Thursday, February 05, 2009

सलिल चौधरी भाग ४

दो बिघा जमीन हा बिमल रॉय यांचा चित्रपट १९५३ साली प्रदर्शित झाला या गोष्टीला आता पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सलिल चौधरी हे मुख्यतः या चित्रपटाचे कथालेखक होते, पण त्यांनी त्याचे संगीत दिग्दर्शनही केले. त्यासाठी त्यांनी स्वरबद्ध केलेली त्यातली चारही गाणी तेंव्हा तर गाजलीच, पण आजदेखील अधून मधून ऐकू येतात. पर्जन्यराजाच्या आगमनाने शेतक-यांच्या मनातले मोर कसे थुई थुई नाचू लागतात त्याचे चित्र "हरियाला सावन ढोल बजाता आया।" या समूहगीताने साक्षात डोळ्यापुढे उभे राहते, तर "भाई रे, धरती कहे पुकारके" या गाण्यात जमीनीपासून दूर जाऊ पाहणा-या किसानाला ती हांका मारते, "कुछ तो निशानी छोड जा " असे विनवते तसेच "तू फिर आये ना आये" असा इशारा देते. अशा प्रकारे हे गाणे सामाजिक आशयाने भरलेले आहे. सलिलदांच्या सामाजिक जाणीवांचे दर्शन त्यात घडते. "अजब तेरी दुनिया, ओ मोरे रामा" हे एक खास उत्तर भारतीय ढंगाचे, ग्रामीण भागातून महानगरात आलेल्या 'भय्या' लोकांचे लोकसंगीत कसे असते त्याचे चांगले उदाहरण आहे. "आजा तू आ, निंदिया तू आ" ही लता मंगेशकरांच्या आवाजातली एक गोड अंगाई आहे.

त्यानंतर पाठोपाठ आलेल्या चित्रपटांमधील गाणीसुद्धा लोकप्रिय होत गेली. कांही गाण्यांच्या चित्रपटांची नांवे आता कदाचित आठवणार नाहीत, किंवा ते कधी पाहिलेसुद्धा नसतील, पण त्या गाण्याची चाल लक्षात राहिली असेसुद्धा सांगता येईल. "नौकरी" हा चित्रपट किती लोकांना आठवत असेल? पण त्यातले "छोटासा घर होगा बादलोंकी छांवमें" या गाण्यात किशोरकुमारने केलेले "हा हा हुइ हुइ हुइहई" मात्र सगळ्यांना आठवते. सलिलदा एकदा काठमांडूला हॉटेलमध्ये उतरले असतांना तिथले गुरखे लोक म्हणत असलेले एक नेपाळी गाणे त्यांच्या कानांवर पडले. त्यांनी ती धुन लक्षात ठेवली आणि तिच्यावर आपले संस्कार करून ती चाल या गाण्याला दिली.

हंसध्वनी या कर्नाटक संगीताकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आलेल्या रागावर आधारलेले "जा तोसे नहीं बोलू कन्हैया। राह चलत पकडी मोरी बैंया।" हे गीत सलिलदांनी "परिवार" या चित्रपटामध्ये दिले आणि लतादीदी आणि मन्ना डे यांनी ते अप्रतिमरीत्या गायिले आहे. त्यात रागदारीच्या सुंदर ताना आहेतच, शिवाय कृष्ण आणि गोपिका यांच्यामधल्या लटक्या रुसव्याफुगव्याचे इतके लोभसवाणे दर्शन घडवणारे ते एक अजरामर गाणे ठरले.

राजकपूरच्या चित्रपटांना बहुधा शंकर जयकिशन यांचेच संगीत असायचे. त्याला अपवाद असलेले जे थोडे सिनेमे आले त्यात "जागते रहो" हे नांव पटकन डोळ्यासमोर येते. हा देखील सामाजिक जाणीव असलेला त्या काळातला एक कलात्मक चित्रपट होता. त्याला कार्लोव्ही व्हेरी इथल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रथम क्रमांक मिळाला होता. पण त्याच्या कथानकात गाण्यांना योग्य अशा जागा नव्हत्या. तरीसुद्धा सलिलदांनी स्वरबद्ध केलेली त्यातली गाणी तुफान लोकप्रिय झाली, कदाचित ती त्या सिनेमापेक्षाही अधिक चालली. स्व.मोतीलाल यांच्या सकस अभिनयाने सजलेले "जिंदगी ख्वाब है, ख्वाबमें झूठ क्या? और भला सच है क्या?" हे दारुड्याचे गाणे जीवनाचे वास्तव स्वरूप सहजपणे सांगते. त्यात एक भांगडा नाच टांकला आहे. मोहंमद रफी आणि बलबीरसिंग यांनी खड्या आवाजात म्हंटलेल्या त्या गाण्यात पहिल्यांदाच हिंदी प्रेक्षकांनी इतके जोरकस "याँहूँ याँहूँ" आणि "बल्ले बल्ले" ऐकले असेल. घोटभर पाण्यासाठी रात्रभर तडफड केल्यानंतर सकाळी नायकाची तृषा मोठ्या कलात्मक रीतीने शांत होते त्या प्रसंगी दिलेले सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देणारे पहिल्या प्रहरी गायल्या जाणा-या भैरव रागावर आधारलेले "जागो मोहन प्यारे" या गाण्याला तर तोड नाही. इतकी गोड आणि शांतरसपूर्ण दुसरी कोणतीही भूपाळी हिंदीमध्ये नसेल.

"अपराधी कौन?" हा रहस्यपट त्यातील कथेच्या त्या काळातल्या नाविन्याने जसा धक्का देणारा होता तसेच त्यातले "द्वार दिलका खुल गया, हाथी निकल गया, दुम रह गयी मगर" हे गाणे गुदगुल्या करणारे होते. रेशमी मुलायम आवाजाचा गायक तलत मेहमूद "एक गांवकी कहानी" या चित्रपटाचा नायक होता. "नीला अंबर झूमे, धरतीको चूमे" आणि "रातने क्या क्या ख्वाब दिखाये" यासारखी तलतने गायिलेली गाणी प्रसिद्ध झाली.

"रातने क्या क्या ख्वाब दिखाये" या गाण्याबद्दल एक मजेदार आठवण माझ्या जीवनाला जोडली गेली आहे. स्टार चॅनेलवर एका काळी गाजलेल्या "मेरी आवाज सुनो" या 'रिअँलिटी शो' कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी प्रेक्षकात बसण्याची संधी आम्हाला मिळाली होती. अन्नू कपूर हे त्या गाण्याच्या स्पर्धेचे सूत्रसंचालक होते. त्यातल्या एका फैरीमध्ये त्यांनी चिठ्ठ्यांनी भरलेला एक वाडगा प्रेक्षकांसमोर धरला आणि एका कन्यकेला त्यातून गाण्याचे नांव असलेली एक चिठ्ठी काढून ती वाचून दाखवायला सांगितले. तिने उचललेल्या चिठ्ठीवर "रातने क्या क्या ख्वाब दिखाये" या गाण्याचे नांव होते. तिला याची चाल ठाऊक नसल्यामुळे ती ते नांव गद्यातच वाचत होती. "प्रेक्षकांमध्ये कोणाला याची चाल येते काय?" असा प्रश्न अन्नू कपूरने विचारताच लगेच मी हांत वर करून ते गाणे गुणगुणून दांखवले. टीव्हीच्या पडद्यावर झळकण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. तो कार्यक्रम त्या काळी खूप लोकांनी पाहिला आणि माझ्या त्या 'चमकण्याचे' सार्थकही झाले.

त्यानंतर आलेल्या "मुसाफिर" सिनेमातील "मुन्ना बडा प्यारा, अम्मीका दुलारा" हे एक मजेदार बालगीत एका कोंकणी लोकगीताच्या चालीवर आधारलेले आहे. त्याच चित्रपटातले "लागी नाही छूटे रामा, चाहे जिया जाये" हे प्रेमगीतसुद्धा खूप चांगले आहे. अशी वाटचाल करत सलिलदांनी पांच वर्षाच्या आंत म्हणजे १९५८ साली 'मधुमती' नांवाचे हिंदी चित्रपटांच्या इतिहासातले एक महत्वाचे शिखर गांठले.
. . . . . . . . . (क्रमशः)

3 comments:

...अंतर्नाद... said...

एकूणच ब्लॉगवरील सलिल चैधरींची माहिती खुपच चांगली आहे.
विकिपेडीयाच्या खालिल दुव्यावर जर आपण ही माहिती टाकलीत तर फार छान होईल.

दुवा :

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80

धन्यवाद,
तुषार पवार

...अंतर्नाद... said...

एकूणच ब्लॉगवरील सलिल चैधरींची माहिती खुपच चांगली आहे.
विकिपेडीयाच्या खालिल दुव्यावर जर आपण ही माहिती टाकलीत तर फार छान होईल.

दुवा :

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80

धन्यवाद,
तुषार पवार

Anand Ghare said...

आभारी आहे. प्रयत्न करेन