरातून आल्या होत्या. त्यांच्या संपर्कात राहून प्राजक्ताच्या वागण्यात सफाई, अदब आणि रिफाइनमेंट आली होती. वेषभूषा, केशभूषा, सौंदर्यसाधनांचा वापर वगैरे बाह्य स्वरूपाच्या गोष्टींच्या बाबतीत तिने आपल्या आईवडिलांना जितपत पसंत पडेल तितपतच मजल मारली असली तरी अंतरंगातून ती त्यांच्या विश्वापासून खूप पुढे गेली होती. त्या तीघांनीही कधीही ही गोष्ट आपल्या ओठावर येऊ दिली नसली तरी ती त्यांच्या कळत नकळत घडत होती. यामुळे लग्नसंबंधासाठी स्थळांचा विचार करून त्यांची छाननी करतांना त्या तीघांच्या हातात वेगवेगळ्या चाळणी होत्या.
जनार्दन आणि जान्हवी या उभयतांचे बहुतेक सर्व नातलग मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातच रहात असल्यामुळे आपले लहानपणी वास्तव्य असलेले खेडेगांव सोडल्यानंतर जनार्दनाचा सारा प्रवास एवढ्या भागातच झाला होता. त्यापलीकडचे विश्व त्याने कधी पाहिलेच नव्हते. त्यामुळे आपल्या लाडक्या कन्यकेला लग्न लावून सातासमुद्रापलीकडे पाठवून द्यायची कल्पनासुध्दा तो सहन करू शकत नव्हता. फार फार तर बडोदा, इंदूर किंवा धारवाडपर्यंत तिला पाठवायची त्याच्या मनाची तयारी होती. प्राजूने आपल्या नजरेच्या टप्प्यात असावे असेच जान्हवीलाही वाटत होते. शिवाय नवरदेवाचे आईवडील, भाऊ बहिणी वगैरे मंडळीसुध्दा त्याच्यासोबतच रहात असली तर उत्तमच, निदान ती गरज पडतांच लगेच येऊ शकतील एवढ्या जवळ असावीत असे तिला वाटत होते. या बाबतीत प्राजूचे मत विचारण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही. सांगून आलेल्या स्थळांमधली अनेक मुले परदेशी गेलेली होती, किंवा जायच्या तयारीत होती. ज्यांची भावंडे अमेरिकेत आधीच जाऊन स्थायिक झाली होती ती आज ना उद्या जाणारच असे गृहीत धरून अशी सर्व स्थळे जनूभाऊने यादीतून कटाप केली. नोकरीसाठी दिल्ली, कोलकाता किंवा बंगलोरला गेलेल्या मुलांचाही विचार केला नाही आणि ज्यांचे आईवडील डेहराडून किंवा कोचीनसारख्या दूरच्या ठिकाणी रहात होते त्यांनाही बाजूला ठेवले. मुंबई व पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रातल्या इतर विभागात प्राजूपेक्षा जास्त पगार मिळवणारी अशी कितीशी मुले असणार? त्यामुळे तिच्यासाठी वरसंशोधन करण्याचे क्षेत्र मुंबईपुण्याच्या सीमेतच मर्यादित राहिले.
प्राजूच्या ज्या मैत्रिणींची लग्ने झाली होती त्या माहेरच्या चांगल्या सुखवस्तू घरातून निघून सासरच्या अधिकच प्रशस्त घरी गेल्या होत्या. कांहीजणींची ठरलेली लग्ने त्यांच्यासाठी नवा फ्लॅट बांधून तयार होण्याची वाट पहात थांबवून ठेवली होती. तिलासुध्दा आपला नवा संसार छानशा जागी थाटावा असे वाटले तर त्यात काही विशेष आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते. पण तिला सांगून आलेल्या स्थळातली कांही मुले सध्या तरी दादर गिरगांवातल्या चाळीत किंवा डोंबिवली भायंदरसारख्या दूरच्या नगरातल्या दोन खोल्यात रहात असलेल्या आपल्या मध्यमवर्गीय आईवडिलांकडे रहात होती. परदेशातल्याप्रमाणे वयात आल्याबरोबर मुलांनी लगेच स्वतंत्र होऊन राहणे अजून आपल्या देशात रूढ झालेले नाही. पुढे त्यांनी गरजेपोटी आपले वेगळे घर केले असतेच, पण लग्न झाल्या झाल्या त्यासाठी पुढाकार घेऊन प्राजूला वाईटपणा घ्यायचा नव्हता. तसेच ते होण्याची वाट पहात त्या माणसांच्या गर्दीत जाऊन राहण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती आणि तिला तसा आग्रह करावा असे जनार्दनालाही वाटत नव्हते. आधीपासूनच व्यवस्थित परिस्थितीत रहात असलेल्या कुटुंबात लग्नानंतर जायची तिची इच्छा त्यालासुध्दा मान्य होती.
अशा प्रकारे मुंबईपुण्यात राहणारी सुस्थितीतली स्थळे निवडून त्यातील एकेकाला प्राजक्ताची माहिती, पत्रिका वगैरे पत्राने पाठवायला जनूभाऊंनी सुरुवात केली. तसेच संभाव्य वराची चौकशी केली. पत्रिका पाहणारे लोक गोत्र, मंगळ, एकनाड यासारख्या कांही किमान गोष्टींकडे लक्ष देतातच, सगोत्र विवाह कोणालाच चालत नाही आणि कांही गोत्रांचे आपसात जमत नाही. त्यामुळे त्या मुद्यांवरून १०-१५ टक्के पत्रिका वर्ज्य ठरतात. आकाशातील राशीचक्रातल्या एकूण बारा राशींपैकी पाच राशींमध्ये (म्हणजे सुमारे चाळीस टक्के लोकांच्या पत्रिकेत) मंगळ हा ग्रह असला तर त्या व्यक्तीला मंगळ आहे असे समजले जाते आणि उरलेल्या अमंगळ व्यक्ती त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार नसतात. कोणाला मंगळ असला तर यात साठ टक्के जागी पत्रिका जुळत नाहीत. जगातील एक तृतियांश म्हणजे तेहतीस टक्के लोकांची नाड एकच असते, ते ही गेले. त्याशिवाय कोणाचा जन्म चांगल्या तिथीवर झालेला नसतो, तर कोणाचे जन्मनक्षत्र अशुभ मानले जाते. अशा सर्व नकारघंटा ऐकल्यानंतर सुमारे वीस टक्के पत्रिकांतल्या जोड्याच एकमेकीशी जुळतात आणि बहुसंख्य म्हणजे ऐंशी टक्के जुळत नाहीतच. असे सर्वांच्याच बाबतीत होत असते. त्याप्रमाणे अनेक लोकांनी प्राजक्ताची पत्रिका त्यांच्या मुलाच्या पत्रिकेशी जुळत नसल्याचा निकाल जनूभाऊंना कळवला.
म्युनिसिपल क्वार्टर्समधला जनूभाऊंचा पत्ता पाहूनच कांही वरपित्यांनी ते पत्र कचर्याच्या पेटीत टाकून दिले असेल. त्याला उत्तर देण्याची गरज त्यांना वाटली नसेल. कांही लोकांना टेलीफोन करून जनूभाऊने आठवण करून दिली, पण रांगडेपणाचा स्पर्श असलेल्या भाषेतले त्याचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी ते संभाषण जास्त वाढवले नाही. बंगल्यात किंवा उत्तुंग गगनचुंबी इमारतीत रहात असलेल्या लोकांच्या घरी जायला त्याला संकोच वाटत होता, पण उद्या आपली मुलगी त्यांच्या घरी द्यायची असेल तर तिथे जावे लागणारच, असा विचार करून तो कांही लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आला. पण दर वाक्यात दोन तीन इंग्रजी शब्द आणि दर दोन तीन वाक्यात एक अख्खे इंग्रजी वाक्य असे मिश्रण असलेले त्यांचे बरेचसे बोलणे जनूभाऊच्या डोक्यावरून जात होते. त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी केलेली वेषभूषा, केशभूषा व एकंदर साजश्रुंगार आणि त्यांचे मॅनर्स व एटिकेट्स सांभाळत कृत्रिमपणे बोलणे जान्हवीच्या मनात इन्फीरिएरिटी काँप्लेक्स निर्माण करत होते. त्यांना एकमेकांशी बोलता येईल असा समान विषय सापडत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात सुसंवाद साधला गेला नाही. अर्थातच त्यांच्याकडून होकार येण्याची अपेक्षा धरण्यात अर्थ नव्हता.
प्राजक्ताला प्रत्यक्ष पाहून कोणी तिला नाकारले असे कधी झाले नाही आणि दाखवल्यानंतर तिला कोणीही नकार दिलाही नसता, पण तिच्या वरसंशोधनाच्या प्रवासाची गाडी त्या स्टेशनापर्यंत गेल्याशिवाय पुढे जायला पसंतीचा हिरवा कंदील मिळणार तरी कसा? मुलीला दाखवणे किंवा मुलगा व मुलगी यांची भेट घडवून आणणे इथपर्यंतसुद्धा बोलण्यातली प्रगती होत नव्हती. दरम्यानच्या काळात प्राजक्ताची नोकरीतली घोडदौड मात्र चालू होती. प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस, रिवॉर्ड्स वगैरेमधून तिची प्राप्ती तीन वर्षात दुपटीवर गेली. त्याबरोबर वराबद्दलच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि छाननीच्या चाळणीतल्या जाळीची वीण अधिकाधिक दाट होत गेली. ज्या आप्तस्वकीयांनी उत्साहाने आधी परिचयातली दोन चार स्थळे सुचवली होती त्यांना त्यांच्या ओळखीमध्ये पहिल्यापेक्षा जास्त चांगली स्थळे मिळालीही नसती आणि मिळाली असती तरी त्यांची पहिल्यासारखीच गत झाली असती असे पहिला अनुभव पाहिल्यानंतर वाटल्यामुळे त्यांनी आणखी नवी स्थळे शोधण्यात रस घेतला नाही. वधुवर सूचक मंडळे, वर्तमानपत्रातल्या आणि इंटरनेटवरच्या जाहिराती वगैरे पाहून जनूभाऊने आपले प्रयत्न चालू ठेवले होते, पण त्यातून कांही निष्पन्न होत नव्हते. प्राजू तर रात्रंदिवस आपल्या कामातच गढून गेली असल्यासारखे दिसत होते आणि तिचे असे कांही फार मोठे वय झाले नसल्यामुळे आपल्या कमावत्या मुलीचे तातडीने लग्न करून तिची सासरी पाठवणी करण्याची जनार्दनालाही विशेष घाई वाटत नव्हती. प्राजूचे आणि अज्ञात असलेल्या संभाव्य वराचे आईवडील एकमेकांना नापसंत करत होते किंवा आकाशातले ग्रह त्यांच्या आड येत होते. तिच्या लग्नाची झालेली अनपेक्षित अशी ही कोंडी कशी फुटणार हेच कळत नव्हते.
. . . . . . .
भाग ४
अशातच एका दिवशी अचानक जनार्दनाचा फोन आला. तो घाईघाईने बोलला, "अरे या रविवारी कसलाही कार्यक्रम ठरवू नकोस हां, ठरला असला तरी तो रद्द कर, तुम्हाला दोघांनाही आमच्या गेट टुगेदरला यायचंय् बरं."
मला कसलाच बोध होत नव्हता. त्या दिवशी त्याच्या घरी कोणाचा वाढदिवस नव्हता की दसरा, संक्रांत यासारखा सण नव्हता. यापूर्वी जनार्दनाने अशा निमित्याने सुध्दा कधीच असे संमेलन भरवले नव्हते. कधी कधी परदेशात राहणारे पाहुणे थोडी सुटी घेऊन भारतात येतात आणि सर्व नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी वेगवेगळे जाण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो म्हणून सर्वांना एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठेवतात. जनार्दनाच्या जवळचे असे कोणीच परदेशात रहात नव्हते. मी विचार करत असतांना जनार्दन पुढे सांगत होता, "तुझी मुलं इकडे आली असतील तर त्यांनाही घेऊन ये, नसतील तरी ती येण्यासारखी असतील तर त्यांना यायला सांग. त्यांच्याही सगळ्यांशी भेटी होतील."
मी त्याला म्हंटले, "अरे हो, हे कशाबद्दल आहे ते जरा नीट सांगशील तरी, प्राजूचं लग्नबिग्न ..." मी खडा मारून पहात होतो, पण माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, "हां, त्याबद्दलच आहे. तू आलास की सगळं कळेल तुला. आधी पत्ता तर लिहून घे. मला अजून खूप फोन करायचे आहेत."
मी दिसेल ते पेन हातात घेऊन समोरच्या वर्तमानपत्रावरच त्याने सांगितलेला पत्ता, तारीख आणि वेळ लिहून घेतली. तेवढ्यात त्याने फोन बंदच केला. मी त्याला फोन लावून पाहिला, पण तो सारखा एंगेज्ड येत राहिला. त्याने सांगितल्याप्रमाणे तो फोनवर एकामागून एक बोलावणी करत असणार. रात्री त्याच्या घरी कोणी फोन उचलतच नव्हते. बहुधा तो समारंभाच्या तयारीसाठी बाहेर गेला असावा आणि मुक्कामाला तिकडेच राहिला असावा असा तर्क करून मी त्याचा नाद सोडून दिला.
रविवारी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोचलो. अनोळखी भागातल्या पूर्वी कधी न ऐकलेल्या जागेचा शोध घेताघेता थोडा उशीरच झाला. तीन मजले चढून गेल्यावर तिथे तो हॉल होता. त्याच्या अंवतीभोवती दिव्याच्या किंवा फुलांच्या माळांची आरास नव्हती की दाराला तोरण नव्हते किंवा स्वागतासाठी कोणी उभे नव्हते. बाहेर कसला बोर्डही नव्हता. उघड्या दरवाजातून आत बसलेली ओळखीची माणसे दिसली तेंव्हा त्यांना पाहून आम्हीही आत गेलो. मुंबई पुणे नाशिक त्रिकोणातली बरीचशी नातेवाईक मंडळी आमच्या आधी तिथे येऊन पोचली होती. आणखी कांही लोक यायला निघाले होते. दारातून आत गेल्यावर जे समोर दिसतील त्यांना "हॅलो, हाय्, कसं काय ?" वगैरे विचारत, वडिलधारी लोकांचा चरणस्पर्श करत आणि आमच्या पाया पडणार्या मुलांच्या पाठीवर थाप मारून त्यांची खुशाली विचारत आम्ही हळूहळू पुढे सरकत स्टेजपाशी जाऊन पोचलो. भेटवस्तू किंवा लिफाफे हातात घेऊन अभिनंदन करायला आलेल्या लोकांच्या छोट्याशा रांगेत उभे राहून समोरचे निरीक्षण केले.
नखशिखांत साजशृंगार करून स्टेजवर उभी राहिलेली प्राजक्ता दृष्ट लागण्यासारखी सुरेख दिसत होती. तिच्या आमच्याकडच्या बाजूला उभे असलेले जनार्दन आणि जान्हवी भेटायला येणार्या लोकाचे हंसतमुखाने स्वागत करत होते. प्राजूच्या पलीकडे एक काळासावळा, तिच्या मानाने थोडा राकट वाटणारा पण तरतरीत दिसणारा एक युवक उभा होता. अर्थातच तो तिचा पती असणार. त्याच्या पलीकडे बरीच जागा सोडून स्टेजच्या कडेला दोन खुर्च्या मांडून त्यावर एक वयस्क जोडपे बसले होते. त्यातल्या गृहस्थाने सुटावर बो बांधला होता. अशा प्रकारच्या समारंभात मी प्रथमच बो बांधलेला पहात होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मॅडमने चक्क फ्रॉक घातला होता. तिच्या कपाळाला कुंकुवाची टिकली नव्हती की गळ्यात मंगळसूत्र नव्हते. तिथे फक्त एक टपोर्या मोत्यांची माळ दिसत होती. त्यांचे रंगरूप आणि चेहेरामोहरा पाहता ते त्या युवकाचे मातापिता असणार हे लक्षात येत होते. हॉलमध्ये आलेल्या लोकांकडे दुरूनच पहात ते फक्त एक दुसर्याशी बोलत बसले होते.
आमच्या पुढे असलेला ग्रुप स्टेजवरून उतरायला लागल्याबरोबर आम्ही पुढे झालो. जनार्जन आणि जान्हवीने एक पाऊल पुढे येऊन आमचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन करून होताच त्याने ओळख करून दिली, "हे आमचे जावई, टॉम कार्व्हाल्लो. "मी ही "हौडीडू" म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केले, "काँग्रॅट्स" म्हणून त्या जोडप्याला "ऑल द बेस्ट विशेस" दिल्या, आम्ही येऊन गेल्याची नोंद आल्बममध्ये ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला आणि स्टेजवरून खाली उतरून जनार्दनाच्या सख्ख्या भावंडांच्या शेजारी जाऊन बसलो.
ती मंडळी अजून धक्क्यातून सावरलेली दिसत नव्हती आणि त्यांनाही संपूर्ण माहिती नव्हती. थोडी माहिती, थोडा तर्क, थोडा अंदाज यातून जे तुकडे कानावर पडले त्यातून मी एक सुसंगत वाटेल अशी गोष्ट गुंफली. प्राजू आणि टॉम सात आठ वर्षांपूर्वी म्हणजे दोघेही शाळेत असतांना कसल्याशा कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते आणि त्यांची नुसती तोंडओळख झाली होती. पुढे दोघे वेगवेगळ्या कॉलेजात शिक्षणासाठी गेले आणि कोण कुठे गेले तेसुध्दा त्यांना एकमेकांना समजायचे कांही कारण नव्हते. शिक्षण संपल्यावर टॉमला थेट दुबाईला नोकरी लागली आणि तो तिकडेच रहात होता. वर्षभरापूर्वी सहज ऑर्कुटवर मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींची नांवे वाचतांना त्यातल्या कोणा एकाला दुसरे नांव दिसले आणि "मला ओळखलंस का?, कांही आठवतंय् कां?" असे विचारत स्क्रॅप टाकायला सुरुवात झाली आणि "तूच ना?", "आता तुझं कसं चाललंय्?", सध्या तू कुठे आहेस?" वगैरेंमधून ते संभाषण वाढत गेले. स्क्रॅप नंतर मेल, चॅटिंग वगैरे करता करता आपण दोघे 'एकदूजेके लिये' निर्माण झालो असल्याचा साक्षात्कार होऊन त्याचे ई-लव्ह अफेअर सुरू झाले. प्राजक्ताने याबद्दल चकार शब्द न उच्चारल्यामुळे घरात किंवा तिच्या मैत्रिणींना त्याचा पत्ता लागला नाही.
ती इंजिनियरिंगला गेली तेंव्हा तिच्या अभ्यासासाठी घरी कॉम्प्यूटर आणला होता आणि नोकरीला लागल्यानंतर इंटरनेट कनेक्शन घेतले होते. घरी असतांना ती त्याच्यासमोर नेहमी बसलेली असते एवढेच तिच्या आईवडिलांना दिसत होते, पण ती इंग्रजी भाषेत काय गिटर पिटर करत असे ते त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्नसुध्दा कधी केला नव्हता. आठवडाभरापूर्वी टॉम भारतात आला. दोघांनी कुठे आणि केंव्हा भेटायचे हे आधी ठरवलेलेच होते, त्याप्रमाणे भेटून त्यांनी सर्व तपशील पक्का केला. टॉमला सोबत घेऊन प्राजू घरी आली आणि तिने सांगितले, "आम्ही दोघे तीन दिवसांनी चेंबूरच्या चर्चमध्ये विवाहबध्द होत आहोत. तिथून परस्पर विमानतळावर जाऊन सिंगापूरला जाऊ आणि चार दिवसांनी परत आल्यावर आठवडाभर मुंबईला हॉटेलात राहून व्हिसा, इन्शुअरन्स, बँक अकौंट्स वगैरेची कामे आटपून अमक्या तारखेला दुबईला जाणार आहोत. माझी बदली दुबईच्या ऑफीसमध्ये झाली आहे आणि दोन आठवड्यात मला तिकडे जॉइन करायचे आहे. सर्व प्रवासांची आणि हॉटेलांची रिझर्वेशने झाली आहेत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी आमची इच्छा आणि अपेक्षा आहे."
कुशल इंजिनियरच्या सफाईने त्यांनी एकूण एक गोष्टी विचारपूर्वक आणि पध्दतशीर रीतीने नियोजन करून केल्या होत्या. त्यात अविचार किंवा उतावळेपणा दिसत नव्हता. त्यामुळे ते त्यात बदल करतील अशी शक्यता नव्हती. त्यांना होकार देऊन आपल्या मायेचे उरले सुरले बंध जपून ठेवणेच जनार्दन आणि जान्हवी यांच्या दृष्टीने शहाणपणाचे होते. ते अशा गोष्टी नाटकसिनेमातून रोज पहात असले तरी गदिमांच्या शब्दात सांगायचे झाले तर "अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात" अशी गोष्ट आता त्यांच्याच जीवनात घडत होती. त्यांनी त्याला विरोध केला नाही. प्राजू आणि टॉमच्या बिझी शेड्यूलमधला रविवारचा सुटीचा दिवस तेवढा आपल्यासाठी मागून घेतला.
प्राजू जन्मल्यापासूनच तिच्या लग्नाची तयारी हळूहळू सुरू झाली होती. तिच्यासाठी एकेक ग्रॅम सोन्याची खरेदी करून ते साठवले होते. ती मोठी झाल्यावर त्याचे अलंकार घडवून घेतले होते. अलीकडे तर कुठेही छानशी साडी किंवा ड्रेस दिसला, एकादी नवी संसारोपयोगी वस्तू दिसली की तिच्यासाठी घेऊन ठेवली जात होती, आपण कोणाकोणाकडे लग्नकार्याला गेलो होतो त्या सगळ्यांना आग्रहाने प्राजूच्या लग्नासाठी बोलावून धूमधडाक्याने तिचा बार उडवायचा असे मनसुबे रचले जात होते. त्यासाठी सर्व नातेवाइकांचे लेटेस्ट पत्ते आणि फोन नंबर एका वेगळ्या वहीत उतरवून काढले होते. पण लग्नसमारंभ तर हे दोघे परस्पर ठरवून मोकळे झाले होते. तिथे इतर कोणाला बोलवायला वाव नव्हता. त्यामुळे जनूभाऊंनी या संमेलनाचा घाट घातला. त्या क्षणाला जो हॉल मोकळा सापडला तो बुक करून टाकला आणि दोन दिवस धांवपळ करून बाकीची सारी जमवाजमव केली. हे पाहता ते संमेलन छानच झाले होते आणि जवळ राहणारी झाडून सगळी आप्तेष्ट मंडळीसुध्दा आली होती. आजकाल कोणी 'खानदानकी इज्जत'चा बाऊ करत नाही.
राहून राहून सर्वांना एकच प्रश्न पडत होता. प्राजक्ताच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींमध्ये भारतीय, हिंदू आणि मराठी मुले शेकड्यांनी असतील, त्यांना सोडून नेमका हा टॉमच कसा तिला भेटला ? त्याचप्रमाणे टॉमला त्याच्यासारखीच गोव्याची एकादी कोंकणी बोलणारी लिझ किंवा मॅग कशी सापडली नाही? कदाचित हे दोघे आपापल्या परिस्थितीच्या कोंडीत सापडल्यामुळे त्या धाग्यानेच एकमेकांत गुंतत गेले असतील आणि त्यांनी दोघांनी मिळून तिला फोडायचे ठरवले असणार!
.. . . . . . . . (समाप्त)
1 comment:
स.न.वि.वि.
"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://marathi-e-sabha.blogspot.com/ या ब्लॉगवरील नवीनतम पोस्ट पहा.
आपल्याला ह्यात सहभागी व्हायला आवडेल असा विश्वास आहे. सहभागी होण्यासाठी shabdabandha@gmail.com येथे ईमेलद्वारे लवकरात लवकर संपर्क करावा ही विनंती.
-शब्दबंध
Post a Comment