Saturday, February 07, 2009

सलिल चौधरी भाग ६

मधुमती हा चित्रपट १९५८ सालचा सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटाला त्या वर्षातली अर्ध्याहूनही अधिक पारितोषिके मिळाली. त्यात सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक सलिल चौधरी यांना मिळाले. त्या चित्रपटालातील गाणी तुफान लोकप्रिय झालीच. १९५३ साली निघालेल्या दो बिघा जमीन पासून मधुमती पर्यंतचा पांच वर्षांचा प्रवास सलिलदा आणि बिमलदा यांनी एकत्र केला होता. बिराज बहू, नौकरी, अमानत, परिवार, अपराधी कौन आदि चित्रपटांसाठी दोघांनीही काम केले होते. मधुमतीच्या यशानंतर मात्र त्यांनी एकत्र केलेला फक्त उसने कहा था हा एकच सित्रपट आला. बंदिनी, सुजाता आदि बिमलदांच्या सिनेमांना सचिनदेव बर्मन यांनी संगीत दिले.

मधुमतीनंतरसुद्धा सलिलदांनी दिलेली गोड व आकर्षक गाणी कांही काळ येतच होती. परखमधील " ओ सजना, बरखाबहार आय़ी, रसके फुहार लायी, अँखियोंमे प्यार लाय़ी।" हे गाणे आतांपर्यंत आलेल्या सर्व पर्जन्यगीतात सर्वात मधुर म्हणता येईल तर " मिला है किसीका झूमका" हे गाणे त्याच्या चालीमधल्या लडिवाळपणानुळे छान वाटते. उसने कहा था मधले "मचलती आरजू, खडी बांहे पुकारे ओ मेरे साजना रे, धडकता दिल पुकारे" या गाण्यात आर्त अशी साद आहे तर "आहा रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत लिये, आय़ी रात सुहानी देखो प्रीत लिये" या उडत्या चालीवरल्या गाण्यात प्रेमाची धुंदी आहे. याच सिनेमातील "जानेवाले सिपाहीसे पूछो के कोई कहाँ जा रहा है" हे गंभीर प्रकृतीचे गाणे आहे. या गाण्याला समूहाच्या कोरसने एक विलक्षण सखोलपणा प्राप्त झाला आहे.

छाया चित्रपटातील "छम छम नाचत आयी बहार" हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारलेले गाणे आहे तर "इतना ना मुझसे तू प्यार बढा कि मै इक बादल आवारा " गाणे मोझार्टच्या सिंफनीचे भारतीय रूप आहे. "आँखोमें मस्ती शराबकी" हे धुंद करणारे गाणे आहे तर "आँसू समझके क्यूँ मुझे आँखसे तूने गिरा दिया" ही एक अतिशय सुंदर गजल आहे. अशी विविधता छाया सिनेमातल्या गाण्यांत आहे. काबुलीवाला सिनेमातले "गंगा आये कहाँसे, गंगा जाये कहाँ रे" या गाण्याला उत्तर भारतीय लोकगीताची चाल आहे तर "ऐ मेरे प्यारे वतन" हे देशभक्तीपर गाणे आहे. त्यात उल्लेख केलेला देश अफगाणिस्तान आहे ही गोष्ट वेगळी. त्याच वर्षी आलेल्या माया सिनेमातली गाणीसुद्धा खूप गाजली. "कोई सोनेके दिलवाला, कोई चाँदीके दिलवाला, शीशेका ऐ मतवाले मेरा दिल", "तसवीर तेरी दिलमे इस दिलने उतारी है", "जा आरे जारे उड जारे पंछी, बहारोंके देस जारे", "ऐ दिल कहाँ तेरी मंजिल" इत्यदि अमर गाणी खास सलिलदांची किमया दाखवतात. आजसुद्धा ही गाणी ऐकू येतात आणि ऐकावीशी वाटतात.

विनोदी प्रकारची गाणी हा एक सलिलदांचा हातखंडा झाला होता. किशोरकुमारचा हाफ टिकट हा सिनेमाच पूर्णपणे विनोदी होता. त्यातले "चील चील चिल्लाके" हे बालगीत मजेदार आहे. किशोरकुमार आणि प्राण यांनी "आके सीधी लगी दिलपे जैसी ये कटरिया, ओ गुजरिया" या गाण्यात जो धुमाकूळ घातला आहे, त्याला तोड नाही. उडत्या सुरांचे हे गाणे हंसवून पोट दुखवते. "वो एक निगाह क्या मिली", "आँखोंमे तुम दिलमे तुम हो" आणि "चाँद रात, तुम हो साथ" ही द्वंदगीतेसुद्धा श्रवणीय आहेत.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: